रमेश कदम मोहोळचे पुढचे आमदार असतील का | Ramesh Kadam | Mohol Vidhansabha | Vishaych Bhari


मंडळी मागच्या महिन्याभरापूर्वी जामीन मंजूर झाल्यानंतर सोलापूरच्या मोहोळ तालुक्याचे माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे माजी नेते रमेश कदम हे परवा मोहोळमध्ये आले होते. त्यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी रमेश कदम यांचं जंगी स्वागत केलं. मोहोळमधल्या तरुण वर्गामध्ये आजही रमेश कदम यांची तुफान क्रेझय ह्येच त्यावेळी दिसून आलं. कारण हजारो समर्थक त्यादिवशी रस्त्यावर उतरले होते. त्यामुळं रमेश कदम यांच्या परत येण्यानं आता मोहोळ आणि एकूणच सोलापूरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जातीये. स्वागत रॅलीनंतर रमेश कदम यांनी सभा घेऊन आपल्याला यंदाची निवडणूक लढवायचीय अशी इच्छासुद्धा कार्यकर्त्यांपुढं तेव्हा बोलून दाखवली. सोबतच मी परत आलो, आता परत लढणार अशी घोषणा ही केली. त्यामुळेच आजच्या या Blog मध्ये आपण रमेश कदम यांना आठ वर्षे तुरुंगवास का भोगावा लागला, त्यांच्यावर कोणते आरोप केले गेले होते, त्यांच्या रीएंट्री मुळं मोहोळ तालुक्यातलं राजकारण कसं बदलू शकतं, आता ते अजित पवार गटाची बाजू घेणार की शरद पवार गटाची की मागच्या वेळी सारखं ते अपक्षचं निवडणूक लढवतील ? सगळ्या प्रश्नाची सविस्तर उत्तरं जाणून घेऊयात.

Ramesh Kadam Mohal

(Ramesh Kadam | Mohol Vidhansabha | Vishaych Bhari)


मंडळी सुरुवातीला आपण रमेश कदम यांच्यावर कोणते आरोप झाले होते त्याची माहिती घेऊ. तर मंडळी माध्यमांमध्ये आलेल्या रिपोर्टनुसार मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांच्यावर अण्णा भाऊ साठे महामंडळामध्ये 312 कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याप्रकरणी आरोप ठेवण्यात आला होता. तेव्हा मीडियात आलेल्या बातमीनुसार रमेश कदम यांनी आण्णा भाऊ साठे महामंडळाच्या अध्यक्षपदी असताना बोगस लाभार्थी दाखवून शेकडो कोटींचा घोटाळा केल्याचं बोललं गेलं होतं. म्हणजे त्याचं झालं असं की २०१२ ते २०१५ या कालावधीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळास केंद्र शासनाकडून ४८४ कोटी ८६ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. मातंग समाजातील पात्र लाभार्थ्यांना अनुदानाचं वितरण करण्याचं ही निश्चित करण्यात आलं होतं. त्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनखाली समाजकल्याण विभागातील अधिकारी आणि महामंडळातील जिल्हा व्यवस्थापकांची एक समिती स्थापन करण्यात आली होती. मात्र त्या समितीतील पदाधिकाऱ्यांशी संगनमत करुन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आणि तत्कालीन राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम, व्यवस्थापकीय संचालक श्रावण बावणे यांनी ३६७ कोटी रुपयांचा अपहार केला असा आरोप मोहोळचे माजी आमदार लक्ष्मण ढोबळे यांनी केला होता . ढोबळेंनी रमेश कदम यांच्यावर साधारण असे आरोप केले होते ,

१) कोणतीही प्रक्रिया न राबवता कदम यांनी 73 जणांची भरती केली .
२) धाराशिवच्या नेटकेंनी मुलाला, तर बावणेंनी मुलीला सेवेत घेतलं, नियुक्त झालेल्यांना 20 लाखांचं गृहकर्जही उपलब्ध करुन दिलं. त्यातले 15 लाख रुपये लाच म्हणून घेण्यात आले,
३) अनेक कर्ज प्रकरणावर खोट्या सह्या घेतल्या,

Ramesh kadam

(Ramesh Kadam | Mohol Vidhansabha | Vishaych Bhari)

लाभार्थींचे चेक परस्पर वाटण्यात आले, तसंच महालक्ष्मी दूध संस्था, खंडाळी, बारामीत दूध संघाला 5 कोटी कागदोपत्री वाटण्यात आले तसेच विधानसभा निवडणुकीत रमेश कदमांनी 6 कोटी 56 लाख रुपये वाटले.आता या आरोपांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं रमेश कदम यांना तातडीनं पक्षातून निलंबित केलं. त्यानंतर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी सात संशयितांवर गुन्हे दाखल करण्यात आले ज्यात तत्कालीन आमदार रमेश कदम यांचा देखील समावेश होता. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक महामंडळाचा हा घोटाळा उघड झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात गोंधळ वाढला आणि आणि घोटाळ्याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी वाढू लागली. त्यावर प्रतिक्रिया देताना माजी समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी मीडियासमोर एक खळबळजनक दावा केला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार अंतिम अहवालापर्यंत घोटाळ्याची व्याप्ती वाढून, अध्यक्ष आ. रमेश कदमांबरोबरच आणखी नावे उघड होतील. त्यामध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचंदेखील नाव असू शकेल. दिलीप कांबळे पुढं म्हणाले होते, महामंडळाच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी सीआयडी चौकशी चालू झाल्यानंतर ३८५ कोटी रूपयांचा आर्थिक घोटाळा महामंडळाचे अध्यक्ष रमेश कदम यांनी केल्याचं प्राथमिक अहवालात उघड झाल्यानंतर एफआयआर दाखल करण्यात आला. त्यानंतर रमेश कदम हे तोंड लपवत फरार झाले. परंतु त्यांना सीआयडीने शेवटी अटक केली . त्यांच्याबरोबर जिल्ह्यातील अनेक राष्ट्रवादीचे अध्यक्ष, पदाधिकार्‍यांना व्यवसायाच्या गाड्या खरेदीसाठी कोटेशन दाखवून अलिशान गाड्यांसह इतर महागड्या गाड्या देण्यात आल्या होत्या.

(Ramesh Kadam | Mohol Vidhansabha | Vishaych Bhari)


खरंतर शासनाने तेव्हा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाबरोबर इतर महामंडळाचीही चौकशी केली . परंतु इतर महामंडळात काही आढळले नाही. दरम्यानच्या काळात 2018 साली रमेश कदम यांच्या पत्नी प्रतिभा कदम यांची देखील संशयित म्हणून चौकशी करण्यात आली होती. कारण निवडणूकांवेळी ज्या बँक एकाऊंटमधून पैशांचा व्यवहार झाला होता ते बँक अकाउंट संयुक्तपणे रमेश कदम आणि प्रतिभा कदम यांच्या नावावर होतं. दरम्यानच्या काळात दहिसर इथल्या अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यालयातून घोटाळ्यासंबंधीच्या सर्व फाईल्स गायब केल्याची ही घटना घडली होती. म्हणजे कार्यालयाचं सील तोडून सगळ्या फायल्स गायब करण्यात आल्या होत्या आणि त्यामागं रमेश कदम यांच्या भावाचा हात असल्याची चर्चा पसरली होती. पण पुढं गायब झालेल्या फाईल्स घोटाळ्याच्याचं आहेत याचा दुजोरा मिळू शकला नाही अन कदम यांच्या भावानं त्या सगळ्या आरोपांचं खंडन केलं . तोवर रमेश कदम यांची रवानगी आर्थर जेलमध्ये करण्यात आली होती. पुढं त्यांना भायखळ्याच्या जेलमध्ये हलवण्यात आलं होतं. जेलमध्ये असताना ही रमेश या ना त्या कारणाने कायम चर्चेत राहिले. मागे त्यांची जेलमधली एक व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली होती. त्या व्हिडीओत रमेश कदम आर्थर रोड जेलमध्ये कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना शिवीगाळ करत असल्याचं दिसून आलं होतं. त्यासंदर्भात रमेश कदम यांच्याविरोधात नागपाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा देखील नोंदवण्यात आला होता. मात्र, पोलिसांनीच मला जातीवाचक शिवीगाळ केली आणि 25 हजारांची लाच मागितली’ असा उलट दावा त्यांनी केला होता. पुढं भायखळा जेलमध्ये असताना सुद्धा वॉर्डन मंजुळा शेट्ये हत्या प्रकरणातही त्यांनी पोलिसांवर वेगवेगळे आरोप केले होते. पण पुढं रमेश कदम यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यामुळं न्यायालयानं त्यांना शिवीगाळ प्रकरणातून दोषमुक्त केलं. पुढं 2019 साली रमेश कदम यांना विधानसभा निवडणूकीचा फॉर्म भरण्यासाठी तीन दिवसांची पॅरोलवर रजा मिळाली होती. त्यावेळी रमेश कदम जेलमधून बाहेर आल्यानंतर कार्यकर्त्यांनी तब्बल 500 किलोंचा हार देऊन त्यांचं स्वागत केलं होतं. 2019 च्या निवडणुकीत जेलमध्ये असताना सुद्धा त्यांना जवळपास 25000 मतं मिळाली होती. ही एकप्रकारे मोहोळमध्ये त्यांची किती क्रेझय याची पोच पावती होती. त्यावेळी रमेश कदम अपक्ष उभे होते. आणि निवडणूकीची संपूर्ण जबाबदारी त्यांची मुलगी सिद्धी कदम यांच्यावर सोपवण्यात आली होती.

(Ramesh Kadam | Mohol Vidhansabha | Vishaych Bhari)

पुढे यावर्षीच्या एप्रिल महिन्यात रमेश कदम यांना शिवीगाळ प्रकरणात जामीन मिळाला पण तो जामीन फक्त एका गुन्ह्यासाठी असल्यामुळे त्यांना अटकेतच रहावं लागलं होतं. पण आता ऑगस्ट महिन्यात त्यांना 1 लाख रूपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर तब्बल आठ वर्षांनी जामीन मंजूर झाला अन परवा ते थेट मोहोळमध्ये परतले. 2015 नंतर तब्बल आठ वर्षांनी ते मोहोळ मतदारसंघात परत आल्यामुळं त्यांच्या समर्थकांकडून फटाक्यांची आतिषबाजी आणि पुष्पवृष्टी करत त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. सोबत जागोजागी त्यांचे पोस्टर्स ही लावण्यात आले . पहिल्यांदा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांचं स्वागत करण्यात आल्यामुळं आता मोहोळ आणि सोलापूर जिल्ह्यात राजकीय चर्चाना उधाण आलंय. रमेश कदम यांच्या एन्ट्रीमुळं मोहोळ विधानसभा मतदारसंघातील राजकीय गणितं बदलण्याची चिन्हं दिसायला लागलीत. त्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे सध्या मोहोळच्या आमदारपदी राष्ट्रवादीचेचं यशवंत माने हे आहेत. अटकेनंतर राष्ट्रवादीनं रमेश कदम यांचं निलंबन करून यशवंत माने यांना संधी आणि ताकद दिली होती. खरे तर त्यांच्या आधी लक्ष्मण ढोबळे हे इथून आमदार होते.
त्यांनीच रमेश कदम यांचं प्रकरण बाहेर काढलं होतं. आता यामुळे राष्ट्रवादी अंतर्गत तेव्हा कसे मतभेद होते है आपल्याला कळलं असेल.
आता लक्ष्मण ढोबळें चार वर्षांपूर्वीच भाजपमध्ये गेलेत. पण खरंतर या मतदारसंघात राजन पाटील यांचा मोठा प्रभाव दिसून येतो.1995 ,99 आणि २००४ अशा तीन टर्मला राजन पाटील आमदार झाले होते. आधी ते कांग्रेसमध्ये होते तर नंतर राष्ट्रवादीत गेले.‌पण २००९ ला मोहोळ हा मतदारसंघ राखीव झाला आणि मग इथून पाटलांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना ताकद पुरवायला सुरूवात केली . पण मागं इथं राष्ट्वादीचेच जिल्हा कार्याध्यक्ष असणार्‍या उमेश पाटील आणि त्यांच्यात मोठा बेबनाव झाला आणि त्यात राष्ट्रवादी आपल्याला साथ देत नसून मागून आलेल्या नेत्यांना पक्षनेतृत्व सपोर्ट करतंय असा आरोप राजन पाटील यांनी केला होता. तशी खदखद राजन यांचे सुपुत्र बाळराजे पाटील यांनीही व्यक्त केली होती.

Rajan Patil

(Ramesh Kadam | Mohol Vidhansabha | Vishaych Bhari)

अगदी मागे देवेंद्र फडणवीस दिल्लीत असताना आमदार बबनदादा शिंदे आणि राजन पाटील भाजप नेत्यांची भेट घेऊन आले होते. मागाहून त्यांनी याबद्दल सारवासारव केली खरी पण राजन पाटील यांच्या मनातला पक्ष नेतृत्वाबद्दलचा असंतोष अजिबात लपून राहिला नाही. आता त्यांनी अजित दादा भाजपसोबत गेल्यानंतर अजित दादांना साथ द्यायचं ठरवलं आहे. तेव्हा एकूणच मोहोळमध्ये राष्ट्रवादी पहिल्यापासूनच एकसंध नाही हे समजतेय. आता काही प्रमाणात ती राजन पाटील यांच्यामागे एकवटलीय. तर काही प्रमाणात उमेश पाटील यांच्या . पण राजन पाटील हेच राष्ट्रवादीचे मोहोळचे बडे प्लेयर आहेत. आता राजन पाटील हे अजित दादा गटात गेलेत. तर उमेश पाटील हे सुद्धा अजित पवार गटात आहेत. आता रमेश कदम हे सुद्धा अजित दादा गटात जातील अशी मोहोळमध्ये चर्चा आहे. पण तसं जर झालं तर या ३ नेत्यांमध्ये तिथे
पुन्हा एकदा नवा संघर्ष उभा राहू शकतो. पण अजित दादा इथे रमेश कदम यांच्या इनकमिंगबाबत सकारात्मक भूमिका घेतील का हे बघावं लागेल.‌ आता खरंतर जेलमधून सुटल्या सुटल्या आपण शरद पवार आणि अजित दादा या दोन्ही नेत्यांना भेटू असं रमेश कदम यांनी म्हटलं होतं. मोहोळ मधील सभेतही त्यांनी अद्याप पत्ते पूर्णपणे उघड केलेले नाहीत. तिथे राष्ट्रवादी आणि मनसेनंही त्यांचं जोरदार स्वागत केलंय. पण आता रमेश कदम फायनली कुठं जातील हे पाहणं महत्त्वाचं आहे. त्यांच्याकडे खरंतर प्रामुख्याने ३ पर्याय आहेत. एक म्हणजे शरद पवार गटासोबत जाणं . नंबर दोन म्हणजे अजित दादा गटासोबत जाणं आणि नंबर ३ म्हणजे मनसे , शिवसेना किंवा भाजपची वाट धरणं.

(Ramesh Kadam | Mohol Vidhansabha | Vishaych Bhari)

आता पर्याय नंबर एक म्हणजेच रमेश कदम हे शरद पवार गटात गेले तर पवारांच्या सिंपथीमुळे रमेश कदम यांचं क्राईम रेकॉर्ड सिंपथी कार्डमध्ये परावर्तित होऊ शकतं.पण कुठल्याही क्राईम रेकॉर्ड असणार्‍या नेत्याला ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षात घेऊन पक्षाची राज्यभर छबी बिघडवायला शरद पवार तयार होणार का ? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आता शरद पवार गटाने यापूर्वी क्रिमिनल background असणार्‍या
नेत्यांना सोबत घेतलं नाही ,असं नाही. त्यामुळे ही रिस्क वेळ, काळ आणि रमेश कदम यांना मिळणारा प्रतिसाद बघूनच शरद पवार घेऊ शकतात .‌ आता मागं रमेश कदम यांच्यावर आरोप झाले तेव्हा पक्षाने सरळ हात वर करून रमेश कदम यांना निलंबित केलं होतं ही गोष्ट सुद्धा इथं विशेष नोंद घेण्यासारखीय. दुसरा पर्याय आहे अजित दादांसोबत जाण्याचा आता राजन पाटील सध्या अजित दादा गटात आहेत. त्यांची मतदारसंघात चांगली ताकद दिसून येते. आता अजित दादा गटासोबत जायचं असेल तर मग राजन पाटील यांच्या परवानगीशिवाय अजित दादा , रमेश कदम यांना पक्षात घेतील असं वाटत नाही. कदाचित रमेश कदम अजित दादा गटात आले तर राजन पाटील यांना रमेश कदम विरूद्ध उमेश पाटील अशी rivalary तालुक्यात यामुळे उभी करता येऊ शकेल. पण मग रमेश कदम हे राजन पाटील यांना वरचढ ठरले तर मग त्यांनाही जड जाऊ शकतात असं दिसतंय. त्यामुळे राजन पाटील इथं ही रिस्क घेणार का हा खरा प्रश्न आहे.‌ एकूणच परवाचं रमेश कदम यांचं शक्ती प्रदर्शन हे एका अर्थाने त्यांच्यासाठी महत्वाचं आणि दुसर्‍या वेळी तोट्याचं ठरू शकतं. फायद्याचं यासाठी की त्यामुळे रमेश कदम यांची याद्वारे बार्गेनिंग सिद्ध होतेय पण त्यांची ही पावर अजित दादा गटातील या दोन्ही नेत्यांना damage करू शकते असं वाटलं तर मग रमेश कदम यांचा अजित दादा गटातील प्रवेश अशक्य होऊ शकतो. त्यावेळी रमेश कदम यांना मोहोळमध्ये तिसरा पर्याय म्हणून उभं रहावं लागू शकतं.
कारण अजित दादाही तीन मौठ्या नेत्यांना एकत्रित आणून पक्षांतर्गत संघर्ष वाढू देणार नाहीत. पण आता राजन पाटील विरूद्ध उमेश पाटील हा संघर्ष इथं वाढला तर मग कदाचित या दोन पाटलांपैकी एक नेता इथून भाजपच्या किंवा शरद पवार गटाच्याही वाटेने गेला तर नवल वाटायला नको.

Ajit  Pawar ,
Ramesh Kadam ,

(Ramesh Kadam | Mohol Vidhansabha | Vishaych Bhari)

एकूणच आता इथूनपुढे रमेश कदम यांना अतिशय सावधपणे मोहोळमध्ये त्यांची मोट बांधावी लागणार आहे. सोबतच आपली इमेज रिकव्हर होऊ देत क्रिमीनल रेकाॅर्डचा विषय त्यांच्यावरील अन्यायाच्या कार्डकडे शिफ्ट करावा लागणार आहे .‌ म्हणून तर त्यादिवशीच्या भाषणात मी किती भोगलंय ही लाईन रमेश कदम यांनी पकडली होती. पण आता प्रश्न उरतो की दोन्ही राष्ट्रवादी गटाकडे हातपाय मारून जर फायदा झाला नाही तर रमेश कदम हे भाजप , ठाकरे गट शिंदे गट किंवा वंचित ,बीआर एस असा option निवडतील की मग अपक्ष राहूनच आपली ताकद दाखवतील? आता लक्ष्मण ढोबळेंनी भाजपमध्ये केलेला प्रवेश कदम यांचे भाजपप्रवेशाचे दरवाजे बंद करतो. ठाकरे गट , आणि brs इथून आपली छबी बिघडवायला तयार होईल असं दिसत नाही. त्यावेळी अपक्ष हाच रमेश कदम यांच्यापुढचा option असू शकतो.‌ पण यानिमित्ताने शिंदे गटाचे प्रताप सरनाईक यांनी मात्र रमेश कदम यांना जामीन मिळाला म्हणजे क्लिनचीट मिळाली असं नाही. ते काही दिवसांसाठी जामीनावर बाहेर आलेत. पण रमेश कदम यांनी मात्र आपण आता कायमचे सुटलो, असल्याचं म्हणलंय. कारण मी कोणताच गुन्हा केला नाही आणि माझ्यावर अन्याय झालाय हेच त्यांचं म्हणणं आहे. पण तुम्हाला काय वाटतंय खरंच माजी आमदार रमेश कदम हे घोटाळेबाज आहेत की मग त्यांच्यावर अन्याय झालाय ? कुठल्या नेत्यानं ऐनवेळी अंग काढून घेत त्यावेळी रमेश कदम यांच्यावर सगळा दोष ढकललाय का ? तसेच मोहोळमध्ये खरंच अजूनही रमेश कदम यांची ताकद उरलीये का? ते मोहोळचे पुढील आमदार होऊ शकतात का? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा…

रमेश कदम मोहोळचे पुढचे आमदार असतील का | Ramesh Kadam | Mohol Vidhansabha | Vishaych Bhari

Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇

https://www.facebook.com/vishaychbhari

https://www.facebook.com/aplavishaychbhari

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *