थेट पांडुरंगाच्या गाभाऱ्यापर्यंत नेणाऱ्या वारीची संपूर्ण गोष्ट

राम कृष्ण हरी माऊली. आषाढी वारी म्हणजे वारकऱ्यांसाठी दिवाळी दसऱ्यापेक्षा मोठा सण. खरं तर त्याबद्दल मी सांगणं अन तुम्ही ऐकणं यापेक्षा वारीचा माहोल प्रत्यक्ष अनुभवणं हाच वारीचा महिमा जाणून घेण्याचा सर्वोत्तम मार्गय. समता, बंधुता, प्रेम, सहिष्णूता, सेवाभाव अशी मानवतावादी मूल्ये जपणाऱ्या या वारीला जवळपास 800 वर्षाची परंपराय.

मध्यंतरी मुघल, इंग्रज या परप्रांतीय सत्ताधीशांच्या काळात वारीच्या सुवर्ण परंपरेला तडा गेला होता पण पुन्हा एकदा हैबतबाबा आरफळकरांच्या पुढाकारामुळं वारी पहिल्यासारखी त्याचं भक्तीभावानं सुरू झाली अन आजपर्यंत तो वैष्णवांचा सोहळा अखंडरित्या सुरूचय. यंदा जून महिन्याच्या 10 तारखेला देहूतून जगद्गुरू तुकाराम महाराजांची आणि 11 जूनला आळंदीच्या ज्ञानेश्वर माऊलींची पालखी विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूराच्या दिशेने निघाली. पण महत्वाचा प्रश्न हा आहे की एवढा लाखों लोकांचा जनसमुदाय ऊन वारा पाऊस यांची काळजी न करता, अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने शेकडो किलोमीटरचा हा प्रवास पायी चालत कसा पार करतो. वारकऱ्यांच्या वारीचं नियोजन इतकं परफेक्ट कसं काय असतं. नेमकं वारी करणं म्हणजे काय या अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण या ब्लॉगमधून जाणून घेणारंय.

मंडळी आता आषाढी वारी कधी आणि कशी सुरु झाली, याबद्दल थोडक्यात ऐकून वारीच्या मुख्य नियोजनावर लक्ष केंद्रित करूयात. तर ज्ञानेश्वर महाराज यांचे वडील विठ्ठलपंत कुलकर्णी हे आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूर येथे पायी वारी करीत होते असे संदर्भ मिळतात. त्यांच्यानंतर माऊली ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांनी वारीची परंपरा सुरू ठेवली. पुढं नामदेवराय आणि एकनाथ महाराज यांच्याकडून ती वैष्णव परंपरा तुकोबारायांपर्यंत येऊन ठेपली. ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस या उक्तीप्रमाण तुकोबारायांनी माऊलींच्या पाऊलावर पाऊल ठेवून सर्व जात धर्म पंथ यांना एकत्रित बांधून पंढरीची वारी सुरु ठेवली. त्यांच्यानंतर परकीय सत्तांच्या गदारोळात काही काळ वारीला फटका बसला. पण तुकोबारायांचे वंशज नारायणबुवांनी पुन्हा एकदा वारीला गतवैभव प्राप्त करून दिलं. त्यांनी देहू येथून तुकोबारायांच्या पादुका पालखीत ठेवून वारी करण्याची नवी परंपरा सुरू केली. मात्र पुढं त्यांच्या कुटुंबात पालखीच्या मानावरून भावकीचा गदारोळ वाढला. ते साताऱ्याच्या हैबतबाबांना पाहवलं नाही. म्हणून त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखीत घालून आळंदी येथून पंढरीला जाणारी दिंडी सुरू केली केली.

त्या वारीसाठी तत्कालीन संस्थानाचे राजे व पेशवे मदत करीत असायचे. खास करून अंकलीचे शितोळे सरकार, ग्वाल्हेरचे शिंदे सरकार आणि औंधचे पंतप्रतिनिधी यांनी भरभरून मदत केली. ज्ञानदेवांच्या पालखी सोहळ्याला पूर्वी हत्ती, घोडे असा राजेशाही लवाजमा शितोळे सरकार आणि औंधच्या श्रीमंत पंतप्रतिनिधीकडून येत असायचा. ग्वाल्हेरचे शिंदे सरकार खाण्यापिण्याची व्यवस्था करायचे. पुढे ब्रिटिश कंपनी सरकारचा अंमल सुरू झाल्यावरही खर्चाची तरतूद सरकारकडून होऊ लागली. त्या सरकारने इ.स. १८५२ मध्ये पंचकमिटी स्थापन करून ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीची व्यवस्था केली अन आजही तो सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडतोय. हळूहळू त्या दिंडीमध्ये शेकडो संताच्या नवनवीन पालख्या सामील झाल्या आणि वारी सोहळ्याला वैश्विक स्वरूप प्राप्त झालं. आज फक्त महाराष्ट्रातले नाही तर परराज्यातले आणि परदेशातले ही लोक वारीला हजेरी लावताना दिसतात. इतकी वारी आता लोकांना जीवाभावाची वाटू लागलीये.

आता आपण वारीच्या एकूण नियोजनाची माहिती घेऊ. तर सांगायचा मुद्दा म्हणजे, देहू आणि आळंदीच्या मुख्य पालखीसोबतचं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जवळपास 400 च्या वर लहान मोठ्या दिंड्या सहभागी होतात. त्यापैकी एकट्या 250 ते 280 दिंड्या ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी पाठोपाठ चालत असतात. तर तुकाराम महाराजांच्या पालखीमागून शे दीडशे दिंड्या विठू नामाचा गजर करत चालत असतात. त्यांची एकूण संख्या जवळपास पाच ते सहा लाखाच्या घरात असते.

या दोन मुख्य पालख्यांचा सोहळा टीव्ही चॅनेलच्या माध्यमातून लोकांना दिसतो पण त्यांच्यासोबत येणाऱ्या इतर संताच्या पालख्यांबद्दल मात्र लोकांना फारशी कल्पना नसते. अगदी ढोबळमानाने नावं सांगायची झालीचं तर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून संत निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई, जनार्दनस्वामी, एकनाथ महाराज, नामदेव महाराज, श्री बाबाजी चैतन्य महाराज, गजानन महाराज, साईबाबा, गाडगे महाराज, समर्थ रामदास स्वामी, जगनाडे महाराज, गवरशेटवाणी, निळोबाराय, दामाजी, सावता माळी, चोखामेळा, गोरा कुंभार, बंका, वेणीराम महाराज, गोमेन, लिंबराज, महिपती महाराज, गोंदवलेकर महाराज, यशवंत महाराज यांसारख्या संतांच्या शेकडो पालख्या पायी वारीसाठी निघतात.

सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे वारीमध्ये हिंदूसोबत जैन, मुस्लिम, पारशी, ख्रिश्चन समाजाचे लोक हिरीरीने भाग घेतात. एवढंच काय संत तुकारामांच्या पालखीला चकाकी देण्याचं कामही देहूतील मुस्लिम समाजचे लोक करतात. ही समतेची ताकदच वारकऱ्यांना बळ देते. आळंदी आणि देहू या दोन्ही मुख्य पालख्यांचे रथ ओढण्यासाठी दरवर्षी नवीन बैलजोडी शेतकऱ्यांकडून अर्पण केली जाते. ज्ञानोबा माऊलीआणि तुकाराम महाराज यांची पालखी ओढण्याचा मान आपल्या बैलजोडीला मिळावा म्हणून शेतकरी वर्षभर नोंदणी करत असतात. नोंदणी झालेल्या विविध कुटुंबातील बैल जोडीचं परीक्षण करून उत्तम शरीरयष्टीच्या दोन बैलजोड्या निवडल्या जातात. पहिल्या दिवशीच्या बैलजोडीला एक दिवसाचा पूर्ण आराम मिळावा म्हणून दोन बैलजोड्या असतात. ही निवड आळंदी संस्थानचे विश्वस्त, अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या मर्जीने केली जाते. माउलींच्या पालखी सोहळ्याला बैलजोडी देण्याचा मान हा आळंदी गावातील कुऱ्हाडे, घुंडरे, भोसले, वरखडे, वहिले, रानवडे या कुटुंबांनाच मिळतो. आळंदी सोडून बाहेरील ग्रामस्थांना हा मान आजवर दिला गेलेला नाही. कारण, ही प्रथा खूप काळापासून सुरू आहे असं बैलजोडी समितीचे अध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे यांनी सांगतात. यंदा चांदीच्या रथाला बैलजोडी देण्याचा मान आळंदीतील तुळशीराम नारायण भोसले आणि रोहित चंद्रकांत भोसले यांच्या कुटुंबाला मिळालाय. अशीच सेम पद्धत तुकाराम महाराजांच्या पालखीसाठी ही असते. पण तिथं फक्त देहू गावातीलच बैलं असावीत असा नियम नाही. यंदा देहूत एकूण 18 बैलजोड्यांचे अर्ज आले होते. त्यापैकी देहूतील सुरेश मोरे यांची सोन्या – खासदार आणि पिंपळे सौदागरच्या महेंद्र झिंझुर्डे यांची राजा – सोन्या या बैलजोडीची निवड झालेलीय. ही निवड श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष, विश्वस्त आणि सात वारकरी मिळून करतात.

ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीरथा पुढे माऊलींचा अश्व ही असतो. त्या अश्वाला वारकऱ्यांमध्ये विशेष आदराचं स्थान दिलं गेलंय. कारण त्या घोड्यावर स्वतः ज्ञानेश्वर माऊली स्वार होऊन पंढरीला येतात अशी वारकऱ्यांची श्रद्धाय.

देहू आणि आळंदी या दोन्ही पालखीमागून चालणाऱ्या बहुतांश दिंड्यांना अनुक्रमांक दिलेले असतात. त्या क्रमांकानुसारच दिंड्या एकामागोमाग एक चालत राहतात. आता त्या दिंड्याचं स्वरूप नेमकं कसं असतं तर ऐका, दिंडी’ म्हणजे ठराविक वारकऱ्यांचा संच. एका दिंडीत किती वारकरी असावेत याविषयी काहीही ठोस नियम नाही. 15-20 वारकऱ्यांपासून अगदी 1500-2000 वारकरी एका दिंडीत असू शकतात. मात्र एका दिंडीत एकच वीणाधारक वारकरी असतो. थोडक्यात ‘एक वीणा एक दिंडी’ असं चित्र असतं. दिंडीच्या सर्वात पुढं हातात दंड घेतलेले लाल कपड्यातले चोपदार असतात. हे चोपदार म्हणजे अशी व्यक्ती जी दिंडीचा नियंत्रक असतो. म्हणजे दिवसभराची वाटचाल, सूर्यास्ताच्या वेळी माऊलीची आरती, टाळमृंदगाचा जयघोष हे सगळं चोपदारांच्या दंडाचा आदेश मानतात. चोपदारांनी आपला दंड उंच केला की एका क्षणात सर्व टाळांचा आवाज बंद होतो. पण एखाद्या दिंडीची काही तक्रार असेल तर मात्र ते आपली वाद्ये वाजविणे चालूच ठेवतात. तेव्हा स्वत: चोपदार त्यांच्याजवळ जाऊन आणि त्यांची तक्रार ऐकून योग्य तो निर्णय देतात. तो त्या दिंडी मालकाला मान्यही होतो. तसंच दिंडीमध्ये चालताना कुणाची चोरी झाली किंवा मोठा काही वाद झाला, म्हणजे एक तर असं कधी होतं नाही पण त्यातूनही घटना घडलीचं तर त्याचा न्यायनिवाडा करण्याचे अधिकारही चोपदाराला असतात.

तर या चोपदारांच्या पाठीमागं भगवी पताका हाती घेतलेले काही वारकरी, त्यामागे टाळ वाजविणारे टाळकरी, मध्ये मृदुंगवादक, त्यामागे गळयात वीणा धारण केलेला वीणेकरी अन त्यांच्या पाठीमागे डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या किंवा माऊलीचा जयघोष करत चालणाऱ्या अन्य महिला वारकरी, अशी सर्वसाधारण एका दिंडीची रचना असते.

प्रत्येक दिंडीतील वीणाधारक वारकरी प्रमुख असून त्यांच्या आदेशानुसार पायी सोहळ्यात पारंपरिक अभंग, भजनं गायली जातात. त्यामध्ये भारूड, गवळण भजन प्रकारांचाही समावेश असतो. दररोज 20 ते 25 किलोमीटर अंतर पार करावयाचे असल्यामुळं वारकरी पहाटे दोन वाजल्यापासून उठून तयारी करतात. लवकर उठून, अंघोळ, देवपूजा, चहा, नाश्ता झाल्यानंतर मार्गक्रमण सुरु करतात. दिंडीचा मुक्काम रस्त्यात येणाऱ्या काही गावांमध्ये केला जातो. संबंधित गावचे गावकरीही मोठ्या भक्तीभावाने वारकऱ्यांची सेवा करतात. न सांगता त्यांच्या चहापाण्याची अन नाश्ता जेवणाची सोय करतात. वारकऱ्यांची सोय करणे म्हणजेच विठ्ठलाची सेवा होय अशी त्यांची भावना असते. वारी जातधर्म गरीब श्रीमंत या भेदभावाच्या पलीकडे गेलेली असते. थांबलेल्या ठिकाणी त्या त्या फडातले लोक रात्रीच्या मुक्काम ठिकाणी कीर्तन, भजन, भारूड, गवळणी सादर करतात. असा त्यांचा अविरत भगवंताचं नामस्मरण करत प्रवास सुरू असतो.

दरम्यान विविध सरकारी, सामाजिक आणि औद्योगिक संस्था वारकऱ्यांचा प्रवास सुखकर व्हावा, त्यांच्या खाण्यापिण्याची सोय व्हावी, त्यांचं आरोग्य ठीक राहावं यासाठी पुढाकार घेतात. महाराष्ट्र शासनातर्फे रस्त्यांची स्वछता, वैद्यकीय सेवा, पिण्याचे पाणी आणि प्रवासाची व्यवस्था केली जाते. रस्त्याने चालताना हमखास त्या त्या भागातील ऍम्ब्युलन्स वैद्यकीय सेवेसाठी वारकऱ्यांसाठी हजर असतात. अगदी रक्त लघवी तपासणीपासून नेत्रतपासणीपर्यंत बऱ्याच सुविधा या संस्था देत असतात. समस्त वारकरी फडकरी दिंडी समाज संघटना, वारकरी पाईक संघ, महाराष्ट्र वारकरी महामंडळ, वारकरी संप्रदाय युवा मंच, महाराष्ट्र राज्य आम्ही वारकरी वारकरी सेवा संघ, अखिल भारतीय वारकरी मंडळ, कर्नाटक वारकरी संस्था, कुंभमेळा वारकरी आखाडा परिषद, जागतिक वारकरी शिखर परिषद, तुकाराम महाराज पालखी सोहळा संस्था दिंडी, वारकरी – फडकरी संघटना, देहू गाथा मंदिर संस्था, फडकरी-दिंडीकरी संघ, राष्ट्रीय वारकरी सेना, वारकरी प्रबोधन महासमिती, ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळा – दिंडी समाज, ज्ञानेश्‍वर महाराज संस्थान, सद्गुरू सेवा समिती पंढरपूर, धर्मसंस्थापना ग्रुप मुंबई, सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था अशा शेकडो संस्था वारकऱ्यांच्या सेवेसाठी वारीमार्गात उभ्या असतात. बरं गुप्तपणे दान देणाऱ्यांची तर गिनतीचं नसते. वाखरी आणि पंढरपूरात तर वारकऱ्यांसाठी पंढरपूर प्रशासन आणि औद्योगिक संस्थाकडून एकत्रितपणे मोफत राहण्याचीही व्यवस्था केली जाते. त्याठिकाणी तंबू, मलमूत्र केंद्र, पिण्याच्या पाण्याचे टँकर यांची सोय केलेली असते.

असो, आता आपण ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांच्या पालखीचा प्रवास आणि मुक्काम नेमक्या कोणत्या मार्गाने होतो त्याची माहिती घेऊ. सुरवातीला आपण तुकाराम महाराजांच्या पालखीबद्दल जाणून घेऊ. माऊली सदर व्हिडीओत संदर्भ यावर्षीच्या तारखांचे दिले असले तरी दरवर्षी सांगितलेल्या मार्गानेच आणि  विश्रांतीच्या ठिकाणावरून दिंडी पुढं सरकते. दरवर्षी ज्येष्ठ वद्य सप्तमीला देहूत पालखी सोहळ्याचं प्रस्थान होतं. सुरवात होते. जसं यावर्षी 10 जूनला झालं तसं. पुढं देहूमध्येच इनामदार वाड्यात पालखीचा पहिला मुक्काम होतो. त्यानंतर पालखी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास देहूतून बाहेर पडते आणि अनगडशाहबाबांच्या समाधीस्थळाजवळ त्यादिवशीचा पहिला विसावा घेते. त्यानंतर चिंचोली इथे पादुकांची आरती होते आणि नंतर थोडं मार्गाक्रमण करून पालखी निगडीमध्ये जेवण करण्यासाठी थांबवली जाते. ज्येष्ठ वद्य अष्टमीला पालखी आकुर्डीच्या विठ्ठल मंदिरात रात्रीच्या मुक्कामाला थांबते. ज्येष्ठ वद्य नवमीला पुन्हा पालखी आकुर्डीहून निघते आणि त्यादिवशीचा पहिला विसावा श्री विठ्ठलनगरच्या एच ए कॉलनीत घेते. पुढं कासारवाडीमध्ये दुसरा थांबा आणि नंतर दुपारच्या जेवणासाठी दापोडीमध्ये थांबते. तिथून पुढं दुसऱ्या विसाव्यासाठी शिवाजीनगर, संत तुकाराम महाराज पादुका मंदिर, फर्गयुसन कॉलेज रोड करत रात्री मुक्कामासाठी निवडुंग विठ्ठल मंदिर नाना पेठ येथे थांबते. ज्येष्ठ वद्य दशमीला पुन्हा तिथून संपूर्ण पूणे शहरातून ठिकठिकाणी थांबा घेत पालखीचा प्रवास सुरू राहतो आणि रात्री पुन्हा निवडुंग विठ्ठल मंदिर नाना पेठ येथेच पालखी मुक्कामासाठी परतते. दरम्यान पुण्याचे लोक पालखी सोहळ्यासाठी शक्य असेल ती सगळी मदत करतात. पुण्यातून काही दिंड्या पालखीमध्ये सहभागी होतात. ज्येष्ठ वद्य एकादशीला निवडुंग विठ्ठल मंदिरातून पालखी पुढं सरकते आणि भैरोबा नाला येथे त्यादिवशीचा पहिला विसावा घेते. पुढं हडपसरमध्ये जेवण करून दुसऱ्या विसाव्यासाठी मांजरी फार्म, लोणी काळभोर रेल्वे स्टेशन करत रात्री मुक्कामाला लोणी काळभोरच्या विठ्ठल मंदिरात थांबते. ज्येष्ठ वद्य द्वादिशीला पालखी तिथून पुढच्या मार्गाला लागते. पुढं त्यादिवशीचा पहिला विसावा कुंजीरवाडी फाटा, जेवण उरुळी कांचन, दुसरा विसावा जावजी बुवाची वाडी आणि रात्रीचा मुक्काम यवतच्या भैरवनाथ मंदिरात करते. ज्येष्ठ वद्य त्रयोदिशीला यवतहून निघते ती थेट दुपारी जेवणालाचं भंडगाव येथे थांबते. पुढं केडगाव चौफुला येथे एक विसावा आणि रात्रीचा मुक्काम श्री विठ्ठल मंदिर वरवंड येथे थांबते. ज्येष्ठ वद्य चतुर्दशीला वरवंड येथून प्रस्थान करते. पुढं त्यादिवशीचा पहिला विसावा भागवत वस्ती, जेवण पाटसमध्ये, दुसऱ्या विसाव्यावेळी रोटी, हिंगणेवाडा, वासुंदे, खराडवाडी या चार ठिकाणी थांबून रात्री मुक्कामाला उंडवडी गवळ्याची येथे पोहोचते.

पुढ आषाढ शुद्ध पंधरावडा सुरू होतो. त्या पंधरवड्याच्या प्रतिपदेला पालखी उंडवडी गवळ्याची इथून निघते. त्यादिवशीचा पहिला विसावा उंडवडी पठार, दुपारचं जेवण बऱ्हाणपूर, दुसरा विसावा मोरेवाडी आणि सराफ पेट्रोल पम्प बारामती आणि मुक्कामासाठी बारामती सांस्कृतिक भवन याठिकाणी थांबते. आषाढ शुद्ध द्वितीयेला पालखी मुक्कामाहून निघते. त्यानंतर मोतीबागमध्ये थांबते. पुढचा थांबा पिंपळी ग्रेप लिमिटेड येथे, दुपारचं जेवण काटेवाडीमध्ये, पुढचा विसावा भवानीनगर साखर कारखाना आणि मुक्काम सणसरच्या मारुती मंदिरात होतो. आषाढ शुद्ध तृतीयेला पालखी पुढं सरकते अन एक महत्वाचा सोहळ्यासाठी बेलवडी येथे पोहोचते. तो महत्वाचा सोहळा म्हणजे रिंगण.

आडवे, गोल आणि उभे अशा तीन पद्धतीचे रिंगण सोहळे वारीदरम्यान पार पडतात. त्यामध्ये तुकारामांच्या पालखीचं रिंगण आणि ज्ञानेश्वरांच्या पालखीचं रिंगण वेगवेगळ्या ठिकाणी पार पडतं. आडव्या रिंगणात वारकरी आडव्या रांगेत, उभ्या रिंगणात उभ्या रांगेत आणि गोल रिंगणावेळी वारकरी गोल रिंगण करून उभे राहतात. यामध्ये चोपदारांचा रोल खूप महत्वाचा असतो. कारण रिंगणाची विशिष्ट स्वरूपाची रचना त्यांच्याचं आदेशाने होते. रिंगणात वारकरी उभे राहिल्यानंतर माऊलीच्या पालखीपुढे चालणारा माऊलीचा अश्व आणि दुसरा शितोळे सरकार यांचा मानाचा अश्व यांच्या साहाय्याने रिंगण सोहळा पार पडतो. माऊलींचा अश्व मोकळा असतो व तो पुढे पळत राहतो. त्यामागे स्वार असलेला अश्व धावतो. माऊली अश्व रिंगणात एक-दोन वेढे काढतो, आणि थांबतो. मग, स्वार असलेला अश्व त्यापुढे जातो आणि रिंगण पूर्ण होते. ‘पुढं माऊली.. माऊली’चा जयघोष होतो आणि दोन्ही अश्व माऊलींच्या पालखीजवळ जातात आणि रिंगण संपते. त्यानंतर चोपदार सर्व दिंड्यांना उडीच्या खेळासाठी निमंत्रण देतात. माऊलींच्या पालखीच्या सभोवताली घड्याळाच्या काट्याप्रमाणे ओळी करून टाळकरी उभे राहतात. बाहेरच्या बाजूला गोलाकार सर्व मृदंगधारक, विणेकरी आणि झेंडेकरी असतात. टाळ-मृदंगाची जुगलबंदी सुरू होते. चोपदार बंधू चार ठिकाणी उभे राहून सूचना देतात. त्यावर टाळकरी ठेका धरतात. झोपून, गुडघे टेकून, मागे-पुढे तोंड करून टाळकरी बेफाम होऊन नाचतात. अर्धा तास खेळ रंगतो. ‘तुका म्हणे वृद्ध होती तरुण’ अशी परिस्थिती असते. शेवटी चोपदार चोप वर करून उडी मारतात. मग, उडीचे खेळ संपतात. त्यानंतर सर्वजण लोटांग घालून नमस्कार करतात. यामागे संतांची चरणधूळ माथी लागावी हा उद्देश असतो. तुकाराम महाराजांच्या रिंगणाचा पण असाच नयनरम्य सोहळा पाहायला मिळतो. पालखीचं स्वागत केल्यानंतर सोहळ्यातील अश्वाचं पूजन केलं जातं. त्यानंतर पालखी तळावर संत तुकाराम महारांजाच्या पादुका ठेवून रिंगण सोहळ्याला सुरवात होते. पताकावाले देहभान विसरुन रिंगणाला फेरी मारतात. त्यानंतर मानाच्या मेंढ्यांचं रिंगण पार पडतं. उंच उंच भगव्या पताका गगनाशी भिडतात. डोक्यावरती तुळस व पाण्याची कळशी घेऊन महिला रिंगण सोहळ्याला फेऱ्या मारतात. सगळे विणेकरी, टाळ-मृंदुग वाजवणारे वारकरी देहभान हरपून रिंगण सोहळ्यात धावतात. त्याचवेळी दिंड्यांचे भजन सुरू होतं. विठ्ठलाच्या गजरात माहोल रंगून जातो. पुढं अश्व रिंगण सोहळ्याला पाच फेऱ्या मारतात आणि रिंगण सोहळा पूर्ण होतो. रिंगण झाल्यानंतर वारकरी रिंगणात धावलेल्या अश्वाचं दर्शन घेतात आणि त्याने तुडवलेली माती तुकाराम महाराजांचा आशीर्वाद म्हणून कपाळी लावतात. तर अशा पद्धतीनं दोन्ही पालख्यांचे रिंगण सोहळे पार पडतात.

दरम्यान तुकाराम महाराजांच्या पालखीचा रिंगण सोहळा पार पडला की पुढं बेलवाडीतच दुपारच जेवण उरकून पालखी ल्हासुर्णे जंक्शन करत रात्रीच्या मुक्कामासाठी अंथुरणे निमगाव केतकी इथं पोहोचते. आषाढ शुद्ध चतुर्थीला दुपारी तरंगवाडी केनोलमार्गे विसावा इंदापूरला गोल रिंगण सोहळ्यासाठी पोहोचते.

तिथून पुढं आषाढ शुद्ध पंचमीला पालखी इंदापूरातून निघते. नंतर गोकुळीचा वाडा इथं विसावा, बावडा इथं जेवण आणि रात्री मुक्कामासाठी सराटीला जाऊन पोहोचते. आषाढ शुद्ध षष्ठीला अकलूजच्या माने विद्यालयात पालखी रिंगणासाठी पोहोचते आणि तिथून थेट अकलूजला रात्रीच्या मुक्कामासाठी येते. त्यानंतर आषाढ शुद्ध सप्तमीला पुन्हा सकाळी वडापुरीच्या मानेनगरमध्ये रिंगण सोहळा पार पडतो. तिथून पुढं पालखी पायरीचा पूल, कदम वस्ती, शिरपूर साखर कारखाना करत बोरगावला मुक्कामी येते. आषाढ शुद्ध अष्टमीला पालखी बोरगावातून निघते आणि मलखांबी जेवणासाठी थांबते. त्यानंतर तोंडले बोन्डले धावा, टप्पा पार करून पिराची कुरोली गायरान येथे मुक्कामासाठी पोहोचते. आषाढ शुद्ध नवमीला बाजीराव विहीर इथं उभे रिंगण सोहळा पार पडतो. त्यानंतर पालखी वाखरी तळ येथेचं मुक्काम करते. आषाढ शुद्ध दशमीला वाखरी येथेचं पादुकांचं पूजन आरती होऊन आणखी एक उभे रिंगण सोहळा साजरा केला जातो. पुढं रिंगण सोहळ्यानंतर पालखी श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी पोहोचते आणि वारकऱ्यांना आभाळ ठेंगण होतं. पुढ आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी पालखीची नगर प्रदिक्षणा होते, वारकरी चंद्रभागेत स्नान करतात अन फायनली तुकाराम महाराज आणि विठ्ठल माऊलीची भेट होते. पुढं ३ जुलैपर्यंत पालखी पंढरपूरातच मुक्कामी असेल आणि विठ्ठल- रुक्मिणीभेटीनंतर त्याच दिवशी पालखीचा परतीचा प्रवास वाखरी येथून सुरू होतो.

आता आपण ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा रूट, विश्रांतीची ठिकाण जाणून घेऊ. तर ज्येष्ठ वद्य अष्टमी म्हणजे तुकाराम महाराजांची पालखी निघाल्यानंतर बरोबर एक दिवसांनी ज्ञानोबांची पालखी आळंदीयेथून प्रस्थान करते. दिवसभर प्रवास करून रात्री आळंदीच्या गांधीवाडा येथे मुक्कामासाठी थांबते. ज्येष्ठ वद्य नवमीला आळंदीतून पालखी निघाल्यानंतर थोरल्या पादुकांची आरती होते. पुढं भोसरी फाटा इथे एक थांबा देऊन पालखी जेवण करण्यासाठी फुलेनगर येथे थांबते. त्यानंतर संगमवाडी करून पालखी विठोबा मंदिर भवानी पेठ पुणे येथे मुक्कामी थांबते. ज्येष्ठ वद्य दशमीला पालखी पुण्यातील मुख्य शहरातून मार्गाक्रमण करते. पुण्याचे भाविक मोठ्या भक्तीभावानं दर्शन घेतात. त्यानंतर पालखी पुन्हा पालखी विठोबा मंदिर भवानी पेठ पुणे येथे मुक्कामी माघारी येते. ज्येष्ठ वद्य एकादशीला पालखी पुण्यातून बाहेर पडण्यासाठी सज्ज होते. पुढच्या प्रवासात पालखीची शिंदे छत्री येथे आरती होते, दुपारचं जेवण  हडपसरमध्ये, पुढं दुसरी विश्रांती उरुळी देवाची, वडकी नाला, झेंडेवाडी येथे होते आणि रात्री पालखी सासवडमध्ये मुक्कामासाठी पोहोचते. ज्येष्ठ वद्य द्वादिशीला पालखी जवळपास सासवड शहरातून प्रवास करत हळूहळू पुढं सरकते आणि रात्रीचा मुक्काम देखील सासवडमध्येच करते.

दरम्यान आणखी काहींल दिंड्या आणि वारकरी पालखीमागे चालण्यासाठी सहभागी होतात. पुढं ज्येष्ठ वद्य त्रयोदिशीला सासवड मधून पालखीचं प्रस्थान होतं आणि पहिला विसावा बोरावके मळा, जेवण यमाई शिवारी, दुसरा विसावा साकुर्डे येथे तर रात्रीचा मुक्काम श्री क्षेत्र जेजुरी येथे होतो. त्यानंतर ज्येष्ठ वद्य चतुर्दशीला पालखी जेजुरीतून निघते. पुढं पहिला विसावा दौंडज शीव, दौंडज करत जेवणासाठी शुक्लवाडी आणि वाल्हेच्या दरम्यान पोहोचते. रात्रीचा मुक्काम ही वाल्ह्यातच होतो. त्यानंतर आषाढ शुद्ध प्रतिपदेला वाल्हेमधून पुढं सरकलेली पालखी पिंपरे खुर्दमध्ये विसावा घेते आणि दुपारच्याला प्रसिद्ध नीरा नदी काठी नीरास्नान घेण्यासाठी पोहोचते. स्नानाचा कार्यक्रम उरकल्यानंतर प्रवास सुरू होतो आणि लोणंदमध्ये पालखी रात्रीची मुक्कामी थांबते.

आषाढ शुद्ध द्वितीयेला पालखी लोणंदमधून मार्गस्थ होते आणि चंदोबाचा लिंब याठिकाणी उभे रिंगण सोहळ्यासाठी पोहोचते. रिंगण सोहळ्यानंतर पालखी तिथून पुढं तरडगावमध्ये मुक्कामी येते. आषाढ शुद्ध तृतीयेला तरडगावाहून निघाल्यानंतर सुरवाडीला पहिला थांबा, निंभोरे ओढ्याजवळ दुपारी जेवण, वडजळला दुसरा थांबा आणि पुढं फलटणमध्ये माऊलीची पालखी मुक्कामासाठी थांबते.

आषाढ शुद्ध चतुर्थीला पालखी फलटणमधून प्रवास सुरू केल्यानंतर पहिल्यांदा बिडणी, दुपारी पिंप्रद, नंतर निंबळक फाटा आणि मुक्कामासाठी बरडला येऊन पोहोचते. वाटेत छोट्या मोठ्या दिंड्यातले हजारो वारकरी पालखीसोबत जोडले जातात. पुढं आषाढी शुद्ध पंचमीला बरडहून निघाल्यानंतर साधूबुवाची वाडी, धर्मापुरी पाटबंधारे बंगला कालवा, शिंगणापूर फाटा, पानस्करवाडी करत नातेपुत्याला येऊन मुक्काम करते. पुढं मग आषाढ शुद्ध षष्ठीला नातेपुत्यातनं पुरंदवडेला पोहोचते. तिथून पुढं सदाशिवनगर, येळीव करत माळशिरसमध्ये मुक्कामी येते. आषाढ शुद्ध सप्तमीला माळशिरसमधून निघते अन थेट खुडूस फाट्याला येते. तिथून पुढं पालखी विंजोरी ज्ञानेश्वर नगर, धावाबावी टेकडी या ठिकाणी विसावा घेऊन मुक्कामासाठी वेळापूरला पोहोचते. पुढं आषाढ शुद्ध अष्टमीला पालखी वेळापूरहून निघून ठाकूरबुवा समाधीजवळ पोहोचते. तिथं गोल रिंगण सोहळा पार पडतो.

त्यानंतर एका टप्प्यावर विसावा घेऊन पालखी संत सोपानदेवांची भेट घेऊन भंडीशेगावला मुक्कामी जाते. पुढं आषाढ शुद्ध नवमीला पालखी भंडीशेगाव करून बाजीरावाच्या विहिरीजवळ विसाव्याला थांबते. तिथंही रिंगण पार पडतं. त्यानंतर वाखरीत ठरलेल्या ठिकाणी येऊन पालखी मुक्काम करते. आषाढ शुद्ध दशमीला वाखरीत आकर्षक असं उभं रिंगण सोहळा पार पडतो. त्या सोहळ्याला वारकरी सगळ्यात जास्त उपस्थिती दाखवतात कारण तिथं दोन्ही पालख्या एकत्र येतात. त्यानंतर पालखी श्री क्षेत्र पंढरपूरात प्रवेश करते. आणि आषाढी एकादशीला नगरप्रदक्षणा, चंद्रभागा स्नान उरकल्यानंतर माऊलींची विठूरायांशी भेट होते. आषाढी एकादशीच्या पहाटे राज्याचे मुख्यमंत्री सपत्निक श्री विठ्ठल आणि रुक्मिणीची महापूजा करतात. त्याला शासकीय पूजेचा दर्जा दिलेलाय. बर वारकरी पंढरपूरात येऊन फक्त पांडुरंगाचं दर्शन घेत नाहीत तर चंद्रभागा नदीमध्ये स्नान करतात. चंद्रभागेत सगळी पाप धुवून जातात अशी त्यांची धारणाय.

त्यानंतर लोकं संत नामदेव यांच्या स्मरणार्थ बांधलेली नामदेव पायरी, गणेश मंदिर, दत्त मंदिर, गरुड मंदिर, मारुती मंदिर, चौरंगी देवी मंदिर, गरुड खांब, नरसिंह मंदिर, एक मुख दत्तात्रय मंदिर, रामेश्वर लिंग मंदिर, कान्होपात्रा मंदिर, अंबाबाई मंदिर, शनी देव मंदिर, नागनाथ मंदिर, गुप्तलिंग मंदिर, खंडोबा मंदिर, पुंडलिक मंदिर, नामदेव मंदिर, ज्ञानेश्वर मंदिर, तुकाराम मंदिर, संत कैकाडी महाराज मठ, संत तनपुरे महाराज मठ यांसारख्या अनेक ठिकाणी दर्शनासाठी जातात. मग खऱ्या अर्थाना इथं वारी संपन्न होते.

खरं तर अशा एकूण चार वाऱ्या वर्षभरात पार पडतात. चैत्र वारी, माघी वारी, आषाढी वारी आणि कार्तिकी वारी. पण त्यातल्या त्यात आषाढी वारीला मोठ्या सोहळ्याचं स्वरूप प्राप्त होतं. याउपरही आषाढी वारीनंतर पुढचे पंधरा दिवस परतवारी सुरू राहते. त्यावेळी वारीला आलेले लोक आपापल्या घरी परत जातात. मात्र तो प्रवास खूपच संघर्षाचा असतो. कारण येतेवेळी विठ्ठलभेटीसाठी आसूसलेले वारकरी कसल्याचं अडथळ्यांचा विचार करत नाहीत. बरं येताना वाटेत हजारो लोक मदतीसाठी तयार असतात. पण जातेवेळी मात्र वारकऱ्यांची पंढरपूर सोडून जायची अजिबात इच्छा नसते. अन मनात उल्हास ही नसतो. त्यामुळं परतवारी लोकांना खडतर वाटते. त्या अनुभवांवर सुधीर महाबळ यांनी परतवारी’ नावाचं पुस्तक लिहिलंय. तर एकूण असं सगळं वारीचं परफेक्ट नियोजन केलेलं असतंय. तुम्हाला ही माहिती कशी वाटली त्ये आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. तसंच तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपल्या विषयच भारी यु ट्यूब चॅनेलवर सदर माहितीचा व्हिडीओ देखील पाहू शकता. राम कृष्ण हरी

Connect with us : 👇 👇 👇 

Instagram

Facebook

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *