तंबाखूनं घात केला पण आर आर आबा माणूस भारी होता | R. R. Patil Biography in Marathi | Vishaych Bhari

२००५ साली कोल्हापूर, सांगली भागात महापूराचा धोका वाढला होता. अनेक कुटुंब उध्वस्त होण्याच्या मार्गावर होती. तेव्हा तत्कालीन कर्नाटक सरकारनं अलमट्टी धरणाचे दरवाजे उघडण्यास नकार दिला होता. तेव्हा महाराष्ट्रातील एका शांत आणि संयमी नेत्यानं कर्नाटक सरकारला उघड उघड धमकी दिली होती की “ जर कर्नाटक सरकारनं अलमट्टी धरणाचे दरवाजे उघडून कृष्णेच्या पाण्याला पुढं जाण्यासाठी वाट करून दिली नाही तर आम्ही आमच्या राज्यातील धरणांचे सगळे दरवाजे उघडून पाणी थेट कर्नाटकात घुसवू. ” ती धमकी मिळताच घाबरलेल्या कर्नाटक सरकारनं ताबडतोब अलमट्टी धरणाचे सर्व दरवाजे उघडत कृष्णेच्या पाण्याला वाट करून दिली आणि पूरग्रस्त भागातील पाणी ओसरून मोठा धोका टळला. थंड स्वभावानं कर्नाटक सरकारच्या पुंग्या टाईट करणाऱ्या त्या नेत्याचं नाव होतं रावसाहेब रामराव पाटील उर्फ आर आर पाटील आबा. आज दिवंगत नेते आर आर पाटील यांचा जन्मदिन. आबांच्या निधनाला जवळपास सात वर्षे उलटून गेलीयेत. पण आजही आबांचे अनेक किस्से पश्चिम महाराष्ट्रात रंगवून सांगितले जातात. आजच्या या लेखात आपण आबांचा राजकीय प्रवास थोडक्यात जाणून घेणारय..

( R. R. Patil Biography in Marathi | Vishaych Bhari )
16 ऑगस्ट 1957 साली सांगली जिल्ह्याच्या तासगाव तालुक्यातील अंजनी गावात आर आर पाटील यांचा जन्म झाला. घरात संपत्तीवरून झालेला वाद, त्यातून झालेल्या वाटण्या, वाटण्यातून मिळालेली ३ एकर जमीन, त्यासोबतच आलेली गरिबी, वडिलांना लागलेलं दारूचं व्यसन यामुळं आबांचं बालपण फारच हलाखीच्या परिस्थितीतून गेलं. बिकट आर्थिक परिस्थितीमुळं आबांना त्यांचं शालेय शिक्षण देखील कमवा आणि शिका या योजनेतून पूर्ण करावं लागलं. शाळेत असतानाचं आबांनी भाषणकला अवगत केली होती. त्याचा फायदा त्यांना पुढच्या काळात झाला. दरम्यान रोजगार हमी योजनेवर काम करत करत आबांनी दहावीला ७१ % गुण मिळवले आणि आबा सांगली केंद्रात प्रथम आले. तेव्हा आबांना सायन्सला ऍडमिशन घेऊन डॉक्टर किंवा इंजिनियर बनण्याची इच्छा होती पण कमवा शिका योजनेत रोज चार पाच तास काम करायला लागायचं. त्यामुळं सायन्सला ऍडमिशन घेतलं तर प्रॅक्टिकल्सचा टाईम कसा मॅनेज करायचा, त्यासाठी काम सोडावं लागेल, म्हणजे पुन्हा पैशांची अडचण म्हणून त्यांनी डॉक्टर, इंजिनियर बनण्याचा नाद सोडून दिला. मी कसा घडलो या पुस्तकात आबा लिहितात रोजगार हमीवर काम करताना आबांना पावणेदोन रुपये मिळायचे. तेव्हा तो मोबदला वाढावा म्हणून आबा व त्यांच्या सहकाऱ्यांनी आंदोलन केलं. त्या आंदोलनात भाषण करताना कॉलेजचे प्राचार्य पी. बी. पाटील यांनी आबांना पाहिलं. अन पुढं आबांच्या नेतृत्व, वक्तृत्व गुणांना पी बी पाटलांनीचं अधिक समृद्ध केलं. पुढे सांगलीतल्या शांतीनिकेतन महाविद्यालयातून आबांनी बीए आणि नंतर एलएलबीची ही डिग्री मिळवली.
( R. R. Patil Biography in Marathi | Vishaych Bhari )
त्याकाळी संत गाडगे महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, क्रांतीसिंह नाना पाटील, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांच्या विचारांनी आबा प्रभावित झाले होते. आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो अशी त्यांच्यात भावना निर्माण झाली अन त्यांनी स्थानिक राजकारणाकडं त्यांचा मोर्चा वळवला. सुरवातीला गरिब शेतकरी कुटुंबातल्या आबांमधील नेतृत्वगुण हेरले ते वसंतदादा पाटील यांनी. आबांची मनाला भिडणारी भाषणशैली, स्वच्छ प्रतिमा आणि समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द यामुळं वसंतदादांनी त्यांना संधी दिली. त्यांच्या साथीमुळं 1979 साली आर. आर. पाटील हे पहिल्यांदा सावळज मधून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले. पुढं 1979 ते 1990 पर्यंत ते जिल्हा परिषद सदस्यचं राहिले. पण त्याकाळात आबांनी सांगली भागात त्यांची राजकीय ताकद वाढवली होती. सातत्याने त्यांची शरद पवार यांच्याशीही जवळीक वाढत होती. याच राजकीय ताकदीचा अंदाज घेऊन 1990 साली त्यांनी पहिल्यांदा काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली अन तासगाव विधानसभेवर ते निवडून देखील आले. पुढं 1995 साली कॉंग्रेसच्या तिकिटावर दुसऱ्यांदा ते आमदार झाले. तेव्हा भाजप-शिवसेनेच युती सरकार सत्तेत होतं. त्याकाळी राजकीय आयुधांचा वापर करत आबांनी विधानसभेत सत्ताधारी भाजप-शिवसेनेला चांगलंच कोंडीत पकडलं होतं. तेव्हापासून शांत, संयमी आणि अभ्यासू नेता म्हणून त्यांची महाराष्ट्राला ओळख झाली होती. पुढं 1998 – 99 च्या सुमारास काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद झाला आणि शरद पवारांनी काँग्रेसला सोडचिट्टी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. तेव्हा शरद पवारांचे सगळ्यात विश्वासू नेते अशी आबांची छबी तयार झाली होती. दरम्यान आबांनीही काँग्रेसला राम राम करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर पुढं आबांनी १९९९, २००४, २००९ आणि २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत लागोपाठ विजय मिळवला. बरं त्याकाळात फक्त आमदार नाही तर राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री अशी काही महत्वाची पदेही त्यांनी भूषवली. आर. आर. पाटील यांना काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये सुरवातीला ग्रामविकास आणि पाणीपुरवठामंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती.

( R. R. Patil Biography in Marathi | Vishaych Bhari )
त्यावेळी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर संत गाडगे महाराज स्वच्छता अभियान यशस्वीपणे राबवून दाखवलं आणि एक कार्यक्षम नेता म्हणून राज्याच्या राजकारणात आपला ठसा उमटवला. 2003-04 च्या विधानसभा निवडणुकीनंतर दिवंगत नेते विलासराव देशमुखांकडं मुख्यमंत्री तर आबांकडे उपमुख्यमंत्री अन गृहमंत्री पदाची जबाबदारी सोपवली गेली. गृहमंत्री असताना आबांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेची वेगळी ओळख निर्माण केली. एकदा काय झालं, आर आर पाटील पुण्याच्या पोलीस सांस्कृतिक केंद्राचं उदघाटन करायला जात होते. तेव्हा एक भयानक बातमी त्यांच्या वाचनात आली. ती अशी की डान्सबारमध्ये उडवण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून एका मुलानं नशेच्या भरात स्वतःच्याच आईचा खून केला. ती बातमी ऐकून आबांचं मन सुन्न झालं.
आबा कार्यक्रमाच्या भाषणात म्हणाले “कला, करमणूक याला आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्वय पण आज डान्सबारसारखी संस्कृती जर मुलाला आईचा खून करण्यापर्यंत नेत असेल तर अशा गोष्टी महाराष्ट्रामध्ये ठेवायच्या का ?”
बरं आबा फक्त सवाल उपस्थित करून थांबले नाहीत तर त्यांनी सक्तीनं राज्यातले अनेक डान्सबार कायमचे बंद करून टाकले. पुढं गावागावात मिळणाऱ्या गावठी दारूमुळं अनेकांचे संसार उध्वस्त झाल्याच आबांच्या पाहण्यात आलं. मग काय, काय विपरीत परिणाम होईल याची धास्ती न बाळगता आबांनी थेट गावठी दारूवरही बंदी आणली. त्यांच्या गृहमंत्री कारकिर्दीतले हे दोन सगळ्यात क्रांतिकारी निर्णय होते त्यामुळं सत्याच्या आणि जनतेच्या हिताच्या बाजूनं उभे राहणारे आबा अशी लोकांच्यात त्यांची इमेज झाली. त्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी स्वच्छ ग्राम स्पर्धा, महात्मा गांधी तंटामुक्त अभियान, ग्रामीण भागातली कोट्यावधीची विकासकामं यामुळं आर आर पाटील घराघरात पोहोचले. एकदा एका महिलेने आबांना पत्र लिहिलं की गावानं आम्हाला सरपंच तर केलं पण आजही 15 ऑगस्टला झेंडा फडकावायला गावातली पुरुष मंडळीचं पुढाकार घेतात. तेव्हा आबांनी त्याबद्दलही कठोर भूमिका घेतली. ज्या गावात महिला सरपंचांना झेंडावंदन करू दिलं जात नाही त्या गावातील लोकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा आदेश त्यांनी दिला. कदाचित त्यानंतरच आर आर पाटील हे लोकांचे लाडके आबा म्हणून जास्त प्रसिद्ध झाले. पुढं तेलगी स्कॅम आणि Mpsc घोटाळ्याबाबत घेतलेली त्यांची आक्रमक भूमिका ही त्यावेळी चर्चेचा विषय ठरली होती. आबांनी पोलीस भरतीत घोटाळा करणाऱ्या अधिकाऱ्यांचं जाग्यावर निलंबन करून पोलीस भरतीत सुसूत्रता आणली. त्यामुळं योग्यता असणारी अनेक गरीब घरातली मुलं पोलीसांत भरती व्हायला मदत झाली. आबांनी गृहमंत्री असताना पोलिसांची डागाळलेली प्रतिमा दूर करण्याचाही प्रयत्न केला. आबांच्या त्या निर्णयामुळं आजही लोकं त्यांची आठवण काढतात. एवढच काय गडचिरोली या नक्षलग्रस्त भागाचं पालकत्व स्विकारण्यासारखे धाडसी निर्णयदेखील त्यांनी त्यांच्या कार्यकाळात घेतले. पण आबांची एक गोष्ट मात्र त्यांच्या जवळच्या लोकांना खूप खटकायची. अन ती म्हणजे त्यांचं तंबाखू खाण. आबांना तंबाखू सेवनाची भयंकर सवय होती. त्यांची ती सवय सुटावी म्हणून शरद पवार, अजित पवार, मंत्रिमंडळातील त्यांचे सहकारी, त्यांचे कार्यालयीन कर्मचारी आणि जनसंपर्क अधिकारी जयंत करणजावकर त्यांना वारंवार सांगत असायचे की, आबा, बस्स झाली तंबाखू. तुमचा रुमालही पिवळा झालाय आता. पण आबांची सवय काय सुटली नाही. त्याचंकाळात त्यांना अनेक आजारांनी ग्रासलं होतं पण कामाच्या व्यापात आबा आरोग्याकडं साफ दुर्लक्ष करायचे. त्यांचे अनेक सहकारी आजही त्यांची ही आठवण सांगतात.
आबांबद्दल असाच अजून एक इंटरेस्टिंग किस्सा घडला होता. त्याचं झालं असं कि आबांची कार्यकुशल इमेज ब्रेक करण्यासाठी त्यावेळी अनेकजण गळ लावून बसलेले होते. त्याचं झालं असं की आबा एकदा त्यांच्या चित्रकुट बंगल्यात जनता दरबार भरवून लोकांची गाऱ्हाणी ऐकून घेत होते. तेव्हढ्यात तिथं एक बारबालेसारखी भडक मेकअप केलेली तरुणी आली आणि ती काहीतरी कारण काढून आबांच्या अंगचटीला येण्याचा प्रयत्न करू लागली. आबांना ती गोष्ट लक्षात आल्यावर आबांनी तिला खडसावलं आणि समोर नजर टाकली तर त्यांना त्या तरुणीसोबत आलेला माणूस काहीतरी विचित्र हालचाली करतोय असं दिसलं. आबांना शंका आली आणि त्यांनी पोलिसांनी बोलावून दोघांना ताब्यात घ्यायला सांगितलं. तेव्हा समजलं की ती मुलगी बारबाला नसून एका इंग्रजी पेपरची पत्रकार होती आणि ते दोघे आबांचं स्टिंग ऑपरेशन करायला छुपा कॅमेरा घेऊन तिथं आले होते. चौकशी झाल्यानंतर त्या दोघांनाही अटक करण्यात आली होती. पण एक प्रकरण आबांच्या खूप अंगलट आलं. अन ते म्हणजे 26/11/2008 साली मुंबईवर जो दहशतवादी हल्ला झाला त्यावेळी त्यांनी केलेलं विधानाचं. म्हणजे मुंबई हल्ल्यानंतर त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडालेला होता. पण आबांनी एका ठिकाणी त्या हल्ल्याचा उल्लेख करताना बडी बडी शहरोमें ऐसी छोटी छोटी बाते होती रहती असं असंवेदनशील विधान केलं आणि त्यांना लोकांच्या रोषाला चांगलंच सामोरं जावं लागलं. इतकं की त्यावेळचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख अन गृहमंत्री असलेल्या आबांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. खुद्द शरद पवार यांनीही त्यावेळी त्यांच्या विधानाचा जाहीर निषेध केला होता. पण त्या विधानानंतरही लोकांच्यात असणारी त्यांच्या चांगल्या कामांची इमेज पुसली गेली नव्हती. 2009 साली आर आर पाटील पुन्हा एकदा राज्याचे गृहमंत्री झाले.
तळागाळातल्या कार्यकर्त्यांशी जवळीक वाढवणं, त्याला नावानिशी हाक मारणं यांसारख्या घटनांमुळं आबा कार्यकर्त्यांमध्ये खूप प्रसिद्ध झाले होते. याबाबतीत त्यांनी शरद पवारांचा गुण घेतला होता. असो, पण या सगळ्या कामांच्या गदारोळात आबांची अजून एक चूक झाली ती म्हणजे आबांनी त्यांच्या आरोग्याकडं साफ दुर्लक्ष केलं होतं. खरंतर त्याचा त्यांना आणि संपूर्ण महाराष्ट्रालाही जबर फटका बसला. तंबाखूच्या सेवनामुळं त्यांना कॅन्सरसारख्या भयानक आजारानं गाठलं आणि तिथून आबांची तब्येत सातत्यानं बिघडत गेली. शेवटच्या काळात म्हणजे 2015 च्या दरम्यान खचलेल्या आर आर पाटील यांना मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं.आणि तिथं उपचारादरम्यानच त्यांना एकदा हृदयविकाराचा झटकाही येऊन गेला. पुढं त्यांचे शरीराचे एक एक अवयव निकामी होत गेले आणि दुर्दैवानं कॅन्सरशी लढताना आबांचं निधन झालं. त्यानंतर आबांच्या अंजनी या जन्मगावी हेलिपॅड ग्राऊंडवर त्यांच्या पार्थिववावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अनेक केंद्रीय आणि राज्य मंत्रिमंडळातील लोकं त्यांच्या अंत्यविधीला हजर राहिली होती. निधनावेळी आबांचं वय केवळ 58 वर्षाचं होतं. आबांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक मोठमोठाली पदे भूषवली. परंतु स्वतःच्या यशाला अहंकाराचा कधी स्पर्श होऊ दिला नाही. त्यांना जवळून जाणणारे लोक सांगतात आबांनी पोटात एक आणि ओठात एक असे वर्तन कधीचं केलं नाही. आबा जे काही त्यांच्या मनात असेल ते बोलून दाखवायचे. आबा सत्तेची एक एक पायरी चढत गेले पण त्यांच्या कुटुंबानं आबांप्रमाणेच आपला साधेपणा टिकवून ठेवला. आबा हयात होते तोवर त्यांच्या पत्नी सुमन पाटील, मुलगा रोहित आणि मुलगी स्मिता पाटील यांना त्यांनी राजकारणापासून लांब ठेवलं. पण आता आबांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव रोहित पाटील सांगलीमध्ये चांगलेचं ऍक्टिव्ह झालेत.

आबांसारखंच शांत संयमी आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून त्यांची घोडदौड सुरूय. मागं पार पडलेल्या कवठेमहांकाळ नगरपंचायती निवडणुकीत रोहित आर आर पाटील यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं दणदणीत विजय मिळवला होता. 17 पैकी 10 जागांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांचा विजय झाला होता. अजित दादा यांनी राष्ट्रवादीत अंतर्गत बंड केलंय पण आज रोहित पाटील यांनी शरद पवार यांच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतल्याचं समजतंय. आर आर आबांच्या पत्नी सुमन पाटील या तासगावच्या सध्याच्या आमदार आहेत. रोहित पाटील आज आबांचा राजकीय वारसा समर्थपणे पुढे नेताना दिसतायत. तेच आबांचे पुढील उत्तराधिकारी आहेत. म्हणून तर त्यांनी सांगलीत खासदार संजय पाटील यांनाही गेल्या काही काळात टफ फाईट दिलीय. मतदारसंघातले लोक म्हणतात की रोहित पाटील यांच्यात त्यांना आबांची छबी दिसतेय. पण काहीही असो, सध्याच्या घडीला आर आर आबांसारखा दुरदृष्टीचा नेता अजून असायला हवा होता अशीच लोकभावनाय. त्यांचा शांत संयमी स्वभाव आणि लोकांना साद घालणारी त्यांची भाषणकला महाराष्ट्र कायम आपल्या स्मरणात ठेवेल, यात शंका नाही. असो,तर एकूण असा होता आर आर पाटील उर्फ आबांचा संपूर्ण राजकीय प्रवास. तुम्हाला मात्र आर आर पाटील यांचे कोणते निर्णय आवडले होते, या नेत्याबद्दल तुमच्या मनातील भावना काय आहेत, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.
Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇
https://www.facebook.com/aplavishaychbhari
Leave a Reply