मंडळी आपल्या वेब पोर्टल वर २०२४ च्या लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने आपण वेगवेगळ्या मतदारसंघांचा आढावा घेतोय. मागच्या इलेक्शनचे विजेते, चालू इलेक्शनसाठीचे प्रतिस्पर्धी आणि इच्छुक दर्दी या सगळ्यांची माहिती घेत असताना आपण त्या लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या विधानसभा मतदारसंघांचाही आढावा थोडक्यात घेतोय. आमचा नेता लई पावरफुल असं म्हणण्याची ओढ आता कार्यकर्त्यांमध्ये लागून राहिली असून या Blogs ना मिळणारा प्रतिसादही अगदी झकास आहे. या Blog मध्ये आज आपण सांगली लोकसभेविषयीची गणितं पाहणार आहोत.

(Sanjay Kaka Patil की Vishal Patil | Sangali Loksabha | Vishaych Bhari)
तर बघा, शेती, दुग्धउत्पादन, हळद, द्राक्ष आणि एकूणच सहकार क्षेत्राची पंढरी म्हणून सांगली जिल्हा ओळखला जातो. कोल्हापूरइतकाच रांगडापणा सांगलीच्या मातीतही ठासून भरलाय. या जिल्ह्याची ओळख वसंतदादा पाटील या काँग्रेसच्या दिग्गज नावाभोवती आजही फिरते. शिक्षण कमी असलं तरी मुत्सद्दी राजकारण आणि सामान्यांना आपलंसं करून घेणारं राजकारणातील वडीलधारी व्यक्तीमत्त्व म्हणून वसंतदादा परिचित आहेत. त्याशिवाय राजारामबापू पाटील, पतंगराव कदम, आर आर पाटील ही त्यानंतरच्या काळातील पिढीचं नेतृत्व केलेली राजकारणी मंडळी. वसंतदादा वगळता यापैकी कुणाचा जिल्हाभर प्रभाव राहिला असं झालं नाही. असो. आता आपण वळूया आपल्या मुख्य विषयाकडे.तर बघा पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघामध्ये सांगलीचं विशेष महत्त्व आहे. १९६७ ते २०१४ इतका दीर्घकाळ काँग्रेस पक्षाचं या मतदारसंघावर निर्विवाद वर्चस्व होतं. आणीबाणी काळात अगदी तत्कालीन काँग्रेस सर्वेसर्वा इंदिरा गांधींचा पराभव झाला तरी सांगलीतील काँग्रेसची जागा मात्र निवडून आली होती. अण्णासाहेब गोटखिंडे त्यावेळी खासदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतरच्या जवळपास ९ लोकसभा निवडणुकांमध्ये वसंतदादा पाटील आणि त्यांच्या कुटुंबाचं वर्चस्व दिसून आलं.वसंतदादाच्या नेतृत्वात त्यांच्या पत्नी शालिनीताई, मुलगा प्रकाशबापू, आणि वसंतदादापश्चात पुतण्या मदन, नातू प्रतीक यांनी २०१४ पर्यंत इथली खासदारकी भूषवली. २०१४ ला मात्र नरेंद्र मोदी यांच्या लाटेत पहिल्यांदाच याठिकाणी काँग्रेसला पराभव पत्करावा लागला. आणि प्रतीक पाटील यांचा भाजपच्या संजयकाका पाटील यांच्याकडून पराभव झाला. कौटुंबिक राजकारणाची विशेष पार्श्वभूमी नसलेल्या संजय पाटील यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतही विजय मिळवला. पण सलग तिसऱ्या विजयासाठी उत्सुक असलेल्या संजयकाका पाटील यांच्या जमेच्या आणि कमकुवत बाजू काय आहेत, त्यांना आव्हान नेमकं कुणाचं आहे हे आता पाहुयात.
(Sanjay Kaka Patil की Vishal Patil | Sangali Loksabha | Vishaych Bhari)
जत्रेचा सिझन बघून कुस्तीसाठी मैदानात उतरणारा मी पैलवान नाही असं म्हणत संजयकाका पाटील यांनी २०२४ च्या निवडणुकीसाठी दंड थोपटले आहेत. ५८ वर्षीय संजयकाका पाटील हे मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसमधले. सांगलीतील तासगाव हा त्यांचा तालुका. संजय पाटील यांचं राजकारण कायम आर आर पाटील यांच्या विरोधातील. राष्ट्रवादीत असताना आर आर पाटील यांच्यामुळे आपल्याला स्पेस मिळत नाही ही संजय काकांची तक्रार होतीच. अशात २०१४ च्या लोकसभा निवडणुकीआधी त्यांनी भाजपात प्रवेश केला आणि मोदी लाटेत ते निवडूनही आले. भाजपतर्फे तिकीट मिळालेलं असलं तरी संजय काकांचा मूळ पिंड भाजपचा नाही. सांगलीत त्यांना होणारं मतदान हे त्यांच्या वैयक्तिक कामावर जास्त आहे. दांडगा जनसंपर्क, लोकांमध्ये मिसळनं, त्यांच्या अडी-अडचणीला उभं राहणं यामुळं मतदारसंघातील निम्म्या जनतेवर संजयकाका प्रभाव टाकून आहेत. जिल्हा भाजपमधील काही नेते सुरुवातीपासूनच संजय काकांच्या विरोधात असले तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजीचा फायदा उठवत २०१९ साली निवडणूक जिंकण्यात संजयकाकांनी यश मिळवलंय. २०१४ आणि २०१९ या दोन्ही लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा प्रतिस्पर्धी उमेदवार निवडणूक लढवावी की नाही अशा गोंधळलेल्या अवस्थेत असल्याचा फायदा संजयकाकांना झाला होता. शिवाय २०१९ साली वंचित बहुजन आघाडीतर्फे निवडणूक लढवलेल्या गोपीचंद पडळकर यांच्या उमेदवारीचाही संजयकाकांच्या विजयात मोठा वाटा होता. कारण तेव्हा पडळकरांनी तब्बल ३ लाख मतं घेतल्यामुळे संजय पाटलांचा विजय सोपा झाला होता. २०२४ च्या निवडणुकीत मात्र त्यांच्यापुढे महाविकासआघाडीचं तगडं आव्हान असणार आहे. कारण गेल्या निवडणुकीत पराभूत झालेल्या विशाल पाटील यांनी २०२१ पासूनच आपल्या निवडणुक मोहिमेला सुरुवात केली आहे. विशाल पाटील हे वसंतदादा पाटील यांचे नातू, प्रकाशबापू पाटील यांचे चिरंजीव आणि प्रतीक पाटील यांचे लहान बंधू आहेत. काँग्रेसचं युवक प्रदेश उपाध्यक्षपद मिळालेल्या विशाल यांनी कर्जामुळे डबघाईला आलेला वसंतदादा कारखाना सुरळीत करून दाखवला. २०१९ पर्यंत पतंगराव कदम घराण्याचं वर्चस्व मानण्यात नाखूष असलेल्या पाटील कुटुंबाने मागील ४ वर्षांत मात्र कदम कुटुंबासोबत चांगलीच जवळीक केली आहे.

(Sanjay Kaka Patil की Vishal Patil | Sangali Loksabha | Vishaych Bhari)
यंदाची लोकसभा विश्वजित कदमांच्या मार्गदर्शनाखाली लढू असं जाहीरपणे सांगायलाही विशाल पाटील विसरले नाहीत. लोकांच्या मनाचा ठाव घेणारं भाषण कौशल्य आणि वसंतदादांच्या नावाची पुण्याई या गोष्टी विशाल पाटलांकडे आहेत. शिवाय भाजपमधील अंतर्गत गटबाजीचा फायदाही विशाल यांना होऊ शकतो. जतमधून भाजपचे विलास जगताप, खानापूरमधून शिंदे गटाचे अनिल बाबर या मंडळींचं संजयकाका पाटील यांच्याशी विशेष पटत नसल्याने त्यांची ताकदही विशाल पाटलांना लाभदायी ठरू शकते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयंत पाटील आणि सहकाऱ्यांशी मात्र जुळवून घेण्याची कसरत विशाल पाटील यांना करावी लागणार आहे. २०१९ साली निवडणुकीत सहभाग घेतलेल्या गोपीचंद पडळकर यांची सध्याची अवस्था पाहता तेसुद्धा निवडणुक रिंगणात उतरू शकतात ही शक्यता आहे. २०१९ ला विशाल पाटील यांचा पराभव करण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या आणि राष्ट्रवादी पक्षाला, विशेषतः पवार कुटुंब आणि जयंत पाटलांना कायम अंगावर घेण्यासाठी उत्सुक असलेल्या गोपीचंद पडळकर यांना भाजपने विधानपरिषद आमदारकी देऊन बक्षीसच दिलंय. मात्र सध्या अजित पवार यांना सोबत घेतल्याने गोपीचंद पडळकर नाराज असल्याच्या चर्चा आहेत. सांगलीतील राष्ट्रवादी संजयकाका पाटील यांना सहकार्य करत असल्याची कुणकुण पडळकर यांना लागली तर तेसुद्धा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात. आटपाडी भाग तसेच जिल्ह्यातील काही हजार धनगर मतं मिळवून पडळकर आपलं वजन दाखवून देऊ शकतात. त्यामुळे गोपीचंद पडळकर यांना सोबत घेऊन मताधिक्य 9 लाखांपर्यंत नेण्याची शक्यता संजयकाका वर्तवत असले तरीही ते शक्य होईलच असं नाही. मागील काही महिन्यांपासून पैलवान चंद्रहार पाटील हे नावसुद्धा सांगली लोकसभेसाठी चर्चेत आहे. संजयकाका पाटील यांच्याविरोधात पक्षातच नाराजी असेल तर त्याचा फायदा चंद्रहार पाटील घेऊ शकतात. सध्या तरी कुठल्याच पक्षात जाण्याचा विचार चंद्रहार पाटील यांनी बोलून दाखवला नसला तरी राष्ट्रवादी किंवा भाजप पक्षाला ते जवळ करू शकतात. बैलगाडा शर्यत, एक लाख बाटली रक्त संकलन या उपक्रमांच्या माध्यमातून चंद्रहार पाटलांनी आपला जनसंपर्क दरम्यानच्या काळात वाढवला आहे. या ४ नावांव्यतिरिक्त पृथ्वीराज देशमुख हे सांगली ग्रामीण भाजप जिल्हाध्यक्षसुद्धा लोकसभेसाठी इच्छुक असल्याच्या चर्चा आहेत. संजयकाका पाटील यांच्यावर नाराज असलेले लोक पृथ्वीराज देशमुखांना लोकसभेसाठी गळ घालत आहेत. त्यामुळे ते ही सांगलीतून रेसमध्ये आहेत. आता त्यांच्या कार्यकाळात मागील ६ वर्षांत ग्रामीण तसेच शहरी भागातही भाजपचा बराच विस्तार झालाय. याचं बक्षीस त्यांना कदाचित मिळू शकतं.
(Sanjay Kaka Patil की Vishal Patil | Sangali Loksabha | Vishaych Bhari)
लोकसभेसाठी इच्छुक या ५ उमेदवारांची माहिती घेत असतानाच इथल्या विधानसभा मतदारसंघातून कुणाला किती मदत मिळेल हे पाहणंसुद्धा रंजक आहे. सांगली लोकसभा मतदारसंघात सांगली , मिरज, जत, तासगाव-कवठे महांकाळ, खानापूर-आटपाडी आणि पलूस कडेगाव हे ६ विधानसभा मतदारसंघ येतात. यापैकी ३ ठिकाणी महायुती तर उर्वरित ३ ठिकाणी महाविकास आघाडीचं वर्चस्व आहे. सांगली आणि मिरज विधानसभा मतदारसंघात मागील १५ वर्षं भाजप उमेदवार निवडून येत आहेत. सांगलीतून सुधीर गाडगीळ तर मिरजेतून सध्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे आपलं वर्चस्व राखून आहेत. रिपब्लिकन पक्षातून आपल्या राजकारणाची सुरुवात करणाऱ्या सुरेश खाडे यांना गोपीनाथ मुंडेंचा माणूस म्हणून ओळखलं जातं. मिरज हा आरक्षित मतदारसंघ असल्याने मागील ३ निवडणुका ते सहजपणे निवडून आले आहेत. सुधीर गाडगीळही विकासकामांच्या बाबतीत आग्रही असल्याने आपलं वजन राखून आहेत. या दोघा भाजप आमदारांची मदत मागील निवडणुकीत संजयकाका पाटलांना झाली होती. यंदा मात्र या आमदारांविषयी लोकांमध्ये काहीअंशी नाराजी असल्याने त्याचा फटका संजयकाकांनाही बसण्याची शक्यता आहे. तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. आर आर पाटील यांचे राजकिय विरोधक असलेल्या संजयकाकांना याठिकाणी मताधिक्य मिळण्याची शक्यता कमी आहे. आर आर आबा हयात असताना आणि त्यांचं निधन झाल्यानंतरही अजित घोरपडे यांना या मतदारसंघात ताकद देण्याचं काम संजय पाटील यांनी केलं. मात्र त्याचा तितकासा फरक पडला नाही. आर आर आबा यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी मागील काही वर्षांत स्थानिक राजकारणात घातलेलं लक्ष आणि जिंकलेल्या काही निवडणुका पाहता संजयकाका पाटील यांच्याविरोधात विशाल पाटील यांचंच पारडं याठिकाणी जड राहणार आहे. जत विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे विद्यमान जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत हे आमदार आहेत. विश्वजित कदम यांचे नातेवाईक असलेले सावंत हे विशाल पाटील यांच्यासाठी हक्काचे आहेत. शिवाय इथले भाजप उमेदवार आणि माजी आमदार विलास जगताप यांचीही संजयकाका पाटलांवर नाराजी असल्याने जत मतदारसंघ विशाल पाटलांसाठी लाभदायी असल्याचं चित्र आहे. रवी पाटील हेसुद्धा भाजपमधून जत विधानसभेसाठी इच्छुक उमेदवार काही हजार मतांची बेगमी करून आहेत.

(Sanjay Kaka Patil की Vishal Patil | Sangali Loksabha | Vishaych Bhari)
त्यांचा पाठिंबाही लोकसभेसाठी दोन्ही नेत्यांना महत्त्वाचा ठरू शकतो. पण तिथं रवी पाटलांना फिरवायची कुणाची गेम यशस्वी होणार हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. खानापूर-आटपाडी भागातील अनिल बाबर हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार असले तरी त्यांचं महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्याशी विशेष सख्य नाही. पूर्वी राष्ट्रवादी पक्षाचा भाग असलेले अनिल बाबर यांची आर आर पाटील आणि कुटुंबाशी जवळीक असल्याने संजयकाका इथेही मायनसमध्ये जाऊ शकतात. शेवटच्या पलूस-कडेगाव मतदारसंघातही विश्वजीत कदम यांचं वर्चस्व असल्याने इथल्या मतांचा फायदा विशाल पाटील यांना मिळणार आहे. विश्वजीत कदम यांनी काही महिन्यांपूर्वी घेतलेली जनसंवाद यात्रा, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचं सांगलीतील भाषण या सर्वामुळे सांगली जिल्ह्यातील काँग्रेस पुनरुज्जीवीत होत असल्याचे संकेत लोकांमध्ये गेले आहेत. या सर्वांव्यतिरिक्त शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या संभाजी भिडे यांच्या या भागातील वर्चस्वामुळे पाच-पन्नास हजार मतं त्यांच्याशी जवळीक असलेल्या राजकारण्याला सहज मिळू शकतात. स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि वंचित बहुजन आघाडी यांनी अजून आपले पत्ते उघड केले नसले तरी ते जिंकणाऱ्या उमेदवाराचं इथं गणित नक्कीच बिघडवू शकतात. भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केलेल्या शेतकरी संघटनेच्या रघुनाथदादा पाटलांनीही इथून निवडणुक लढवली तर काही हजार मतांचा फटका काँग्रेस किंवा भाजपच्या उमेदवाराला निश्चितच बसू शकतो. कागदोपत्री आकडे पाहता संजय काका आणि विशाल पाटील हे सारख्याच ताकदीचे वाटत असले तरी मागील २ निवडणुकांचा तगडा अनुभव संजयकाका यांना प्लसमध्ये ठेवतोय. दोन्ही निवडणुका अडीच लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने जिंकलेल्या आणि लोकसंपर्क हा यूएसपी असलेल्या संजयकाकांना हरवणं हे तितकं सोपं नाही. असं असलं तरी राजकारण हा बेरीज-वजबाकीचा खेळ आहे. इथं कुणी कधीही वरचढ होऊ शकतं. निवडणुक येईपर्यंत पक्षांतर्गत विरोधकांना संजयकाका शांत करणार का? महायुतीतील इतर नाराज सदस्यांची मनधरणी कशी करणार? हे प्रश्न संजयकाका यांच्यापुढे आहेत. तर राष्ट्रवादीची मतं कशी गोळा करायची ? भाजपमधील अस्वस्थता हेरून ती मतं आपल्या बाजूला कशी वळवायची? गोपीचंद पडळकर फॅक्टर विरोधात कसा जाऊ द्यायचा नाही या प्रश्नांची उत्तरं विशाल पाटलांना शोधावी लागतील.
(Sanjay Kaka Patil की Vishal Patil | Sangali Loksabha | Vishaych Bhari)
हे पण विषय भारी वाच भाऊ
तासगाव कवठेमहाकाळचा पुढचा आमदार कोण | Rohit Patil की Prabhakar Patil | Vishaych Bhari
धाराशिवचा पुढचा खासदार कोण | Omraje Nimbalkar की Rana Jagjit Sinha Patil | Vishaych Bhari
रावेरचा पुढचा खासदार कोण | Eknath Khadse की Raksha Khadse | Latest Marathi News | Vishaych Bhari
सांगली विधानसभेची निवडणुक जिंकणं हे वसंतदादा पाटील कुटुंब आणि पर्यायाने काँग्रेसला सांगली जिल्ह्यात पुनरुज्जीवीत करणारं ठरेल. असं झालं माही तर संजयकाका हेच इथले वस्ताद ठरतील एवढं मात्र नक्की.. पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय सांगलीतनं कोण वरचढ ठरेल ,
तुमच्या लेखी सांगलीचा पुढचा खासदार कोण असेल? विशाल पाटील की संजय काका पाटील? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.
सोबतच तुम्हाला आमच्याकडून अजून कोणत्या मतदारसंघाबद्दल माहिती हवीय त्याचंही नाव आम्हाला कमेंट करून सांगा.
Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇
https://www.facebook.com/vishaychbhari
https://www.facebook.com/aplavishaychbhari
Leave a Reply