Manoj Jarange Patil यांच्या आंदोलनात पुढे या ५ गोष्टी घडू शकतात | मनोज जरांगे पाटील | Vishaych Bhari
पंतप्रधान मोदींनी राज्याच्या मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांना एक फोन केला तर ४ तासांत सगळी कागदपत्रं घेऊन ते आंतरवली सराटी येथे बंगाट पळत येतेत..! मोदींनी फोन केला की आरक्षण मिळतंय.. मी सांगतो तुम्हाला. त्यांना गरिबांची जाण आहे. पण आता मागील २ महिने आम्ही पाठपुरावा केला तरी आमची दखल का घेईनात काय माहिती? पण मोदींचा फोन आला रे आला की समजा तुमच्या सगळ्या चॅनेलला ब्रेकिंग न्यूज फक्त मराठा आरक्षणाचीच असणार.. मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे, त्याशिवाय त्यांनी ४१ दिवस घेतलेच नसते, पण त्यांची कुणीतरी अडवणूक करतय..! सरकारला या घटनेचं गांभीर्य नाही असंच आता म्हणावं लागेल, कारण मागील ४० दिवसांत जालना येथे एका बैठकीला विभागीय आयुक्तांनी आमच्या प्रतिनिधींना बोलावलं, त्याशिवाय सरकारतर्फे कसलाही संपर्क आम्हाला झालेला नाही..! आम्ही तुमच्या दारात काही मागायला आलो का? नाही ना? मग तुम्ही पण आमच्या गावाकडं फिरकायचं नाही..!
Manoj Jarange Patil
२५ ऑक्टोबर २०२३ रोजी मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू करताना माध्यमांसमोर उच्चारलेली ही वाक्यं. राज्यातील मराठा बांधवांना ओबीसी कोट्यातून सरसकट आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी साधारण दोन महिन्यांपूर्वी आंदोलन सुरू केलं. सुरुवातीला १७ दिवसांचं उपोषण केल्यानंतर त्यांनी सरकारला आरक्षण देण्यासाठी ४० दिवसांची वेळ दिली होती. ही वेळ आता संपली आहे. जरांगे यांनी आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली असून त्यांच्या आंदोलनाची पुढची दिशा आता नेमकी काय असेल हेच आपण या ५ मुद्द्यांच्या आधारे समजून घेऊयात.
(Manoj Jarange Patil | Vishaych Bhari)
पहिला मुद्दा आहे जरांगेंचं आमरण उपोषण.
मी काहीही न खाता, पिता तसेच कुठलेही वैद्यकीय उपचार न घेता आमरण उपोषण करेन असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. हे उपोषण त्यांनी आजपासून सुरू केलंय. त्यामुळे आरक्षणासाठी पुन्हा सरकारवर दबाव निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. आरक्षण जाहीर झालं ही एकच बातमी आपल्याला ऐकायची असून त्याशिवाय कुठलंही बोलणं माझ्याशी करू नका असं जरांगे ठामपणे सांगतायत. शिवाय इतर आंदोलकांनी गावागावांतून जिल्हा परिषद गटाच्या पातळीवर साखळी उपोषण चालू केलं आहे. मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातही या उपोषण आणि आंदोलनाचं वारं सुरूच आहे. टिकणारं आरक्षण देण्यासाठी आणखी काही दिवसांचा वेळ द्या, असं सरकारतर्फे गिरीश महाजन म्हणत असले तरी उपोषण किंवा आंदोलन मागे घ्यायला जरांगे पाटील आणि इतर आंदोलकांनी विरोधच केला आहे. साखळी पद्धतीने उपोषण करणारे आंदोलकही २८ ऑक्टोबरपासून आमरण उपोषणाला बसतील. शेकडो किंवा हजारोंच्या संख्येने लोक आमरण उपोषणाला बसणं ही गोष्ट सरकारसाठी निश्चितच परवडणारी असणार नाही. मात्र सरकार खडबडून जागं व्हावं यासाठी हा लढा प्राणपणाने लढावाच लागेल असं जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे. आता १७ दिवसांचं उपोषण,त्यानंतर राज्यभरातील सभा, ४० दिवसाचं अल्टीमेटम यानंतरही जरांगे पाटलांची मागणी पूर्ण झाली नाहीये. त्यामुळे सरकारला जरांगे पाटलांचं हे दुसरं उपोषण नक्कीच जड जाऊ शकतं. शिवाय सरकारच्या विश्वासार्हतेवरही यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकतं .
(Manoj Jarange Patil | Vishaych Bhari)
आंदोलनाची दिशा सांगणारा दुसरा टप्पा आहे राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्याचा.
आंतरवली सराटीसह सर्वच गावांत स्थानिक लोकांनी पुढाऱ्यांना उत्स्फूर्त गावबंदी करावी असं आवाहन जरांगे पाटलांनी केलं आहे. जिल्हानिहाय या गावबंदीच्या फ्लेक्सचं मोफत वाटप लोकांना केलं जाऊ लागलं आहे. काही गावांतून पुढाऱ्यांना काळे झेंडे दाखवून निषेध केला जाऊ लागला आहे तर काही नेत्यांच्या सभेत जाऊन लोक घोषणाबाजीही करत आहेत. मागील आठवडाभरात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्या तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेत हे प्रकार घडल्याचं दिसून आलं. ही गावबंदी फक्त सत्ताधारी पक्षाच्या आमदार, खासदार आणि इतर प्रतिनिधींपुरती मर्यादित नाही. ती सर्वच पक्षाच्या पुढाऱ्यांना लागू आहे. शरद पवार अशोक चव्हाण या विरोधी पक्षातील नेत्यांनाही अध्येमध्ये मराठा आंदोलकांच्या रोषाला बळी पडावं लागलं आहे. मराठा आरक्षणाच्या लढाईत या नेत्यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, आरक्षणाविषयी स्वतःची भूमिका स्पष्टपणे मांडून सरकाररा पाठपुरावा करावा अशी आंदोलकांची यामागील अपेक्षा आहे. असो , पण ज्या लोकांना उपोषणात सहभाग घेता येणार नाही ते मोर्चाच्या माध्यमातून आपला आक्रोश सरकारपर्यंत पोहोचवतील, म्हणून साखळी उपोषण, गावबंदी आणि मोर्चे अशा तिहेरी अस्त्राचा वापर मराठा बांधवांनी सुरू केला आहे. याकडे सरकार किती गंभीरपणे पाहतय यावर आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे. पण गावपातळीवर पोहोचलेली ही आंदोलनाची धग सरकारसाठी नक्कीच चिंतेचा विषय ठरू शकणार आहे.
(Manoj Jarange Patil | Vishaych Bhari)
तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे तो जरांगे पाटील यांनी अवलंबलेलं सर्वसमावेशकतेचं धोरण
अर्थात मराठा प्लस धनगर. दसऱ्याच्या दिवशी चौंडी, अहमदनगर येथील धनगर बांधवांच्या मेळाव्याला उपस्थित राहून जरांगे पाटील यांनी संबोधित केलं. धनगर आरक्षणाला आपला पाठिंबा असून आपल्या न्याय हक्कासाठी चवताळून उठा असा सल्ला जरांगे यांनी याठिकाणच्या आपल्या भाषणात दिला. धनगर, ओबीसी, दलित किंवा आदिवासी बांधवांमध्ये मराठ्यांविषयी आणि त्यांच्या आरक्षणाविषयी गैरसमज पसरवले जात असतील तर ते दूर केले पाहिजेत. सर्वांना विश्वासात घेऊन सोबत पुढे गेलं पाहिजे अशी मांडणी जरांगे पाटील करत आहेत. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात जरांगे पाटील यांच्या याच कृतीचं कौतुक उद्धव ठाकरे यांनीही केलं. आता ही सर्वसमावेशक गोष्टीमागची जातीय समीकरणं ही काही राजकीय पुढार्यांसाठी फायद्याची मात्र ठरू शकतात. मागे जरांगे पाटील यांनी एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत, मराठा आणि धनगरांचं दुखणं एकच आहे अशी मांडणी केली होती. आता जर मराठा प्लस धनगर या दोन्ही समाजाने एकत्रितपणे आरक्षणाचा लढा उभारला तर मग हे प्रकरण सरकारला अजूनच जड जाईल.
(Manoj Jarange Patil | Vishaych Bhari)
चौथा मुद्दा आहे, मराठा क्रांती मूक मोर्चासारखं आंदोलन तीव्र करण्याचा .
२०१७ ला मराठा समाजाचे विराट मोर्चै निघाले. सुरूवातीला राज्यभर मोठ्या शांततेत हे मूक मोर्चे निघाले. कुठलाही गडबड गोंधळ न होता, बड्या मराठा नेत्यांशिवाय ते आंदोलन झालं. आताही जरांगे पाटलांचं आंदोलन असंच सुरूय. त्यावेळेस फक्त या आंदोलनाला चेहरा नव्हता आता चेहरा आलाय. लोकांनीही जरांगे पाटलांच्या नेतृत्वावर मोठा विश्वास टाकलाय.
तेव्हा आता जर उपोषणातून आरक्षणाची मागणी पूर्ण झाली नाही तर कदाचित जरांगे पाटलांच्या नेतृत्वात राज्यभर मराठा समाजाचे सरकारविरोधात परत असेच मोर्चे निघू शकतात.
(Manoj Jarange Patil | Vishaych Bhari)
पाचवा मुद्दा आहे तो राजकीय पक्ष स्थापन करण्याचा.
आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही असं दिसू लागलं तर शेवटी शेवटी जरांगे पाटील हे राजकीय पक्ष काढून प्रस्थापित मराठा नेतृत्वाला आणि इतर सर्वपक्षीय नेत्यांना आव्हान देऊ शकतात असं म्हणलं जातंय. जरांगे पाटलांनी राजकारणात उतरायची भूमिका घ्यावी अशी इच्छाही अनेकांनी सोशल मीडियावर व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्यातील मराठा बांधवांची वाढती संख्या लक्षात घेता जरांगे पाटीलही नवी राजकीय भूमिका घेऊन राजकारणात प्रवेश करू शकतात. प्रस्थापित पक्ष तगडे असले तरी मराठा आरक्षणाच्या निमित्ताने मराठा बांधवांची राज्यभर जी सहानुभूती तयार झाली आहे, त्याचा फायदा घेऊन जरांगे पाटील निवडणूकीच्या राजकारणात उतरु शकतात. आता आरक्षण देण्यात सरकार अपयशी ठरलं तर जरांगे यांच्या नेतृत्वात प्रस्थापित आमदार पाडण्यासाठी राज्यातील लोकसभेच्या १५ ते १८ तर विधानसभेच्या ८० ते १०० जागांवर मराठा बांधवांच्या या मतांचा परिणाम नक्कीच होऊ शकतो.
(Manoj Jarange Patil | Vishaych Bhari)
हे विषयच भारी वाचलेस का भावा !
- जरांगे पाटलांच्या सभांमुळे मराठा समाजाचे हे ५ नेते पडतील | Manoj Jarange Patil Live | Vishaych Bhariजरांगे पाटलांना बदनाम करण्यासाठी सरकारचा प्लॅन ऍक्टिव्ह झालाय | Manoj Jarange Patil Live Sabha
- जरांगे पाटलांच्या पश्चिम महाराष्ट्र दौर्यामुळे हे ३ नेते डॅमेज झालेत | Manoj Jarange Patil Live | Vishaych Bhari
- मनोज जरांगे पाटील हे मराठवाड्याचे दुसरे विनायक मेटे ठरतायत का l Manoj Jarange Patil | Vinayak Mete
- जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 13 वा दिवस, बिना अन्नपाण्याचा माणूस किती दिवस जगू शकतो | Manoj Jarange Patil Latest News | Maratha Arakshan Andolan News Today
- मराठा आरक्षणाबाबत शिंदे फडणवीस सरकारने या ३ गेमा केल्यात | Manoj Jarange News Today | Jalna Maratha Arakshan Latest Update
एकूणातच सरकारला आपली ताकद दाखवून देण्याचे आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचं गांभीर्य पटवून देण्याचे सर्वतोपरी प्रयत्न जरांगे पाटील यांनी सुरू केलेत. आजच छत्रपती संभाजीराजे यांनी पुन्हा एकदा जरांगे पाटलांची भेट घेतली आणि त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवलाय .आज राजेंच्या आग्रहास्तव जरांगे पाटलांनी पाणी पिऊन आंदोलन केलंय. पण उद्यापासून ते पाणीसुद्धा टाळतील. असो तर एकूणच या आंदोलनाची दिशा सरकार विरुद्ध इतर सर्व अशीच सध्यातरी झाली आहे.पण तुम्हाला काय वाटतं? या आंदोलनाचं पुढे काय होईल? मराठा आरक्षणाच्या निमित्ताने जरांगे पाटील मराठ्यांचे नेते बनलेत, याचा झटका प्रस्थापित राजकारण्यांना बसेल का? मराठा समाजाला सरकार टिकणारं आरक्षण देऊ शकेल का ? उपोषण, मूक मोर्चे की मग राजकीय पक्षाची स्थापना, जरांगे पाटलांचं पुढचं पाऊल नेमकं काय असलं पाहिजे?तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.
Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇
https://www.facebook.com/vishaychbhari
Leave a Reply