नितीन काका पाटील हे शरद पवार गटाकडून साताऱ्याचे पुढील खासदार होतील ? | Satara Loksabha 2024 News|Sharad Pawar


मंडळी काल छत्रपती उदयनराजेंनी साताऱ्यात मोठा रोड शो करून विरोधकांच्या काळजात धडकी भरवली. दिल्लीत अमित शाह यांच्या भेटीनंतर आता महायुतीकडून छत्रपती उदयनराजे यांनाचं सातारा लोकसभेची उमेदवारी दिली जाणार हे निश्चित मानलं जातंय. पण महायुतीचा उमेदवार ठरत नाही तोवर आपला पत्ता खोलायचा नाही अशी भूमिका घेतलेल्या शरद पवार यांनी मात्र आता गडबड करायला सुरुवात केलीये. आजच त्यांनी साताऱ्यात तातडीनं बैठक घेऊन लोकसभेच्या इच्छुक उमेदवारांची मतं जाणून घेतली. दरम्यान वाढत्या वयाच्या आणि आरोग्याच्या तक्रारीमुळं खासदार श्रीनिवास पाटील यांनी लोकसभेच्या मैदानातून माघारी घेतल्याचं कळतंय. शरद पवार यांच्याजवळ त्यांनी त्यांचं मन मोकळं केलं. पण आता श्रीनिवास पाटील नाहीत तर मग छत्रपती उदयनराजे यांच्या तोडीस तोड उमेदवार कोण द्यायचा हे आव्हान शरद पवार यांच्यासमोर आहे. तसं बऱ्याच म्हणजे जवळपास 200 च्या वर इच्छुक उमेदवारांनी शरद पवार यांची त्यासंबंधी गाठ घेतल्याची चर्चा आहे पण त्यातही श्रीनिवास पाटील यांचे पुत्र सारंग पाटील, कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील, सत्यजित पाटणकर, सुनील माने, शशिकांत शिंदे यांची नावं सर्वाधिक चर्चेत आहेत. मध्यंतरी शिंदे गटाचे नाराज नेते पुरुषोत्तम जाधव यांनीही पवारांची गाठ घेतली होती पण आता शरद पवार साताऱ्यात भाकरी फिरवण्याच्या मूडमध्ये असल्याच्या चर्चा आहेत. राजेंना महायुतीकडून उमेदवारी जाहीर होणार या चर्चा रंगल्यापासून अजितदादा गटाचे इच्छुक उमेदवार नितीन काका पाटील, त्यांचे बंधू आमदार मकरंद पाटील हे नाराज आहेत आणि ऐनवेळी ते अजितदादांची साथ सोडून पुन्हा शरद पवार गटात घरवापसी करणार असल्याच्या चर्चाना साताऱ्यात उधाण आलंय. जर नितीनकाका पाटलांसारखा वाई, जावळी, सातारा, खंडाळा आणि फलटण भागावर प्रभाव असणारा उमेदवार पवारांच्या गळाला लागला तर राजेंसाठी ही निवडणूक अटीतटीची होऊ शकते असं बोललं जातंय. पण खरंच साताऱ्यात चर्चा आहे तशी नितीन काका शरद पवार गटाकडूक सातारा लोकसभा लढवतील का ? कोण असेल राजेंविरुद्ध पवारांचा ठेवणीतला हुकमी एक्का, राजेंच्या दिल्ली वारीनंतर साताऱ्यात राजकीय वातावरण इतकं का तापलंयं त्याचा घेतलेला थोडक्यात आढावा.

nitin patil, shrinivas patil, udayanraje bhosale,

(Satara Loksabha 2024 News|Sharad Pawar)

मंडळी आता बरेच डाव प्रतिडाव खेळून झाल्यानंतर महायुतीकडून भाजपचे उदयनराजे हेच सातारा लोकसभा लढवतील यावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब होणं तेवढं बाकी राहिलंय. पण राजेंच्या उमेदवारीमुळं अजितदादा गटाचे रामराजे निंबाळकर, नितीन काका पाटील, मकरंद पाटील यांच्या गोटात नाराजीचं वातावरणय. शिंदे गटाचे इच्छुक उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांचा देखील मूड ऑफ असल्याच्या चर्चा आहेत. कारण मध्यंतरी त्यांनी शरद पवार यांची उमेदवारीसाठी भेट घेतली होती. दरम्यान आता हा महायुतीचा आख्खा नाराज गट आणि त्यांची राजकीय ताकद शरद पवार यांनी हेरल्याचं बोललं जातंय. दुसरीकडं त्यांनाही साताऱ्यात श्रीनिवास पाटील यांच्यानंतर तगडा उमेदवार मिळत नाहीये. कारण विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांच्या उमेदवारीला पक्षातून आणि मित्र पक्षातल्या नेत्यांकडून ही साताऱ्यात विरोध होत असल्यानं शरद पवार नव्या उमेदवाराच्या शोधात आहेत. त्यासाठीचं त्यांनी आज तातडीन साताऱ्यात इच्छुक उमेदवारांची बैठक बोलावली होती. त्या बैठकीत एनसीपी शरदचंद्र पवार गटाचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर सर्व नेते आणि कार्यकर्ते एकत्रितपणे पक्षाचा प्रचार करतील, असा विश्वास शशिकांत शिंदेंनी व्यक्त केला तर उदयनराजे भोसलेंची उमेदवारी पहिल्या यादीत जाहीर झाली नाही, हे वेदनादायी असल्याचा टोला सुप्रिया सुळेंनी लगावला. मंडळी 2019 मध्ये उदयनराजे भोसलेंनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर विजय मिळवून ही भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळं सातारा लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली होती. त्या निवडणुकीच्या प्रचारात शरद पवारांनी पावसात सभा घेतली होती. त्या सभेमुळेच सातारा लोकसभा मतदारसंघातलं वारं फिरलं होतं आणि श्रीनिवास पाटील भरघोस मताधिक्यानं निवडून आले होते. अन आताही 2019 चीचं पुनरावृत्ती होणार असा दावा शरद पवार गटाचे समर्थक करतायत फक्त त्यासाठी उमेदवार तगडा हवा अशी त्यांची मागणी आहे. इतक्या दिवस श्रीनिवास पाटील विरुद्ध उदयनराजे अशीचं लढत साताऱ्यात होईल असं म्हंटलं जात होतं पण विधानसभा मतदारसंघनिहाय कार्यकर्त्यांच्या बैठकीत श्रीनिवास पाटील यांनी तब्बेतीचं कारण सांगून उमेदवारीच नाकारली. म्हणून पवारांनी इतर इच्छूक उमेदवारांचीही नावे जाहीर केली आहेत. त्यामध्ये बाळासाहेब पाटील, सत्यजित पाटणकर, सुनील माने, शशिकांत शिंदे, सारंग पाटील तर स्वत: शरद पवार यांचं नाव देखील कार्यकर्त्यांनी सुचवलं असल्याचं शरद पवारांनी सांगितलंय. तर, ऐनवेळी क्लीन चेहरा म्हणून काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांचेही नाव पुढे येण्याची शक्यता आहे पण ते लढण्यास इच्छुक नाहीत.

(Satara Loksabha 2024 News|Sharad Pawar)


अद्यापपर्यंत राष्ट्रवादीतील एकाही इच्छुकाच्या नावावर पक्षातून एकमत झालेलं नाही. आता सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा कौल जाणून घेऊन उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब केलं जाईल अशी भूमिका पवारांची आहे. पण पवारांच्या डोक्यात मात्र वेगळंच गणित शिजत असल्याची चर्चा सध्या साताऱ्यात आहे. त्याचं झालंय असं अजितदादा गटाचे आमदार मकरंद पाटील यांनी अजितदादाकडं पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या उमेदवारीवरून नाराजी व्यक्त केल्याची खबर आहे. कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यात घड्याळावर एकही उमेदवार नाही अशी खदखदही त्यांनी अजितदादांना बोलून दाखवलीये. सोबतच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही तेच गाऱ्हाणं मांडलं. मकरंद पाटील म्हणाले की, सातारा लोकसभा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. पुण्यापेक्षा सातारा जिल्ह्याने राष्ट्रवादी काँग्रेसला भरभरून प्रेम दिलंय. यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचा जिल्हा आहे. माढा लोकसभेतही कार्यकर्त्यांना मानसिक त्रास दिला गेलाय. खोट्या गुन्ह्यात त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत. त्यामुळं अजितदादा, तुम्ही कार्यकर्त्यांची भावना समजून घ्या. आम्ही अनेकदा तुम्हाला सांगितलं आहे, तुम्ही वरिष्ठांनी आमचं ऐकलं नाही. याचे पडसाद तुम्ही पाहिले. कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यात घड्याळावर एकही उमेदवार नाही. ज्या साताऱ्याने पक्ष रुजवला, वाढवला, त्या साताऱ्याचा उमेदवार घड्याळाचा असावा. उमेदवार कोणताही द्या इतकीच मागणी मी करतो. आता ही खदखद मकरंद पाटील यांनी अजितदादा यांच्यापुढं मांडली असली तरी पोहोचलीये मात्र शरद पवारांपर्यंत असं बोललं जातंय. त्यामुळं आता सातारा लोकसभेसाठी इच्छुक असलेले मकरंद पाटील यांचे बंधू नितीन काका पाटील हे ऐनवेळी शरद पवार गटात प्रवेश करतील असं बोललं जातंय. तसंही पाटील कुटुंब आणि पवारांचे जुने व जिव्हाळ्याचे संबंध आहेत. नितीन काका यांचे वडील दिवंगत नेते लक्ष्मण तात्या पाटील हे शरद पवार यांचे सर्वात विश्वासू सहकारी. सन 1999 साली शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यावेळी सातारा जिल्ह्यात सर्वात प्रथम त्यांनीच राष्ट्रवादीचा झेंडा आपल्या खांद्यावर घेतला होता. त्यांनीचं वाई, जावळी, खंडाळा, फलटण भागात राष्ट्रवादी काँग्रेसची पाळंमुळं वाढवण्यास मदत केली. त्यांच्यानंतर त्यांचे सुपुत्र मकरंद आबा पाटील आणि नितीन काका पाटील या दोघांनी शरद पवार यांना खमकी साथ दिली होती. पण फुटीनंतर पाटील बंधू अजितदादा गटात गेले. पण राजकारणात कधीही कुणाशी कायमच शत्रूत्व न ठेवणारे पवार त्यांच्या विरोधकांसाठीही आपली दारं खुली ठेवतात हे वेळोवेळी पाहण्यात आलंय.

ajit pawar, sharad pawar,

(Satara Loksabha 2024 News|Sharad Pawar)

माढ्यात मोहिते पाटील यांना पुन्हा पक्षात घेण्यामागं ही पवारांची तीच भूमिका आहे. आता सेम तोच फॉर्मुला ते नितीन काका पाटील यांच्या बाबतीत ही वापरू शकतात अशा चर्चा आहेत. कारण पवार हे नेहमीचं बेरजेचं राजकारण करत आलेत. मागं सुद्धा सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीनंतर भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि राष्ट्रवादीतर्फे नितीन पाटील यांची नावं अध्यक्षपदासाठी चर्चेत होती. तेव्हा शिवेंद्रराजेंनी पवारांकडे गळ घालून सुद्धा भविष्याची धोरणे आखून पवारांनी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदाची माळ नितीन काका पाटील यांच्या गळ्यात घातली होती. पाटील बंधू साताऱ्यात अजातशत्रू म्हणून ओळखले जातात.. त्यांची सातारा लोकसभेतल्या चार मतदारसंघावर पकड चांगली आहे. सोबतचं कोरेगावचे शशिकांत शिंदे, फलटणचे रामराजे निंबाळकर, जावळीचे शिवेंद्रसिंह राजे यांसारख्या नेत्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यांना जर कराड आणि सातारा भागातील नेत्यांची साथ लाभली तर नितीन काकांचं आव्हान राजेंना जड जाऊ शकतं असं म्हंटलं जातंय अन म्हणूनचं येत्या काळात साताऱ्यात शरद पवार हे नितीन काकांच्या रूपात लोकसभा उमेदवारीची भाकरी फिरवू शकतात असं म्हंटलं जातंय. पण प्रश्न पुन्हा तोच आहे. कराड, पाटण, माण खटावचा काही भाग आणि साताऱ्यातून नितीन काकांना ताकद पुरवली जाईल का ? जिथं राजेंच प्राबल्य अधिकय तिथं नितीन काका मतदारांची मन वळवण्यात यशस्वी होणार का ? शरद पवार गटाचे आणि काँग्रेसचे इच्छुक उमेदवार नितीन काकांच्या उमेदवारीला संमती दर्शवणार का ? तुम्हाला नेमकं काय वाटतंय, नितीन काका पाटील आगामी निवडणूक शरद पवार गटाकडून लढवतील का ? कोण असेल शरद पवार गटाचा उमेदवार, नितीन काका पाटील, सारंग पाटील, बाळासाहेब पाटील, सुनील माने की शशिकांत शिंदे, कोण होईल साताऱ्याचा पुढचा खासदार, तुमची मतं कमेंट करुन नक्की सांगा.

(Satara Loksabha 2024 News|Sharad Pawar)

हे विषयच भारी वाचलेस का भावा !

8 ठरले पण एकनाथ शिंदे यांच्या या ५ खासदारांचं तिकीट कापलं गेलंय का ? | Loksabha Election 2024 News|Eknath Shindeधैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार गटाकडून लढल्यास माढ्याचे फिक्स खासदार | Madha Loksabha 2024|Dhairyashil Mohite Patilबच्चू कडू यांच्या विरोधामुळं अमरावती मध्ये नवनीत राणा पडतील ? | Amravati Loksabha Election 2024| Bacchu Kaduया ५ जागांवर भाजपच्या रागापोटी शिंदेचे नेते ठाकरेंना मदत करतील ? | Loksabha Election 2024 News| Vishaych Bhari

नितीन काका पाटील हे शरद पवार गटाकडून साताऱ्याचे पुढील खासदार होतील ? | Satara Loksabha 2024 News|Sharad Pawar

Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇

https://www.facebook.com/vishaychbhari

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *