मराठा समाजाच्या या माणसानं सरकारला गुडघ्यावर कसं आणलं | Manoj Jarange Sabha Live | Vishaych Bhari


तारीख 1 सप्टेंबर 2023. जालना जिल्ह्यातलं अंतरवली सराटी गाव. आक्रोश करणारा मराठा जनसमुदाय आणि लाठीचार्ज करणारे पोलीस. नाकातोंडातून रक्त येणाऱ्या मराठा महिला आंदोलक आणि जखमी झालेले पोलीस कर्मचारी आणि या सगळ्यात मध्यभागी असणार मनोज जरांगे पाटील हे नाव. अगदीचं 2 महिन्यापूर्वी या नावाची फारचं कमी चर्चा होती किंवा ते करत असलेल्या उपोषणाबद्दल फारस कोणालाचं माहिती नव्हतं. पण तो अमानुष लाठीचार्ज हल्ला झाला आणि मनोज जरांगे पाटील हे नाव सर्वश्रुत झालं. मध्यंतरी तर थेट विनायक मेटेंच्या फोटोपुढे असणारा त्यांचा फोटो वायरल झाला होता. म्हणजेच मराठा नेता म्हणून मनोज जरांगे पाटील मागच्या काही दिवसात  पुढं येताना दिसत आहेत. पण सामान्य कुटुंबातून पुढं येऊन महाराष्ट्रातल्या बहुसंख्य मराठ्यांचं नेतृत्व करण्यापर्यंतची त्यांनी मारलेली मजल म्हणावी तेवढी सोप्पी नाहीय. 17 दिवस अन्नाचा एक कण आणि पाण्याचा एक थेंबही न घेता आख्ख्या मंत्रीमंडळाला अंतरवली सराटी गावात यायला त्यांनी भाग पाडलं होतं . पण 17 व्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनावर मनोज जरांगेनी आपलं उपोषण सोडलं पण तेही काही अटी आणि मुदतीवर. पण 40 दिवसांच्या मुदतीनंतर आपण आंदोलन तीव्र करणार असल्याचं त्यांनी तेव्हा म्हंटल होतं. मनोज जरांगे यांच्या रूपानं आता 2016- 17 नंतर आता पुन्हा एकदा मराठा आंदोलनानं राज्यव्यापी स्वरूप धारण केलयं. कारण आज अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटील यांची भव्य दिव्य सभा पार पडलीय. उपोषण सोडल्याच्या तारखेला एक महिना पूर्ण होत असतानाच म्हणजेचं आज १४ ऑक्टोबर रोजी अंतरवली सराटी येथे मराठा बांधवांची भव्य सभा घेण्याचं नियोजन मनोज जरांगे यांनी केलं होतं. आज झालेल्या या सभेसाठी जवळपास २५० एकर जागेची व्यवस्था गावकऱ्यांनी केली होती यातील १५० एकर जागा सभेसाठी तर १०० एकर जागा गाड्यांच्या पार्किंगसाठी नियोजित असल्याचं गावकऱ्यांकडून सांगितलं गेलं. ही जागा उपलब्ध करून देण्यासाठी गावकर्यांनी अक्षरशः स्वतःची उभी पिकं सुद्धा काढून टाकली. न भूतो न भविष्यती अशी तब्बल २५ लाख लोकांची सभा घेऊन मनोज जरांगे पाटलांनी सरकार विरुद्ध एकदम खणखणीत असा दंड थोपटलेलाय. गोदाकाठच्या १३० गावातल्या लोकांनी ही सभा यशस्वी करण्याचा विडा उचलला होता १३ जिल्ह्यातल्या शेकडो गावांचा प्रवास केल्यानंतर १४ तारखेची ही भव्य सभा, आणि त्याचं नियोजन त्याच गावातले लोक करत असल्याचं मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं होतं. एका महिन्यातचं सरकारला अक्षरशः गुढघे टेकायला लावणारा ह्या मराठा वाघाचा इतिहास सुद्धा जबरदस्तयं. त्यानिमित्तानेचं मराठा आंदोलनासाठी आपलं आख्ख आयुष्यचं वाहून घेतलेल्या मनोज जरांगेच्या संपूर्ण जीवनप्रवासाचा आणि आजच्या सभेचा घेतलेला हा इन डिटेल आढावा.

Manoj Jarange patil

(Manoj Jarange Sabha Live | Vishaych Bhari)

मंडळी बीड जिल्ह्यातलं मातोरी हे जरांगे पाटलांचं मूळ गाव. पण जालन्यातल्या अंकुशनगर इथं सासरवाडीची 4 एकर जमीन मिळाल्यामुळ जरांगे पाटील जालन्याच्या अंबड तालुक्यातल्या अंतरवाली सराटी गावात स्थायिक झाले. विशेष म्हणजे त्यातली 2 एकर जमीन त्यांनी मराठा आंदोलनासाठी विकली असं अनेक माध्यमांनी सांगितलंय. पांढरा पायजमा आणि 3 बटनांचा शर्ट, गळ्यात भगवा, अशी त्यांची साधी राहणी. जेमतेम 12 वी पर्यंतचं शिक्षण असणारे जरांगे पाटील शेती करूनचं त्यांचा घरगाडा चालवतात.  पण सध्याला मराठा समाजासाठी काम करणारा एक लढवय्या कार्यकर्ता म्हणून मनोज जरांगे पाटलांची संपूर्ण मराठवाड्यात ओळख झालीय. पत्नी, चार मुलं, तीन भाऊ आणि आई-वडील असं  त्यांचं कुटुंब आहे. मंडळी मनोज जरांगे पाटलांनी अगदी सुरुवातीला काँग्रेस पक्षात काम केलं. पण पुढ काँग्रेसशी फारकत घेऊन त्यांनी शिवबा संघटनेची स्थापना केली. अतिशय आक्रमकपणे त्यांनी संघटनेच्या कामाला सुरूवात केली. मंडळी आंदोलनं करणं हा जरांगे पाटलांचा स्थायीभाव राहिला आहे.सगळ्यात पहिल्यांदा ते 2016 साली पुढं आले. 2016 साली जेव्हा कोपर्डीतल्या अत्याचार  प्रकरणावरून राज्यातला संतप्त झालेला मराठा समाज एकवटला आणि नंतर मराठा क्रांती मोर्चा किंवा मराठा क्रांती मूक मोर्चा या आंदोलनांना सुरूवात झाली तेव्हापासून जालनामध्ये मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं नेतृत्व करत होते. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवरून त्यांनी वेळोवेळी सरकारविरोधी आवाज उठवलाय. फक्त आवाजचं नाही तर अनेकदा उपोषण आणि ठिय्या आंदोलनही केलेली आहेत. त्यांच्या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या याचं आहेत की मराठा समाजाला शिक्षण, नोकरीमध्ये आरक्षण पाहिजे. त्यासाठी सप्टेंबर 2021 मध्येही मनोज जरांगे यांनी अंबडमध्येचं तीव्र आंदोलन केलं होतं. त्यांच्या म्हणण्यानुसार, मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून ४५ मराठा बांधवांनी आपले बलिदान दिले होते. त्या घटनेला बराच काळ लोटला पण सरकारनं वेळोवेळी मराठा समाजाच्या मागणीकडं दुर्लक्ष केलं.

(Manoj Jarange Sabha Live | Vishaych Bhari)


घोषणा करून ही सरकार मदतीच्या बाबतीत मात्र निष्क्रिय राहिलं  म्हणून 2021 मध्ये त्यांनी बलिदान देणाऱ्या मराठा समाजातील कुटुंबियांतील सदस्यांना शैक्षणिक पात्रतेनुसार शासकिय नोकरी आणि १० लाख रुपये देण्यात यावेत यासाठी आधी अंबड तहसिलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण केलं. पण तरीही सरकारनं मराठा समाजाचा मुद्दा गांभीर्यानं घेतला नाही. मग मात्र मनोज जरांगे पाटील यांनी तत्कालीन राज्य सरकारला अल्टीमेटम देऊन चक्क जलसमाधी आंदोलन करण्याची घोषणा केली. त्यावेळी ते म्हणाले होते जर सरकारनं २८ सप्टेंबरपर्यंत मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या कुटुंबियांच्या सर्व मागण्या मान्य केल्या नाहीत तर मी मनोज जरांगे पाटील २९ सप्टेंबर २०२१ रोजी, शहागड  इथल्या उड्डाणपूलारून उडी मारून जलसमाधी घेणार आहे, त्यानंतर राज्यात सकल मराठा समाजाकडून जी काही असंतोषाची लाट उसळेल, त्या उद्रेकास सर्वस्वी सरकारच जबाबदार असेल. असं सांगून त्यावेळी जरांगे यांनी प्रशासनाला त्यांच्या आंदोलनाची दखल घ्यायला भाग पाडलं होतं. मराठी क्रांती मोर्च्याची दखल घेऊन देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात मराठा समाजाला  काही काळासाठी का होईना जे sebc आरक्षण मिळालं होतं आणि त्यातून ज्या भरत्या झाल्या होत्या त्यामध्ये सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांना तात्काळ नियुक्त्या द्याव्यात म्हणूनही जरांगेंनी मोठ्या प्रमाणावर आवाज उठवला होता.

Manoj Jarange patil

(Manoj Jarange Sabha Live | Vishaych Bhari)

तेव्हा सुद्धा त्यांनी चक्क सरकारला अल्टीमेटम दिला होता की जर मराठा समाजातील पोरांच्या नियुक्त्या नाही झाल्या तर आम्ही राज्यकर्त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, तसेच आम्ही सर्वपक्षीय आमदारांच्या घरांना घेराव घालू. तेव्हा देखील त्यांनी सरकारला नमतं घ्यायला भाग पाडलं होतं. कोरोनाकाळात जालना जिल्ह्यात आरोग्यसेवांची मोठी हेळसांड चालू होती. त्याचा फटका सरळ सरळ कोरोनाग्रस्त रुग्णांना बसला आणि जालनामध्ये परिस्थिती गंभीर व्हायला लागली होती. तेव्हा सुद्धा त्यांनी जालनामध्ये अतिरिक्त रुग्णालय उभारण्याची किंवा रुग्णालयांच्या मदतीसाठीची यंत्रणा उभी करावी अशी मागणी लावून धरली होती. शेवटी त्यांच्या त्या मागणीचाही ठाकरे सरकारला विचार करावा लागला आणि त्यांनी जालनामध्ये यंत्रणा उभी केली. पण यावेळी मात्र मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण कराव्यात यासाठी त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आमरण उपोषणाचा मार्ग निवडला. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोवर अन्नपाण्याचा घास घेणार नाही अशीच त्यांची भूमिका होती. पण त्यामुळं त्यांच्या तब्येतीवर सुद्धा खूप गंभीर परिणाम व्हायला लागले होते. त्यांची प्रकृती अधिक खालावलीये ह्ये लक्षात आल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांच्याशी संपर्क साधला. जरांगे तेंव्हा म्हणाले होते की, मला मुख्यमंत्र्यांचा फोन आला, त्यांनी सांगितलं तुम्ही आंदोलन थांबवा आपण मराठा समाजाला आरक्षण देणार आहोत. त्यावर मनोज जरांगे त्यांना म्हणाले, साहेब तुम्ही कसं आरक्षण देणार. तुम्ही आरक्षणासाठी जी समिती नेमली होती त्या समितीला 3 महिन्याचा अल्टीमेटम दिला होता. पण त्या समितीनं अजून कोणता डेटा सबमिट केला नाही मग तुम्ही कशाच्या आधारावर मराठा समाजाला आरक्षण देणार.

(Manoj Jarange Sabha Live | Vishaych Bhari)

त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की मी समितीशी बोलून एक तासात माघारी कॉल करतो. पण त्यांचा कॉल आला नाही मात्र त्यानंतर पोलीस आले आणि त्यांनी आमच्यावर अमानुष पद्धतीनं लाठीहल्ला केला. त्यानंतर जरांगे यांनी माध्यमांना त्यांची पहिली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सरकारला हा सर्वात मोठा डाग आहे. माझ्या माता माऊलीला गावात येवून मोघलाईनं मारलं नाही,पण तुम्ही मारलंत. शिंदे साहेब सर्व मराठ्यांच्या  तुमच्याकडून अपेक्षा होत्या. पण तुम्ही आमच्या माता माऊलींवर गोळीबार करायला लावला. अहो मला उठताही येत नाही. तरी माझ्यावर तुम्ही हल्ला करायला लावता. तुमच्या आयुष्यातला हा मोठा डाग आहे. आम्ही काय केलं की आमच्या माता माऊलींना तुम्ही घरात घुसून मारलं? आमच्यावर गोळीबार? आम्ही काय केलं? शांततेत मागणी केली की, आम्हाला आरक्षण द्या. उपोषण केलं. शिंदे साहेब तुम्हाला आणखी एकदा सांगतो, आताच या लोकांना थांबायला सांगा, नाहीतर हे गावात धिंगाणा घालतील. आमच्या माता माऊलींना धक्का लागू देऊ नका. आम्ही काही केलेलं नाही. आम्हाला आरक्षण पाहिजे, ते मरेपर्यंत मी घेणारच असाही निर्धार त्यांनी व्यक्त केला. पुढं ते म्हणाले, “आता मला गोळ्या घाला. माझ्यात शक्ती नाही. ज्या माणसाच्या पोटात पाच दिवसापासून पाण्याचा थेंब नाही तो माणूस उठू शकत नाही. मला उठता येईना, मी बसून राहिलो. मला मीडियासमोर गोळ्या घाला . शिंदे साहेब ,गावात कर्फ्यू लागलाय, थांबवा. तीन महिने झालं, समिती काम करत नाही. मी टीव्ही मीडियाच्या माध्यमातून सरकारला आवाहन करतो, लाठीचार्ज करु नका. लोकं घाबरायला लागले आहेत.

Manoj Jarange patil

(Manoj Jarange Sabha Live | Vishaych Bhari)


तुम्ही लहान मुलांना मारलं अशी संतप्त प्रतिक्रिया ही मनोज जरांगे यांनी तेव्हा दिली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांसोबत राज्यातल्या सर्वपक्षीय नेत्यांना स्वतःच्या आंदोलन मंडपापर्यंत यायला त्यांनी भाग पाडलं. त्यामध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर, इम्तियाज जलील, अशोक चव्हाण, रावसाहेब दानवे, गिरीश महाजन, छत्रपती उदयनराजे भोसले, छत्रपती संभाजीराजे, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे या आणि इतर डझनभर नेतेमंडळींनी जरांगे यांचं उपोषण सुरू असताना तिथ भेट दिली. अनेक नेत्यांनी जरांगे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. जरांगे पाटलांच्या या तीव्र उपोषणामुळे त्यांच्या मुलीनं सुद्धा लोकांना भावनिक साद घातली. भाजप शिंदे गटाच्या सरकारमधील अनेक नेते जरांगे यांनी उपोषण मागं घ्यावं यासाठी अंतरवाली सराटी गावात ठिय्या मांडून बसलेवते. निजामकालीन पुरावे, कुणबी प्रमाणपत्र अशा अनेक गोष्टींवर खूप वेळा विचार विनिमय झाला. शेवटी 17 दिवसांनंतर  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण सोडल्यानंतर मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढण्यासाठी सरकारला ४० दिवसांची मुदत दिली. या ४० दिवसांतही जरांगे स्वस्थ बसले नाहीत. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यांचा दौरा काढत त्यांनी मराठा बांधवांची मोट बांधण्याचा प्रयत्न तसाच सुरू ठेवला. त्यानंतर त्यांच्या सभांना तुफान गर्दी होत असल्याचं चित्र पहायला मिळालं. २०१६-१७ साला नंतर जवळपास ६ वर्षांनी मराठा बांधवांना एकजूट करण्यासाठी मनोज जरांगे यांनी प्रयत्न सुरू केलेत. आज सुद्धा लाखो लोकं या सभेसाठी उपस्थित राहिले होते. अनेक जिल्ह्यातून गाड्याच्या गाड्या भरून तिथं पोहोचल्या होत्या. पण यानिमित्तानं 2016 नंतर पुन्हा एकदा मराठा समाज एकवटलाय आणि त्याच्यामागं मनोज जरांगे पाटील नावाचा सामान्य माणूसय. आजच्या सभेत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर तीव्र शब्दांत निशाणा साधला .

हे विषयच भारी वाचलेस का भावा !

(Manoj Jarange Sabha Live | Vishaych Bhari)

विशेषत त्यांचा रोख छगन भुजबळांवर होता. जरांगेंच्या आजच्या भाषणात त्यांनी भुजबळांनी केलेल्या ७ कोटीच्या आरोपाला पद्धतशीरपणे खोडून काढले.‌सोबतच त्यांनी फडणवीसांवरही टीका केली. तसेच उपमुख्यमंत्र्यांचे कार्यकर्ते म्हणून गुणरत्न सदावर्तेंवरही टीका केली.‌ मराठा आरक्षण आपण या सरकारच्या छाताडावर बसून मिळवूच . असं म्हणून जरांगे पाटलांनी २२ तारखेनंतर या आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्याबाबत वक्तव्य केले. तसेच जर १० दिवसात सरकारने आरक्षण दिले नाही तर होणार्‍या परिणामास सरकारच जबाबदार राहील. मी पुन्हा उपोषण सुरू करेन असं म्हणून जरांगे पाटील यांनी सरकारला परत कोंडीत पकडलं.एकूणच गेल्या दोन‌ महिन्यांपासून एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या मराठा समाजाच्या या व्यक्तीनं अक्षरशः सरकारला गुडघ्यावर आणल्याचंच दिसून आलंय.पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय मनोज जरांगे यांची पुढची भूमिका काय असेल ,तुमच्या मते त्यांची आजची सभा कशी पार पडलीय , सरकार खरंच १० दिवसात आरक्षणाचा निर्णय घेईल का ? की पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मागणीवर सरकार कडून एखादी पळवाट शोधली जाईल? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा

मराठा समाजाच्या या माणसानं सरकारला गुडघ्यावर कसं आणलं | Manoj Jarange Sabha Live | Vishaych Bhari

Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇

https://www.facebook.com/vishaychbhari

https://www.facebook.com/aplavishaychbhari

One response to “मराठा समाजाच्या या माणसानं सरकारला गुडघ्यावर कसं आणलं | Manoj Jarange Sabha Live | Vishaych Bhari”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *