शरद पवार नगरच्या खासदारकीला राधाकृष्ण विखे पाटील यांची अशी विकेट काढणार | Radhakrishna Vikhe Patil | Sharad Pawar | Vishaych Bhari

अहमदनगर हा महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाचा जिल्हा. नात्यागोत्याचं आणि जातीचं राजकारण याठिकाणी बेकार चालतं असं म्हटलं जातं. नगर जिल्ह्यातील एकही व्यक्ती आतापर्यंत मुख्यमंत्री झालेली नसली तरी राज्याच्या राजकारणातील महत्त्वाच्या पदांमध्ये नगर जिल्ह्याला नेहमीच झुकतं माप मिळाल्याचं पहायला मिळतं. या जिल्ह्यात लोकसभेचे 2 मतदारसंघ येतात. एक आहे अहमदनगर दक्षिण तर दुसरा आहे शिर्डी. आज आपण अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत.

sujay vikhe patil,
sangram jagatap,

(Radhakrishna Vikhe Patil | Sharad Pawar | Vishaych Bhari)

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाअंतर्गत अहमदनगर शहर, श्रीगोंदा, पारनेर, कर्जत जामखेड, पाथर्डी-शेवगाव आणि राहुरी या ६ विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. सध्या डॉ सुजय विखे पाटील हे या मतदारसंघाचे खासदार आहेत. मागील १५ वर्षांपासून या ठिकाणी भाजपचा उमेदवार खासदार म्हणून निवडून येत आहे. सुजय विखे यांच्याआधी दिलीप गांधी हे सलग २ वेळा खासदार म्हणून या ठिकाणाहून निवडून आले होते. इतर पक्षातून एखादा तगडा नेता आपल्या पक्षात आला की भाजपला स्वपक्षातील नेत्यांचा विसर पडतो किंवा त्यांना अडगळीत टाकलं जातं. दिलीप गांधी यांच्याबाबतही तसंच काहीसं झाल्याचं म्हणता येतं. त्यामुळेच राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजप प्रवेश केल्यानंतर त्यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यासोबतच त्यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील यांना लगोलग अहमदनगर दक्षिणमधून खासदारकीचं तिकीटही देण्यात आलं. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संग्राम जगताप यांचा इथून पराभव केला. मागील साडेचार वर्षांच्या कार्यकाळात रस्ते, उड्डाणपूल, शेतीविषयक समस्या यांचा पाठपुरावा करून त्या सोडवण्यासाठी सुजय विखे यांनी प्रयत्न केल्याचं मतदारसंघातील लोक सांगतात. विखे पाटील कुटुंबाचं शिक्षण संस्था, वैद्यकीय संस्था, सहकारी कारखाने यांचं मोठं जाळं असल्याने त्याचा फायदा त्यांना निवडणुकीसाठी होतो ही वस्तुस्थिती आहे. सुजय विखे पाटील यांचा राजकारण आणि सहकार क्षेत्राचा वारसा त्यांच्या पणजोबांपासून म्हणजेच विठ्ठलराव विखे पाटील यांच्यापासून आहे. विठ्ठलरावांनी देशातील पहिल्या सहकारी साखर कारखान्याची स्थापना प्रवरानगर येथे केली होती. सुजय यांचे आजोबा बाळासाहेब विखे पाटील हे अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये केंद्रीय मंत्री राहिले होते तर २० हून अधिक वर्षं महाराष्ट्र विधानसभेचे आमदारही होते. तर वडील राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेना, काँग्रेस आणि भाजप या तिन्ही पक्षांतून सत्तेत सहभागी होत महत्वाच्या मंत्रीपदांवर काम केलंय. वास्तविक पाहता नगर जिल्ह्याच्या उत्तर भागात विखे पाटील कुटुंबाचं अधिक वर्चस्व आहे. याच भागातील शिर्डी मतदारसंघातून राधाकृष्ण विखे पाटील सलग ७ वेळा आमदार झाले आहेत. मात्र एकूण अहमदनगर जिल्ह्यात विखे पाटील यांच्या नावाचा फायदा करून घेण्याचा विचार भाजपने करून अहमदनगर दक्षिण लोकसभेची उमेदवारी सुजय विखेंना देऊ केली आहे. राधाकृष्ण विखे पाटलांचा दांडगा जनसंपर्क आणि सर्वपक्षीय मित्र जोडण्याची कला त्यांच्या मुलासाठी फायद्याची ठरू शकते. आणि म्हणूनच २०२४ च्या नगर दक्षिण लोकसभा जागेसाठी भाजपतर्फे सुजय विखे हेच प्रबळ दावेदार आहेत.

(Radhakrishna Vikhe Patil | Sharad Pawar | Vishaych Bhari)

सुजय विखे यांच्याविरोधात लढण्यासाठी महाविकास आघाडीकडे सध्यातरी तगडा उमेदवार नाही असंच एकूण चित्र पहायला मिळत आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या नेवासा या विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार शंकरराव गडाख यांना सुजय विखे यांच्याविरोधात उभं केलं जाणार असल्याच्या सध्या चर्चा आहेत. शंकरराव गडाख हे उद्धव ठाकरे गटाकडून सुजय विखें विरूद्ध दोन हात करण्याच्या तयारीत आहेत. सुजय विखे यांनीही शंकरराव आणि मी आताच्या काळातील प्रतिस्पर्धी असल्याचं सांगून आपण या लढाईसाठी तयार असल्याचं सांगितलं आहे. यापूर्वी सुजय विखे यांचे आजोबा बाळासाहेब आणि शंकरराव गडाख यांचे वडील यशवंतराव यांच्यात लोकसभेसाठी १९९१ साली थेट लढत झाली होती. या लढतीत यशवंतराव गडाख विजयी झाले होते. गडाख यांच्या विजयामागे बाळासाहेब विखे यांचे कट्टर विरोधक असलेल्या शरद पवार यांचा हात होता. त्यामुळेच आजही पवार आणि विखे पाटील घराण्याचं फारसं सख्य नाही. २०१९ च्या नगर लोकसभेसाठी शरद पवार यांनी ‘दुसऱ्यांच्या नातवाला तिकीट द्यायची जबाबदारी माझी नाही’ असं म्हणत सुजय विखे यांच्या नावाला विरोध दर्शवला होता. मात्र हा विरोध वरवरचा असल्याच्या चर्चाही कधीतरी केल्या जातातच. कारण सुजय विखेंना कुठल्याही पक्षातून खासदार करण्याच्या बदल्यात रोहित पवारांना कर्जत-जामखेडमधून आमदार करायला विखे पाटलांची मदत घ्यायची अशी सेटलमेंट भाजप आणि राष्ट्रवादीत झाल्याची ती चर्चा.

ajit pawar,
sharad pawar,
shanakarrao gadakh,

(Radhakrishna Vikhe Patil | Sharad Pawar | Vishaych Bhari)


नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांचं वर्चस्व असल्याने ही चर्चा खरी असू शकते असंही म्हटलं जातं. आता मागे कर्जत जामखेडचे राम शिंदे यांनीही मागे सुजय विखे पाटील आणि रोहित पवार यांच्यात छुपी युती आहे, असं एका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक निकालावेळी म्हणलं होतं. त्या निवडणुकीत भाजपचा नगराध्यक्ष तर राष्ट्रवादीचा उपनगराध्यक्ष झाला होता. असो . पण शरद पवार आणि अजित पवार गटानेही शंकरराव गडाख यांना अंतर्गत मदत केली तर नगरचं चित्र वेगळं दिसू शकतं. त्यामुळे सुजय विखे यांच्याविरोधात शंकरराव गडाख यांना उमेदवारी मिळालीच तर विखे विरुद्ध पवार प्लस गडाख असा सामना २०२४ मध्ये पहायला मिळू शकतो. गडाख यांच्याव्यतिरिक्त पारनेरचे डॅशिंग आमदार निलेश लंके यांचं नावही खासदारकीसाठी घेतलं जात आहे. लंके आणि विखे पाटील कुटुंबीयांचा ३६ चा आकडा आहे. काही महिन्यांपूर्वी राधाकृष्ण विखे पाटील यांनी ‘तुम्हाला पुढच्या वेळेस आमदार व्हायचंय ना?’ असा उपहासयुक्त आणि खोचक प्रश्न निलेश लंके यांना उद्देशून विचारला होता. तर त्याला प्रत्युत्तर देताना ‘तुझा पोरगा खासदार कसा होतो ते बघतोच’ असं खंगरी उत्तर निलेश लंके यांनी दिलं होतं. जुलै महिन्यात भाजपच्या मांडीला मांडी लावलेल्या अजित पवार गटात निलेश लंके यांचाही समावेश आहे. अशा परिस्थितीत लोकसभेसाठी निलेश लंके यांना उमेदवारी मिळणार का? उमेदवारी मिळाली नाही तरी ते सुजय विखे यांना मदत करणार का? हे प्रश्न उपस्थित राहतातच.

(Radhakrishna Vikhe Patil | Sharad Pawar | Vishaych Bhari)


नगर लोकसभेअंतर्गत येणाऱ्या ६ विधानसभा मतदारसंघात २ ठिकाणी शरद पवार गट, २ ठिकाणी अजित पवार गट तर उर्वरित २ ठिकाणी भाजप आमदार आहेत. राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये असले तरी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना ते आमदारकीसाठी मदत करतात अशी ग्राऊंड लेव्हलला चर्चा आहे. जिल्ह्यातून भाजप आमदार वाढले तर सरकार आल्यानंतर पालकमंत्रीपदासाठी प्रतिस्पर्धी नकोत असाही एक विचार त्यामागे असू शकतो. शिवाय सुजय विखे यांना खासदारकीला मदत केली तर त्याची परतफेड विधानसभा निवडणुकीत करायची हा विचारसुद्धा त्यामागे असू शकतो. अर्थात हा केवळ अंदाज म्हणायचा. शेवगाव पाथर्डी आणि श्रीगोंदा या दोन मतदारसंघात भाजपच्या मोनिका राजाळे आणि बबनराव पाचपुते हे आमदार आहेत. मोनिका राजळे यांचे पती दिवंगत राजीव राजळे हे आधी काँग्रेस पक्षाकडून आमदार होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून २०१४ ची लोकसभा निवडणुकही लढवली होती. त्यांच्या पत्नी यांनी मात्र २०१४ साली भाजपच्या तिकिटावर निवडणुक लढवत पहिल्यांदा आमदारकी मिळवली. आणि २०१९ ला त्या दुसऱ्यांदा आमदार झाल्या. बबनराव पाचपुते हे राजकारणाचा दांडगा अनुभव असलेले नेते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, अपक्ष आणि भाजप असा त्यांचा राजकीय प्रवास राहिलेला आहे. या दोन्ही नेत्यांकडून भाजपला लोकसभेसाठी मदत अपेक्षित असेल.

Sharad Pawar
Sharad Pawar

(Radhakrishna Vikhe Patil | Sharad Pawar | Vishaych Bhari)

राहुरी आणि कर्जत जामखेड या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्राजक्त तनपुरे आणि रोहित पवार हे आमदार आहेत. तनपुरे हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भाचे तर रोहित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आहेत. मागील निवडणुकीत तनपुरे यांनी भाजपच्या शिवाजी कर्डीले यांचा तर रोहित पवार यांनी राम शिंदे यांचा पराभव केला. आपापल्या मतदारसंघात भाजपला थेट भिडण्याचं काम या दोघांना करावं लागत आहे. ही दोन्ही मंडळी आपल्या अभ्यासू राजकारणासाठी आणि ठाम भूमिका घेण्यासाठी ओळखली जातात. महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात तनपुरे हे कॅबिनेट मंत्री होते. या दोघांच्या मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला ताकद मिळेल अशी शक्यता आहे. पारनेर आणि अहमदनगर शहर भागातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे निलेश लंके आणि संग्राम जगताप हे आमदार आहेत. हे दोघेही त्यांच्या मतदारसंघात तुफान लोकप्रिय आहेत. सामान्य लोकांत राहणारा, त्यांच्यासाठी झटणारा नेता म्हणून निलेश लंके यांची ओळख आहे. तर शहरी भागात विकासकामे करणारा आमदार म्हणून संग्राम जगताप परिचित आहेत. मागील लोकसभा निवडणुकीला संग्राम जगताप हे सुजय विखे यांच्या विरोधात उभे होते. जगताप यांचा पराभव झाला असला तरी त्यांनी ४ लाखांहून अधिक मतं मिळवली होती. वर उल्लेख केल्याप्रमाणे लंके आणि विखे पाटील यांचं विशेष सख्य नाही. अशा परिस्थितीत नाईलाजाने भाजपसोबत आहोत म्हणून सुजय विखे यांचं काम करायचं की आपला करारी विरोधी बाणा कायम ठेवायचा हा निर्णय या दोन आमदारांना करावा लागणार आहे.

(Radhakrishna Vikhe Patil | Sharad Pawar | Vishaych Bhari)

हे विषयच भारी वाचलेस का भावा !


एकूणातच महाविकास आघाडी नगर लोकसभेसाठी कोणता उमेदवार देणार यावर इथली बरीच गणितं अवलंबून असतील. इथल्या सर्व आमदारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पार्श्वभूमी आहे, त्यामुळं अंतर्गत चर्चेतून क्रॉस वोटिंग झालं तर भाजप उमेदवाराला त्याचा फटका बसू शकतो एवढं नक्की. तूर्तास महाविकास आघाडीचा उमेदवार फिक्स होईपर्यंत सुजय विखेच इथले हॉट फेव्हरेट असतील हे खरं. तुम्हाला काय वाटतंय आमचे अंदाज बरोबर आहेत? की यापेक्षाही काही वेगळ्या शक्यता आहेत? नगर लोकसभेसाठी तुमची पसंती कुणाला? तुमची मतं कमेंट करून कळवा.

Sharad Pawar नगरच्या खासदारकीला Radhakrishna Vikhe Patil यांची अशी विकेट काढणार | Vishaych Bhari


Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇

https://www.facebook.com/vishaychbhari

https://www.facebook.com/aplavishaychbhari

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *