एजंट लोकांना फुकट फोर व्हीलर वाटणाऱ्या पर्ल्स कंपनीनं ६०००० कोटींचा घोटाळा कसा केला | PACL Refund |PACL Refund Status

२००७ – ०८ चा काळ. आमच्या शेजारच्या गावात एक प्रसिद्ध जनावरांचा डॉक्टर राहायचा. त्याचं नाव घेणार नाही. जनावरांना बरं करण्यात त्याचा हातखंडा होता. त्यानं हात लावलाय अन जनावर बरं झालं नाय असं कधीच झालं नाय त्यामुळं पंचक्रोशीत त्याला खूप मान होता. लोक त्याच्याकडं आदरानं पाहायची. सगळं सुरळीत चाललं होतं. पण एके दिवशी काय झालं माहिती नाय, त्या डॉक्टरनं चक्क डॉक्टरकी सोडून दिली अन त्यो PACL नावाच्या कोणत्या तरी चीटफंड कंपनीत कामाला लागला. ते PACL म्हणजे पर्ल्स एग्रोटेक कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात पर्ल्स ही कंपनी. आता पर्ल्स ह्ये नाव ऐकल्यानंतर अनेकांच्या शिट्ट्या वाजल्या असतील. का ते तुम्हांला पुढं व्हिडीओ दरम्यान समजेलचं. तर तो डॉक्टर पर्ल्स कंपनीचा एजंट झाला होता. तो त्याच्या गोड वाणीनं लोकांना भुरळ पाडायचा अन पर्ल्स कंपनीमध्ये लोकांना गुंतवणूक करायला सांगायचा. तो म्हणायचा, तुम्ही घरबसल्या तुमचा पैसा कामाला लावा तुम्हाला कंपनी एवढ्या एवढ्या वर्षात १२ टक्क्यानं रिटर्न देणारंय. बर दारात फोर व्हीलर, फॉरेन ट्रीप असलं काय बाय होतचं. त्याच्या शब्दावर विश्वास ठेवून भागातल्या शेकडो लोकांनी पर्ल्समध्ये गुंतवणूक केली. अगदी हातावर पोट असलेल्या मजुरापासून बागायतदार शेतकऱ्यांपर्यंत सगळ्यांनी. मिनिमम रक्कम पन्नास हजार ते maximum ५ लाखांपर्यंत. डॉक्टरनं कंपनीला चांगला रिजल्ट दिला म्हणून कंपनीनं त्याला नवी कोरी ७ सीटर फोर व्हीलर गिफ्ट दिली. डॉक्टर सिंगापूर, मलेशियाला जाऊन आला. ही सगळी प्रगती डॉक्टरनं निव्वळ एका वर्षाच्या आत साध्य केली होती. त्याच्याकडं पाहून भागातले आणखी काही तरुण पोरं पर्ल्स कंपनीत जॉईन झाली आणि बघता बघता त्यांची एक साखळी निर्माण झाली. पुढची सात आठ वर्षे तसाच कारभार सुरु राहिला अन २०१४ साली एक बातमी आली की, पर्ल्सच्या संचालकानं ६०००० कोटींचा घोटाळा करून गुंतवणूकदारांची फसवणूक केलीये. त्ये ऐकून देशातल्या करोडो गुंतवणूकदारांसकट पर्ल्स कंपनीचे एजंट यांची सुद्धा पाचावर धारण बसली. कारण बातमी झळकल्यानंतर सैरभैर झालेल्या लोकांनी आमचे पैसे रिटर्न करा म्हणून त्या एजंटांची गचुंडी धरली. काही एजंटांना मारहाण ही झाली. त्यात आमच्या शेजारच्या गावातला तो जनावरांचा डॉक्टर सुद्धा होता. लोकांच्या भीतीनं त्यानं स्वतःची जमीन, घर दागिने गहाण ठेवले, प्रसंगी विकले अन लोकांचे पैसे भागवण्याचा प्रयत्न केला. पण रक्कम थोडीथोडकी नव्हती. अजून तो छोटे मोठे धंदे करून एकाएकाचे पैसे फेडतोय. आता त्याच्यावरचा विश्वास उडाल्यामुळं त्याला जनावरांना तपासायला ही कुणी बोलवत नाही. त्याच्यासारखीचं गत भागातल्या शेकडो एजंटांची आहे. काहींनी तर त्याकाळी टेन्शनमध्ये जीवनयात्रा संपवल्याच्या ही बातम्या आल्या होत्या आणि आजतागायत लाखो लोकं पर्ल्स कंपनीकडून वसूल होणाऱ्या पैशाच्या प्रतीक्षेत आहेत. पण याची सुरुवात नेमकी कशी झाली होती ,कसं एका साधारण दूध विक्रेत्यानं देशातील लोकांना ६० हजार कोटींचा गंडा घातला, हा पर्ल्स घोटाळा नेमका काय होता, सगळ्या प्रश्नांची उत्तरे या Blog च्या माध्यमातून आपण जाणून घेणारे,

Nirmal Singh Bhangoo

(PACL Refund | PACL India Limited | PACL Scam )


तर मंडळी ही गोष्ट सुरु होते पंजाबच्या अट्टारी गावापासून. त्ये गाव पाकिस्तानी बॉर्डरच्या आसपास वसलेलंय. त्या गावात राहणारा निर्मलसिंग बांगू हा आधी सायकलवर घरोघरी जाऊन दूध विकण्याचा धंदा करायचा. पण त्या धंद्यातून त्याला जास्त पैसा मिळत नव्हता म्हणून तो पुढ हरियाणाच्या एका कंपनीत कामाला गेला. कंपनीचं नाव होतं गोल्डन फॉरेक्स लिमिटेड. ती कंपनी त्या भागात झोलझालसाठी बदनाम होती. खोट्या नाट्या स्कीममध्ये लोकांना पैसा गुंतवायला लावून त्यांना लुबाडण्याचं काम करायची. त्या कंपनीत काम करत असताना निर्मलसिंग बांगूला कळलं की लोकांना गंडवून पैसा कमावण किती सोप्पंय. ही साधारण १९९५-९६ ची गोष्टय. त्यानंतर खूप विचार करून निर्मलसिंग बांगू यानं स्वतःची एक चीटफंड कंपनी काढण्याचा निर्णय घेतला. साधारण १३ फेब्रुवारी १९९६ रोजी त्यानं राजस्थानच्या जयपूरमध्ये जाऊन PACL म्हणजेचं PEARLS AGROTECH CORPORATION LIMITED नावाची एक कंपनी सुरु केली. जी पुढं जाऊन फक्त पर्ल्स एवढ्याचं नावानं देशभरात फेमस झाली. सुरुवातीला त्यानं लोकांना सांगितल की पर्ल्स ही एक रिअल इस्टेट क्षेत्रात काम करणारी कंपनीय. त्यामुळं बरेचसे लोक चौकशी करण्यासाठी त्याच्याकड जायचे. त्यातल्याच काही लोकांना हेरून त्यांना गाडी, बंगला, फॉरेन ट्रीपची स्वप्नं दाखवून त्यानं कंपनीसाठी काम करायला तयार केलं. त्यांना मोठमोठाले पगाराचे आकडे वाढवून सांगितले अन त्यामुळं अनेक लोक पर्ल्सचे एजंट बनू लागले. दरम्यान त्ये एजंट लोकांकडं जायचे आणि त्यांना सांगायचे की जर तुम्ही आमच्या कंपनीत पैसा गुंतवला तर आम्ही तुमचा पैसा अनडेव्हलपमेंट land म्हणजेचं अविकसित जमीनक्षेत्रात लावू आणि त्याचा विकास करू. विकास झाल्यानंतर ठराविक काळानं तुम्हाला बँकेपेक्षा डब्बल म्हणजे साडे बारा टक्के दरानं तुमचे पैसे रिटर्न करू किंवा तुम्हाला हव असेल तर तुमच्या पैशाच्या किमती एवढी जमीन सुद्धा तुमच्या नावावर करून देऊ. पण जमीनीमध्ये लोकांनी कमी इंटरेस्ट दाखवल्यावर निर्मलसिंग बांगू यानं आणखी एक वाढीव स्कीम काढली. ती अशी की आम्ही सहा वर्षात तुमचे पैसे डब्बल आणि दहा वर्षात चौबल करून देऊ. एवढचं नाही तर सुरुवातीच्या काळात लोकांना विश्वास पटावा म्हणून काही जणांना बॉंडवर लिहून डब्बल चौबल रक्कम रिटर्न सुद्धा केली. त्यावेळी भारतात एकला डब्बल, चौबल स्वरुपाची ती पहिलीचं स्कीम होती. त्यामुळं लोकांना त्याची जास्त माहिती नव्हती. ना गावाकडच्या, ना शहरातल्या. ज्यांना LIC मुळं थोडंफार माहिती होतं त्यांनाही PACL वाले खतरनाक रिटर्नची आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढायची. ती आयडिया बेक्कार चालली. म्हणजे पाक राजस्थान, युपी, बिहार, पंजाब, हरियाणा या उत्तरेतल्या राज्यापासून त्ये खाली मध्यप्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगढपर्यंत पर्ल्सची पाळमुळं पसरली.

(PACL Refund | PACL India Limited | PACL Scam )

लोकांना पर्ल्सबद्दल इतकं अप्रूप वाटलं की लोक एकमेकांना पर्ल्समध्ये गुंतवणूक का केली नाहीस म्हणून वेड्यात काढायचे. म्हणायचे, LIC बीलायसी काय घेवून बसलाय, पैसा गुंतवायचा तर फक्त पर्ल्समध्ये. कुठ अठरा अठरा वर्षे LIC त पैसे भरत बसायचं. सहा वर्षात पन्नास हजाराचे दोन लाख. लोकं भुलली. त्यांनी फक्त पर्ल्समध्ये पैसा गुंतवला नाही तर स्वतः कंपनीशी जॉईन होऊन एजंट झाले. त्यावेळी पर्ल्सचा एजंट असणं हे प्रतिष्ठेच काम समजलं जायचं. बरं त्यात कंपनीचा एजंट होण्यासाठी ना कोणती शिक्षणाची अट, ना मार्केटिंग प्रमाणपत्राची गरज. फक्त आपल्या कस्टमरला आकर्षित करून घेण्याची कला अवगत झाली की तुम्ही पर्ल्ससाठी काम करण्यासाठी तयार. अगदी पाचपन्नास घराच्या छोट्या गावांपासून त्ये पाक मोठमोठ्या शहरांपर्यंत हजारोंच्या संख्येनं लोक २० टक्के कमिशनच्या मोहाला बळी पडून एजंट बनले होते. त्यांनी त्यांच्या नात्यातली माणसं, मित्र, शेजारीपाजारी यांनाचं पहिल्यांदा त्यांचं ग्राहक बनवलं. बरं आपल्या आधीच्या एजंट लोकांची प्रगती बघून त्यांनी लोकांकडून पैसे घेताना मी तुमच्या पैशाला जबाबदार आहे असं छातीठोकपणे सांगितलं. एजंटाच्या आत्मविश्वासाला लोकं बळी पडली. दरम्यान ज्या एजंटांनी त्यांचं टार्गेट पूर्ण केलं त्यांना पर्ल्स कंपनीकडून अवघ्या सहा महिन्यांत दोन चाकी, चार चाकी गाड्या दिल्या जाऊ लागल्या. त्यांची ती अकस्मात आलेली श्रीमंती पाहून आणखी बरीच लोकही अचंबित झाली. पण कंपनी नेमकं ही एक का डब्बल स्कीम नेमकी कशी चालवते याचा कुणीचं विचार केला नाही. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त पश्चिम महाराष्ट्रात त्या पर्ल्स कंपनीचं नेटवर्क पसरल होतं. त्यातल्या त्यात सातारा, सांगली, सोलापूर भागात जास्तचं. लोकमत वृत्तपत्रानं दिलेल्या बातमीनुसार २०१४ साली जेव्हा स्कॅम उघड झाला होता तेव्हा एकट्या सोलापूर जिल्ह्यात जवळपास पाच लाख गुंतवणूकदारांची ९०० कोटी रुपयांची पर्ल्समध्ये गुंतवणूक असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली होती.

Nirmal Singh Bhangoo

(PACL Refund | PACL India Limited | PACL Scam )


तर सातारा जिल्ह्यातील लाखो गुंतवणूकदारांचे सहाशे कोटी रुपये पर्ल्समध्ये गुंतले होते. मिडिया रिपोर्टनुसार १९९६ ते २०१४ सालापर्यंत, महाराष्ट्रातल्या ७४ लाख आणि आणि देशातल्या जवळपास सहा कोटी लोकांनी पर्ल्समध्ये ६०००० कोटी एवढी मोठी रक्कम गुंतवली होती. बर त्यातून मिळालेल्या पैशांचं पर्ल्स कंपनीनं काय केलं तर काही ठिकाणी जमीन खरेदी केली. पण बऱ्याच जमिनींची कागदपत्रेचं बनवली नाहीत. त्यामुळं झालं काय तर ज्या गुंतवणूकदारांना त्यांची पर्ल्स कंपनी जमीनीचे प्लॉट alot करायची त्यांना कळायचंच नाही की आपल्याला मिळालेला प्लॉट किंवा जमीन नेमकी हाय कुठली. म्हणजे एकूणचं सगळ घोळाचं काम होतं. ज्यांना ज्यांना असा अनुभव यायला लागला त्यांनी मग पर्ल्सविरोधी फसवणुकीचे गुन्हे दाखल करायला सुरवात केली. तक्रारी खूपचं वाढल्यानंतर २००३ साली त्याप्रकरणात Securities and Exchange Board of India म्हणजेच सेबीची एन्ट्री झाली. सेबीनं मग काही तपास करून पर्ल्सला सांगितलं की तुम्ही असं लोकांना मोठमोठी स्वप्नं दाखवून, त्यांना फसवून त्यांचे पैसे घेऊ शकत नाही. एवढ्चं नाही तर सेबीनं CIS म्हणजे कलेक्टीव्ह इन्वेस्टमेंट स्कीम च्या अंडर पर्ल्स कंपनीला राजस्थानच्या हायकोर्टात खेचलं. त्यावेळी कोर्टात पर्ल्स कंपनीकडून असं सांगण्यात आलं की, ही आमची रिअल इस्टेट कंपनी आहे. त्यामुळं CIS ची केस आमच्यावर लागू होत नाही. त्यामुळं सेबी आम्हाला कंट्रोल करू शकत नाही. त्यानंतर राजस्थान कोर्टानं उलट सेबीलाचं अल्टीमेटम दिला की पर्ल्स गंडवागंडवीच्या स्कीममध्ये येत नाही, तुम्ही त्यांच्याकड दुर्लक्ष करा. मग काय थेट कोर्टाकडून APPROVAL मिळाल्यावर पर्ल्सची गाडी आणखीनचं भुंगाट सुटली. ती केस मिटल्यानंतर पर्ल्सच्या हालचाली अतिशय वेगानं वाढल्या. मग पुढं पर्ल्सने रिअल इस्टेट सोबतचं मिडिया, एज्युकेशन, टुरिझम आणि मेडिकल क्षेत्रात ही एन्ट्री केली. एवढचं काय २०१० पासून २०१३ पर्यत कबड्डीच्या वर्ल्डकपला sponser केलं अन ऑस्ट्रेलियात त्यांच्या एका product ला प्रमोट करण्यासाठी थेट ब्रेटली या क्रिकेटरलाचं brand ambassador बनवलं. हा पण त्याकाळात पर्ल्स सेबीच्या रडारवरून हटली नव्हती. सेबीचे अधिकारी रात्रंदिवस एक करून पर्ल्स आणि त्याच्या संचालकांच्या विरोधात फसवणुकीचे पुरावे शोधत होते. दरम्यान २०१४ साली सेबीनं पर्ल्सला पुराव्यानिशी सुप्रीम कोर्टात खेचलं. त्यावेळी सुप्रीम कोर्टानं ह्ये मान्य केलं की पर्ल्सनं त्याच्या गुंतवणूकदारांची फसवणूक केलीये.

(PACL Refund | PACL India Limited | PACL Scam )

दरम्यान सेबीनं त्याची आणखी सखोल चौकशी केली अन पर्ल्सनं त्याच्या गुंतवणूकदारांना पैसे रिटर्न करावेत असंही सांगितलं. पुढं CBI सुद्धा त्यात इन झाली आणि त्यांनी असा रिपोर्ट सादर केला की, पर्ल्सच्या मालकीची देशात २ लाख कोटीची जमीनय आणि त्यांची १३०० बँक accounts आहेत. तसच २८० कोटीच्या एफ डीज आणि १४००० हजार वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आहेत. त्यांनतर सगळ्या देशात त्या स्कॅमची बातमी पसरली आणि की पर्ल्स कंपनीनं देशात जवळपास ६०००० कोटीच्या आसपास मोठा फ्रौड केलाय हे उघड झालं. ते ऐकल्यानंतर सामान्य गुंतवणूकदार, ठेवीदार आणि ग्राहकांचे धाबे दणाणले. लोकांना आता काय करावं हेच कळत नव्हतं. कारण त्यांनी त्यांच्या आख्ख्या आयुष्याची बचत पर्ल्समध्ये गुंतवली होती. गावागावात त्या बातमीनंतर निराशा आणि चिंतेच वातावरण पसरलं. काही काही लोक जबर आक्रमक झाले आणि त्यांनी ज्या एजंट लोकांमार्फत पर्ल्समध्ये पैसे गुंतवले होते त्यांना धरलं आणि पैशासाठी तगादा लावला. बऱ्याच जणांना मारहाण देखील केली. तर काहींनी त्या भीतीनं टोकाची पाऊल उचलली. दरम्यान काही एजंट लोकांनी अद्याप ती केस कोर्टात चालू आहे आणि लवकरच तुम्हाला तुमचे पैसे रिटर्न मिळणर आहेत या आशेवर ठेवलंय. पण गेल्या सात आठ वर्षात हजारो ठेवीदारांना त्यांचे थोडेफार पैसे परत मिळालेत. ते सुद्धा आर एम लोढा समितीमुळं. सेबीनं घोटाळा उघड झाल्यानंतर गुंतवणूकदारांना न्याय देण्यासाठी लोढा समिती स्थापन केली होती. त्या समितीनं फसवणूक झालेल्या लोकांचे अर्ज भरून घेतले अन हफ्त्या हफ्त्यात त्याची त्यांच्या रिकव्हरीची रक्कम पाठवली. ती सुद्धा हजार दीडहजार अशा स्वरूपात. २०२० पर्यंत पहिल्या स्टेजमध्ये आठ लाख ३१ हजार लोकांना एकूण २०४ कोटी एवढी रक्कम रिटर्न करण्यात आलीये अन अजूनही कोट्यावधी लोक बाकी आहेत. त्यामुळं अद्याप ती अर्ज करण्याची प्रोसेस अविरत चालूय. समोर स्क्रीनवर दिलेल्या वेबसाईटवर अर्ज भरण्यात येतोय. दरम्यान कारवाई झाल्यानंतर सीबीआयनं ८ जानेवारी २०१६ रोजी त्या घोटाळ्याचा म्होरक्या अन पर्ल कंपनीचा माजी अध्यक्ष निर्मलसिंह बांगू तसच पर्ल अ‍ॅग्रोटेक कॉर्पोरेशनचा एमडी व प्रमोटर सुखदेव सिंग, कंपनीचा कार्यकारी संचालक गुरमीत सिंग, सुब्रत भट्टाचार्य यांना अटक करण्यात आली होती.

Nirmal Singh Bhangoo

(PACL Refund | PACL India Limited | PACL Scam )

हे पण विषय भारी वाच भाऊ

तासगाव कवठेमहाकाळचा पुढचा आमदार कोण | Rohit Patil की Prabhakar Patil | Vishaych Bhari

करोडोंच्या गोष्टी सांगणाऱ्या Chain Marketing चा फ्रॉड कसा चालतो | MLM OR Network Marketing Reality


पण मागच्या चार वर्षापासून निर्मलसिंग बांगू याचा मुक्काम बिघडलेल्या तब्येतीमुळं पोलिसांच्या निदर्शनात हॉस्पिटलमध्येचं आहे ते सुद्धा फाईव्ह स्टार सोयीसुविधा असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये. असो तर एकूण अशी आहे पर्ल्स घोटाळ्याची सुफळ संपूर्ण कहाणी. बाकी तुमचे किंवा तुमच्या मित्रांचे, नातेवाईकांचे पैसे पर्ल्स मध्ये अडकले आहेत का ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

एजंट लोकांना फुकट फोर व्हीलर वाटणाऱ्या पर्ल्स कंपनीनं ६०००० कोटींचा घोटाळा कसा केला | PACL Refund

Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇

https://www.facebook.com/vishaychbhari

https://www.facebook.com/aplavishaychbhari

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *