२६ तास लाटांशी झुंजला, सगळं संपलं होतं पण गणपती बाप्पानं लखनला वाचवलं | VIshaych Bhari | lakhan devipujak News


मंडळी तुम्ही लाईफ ऑफ पाय नावाचा सिनेमा बघितला असेल. त्यात एका सर्कस मालकाचं कुटुंब त्याच्या सर्कशीतल्या प्राण्यांसोबत जहाजातून समुद्रामार्गे प्रवास करत भारताकडं येत असतं. तेव्हा अचानक उसळत्या लाटांमुळं त्यांचं जहाज बुडतं आणि त्या भयानक संकटाततून फक्त दोघं जण वाचतात. त्यापैकी एक असतो खुद्द सर्कस मालकाचा मुलगा पाय तर दुसरा असतो त्यांच्या सर्कशीतला एक वाघ. पण ती दोघं ही खवळलेल्या समुद्राच्या मध्यभागी अडकून पडतात. मग त्या वाघासोबत जीव मुठीत धरून राहणारा पाय, खाण्यापिण्यावाचून त्याच्या हाडाची झालेली काडं अन तब्बल दोन ते तीन महिने उसळलेल्या समुद्राशी चाललेली त्याची झुंज अशा रिअल घटनेवर आधारित तो सिनेमा बनवला होता. सेम तशीच एक घटना घडलीये आता सुरतच्या लखनसोबत. समुद्रकिनारी खेळता खेळता लखन पाण्याच्या लाटेसोबत समुद्रात ओढला गेला अन थेट गायबच झाला. खूप शोध घेऊनही तो सापडेना म्हणून घरच्यांनी त्याच्या अंत्यविधीची तयारी केली. पण नंतर अचानक 26 तासांनी तो सापडला चक्क एका लाकडी फळीसोबत. त्या 26 तासात त्याच्यासोबत नेमकं काय काय घडलं, त्यानं समुद्राच्या मध्यभागी अंधारी रात्र एकट्यानं कशी काढली सगळं सविस्तर पाहूयात,

lakhan devipujak

(lakhan devipujak News | VIshaych Bhari)


इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या बातमी नुसार, २९ सप्टेंबर 2023 चा तो दिवस. उधाणलेला समुद्र होता. 12 वर्षांचा लखन देवीपूजक हा त्याचा छोटा भाऊ करन आणि छोटी बहीण अंजली यांच्यासोबत सुरतच्या दमास समुद्र किनाऱ्यावर खेळत होता. ते तिघेही त्यांची आजी शेवंताबेन देवीपूजक यांच्यासोबत किनाऱ्यावर खेळायला आले होते. आधी शेवंताबेन आपल्या तिन्ही नातवंडावर व्यवस्थित नजर ठेवून होती. पण पोरं किनाऱ्यापासून लांब खेळतायत आणि त्यांना कोणताही धोका नाही हे पाहून थोड्या वेळानं शेवंताबेन यांचं पोरावरचं लक्ष कमी झालं. मात्र खेळता खेळता करन समुद्राच्या अधिक जवळ गेला आणि अचानक पाण्यात ओढला गेला. त्ये पाहून लखननं पळत जाऊन त्याला घट्ट पकडलं आणि पाण्याबाहेर खेचलं. पण करनला बाहेर काढत असताना लखनला स्वतःचा बचाव करणं जमलं नाही. त्याची ताकद कमी पडली अन तो पाण्यात खेचला गेला. पाण्यात खेचल्याबरोबर लखन अचानक गायबचं झाला. आपला भाऊ कुठेचं दिसेना यामुळं भेदरलेल्या करन आणि अंजलीनं एकच गलका केला. पोरांचा कालवा ऐकून शेवंताबेन तातडीनं पोरांजवळ गेली पण तिला लखन कुठेच दिसला नाही. तिचा जीव घाबराघुबरा झाला. दरम्यान लखनच्या आजीनं मदतीसाठी आरडाओरड सुरू केली. आजी आणि तिची दोन्ही नातवंड रडायला लागली होती. त्यांचा आवाज ऐकून काही तरुण तिथं जमा झाले. शेवंताबेन यांनी घडलेला सगळा प्रकार सांगितला आणि त्यांच्याकडं मदत मागितली. मग त्या तरुण पोरांनी समुद्राच्या पाण्यात उड्या मारून लखनचा शोध घेतला पण समुद्र खवळलेला असल्यामुळं त्यांना जास्त आतमध्ये जाता आलं नाही. त्यांना लखनला शोधण्यात अपयश आलं. ही सगळी दुर्दैवी घटना 29 तारखेला साधारण दुपारी दीडच्या सुमारास घडली अशी माहिती लखनचे काका विजय देवीपूजक यांनी माध्यमांना दिली. पुढं मग त्यासंबंधी लखनच्या घरच्यांनी अग्निशमन विभाग आणि दमास पोलिसांना सदर घटनेची संपूर्ण माहिती दिली.

(lakhan devipujak News | VIshaych Bhari)

माहिती मिळाल्यानंतर दमास पोलिसांनी तातडीनं लखनला शोधण्याची मोहीम हाती घेतली. पण तरीही लखनचा कुठेच पत्ता लागला नाही. असं लखनचे काका विजय देवीपूजक यांनी सांगितलं. इकडं तोवर लखनच्या घरी रडारड सुरू झाली होती. आपलं पोरगं कायमच आपल्याला सोडून गेलं असं समजून लखनच्या आई वडिलांची रडून रडून वाईट अवस्था झाली होती. शेजारीपाजारी ही तशीच कुजबुज सुरू होती. बरेचजण लखनच्या अंत्यविधीची तयारी करा असं म्हणत होते. पण तरीही लखनच्या काकांनी धीर सोडला नव्हता. दरम्यान दुसऱ्या दिवशी ३० सप्टेंबर रोजी नवसारी जिल्ह्याच्या भाट गावातले एक मच्छीमार रसिक तांडेल हे त्यांच्या एका सहकाऱ्यासोबत समुद्रात बोट घेऊन गेले होते. त्यावेळी त्यांना लांब काहीतरी हलताना दिसलं. पण त्ये नेमकं काय आहे त्यांना कळलं नाही. त्यामुळं ते आणि त्यांचे सहकारी बोट घेऊन आणखी पुढं गेले. जवळपास १२ नॉटिकल मैल इतकं अंतर कापल्यानंतर त्यांना एका लाकडी फळीजवळ एक हात हलताना दिसला. तो हात पाहून रसिक तांडेल आणि त्यांचे सहकारी बुचकळ्यात पडले. इतक्या आत समुद्रात फक्त लाकडी फळीच्या साथीनं कुणीतरी वाहत आलंय याचं त्यांना आश्चर्य वाटलं म्हणून त्यांनी वेगानं बोट त्या फळीच्या दिशेने नेली. जवळ पोहोचल्यावर त्यांना समुद्राच्या मध्यभागी एक मुलगा फक्त एका लाकडी फळीच्या मदतीनं तरंगताना दिसला. तो लखन होता. जगण्याच्या प्रचंड इच्छेपायी त्यानं तब्बल 26 तास जीवघेण्या लाटांचा सामना करून निव्वळ एका लाकडी फळीच्या जोरावर स्वतःला जिवंत ठेवलं होतं. नंतर मग त्यांनी लखनच्या दिशेनं दोर फेकला आणि त्याला बोटीत ओढून घेतलं. पुन्हा त्यांनी लखनला चहा, पाणी आणि कोरडे कपडे दिले. ब्लँकेट दिलं.

रसिक तांडेल

(lakhan devipujak News | VIshaych Bhari)


दरम्यान लखननं त्यांना भावाला वाचवताना आपला तोल कसा गेला हे सांगितलं. त्यानं त्याच्या वडिलांचा आणि काकांचा नंबर ही तांडेल यांना दिला. त्यानंतर मग तांडेल वायरलेस सेटच्या माध्यमातून नवसारीच्या धोलई बंदरावर परतणाऱ्या एका बोटमनशी बोलले आणि त्यानं मरीन पोलिसांना घटनेची माहिती आणि त्या मुलाच्या पालकांचा नंबरही दिला. ही सगळी माहिती रसिक तांडेल यांनी माध्यमांना दिली. तांडेल यांनी पाठवलेली माहिती मिळाल्यानंतर पोलीसांनी तातडीनं धोलई बंदरावर रुग्णवाहिका आणि डॉक्टर पाठवले. लखनच्या कुटुंबीयांनाही त्याची माहिती दिली. पोलीस निरीक्षक एम. आर. छावडा यांनी दिलेल्या माहीतीनुसार रविवारी, अर्थात १ ऑक्टोबर रोजी पहाटे ४ वाजता रसिक तांडेल यांची नवदुर्गा बोट धोलई बंदरावर पोहोचली. त्यातून लखनला खाली उतरवण्यात आलं आणि त्याची वैद्यकीय तपासणी केली गेली. पुढं लखनला त्याच्या कुटुंबीयांशी भेटवण्यात आलं. लखनच्या आईनं समुद्राशी दोन हात करून आलेल्या आपल्या लेकाचे मुके घेतले आणि त्याला छातीशी कवटाळलं. पुढं लखनला निराली रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथं एक दिवस उपचार घेतल्यानंतर त्याला सोमवारी घरी पाठवण्यात आलं. आता इथंपर्यंत तुम्ही ऐकली लखनच्या survival ची गोष्ट. पण तुम्हाला माहितीये का लखनला 26 तास पाण्यात ज्या फळीनं आधार दिला ती लाकडी फळी कुठून आली होती. तर ऐका लखनचे काका विजय देवीपूजक यांनी दिलेल्या माहितीनुसार २८ सप्टेंबरला दमासच्या समुद्रात मोठ्या गणेश मूर्तीचे विसर्जन झालं होतं. विसर्जना दरम्यान मूर्तीसोबत एक लाकडी तराफा होता. त्याचं तराफ्याची एक फळी निसटून बाजूला झाली होती. अन 29 तारखेला रात्री जेव्हा लखन समुद्रात पोहून स्वत:चा बचाव करत होता तेव्हा त्याला भयंकर दम लागला होता. अंधारात काहीच नीट दिसत नव्हतं. आता आपण वाचणार नाही असंच त्याला वाटत होतं पण तेवढ्यात गणेश मूर्ती बसवलेली तीच लाकडी फळी तरंगत त्याच्या बाजूला आली. मग लखननं तातडीनं ती फळी पकडली अन त्या फळीच्या आधारे तो रात्रभर तग धरून राहिला.

(lakhan devipujak News | VIshaych Bhari)

लखनचे काका म्हणाले, आम्हाला वाटतं गणपतीनंच लखनचा जीव वाचवला. कारण लखनच्या वडिलांनी तर तो जिवंत परत येईल याची आशाच सोडली होती. त्याच्या अंत्यसंस्कारांसाठी ते लखनचा मृतदेह शोधत होते. पण आम्ही जेव्हा त्याला जिवंत पाहिलं, तेव्हा आम्ही नि:शब्द झालो होतो. आम्ही रसिक तांडेल यांची भेट घेतली आणि त्यांचे मनापासून आभार मानले. लखनचे वडील विकास देवीपूजक यांच्या डोळ्यात हे सांगताना आसवं दाटली होती. तर मंडळी अशा प्रकारे समुद्राच्या मध्यावर तब्बल २६ तास तरंगत राहून निव्वळ 12 वर्षाच्या लखननं सर्वासमोर आदर्श ठेवलाय की संकट कितीही मोठं असो त्यातून, तुमच्यात लढण्याची धमक असली की मार्ग मिळतोचं. लखनच्या त्या जिद्दीला विषयच भारी टीमचा सलाम. तुम्हाला 12 वर्षीय लखनची ही संघर्षगाथा ऐकून नेमकं काय वाटलं त्ये आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

२६ तास लाटांशी झुंजला, सगळं संपलं होतं पण गणपती बाप्पानं लखनला वाचवलं | VIshaych Bhari

Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇

https://www.facebook.com/vishaychbhari

https://www.facebook.com/aplavishaychbhari

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *