२३ उमेदवार फिक्स झाले पण भाजप अजून या ९ लोकसभेच्या जागा लढवेल ? | Loksabha Election 2024 Latest News| Vishaych Bhari


मंडळी राज्यातील 48 लोकसभेच्या जागांपैकी किमान 45 जागा जिंकण्याचं ध्येय ठेवणाऱ्या भाजपकडून लोकसभेच्या जवळपास 23 जागांवरील उमेदवार जाहीर झालेत. त्या 23 पैकी बऱ्याचं जागांवर भाजपनं विद्यमान खासदारांना पुन्हा संधी दिलीये तर काही ठिकाणच्या खासदारांचा पत्ता कट करून धक्कातंत्र वापरत नवीन चेहऱ्यांना ही संधी दिलीये. कालच सोलापूरमध्ये काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्या विरोधात भाजपनं आमदार राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर केली. हा सगळ्यांसाठी धक्काचं होता. असो, पण तरीही अजून 9 ते 10 लोकसभा मतदारसंघात भाजप आपले उमेदवार उभं करू शकतं असं म्हंटलं जातंय. काही काळापूर्वी राजकीय वर्तुळात अशीही चर्चा होती की महायुतीतील शिंदे गट आणि अजितदादा गटाला नाममात्र जागा देऊन आपल्या वाट्याला जास्त जागा घेण्याचाही भाजपचा प्रयत्न होता. पण आता भाजपनं मित्रपक्षांसमोर नमते घेतल्याची माहिती आहे. भाजप 30 ते 32 जागा लढवणार असून उर्वरित जागा मित्रपक्षांना देणारय असा निर्णय दिल्लीत शनिवारी रात्री उशीरापर्यंत झालेल्या चर्चेत घेण्यात आलाय असं सांगितलं जातय. पण त्यापैकी 23 उमेदवार तर जाहीर झाले मग उरलेले 9 लोकसभा मतदारसंघ कोणते आणि तिथं नेमकी कुणाच्या नावाची चर्चा आहे त्याचा घेतलेला हा सविस्तर आढावा..

narendra modi,

(Loksabha Election 2024 Latest News)


मंडळी सुरुवातीला आपण नेमक्या कोणत्या 23 लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची नावं आणि त्यांची यादी जाणून घेऊ. (तुम्ही खाली वाचू शकता ) त्या संबंधित मतदारसंघांचं आणि तिथं कुणाला उमेदवारी जाहीर झाली त्या उमेदवाराचं नाव वाचू शकता अगदीच नावं सांगायची झाली तर आतापर्यंत
१) चंद्रपूरमध्ये- सुधीर मुनगंटीवार
२) रावेरमध्ये- रक्षा खडसे
३) जालन्यात – रावसाहेब दानवे
४) बीडमध्ये- पंकजा मुंडे  
५) पुण्यात- मुरलीधर मोहोळ
६) सांगलीत- संजयकाका पाटील
७) माढ्यात रणजितसिंह नाईक निंबाळकर
८) धुळ्यात – सुभाष भामरे
९) उत्तर मुंबईत – पियुष गोयल
१०) उत्तर पूर्व मुंबईत – मिहीर कोटेचा
११) नांदेडमध्ये- प्रतापराव चिखलीकर
१२) अहमदनगरमध्ये सुजय विखे पाटील
१३) लातूरमध्ये- सुधाकर श्रृंगारे
१४) जळगावात –  स्मिता वाघ
१५) दिंडोरीत – भारती पवार
१६) भिवंडीत – कपिल पाटील
१७) वर्ध्यात – रामदास तडस
१८) नागपूरात – नितीन गडकरी
१९) अकोल्यात- अनुप धोत्रे
२०) नंदुरबारमध्ये डॉ. हिना गावित
२१) सोलापूरमध्ये- राम सातपुते
२२) भंडारा गोंदियात – सुनील मेंढे आणि
23) गडचिरोली चिमूरमध्ये- अशोक नेते
या उमेदवारांची नावं भाजपकडून जाहीर करण्यात आलीयेत. दरम्यान भाजपनं महाराष्ट्रातील उमेदवारांची जी यादी जाहीर केलीय त्यात आतापर्यंत पाच विद्यमान खासदारांची तिकीटं देखील कापली आहेत. त्यांची नावं सांगायची म्हणजे उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी, बीडच्या प्रीतम मुंडे, मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघाचे खासदार मनोज कोटक, जळगावचे उन्मेष पाटील आणि सोलापूरचे जयसिद्धेश्वर स्वामी यांचा समावेश आहे. आता आपण उर्वरित कोणत्या मतदारसंघात भाजपकडून उमेदवार दिली जाण्याची चर्चा आहे, तिथं कुणाचा पत्ता कट होण्याची आणि कुणाच्या गळ्यात उमेदवारीची शक्यता आहे त्याची आपण एक एक करून माहिती घेऊ.

(Loksabha Election 2024 Latest News)

तर सर्वात पहिला लोकसभा मतदारसंघ आहे सातारा. मंडळी दिल्लीतल्या बैठकीनंतर आता साताऱ्यात छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याच्या चर्चाना उधाण आलंय. इतक्या दिवस मात्र अजितदादांच्या क्लेममुळं साताऱ्याच्या जागेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. पण माढ्याच्या जागेच्या बदल्यात अजितदादांनी साताऱ्याची जागा भाजपला सोडणार असल्याचा टेक घेतल्याचं कळतंय. पण गंमत म्हणजे भाजपनं माढ्यात याआधीचं रणजितसिंह निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर केलीये. पण माढ्यात भाजपच्या मोहिते पाटील गटानं निंबाळकरांच्या उमेदवारीला विरोध केल्यानं सातारा आणि माढ्यात भाजपची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झालीये. पण तरीही महायुतीतल्या सर्व पक्षांनी उदयनराजे यांना निवडणुन आणण्याचं ठरवल्याची चर्चा आहे. पण त्यामुळं अजित पवार गटाकडून इच्छुक असलेले नितीन काका पाटील, शिंदे गटाकडून इच्छुक असलेले पुरुषोत्तम जाधव यांचा काय टेक असणारं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणारय.

udayanraje bhosale,

(Loksabha Election 2024 Latest News)

त्यानंतर दुसरा लोकसभा मतदारसंघय उत्तर मध्य मुंबई. तिथून भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन या दोन टर्म झालं सिटिंग खासदार आहेत. त्यांनी 2009 आणि 2014 मध्ये अभिनेते सुनील दत्त यांच्या कन्या प्रिया दत्त यांचा पराभव केला होता. पण पूनम महाजन यांचा मतदार संघात मोठा जनसंपर्क नसल्याची आणि मतदार पूनम महाजन यांच्या परफॉर्मन्सवर नाराज असल्याची दबक्या आवाजात चर्चाय. त्यामुळं भाजप तिथं भाकरी फिरवण्याच्या तयारीत असून यंदा पूनम महाजन यांचा पत्ता कट होण्याची जोरदार चर्चाय. पण सध्या तिथं भाजपकडं दुसरा स्ट्रॉंग चेहरा देखील नसल्याची चर्चाय.दरम्यान काही राजकीय विश्लेषकांच्या मते उत्तर मध्य मुंबई लोकसभेवर भाजपचा दावा असला तरी ती जागा ऐनवेळी भाजप महायुतीतल्या शिंदे गट किंवा अजितदादा गटाला सोडू शकतं.

(Loksabha Election 2024 Latest News)

पुढं तिसरा लोकसभा मतदारसंघय अमरावती. सध्याच्या अमरावतीच्या विद्यमान अपक्ष खासदार नवनीत राणा ह्या महायुतीमध्ये असून त्यांनी अनेक वेळा सांगितलंय की आपण येणारी लोकसभेची निवडणूक महायुतीकडून लढू. याला अर्थात भाजपकडून सुद्धा दुजोरा दिला गेलाय. काही दिवसापूर्वी फडणवीसांनी नवनीत राणा याचं भाजपकडून अमरावती लोकसभा लढवतील असं वक्तव्य केलं होतं. पण असं असलं तरी अमरावतीमध्ये शिंदे गटाचे आनंदराव अडसूळ यांचा उमेदवारीवर दावा कायम आहे. तसंच महायुतीकडून घेण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये अभिजीत अडसूळ यांनी देखील अमरावती लोकसभा उमेदवारीसाठी दावा ठोकला होता. पण ऐनवेळी नवनीत राणा याच भाजपमध्ये जाण्याच्या दाट शक्यता आहेत आणि म्हणून त्याचं भाजपकडून संभाव्य उमेदवार असतील असं बोललं जातंय. नवनीत राणा यांचं भाजपसोबत सख्य असल्याच़ वारंवार दिसून आलंय.

navnit rana,

(Loksabha Election 2024 Latest News)

त्यानंतर चौथा लोकसभा मतदारसंघय कोल्हापूर. कोल्हापुरात मविआकडून छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी जाहीर झालीये त्यामुळं आता महायुतीच्या गोटात हालचाली वाढल्यात. सध्या तिथं शिंदेच्या शिवसेनेचे संजय मंडलिक ह्ये विद्यमान खासदार असले तरीही मागच्यावेळी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक हरलेले धनंजय महाडिक यांनी 180 डिग्रीत टर्न घेऊन भाजपमध्ये प्रवेश केलाय. त्यामुळं तिथलं स्थानिक राजकारण पूर्णतः बदलून गेलंय. तशी तर इतक्या दिवस महायुतीकडून संजय मंडलिक यांच्या नावाची चर्चा असली तरीही शिवसेनेतील फुटीनंतर मंडलिक यांनी शिंदे गटाचा रस्ता धरल्यामुळं त्यांच्यावर जनतेचा रोष आहे असं भाजपच्या सर्वेत समोर आलंय. त्यामुळं आता कोल्हापूर लोकसभेसाठी भाजपकडून उमेदवार बदलाची चर्चा आहे आणि त्या धर्तीवर तिथं धनंजय महाडिक किंवा मग शाहू महाराजांच्या राजकीय घराणेशाहीला तोड म्हणून समरजित घाटगे यांच्या नावाचा देखील  विचार सुरू आहे असं म्हणलं जातंय.

(Loksabha Election 2024 Latest News)

पुढं पाचवा लोकसभा मतदारसंघय रत्नागिरी सिंधुदुर्ग. सध्या तिथं ठाकरेंच्या शिवसेनेचे विनायक राऊत ह्ये विद्यमान खासदार आहेत पण तिथं आता महायुतीतल्या भाजप व शिंदे गटाकडून दावा करण्यात आल्याचं कळतंय. दीपक केसरकरांनी शिंदेच्या शिवसेनेकडून किरण सामंत यांचं नाव पुढं केलं होतं पण भाजप तिथं नारायण राणे किंवा निलेश राणे यांच्या उमेदवारीसाठी आग्रही असल्याचं कळतंय. त्यातही ती जागा भाजपककडं राहिलीच तर मग नारायण राणे किंवा मग निलेश राणे हेच भाजपकडून तिथले उमेदवार असतील अशी चर्चाय.

vinayak raut,

(Loksabha Election 2024 Latest News)

त्यानंतर सहावा लोकसभा मतदारसंघय ठाणे. सध्याच्या घडीला तिथं ठाकरे गटाचे राजन विचारे ह्ये विद्यमान खासदार आहेत. तसा ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्लाय त्यामुळं एकनाथ शिंदे यांनी ठाण्याच्या जागेवर ठामपणे दावा केलाय. शिंदे गटाकडून आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के, माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांची नावं चर्चेत आहेत. पण भाजप सुद्धा ती जागा सोडायला तयार नसल्याचं कळतंय. दरम्यान कल्याणची जागा शिंदेनाचं सोडून किमान ठाणे तरी आपल्याकडं घ्यायचं असा भाजपचा मन्सूबा असल्याचं कळतंय. मागं उल्हासनगर पोलीस स्टेशनमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणी अटकेत असलेले भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी यापुढं ठाणे आणि कल्याणमध्ये भाजपचा खासदार होणार असं वक्तव्य केलेलं होतं. भाजपकडून माजी खासदार विनय सहस्रबुद्धे, संजीव नाईक, आमदार संजय केळकर याचबरोबर गणेश नाईक यांची नावं चर्चेत आहेत. पण त्यातल्या त्यात सहस्रबुद्धे यांनी गिअर टाकल्याचं पाहण्यास मिळतंय. त्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून माजी खासदार आनंद परांजपे हे सुद्धा ठाण्यावर दावा ठोकून आहेत. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ताब्यात असलेले ठाणे आणि कल्याण हे दोन लोकसभा मतदारसंघ आनंद दिघे यांनी नंतर शिवसेनेकडे खेचून घेतल्यानं भाजपच्या जुन्याजाणत्या नेत्यांच्या मनात ती सल आजही कायमय. तशीही 2014 नंतर ठाणे जिल्ह्यातील राजकीय समीकरणं बदलली असल्याचं भाजप नेत्यांचं म्हणणय. पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे प्रभावी नेते भाजपमध्ये आलेत. त्याशिवाय मोदी लाटेवर स्वार असलेल्या मतदारांचं मोठ जाळ जिल्ह्यातील शहरी भागातय. त्यामुळं आता शिवसेनेला वरचढ होऊ द्यायचं नाही अशी रणनीती भाजपच्या गोटात सातत्यानं आखली जातेय.

(Loksabha Election 2024 Latest News)

पुढं सातवा लोकसभा मतदारसंघय छत्रपती संभाजीनगर. सध्या तिथं एमआयएमचे इम्तियाज जलील ह्ये खासदार आहेत. पण असं असलं तरीही तो मतदारसंघ खरं तर शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जायचा. त्यामुळं शिंदे गट तिथल्या जागेसाठी आग्रही आहेच पण हिंदुत्ववादी केडर मोठ्या प्रमाणात असल्यामुळं भाजपनं ही तिथं आपला दावा ठोकलाय. भागवत कराड ह्ये भाजपकडून लोकसभेचे उमेदवार असू शकतात असं बोललं जातंय. हा, पण तिथं त्यांना ठाकरे गटाचे अंबादास दानवे आणि एमआयएमच्या इम्तियाज जलील यांचं तगडं आव्हान असणारय.

imtiyaz jalil,

(Loksabha Election 2024 Latest News)

पुढं आठवा लोकसभा मतदारसंघय हातकंणगले. सध्या तिथं शिंदे गटाचे धैर्यशील माने विद्यमान खासदार आहेत पण शिवसेनेतील फुटीनंतर शिंदे गटात जाण्याची त्यांची भूमिका लोकांना आवडली नाही. लोकांचा कल ओळखून येत्या काळात त्ये भाजपमध्ये उडी घेतील असं बोललं जातंय. कारण ती जागा महायुतीतल्या भाजपनेच लढवावी यासाठी भाजप आग्रही असल्याचं कळतंय. दरम्यान तिथं भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष, इचलकरंजीचे माजी आमदार सुरेश हाळवणकर आणि भाजपला पाठिंबा दिलेले इचलकरंजीचे अपक्ष आमदार राहुल आवाडे हे देखील लोकसभेसाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदार, खासदारांची प्रतिमा डागाळलीय असं भाजपच्या सर्वेत समोर आलंय. त्यामुळं उमेदवार बदलायची वेळ आलीच तर सज्ज असावं अशी भाजपची रणनीती आहे. पण स्वाभिमानीचे राजूशेट्टी यांचं आव्हान भाजपला तिथं पेलावं लागणारय. कारण मविआकडून ठाकरे ती जागा राजू शेट्टीना सोडायला तयार झाल्याची चर्चा आहे.

(Loksabha Election 2024 Latest News)

हे विषयच भारी वाचलेस का भावा !

Manoj Jarange Patil यांनी स्वतःचा राजकीय पक्ष काढला तर हे ७ खासदार निवडणुकीत पडतील | Vishaych Bhariलंडनमध्ये खुलेआम फिरणाऱ्या विजय माल्ल्याला अटक का होतं नाही | Vijay Mallya Story | Scamहरी पाठातला गोड आवाज गेला | बाबा महाराज सातारकर यांचे निधन | Baba Maharaj Satarkar Death

त्यानंतर सर्वात शेवटचा लोकसभा मतदारसंघय धाराशिव. तिथं ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर ह्ये विद्यमान खासदार आहेत पण त्यांचे कट्टर विरोधी मानले गेलेले राणा जगजीतसिंग पाटील यांच्या नावावर भाजप शिक्कामोर्तब करेल असं बोललं जातय. पण मध्यंतरी मतदारसंघात संपर्क वाढवत भाजपच्याचं बसवराज मंगरुळे यांनी सुद्धा धाराशिव लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याचं कळतंय. तसंच लिंगायत मतांची मोट बांधण्यासाठी बसवराज पाटील यांनाही भाजपनं त्यांच्या गोटात घेतलंय. ऐनवेळी धक्कातंत्र वापरत बसवराज पाटील यांनाही धाराशिव लोकसभेची उमेदवारी दिली जाईल अशी मतदारसंघात दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. ही झाली संभाव्य उमेदवारांची नावं पण येणाऱ्या काळात भाजपच्या गोटातलं हे चित्र अजून स्पष्ट होईल. त्याव्यतिरिक्त सध्या भाजप मनसे युतीची ही राज्यात जोरदार चर्चा सुरू असून भाजपनं दावा केलेल्या दक्षिण मुंबई लोकसभेची जागा भाजपच्या कोट्यातून मनसेला मिळणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळं तिथं मनसेचे बाळा नांदगावकर हे लोकसभा निवडणूक लढवतील अशी चर्चा आहे. तसंच माढ्यात सुद्धा धैर्यशील मोहिते पाटील गटानं रणजितसिंह निंबाळकर यांच्या उमेदवारीला विरोध केल्यानं ऐनवेळी भाजप निंबाळकरांचा पत्ता कट करून भाजपच्या धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी देणार किंवा मग साताऱ्याच्या बदल्यात ती जागा अजितदादा गटाला सोडून भाजप धैर्यशील मोहिते पाटील यांनाचं ऐनवेळी अजितदादा गटाकडून लढायला सांगणार अशीही शक्यता वर्वतण्यात येतीये.

omraje nimbalkar,

(Loksabha Election 2024 Latest News)

तसंच महायुतीत ज्या जागा शिंदे गटाला सोडायला भाजप तयार झालंय त्यामध्ये किमान पाच जागांवरील उमेदवारांना भाजपच्या चिन्हावर लढायला लावणार असल्याची ही रणनीती भाजपकडून आखण्यात आल्याचं कळतंय. पण ती नावं अजून गुलदस्त्यात ठेवण्यात आलीयेत. पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय, आम्ही सांगितलेल्या मतदारसंघात महायुतीकडून नेमकी कुणाला उमेदवारी मिळू शकते, याव्यतिरिक्त अजून कोणत्या ठिकाणी भाजप त्यांचा उमेदवार देऊ शकतं, तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा.

२३ उमेदवार फिक्स झाले पण भाजप अजून या ९ लोकसभेच्या जागा लढवेल ? | Loksabha Election 2024 Latest News

Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇

https://www.facebook.com/vishaychbhari

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *