मैं वो काम नहीं करता जिसमे खुदा मिले, लेकीन मैं वो काम जरूर करता हूं जिसमे दुवा मिलेसिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नहीं है, मेरी कोशिश हैं की ये सुरत बदलनी चाहीये, मेरे सीने मैं नही तेरे सीने मै सही, हो कही भी आग – ये आग जलनी चाहीये.. अशा शेरोशायरी ऐकल्या की माणसाला कणभर मास जास्त चढतं. आपण काहीतरी डॅशिंग काम करतोय आणि त्याचा कुणालातरी उपयोग होणारे, त्याचं भलं होणार आहे ही भावना व्यक्तीला आनंद देणारी असते. वरवर सगळीकडे सहज आढळून येणारी ही शेरोशायरी वसंत मोरे यांच्या फेसबुक अकाऊंटला तुम्ही पाहता, तेव्हा मात्र बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले या उक्तीचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही. नगरसेवक पदाची तिसरी टर्म सांभाळणाऱ्या वसंत मोरे यांना त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाने पुणे लोकसभेसाठी प्रचार प्रमुख म्हणून नेमलं आहे. असंही म्हणलं जातंय की येणार्या लोकसभा निवडणुकीत वसंत तात्या पुण्यातून उभं राहू शकतील. पण तात्या या टोपणनावाने प्रसिद्ध असलेल्या वसंत मोरे यांची पुणे मतदारसंघात नेमकी ताकद कितीय ? ते खरंच पुण्यातून पुढील खासदार होऊ शकतात का ? त्यांच्या राजकीय वाटचालीचा आणि भविष्यातील पाऊलांचा घेतलेला हा थोडक्यात अंदाज वजा आढावा.
(Vasant More Latest News | Vishaych Bhari)
वसंत कृष्णा मोरे, वय ४८ वर्षं. शालेय जीवनापासूनच राजकारणात जायची विशेष ओढ. शाळेच्या वहीवर रोज जय महाराष्ट्र लिहिल्याशिवाय पठ्ठयाला चैन पडत नव्हतं. याच मोरेंनी २००२ साली शिवसेना पक्षातून आपल्या राजकारणाची सुरुवात केली. त्या वेळी शिवसेनेत असलेल्या राज ठाकरे यांच्या सभा मन लावून ऐकणे, त्यांचा कार्यकर्ता बनून धडाडीने काम करणे ही कामं वसंत तात्या करायचे. शिवसेनेतून बाहेर पडलेल्या राज ठाकरे यांनी स्वतःचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष स्थापन केला. वसंत मोरे यांनीसुद्धा त्यांच्याच पावलावर पाऊल टाकलं. २००७ साली झालेल्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनसेचे ८ नगरसेवक निवडून आले. वसंत मोरे त्यापैकीच एक. राज ठाकरेंचा आदेश आला की वसंत तात्या लगेच ऍक्शन मोडमध्ये येणार हे मागच्या २१ वर्षांपासूनचं ठरलेलं गणित आहे. मनसेने टोल नाक्यांवर हल्ला करण्याची धडक मोहीम उघडली होती. या मोहिमेत वसंत मोरे आघाडीवर होते. खेड शिवापूरचा टोलनाका दोनदा फोडल्याचं वसंत मोरे आवर्जून सांगतात. याशिवाय फायनान्स कंपन्यांच्या मनमानी कारभाराचा जाब विचारणे, कष्टकरी गरिबांचे पैसे बुडवणाऱ्या ठेकेदार किंवा व्यावसायिकाला झापणे, दवाखान्यातील बिलात अफरातफरी करणाऱ्या हॉस्पिटल प्रशासनाला धारेवर धरणे, शासकीय योजनांचा फायदा मतदारसंघातील लोकांना मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणे या आणि अशा बऱ्याच कामात वसंत मोरे मागील १५ वर्षांपासून सक्रिय आहेत. २०१२ च्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनसेचे २७ नगरसेवक निवडून आल्यानंतर मोरे यांची सभागृहात विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली होती. शिवाय २०२१ साली मनसेच्या पुणे शहर अध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांना मिळाली होती.
(Vasant More Latest News | Vishaych Bhari)
वसंत मोरे यांचा एकूण रागरंग आणि काम करण्याची पद्धत पाहता ते प्रसिद्धीसाठी राजकीय स्टंट करतात असा बऱ्याच जणांचा वरकरणी समज होतो. वसंत मोरे त्यांच्या डॅशिंग स्वभावाचे, काम करतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर टाकतात, कुणासोबत कामानिमित्त वा इतर कारणासाठी फोनवर बोलणं झालं असेल तर त्याचं कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल करतात त्यामुळं बऱ्याच लोकांना ही स्टंटबाजी वाटू शकते. विरोधक त्यांच्यावर तसा आरोपही ठेवतात. मात्र वसंत मोरे यांच्या कार्यपद्धतीचा जवळून अनुभव घेतलेल्या लोकांना तात्यांच्या तळमळीची आणि लोकांसाठी झटण्याच्या प्रयत्नांची खात्री पटायला वेळ लागत नाही. राज्यशासन पुरस्कारप्राप्त लेखक नितीन थोरात यांनी वसंत मोरे यांच्याबद्दल असलेल्या गैरसमजुतीचं रूपांतर त्यांचं प्रत्यक्ष काम पाहिल्यानंतर त्यांच्याविषयीच्या आदरात कसं झालं यावर सविस्तर पोस्टही लिहिली होती. असे एक नाही तर शेकडो अनुभव तुम्हाला पहायला, ऐकायला मिळतील.
(Vasant More Latest News | Vishaych Bhari)
असो पण आपल्या राजकीय पक्षाकडून किंवा त्यातील वरीष्ठ नेत्याकडून एखादी चुकीची गोष्ट होत असेल तर त्यासंदर्भात ठाम भूमिका घेतानाही मोरे कचरत नाहीत. मागे राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे काढले नाहीत तर आम्हीही भोंग्यावर हनुमान चालीसा लावू अशा आशयाचं विधान केलं होतं. त्या विधानावर वसंत मोरे यांनी नाराजी व्यक्त केली होती. यावर स्पष्टीकरण देताना ते म्हणाले होते, “मी काम करणाऱ्या मतदारसंघात जवळपास साडेतीन लाख मुस्लिम बांधव राहतात. तिथे ५० हून अधिक मशिदी आणि २० हून अधिक मदरसे आहेत. सर्व जातीधर्मीय कार्यक्रमांत आवर्जून सहभागी होणाऱ्या माझ्या मतदारसंघात जर अशा वक्तव्याने गोंधळ निर्माण होत असेल तर मला त्यांचा प्रतिनिधी म्हणून आवाज उठवावाच लागेल.” वसंत मोरे यांच्या या भूमिकेनंतर त्यांना शहर अध्यक्ष पदावरून दूर करण्यात आलं होतं. काही दिवस त्यांचं शहरातील मनसेच्या इतर नेत्यांशी संभाषणही नव्हतं. त्याच काळात त्यांना राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षातर्फे पक्षप्रवेशाच्या ऑफरही आल्या होत्या. मात्र काही दिवसांनी राज ठाकरे यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधत वसंत मोरे यांनी आपण मनसे पक्ष सोडून कुठेही जाणार नसल्याचं जाहीर केलं. पुण्याच्या कात्रज चौकात वसंत मोरे यांच्या सौजन्याने राज ठाकरे यांचं भित्तिचित्र रेखाटण्यात आलं आहे. मोरे यांची राज ठाकरे आणि मनसेशी असलेली बांधिलकीच त्यातून दिसुन येत
(Vasant More Latest News | Vishaych Bhari)
असो तर बर्याच काळ वसंत मोरेंना इतर पक्षातून ऑफर येतच राहिल्या. असं म्हणतात की राष्ट्रवादीतर्फे अजित पवार त्यांना म्हणाले होते की , “मोरे कधी येताय? वाट पाहतोय.” मनसेतून राष्ट्रवादीमध्ये गेलेल्या रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या होत्या, “मी माझ्या भावाच्या पाठीशी आहे.” शिवसेनेचे नेते संजय राऊत पुण्यातील एका कार्यक्रमात मोरेंना म्हणाले होते, “चांगलं काम करताय, पुन्हा नक्की भेटू”. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना तेही म्हणाले होते की , “वसंत मोरे आमच्याकडे येत असतील तर त्यांचं स्वागतच आहे.” एकूणच काय स्वतःचं वेगळं वजन राखून ठेवण्यात वसंत मोरे यशस्वी झाले आहेत. त्यांची एकूण सर्वपक्षीय बार्गेनिंग जबरदस्त अशीच आहे. वसंत मोरे यांनी मनसेच्या तिकिटावर दोनदा २००९ आणि २०१९ साली हडपसर विधानसभा लढवलीय. मात्र त्यांचा त्यात पराभव झालाय. साधारण ३५ हजारांच्या आसपास मतं त्यांना मिळाली. आता निवडणुकीत पराभव झाला म्हणून स्वस्थ बसतील ते मोरे कसले. दुसऱ्या दिवसापासून ते कामाला सुरुवात करतात. म्हणून तर २०२४ च्या लोकसभेसाठी पुणे मतदारसंघातून वसंत मोरे यांनी स्वतःची दावेदारी सांगायला सुरुवात केली आहे. मागील आठवड्यात त्यांच्या वाढदिवसानिमित्त जे फ्लेक्स पुण्यात लागले त्यात भावी खासदार असा ठळक उल्लेख पाहायला मिळालाय. शिवाय एका कार्यकर्त्याने तर लाल दिवा असलेली, भावी खासदार ही पाटी लिहिलेली Ambassidor गाडीच मोरे यांना भेट दिली आहे. या सगळ्यांवर बोलताना वसंत मोरे म्हणाले की पुण्याने ठरवलं तर ते मनसेचा पहिला खासदार संसदेत नक्कीच पाठवू शकतात.
(Vasant More Latest News | Vishaych Bhari)
आता राजकारण हा अंदाजपंजे खेळता येणारा खेळ बिल्कुल नाही. या खेळात वर्षानुवर्षे मुरलेले खेळाडू वेगवेगळे डाव टाकत असतात. पुणे लोकसभेचा विचार करता मागील काही वर्षांत इथे भाजपचं वर्चस्व आहे. सुरेश कलमाडी यांची सद्दी संपवल्यानंतर भाजपने याठिकाणी मजबूत पाय रोवलेत. त्यानंतर काँग्रेसला म्हणावा असा तगडा उमेदवार याठिकाणी मिळाला नाही. या मतदारसंघावर भाजप किंवा काँग्रेसचं वर्चस्व असल्याने इतर उमेदवार निवडून येण्याच्या शक्यता कमी राहतात. मागील काही निवडणुकांत जागावाटपातही ही जागा शिवसेना किंवा राष्ट्रवादीकडे गेलेली नाही. २०२४ साठी भाजपतर्फे मुरलीधर मोहोळ, देवेंद्र फडणवीस ते अगदी नरेंद्र मोदींचं नाव पुण्यासाठी चर्चेत आहे. तर काँग्रेसतर्फे रवींद्र धंगेकर, अरविंद सावंत, संग्राम खोपडे, मोहन जोशी ते अगदी प्रवीण गायकवाडांच्या नावाचीही इथून चर्चा आहे. त्यामुळे सध्यातरी वसंत मोरे कुठेच तुल्यबळ प्रतिस्पर्धी वाटत नाहीत. वसंत मोरे यांनी ज्या हडपसर मतदारसंघातून आमदारकीची निवडणुक लढवली तो हडपसर मतदारसंघ शिरूर लोकसभेत मोडतो. त्यामुळे पुणे भागात मनसे आणि पर्यायाने मोरे यांना लाखभर मतांच्या वर मतं मिळवणं वाटतंय तेवढं सोपं असणार नाही. शिवाय मनसे हा महाविकास आघाडी किंवा महायुतीचा घटकपक्ष नाही. त्यामुळं मोरेंचं निवडून येणं अतिशय खडतर असं आहे.
(Vasant More Latest News | Vishaych Bhari)
.मोठया निवडणुकांसाठी जनाधार असलेला किंवा इलेक्टिव्ह मेरिट असणारा पक्ष म्हणून मनसेकडे अजूनही पाहता येत नाही ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. आणि म्हणूनच वसंत मोरे यांच्या खासदारकीचा प्रवास तितका सोपा नाही हे ही तितकंच खरंय. आता मनसे भाजप किंवा महाविकास आघाडी सोबत जाणार नाही. आणि जरी गेला तरी दोन्हीकडून मनसेला ही जागा सुटणं अशक्य प्राय असंच आहे. आता वसंत मोरे जर उद्या राष्ट्रवादी किंवा ठाकरे गटात गेले तर मग त्यांना आमदारकीसाठी संधी मिळूही शकते. सध्या हडपसर मधून राष्ट्रवादीचे चेतन तुपे आमदार आहेत. त्यांच्या भूमिका उघड नाहीत. आता ते उभे राहिले तर त्यांच्याविरूद्ध वसंत मोरे निवडणूक लढवू शकतात. एकूणच कागदावर मनसेची ताकद कमी आहे. मविआ आणि भाजपच्या स्पर्धेत, अलायन्स न करता हा पक्ष पुण्यातून फार भरारी मारेल असं दिसत नाही. पण मागं मनसेचे गोल्डन आमदार रमेश वांजळेंनी अशाच दुर्धर परिस्थितीत मनसेतून इकडं आमदारकी मिळवली होती. पण २००९ चा तो काळ होता जेव्हा राज ठाकरे आणि मनसेचा मराठीचा मुद्दा पीक point ला होता. अर्थात आज वसंत तात्या मोरे यांची क्रेझ पाहता निवडणुकीच्या निकालात उलथापालथ करण्याची क्षमता ते ठेवतात एवढं मात्र निश्चितपणाने म्हणता येईल. बाकी तुम्हाला काय वाटतंय? वसंत मोरे यांनी २०२४ ची लोकसभेची निवडणुक लढवली तर ते निवडून येऊ शकतात का? ते कधी पुण्याचे खासदार होऊ शकतात का?तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा .
Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇
https://www.facebook.com/vishaychbhari
https://www.facebook.com/aplavishaychbhari
Leave a Reply