पडत्या काळात ज्यांना साथ दिली ते छगन भुजबळ शरद पवारांवर कसे उलटले ? | Sharad Pawar vs Chhagan Bhujbal
साहेब, जे काही चालले आहे ते काही योग्य वाटतं नाही, मी जातो, माहिती घेतो आणि तुम्हाला कळवतो असं म्हणाले अन गेले ते सगळयांनाच घेऊन गेले असं उद्गार Sharad Pawar यांनी त्यांच्या चार दिवसापूर्वीच्या भाषणात काढलं.
शरद पवारांच्या बोलण्याचा रोख छगन भुजबळाकडे होता हे आता लपून राहिलेलं नाही. त्यादिवशी उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांच्यापाठोपाठ कॅबिनेट मंत्री म्हणून छगन भुजबळ यांनी शपथ घेतली. आठ तारखेला त्यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजे नाशिकच्या येवला भागात शरद पवार त्यांची बंडानंतरची पहिली सभा घेतायत. खरं तर Chhagan Bhujbal शरद पवार यांना सोडून जातील याची कुणीचं कल्पना केली नव्हती. कारण भुजबळांची राजकारणात डगमगलेली नौका पार लावण्यात शरद पवारांचा मोठा हातय आणि ते खुद्द भुजबळ देखील मान्य करतात. आजच्या या व्हिडीओत आपण छगन भुजबळ यांच्या राजकीय प्रवासात शरद पवारांची नेमकी काय भूमिका राहिली, त्यांनी विरोध असताना ही भुजबळांना निवडणुकीचं तिकीट का दिलं याची माहिती जाणून घेणारय…

मंडळी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पहाटेच्या शपथविधीनंतर अजित पवार एक ना एक दिवस सत्तेच्या वळचणीखाली जाऊन उभे राहणार याची राजकीय क्षेत्रात चर्चा होतीचं. मात्र अजित पवारांसोबत छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांसारखी माणसं ही जातील यावर लोकांचा अजूनही विश्वास बसत नाही. म्हणूनच की काय आज सुद्धा अजित पवार यांचं बंड सगळ्यांना शरद पवार यांचीचं खेळी वाटते. असो, बाकीच्यांचं सोडा छगन भुजबळ हे सुद्धा शरद पवारांविरुद्ध बंड करतील याची खुद्द त्यांच्या कार्यकर्त्यांना ही कल्पना नसावी. कारण मागच्या काही काळापासून राजकारणात मार्गक्रमण करताना शरद पवार या नावानेचं भुजबळ यांचं राजकीय आयुष्य व्यापून राहिलं होतं. आता आपण सुरुवातीपासून भुजबळांच्या राजकीय प्रवासाचा धांडोळा घेऊयात म्हणजे गोष्टी तुमच्या लक्षात येतील. नाशिकमधील भगवानपुरा भागातल्या अरुंद गल्लीबोळात बालपण घालवल्यानंतर भुजबळ भावंड आई वडिलांच्या निधनानंतर आईच्या आत्याकडं जाऊन राहिली. पुढं मगन आणि छगन भुजबळ मुंबईत दाखल झाले. माळी समाजातील लोकांनी पैशाची मदत केली अन त्या भावंडानी माझगावमध्ये भाजीपाल्याचा छोटेखानी व्यवसाय सुरू केला. त्यासोबतच मेकॅनिकल इंजिनीअरिंगचा डिप्लोमा ही पूर्ण केला. त्याकाळी बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून भुमीपुत्रांच्या हक्कांसाठी आवाज उठवत होते.
आंदोलनं करत होते. बाळासाहेबांच्या करारी भाषणांनी छगन भुजबळ प्रभावित झाले. त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि बाळासाहेबांच्या मार्गदर्शनात राजकीय प्रवास सुरू केला. लोकाशी असलेला जनसंपर्क आणि आक्रमक भाषणांमुळे सेनेत त्यांचं महत्त्व वाढलं. त्याच्या जोरावरच त्ये १९७३ साली शिवसेनेतून निवडून आलेले पहिले नगरसेवक ठरले. १९७३ ते १९८४ या काळात छगन भुजबळ हे मुंबईतील सर्वांत क्रियाशील नगरसेवक मानले जात होते. त्यांच्या कामाच्या धडाक्यामुळे दोनवेळा ते मुंबई महापालिकेचे महापौरही झाले. महापौर असताना त्यांनी राबलेली ‘सुंदर मुंबई, मराठी मुंबई’ ही मोहीम विशेष गाजली. मुंबईच्या सौंदर्यासाठी त्यांनी अनेक कठोर पावले उचलली. १९८५ मध्ये ते माझगावमधून शिवसेनेचे पहिले आमदार झाले. मात्र शिवसेनेत त्यांच्या मनाप्रमाणे गोष्टी घडत नव्हत्या. १९९१ मध्ये मग मंडल आयोगाच्या मुद्द्यावरून शिवसेना ओबीसी आरक्षणाच्या विरोधात असल्याचं सांगत भुजबळांनी शिवसेना सोडली. मात्र राजकीय जाणकारांची त्याबद्दल वेगवेगळी मतं आहेत. असं सांगितलं जातं की, १९९० च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीनं ८५ जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी आपल्याला विरोधी पक्षनेतेपद मिळेल अशी आशा भुजबळ यांना होती. पण बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशी यांना विरोधी पक्षनेते केलं. त्यातूनच त्यांचा जोशी यांच्यासोबतचा संघर्ष वाढत गेला आणि परिणामी भुजबळांनी शिवसेना सोडली. त्यावेळी भुजबळावर भयंकर टीका करण्यात आली होती. रागावलेल्या शिवसैनिकांनी त्यांच्यावर हल्ला करण्याची ही तयारी केली होती. तो काळ त्यांच्यासाठी खूप धकाधकीचा राहिला. त्यांना मुंबईत येणं अवघड जाऊ लागलं. पण त्यातून सावरून त्यांनी पुढं स्वत:ला ओबीसी नेता म्हणून महाराष्ट्रापुढं प्रेझेंट केलं.

दरम्यान त्याच काळात शरद पवार हे राज्यातील कॉंग्रेसचे प्रमुख नेते म्हणून काम करत होते. छगन भुजबळ यांच्या कामाचा सपाटा आणि शिवसेनेत सुरू असलेला त्यांचा संघर्ष पवारांच्या नजरेतून सुटला नाही. त्यावेळी मग पवारांनी भुजबळ यांना आपल्यासोबत घेण्याचा निर्धार पक्का केला. तशी बोलणी ही केली. दोघांचे सुर जुळले आणि १९९१ च्या नागपूर हिवाळी अधिवेशनात भुजबळ यांनी नऊ आमदारांना सोबत घेत शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. भुजबळांच्या कॉंग्रेसवासी होण्याचा शिवसैनिकांना आणखीनच राग आला. बाळासाहेब ठाकरे यांनी भुजबळांना ‘लखोबा लोखंडे’ म्हणत संताप व्यक्त केला. त्यावेळी संतापलेल्या शिवसैनिकांकडून भुजबळांच्या जीवाला काही धोका पोहोचणार नाही याची सगळी जबाबदारी शरद पवार यांनी घेतली होती. पुढं शरद पवार यांचं काँग्रेसवाल्यांशी वाजलं आणि त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत राष्ट्रवादीची स्थापना केली. त्यावेळी पवारांच्या खांद्याला खांदा लावून चालणारे पहिले नेते होते छगन भुजबळ. त्यामुळं भुजबळ पवारांचे विश्वासु सहकारी बनले. शरद पवारांनी कॉंग्रेस – राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारमध्ये त्यांना उपमुख्यमंत्री बनवलं. एवढच नाही तर एकदा गृहमंत्रालयाची ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. शरद पवार यांनी भुजबळ यांच्या आक्रमक राजकारणाला कायमच पाठिंबा दिला. त्यामुळेचं की काय एकदा गृहमंत्री असताना बाळासाहेब ठाकरे यांना अटक करण्याचा धाडशी निर्णय ही भुजबळांनी घेतला. शरद पवार यांनी छगन भुजबळ यांना प्रत्येकवेळी सत्तेत संधी दिली. दोन वेळा उपमुख्यमंत्रीपदासोबतच विविध खात्यांची मंत्रीपदेही छगन भुजबळांनी भूषवली.
एकीकडं त्यांचा राजकीय आलेख वाढत असतानांच आर्थिक गैरव्यवहाराची प्रकरणेही त्यांच्या मानगुटीवर बसली. तेलगीने केलेला स्टँम्प घोटाळा, दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकाम गैरव्यवहार यामुळं भुजबळांची इमेज डॅमेज होत राहिली. पण तरीही शरद पवार यांनी वेळोवेळी भुजबळांना संधी दिली. भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांच्या माहितीनुसार भुजबळ यांच्याकडे 2,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्तीय. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे आणि लोणावळा येथे टाकलेल्या छाप्यात छगन भुजबळ आणि त्याच्या कुटुंबीयांच्या नावावर कोट्यवधींची मालमत्ता आढळून आली होती. त्यात नाशिकमध्ये त्यांचा मुलगा पंकज भुजबळांच्या नावावर असलेला 46,500 स्क्वेअर फुटांमध्ये पसरलेला 100 कोटीचा बंगला देखील होता. दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळाप्रकरणी आणि बेहिशोबी मालमत्ता जमवल्याच्या आरोपावरुन १४ मार्च २०१६ रोजी भुजबळांना अटक देखील करण्यात आली होती. ते जवळजवळ अडीच वर्षे तुरुंगात होते. त्यानंतर ते जामीनावर बाहेर आले. तुरुंगातून आल्यानंतर त्यांना तिकीट देण्यास पक्षातील अनेकांनी विरोध केला होता. परंतू त्यांच्यावर अन्याय झालाय असं सांगून पवारांनीचं त्यांना विधानसभेला तिकीट दिलं. एवढच काय महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रीही केलं. नुकताच तो किस्सा जितेंद्र आव्हाड यांनी वाय बी सेंटरमध्ये सांगितला.

मात्र, हेच भुजबळ आता त्यांच्या गुरूची साथ सोडून पुरोगामी विचारधारा खुंटीला टांगत पुन्हा एकदा सत्तेच्या मागे गेलेले दिसले आणि कार्यकर्त्यांची गोची झाली. १९९१ च्या नागपूर हिवाळी अधिवेशनापासून भुजबळ यांच्या आयुष्यात आलेला शरद पवार नावाचा सुवर्ण अध्याय चार दिवसांपूर्वी अजित पवार यांनी केलेल्या बंडासोबत संपला अशी आता चर्चा रंगायला लागलीये. भ्रष्टाचार प्रकरणाच्या अनेक केसेस त्यांच्यावर प्रलंबित आहेत. या सर्व प्रकरणांमधून स्वतःची सुटका करुन घेण्यासाठीच शरद पवारांची साथ सोडत त्यांनी अजित पवारांचा हात हातात घेत भाजपसोबत सत्तेचा मार्ग धरला असावा, असा कयास राजकीय वर्तुळातून व्यक्त केला जात आहे. अन्यथा ज्या माणसाने सत्तेचं दान भरभरुन आपल्या झोळीत टाकलं त्यालाच आव्हान देण्याची भाषा छगन भुजबळ यांनी केली नसती. एकूण काय तर सत्तेपुढं कुणाचचं शहाणपण चालत नाही. अन्यथा तत्व, निष्ठा आणि विचारधारा फक्त भाषणापुरत्या मर्यादित राहिल्या नसत्या. असो, बाकी छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्याविरोधात पुकारलेल्या बंडाबाबत नेमकं तुमचं मतं काय त्ये आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा किस्सा आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा.
Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇
https://www.facebook.com/aplavishaychbhari
Leave a Reply