सॅम बहादूर सिनेमाची खरी गोष्ट | Sam Bahadur Trailer | Sam Bahadur Manekshaw | Vishaych Bhari


नुकताच विकी कौशलच्या सॅम बहाद्दूर सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. त्यात विकी कौशल एका उच्च पदावरील आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत दिसतोय. विकी कौशलनं ज्यांची भूमिका केलीये ते होते इंडियन आर्मीचे पहिले फिल्ड मार्शल सॅम माणिकशॉ उर्फ सॅम बहाद्दूर. त्ये 1934 पासून भारतीय सैन्यात आहेत आणि आर्मीनं लढलेल्या एकूण पाच मोठ्या लढाईमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांचा इतका दरारा होता की तत्कालीन पंतप्रधान स्वतः इंदिरा गांधी सुद्धा त्यांच्या कार्याचा आणि मतांचा आदर ठेवायच्या. त्यांच्या शब्दाला फौजमध्ये मान होता आणि भारतीय सैनिकांशी त्यांचं खूप जबरदस्त ट्युनिंग जुळायचं. लढाई दरम्यान सैन्य कितीही थकलेलं असलं तरीही सॅम बहाद्दूर यांच्या शब्दांनी त्यांच्यात नवचैतन्य सळसळायचं आणि आपले सैनिक शत्रूला पुरून उरायचे. 1971 सालच्या भारत पाकिस्तान युद्धाच्या आधी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि सॅम बहाद्दूर यांच्यात काही कारणावरून मतभेद झाले होते. म्हणजे इंदिरा गांधीनी आगामी निवडणूका डोक्यात सैन्याला तात्काळ लढाईसाठी तयार राहा असे आदेश दिले होते. त्यासाठी त्या फौजवर राजकीय दबाव टाकण्याचा ही प्रयत्न करत होत्या पण जोपर्यंत माझ्या सैनिकांची व्यवस्थित तयार होत नाही, त्यांना मनापासून लढू वाटत नाही तोवर आम्ही लढाई सुरू करणार नाही असं सॅम बहाद्दूर यांनी इंदिरा गांधीना तोंडावर ठणकावून सांगितलेलं होतं. हा पण दोघांना एकमेकांच्या कार्याचा तितकाचं आदर होता. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये एक डायलॉगय, ज्यात इंदिरा गांधीची भूमिका केलेली फातिमा सना शेख म्हणते जवान का काम ही हैं देश के लिये जान देना, तेव्हा सॅम बहाद्दूर यांच्या भूमिकेतला विकी कौशल म्हणतो, जवान का काम होता है अपनी देश की रक्षा करते हुये दुश्मन को मारना. असो, तर आजच्या या Blog मध्ये आपण खऱ्या आयुष्यातील सॅम बहाद्दूर यांची खरी गोष्ट जाणून घेणारे,

Sam Bahadur Manekshaw

(Sam Bahadur Trailer | Sam Bahadur Manekshaw | Vishaych Bhari)


सॅम माणिकशॉ यांचा जन्म ३ एप्रिल १९१४ ला अमृतसर इथ एका पारशी कुटुंबात झाला. त्यांचं पुर्ण नाव होतं सॅम हॉर्मूसजी फर्मजी जमशेदजी माणिकशॉ. १९३२ च्या सुमारास तत्कालीन इंग्रज सरकारनं British Indian Army ची पुर्नरचना केली. त्याचा एक भाग म्हणून डेहराडून इथं Indian Military Academy ची स्थापना करण्यात आली. त्यात भारतीयांना योग्य ट्रेनिंग देऊन लष्करात अधिकारी म्हणून प्रवेश दिला जाणार होता. त्या इंडियन मिलिटरी ऍकॅडमच्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी म्हणून माणिकशॉ यांनी तिथं प्रवेश घेतला. मानेकशा यांचा जन्मचं जणू सैनिक होण्यासाठी झाला होता. कारण त्या बॅचमध्ये ट्रेनिंग घेत असताना त्यांनी त्यांचं सर्वस्व पणाला लावलं होतं. त्यांची ती झोकून देण्याची वृत्ती अनेकांना प्रभावित करून गेली अन पुढं माणिकशॉ लष्कर प्रमुख झालेले पहिले अधिकारी ठरले. माणिकशॉ अतिशय सिरीयस पदावर काम करत होते पण त्यांचा मूळ स्वभाव हा कमालीचा खोडकर आणि विनोदी होता. फेब्रुवारी १९३५ ला सेकंड लेफ्टनंट या पदावर ते लष्करात दाखल झाले. त्यावेळी जग दुसऱ्या महायुद्धाच्या कचाट्यात सापडलेलं होतं. दुसऱ्या महायुद्धात फेब्रुवारी १९४२ रोजी तेव्हाच्या बर्मा देशातील Sittang Bridge च्या लढाईत माणिकशॉ यांनी प्रतिनिधित्व केलं. अधिकारी असले तरी इतर कोणाचाही जीव धोक्यात घालण्यापेक्षा माणिकशॉ स्वतः पुढं राहून लढाई करणं पसंत करायचे. बर्मा विरुद्धच्या लढाईत त्याचा त्यांना फटका बसला आणि त्ये जबर जखमी झाले.  तब्बल ९ बंदुकीच्या गोळ्यांनी माणिकशॉ यांच्या शरीराचा ठाव घेतला होता. ते जिवंत वाचण्याची शक्यता जवळपास नव्हतीच. त्यांच्या साथीदारांनी जेव्हा त्यांना युद्धभूमीवरून खांद्यावर उचलून आणलं तेव्हा रक्तबंबाळ आणि बेशुद्ध अवस्थेत होते.

(Sam Bahadur Trailer | Sam Bahadur Manekshaw | Vishaych Bhari)

दरम्यान त्यांच्या साथीदारांनी त्यांना डॉक्टरांकडं आणलं आणि थोड्या उपचारानंतर शुद्ध आल्यावर डॉक्टरांनी त्यांना विचारलं काय झालेलं तुम्हांला ? तेव्हा शुद्धीत आलेले माणिकशॉ म्हणाल, गाढवानं लाथ मारली एवढंच मला आठवतंय. त्यांच्या उत्तरानंतर डॉक्टर आणि सहकारी खूप हसले. त्या परिस्थितीतून व्यवस्थित बरे झाल्यावर त्यांची नेमणूक आता पाकिस्तानात असलेल्या क्वेट्टा इथे करण्यात आली होती. पुढं स्वातंत्र्य मिळाल्यावर लष्कराची विभागणी झाली. त्यावेळी माणिकशॉ हे Military Operations (MO) Directorate मध्ये कार्यरत होते, काही महिने त्यांना ऑस्ट्रेलियामध्येही काम करावे लागले. Military Operations (MO) Directorate या विभागात कार्यरत असतांना काश्मीर संस्थान भारतात सामिल होणे, हैद्राबाद कारवाई अशा मोठ्या घडामोडींमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता, त्या सर्व घडामोडींचे ते जवळूनचे साक्षीदार होते. पुढं माणिकशॉ यांची Director of Military Training at Army Headquarters मध्ये बदली झाली. तिथं त्यांनी सैन्य प्रशिक्षणाचे नवे आयाम तयार केले.

Sam Bahadur Manekshaw

(Sam Bahadur Trailer | Sam Bahadur Manekshaw | Vishaych Bhari)


१९६२ सालच्या चीन युद्धात पराभवानं खचलेल्या आसाम-अरुणाचल प्रदेशातील लष्कराचं मनोधैर्य वाढवण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. तेव्हापासून त्यांचं फौजमधल्या सैनिकांशी एक नंबर ट्युनिंग जुळलं. त्यावेळचा एक किस्सा सैन्यात खूप गाजला होता. त्याचं झालं असं १९६२ साली जेव्हा मिझोरामच्या एका बटालियननं भारत-चीन युद्धापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला तेव्हा माणिकशॉ यांनी त्या बटालियनला एक पार्सल पाठवलं होतं. त्या पार्सलमध्ये एक बांगड्यांचा बॉक्स आणि एक चिठ्ठी होती. त्या चिठ्ठीवर लिहिलं होतं की, जर तुम्ही लढाईतून माघार घेत असाल तर तुमच्या बटालियन मधील सैनिकांना या बांगड्या हातात घालायला सांगा. ती गोष्ट त्या बटालियनमधील सैनिकांच्या जिव्हारी लागली. त्यानंतर लगेचच त्या बटालियननं लढाईत भाग घेतला आणि जबरदस्त शौर्य दाखवलं. नंतर परत माणिकशॉ यांनी त्या बटालियनला एक चिठ्ठी लिहून पाठवली. त्या चिठ्ठीत लिहलेलं होतं, आता तुम्ही तुमचं काम योग्यरित्या करता आहात. त्यामुळे तो बांगड्यांचा बॉक्स आमच्याकडं परत पाठवून द्या. पुढं माणिकशॉ पूर्व विभागाचे प्रमुख झाले आणि त्यांनी नागालँड मधली हाताबाहेर गेलेली परिस्थिती नियंत्रण आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. 1962 च्या भारत चीन युद्धानंतर त्यांनी गोरखा रेजिमेंटच्या सन्मानार्थ एक वाक्य वापरलेलं. ते म्हणाले होते की जर कुणी म्हणत असेल की मला मृत्यूची भीती नाही तर समजून जा की एक तर तो खोटं बोलतोय किंवा मग तो गोरखा आहे. सॅम माणिकशॉ यांना त्यांचे घरचे लोक, नातेवाईक, सहकारी मित्र आणि अधिकारी सगळेचं सॅम बहाद्दूर नावानं बोलवायचे. कारण सॅम बहाद्दूर ह्ये मरणाला अजिबात घाबरत नव्हते. प्रत्येक संकटात ते मेंदू शांत आणि चेहऱ्यावर स्माईल ठेवून निर्णय घ्यायचे. त्यांच्या व्यक्तिमत्वात समोरच्याला प्रभावित करण्याची जबरदस्त क्षमता होती त्यामुळं जिथं त्यांची नेमणूक झाली तिथं ते लोकप्रिय झाले.

(Sam Bahadur Trailer | Sam Bahadur Manekshaw | Vishaych Bhari)

लष्करातील सर्व स्तरातील जवान-अधिकाऱ्यांशी मोकळेपणाने संवाद साधण्याची हातोटी, बडेजावपणाचा अभाव, जे काही केलं त्याचं क्रेडिट स्वतःला न घेता इतरांना देण्याचा स्वभाव यामुळं त्ये सर्वांना हवेहवेसे वाटायचे. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी तब्बल पाच खतरनाक युद्धांत दुश्मनांशी सामना केला. त्यामध्ये दुसरं महायुद्ध, १९४७ सालचं पाक युद्ध, १९६२ सालचं चीन युद्ध, १९६५ सालचं पाक युद्ध आणि अर्थात १९७१ साली पाकिस्तानसॊबत झालेलं युद्ध ज्यामुळं बांगलादेश स्वतंत्र झाला अशा काही खास लढाईंचा समावेश आहे. त्या सर्व लढायांमध्ये माणिकशॉ यांना त्यांचा शांत स्वभाव आणि कार्यपद्धत या दोन्हीची खूप मदत झाली. 1971 च्या त्या प्रसिद्ध युद्धाबद्दल बोलायचं झाल्यास, तेव्हाच्या पूर्व पाकिस्तानात परिस्थिती अधिक चिघळलेली होती. पूर्व पाकिस्तानमधून निर्वासितांचे लोंढे भारतात येऊन धडकत होते. तो आकडा लाखांच्या घरात होता. एवढ्या लोकांना सांभाळणे अशक्यप्राय गोष्ट होती. पण त्याही पेक्षा गंभीर गोष्ट होती ती म्हणजे पूर्व पाकिस्तानात लष्कराकडून नागरिकांवर केले जाणारे अमानुष अत्याचार. त्या अत्याचारांनी जेव्हा कळस गाठला तेव्हा त्याचा काहीतरी सोक्षमोक्ष लावणं गरजेचंहय असं इंदिरा गांधी यांना वाटू लागलं.

Sam Bahadur Manekshaw

(Sam Bahadur Trailer | Sam Bahadur Manekshaw | Vishaych Bhari)

पण त्यावेळी लष्करी कारवाईच्या माध्यमातून हस्तक्षेपाशिवाय म्हणजेच युद्धाशिवाय दुसरा कोणताचं पर्याय त्यांच्यासमोर नव्हता. दरम्यान १९७१ च्या एप्रिल महिन्यात पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी एक बैठक बोलावली. त्या बैठकीत लष्करप्रमुख आणि तिन्ही सेनादलाच्या प्रमुखांचे अध्यक्ष जनरल माणिकशॉ यांना ही निमंत्रण होतं. इंदिरा गांधी यांनी निवडणूकीच्या धर्तीवर त्यांना तातडीनं सैन्याला युद्धासाठी तयार राहण्याचे आदेश द्या असं सांगितलं पण जोवर माझं सैन्य पूर्ण ताकदीनं तयार होतं नाही तोवर आम्ही युद्ध करणार नाही असं माणिकशॉ यांनी इंदिरा गांधी यांना तोंडावर सांगितलं. त्यावेळी पंतप्रधान पदावरील व्यक्तीला तसा स्पष्ट नकार देण्याची हिंमत कोणाच्यात नव्हती पण माणिकशॉ यांनी त्ये करून दाखवलं अन महत्वाचं म्हणजे इंदिरा गांधी यांनी त्यांच्या मतांचा आदर केला. त्यांनी युद्धाचा निर्णय पुढं ढकलला. माणिकशॉ यांचं म्हणणं होतं की आपल्या सैन्याला तयारीकरता पुरेसा वेळ पाहिजे. जर पावसानं कारवाई दरम्यान काही ख्वाडा घातला तर त्यासाठीचा बॅकअप प्लॅन माझ्या सैन्याकडं पाहिजे. दरम्यान नंतर इंदिरा गांधी यांनीमाणिकशॉ यांना फ्री हॅन्ड दिले. पुढं जेव्हा युद्धाची योग्य वेळ आली तेव्हा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जनरल माणिकशॉ यांना विचारलं की, लढाईची तयारी पूर्ण झाली आहे का? यावर माणिकशॉ म्हणाले की, मी युद्धासाठी नेहमीच तयार असतो स्वीटी. चक्क पंतप्रधान इंदिरा गांधींना ‘स्वीटी’ म्हणण्याची क्षमता फक्त माणिकशॉ यांच्याकडं होती

(Sam Bahadur Trailer | Sam Bahadur Manekshaw | Vishaych Bhari)


पुढं माणिकशॉ यांच्या मार्गदर्शनात भारत पाकिस्तान युद्ध झालं आणि निव्वळ 14 दिवसांत इंडियन आर्मीनं पूर्व पाकिस्तानच्या लष्कराला गुडघे टेकायला लावले. त्यातूनचं बांगलादेशाची निर्मिती झाली. त्या युद्धानंतर माणिकशॉ यांनी त्या संपूर्ण लढाईचं श्रेय लेफ्टनंट जनरल जगजीत सिंह अरोरा यांना दिलं. बांगलादेशला स्वतंत्र देश म्हणून मान्यता देणारा भारत हा पहिला देश होता. बांगलादेशच्या स्वातंत्र्यानंतर भारताने त्यांच्यासोबत लगेचच राजनैतिक संबंध प्रस्थापित केले. १९७१ च्या युद्धानंतर त्यांना कुणीतरी विचारले होते की जर तुम्ही फाळणीच्या वेळी पाकिस्तानात गेले असतात तर काय झालं असतं. तेव्हा विनोदी स्वभावाचे माणिकशॉ म्हणाले की, काही नसतं झालं. फक्त १९७१ ची लढाई भारताऐवजी पाकिस्ताननं जिंकली असती. ८ जून १९६९ ला लष्करप्रमुख झालेले माणिकशॉ हे एप्रिल १९७२ ला निवृत्त होणार होते. मात्र त्यांना मुदतवाढ देण्यात आली. आणि त्यानंतर जानेवारी १९७३ साली त्यांना फिल्ड मार्शल हे लष्करातील सर्वोच्च पद बहाल करण्यात आलं. माणिकशॉ हे भारताचे पहिले फिल्ड मार्शल ठरले.त्यानंतर बराच काळ त्ये फिल्ड मार्शल पदावर कार्यरत राहिले. निवृत्तीनंतरही केंद्र सरकारनं राज्यपालांपासून प्रदेशातील उच्चायुक्त वगैरे अशी विविध पदे देऊ केली पण माणिकशॉ यांनी ती नम्रपणे नाकारली. उलट देशातील मानांकित १० पेक्षा अधिक खाजगी संस्थाच्या संचालक मंडळांवर किंवा अध्यधपदांवर कार्यरत राहत त्यांनी त्यांच्या व्यवस्थापन कौशल्याच्या अनुभवाचे धडे दिले.सर्वात महत्त्वाचं म्हणजे निवृत्त झाल्यावर त्यांनी कधीच वादग्रस्त किंवा संशय निर्माण करेल असं व्यक्तव्य केलं नाही.

Sam Bahadur Manekshaw

(Sam Bahadur Trailer | Sam Bahadur Manekshaw | Vishaych Bhari)

हे विषयच भारी वाचलेस का भावा !

त्यांच्या संपुर्ण लष्करी कारकीर्दीत त्यांच्यावर एकही आरोपाचा डाग लागला नाही. फील्ड मार्शल माणिकशॉ यांच्याविषयी अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, त्यांनी १९३४ ते २००८ पर्यंत भारतीय लष्करात काम केलं. सॅम माणिकशॉ यांना १९४२ साली मिलेट्री क्रॉस पुरस्कार, १९६८ साली पद्मभूषण आणि १९७२ साली पद्मविभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. पण इतकी भव्य विजयी कारकीर्द असलेले सॅम माणिकशॉ त्यांच्या शेवटच्या दिवसांत एका रोगाशी लढताना आयुष्याची लढाई हरले. वेलिंग्टनमधील लष्करी रुग्णालयात २७ जून २००८ साली न्यूमोनियाच्या उपचारादम्यान त्यांचं निधन झालं. खरं तर हे दुर्देवचं म्हणावं लागेल की आभाळाएवढी कामगिरी करून सुद्धा माणिकशॉ लोकांच्यात म्हणावे तेवढे परिचित नाहीत. पण आता विकी कौशलच्या ‘सॅम बहादुर’ चित्रपटाच्या रुपानं नव्या पिढीला फिल्ड मार्शल सॅम माणिकशॉ यांची ओळख होईल. तुम्ही सॅम बहाद्दूर सिनेमाचा ट्रेलर पाहिलाय का, अन तुम्हाला फिल्ड मार्शल माणिकशॉ यांची खरी गोष्ट ऐकून काय वाटलं त्ये आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

सॅम बहादूर सिनेमाची खरी गोष्ट | Sam Bahadur Trailer | Sam Bahadur Manekshaw | Vishaych Bhari

Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇

https://www.facebook.com/vishaychbhari

https://www.facebook.com/aplavishaychbhari

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *