लंडनमध्ये खुलेआम फिरणाऱ्या विजय माल्ल्याला अटक का होतं नाही | Vijay Mallya Story | Scam


तो सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आला होता. बड्या बापाची बडी औलाद. लोकं त्याला किंग ऑफ गुड टाईम्स म्हणायचे. म्हणजे चांगल्या वेळेचा राजा. त्याचा कधीचं खराब टाईम येणार नाही असा त्याच्यापेक्षा जास्त त्याला ओळखणाऱ्या लोकांना विश्वास होता. अतिशय कमी काळात जास्त वेगानं पैसा कमवायची ही त्याच्यात सनक आणि नशा होती. राजेशाही थाट त्याच्या रक्तात होता. त्यामुळं तो कायम थाटात राहायचा आणि लोकं त्याला इंडियाचा सगळ्यात स्टायलिश बिजनेसमन म्हणून ओळखावायचे. त्याच्या बर्थडेला तो जगभरातल्या टॉप 500 पॉवरफुल्ल लोकांना स्पेशल निमंत्रण द्यायचा. थेट हॉलिवूडच्या बेस्ट सिंगरकडून गाणी म्हणून घ्यायचा. त्यानं पैसा फक्त उधळला नाय तर पैशांचा बेक्कार माज केला. पण शेवटी पैशाच्या धुंदीत त्याच्याकडून एक चूक झालीचं अन त्याचा गुड टाईम कायमस्वरूपी खराब टाईममध्ये बदलला. बरं त्यानंतर ही तो थांबला नाही, त्यानं देशातल्या तब्बल 18 बँकाना गंडा घातला अन लोकांच्या मेहनतीचे साडे नऊ हजार कोटी बुडवून तो कायमचा देश सोडून पळून गेला. कदाचित इतकं सगळं सांगितल्यानंतर तुम्हाला त्याची वेगळी ओळख करून देणं म्हणजे पाप ठरेल. हो, तुम्ही बरोबर ओळखलंय, आपण बोलतोय किंगफिशर कंपनीचा मालक Vijay Mallya बद्दल. आजच्या या Blog मध्ये आपण त्यानं देशातील बँकाना कसं गळाला लावलं, त्यासाठी प्रत्येकवेळी त्याला कुणी मदत केली, त्याला कोणाचा राजकीय पाठिंबा मिळाला, नोटीस जारी केलेली असताना सुद्धा तो भारत सोडून गेलाच कसा, कुणी त्याच्या लुकआऊट नोटीस मध्ये फेरफार करुन त्याला पळून जाण्यासाठी मदत केली या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत,

Vijay Mallya

(Vijay Mallya Story | Scam)


माल्ल्याची गोष्ट सुरू होते कोलकत्तापासून. 18 डिसेंबर 1955 रोजी त्याचा कोलकत्तामध्ये एका श्रीमंत कुटुंबात जन्म झाला. त्याचे वडील विठ्ठल माल्ल्या ह्ये देशातले एक टॉपचे बिजनेसमन होते. ते UB Group म्हणजे युनाइटेड ब्रिव्हरीजचे चेअरमन होते. विठ्ठल माल्ल्या हार्डकोअर आणि थंड डोक्यानं बिजनेस करणारे व्यक्ती होते. कोणताही बिजनेस दीर्घकाळ चालला पाहिजे अशी त्यांची धारणा होती. त्यामुळं ते जपून आणि त्यांच्या सोबतच्या लोकांची मर्जी राखून पाऊल टाकायचे. अगदी त्यांच्या कंपनीत काम करणाऱ्या कामगारांची सुद्धा. त्यांच्या UB Group च्या अंडर त्याकाळी 60 वेगवेगळ्या कंपन्याचं काम चालायचं. ज्यामध्ये Fertilizer, engineering, aviation, alcoholic beverages अशा अनेक प्रॉडक्ट्सचा समावेश होता. पण त्यात सगळ्यात फायदेशीर होती लिकर बनवणारी किंगफिशर कंपनी. म्हणजे एकूणचं UB ग्रुपचा पसारा मोठा होता. दरम्यान विजय माल्ल्यानं कोलकातामधून त्याचं शालेय शिक्षण पूर्ण केलं. पुढं कोलकाताच्याचं सेंट झेवियर्स कॉलेजमधून ग्राज्यूएशन पूर्ण केलं अन पुढं पोस्ट ग्राज्यूएशन करण्यासाठी तो अमेरिकेला गेला. दरम्यान ग्राज्यूएशनला असताना त्यानं काही काळ वडिलांच्या कंपनीत इंटर्नशिप केली होती. अमेरिकेला गेल्यावर सुद्धा त्यानं तेच केलं. तिथल्या एका प्रसिद्ध कंपनीत नोकरी म्हणजेचं इंटर्नशिप केली अन 1980 च्या दरम्यान तो माघारी आला. पुन्हा घरच्याचं कंपनीत जॉब करू लागला. दरम्यान 1983 साली एक दुर्दैवी घटना घडली. एका सक्सेस पार्टी दरम्यान विजयच्या वडिलांना हार्ट अटॅक आला आणि त्यात त्यांचं निधन झालं. झालं, वडिलांनंतर विजय UB ग्रुपचा मुख्य संचालक झाला. त्यानं UB ग्रुपची सगळी सूत्रे त्याच्या हातात घेतली. वडील हयात असताना त्याला कंपनीच्या मिटींग्जमध्ये निर्णय घ्यायची मुभा नव्हती. पण आता त्याला रान मोकळं होतं. विजय माल्ल्याचा स्वभाव त्याच्या वडिलांच्या अगदी उलटा होता. त्याला अतिशय जलदगतीनं देशातला सर्वात मोठा बिजनेसमन व्हायचं होतं. त्या दृष्टीनं तो त्याची पाऊलं टाकत होता. दरम्यान 1986 साली विजय माल्ल्या एअर इंडियाची एक एअर हॉस्टेस समीरा तायबजी हिच्या सोबत लग्न करतो. त्या दोघांना सिद्धार्थ नावाचा एक मुलगा होतो. काही काळ एकत्र राहिल्यानंतर विजय आणि समीराच्या नात्यात दुरावा निर्माण होतो अन ते वेगवेगळे राहू लागतात. दरम्यानच्या काळात माल्ल्या फुल्ल टू बिजनेसवर फोकस करू लागतो. त्याच्या UB ग्रुपचा टर्नओव्हर तब्बल 64 टक्क्यानी वाढवतो. 1988 साली तो बर्जर पेंट्स, बँगलोर फर्टीलाईजर, एशियन एज न्यूजपेपर आणि अनेक फिल्मी मॅगझीन्सच्या व्यवसायांना UB ग्रुपच्या अंडर आणण्यात यशस्वी होतो. तो काळ विजय माल्ल्याचा सुवर्णकाळ होता असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. कारण त्याकाळी बुलेट ट्रेनच्या वेगानं त्याची प्रगती सुरू होती. त्याचंकाळात म्हणजे 1993 साली मोके पे चौका मारून विजय माल्ल्या रेखा नावाच्या एका महिलेशी लग्न करतो. लग्नानंतर रेखाची पहिली मुलगी लीलाला सुद्धा दत्तक घेतो. पुढं जाऊन रेखा आणि विजयला तानिया अन लियाना नावाच्या आणखी दोन मुली होतात.

(Vijay Mallya Story | Scam)


तो असा काळ होता जेव्हा विजय माल्ल्याची पॉप्युलॅरिटी दिवसागणिक वाढत होती. त्याच्या उच्चराहणीमुळं त्यो इंडियाचा मोस्ट स्टायलिश बिजनेसमन म्हणून नावारुपाला येत होता. त्याची पॉलिटिक्स, मोठंमोठे अधिकारी, खेळाडू आणि बॉलिवूडमधल्या सेलिब्रेटी यांच्यावर प्रभाव वाढत होता. फक्त भारतच नाय तर भारताबाहेरील पॉवरफुल्ल लोकांसोबत त्याची उठबस सुरू होती. सगळं व्यवस्थित सेट झालेलं होतं. त्याला आधी भारतातला अन नंतर आशियातला सगळ्यात श्रीमंत व्यावसायिक बनायचं होतं. पुढं 2002 साल उजाडतं आणि माल्ल्याची पॉलिटिक्समध्ये एन्ट्री होते. अन पुढं जाऊन तीच गोष्ट त्याच्या अधोगतीला कारणीभूत ठरते. ती कशी ते आता आपण पाहू. मित्रांनो विजय माल्ल्याची वाढती लोकप्रियता पाहून काँग्रेस आणि बीजेपी दोन्ही पक्षाकडून त्याला आपल्यासोबत घेण्याची तयारी सुरू होती. पण काँग्रेस आणि JDS युतीचा उमेदवार म्हणून तो राज्यसभेवर गेला. त्यावेळी देशात UPA चं आघाडी सरकार बनलेलं होतं. माल्ल्या मग त्याच्या ओळखीचा फायदा उठवून 2004 साली बँकाकडून 8040 करोड रूपयांचं पहिलं लोन मिळवतो. पुढं 2005 साली माल्ल्या त्याचा 50 वा बर्थडे ग्रँड पद्धतीनं साजरा करतो. असं म्हणतात तब्बल पाच दिवस गोव्यात त्याच्या बर्थडेची पार्टी सुरू होती. जगभरातल्या 500 इम्पॅक्टफुल माणसांना त्यानं त्यासाठी निमंत्रण दिलं होतं. अमेरिकेन पॉपस्टार लिओनेल रिचीकडून त्यानं गाणं ही म्हणून घेतलं होतं. दरम्यान त्याचंवर्षी तो त्याचा मुलगा सिद्धार्थ माल्ल्याला किंगफिशर एअरलाईन्स ही कंपनी गिफ्ट करतो. त्यासाठी तो उपलब्ध झालेल्या कर्जाच्या रकमेतून 70 नवीन विमानं आणि 50 बसेस विकत घेतो. दोन वर्षात त्याची किंगफिशर एअरलाईन्स जबरदस्त ग्रीप पकडते. सतत फॉरेन ट्रिप करत असल्यामुळं माल्ल्याला परफेक्ट कळलं होतं की लोकांना विमानात काय सेवा पाहिजे. त्यानं VIP सोयी सुविधासोबत जगभरातल्या विश्वसुंदऱ्यांना लाजवतील अशा टॉप क्लास एअर हॉस्टेस कामावर ठेवल्या. असं म्हणतात तेव्हा किंगफिशर एअरलाईन्सच्या एअर हॉस्टेसना पाहता यावं म्हणून अनेक VIP लोकं मुद्दाम किंगफिशरच्या विमानातून प्रवास करायची. माल्ल्याचा व्यवसाय चांगला रन व्हायला लागला होता. दिवसाला 412 डोमेस्टिक फ्लाईट्स सोडल्या जात होत्या. लोकं इतर कंपन्यांच्या विमानांची तिकिटं रद्द करून रांगा लावून किंगफिशरची तिकीटं काढत होती. सगळं सेट होतं. पण तरीही माल्ल्याला धीर नव्हता. त्याला लवकरात लवकर विमान व्यवसायातला किंग व्हायचं होतं. पुढं त्यानं निर्णय घेतला की किंगफिशरच्या माध्यमातून आपण इंटरनॅशनल फ्लाईट्स ऑपरेट करायच्या. खरं तर सरकारी नियम असाय की जोपर्यंत कुठली कंपनी विमान व्यवसायात पाच वर्ष काळ पूर्ण करत नाही तोवर ते आंतरराष्ट्रीय विमानसेवा देऊ शकत नाहीत. पण माल्ल्याला थांबायचं नव्हतं. मग त्यानं एक नवीन प्लॅन केला. ज्या जुन्या कंपन्या आधीपासून इंटरनॅशनल फ्लाईट्स सोडत होत्या त्या कंपन्या विकत घ्यायचा त्यानं निर्णय केला.

Kingfisher airline

(Vijay Mallya Story | Scam)

दरम्यान त्याच्या रडारवर आलेली पहिली कंपनी होती एअर सहारा. 2006 साली त्या कंपनीचा लिलाव सुरू होता. त्यावेळी विजय माल्ल्यानं त्यावर बोली लावली. पण जेट एअरवेज समोर त्याचा निभाव लागत नाही. तो बोली हरतो. पुढं मग 2007 साली तो त्याचा मोर्चा एअर डेक्कनकडं वळवतो आणि 550 करोड रुपयांना एअर डेक्कन कंपनी विकत घेतो. या सगळ्या व्यवहारादरम्यान तो तेच लोनमध्ये मिळालेले पैसे वापरतो. पुढं सगळं सेट झाल्यानंतर 2008 साली त्याची एअर डेक्कन कंपनी बँगलोर ते लंडन पहिली इंटरनॅशनल फ्लाईट्स सोडते अन त्यानंतर माल्ल्याचं सगळ्या स्तरातून कौतुक होऊ लागतं. त्या व्यवसायात त्याचा जम बसणार तेवढ्यात आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये तेलाच्या किमतीत भयंकर वाढ होते आणि भारतासह जगाला आर्थिक मंदीची चाहूल जाणवू लागते. त्याकाळात विजय माल्ल्याचा एअरलाईन्सचा बिजनेस बेक्कार तोट्यात जातो. त्याला मोठा आर्थिक फटका बसतो. इतका की त्याला कामगारांचे पगार देणं सुद्धा अशक्य होतं. आता त्यावर काय उपाय करायचा म्हणून तो काही बँकाकडून आणखी कर्ज उचलतो. त्यामुळं त्याच्यावरचा कर्जाचा बोजा आणखी वाढतो. आता तुम्ही म्हणाल त्यानं बँकाना एकही रूपाया माघारी केलेला नसताना बँकानी त्याला पुन्हा कर्ज कसं काय दिलं. तर ऐका, बँकानी 2008 साली त्याच्या कर्जाची रक्कम NPA मध्ये म्हणजे नॉन प्रॉफिटेबल एसेट्स मध्ये टाकली. आता हे नॉन प्रॉफिटेबल एसेट्स म्हणजे काय तर अशी रक्कम जी बँक कर्जदाराकडून वसुल करण्यात अपयशी ठरते. म्हणजे बँकेचे पैसे बुडीत गेले असं दाखवण्यात येतं. दरम्यान सरकारला माहिती होतं की विजय माल्ल्या बँकाना गंडवतोय, पैसे रिटर्न करत नाहीये तरी देखील त्याला पुन्हा लोन दिलं जातं. 2008 सालीचं भारतात आयपीएल नावाची सोन्याचं अंड देणारी कोंबडी जन्माला येते. माल्ल्याला त्यात पुन्हा पैशाचा खणखणाट ऐकू येऊ लागतो.

(Vijay Mallya Story | Scam)


पुढं प्रचंड लॉसमध्ये असताना सुद्धा तो तब्बल 476 करोड रुपयांना IPL ची रॉयल चॅलेंजर्स बँगलोर ही टीम विकत घेतो. ते सुद्धा तब्बल आठ वर्षासाठी. तशीच फोर्स इंडिया ही एफ 1 रेसिंगची आणखी एक टीम विकत घेतो. दरम्यान त्याच्या कंपनीतले अनेक कामगार कामबंद आंदोलन करायला सुरुवात करतात. कारण त्यानं तब्बल वर्षभर त्यांचा पगार दिलेला नसतो.नव्हता. पुढं कामगारांचा रोष आणखी वाढल्यावर तो कामगारांना पगार द्यायचाय असं सांगून त्याची एअर लाईन्स कंपनी गहाण ठेवून IDBI बँकेकडे 861 करोड रुपयांचं कर्ज मागतो. पण कर्जाची रक्कम त्याच्या कंपनीच्या किमतीपेक्षा खूप जास्त होती म्हणून IDBI बँक त्याला कर्ज द्यायला नकार देते पण तरीही तो हार मानत नाही. तो अधिकाऱ्यांना 16 करोड रूपये लाच देऊन खोट्या कागदपत्रावर त्यांच्याकडून सह्या करून घेतो अन कर्ज मिळवतो. बरं पैसे मिळाल्यावर तो पैसे कामगारांना न देता थेट युरोपमध्ये वळवतो अन तिथं एफ 1 रेसचं आयोजन करतो. पुढं 2010 साली तो पुन्हा एकदा राज्यसभा मेंबर म्हणून संसदेत जातो. पण यावेळी काँग्रेस नाही तर भाजप आणि JDS युतीचा मेंबर म्हणून. दुसऱ्या बाजूला त्याच्या किंगफिशर एअरलाईन्सची हालत अतिशय खराब होत चाललेली असते. कंपनीतले बरेच कामगार, टेक्निशियन, इंजिनियर्स काम सोडतात तर काही सोडून जाण्याचा तयारीत असतात. कारण माल्ल्यानं त्यांच्या पीएफचा आणि सर्व्हिस टॅक्सचा पैसा सुद्धा धड जमा केलेला नसतो. तो प्रश्न मोठा व्हायला लागलाय ह्ये लक्षात आल्यावर तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे बँक आणि माल्ल्या यांच्याशी बोलणी करतात. त्या बैठकी माल्ल्यानं त्यांच्या कामगारांचा पगार दिला पाहिजे असं सांगण्यात येतं. पण माल्ल्या कामगारांना पगार देत नाही अन फायनली त्याच्या किंगफिशर एअर लाईन्सचं लायसन्स रद्द होतं. 2012 साली त्याची कंपनी पूर्णपणे बंद पडते. खरं तर त्याआधीपासूनचं CBI विजय माल्ल्याच्या मागावर होती. कारण त्यांना सूत्रांकरवी माल्ल्यानं केलेल्या गैरव्यवहाराची माहिती मिळालेली होती. पण माल्ल्या तरीही त्याच्याचं धुंदीत जगत असतो. 2015 साली तो त्याचा साठावा बर्थडे सुद्धा धामधुमीत सेलिब्रेट करतो. जगभरातल्या 500 पॉवरफुल्ल लोकांना बोलावून. त्यावेळी त्याला पाहून कुणालाही असं वाटत नाही की त्याच्या डोक्यावर करोडो रुपयांचं कर्जय. तो निवांत राहतो अन त्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे जो पैसा तो खर्च करतो त्याचा नसून बँकाचा असतो. लोकांनी त्यांच्या रक्ताचं पाणी करून बँकेत साठवून ठेवलेला. त्याकाळात तो युके, युएस, फ्रान्स, स्वित्झर्लँड, आयरलँड आणि साऊथ आफ्रिकेत मोठ्या प्रमाणावर पैसा पाठवतोय अशाही बातम्या छापून येत होत्या. CBI च्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार माल्ल्यानं SBI कडून 1600 करोड, PNB कडून 800 करोड, IDBI कडून 850 करोड, BOI कडून 600 करोड, BANK OF BADODA कडून 550 करोड अशी कर्ज उचलली होती.

Vijay Mallya

(Vijay Mallya Story | Scam)

अन हे सगळं त्यानं अधिकाऱ्यांच्या मदतीनं केलेलं होतं. त्यापैकी SBI चे तत्कालीन चेअरमन ओ पी भट्ट यांची CBI ने चौकशी ही केला होती. त्या सगळ्या फ्रॉडमुळं CBI आणि इतर यंत्रणा हात धुवून माल्ल्याच्या मागं लागलेल्या होत्या. त्याचंकाळात CBI नं देशातील प्रत्येक bureau of immigration च्या ऑफिसमध्ये एक लेटर पाठवलं होतं. ज्यात असा उल्लेख केला होता की जर कोणत्याही कावून्टरवर विजय माल्ल्या दिसला तर त्याची खबर तातडीनं CBI ला दिली जावी, जेणेकरून त्याला पकडलं जाईल आणि त्याची चौकशी करण्यात येईल. सप्टेंबर 2015 मध्ये माल्ल्या विरोधात लुक आऊट नोटीस जारी करण्यात आली होती. पण नंतर अचानक 24 नोव्हेंबर 2015 रोजी त्या लुकआऊट नोटीसमध्ये एक चेंज करण्यात आला. तो असा की विजय माल्ल्या bureau of immigration च्या कोणत्याही खिडकीवर दिसला तर त्याला फक्त तो कुठं निघालाय एवढंच विचारूलं जाईल. पण मग प्रश्न असा आहे की विजय माल्ल्याची CBI चौकशी सुरूय याची सरकारला कल्पना असताना ही त्याच्या लुक आऊट नोटीसमध्ये कुणी फेरबदल केला. तर त्याबद्दल बोलताना बीजेपीचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी एकदा एक धक्कादायक वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले होते माल्ल्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी केल्यानंतर विजय माल्ल्या दिल्लीत येऊन एका पॉवरफुल्ल पॉलिटिशियनला भेटला होता अन त्यानंतर त्याची नोटीस बदलण्यात आली होती. पण त्यांनी शेवटपर्यंत त्या नेत्याचं नाव जाहीर केलं नाही. ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा मोदींचं सरकार केंद्रात निवडून आलं होतं. त्यानंतर माल्ल्या दोन वेळा परदेशवारी करून भारतात माघारी आला. दरम्यान 1 मार्च 2016 रोजी तो राज्यसभेत दिसला होता. 3 मार्चला त्याच्या कर्जाच्या केसची सुनावणी होणार होती. पण 2 मार्च 2016 रोजीचं विजय माल्ल्या भारत सोडून लंडनला पळून जातो. ते सुद्धा डिप्लोमॅटिक पासपोर्ट वापरून जो फक्त आणि फक्त खासदार किंवा त्याच्या पत्नीला मिळतो. माल्ल्यासोबत त्याची एक गर्लफ्रेंड आणि 55 सूटकेस सुद्धा लंडनला जातात.

(Vijay Mallya Story | Scam)


तेव्हा जो माल्ल्या लंडनला जातो तो पुन्हा कधीच माघारी येत नाही. दरम्यान 3 मार्चला कोर्टात सुनावणी चालू होते पण तत्कालीन attorney of general सांगतात की माल्ल्या इथं उपस्थित नाही. तो लंडनला गेलाय. पुढं लंडन हायकोर्टात माल्ल्याच्या कर्जप्रकरणाची केसं उभी राहते अन लंडन हायकोर्टाच्या बाहेरून माल्ल्या एक खळबळजनक वक्तव्य करतो. एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना माल्ल्या म्हणतो की मी इकडं येताना भारताच्या अर्थमंत्र्याशी सेटलमेंटची चर्चा करून आलोय. त्याच्या वक्तव्यानं भारतात पुन्हा एकदा मोठा गोंधळ उडतो. त्याला उत्तर देताना तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली म्हणतात की तो मला भेटला हे खरंय. 15 मिनिट आम्ही बोललो. त्यानं माझ्याशी सेटलमेंटबद्दल काहीतरी चर्चा केली पण मी त्याला सांगितलं तुम्ही सेटलमेंट माझ्याशी नाही तर कर्ज घेतलेल्या बँकाशी करा. पण त्यानंतर विरोधकांनी असा प्रतिसवाल केला की जर विजय माल्ल्या तुम्हाला भेटला होता अन तो सेटलमेंटबद्दल बोलणी करत होता तर मग तुम्ही CBI ला ती खबर का नाही कळवली. जर त्याच्या पळून जाण्याची थोडी जरी कानकून लागली असती तरी पोलिसांनी त्याला अटक केली असती किंवा त्याच्या हालचालीवर लक्ष तरी ठेवलं असतं. काँग्रेसच्या राज्यसभेचे तत्कालीन मेंबर P L पुनिया यांनी तर थेट 1 मार्चला जेव्हा विजय माल्ल्या अरुण जेटली यांना भेटायला आला होता त्यादिवशीचं CCTV फुटेज तपासण्याची मागणी केली होती. त्यांचा असा दावा होता की अर्थमंत्री आणि माल्ल्यामध्ये 20 मिनिटाच्यावर चर्चा झाली होती अन जर तसं नसेल तर मी कायमच राजकारण सोडून देईन अशीही घोषणा केली होती. पुढं त्या तपासाचं काय झालं याची खबर माध्यमाना मिळाली नाही. 2019 साली विजय माल्ल्याला भारत सरकारनं फरार म्हणून घोषित केलं. माल्ल्याबद्दलची अजून एक कॉन्स्पिरसी अशी की 2004 साली माल्ल्यानं टिपू सुलतानची एक तलवार दीड कोटी रुपयांना विकत घेतली होती. पण त्यानंतर त्याचा वाईट काळ सुरु झाला म्हणून त्यानं कुणाला तरी ती तलवार देऊन टाकली अशी खबर पसरली होती. पण 2023 च्या फेब्रुवारीमध्ये सेम त्याचं तलवारीचा लंडनमध्ये 140 कोटी रुपयांना लिलाव झाला.

Vijay Mallya

(Vijay Mallya Story | Scam)

असं म्हणतात की माल्ल्यानं ती तलवार कोणाला कधी दिलीच नव्हती. अडचणीच्या वेळी उपयोगी पडेल म्हणून त्यानं ती तलवार सुद्धा आधीच लंडनला पोहोचवली असण्याची शक्यता होती. त्या प्रकरणाचा ही चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली होती. मित्रांनो एका प्रसिद्ध वृत्तपत्रानं दिलेल्या बातमीनुसार लंडन हायकोर्टानं माल्ल्याला भारतात आणण्यासाठी 2020 सालीचं ग्रीन सिग्नल दिला होता पण आज 2023 उजाडलं तरी भारत सरकार लोकांच्या हक्काचा पैसा लुबाडणाऱ्या विजय माल्ल्याला इंडियात आणू शकलेलं नाही. अन त्याची नेमकी काय कारणे आहेत हे देखील जनतेला अजून कळू शकलेलं नाहीये. राजकीय जाणकारांच्या मते माल्ल्या परत आला तर देशातल्या मोठमोठ्या लोकांचे खरे चेहरे जनतेसमोर उघडे पडतील अशी त्यांना भीती असल्यामुळेचं कुणी त्याला परत आणण्याचा साधा प्रयत्न देखील करताना दिसत नाहीये. पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय, परवानगी मिळून विजय माल्ल्याला भारतात न आणण्यामागं सरकारची नेमकी काय भूमिका असावी, माल्ल्याला मोठा करण्यात आणि पळून जाण्यात कुणी मदत केली असावी तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

लंडनमध्ये खुलेआम फिरणाऱ्या विजय माल्ल्याला अटक का होतं नाही | Vijay Mallya Story | Scam

Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇

https://www.facebook.com/vishaychbhari

https://www.facebook.com/aplavishaychbhari

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *