तासगाव कवठेमहाकाळचा पुढचा आमदार कोण | Rohit Patil की Prabhakar Patil | Vishaych Bhari


मंडळी मागच्या तीन चार दिवसांत सांगलीचा कवठे महाकाळ तालुका चांगलाचं चर्चेच्या केंद्रस्थानी आलं होता. त्याचं कारण म्हणजे दिवंगत नेते आर आर आबा यांच्या पत्नी सुमन पाटील आणि त्यांचे सुपुत्र रोहित पाटील यांनी टेंभू पाणी योजनेसाठी सांगली जिल्हा परिषदेसमोर केलेलं उपोषण. तासगाव आणि कवठेमहाकाळ तालूक्यातील तब्बल १९ गावांचा पाणीप्रश्न निकालात काढण्यासाठी त्यांनी ते उपोषण केल्याचं कवठेमहाकाळ विधानसभेच्या विद्यमान आमदार सुमनताई आणि त्यांचे सुपुत्र रोहित पाटील यांनी माध्यमांना सांगितलं होतं. त्यावर सांगलीचे भाजप खासदार आणि रोहित पाटील यांचे कट्टर विरोधक समजले जाणारे संजयकाका पाटील यांनी तो सगळा प्रकार फक्त आणि फक्त राजकीय stunt असल्याची टीका केली होती. त्यांच्या मते सरकारनं आधीचं टेंभू पाणी योजनेसाठी हिरवा कंदील दाखवलेलाय, पण तरीही विद्यमान आमदार चर्चेत राहण्यासाठी अशा गोष्टी करत आहेत. आता टेंभू पाणी योजनेचं क्रेडिट घेण्यावरून तासगाव आणि कवठे महाकाळ मतदारसंघातलं राजकारण चांगलंचं तापलेलंय अन त्या राजकीय संघर्षामुळं २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठीचा बिगुल वाजलाय. आजच्या या Blog मध्ये आपण तासगाव कवठे महाकाळमध्ये नेमकी कुणाची ताकद किती आणि कोण तासगाव कवठे महाकाळचा पुढचा आमदार होवू शकतो हेच जाणून घेणारंय,

Rohit Patil 
 Prabhakar Patil

(Rohit Patil vs Prabhakar Patil | Vishaych Bhari)


मंडळी राजकारणात आबा म्हंटल की आपसूक एकच नाव डोळ्यासमोर येतं ते म्हणजे महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आर आर पाटील अर्थात आबांचं. 16 फेब्रुवारी 2016 साली आबांचं निधन झालं आणि सांगलीच्या तासगाव कवठेमहांकाळ मतदार संघात पोटनिडणुक लागली. आबांच्या पत्नी सुमन ताई पाटील यांना पोटनिवणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली होती. 2014 ला देशात मोदी लाट होती. काँग्रेसची सत्ता जाऊन देशात भाजपचं सरकार आलं होतं. मात्र त्यातही सुमन ताईंनी हा गड राखला. बरं त्या फक्त निवडून आल्या नाहीत तर 2009 ला आबांना जितक मताधिक्य मिळालं होतं त्याहीपेक्षा जास्त मताधिक्य घेत सुमन ताई निवडून आल्या होत्या. अन त्याचं एक महत्वाचं कारण होतं, स्वतः आर आर आबा यांचे सुपुत्र रोहित पाटील यांनी निवडणुकीच्या रिंगणात केलेला सुमन पाटील यांचा प्रचार. खर तर तेव्हापासूनचं आबांच्या विरोधकांना सुमन पाटील आणि रोहित पाटील यांच्या ताकदीचा अंदाज यायला लागला होता. त्या निवडणुकीपासूनचं रोहित पाटील यांची तासगाव कवठे महाकाळच्या राजकारणात सक्रीय एन्ट्री झाली आणि त्यांनी आपण आर आर आबांचे पुढचे वारसदार असल्याची त्यांच्या विरोधकांना ग्वाही दिली. सुमन पाटील यांचा प्रचार करताना रोहित पाटलांनी केलेली भाषणं युवा वर्गात खूपच लोकप्रिय झाली आणि आबांच्या जाण्यानंतर राष्ट्रवादीपासून दुरावलेला युवा मतदार पुन्हा एकदा रोहित पाटील यांच्यामार्फत राष्ट्रवादीकडं आकर्षित झाला. दरम्यान त्यावेळी खुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सुमन पाटील यांच्यासाठी प्रचार सभा घेतली होती आणि त्या सभेदरम्यान त्यांनी आगामी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी रोहित पाटील यांना उमेदवारी देण्याचं जाहिर केलं होतं. अन तेव्हापासूनचं तासगाव कवठे महाकाळ मतदारसंघात भावी आमदार रोहित पाटील अशा आशयाची पोस्टरबाजी करण्यात येतीये. तसं पाहिलं तर ,मागच्या म्हणजे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा रोहित पाटील यांची वर्णी लागली असती पण वयामुळं त्यांना तिकीट नाकारण्यात आलं आणि पुन्हा एकदा त्यांच्या आई सुमन पाटीलच तासगाव कवठे महाकाळच्या आमदार म्हणून निवडून आल्या. त्यांनी शिवसेनेच्या अजितराव घोरपडे यांना तब्बल ६२५३२ मतांनी हरवलं आणि विजयाची पुनरावृत्ती केली. तेव्हा सुद्धा रोहित पवार यांनीचं मतदारसंघातील प्रत्येक गावात जावून सुमन पाटील यांच्यासाठी प्रचार केला होता.

(Rohit Patil vs Prabhakar Patil | Vishaych Bhari)

पण मंडळी मागच्या बऱ्याच काळापासून सांगलीतलं राजकारण ह्ये दिवंगत नेते आर.आर.आबा पाटील आणि संजयकाका पाटील यांच्यातल्या राजकीय संघर्षामुळं चर्चेत राहिलेलंय. या मातब्बर नेत्यांनी त्यांची त्यांची ताकद लावून सांगलीच्या राजकारणावर दबदबा ठेवण्याचा प्रयत्न केलाय. दरम्यान आर आर आबा पाटील हयात होते तेव्हा त्यांनी सांगलीमध्ये तळागाळातल्या कार्यकर्त्याच्या गाठीभेटी घेवून राष्ट्रवादी पक्षाची सक्षम मोट बांधली होती. पुढं उपमुख्यमंत्री झाल्यावर तर त्यांनी केलेल्या कामाचा आवाका लक्षात घेऊन समस्त तासगाव करांनी एकदिलाने आर आर पाटील यांना त्यांचा पाठींबा दर्शवला होता. त्यानंतर मग संजयकाका पाटील आणि आर आर आबा यांच्यातला संघर्ष आणखीनचं ताणला गेला होता. पण एकदा पुढाकार घेऊन स्वतः आबांनीचं तो वाद संपवण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यात त्यांना यश आलं नाही. पुढं मग आबांच्या निधनानंतर ते वैर संपेल असंच सगळ्यांना वाटलं होतं. पण आता त्यांच्या घरातील पुढच्या पिढीत सुद्धा तो संघर्ष धुमसत असल्याचं वेळोवेळी सांगलीकरांना पाहायला मिळतंय.

Sanjay kaka patil 
R r Aaba

(Rohit Patil vs Prabhakar Patil | Vishaych Bhari)


म्हणजे आर आर आबा यांचे सुपुत्र रोहित पाटील आणि भाजपाचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांचे चिरंजीव प्रभाकर पाटील या दोन युवा नेत्यांमध्ये वादाची ठिणगी पडलेलीय. अन त्याचं एक महत्वाचं कारण २०२४ ची तासगाव कवठे महाकाळ विधानसभेची निवडणूक असल्याचं ही बोललं जातंय. कारण खासदार संजयकाका पाटील ह्ये त्यांचे सुपुत्र प्रभाकर पाटील यांना तासगाव कवठे महाकाळच्या विधानसभा निवडणुकीमध्ये उतरवणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. त्यासाठीच भाजप नेते प्रभाकर पाटील काही दिवसांपूर्वी कवठेमहांकाळ तालुक्यातल्या नागज या ठिकाणी एका कार्यक्रमासाठी गेले होते. त्यावेळी भाषण करताना त्यांनी रोहित पाटील यांचं नाव न घेता त्यांच्या कार्यकर्त्याकडून गावात गुंडगिरी सुरु असल्याच्या भावना व्यक्त केल्या. प्रभाकर पाटील म्हणाले, मी संजयकाका पाटील नावाच्या वाघाचा छावा आहे. आम्ही मनावर घेतलं तर गुंडगिरी करणाऱ्यांना घरातून बाहेर पडू देणार नाही. प्रभाकर पाटील यांच्या त्या वक्तव्यानंतर रोहित पाटील यांनीही प्रत्युत्तर दिलं होतं. रोहित पाटील म्हणाले, जर आबांच्या कार्यकर्त्यांना कोणी हात लावणार असेल तर आम्ही काही बांगड्या भरलेल्या नाहीत. तुमची थेट गाठ रोहित पाटलांशी आहे, हे देखील लक्षात ठेवा. रोहित पाटील यांच्या भाषणानंतर त्यांच्या समर्थकांनी मै हूं डॉन हे गाणं लावून त्यांचे व्हिडीओ व्हायरल केलेले पाहण्यात आले होते.

(Rohit Patil vs Prabhakar Patil | Vishaych Bhari)

मंडळी दरम्यान रोहित पाटील आणि भाजप खासदार संजय काका पाटील यांचातील संघर्षाची पहिली झलक पाहायला मिळाली होती ती २०२१ च्या कवठेमहंकाळ नगरपालिका निवडणुकीत. त्याचं झालं असं की 2021 च्या डिसेंबर महिन्यात कवठे महाकाळ नगरपंचायतीच्या 17 जागांसाठी निवडणूक लागली होती. त्या निवडणुकीत स्थानिक पातळीवर संजय काका पाटील यांच्या मार्गदर्शनात भाजप, शिवसेना आणि काँग्रेस अशी आघाडी निर्माण झाली होती आणि त्यांच्या आघाडीविरुध्द रोहित पाटील यांचा राष्ट्रवादी गट असा थेट सामना रंगला होता. दरम्यान सगळ्यांना असं वाटलं होत की संजयकाका पाटील यांच्या मार्गदर्शनात बनलेली आघाडी नवख्या रोहित पाटील यांच्या राष्ट्रवादी गटाला पाणी पाजेल. पण रोहित पाटील यांनीही कडवी झुंज दिली आणि १७ पैकी तब्बल १० जागा निवडून आणल्या. ती निवडणूक प्रचंड अटीतटीची झाली अन त्याचंवेळी विरोधकांना नवख्या रोहित पाटील यांच्या ताकदीचा अंदाज आला. बहुमत असल्यामुळं त्यांच्याच गटाचा नगराध्यक्ष होईल अशी अपेक्षा असताना नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत 4 सदस्य गैर हजर राहिले अन चिठ्ठी उडवून नगराध्यक्ष निवडण्यात आला. त्यात संजय काका पाटिल गटाच्या सिंधुताई गावडे नगराध्यक्ष झाल्या मात्र 10 जागा जिंकल्यामुळं जनमत रोहित पाटील यांच्या मागे असल्याचं दिसून आलं होतं. आता सुद्धा उपोषणादरम्यान अंगात ताप असतानाही रोहित पाटील उपोषणाला बसून राहिले होते. त्यांच्या उपोषणाची दखल सांगलीतील आणि राज्यातील प्रमुख नेत्यांनी घेतली असल्याच पाहण्यात आलं. त्यावेळी भाजप नेते पृथ्वीराज देशमुख, मंत्री सुरेश खाडे यांनी सुद्धा रोहित पाटील यांची भेट घेतली तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फोन करुन रोहित पाटील यांच्याशी चर्चा केली. आता एकीकड आबा काका गटाचा हा संघर्ष पेटलेला असतानाचं दुसरीकडं माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांचे पुत्र राजवर्धन घोरपडे हे सुद्धा अतिशय गुप्तपणे मतदारसंघात चाचपणी करत असल्याचं बोलल जातंय. त्यामुळं आता तासगाव कवठे महाकाळ मतदार संघातील लढाई दुहेरी नाही तर रोहित पाटील विरुद्ध प्रभाकर पाटील विरुद्ध राजवर्धन घोरपडे अशी तिहेरी होण्याची चिन्ह दिसू लागलेत.

Rohit Patil

(Rohit Patil vs Prabhakar Patil | Vishaych Bhari)

दरम्यान त्याचं धर्तीवर तालुक्याच्या राजकारणात मागच्या काही दिवसांपासून अनेक राजकीय बदल झाल्याचं दिसून आलंय. कारण काही महिन्यांपासून खासदार संजय पाटील व त्यांचे सुपुत्र प्रभाकर पाटील यांनी तालुक्यात दौरे करायला सुरवात केलीये. त्यांनी गावोगावी भेटी देत गणेशोत्सवात तरुणांशी संवाद साधलाय. तर त्यांचे कार्यकर्ते प्रभाकर पाटील यांचा ‘भावी आमदार’ असा प्रचार करत आहेत. भाजपने तालुक्यात सुरु केलेली ही जोरदार बॅटिंग पाहिल्यानंतर राष्ट्रवादीच्या आमदार सुमन पाटील आणि रोहित पाटील यांनीही तालुक्यात विकासकामांच्या ‘मार्केटिंग’चा धडाका लावलाय. रोहित पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आक्रमकता दाखवायला सुरवात केलीय. तर खासदार-आमदार गटाच्या या दौऱ्यांना प्रत्युत्तर म्हणून माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनीही त्यांच्या संथ आणि छुप्या हालचाली सुरु केल्यात. तिन्ही गटाच्या नेत्यांकडून फक्त विधानसभा नाही तर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठीही विशेष रणनीती आखण्यात येतीये. दरम्यान आता राष्ट्रवादीतील फुटीनंतर त्याठिकाणी रोहित पाटील यांनी शरद पवार गटात रहात शरद पवारांना त्यांचा पाठिंबा जाहीर केलाय. तर दुसरीकडं प्रभाकर पाटील हे महायुतीचे उमेदवार असण्याची शक्यता वर्तवली जातीये.

(Rohit Patil vs Prabhakar Patil | Vishaych Bhari)


तर अजित घोरपडेंचे पुत्र राजवर्धन घोरपडे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास तासगाव कवठे महाकाळ मतदार संघात सगळ्या युवा उमेदवारांमध्ये कडवा संघर्ष पाहायला मिळू शकतो. दरम्यान याआधी दोनदा शिवसेनेकडून निवडणुक लढवताना अजितराव घोरपडे यांचा पराभव झालेलाय. तर संजयकाका पाटील यांनी २०१४ पासून लोकसभेला त्यांची ताकद दाखवून दिलीये. पण 1991 पासून सलग 24 वर्ष आर आर पाटील हेच तासगाव कवठे महाकाळचे आमदार म्हणून निवडून येत होते. पण तुम्हांला नेमकं काय वाटतय, आपल्या वडिलांचा वारसा कायम राखून रोहित पवार यंदा २०२४ ची विधानसभा मारतील की संजय काका पाटील यांच्या मार्गदर्शनात प्रभाकर पाटील त्यांचा गेम करतील, किंवा अगदी त्याच्याही पुढं जाऊन राजवर्धन घोरपडे आपल्या वडिलांच्या पराभवाचा वचपा काढून आबा काका गटातील संघर्षाला कायमचा ब्रेक लावत आगामी निवडणूक मारतील ? तुमच्या मते तासगाव कवठे महाकाळचा पुढचा आमदार नेमकं कोण होऊ शकतं,, तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

तासगाव कवठेमहाकाळचा पुढचा आमदार कोण | Rohit Patil की Prabhakar Patil | Vishaych Bhari

Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇

https://www.facebook.com/vishaychbhari

https://www.facebook.com/aplavishaychbhari

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *