झपाटलेला सिनेमातला तात्या विंचू स्वतःचं कसा चालायचा, बोलायचा | तात्या विंचूचं शुटींग कसं केलेलं ? |Tatya Vinchu | Zapatlela


मंडळी तुम्हाला झपाटलेला सिनेमांतला तो सीन आठवत असेल. लक्ष्मीकांत बेर्डे उर्फ आपला लाडका लक्ष्या बेडवर झोपलेला असतो. तेवढ्यात त्याच्या चेहऱ्यावरून एक मऊसूद हात फिरू लागतो. तो हात असतो बाहुल्याच्या रूपातल्या तात्या विंचूचा. अर्धवट झोपेत असलेल्या लक्ष्याला वाटतं की त्याच्या चेहऱ्यावरून त्याची आवडीचं हात फिरवतीये. लक्ष्या झोपेत बडबडतो. आवडे तुझा हात अगदी स्पंजासारखा हाय बघ. एकदम बाहुल्यावानी. आवडे यखाद गाणं म्हण ना. तेव्हा तात्या विंचू त्याच्या छाताडावर हात फिरवत गाणं म्हणू लागतो, ओम भगनी भागोदरी, भगमासे, भगभुगे योवानी ओम फट् स्वाहा.. त्ये विचित्र गाणं ऐकून अर्धवट झोपलेला लक्ष्या अन टीव्ही समोर बसलेलं पब्लिक दोघांच्या छातीत गोळा येतो. एवढी खतरनाक दहशत होती त्या बाहुल्याच्या गेटअपमधल्या तात्या विंचूची. अगदी खरोखर त्या बाहुल्याला तात्या विंचूच्या भुतानं झपाटलंय की काय असंच तेव्हा वाटायचं. पण मंडळी महेश कोठारे यांनी त्ये तात्या विंचूचं पात्र कसं रेखाटलं होतं, त्यांना ती अतरंगी स्टोरी कशी सुचली होती, तो डेंजर बाहुला घेऊन त्यांनी सबंध सिनेमा कसा शूट केला होता, तो बाहुला स्वतःहून हालचाल करत होता की त्याला कुणी ऑपरेट करत होतं, महेश कोठारे यांनी माणसाऐवजी बाहुलाचं का सिलेक्ट केला, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणारे,

(Tatya Vinchu | Zapatlela)

मंडळी तात्या विंचूबद्दल बोलण्याआधी आपण महेश कोठारे यांना झपाटलेला सिनेमाची अतरंगी कल्पना नेमकी कुठून सुचली ते आपण जाणून घेऊ. तर 1988 साली child’s play नावाचा एक अमेरिकन सिनेमा आला होता. डॉन मंकीनी नावाच्या लेखकानं लिहिलेला अन टॉम हॉलंड यानं दिग्दर्शित केलेला. त्या सिनेमाची कन्स्पेट अशी होती की सिनेमाच्या सुरवातीला एक डिटेक्टिव्ह एका सिरीयल किलरचा पाठलाग करून त्याला गोळी मारतो. तो गोळी लागलेला सिरीयल किलर एका खेळण्याच्या दुकानात जातो. त्याला आपला मृत्यू जवळ आलाय ह्ये कळतं मग तो मृत्यूच्या आधी त्याच्या गुरुकडून शिकलेला एक वुडू मंत्र वापरून त्याचा आत्मा तिथल्या एका गुड बाय ब्रँडच्या बाहुल्यात ट्रान्सफर करतो अन तो मरतो. पुढं त्या सिरीयल किलरचं मृत शरीर पाहून तो डिटेक्टिव्ह तिथून निघून जातो. कट टू एका विधवा कामवालीचा 10 12 वर्षाचा मुलगा अँडी त्याच्या आईकडं गुड बाय ब्रँडच्या बाहुल्यासाठी हट्ट करतो. पण कमी पैशाअभावी तिला ते शक्य होत नाही. मग एका चोराकडून कमी पैशात गुड बाय ब्रँडचा बाहुला खरेदी करते अन मुलाला आणून देते. अँडी खुश होतो. तो त्याला चकी असं नाव देतो पण नंतर त्याला कळतं की तो बाहुला कोणत्याही बॅटरीशिवाय ऑटोमॅटिकपणे चालतो, बोलतो, उठतो, बसतो. अन स्वतःचं नाव सुद्धा सांगतो. ते नाव असतं त्या मेलेल्या सिरीयल किलरचं. हळूहळू तो बाहुल्याच्या रूपातला सिरीयल किलर अँडीच्या मित्रांना एक एक करून मारून टाकायला लागतो अन त्याचा आरोप अँडीवर येतो. मग पुढं सिनेमात जे काय होतं त्ये तुम्ही सिनेमातचं बघा.

(Tatya Vinchu | Zapatlela)

पण एवढी स्टोरी वाचल्यानंतर तुम्हांला झपाटलेला सिनेमाची कनस्पेट थोडी क्लियर झाली असावी. कारण अशीचं काहीशी सुरुवात आपल्याला १९९३ साली आलेल्या झपाटलेला सिनेमात देखील पाहायला मिळाली होती. आवं मिळणारचं ना, कारण तिथूनचं महेश कोठारे यांना झपाटलेलाची स्टोरी सुचली होती. मंडळी काहीही म्हणा पण लक्ष्या महेशच्या नादखुळा acting मुळं जेवढा झपाटलेला लक्षात राहिला त्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त तात्या विंचू या बाहुल्यामुळं तो सिनेमा अनेकांच्या लक्षात राहिलाय. कारण तोवर मराठी सिनेमात तसा विचित्र व्हीलन कुणी introduce केला नव्हता. महेश कोठारे यांच्या पाच अक्षरी सिनेमांच्या मालिकेतला तो आणखी बेस्ट सिनेमा. चला आता आपण आलो मेन मुद्द्यावर. सिनेमात कोठारेनी त्या व्हीलनला तात्या विंचू हेच नाव का दिलं. तर ऐका, महेश कोठारेनी जेव्हा झपाटलेलाची स्क्रिप्ट लिहायला घेतली होती तेव्हा त्यांना व्हिलनसाठी विचित्र आणि खुंखार नाव सुचत नव्हत. दरम्यान त्यावेळी child’s play सिनेमाचा पूर्ण अभ्यास करून झाल्यानंतर  एके दिवशी त्यांच्या पाहण्यात अजून एक इंग्लिश सिनेमा आला. त्याचं नाव होतं RED SCORPIAN. म्हणजेच लाल विंचू. मग त्याचं लाल विंचू मधला त्यांनी विंचू शब्द शब्द उचलला आणि त्याला त्यांच्या मेकअपमनचं तात्या हे टोपणनाव जोडलं. अन मग मराठी फिल्म इंडस्ट्रीला मिळाला तात्या विंचू नावाचा खुंखार व्हीलन. आता नाव तर झालं पण मुख्य काम होतं child’s play सिनेमासारख्या खुंखार बाहुल्याची. तो बाहुला सुद्धा इंग्लिश बाहुल्यासारखा खतरनाक दिसला पाहिजे अशी त्यांची अट होती. मग तसा बाहुला बनवणार कोण, तो ऑपरेट करणार कोण ? त्याचं शूट कसं घेता येईल, त्याला आवाज कोण देणार असे ढीगभर प्रश्न कोठारे यांच्यापुढं आ वासून उभे होते.

Tatya Vinchu | Zapatlela

(Tatya Vinchu | Zapatlela)


पण त्यांची सगळी चिंता मिटवली ती बोलक्या बाहूल्यांचा खेळ करणारे रामदास पाध्ये. रामदास पाध्ये हे बोलक्या बाहुल्यांच्या खेळामधला जादूगार माणूस होता. रामदास पाध्ये यांचे वडील सुद्धा बोलक्या बाहूल्यांचे खेळ करायचे अन गंमत म्हणजे ते घरातच त्यांना हव्या तशा बाहुल्या बनवत असायचे. त्यांचे दोन बाहुले तर तेव्हा खूप लोकांच्या पसंतीस उतरले होते. त्यांची नावं ऐकून तुम्ही ही चकित व्हाल. त्या बाहुल्यांची नावं होती अर्धवटराव आणि आवडी. त्या बाहुल्यांनी पाध्ये कुटुंबाला ओळख मिळवून दिली. त्यांचं नाव सातासमुद्रापार पोहोचवलं. मग शेवटी महेश कोठारे यांनी रामदास पाध्ये यांना त्यांच्या डोक्यातली सगळी कल्पना बोलून दाखवली. रामदास पाध्ये यांनी कसले ही आडेवेडे न घेता काम करायला तयार झाले. त्यांनी त्यात्या विंचू या कॅरॅक्टर साठी एकूण १७ वेगवेगळ्या बाहुल्या बनवल्या. पण महेश कोठारेंनी त्यातली त्यांना हवा होता तो एकच बाहुला फायनल केला. मग नंतर महत्वाची जबाबदारी त्यांच्यावर आली अन ती म्हणजे कॅमेऱ्यापासून लपून राहत तात्या विंचू या बाहुल्याचे सीन शूट करायची. ते काम फार अवघड करत होतं कारण शूट म्हणजे फक्त शूट नव्हतं. तर तात्या विंचू खरा वाटावा यासाठी त्याला सातत्यानं ऑपरेट करण गरजेचं होतं. म्हणजे त्याच्या भुवया हलवण, त्याच्या हाताची बोटं हलवणं, तोंडाची हालचाल करणं सगळंच भन्नाट काम होतं. पण ते अवघड काम साध्य करून दाखवलं रामदास पाध्ये आणि त्यांच्या पत्नी अपर्णा पाध्ये यांनी. त्यावेळी भारतीय सिनेमात स्पेशल इफेक्टचं तंत्रज्ञान एवढं प्रगत नव्हतं पण रामदास पाध्ये, त्यांचं कुटुंब, अफकोर्स लक्ष्मीकांत बेर्डे आणि. महेश कोठारे यांच्या व्हिजनमुळं तात्या विंचू स्क्रीनवर किती खतरनाक दिसलाय याची तुम्हाला कल्पना आहेच.

(Tatya Vinchu | Zapatlela)

खूप वेगवेगळ्या ट्रिक्स वापरून रामदास पाध्ये आणि त्यांच्या पत्नी अपर्णा यांनी तात्याला ऑपरेट केला. पाध्ये यांनी शूटचा विचार करून आधी दोरीनं लांबूनही ऑपरेट करता येईल असा बाहुला बनवला होता पण नंतर महेश कोठारे यांनी त्यांना स्वतः जवळून ऑपरेट करता येईल असा बाहुला बनवायला लावला. मग त्याचा फायनल रिजल्ट तुम्ही सिनेमात पाहिलाचं. खरं तर तात्या विंचू याच्या जिवंत वाटण्याचं थोडं फार श्रेय आपल्या लाडक्या लक्ष्याला सुद्धा जातं कारण त्याच्या सिंगल शॉटमध्ये लक्ष्या जो काही तात्या विंचू बरं खेळलाय त्याला तोड नाय. ते कुणाला जमूच शकतं नाय इतकं परफेक्ट कॉम्बिनेशन होतं. कारण तुमच्या माहितीसाठी सांगतो. 2000 मध्ये झपाटलेला सिनेमाचा तेलगू रिमेक बनवण्यात आला होता. त्या सिनेमाचं नाव होतं अम्मा बोम्मा. त्यामध्ये राजेंद्र प्रसाद यांनी लक्ष्याची तर सुमन यांनी महेशची भूमिका केली होती. दोन्ही भाषेत सिनेमा तुफान चाल्ला. पुढं झपाटलेलाचं यश पाहून तो सिनेमा आहे तसा हिंदीत डब करून झी सिनेमाला दाखवण्यात येऊ लागला. असो आपल्या स्टोरीकडं येऊ. तर बाहुल्याची जिम्मेदारी रामदास पाध्ये अन फॅमिलीनं पार पाडली पण अजून एक महत्वाचं काम होतं अन ते म्हणजे तात्या विंचूचा आवाज. तात्या ऑपरेट तर व्यवस्थित झाला होता पण दमदार आवाज मिळाला तर तात्या विंचूचं पात्र जिवंत होईल याची महेश कोठारे यांना कल्पना होती. त्यावेळी मग महेश कोठारे यांनी त्यांचे मित्र आणि गुरु दिलीप प्रभावळकरांना त्यासाठी गळ घातली. एवढंच नाही त्यांच्याकडून माणूस रूपातला तात्या विंचू या गुन्हेगाराचा रोल सुद्धा शूट करून घेतला.

Tatya Vinchu | Zapatlela

(Tatya Vinchu | Zapatlela)

हे विषयच भारी वाचलेस का भावा !

मंडळी दिलीप प्रभावळकरांनी तात्या विंचूला त्यांच्या आवाजानं कसं जिवंत केलंय ह्ये सुद्धा तुम्हाला वेगळं सांगायला नको. अगदी ॐ फट स्वाहा पासून माझा आत्मा तुझ्यात, तुझा आत्मा माझ्यात असे कितीतरी तात्या विंचूच्या तोंडचे डायलॉग त्यांनी अजरामर केले. मंडळी झपाटलेला रिलीज झाल्यानंतर तब्बल २५ आठवडे तो थेटरमधून उतरला नव्हता. त्या सिनेमानं मराठी फिल्म इंडस्ट्रीच्या व्हीलनमध्ये एकप्रकारे revolution आणलं. पुढं २० वर्षांनी महेश कोठारेनी झपाटलेला सिनेमाचा सिक्वेल काढला अन त्यात त्यांनी थ्रीडी टेक्नोलॉजी वापरली. मराठीत पहिल्यांदा असं काहीतरी घडलं होतं. पण लक्ष्याच्या अनुपस्थितीमुळं झपाटलेला 2 म्हणावा इतका चाल्ला नाय. कारण लक्ष्या, महेश, दिलीप प्रभावळकर, आवडी, कान्या हवालदार अन खुद्द तात्या विंचूच्या अभिनयानं नटलेला पहिला झपाटलेला पिच्चर आहे तसा प्रेक्षकांच्या लक्षात राहिला होता. मंडळी तात्या विंचूचं पात्र आजच्या घडीला मराठीतलं सर्वात जबरदस्त मीम मटेरियल म्हणून प्रसिद्धय. इतकी लोकांना त्याची गोडीय पण तेव्हा मात्र त्याची मनात दहशत बसलेली ह्ये नक्की. बाकी तात्या विंचूचा कोणता डायलॉग तसंच लक्ष्या महेश यांच्या कोणत्या सिनेमाच्या आठवणी तुमच्या लक्षात आहेत त्ये आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

Zapatlela सिनेमातला Tatya Vinchu स्वतःचं कसा चालायचा, बोलायचा | तात्या विंचूचं शुटींग कसं केलेलं ?

Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇

https://www.facebook.com/vishaychbhari

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *