रायगड जिल्ह्याचा पुढचा खासदार कोण सुनील तटकरे की अनंत गीते कोणाची ताकद जास्तय ? | Vishaych Bhari | Sunil Tatkare | Anant Gite
महाराष्ट्राच्या राजकारणात कोकण म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून कोकणातील मतदारांनी शिवसेनेला साथ दिली आहे. काही अपवाद वगळता कोकणातील बऱ्याच लोकसभा मतदारसंघांमध्ये शिवसेनेचं वर्चस्व राहिलेलं आहे. अशाच मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ म्हणजे रायगड लोकसभा मतदारसंघ. गेल्या लोकसभा निवडणुकीत इथे शिवसेनेचे उमेदवार अनंत गिते यांचा थोडक्यात पराभव झाला होता. सध्या या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात असलेले सुनील तटकरे खासदार आहेत. मात्र शिवसेनेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीमुळे या मतदारसंघातील समिकरणं पूर्णपणे बदलली आहेत. सध्या या मतदारसंघात नेमकी काय परिस्थिती आहे, कोण रायगडमधून पुढील खासदार होऊ शकतं . अनंत गीते की सुनील तटकरे, ताकद कोणाची जास्तंय? चला सगळंच सविस्तर पाहूयात.
(Vishaych Bhari | Sunil Tatkare | Anant Gite)
मंडळी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाल्यानंतर या बंडात आघाडीवर असलेल्या नेत्यांना पराभूत करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी जणू चंगच बांधलाय. या दोन्ही नेत्यांच्या हिटलिस्टवर असलेल्या नेत्यांपैकीच एक आहेत सुनील तटकरे. सुनील तटकरे हे सध्या रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अनंत गीतेंकडून तटकरेंचा निसटता पराभव झाला होता. मात्र सुनील तटकरे यांनी २०१९ मध्ये अटीतटीच्या लढतीत गीतेंचा पराभव करत दिल्ली गाठली आहे. मात्र आता अजित पवारांचे खंदे समर्थक असलेल्या तटकरे यांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागण्याची शक्यता आहे. रायगड लोकसभा मतदार संघातील राजकीय वातावरण पाहिल्यास या मतदारसंघांमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेकाप आणि भाजप या पक्षांचा ठरावीक जनाधार आहे. रायगड लोकसभा मतदारसंघ २००९ मध्ये पुनर्रचनेनंतर नव्याने अस्तित्वात आला होता. २००९ मध्ये शिवसेनेच्या अनंत गीते यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते बॅरिस्टर अंतुले यांचा १ लाख ४६ हजार ५२१ मतांनी पराभव करून विजय मिळवला होता. २०१४ मध्ये इथे रंगतदार लढत झाली होती. त्या निवडणुकीत अनंत गीतेंसमोर राष्ट्रवादी काँग्रेसने सुनील तटकरे यांच्या रूपात मोठे आव्हान उभे केले होते. तर शेतकरी कामगार पक्षानेही उमेदवार उतरवून ही लढत तिरंगी केली होती. शेकापचे उमेदवार रमेशभाई कदम यांनी तब्बल १ लाख २९ हजार मतं खेचल्याने इथली समिकरणं आयत्यावेळी बदलली होती. त्यावेळी मतमोजणीच्या शेवटच्या फेऱ्यांपर्यंत सुनील तटकरे आणि अनंत गीते यांच्यात चढाओढ सुरू होती. अखेरीस या लढतीत अनंत गीते यांनी अवघ्या २ हजार ११० मतांनी बाजी मारली होती. या निवडणुकीत सुनील तटकरे नावाच्या दुसर्या एका अपक्ष उमेदवाराने घेतलेली ९ हजार ८४९ मतं राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंच्या पराभवामध्ये निर्णायक ठरली होती. तर २०१९ मध्ये मात्र सुनील तटकरे यांनी या पराभवाचा वचपा काढताना अनंत गीतेंचा ३१ हजार ४३८ मतांनी पराभव केला होता. त्यावेळी रायगडमध्ये एका अपक्ष उमेदवार आणि वंचितनं घेतलेली मतं ही तटकरेंच्या पथ्यावर पडली होती.
(Vishaych Bhari | Sunil Tatkare | Anant Gite)
पण आता २०२४ मध्ये सुनील तटकरेंना आव्हान देण्यासाठी महाविकास आघाडीकडून कुणाला उतरवलं जातंय, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.अनंत गीते हेच इथून सध्यातरी दावेदार दिसतायत. असो तर रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी चार मतदारसंघ हे रायगड जिल्ह्यातील तर दोन मतदारसंघ हे रत्नागिरी जिल्ह्यातील आहेत. त्यातील एका मतदारसंघात भाजपा, तीन मतदारसंघात शिंदे गट, एका मतदारसंघांत ठाकरे गट आणि एका मतदारसंघात अजित पवार गटाचा आमदार आहे. या मतदारसंघांचा आता आपण सविस्तर आढावा घेऊ. रायगड लोकसभा मतदारसंघातील पेण विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपाचे रवीशेठ पाटील आमदार आहेत. त्यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाच्या धैर्यशील पाटील यांचा २४ हजार मतांनी पराभव केला होता. सद्यस्थितीत या मतदारसंघामध्ये भाजपाला आव्हान मिळेल, अशी फारशी परिस्थिती नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत इथे महायुतीच्या उमेदवाराला आघाडी मिळू शकते. या लोकसभा मतदारसंघातील दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे अलिबाग. शेकापचं वर्चस्व राहिलेल्या या मतदारसंघात २०१९ मध्ये शिवसेनेच्या महेंद्र दळवी यांनी धक्कादायक निकालाची नोंद केली होती. दळवी यांनी शेकापच्या सुभाष पाटील यांचा तब्बल ३२ हजार मतांनी पराभव केला होता. शिवसेनेत झालेल्या बंडानंतर महेंद्र दळवी हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले असून, सध्या इथे शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये फूट पडलेली आहे. त्यामुळे सद्यस्थितीत इथे अटीतटीचं चित्र असून, लोकसभेतही संमिश्र मतदान होण्याची शक्यता आहे.
(Vishaych Bhari | Sunil Tatkare | Anant Gite)
रायगड लोकसभा मतदारसंघातील तिसरा विधानसभा मतदारसंघ असलेल्या श्रीवर्धनमध्ये सुनील तटकरे यांच्या कन्या अदिती तटकरे या आमदार आहेत. अदिती तटकरे या सध्या अजित पवार गटात असून, त्या राज्य सरकारमध्ये मंत्री आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अदिती तटकरे यांनी शिवसेनेच्या विनोद घोसाळकर यांचा तब्बल ३९ हजार मतांनी पराभव केला होता. या मतदारसंघात अजित पवार यांच्यासोबत असलेल्या सुनील तटकरे यांची चांगली पकड आहे. त्यामुळे इथे जनाधार मिळवणे महाविकास आघाडीला जड जाण्याची शक्यता आहे. रायगड लोकसभा मतदारसंघात येणारा रायगड जिल्ह्यातील चौथा मतदारसंघ आहे तो महाड. महाड मतदारसंघात १९९० पासून शिवसेनेचं वर्चस्व राहिलेलं आहे. २००४ चा अपवाद वगळता इथून शिवसेनेचा उमेदवार विजयी होत आला आहे. २००९ पासून इथे भरत गोगावले आमदार म्हणून निवडून येत आहेत. २०१९ मध्ये गोगावले यांनी काँग्रेसच्या माणिकराव जगताप यांचा २१ हजार मतांनी पराभव केला होता. मात्र शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर भरत गोगावले हे शिंदेंसोबत गेले आहेत. त्यामुळे या मतदारसंघातही शिवसेनेत फूट पडली आहे. गोगावलेंच्या बंडखोरीला आव्हान देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी इथले माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या स्नेहल जगताप यांना ठाकरे गटात आणले आहे. त्यामुळे इथे भरत गोगावले यांच्यासमोर कडवं आव्हान उभं राहिलं आहे. त्याचा परिणाम इथून लोकसभा निवडणुकीत होणाऱ्या मतदानावरही होण्याची शक्यता आहे. या लोकसभा मतदारसंघातील पाचवा आणि रत्नागिरी जिल्ह्यात मोडणारा मतदारसंघ म्हणजे दापोली. या मतदारसंघात सध्या शिंदे गटाचे योगेश कदम हे आमदार आहेत. २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजय कदम यांचा १३ हजार ५७८ मतांनी पराभव केला होता. मात्र योगेश कदम शिंदे गटात गेल्यापासून इथली समिकरणं बदलली आहेत. तसेच कदम यांच्याविरोधात विरोधक एकत्र आले आहेत. दापोली हा रामदास कदम यांचा बालेकिल्ला मानण्यात येतो.
(Vishaych Bhari | Sunil Tatkare | Anant Gite)
पण यावेळेस इथे वर्चस्व कायम राखताना योगेश कदम यांची दमछाक होण्याचीच शक्यता आहे. या मतदारसंघातील सहावा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे गुहागर. या मतदारसंघावर कोकणातील मातब्बर नेते असलेल्या भास्कर जाधव यांचं वर्चस्व आहे. सध्या ठाकरे गटात असलेले भास्कर जाधव इथून राष्ट्रवादी आणि शिवसेना अशा दोन्ही पक्षांकडून निवडणूक लढवून जिंकून आले आहेत. २०१९ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहदेव बेटकर यांचा २६ हजार ५०० मतांनी त्यांनी पराभव केला होता. शिवसेनेत फूट पडल्यानंतरही भास्कर जाधव हे ठाकरेंसोबत राहिले आहेत. तसेच त्यांच्या मतदारसंघात ठाकरे गटात फार मोठी फुटाफूट झालेली नाही. त्यामुळे इथून महाविकास आघाडीला फायदा मिळण्याची शक्यता आहे. एकंदरीत रायगड लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला असता सध्या इथे आमदारांच्या संख्येमध्ये महायुती आघाडीवर असली तरी स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीचाही बऱ्यापैकी जनाधार आहे. मात्र इथे निवडणूक कुणी लढायची यावरून दोन्ही आघाड्यांतील पक्षांमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे २०१९ मध्ये इथे राष्ट्रवादी काँग्रेसचा खासदार निवडून आला होता. तर शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर होती. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये हा मतदारसंघ ठाकरे गटाकडे जातो की शरद पवार गट आपल्याकडे ठेवतो हे पाहावे लागेल. तर विद्यमान खासदार सुनील तटकरे हे अजित पवारांसोबत महायुतीमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे महायुतीकडून तेच उमेदवार असण्याची शक्यता आहे. मात्र त्यांच्याबाबत शिंदे गट काय भूमिका घेतो हे पाहावे लागेल. सध्या रायगड जिल्ह्यात चांगला जनाधार असलेला शेकाप हा महाविकासआघाडीमध्ये असल्याने इथे महाविकासआघाडीचं बळ वाढलेलं आहे. त्यामुळे इथून पुन्हा एकदा निवडूण येणं हे सुनील तटकरे यांच्यासाठी तितकसं सोपं नसेल, हे ही तितकंच खरंय. बाकी तुम्हाला काय वाटतंय , रायगडमध्ये ताकद कोणाची जास्तंय? कोण रायगडचा पुढील खासदार होऊ शकतो, अनंत गीते, सुनील तटकरे की मग अजून कोण? तुमच्या मनातील रायगडच्या खासदाराचं नाव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा .
Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇
https://www.facebook.com/vishaychbhari
https://www.facebook.com/aplavishaychbhari
Leave a Reply