मंडळी भाजपनं एकूण 23 मतदारसंघात त्यांचे उमेदवार जाहीर केल्यानंतर आता महायुतीतल्या शिंदे गट आणि अजितदादा गटाला आपले उमेदवार जाहीर करण्याचे वेध लागलेत अशी चर्चा आहे. महायुतीत शिंदे गटाला १३ जागा, भाजपला ३० तर अजितदादा गटाच्या वाट्याला 5 जागा येणार आहेत आणि येत्या दोन दिवसांत त्यावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याचीही शक्यता वर्तवली जातीये. त्या धर्तीवर चार पाच दिवसांपूर्वी भाजप हायकमांड कडून शिंदेच्या संभाव्य 13 उमेदवारांची यादी मागून घेण्यात आली होती. त्या यादीत शिवसेनेच्या विद्यमान खासदारांची नावं आहेत. दरम्यान 3 जागांवर मात्र भाजप आणि शिंदे गटात कचाकची सुरू असल्याच्या चर्चा आहेत. आज शिंदे गटाच्या उमेदवारांची नावं जाहीर होणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान या आधी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासोबत शिंदे आणि अजितदादांची बैठक झाली होती. त्या बैठकीत काही जागांवर उमेदवार बदलण्याबाबत अमित शाह यांनी सूचना केल्या होत्या, त्यानंतर शिंदे गटानं खासदारांची बैठक घेतली होती. पण, अजुनही जागावाटपाचा निश्चित फॉर्म्युला ठरलेला नाही. काही जागांवर अजुनही पेच कायम आहे. दरम्यान आता कोण असतील शिंदे गटाचे संभाव्य उमेदवार आणि कुणाचा पत्ता कट होणार, कुणाला भाजपच्या चिन्हावर लढावं लागणार त्याचा घेतलेला हा सविस्तर आढावा.
(Loksabha Election 2024 | Vishaych Bhari)
मंडळी मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेतील खासदारांच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १३ संभाव्य उमेदवारांची यादी भाजपच्या हायकमांडकडे पाठवली होती. येत्या काही तासात राज्यातील उमेदवारांच्या नावांची घोषणा होणार असल्याची चर्चा सुरू आहे. महायुतीच्या जागावाटपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेल्या काही खासदारांना डच्चू मिळण्याच्या चर्चेनं शिवसेनेतील नेत्यांची अस्वस्थता वाढू लागलीय. दरम्यान ते खासदार आता थेट एकनाथ शिंदे यांच्या घरी येऊन नाराजी व्यक्त करू लागल्याच्या चर्चा आहेत. धुळवडीच्या पूर्वसंध्येला नाशिकमधील शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांनी त्यांच्या समर्थकांसह मुख्यमंत्र्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी जाऊन ठिय्या दिला. ‘नाशिक मतदारसंघ सोडू नका’ असा त्यांचा आग्रह होता. नाशिक सारखंच अमरावती, परभणी, नाशिक, ठाणे, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, दक्षिण मुंबई, रायगड, धाराशिव, मावळ, बारामती, शिरूर, शिर्डी, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले यांसारख्या काही जागांवरून भाजप- शिंदे गट आणि अजितदादा गटात रस्सीखेच सुरू असल्यानं तिथले नेते अस्वस्थ आहेत. भाजपकडून दावा करण्यात आलेल्या जागांमध्ये अमरावती, परभणी, नाशिक, मुंबईमधील तीन जागा आणि पूनम महाजन यांची जागा तसच कोल्हापूर आणि हातकणंगलेच्या जागेचाही समावेश आहे. त्या जागा भाजप घेणार की शिंदे गटालाच दिल्या जाणार याबाबत मात्र अजूनही अनिश्चितता कायमय. त्या लोकसभा मतदारसंघात जागांची आणि चिन्हांची अदलाबदल होण्याची ही शक्यता वर्तवली जातीये शिरुरमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढणार असून आज ते अजितदादा गटात प्रवेश करणार आहेत. तर सातारच्या जागेवरून सुद्धा भाजप आणि अजित पवार गटात रस्सीखेच सुरुय. त्यामुळे या जागेवर उदयनराजे यांना तिकिट दिल्यास ते कोणाच्या चिन्हावरती निवडणूक लढवणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.
(Loksabha Election 2024 | Vishaych Bhari)
तसंच पालघरचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांच्याविरोधात पालघर आणि वसईतील भाजप पदाधिकाऱ्यांनी आघाडी उघडत उमेदवार बदला अशी मागणी लावून धरल्यानं गावितही नाराज आहेत. त्यातच महायुतीत मनसेच्या समाविष्ट करून घेण्यात शिंदे गटातील काही खासदारांचा विरोधय. कोल्हापूरमधून संजय मंडलिक यांचं तिकीट कापले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. पण खा. मंडलिक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवर संवाद साधल्यानंतर तुम्ही काम सुरू ठेवा तुमच्या सर्वांची उमेदवारी ठरली असल्याचं मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आलं असून लवकरच उमेदवार जाहीर होतील असं स्वतः मंडलिक यांनी स्पष्ट केलंय. तर एवढ्या सगळ्या गदारोळात शिंदेकडून 13 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणारय आणि त्यापैकी 10 नावं जवळपास निश्चित असल्याची चर्चाय. आता ते कोणते हे आपण एक एक करून जाणून घेऊ…
(Loksabha Election 2024 | Vishaych Bhari)
सर्वात पहिला आहे रामटेक लोकसभा मतदारसंघ. तिथं राजू पारवे हे महायुतीतील शिंदे गटाकडून लोकसभेचे संभाव्य उमेदवार असतील असं म्हंटलं जातंय. रामटेक हा मतदारसंघ सध्या शिंदेच्या शिवसेनेच्या ताब्यात आहे. कृपाल तुमाने हे रामटेकचे विद्यमान खासदार आहेत. पण तुमाने यांच्याविरुद्ध मतदारसंघात तीव्र नाराजी असल्यानं पराभवाच्या भीतीपोटी स्वतः भाजपकडून त्या जागेवर ताकदीचा उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू होत्या.मात्र काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांनी त्यांच्या आमदाराकीचा राजीनामा देऊन एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि महाविकास आघाडीवर सडकून टीका केली. दरम्यान आता राजू पारवे हेच लोकसभा निवडणुकीत रामटेकमधून महायुतीचे उमेदवार असतील असं म्हटलं जातय. त्यामुळं भाजपनं त्या जागेवरील आपला दावा सोडण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. दुसऱ्या बाजूला मविआकडून तिथं काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांना उमेदवारी जाहीर झालीये. त्यामुळं फाईट तगडी होणार असल्याची चिन्ह आहेत.
(Loksabha Election 2024 | Vishaych Bhari)
दुसरा आहे वाशिम – यवतमाळ लोकसभा मतदारसंघ. तिथं शिंदे गटाच्या भावना गवळी या विद्यमान खासदार असून मागच्या पाच टर्म त्या तिथं निवडून आलेल्या आहेत. आताही त्यांनी मैं मेरी झान्सी नहीं दूंगी म्हणत मतदारसंघावर क्लेम कायम ठेवलाय पण भाजपकडून तिथ उमेदवार बदलाचा अजेंडा रेटला जातोय. मतदारसंघातल्या अँटी इनकम्बन्सी फॅक्टरमुळे भावना गवळी यांना तोटा होण्याची शक्यता जास्तय म्हणून भाजपकडून तिथं उमेदवार देण्यात यावा अशी मागणी करण्यात येतेय पण शिंदे गट ती जागा भाजपला सोडायला तयार नाही. दरम्यान गवळीच्या जागी आता नव्या दमाच्या संजय राठोड यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा आहे.तिसराय ठाणे लोकसभा मतदारसंघ. ठाण्यात सध्या ठाकरेंचे राजन विचारे हे विद्यमान खासदार आहेत. ठाण्यात शिवसेना आणि शिंदेची ताकद मोठीय त्यामुळं शिंदे गट ठाण्याच्या जागेसाठी प्रचंड आग्रही आहे. पण भाजपकडून त्यांच्याकडं ठाणे किंवा कल्याण अशी द्विधा स्थिती निर्माण केल्याची चर्चा आहे. भाजपला ठाणे किंवा कल्याण यापैकी एक जागा हवीय आणि म्हणून त्या जागेवरून भाजप शिंदे गटात जुपलंय असं म्हंटलं जातंय. भाजपकडून इच्छुक उमेदवारांची गर्दीय पण शिंदेकडून ठाण्यात प्रताप सरनाईक यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याची चर्चा आहे. पण तिथं त्यांना राजन विचारे यांच्याशी दोन हात करावे लागणार आहेत.
(Loksabha Election 2024 | Vishaych Bhari)
त्यानंतर चौथा लोकसभा मतदारसंघय कल्याण – . सध्या तिथं शिंदे गटाचे श्रीकांत शिंदे हे विद्यमान खासदार असून पुन्हा एकदा त्यांच्याचं नावाची तिथं वर्णी लागणार हे जवळपास कन्फर्मय. पण तिथं ही भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीला विरोध केला जातोय आणि श्रीकांत शिंदेंनी ठाणे लोकसभा लढवून कल्याणची जागा भाजपला सोडावी अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आल्याचं कळतंय. मागं आमदार गणपत गायकवाड यांनीही उघडपणे ही गोष्ट बोलून दाखवली होती.पुढं पाचवा लोकसभा मतदारसंघ आहे दक्षिण मध्य मुंबई. सध्या तिथं शिंदे गटाचे राहुल शेवाळे हे विद्यमान खासदार असून शिंदेंनी त्यांच्याचं नावाला पुन्हा पसंती दिल्याचं कळतंय. कारण 2014 आणि 2019 या सलग दोन निवडणुकांत राहुल शेवाळे यांनी काँग्रेसच्या एकनाथ गायकवाड यांचा पराभव केला होता. पण यंदा तिथं काँग्रेस प्लस ठाकरे गट यांच्या एकत्रित ताकदीचा सामना राहुल शेवाळे यांना करावा लागू शकतो. मविआकडून ठाकरेंनी त्या जागेवर क्लेम केल्याचं कळतंय. पण अद्याप त्यांचा उमेदवारीचा चेहरा ठरला नसल्याची चर्चा आहे.
(Loksabha Election 2024 | Vishaych Bhari)
पुढं सहावा लोकसभा मतदारसंघ आहे मावळ. सध्या तिथं शिंदे गटाचे श्रीरंग बारणे हे विद्यमान खासदार आहेत आणि शिंदे गटाकडून पुन्हा एकदा त्यांनाचं संधी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. पण गंमत म्हणजे महायुतीतील अजितदादा गटाने ही मावळ लोकसभेवर दावा ठोकला असून मतदारसंघातल्या अजितदादा गटाच्या आमदारांनी श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीला उघडपणे विरोध दर्शवलाय. मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके यांनी मावळमधून अजितदादांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी निवडणूक लढवावी अशी इच्छा बोलून दाखवली होती. दरम्यान शेळके यांच्या भूमिकेमागं अजितदादाचं आहेत अशा चर्चा मतदारसंघात रंगल्यात. तसंच मतदारसंघातली विद्यमान खासदारांबद्दल असलेली नाराजी पाहता भाजपसुद्धा मावळच्या जागेसाठी आग्रही असल्याचं कळतंय. मावळची जागा भाजपने घ्यावी आणि आपल्याला उमेदवारी द्यावी, अशी मागणी भाजपशी संलग्न असलेल्या राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांनी आज पत्रकार परिषदेत केलीय.त्यानंतर सातवा लोकसभा मतदारसंघ आहे कोल्हापूर. शिंदे गटाचे संजय मंडलिक हे कोल्हापूर लोकसभेचे विद्यमान खासदार आहेत. त्या जागेवर भाजपनं दावा केलेला असताना सुद्धा एकनाथ शिंदे यांनी मंडलिकांना तुम्ही तयारी करा, तुमची उमेदवारी ठरलीये म्हणत त्यांच्याचं उमेदवारीवर शिक्कामोर्तब होणार असल्याचं आश्वासन दिलंय. पण मंडळी तिथं संजय मंडलिक यांच्याविरोधात नाराजीचं वातावरणय. त्यांनी ठाकरेंची साथ सोडणं कोल्हापूरकरांना आवडलेलं नाही असं भाजपच्या सर्व्हेत समोर आलंय. त्यामुळं भाजप तिथं भाकरी फिरवण्याच्या तयारीत असून धनंजय महाडिकांपासून, समरजित घाटगे यांचं ही नाव तिथं भाजपकडून आघाडीवर आहे. दुसऱ्या बाजूला मविआकडून तिथं शाहू छत्रपतींना उमेदवारी जाहीर झालीये.दरम्यान शाहू महाराजांसारख्या अजातशत्रू उमेदवाराला हरवण्यासाठी महायुती त्यांचा उमेदवारदेताना चोखंदळपणा करतीये असं म्हंटलं जातंय.
(Loksabha Election 2024 | Vishaych Bhari)
पुढं आठवा लोकसभा मतदारसंघ आहे हातकणंगले. तिथं ही सेम कोल्हापूरसारखीचं परिस्थिती आहे. शिंदे गटाचे धैर्यशील माने तिथं विद्यमान खासदार असून त्यांनी ही शिवसेना फुटीनंतर शिंदे गटात उडी घेतल्यानं त्यांच्याबद्दल नाराजीचं वातावरण आहे. दरम्यान सध्या जरी विनींग सीट म्हणून शिंदे गटाकडून धैर्यशील माने यांच्या नावाला पसंती असली तरी भाजपकडून हातकणंगले हायजॅक करण्याच्या हालचाली सुरू झाल्याचं कळतंय. महायुतीकडून तिथं विनय कोरे, राहुल आवाडे, शौमिका महाडिक यांच्या रुपात नवा चेहरा दिला जाण्याचीही शक्यता आहे.पुढं नववा लोकसभा मतदारसंघ आहे बुलढाणा. सध्या शिंदे गटाचे प्रतापराव जाधव, हेच तिथले विद्यमान खासदार असून शिंदेंनी पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास टाकल्याचं कळतंय. बुलढाणा लोकसभा मतदारसंघावर गेल्या पंचवीस वर्षांपासून शिवसेनेचा ताबा आहे. मागच्या निवडणुकीत शिवसेनेच्या प्रतापराव जाधवांनी राष्ट्रवादीच्या राजेंद्र शिंगणे यांचा पराभव केला होता. पण बुलढाण्यात शिवसेनेनंतर राष्ट्रवादीची ही बऱ्यापैकी ताकद असल्यानं अजितदादा गटाकडून बुलढाण्याच्या जागेवर क्लेम करण्यात आला होता. पण महायुतीच्या बैठकीत ती जागा शिंदे गटाला सोडायची यावर एकमत झाल्याच्या चर्चा आहेत. खरं तर महायुती किंवा महाविकास आघाडीकडून तिथं अद्यापही अधिकृत उमेदवाराची घोषणा केलेली नाही. फक्त नावांची चर्चा आहे. पण स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर व वन बुलढाणा मिशनचे संदीप शेळके यांनी मात्र त्यांचा प्रचार सुरू केलाय. तसंच वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेवर ही बुलढाणा मतदारसंघाचं भवितव्य अवलंबून असणार आहे.
(Loksabha Election 2024 | Vishaych Bhari)
हे विषयच भारी वाचलेस का भावा !
जातीचं हे गणित जुळलं तरच Praniti Shinde सोलापूरच्या खासदार होतील ? | Solapur Loksabha Election 2024|Vishaych Bhariपरळीचा पुढचा आमदार कोणी | Pankaja Munde कि Dhananjay Munde | Parli Vaijnath | Parali Vidhansabhaशरद पवार नगरच्या खासदारकीला राधाकृष्ण विखे पाटील यांची अशी विकेट काढणार | Radhakrishna Vikhe Patil | Sharad Pawar | Vishaych Bhariसुजय विखे पाटीलच नगर दक्षिणचे पुढील खासदार होतील ? ७ कारणे | Loksabha Election 2024 | Vishaych Bhari
आता सर्वात शेवटचा म्हणजे दहावा लोकसभा मतदारसंघय शिर्डी. तिथं ही शिंदे गटाचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्याचं नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याची चर्चा आहे. कालच खासदार लोखंडे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटला की नाही, हे कळेल. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मलाच कामाला लागा, अशा सूचना केल्या आहेत. त्यामुळे शिर्डीत महायुतीचा उमेदवार म्हणून शंभर टक्के मीच असेल. मी निवडणुकीत चपटी आणि पाकीट वाटले नाही, तरी जनतेचा माझ्यावर विश्वास असल्याचा दावा शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी व्यक्त केला. तसंच त्यांच्याविरुद्ध ठाकरेंचे भाऊसाहेब वाकचौरे हे शिर्डी लोकसभेच्या रिंगणात उतरतील हे जवळपास कन्फर्म आहे असं बोललं जातंय. आता त्या 10 जागांवर शिंदेचे उमेदवार निश्चित झाल्याची चर्चा आहे पण उरलेल्या तीन मतदारसंघात मात्र भाजप – शिंदे गट – अजितदादा गट यांच्यात कळवंडी सुरू आहेत. त्यामध्ये खासकरून अमरावती, परभणी, नाशिक या जागेंचा वाद आहे. अमरावतीत आनंदराव अडसूळ शिंदे गटाकडून तर नवनीत राणा भाजपकडून इच्छुक आहेत. परभणीत शिंदे गटाचे विद्यमान खासदार संजय जाधव तर अजितदादा गटाचे राजेश विटेकर यांच्यात उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू आहे. नाशिकमध्ये श्रीकांत शिंदे यांनी विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांची उमेदवारी आधीच जाहीर केली होती पण आता त्यांची उमेदवारी धोक्यात आली असून भारतीय जनता पक्षानं नाशिक मतदारसंघातून छगन भुजबळ यांनी भाजपच्या कमळ या चिन्हावर उमेदवारी करावी, असा प्रस्ताव दिल्याचं कळतंय. पण तो प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फेटाळून लावला असून भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावरच निवडणूक लढवतील, अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलीय. त्यामुळं शिंदेच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे. पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय, एकनाथ शिंदे याचं उमेदवारांसह लोकसभेच्या रिंगणात उतरले की भाजपच्या दबावतंत्राला बळी पडून विद्यमान खासदारांचा पत्ता कट करून नव्या चेहऱ्यांना संधी देईल. शिंदेच्या खासदारांवर भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची वेळ येईल का,
शिंदे गटाचे यावेळी किती उमेदवार निवडून येतील? तुमची मत कमेंट करून नक्की सांगा.
Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇
https://www.facebook.com/vishaychbhari
Leave a Reply