यंदा रानात झेंडूचं पीक घेणार असाल तर या पाच गोष्टी करायला चुकून ही विसरू नका | Zendu Lagwad In Marathi | Vishaych Bhari
मंडळी सध्या बऱ्याच शेतकऱ्यांनी झेंडू पिकाची लागवड केलीय किंवा बरीच लोक लागवड करण्याच्या विचारात आहेत. तर बघा झेंडू हे पीक काय फक्त आपल्याच राज्याचं नाय तर आपल्या देशाचं सुद्धा महत्वाचं फुलपिकयं आणि या झेंडूच्या फुलांचा उपयोग कुठं कुठं आन कसाकसा होतो ते तुम्हा आम्हाला परफेक्ट माहितेय. त्याचबरोबर सणासूदीचं दिवस आल्यामुळं आन गणपती दसरा काही दिवसावरचं येऊन ठेपल्यामुळं झेंडूच्या फुलांच पीक घेण्यासाठी ह्यो सीझन महत्वाचा ठरतोय. काही तज्ञाच्यामते तर यंदा झेंडूला भरघोस दर येण्याची शक्यताय. म्हणूनच आपण आजच्या लेखामध्ये झेंडू पिकाच्या उत्पादनाबद्दल, त्याच्या एकूण पुढील मार्केटबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत…
( Zendu Lagwad In Marathi | Vishaych Bhari )
तर बघा मंडळी झेंडू हे तिन्ही हंगामात घेतलं जाणार प्रमुख फुलपीकयं जे बऱ्यापैकी आपल्या अख्ख्या राज्यातच घेतलं जातं. पण त्यातल्या त्यात सुद्धा पुणे, नाशिक, नगर, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, परभणी, नांदेड, अकोला, नागपूर, छ. संभाजीनगर या जिल्ह्यात झेंडू मोठ्या प्रमाणावर केला जातो. चला तर मग झेंडूला कशाप्रकारची जमीन लागते इथपासून सुरवात करूयात. तर बघा झेंडू पिकासाठी चांगली आणि कसदार जमीन पाहिज्ये. पाणी धरून ठेवणारी पण पाण्याचा योग्य निचरा असणारी जमीन हवी. ज्याच्यामध्ये सेंद्रिय करबाचं प्रमाण हे 0.5 ते 0.7 टक्के असावं. ज्याचा ph 5.5 ते 7.0 इतका असावा. हवामानाबद्दल बोलायचं झाल्यास झेंडू हे मुख्यत्वानं थंड हवामानाचं पिकयं. म्हणजे थंड हवामानात झेंडूची वाढ आणि फुलांचा दर्जा हा चांगला असतो. रात्रीच्या वेळी जर 15 ते 18 डिग्री पर्यंत तापमान राहिलं तर रोपांची चांगली वाढ़ होते. वातावरणाच्या परिस्थितीनुसार झेंडूची लागवड ही पावसाळी, हिवाळी किंवा उन्हाळी या तीनही हंगामात केली जाते. आफ्रिकन झेंडूची लागवड फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यानंतर किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यापूर्वी केल्यास उत्पादनावर आणि फुलांच्या दर्जावर चांगला परिणाम होतो. त्यामुळे जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून 15 दिवसाच्या अंतरानं लागवड केल्यास ऑक्टोबर ते एप्रिल या कालावधीत भरपूर व दर्जेदार उत्पादन मिळतं. पण सगळ्यात जास्त उत्पादन हे सप्टेंबर मध्ये लागवड केलेल्या झेंडूपासून मिळत. झेंडूच्या पिकाला भरपूर सूर्यप्रकाश आवश्यक असतो. तसं सावलीमध्ये झाडांची वाढ चांगली होते पण फुलांच प्रमाण कमी असत.
( Zendu Lagwad In Marathi | Vishaych Bhari )
आता जातींचा विचार केला तर आफ्रिकन आणि फ्रेंच या दोन प्रकाराचे झेंडू असतात. पण फ्रेंच झेंडूच्या फुलांच्या कमी साईज आणि रंगामुळे आपल्याकडं आफ्रिकन जातीचीचं जास्त प्रमाणात लागवड केली जाते. पण आफ्रिकन जात निवडताना सुद्धा येलो किंवा ऑरेंज या दोन रंगात मार्केटचा अभ्यास करावा. त्यातल्या पण कोणत्या जातीला नेमकी जास्त मागणीय याचाही अभ्यास करावा. आता यलो किंवा पिवळ्या रंगात म्हणाल तर त्यातल्या त्यात पितांबर, टेनिस बॉल, लिरील येलो या इंडस कंपनीच्या आणि कलश 5460, येलो ब्युटी, येलो स्टार, मार्तंड, लक्षमी अशा काही जाती त्याचबरोबर ऑरेंज रंगात अष्टगंधा प्लस, अथर्व, सेंदुरी, ह्या काही जाती सध्या प्रसिद्धयत. आता आपण झेंडूच्या लागवडीपूर्वी काय मशागत करावी. याच्याविषयी जरा बघूया. तर बघा मशागत करताना सगळ्यात पहिल्यांदा शेताची व्यवस्थित खोल नांगरट करून घ्यावी. त्यानंतर कुळवणी करून एकदा रोटावेटर फिरवावा आणि सरी किंवा बेड घालावे. आता तुम्ही दोन्ही प्रकारे लागवड करू शकता. एकतरं सरी किंवा बेड पद्धतीने. गादी वाफा हा 60 सेमी रुंद आणि 30 सेमी उंच असावा. जर सरीने लागवड करत असाल तर 60 सेमीची सरी घालावी. लागवड करताना दोन्ही रोपांमधलं अंतर हे 30 सेमी ठेवावं. पाण्यासाठी ठिबक आणि मल्चिंग पेपर तुम्ही वापरू शकता त्यानं तुम्हाला उत्तम रिझल्ट मिळेल. आता यानंतरचा मुद्दा आहे खतव्यवस्थापन. शेतकरी मित्रांनो झेंडूची लागवड करण्यापूर्वी त्या शेतात 10 ते 12 क्विंटल शेणखत टाकण आवश्यकयं. शेणखत कुजलेलं असावं त्याच्यावर कंपोस्टिंग बॅक्टरियाचा वापर करावा.
( Zendu Lagwad In Marathi | Vishaych Bhari )
जेणेकरून जमिनीत सेंद्रिय करबाच नियोजन होईल. बेसल डोसाविषयी पुढं सांगितलं आहे. आता खताचं म्हणाल तर रोप लागवडी नंतर रोपांना शिफारसी नुसार झेंडूला आळवण्या कराव्या. ज्यामध्ये रोप लागवडी नंन्तर 9 दिवसांनंतर 19 19 19, 12 61, ह्यूमिक ऍसिड, बुरशीनाशक याची आळवणी करावी. ज्यामुळे झाडाची शाकीय आणि त्यांच्या मुळांची वाढ होईल. त्यानंतर 20 व्या ते 25 व्या दिवशी पुन्हा एकदा 12 61 या ग्रेडचा वापर करावा. सोबत एक बुरशीनाशक आणि टॉनिक वापरलं तरी चालेल. जेणेकरून झाडाचे फुटवे आणखी वाढतील. 15 दिवसांच्या टप्प्याने मग पुन्हा झाडाला चांगली मुळं फुटावीत 12 32 16 या खताचा वापर करावा. त्यानंतर पुढं 15 दिवसांची फुलं सेटिंग होण्यासाठी 0:52:34 या ग्रेडचा वापर करावा. त्यानंतर 15 दिवसांनी फुलांचं वजन चांगल मिळावं यासाठी 0:0:50 या खताच्या ग्रेडचा वापर करावा. फवारण्याचं म्हणाल तर प्रत्येक 7 दिवसांनी झेंडूला फवारण्या घ्या. ज्यामध्ये पिकाच्या अवस्थेनुसार मात्रा द्या. पण प्रत्येक फवारणी मध्ये बुरशीनाशक, कीटकनाशक, टॉनिक, स्टिकर यांचा वापर करा. ग्रान्यूल फॉर्म मध्ये म्हणाल तर भरीच्या वेळेस बेसलं म्हणून एकदा आणि भरीच्या वेळेसं एकदा असे दोन डोस तुम्ही देऊ शकता. त्यामध्ये यूरिया, DAP, पोटॅश, मॅग्नेशियम, sulphur, मायक्रो nutrient अशा खतांचा वापर करावा. पाण्याच्या व्यवस्थापनाबद्दल म्हणाल तर उन्हाळी सीजनला झेंडूला दर 6, 7 दिवसांनी पाणी द्यायला लागतं तर रब्बी हंगामात दर 8 दिवसाला आणि खरीप हंगामात 10 ते 15 दिवसांनी. पण शक्यतो पाणी देण्यासाठी ड्रीप इरिगेशन सिस्टीमचाच वापर करावा. झेंडू लावून दोन आठवडे झाले की त्याची खुरपणी करून घ्यावी. आणि खुरपणी करता करताचं झाडाला मातीचीं भर लावून घ्यावी म्हणजे कसं रोपं फुलांच्या ओझ्याने कोलमडून पडणार नाहीत. रोग आणि किडींबद्दल बोलायचं झाल्यास झेंडूला पांढरी लाल माशी, कोळी, मावा तुडतुडे, केसाळ अळी या किंडिंचा प्रादुर्भाव होतो. तर मर आणि करपा असे रोग होतात.
( Zendu Lagwad In Marathi | Vishaych Bhari )
आता बऱ्याच शेतकऱ्यांचा असा प्रश्न असतो की झेंडूच्या झाडांची खुडणी करावी का ? तर बघा आफ्रिकन झेंडू हा उंच वाढतो. त्याची वाढ नियंत्रित ठेवून जास्तीत जास्त फुटवे येऊन उत्पादन वाढावं, म्हणून शेंडा खुडण्याची प्रोसेसयं. शेंडा खुडल्यानं उंच वाढणाऱ्या जातींची वाढ खुंटते , बगल फुटी भरपूर येतात आणि झाडाला झुडपासारखा आकार येतो. जेणेकरून फुलांची संख्या वाढते. पण जर शेंडा खुडण्यास उशीर झाला तर मात्र झाडाच्या वाढ, उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. साधारण 60-65 दिवसांनी फुलं तोडायला येतात. जर तोडल्यानंतर जर फुलं तुम्हाला लेट विकायची तर ती थंड ठिकाणी साठवावीत. जेणेकरून ती खराब होणार नाहीत. भरं उन्हात फुलांची तोडणी करू नये. एकतरं सायकांळी नाहीतर सकाळी लवकर फक्त या दोन्हीच वेळेस फुलांची तोडणी करावी. ह्या अश्या काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या तर नक्कीच तुम्हाला झेंडूच भरघोस उत्पादन मिळू शकत. आता मार्केट विषयी बोलाल तर झेंडूच मार्केट हे सणासुदीच्या काळात चांगलंच तापतं . मग 100 150 रुपये किलो सुद्धा त्याला दर येतो. तज्ञाच्या मते यंदा ही झेंडूची सरासरी लागण कमी झाल्यामुळे झेंडूला चांगला दर येण्याचे चान्सेस आहेत. पण असं असूनसुद्धा काही शेतकरी मात्र फुल शेतीला बगल देताना दिसतायत. कदाचित त्याची कारण वेगळी असू शकतात. पण फुलशेती ही शेतकऱ्यांसाठी हमी भाव आणि उत्पादन देणारी झालीय. त्यामुळं शेतकऱ्यांनी फुलशेतीकडे डोळेझाक करू नये, असंच काही कृषीतज्ञांना वाटतंय. बाकी तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला. झेंडूच्या आगामी मार्केटबद्द्दल , दराबद्दल तुमचा अंदाज काय सांगतोय ? हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही झेंडू लागवड केली आहे का? आणि त्यासंदर्भात तुमच्या काही अडचणी असतील तर त्याही आम्हाला कमेंट करून कळवा. आपण नक्की त्या मिळून,solve करण्याचा प्रयत्न करू.बाकी, जर ही माहिती आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा.
Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇
https://www.facebook.com/aplavishaychbhari
Leave a Reply