तुकाराम महाराजांचा खरंच खून झाला होता का | Sant Tukaram Beej | Sant Tukaram Maharaj Death | Vishaych Bhari


आमच्यापेक्षा कनिष्ठ समाजातील माणूस ईश्वरासाठी कविता कशा लिहू शकतो ? कविता करण्यासाठी तुम्ही धर्मपीठाची परवानगी घेतलेली का ? आम्ही पंडित मेलो की काय ? धर्मपीठा समोर आरोपी म्हणून उभे असलेल्या तुकाराम महाराजांना रामेश्वर भट असा खोचक प्रश्न विचारतो. त्यावर शांत स्वभावाचे तुकाराम महाराज ठामपणे बोलू लागतात. तुकोबा म्हणतात, नुकतंच जन्माला आलेलं मूल त्याच्या आईचं स्तन्य चोखु लागतं तेव्हा त्याला कुणाची परवानगी घ्यावी लागत नाही. अगदी त्याचं निरागसपणे मी माझी काव्य लिहितो. ज्ञान मिळवण्याचा आणि ईश्वराला भेटण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. सत्य आम्हा मनी, नव्हे गबाळाचे धनी । देतो तीक्ष्ण उत्तरे, पुढे व्हावयासी बरे. इतक्या आक्रमकपणे ज्या तुकाराम महाराजांनी त्यांच्या जिवंतपणी कर्मकांड, कर्मठपणा, भोंदूगिरी, अस्पृश्यता, शेतकऱ्यांवरील अन्याय या गोष्टींबद्दल वैज्ञानिक दृष्टीकोनातून आवाज उठवला, लोकांना आयुष्याला पुरेल एवढं तत्वज्ञान अभंगातून सांगितलं त्याचं तुकाराम महाराजांच्या निधनाबद्दल मात्र काही लोकांनी चुकीची माहिती इतिहासात नोंद केली असा आरोप गेले कित्येक दिवस सातत्याने होताना दिसतोय.. तुकाराम महाराजांचं खरंच वैकुंठ गमन झालं की अनेक इतिहासकार सांगतात तसं त्यांचा खून झाला, नेमकं काय सत्यय,? आता हेच नीट समजून घेण्यासाठी आपल्याला तत्कालीन परिस्थितीत घुसून ‌विचार करावा लागेल.

tukaram maharaj,

(Sant Tukaram Beej | Sant Tukaram Maharaj Death | Vishaych Bhari)

पोळ्या करत बसलेल्या आवलीला म्हणजे तुकारामांच्या पत्नीला एक शेजारची बाई सांगत येते, अगं इथं पोळ्या काय करत बसलीयेस, तिकडे तुकोबा वैकुंठाला जायला निघाले, चल लवकर. त्यानंतर आवली धावत पळत जाते तर तिथं गरुडाच्या पाठीवरील पुष्पक विमानात बसलेले तुकाराम महाराज लोकांना हात करून म्हणतात, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. त्यानंतर तो महाकाय गरुड आसमंतात झेपावतो आणि काही वेळाने अदृश्य होतो. गावकरी तुकाराम वैकुंठाला गेले असं कुजबुजतात. 1936 साली रिलीज झालेल्या ‘संत तुकाराम सिनेमातला हा शेवटचा सीन. तेव्हापासून प्रत्येकाला वाटतंय की तुकाराम महाराज पुष्पक विमानात बसून सदेह वैकुंठाला गेले. अगदी सायन्स शिकणाऱ्या महाराष्ट्रीयन तरुणांची सुद्धा अजून तीचं समजूतय. पण जे सायन्स स्वर्ग, नरक किंवा अगदी तत्सम वैकुंठ अशा गोष्टी नाकारतं, त्याचं सायन्सचे विद्यार्थी तुकाराम महाराजांना वैकुंठगमन झालं ह्ये विना चिकित्सा कसं काय स्वीकारु शकतात, असाही प्रश्न मागच्या काही काळापासून पुरोगामी विचारसरणीच्या लोकांकडून उपस्थित केला जातोय. त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी 2018 साली एकदा त्यांच्या फेसबुक लाईव्हमध्ये ‘संत तुकारामांचा खून झाला होता’ असं म्हणाले होते. वारकरी संप्रदायातील काही जणांनी त्याचा कडकडून निषेध ही केला होता. पुढं तो वाद आणखी वाढल्यानंतर आव्हाडांनी तो व्हिडिओ त्यांच्या फेसबुक प्रोफाइलवरून काढूनही टाकला होता. पण त्यानंतर तुकारामांच्या मृत्यूविषयीचं गूढ आणखीनचं चर्चेत आलं. अन नेमकं तुकाराम बीजच्या निमित्ताने तो प्रश्न नाही म्हणलं तरी दरवर्षी तोंड वर काढतोचं.

(Sant Tukaram Beej | Sant Tukaram Maharaj Death | Vishaych Bhari)

खरं तर जितेंद्र आव्हाड यांच्याआधीही बऱ्याच लेखकांनी त्यांच्या पुस्तकात, इतिहासकारांनी त्यांच्या शोध निंबधात आणि कीर्तनकारांनी त्यांच्या कीर्तनात तुकारामांच्या मृत्यूचा मुद्दा उपस्थित केला होता. सत्यशोधक समाज आणि ब्राम्हणेतर चळवळीतील अनेकांनी तो प्रश्न पुन्हा पुन्हा चव्हाट्यावर आणायचं काम केलंय. त्यापैकी एक म्हणजे डॉ सदानंद मोरे ,जे स्वतः संत तुकाराम महाराजांचे वंशज आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, तुकारामांच्या वैकुंठगमन किंवा हत्येविषयी कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीयेत. त्यामुळं कुणी पुरावे नसताना महाराजांच्या मृत्यूचा केवळ राजकारणासाठी उपयोग करून घेऊ नये. पण तुकाराम महाराजांच्या अभंगाची संहिता म्हणजेचं विद्रोही तुकाराम हे पुस्तक लिहिणारे ज्येष्ठ लेखक आणि इतिहास अभ्यासक डॉ. आ. ह. साळुंखे म्हणतात की, आजवर बहुतेक चरित्रकारांनी आपल्यापुढ तुकारामांची उभी केलेली प्रतिमा त्यांच्या मूळ व्यक्तित्वाशी सुसंगत असलेली दिसत नाही. म्हणजे काय तर तुकाराम महाराज हे आर्थिकरित्या दुर्बल झाल्यामुळं ईश्वराच्या भक्तीला लागले. त्यांना संसार नीट जमला नाही. ते व्यवहारशून्य आणि भोळेभाबडे होते. तसंच ते नेहमी सदैव टाळ कुटत राहायचे वगैरे अशी त्यांची प्रतिमा आजवर आपल्यापुढं उभीकरण्यात आलेलीय. पण खरी वस्तुस्थिती तशी नव्हती. तुकाराम महाराज हे धर्माच्या नावावर अनीतीचा बाजार मांडणाऱ्या अहंकारी धर्मसत्तेला आव्हान देणारे एक लढवय्ये संत होते. पण अनेक चरित्रकारांनी तशा सिंहाचं चित्रण शेळीच्या स्वरूपात केल्याचं आ.ह. साळुंखे यांचं म्हणणंय. डॉ आ.ह साळुंखे यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे, तुकारामांनी त्यांच्या धारदार वाणीने अत्यंत जहाल शब्दात ढोंगी आणि भ्रष्ट लोकांवर ताशेरे ओढलेलेयेत. धार्मिकतेचा बुरखा पांघरून लोकांना लुटणाऱ्या लोकांना तर त्ये कडाडून विरोध करत असत. आपलं म्हणणं पटवून देण्यासाठी त्ये अभंगातून वास्तविक जीवनाचे दाखले ही देत असत. वेदाचा तो अर्थ आम्हांसीच ठावा, येरांनी वाहावा भार माथा, या कडव्यात ते सांगतात की वेदांचा खरा अर्थ न समजणारे पंडित म्हणजे ओझं वाहणारी गाढवं आहेत.
अगदी तुकाराम महाराज यांच्या मूळ ओळी या
म्हणे तर देऊ गांडेची लंगोटी,नाठाळाचे माथी हाणू काठी अशा आहेत पण
काहींना तो शब्द खटकल्याने मग त्याऐवजी
कासेची हा शब्द वापरला जाऊ लागला.
त्यांचं हेचं तिखटजाळ बोलणं आणि लिखाण
त्यावेळच्या धार्मिकतेचं कातडं पांघरणाऱ्या कर्मठांना आवडत नसायचं. त्यामुळं त्या प्रत्येकाच्या मनात विद्रोही तुकारामांविरोधात एकप्रकारे विष तयार झालं होतं. अगदीचं तुकारामांच्या आणखी एका विद्रोही अभंगाचा दाखला द्यायचा झालाचं तर
सकळ शास्त्रांचे सार। हें वेदांचे गव्हर।
पाहतां विचार। हाचि करिती पुराणें।।
ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र। चांडाळांही अधिकार।
बाळें नारीनर। आदिकरोनि वेश्याही,

(Sant Tukaram Beej | Sant Tukaram Maharaj Death | Vishaych Bhari)

या अभंगाद्वारे तुकाराम महाराज ठणकावून सांगतात की, वेद समजून घ्यायचा अधिकार समाजातील प्रत्येक घटकाला आहे. नर, नारी, ब्राम्हण, क्षत्रिय, व्यापारी, वंचित आणि अगदीच वैश्येलाही. पण आ.ह.साळुंखे यांच्या म्हणण्यानुसार तुकाराम महाराजांचे ते विचार कितीही क्रांतीकारी असले तरीही तत्कालीन समाजव्यवस्थेतील प्रस्थापितांना रुचणारें नव्हते. आणि त्यामुळेचं समाजातील प्रस्थापित आणि प्रतिष्ठित लोक हे तुकारामांचा द्वेष करायचे . त्याबद्दल संत तुकारामांच्या शिष्या संत बहिणाबाई यांनीही त्यांच्या अभंगात तुकोबांबद्दल लिहून ठेवलंय. देहूमध्ये मंबाजी गोसावी आणि त्यांचे अनुयायी महाराजांचा कसा द्वेष करायचे त्याबद्दल त्यांनी लिहिलंय.
तुम्हांसी वाळीस ब्राह्मणाचे पंक्तिं । तुम्ही गुरुभक्ती नका सांगूं ॥ बहिणी म्हणें ऐसें मंबाजी बोलिला । द्वेषही मांडिला तेच क्षणीं ॥
स्वतः तुकाराम महाराजांनीही वेळोवेळी त्यांच्या अभंगातून
‘हे लोक कोलीत लावून माझा घात करतील. पण शस्त्रधारी माणसाने जरी माझ्या देहाचे शेकडो तुकडे केले तरी मी भिणार नाही, माझी मान कापली तरी मी वेगळं काही करणार नाही, अशा आशयाची विधानं केलेलीयेत. आ ह साळुंखे यांच्यामते याचा अर्थ संत तुकाराम महाराजांना पुढच्या घटनांची चाहूल लागली होती असं आपण म्हणू शकतो. त्या ही पुढं जाऊन साळुंखे सर तुकारामांच्या हत्येची शक्यता पटवून देताना मनुस्मृतीतील विधानाचे दाखले देतात. मनुस्मृतीमध्ये ब्राम्हणाला नावे ठेवली तर शूद्राचा वध करावा, शूद्राने त्याच्या दारुण वाणीने द्विजांची निंदा केली असता त्याची जीभ छाटावी. कारण तो जन्माने हीन असतो असं लिहून ठेवल्याचं त्यांनी निदर्शनास आणून दिलं होतं. ज्यांच्या हातात धर्मशास्त्रे होती, त्यांनी अनेकदा तशा नियमांची अंमलबजावणी केलेली इतिहासाने पाहिलेलंय. अगदी ज्ञानेश्वरांच्या बाबतीत सुद्धा हे लोक क्रूर वागले असं डॉ साळुंखे यांचं म्हणणंय. बी बी सी मराठीला दिलेल्या मुलाखती दरम्यान त्यांनी हे सगळं स्पष्टीकरण दिलं होतं. त्यामुळेचं की काय त्यांनी त्यांच्या विद्रोही तुकाराम या पुस्तकात चक्क धुळवडीच्या रात्री तुकारामांची धुळवड केली’ असा मथळा लिहून मांडणी केलेलीय. त्यानंतर लेखक आणि विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांच्या म्हणण्यानुसार, संत तुकारामांचा मृत्यू नेमका कसा झाला हे आजवर कोणालाच सांगता आलेलं नाहीये. पण उपलब्ध साधनसामुग्रीवरून मंबाजी गोसावी त्यांना छळत होता, हे लक्षात येतं. तसंच त्याकाळात तुकारामांचं लेखन संपवण्यासाठीही काही शक्ती काम करत होत्या. म्हणूनचं तर त्यांना अभंगवाणी इंद्रायणीत बुडवावी लागली ना ? जोपर्यंत त्यांच्या मृत्यूचं गूढ उलगडत नाही तोपर्यंत तुकारामांची हत्याच झाली असं माझं मतय. डॉ रावसाहेब कसबे पुढं असंही म्हणतात की, संत चळवळ ही शूद्र, अतिशूद्र आणि स्त्रियांची चळवळ होती. त्यावेळच्या समाजव्यवस्थेविरुद्ध केलेला तो विद्रोह होता. नामदेवांच्या परंपरेपासून ती सगळ्या जातींचा समावेश असणारी चळवळ सुरू झाली होती. तुकारामांनी त्यावर कळस चढवला होता. ईश्वराची निर्मिती माणसाने केलीय असं म्हणणारे तुकाराम पुढे असंही म्हणतात की माझ्यासाठी देव मेलाय हे सगळं त्यावेळच्या ब्राम्हणी धर्माच्या विरुद्ध होतं. म्हणजे रावसाहेब कसबे त्यांच्या म्हणण्यातून सगळ्यांना तुकारामांच्या मृत्यूसंबंधी वेगळ्या पद्धतीने विचार करण्यासाठी सूचित करू पाहतायत. पण त्याबद्दल खुद्द तुकाराम महाराजांचे वंशज श्रीधरमहाराज यांनी त्यांच्या प्रयाणमध्ये असं लिहून ठेवलंय की, त्यादिवशी ‘इंद्रायणीकाठी तुकोबांचं कीर्तन सुरू होतं.त्यांनी सर्वांना ‘आम्ही वैकुंठाला जात आहोत, तुम्ही माझ्याबरोबर वैकुंठाला चला’ असं सांगितलं. त्यानंतर १४ टाळकऱ्यांनी क्षेमालिंगन दिलं. सकळही माझी बोळवण करा । परतोनि घरा जावा ।। अशी सूचनाही त्यांनी केली आणि भागवतकथा करीत असता तुकोबा अदृश्य झाले. पुढं तुकोबांच्या गुप्त होण्याने सर्व मंडळी शोकसागरात बुडाली. तुकोबांची मुले, बंधू, अनुयायी तेथेच बसून राहिले. पंचमीला तुकोबांचे टाळ, पत्र, कथा आकाशमार्गे आली. रामेश्वरशास्त्रींनी निर्णय दिला की तुकोबा सदेह वैकुंठाला गेले.पण तुकारामांच्या मृत्यूची ही मांडणी वास्तविकतेला धरून नाही असं आता बऱ्याचं तज्ञांचं मत झालंय. डॉ. कसबे त्यासाठी सुदाम सावरकर यांच्या पुस्तकाचा संदर्भ देतात. ते म्हणतात, सुदाम सावरकर म्हणजे संत तुकडोजी महाराजांचे शिष्य. त्यांनी त्यांच्या पुस्तकात तुकारामांची हत्याच झाली असा स्पष्टपणे दावा केलाय. त्यांच्या पुस्तकानुसार तुकाराम महाराज हळूहळू अदृश्य झाले म्हणजे नेमकं काय झालं, कसं झालं हे प्रश्न अनुत्तरीतचं आहेत. लोकांनी त्यावर विचार करायला हवा. पण सुदाम सावरकराचं म्हणणं अजूनही लोकांच्या पचनी पडत नाही म्हणून मृत्यूच्या चमत्कारिक कथा रचल्या जातात. सांप्रदायिक लोकंही डोळे झाकून त्या गोष्टींवर विश्वास ठेवतात मात्र त्याबद्दल तर्कशुद्ध विचार करत नाहीत. चंद्रकांत कुलकर्णी यांच्या 2012 साली आलेल्या तुकाराम या सिनेमामध्यैही तुकारामांचं व्यक्तिमत्व हे सोशिक नाही तर बंडखोर आणि विज्ञाननिष्ठ दाखवण्यात आलंय.. तुकाराम महाराज हे वेळोवेळी त्यांच्या अभंगवाणी आणि कीर्तनातून अंधश्रद्धेवर कसा घाव घालायचे हे त्या सिनेमांत दाखवलं गेलंय. पण त्यात तुकारामांचा मृत्यू कसा झाला हे मात्र दाखवलं गेलेलं नाहीये. त्याबद्दल बोलताना सिनेमाचे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी म्हणतात की महाराजांचा मृत्यू कसा झाला हे शोधणं संशोधकांचं कामय. आम्हाला फक्त तुकारामांची वास्तविक आणि विज्ञानवादी बाजू दाखवायची होती. तुकाराम हे तुमच्या-आमच्यासारखे हाडामांसाचे माणूस होते.देव नव्हते. त्यांनी भयंकर असा दुष्काळ आणि घरातले पाच मृत्यू जवळून पाहिलेत. त्या कडू अनुभवांनतर त्यांचं तत्त्वज्ञान निर्माण झालंय. त्यांच्याकडे विरक्तीपेक्षाही जास्त जीवनानुभूती होती. आणि आपण देखील त्याचं वैज्ञानिक दृष्टिकोनातून तुकारामांकडे बघितलं पाहिजे.


(Sant Tukaram Beej | Sant Tukaram Maharaj Death | Vishaych Bhari)

हे विषयच भारी वाचलेस का भावा !

हे आहेत शिंदे गटाच्या यादीतले १० फायनल लोकसभेचे उमेदवार ? | Loksabha Election 2024 | Vishaych Bhariजातीचं हे गणित जुळलं तरच Praniti Shinde सोलापूरच्या खासदार होतील ? | Solapur Loksabha Election 2024|Vishaych Bhariरायगड जिल्ह्याचा पुढचा खासदार कोण सुनील तटकरे की अनंत गीते कोणाची ताकद जास्तय ? | Vishaych Bhari | Sunil Tatkare | Anant Giteपरळीचा पुढचा आमदार कोणी | Pankaja Munde कि Dhananjay Munde | Parli Vaijnath | Parali Vidhansabha

आता आपण जरा, तत्कालीन गोष्टींच्या आधारे काही गोष्टीं जाणून घेऊयात, म्हणजे बघा तुकाराम महाराजांबद्दल छत्रपती शिवाजीराजे बऱ्यापैकी जाणून होते.. मग तुकाराम महाराजांचा खून झाला असा जर त्यावेळी गदारोळ माजला असेल तर राजांनी त्यानंतर का काही ठोस पाऊल उचलल्याची इतिहासात नोंद नाही,असं काही अभ्यासक तुकारामांच्या खूनाचं खंडन करताना म्हणतात.तसेच तत्कालीन ब्राह्मण धर्माच्या वर्चस्ववादाबद्दल तुकारामांना चीड होती आणि त्यामुळे त्यांच्यात संघर्ष झाले असणार ही गोष्ट सुद्धा नाकारता येत नाही,असंही दुसर्या गटाचं म्हणणंय. पण मोठ्या प्रमाणात लोकप्रिय असणाऱ्या तुकारामांचा जर खूनच झाला असेल तर ती गोष्ट इतक्या सहजासहजी त्यांच्या मारेकऱ्यांना दडवता कशी आली असेल? हा ही गूढ प्रश्न अनेकांना पडलेला आहे.काहींच्या मतै तुकाराम महाराज वयोवृद्ध होऊन निधन पावले का? तर त्याबद्दलही बऱ्याच जणांचं असं म्हणणंय की तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमन झालं असं म्हणतात तेव्हा ते फक्त 42 वर्षांचे होते. त्यामुळे या मांडणीलाही फार आधार नाही. इतिहास अभ्यासक पांडुरंग कवडे तर त्याहीपुढे जाऊन म्हणतात की, फाल्गुन वद्य द्वितीया म्हणजेचं शिमग्याचाचं दिवस का निवडावा देवाने पुष्पक विमान पाठवण्यासाठी अन ते सुद्धा अगदी सूर्योदयाच्या वेळी.पुढे कवडे असंही म्हणतात की, बरं त्याकाळी विमान ही संकल्पना देखील अस्तित्वात नव्हती.आता काय खरं आणि काय खोटं. प्रश्न अनेक आहेत. पण एक मात्र नक्की, “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, अशी निसर्गप्रेमी काव्य करणारे, धर्तीवरचं कसा स्वर्ग दडलाय हे सांगणारे विद्रोही तुकाराम महाराज अकाली आपलं काम अर्धवट सोडून वैकुंठ गमन करायला कसे जातील. तो प्रश्न आमच्यासकट सगळ्या तुकाराम भक्तांचं मन आजंही कुरतोडतोय हे मात्र नक्की.आज तुकाराम बीज निमित्त त्यांची पूजा केली जाते. पण आ. ह साळुंखे यांच्या म्हणण्यानुसारही ब्राम्हण्यवाद्यांची एक मोठी चाल आहे. म्हणजे सुरूवातीला माणसाचा अनुल्लेख करायचा पण तरीही तो व्यक्ती डोईजड झाला तर त्याला एकतर ब्राम्हण्याच्या कह्यात आणायचं नाही जमलं तर त्याची यथेच्छ बदनामी करायची. बरं तरीही हा व्यक्तीजड गेला तर त्याच्या मृत्युपश्चातंही त्याचे विचार नाकारून त्याला अखेर देवत्व बहाल करायचं, खरंतर तुकाराम महाराजांचा याहून मोठा अपमान नाही. फक्त तुकाराम महाराजच नाही तर चार्वाकांपासून ते चक्रधर स्वामी,संत रोहिदास,बसवेश्वर महाराज, अगदी छत्रपती शिवाजी महाराज या सगळ्या महापुरुषांचे मृत्यूअसेच संशयास्पद मानले गेलेले आहेत.‌.पण तुम्हाला तुकाराम महाराजांच्या निधनाबद्दल नेमकं काय वाटतंय? त्यांचं खरंच वैकुंठगममन झालं कि खून झाला? तुम्हाला असलेली अधिकची माहिती आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा.

तुकाराम महाराजांचा खरंच खून झाला होता का | Sant Tukaram Beej | Sant Tukaram Death | Vishaych Bhari

Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇

https://www.facebook.com/vishaychbhari

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *