मनोज जरांगे पाटील हे मराठवाड्याचे दुसरे विनायक मेटे ठरतायत का l Manoj Jarange Patil | Vinayak Mete


आज जालन्याच्या आंतरवली सराटी गावात तब्बल दीडशे एकरच्या जागेवर मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची अवाढव्य सभा पार पडली. त्या सभेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखों लोकं उपस्थित राहिलेले होती. त्या सभेत जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणा संदर्भातल्या काही मागण्या सरकारपुढं ठेवत सरकारला दहा दिवसांचा अल्टीमेटम दिला अन सरकारची पाचावर धारण बसवली. राजकीय जाणकारांनी जरांगे पाटलांची ती जंगी आणि विराट सभा म्हणजे जरांगे पाटलाचं शक्ती प्रदर्शन होतं आणि आगामी निवडणूकींच्या धर्तीवर त्याचे खूप वेगळे परिणाम पाहायला मिळू शकतात असं विधान केलं तर काही जणांनी जरांगे पाटलांना विनायक मेटे यांच्यानंतर मराठा समाजाचे सर्वात मोठे नेते म्हणून संबोधलं. काही जणांनी तर पुढं जाऊन मनोज जरांगे पाटील स्वतःचा पक्ष काढण्याचा निर्णय घेतील अशीही शक्यता व्यक्त केलीये. बरं राजकीय जाणकारांप्रमाणे खुद्द बहुसंख्य मराठा समाजानं सुद्धा आरक्षणाच्या आंदोलनानंतर जरांगे पाटलांना त्यांचा सर्वात मोठा नेता मानल्याचं दिसतंय. त्यामुळं पुढं जाऊन जरांगे पाटील निवडणुकीच्या रिंगणात दिसले तर नवल वाटायला नको. कारण शिवसंग्राम पक्षाचे दिवंगत नेते विनायक मेटे यांनी सुद्धा त्यांच्या कार्यकाळात मराठा समाजाची बाजू ताकदीनं लावून धरल्यानंतर पुढं त्यांची राज्याच्या राजकारणात वर्णी लागली होती. आजच्या या Blog मध्ये आपण जरांगे पाटील हे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून त्यांच्या सामाजिक व राजकीय कारकीर्दीची कशी वाटचाल करत आहेत आणि पुढं जाऊन त्ये लोकसभा किंवा विधानसभेला उभे राहू शकतात का याची माहीती घेणार आहोत.

Manoj Jarange Patil 
 Vinayak Mete

(Manoj Jarange Patil | Vinayak Mete)


मंडळी शिवसंग्राम पक्षाचे दिवंगत नेते विनायक मेटे हयात असताना त्यांनी मराठा महासंघाच्या चळवळीच्या माध्यमातून मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी आणि आरक्षणासाठी सातत्यानं आवाज उठवला. त्यांची आक्रमक भाषण शैली लोकांना खूप आवडायची. अगदी तेव्हापासून मराठा समाजाच्या मागण्यासाठी मेटे निकरानं लढा देणारे नेते म्हणून त्यांची ओळख व्हायला लागली होती. आता त्यांच्याचं पाऊलावर पाऊल ठेवून जरांगे पाटील सुद्धा त्यांची वाटचाल करत आहेत. मनोज जरांगे पाटील हे पण तसे मूळचे बीडचे पण ते फार पूर्वीच जालन्याचे रहिवाशी झालेत. त्यांचे वडील शेतकरी. पण लहानपणापासून आरक्षणाचा विषय जरांगे पाटलांच्या डोक्यात फिट्ट बसला होता. मराठा समाजाचं भलं करायचं असेल तर आरक्षणाला पर्याय नाही हे त्यांना पक्कं माहीत झालं होतं. आणि जर आरक्षण हवं आणि जर ते टिकणारंही हवं असेल तर मराठा समाजाला कुणबीचं प्रमाणपत्र देऊन ओबीसी मधून आरक्षण द्या अशी त्यांची मागणी राहिली होती. यासाठी त्यांनी मराठवाड्यात शिवबा संघटना निर्माण करून त्यांनी हजारो कार्यकर्त्यांची फौज तयार केली होती. तेव्हापासून जरांगे पाटील ह्ये मराठा मुद्द्यावरून आक्रमक आहेत.

(Manoj Jarange Patil | Vinayak Mete)

मंडळी 2014 रोजी राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर लोकसभा निवडणुकीदरम्यान मेटे यांनी त्यांचा शिवसंग्राम पक्ष महायुतीत सामील केला आणि त्यांना विधानपरिषदेवर आमदार म्हणून घेतलं होतं. मेटे यांना माहिती होतं की आपल्याला मराठा समाजासाठी जे काही मिळवायचंय त्यासाठी आपल्याला सत्तेचा भाग असणं महत्वाचंय. म्हणून तर त्यांनी सरकार कुणाचं ही असो कायम त्याच्याशी जुळवून घेतलं. भाजपच्या आधी राष्ट्रवादीनेही त्यांना 2 वेळा विधान परिषदेवर संधी दिली होती. त्या काळातही मेटे सत्ताधारी पक्षातील आमदार होते. भाजप, राष्ट्रवादी आणि पुन्हा भाजप असा राजकीय प्रवास करणाऱ्या मेटेंची उठबस कायम बड्या नेत्यांमध्ये राहिली. तत्कालिन मुख्यमंत्री मनोहर जोशी, नारायण राणे, उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पुढे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही त्यांचे सलोख्याचे संबंध राहिले. अन आता तेच मनोज जरांगे पाटील ही करताना दिसतायत. २८ ऑगस्ट २०२३ ला जालन्याच्या अंतरवली सराटी गावात मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्क्षणासाठीचं आमरण उपोषण सुरू केलं होतं. खरंतर त्यावेळी मराठा आंदोलक वगळता तसेच मराठवाड्यातील काही भाग वगळता मनोज जरांगे पाटील यांचं नाव राज्यात कोणालाच माहिती नव्हतं .‌पण जरांगे पाटील तेव्हा चर्चेत आले जेव्हा आंदोलन मिटवायला आलेल्या पोलिसांनी या आंदोलकांवर बेछूट लाठीचार्ज केला. ते आंदोलन तेव्हा खूप चिघळलं. मीडिया आणि विरोधकांनी ते बेकार उचलून धरलं.आणि मग एक एक करून सगळ्या पक्षातले नेते अंतरवली सराटी गावात जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊ लागले. असा एक पक्ष नाही किंवा एक नेता नाही ज्यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली नसेल.

Manoj Jarange Patil

(Manoj Jarange Patil | Vinayak Mete)


फडणवीसांचा अपवाद वगळता अगदी अशोक चव्हाण, शरद पवार, प्रकाश आंबेडकर, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, इम्तीयाज जलील, छत्रपती उदयनराजे भोसले, संभाजीराजे छत्रपती ते अगदी अजित दादा आणि एकनाथ शिंदेही मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला गेले होते. आता त्या सगळ्यांनाच मराठा आरक्षणाबद्दल कणव आहे असं ठामपणे म्हणता येणार नाही. पण मनोज जरांगे पाटील हे सध्या मराठा आंदोलनाचा सगळ्यात मोठा चेहरा झालेले आहेत, ते ओळखूनच आपलं राजकारण मराठा सेंटृरिक करण्याचाच यापैकी अनेक बड्या नेत्याचा मनसूबा होता, असं दिसतंय. आजच्या सभेतील गर्दी पाहता तर जरांगे पाटलांच्या नेतृत्वावर मराठा समाजाकडून शिक्कामोर्तब झालेलं पाहायला मिळालं. त्यामुळं राजकीय पक्षाला मनोज जरांगे पाटील हवे आहेत अशा सोशल मीडियावर कमेंट येतायत. म्हणजे भविष्यात मनोज जरांगे पाटील हे कोणत्या तरी राजकीय पक्षात दिसतील किंवा स्वतःचा स्वतंत्र पक्ष काढून वेगळी वाट धरतील अशा ही चर्चाना उधाण आलंय. आता जरांगे पाटलांच्या भोवतीचं ते मराठा धुर्वीकरण आपल्या दिशेनं वळवण्यासाठी सगळेच नेते प्रयत्न करताना दिसतायत. एवढंच नाय तर सोशल मीडियावरही जालन्याचे पुढचे खासदार हे मनोज जरांगे पाटीलच व्हावेत असं अनेकांनी मत व्यक्त केलंय तर जरांगे पाटलांच्या समर्थकांनी पाटील  जे करतायत त्ये एक सामाजिक आंदोलन आहे त्यामुळे जरांगे पाटील राजकारणात पडणार नाहीत असाही अंदाज व्यक्त केलाय. तर काहींनी मात्र राजकारणात पडल्यावर उलट कायदे प्रक्रियेचा भाग होता येतं, मराठा समाजासाठी हे फायदेशीरच पाऊल ठरेल असं मत सोशल मीडियावर नोंदवलंय.

(Manoj Jarange Patil | Vinayak Mete)

पण याबद्दल मनोज जरांगे पाटील यांचा एकूण track record जाणून घेता ते राजकारणात उतरतील असं वाटत नाही. पण तरीही एक सामान्य घरचा शेतकरी कुटुंबातला व्यक्ती संसदेत खासदार झाला तर ते कोणाला आवडणार नाही. जर आपण त्याबद्दलच अजून खोलात जाऊन बोललो तर मनोज जरांगे पाटील हे कुठून उभे राहतील भाजप शिंदे गट किंवा मग कांग्रेस राष्ट्रवादी कडून का मग मेटे यांच्यासारखा स्वतंत्र पक्ष स्थापन करून. काही facts च्या आधारे हेच समजावून घेऊयात. सगळ्यात आधी तर शरद पवार गटाचा विचार केला तर अलीकडंच राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यामुळं राष्ट्रवादीची ताकद विभागली गेलीये. त्यामुळे जर आता शरद पवार यांना राजकारणात लीड घ्यायचं असेल तर मग त्यांना त्यांची मराठा सेंट्रिक जुनी छबी पुन्हा रिस्ट्क्चर करणं गरजेचं वाटत असेल. अन सध्या त्यांच्यापुढं मराठा समाजाचा खमका चेहरा म्हणून जरांगे पाटील यांचच नाव असेल. दुसरं नावये ठाकरे गटाचं. भाजपच्या धर्माधारित राजकारणाला टॅकल करण्यासाठी मराठा समाजाचा जात फॅक्टर मोठा करून ती मोठी ताकद आपल्यामागं वळवण्यासाठी उद्धव ठाकरें जरांगे पाटलांच्या नेतृत्वाकडं आशेनं पाहत असतील. कारण त्यांच्या सहानुभूतीला जर मराठा सेंट्रिक politics चा आधार मिळाला तर त्याचा त्यांना 2024 च्या निवडणुकीत मोठा फायदा होऊ शकतो.. खास करून मराठवाड्यात. त्यासाठी ते जरांगे पाटलांचं मन वळवण्याचा नक्की प्रयत्न करतील.

Uddhav Thackeray
Manoj jarange patil

(Manoj Jarange Patil | Vinayak Mete)

तिसराय शिंदे गट. आता जरांगे पाटलांनी एकनाथ शिंदे सरकारला धारेवर धरून उपोषण केलं असलं तरी मुख्यमंत्री स्वतः मराठा समाजाचे नेते आहेत याची ही जरांगे पाटलांना कल्पना होती. त्यामुळंच ते कायम एकनाथ शिंदे सोबत संवादाच्या भूमिकेत राहिले एवढंच काय तर त्यांनी त्यांचं उपोषण सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्यूस घेऊन सोडलं होतं. त्यामुळे आता एकनाथ शिंदे ही त्यांच्या मराठा कार्डचा वापर करून आगामी निवडणुकीसाठी जरांगे पाटलांचं मन वळवताना दिसले तर नवल वाटायला नको. कारण एकनाथ शिंदेना उद्धव ठाकरेंच्या वाढत्या सहानुभूतीला शह देण्यासाठी कास्ट फॅक्टरला जवळ करणं गरजेचं वाटत असणार. जर आपण कांग्रेसबद्दल बोललो तर कांग्रेसचे अशोक चव्हाण हे कांग्रेस नेत्यांमध्ये मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यामध्ये नंबर एकला होते. आता अशोक चव्हाण हे स्वतः बराच काळ मराठा आरक्षण समितीचे भाग होते त्यामुळं त्यांना मराठा समाजाच्या ताकदीचा पुरेपूर अंदाजय. त्यामुळं त्ये त्यांची मराठाविरोधी छबी पुसून काढण्यासाठी आणि मराठवाड्यात strong होऊन पुढे पक्षाची बार्गेनिंग लेव्हल वाढवण्यासाठी राज्यातल्या बहुसंख्य जातीचा मास लीडर चेहरा आपल्या सोबत असावा म्हणून प्रयत्नशील होताना दिसतील. त्यामुळं आपसूक आता जरांगे पाटलांच्या नावाचा ते विचार करतील. तिकडं अजित पवार गट आणि त्यातील आघाडीच्या नेत्यांनी जरांगे पाटलांवर झालेल्या लाठीहल्ल्यापासून त्यांच्या आत्ताच्या सभेपर्यंत न्यूट्रल भूमिका घेतलेली दिसली. उलट छगन भुजबळ यांनी ओबीसी मतदारांचा विचार करून वेळोवेळी जरांगे पाटलांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. त्यामुळं जरांगे पाटील अजित पवार गटात जाण्याचा विचार करणं सध्याच्या घडीला तरी शक्य दिसत नाही. सोबतच आंदोलन सुरू केल्यापासून जरांगे पाटलांनी आरक्षणाच्या मागणीवरून फडणवीसांवर निशाणा साधलेला दिसला.

(Manoj Jarange Patil | Vinayak Mete)

आजच्या सभेत सुद्धा त्यांनी नरेंद्र मोदी आणि फडणवीसांना भाषणा दरम्यान टार्गेट केलं. येत्या काळात जर भाजपच्या धर्माधिष्ठित राजकारणाला बळ देण्यासाठी जात फॅक्टरला महत्व देण्याचं ठरलं तर बहुसंख्य समाजाचा नेता म्हणून पक्षश्रेष्ठीकडून जरांगे पाटलांच्या नावाचा नक्की विचार होऊ शकतो. पण जरांगे भाजपकडे कधीच जाणार नाहीत अशीच सध्यातरी चिन्ह आहेत पुढं आपण इतर राहिलेल्या सगळ्या पक्षांबद्दल बोलायचं म्हणलं तर बघा अंतरवली सराटीत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचणारे संभाजीराजे छत्रपती हे स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून नवा विचार रूजवू पाहतायत अन त्यांच्यासाठीही जरांगे पाटील महत्वाचे असतील. राज ठाकरे यांच्या मनसेला ग्रामीण विशेषतः मराठवाड्यात पोहोचायचं असेल तर सध्या मनोज जरांगे पाटील यांच्यासारखा दुसरा प्रभावी चेहरा नाही. त्याशिवाय प्रकाश आंबेडकर यांनीही पिछाडलेल्या मराठ्यांनी सोबत यावं असं म्हणलंय. त्यांनीही मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. अगदी इम्तीयाज जलील ही याठिकाणी उपस्थित झाले होते. बरं सरकारकडून तोडगा काढायला आलेले नितेश राणे, गिरीश महाजन, अर्जुन खोतकर, संदीपान भुमरे, रावसाहेब दानवे, शरद पवार गटाचे नेते राजेश टोपे या सगळ्यांना ही मनोज जरांगे पाटील यांची ताकद माहितैय. सगळ्यांनाच मनोज जरांगे पाटील हवे आहेत.

Raosaheb Danve
Sandipanrao Bhumre
Rajesh Tope
Girish Mahajan
Nitesh Narayan Rane

(Manoj Jarange Patil | Vinayak Mete)

हे विषयच भारी वाचलेस का भावा !


पण खरंतर मनोज जरांगे पाटील हे राजकीय क्षेत्रात उतरतील की नाही हा जर तर चा मुद्दा आहे. सध्या तरी त्यांची भूमिका मराठा आरक्षणासंदर्भातचा सामाजिक लढा चालू ठेवण्याची आहे. पण सोशल मीडियावर अनेक मराठा तरूणांनी आता सर्वसामान्यांचा आवाज असणारे आणि मराठा आरक्षणासाठी तळमळ असणारे मनोज जरांगे पाटील हे आमदार नाहीतर खासदार व्हावेत अशी तीव्र इच्छा व्यक्त केलीय. पण बऱ्याच जणांना वाटतंय जर जरांगे पाटील राजकारणात उतरले तर मनोज जरांगे पाटील यांनी अपक्ष लढावं किंवा मराठ्यांचाच स्वतंत्र पक्ष काढावा आणि सामाजिक आणि राजकीय संघटन वाढवावं. पण आता factual विचार करता रावसाहेब दानवे हे सध्या जालन्याचे सलग पाच टर्म झाले खासदार आहेत. त्यांच्या ऐवजी आता खरंच मनोज जरांगे पाटील हे मैदानात उतरले तर आगामी निवडणुकीत जालन्यातून मनोज जरांगे पाटील vs रावसाहेब दानवे हा नवा सत्तासंघर्ष उभा राहू शकतो. पण तुम्हाला काय वाटतंय, जरांगे पाटील 22 तारखेला त्यांची राजकीय भूमिका स्पष्ट करतील का?, जर ते राजकारणात उतरले तर त्यांनी कोणत्या पक्षातून खासदार किंवा आमदार व्हायला पाहिजे ? मराठा आरक्षणाचा प्रश्न कधीपर्यंत सुटू शकतो ? तसेच त्यांनी राजकारणात उतरावं की उतरू नये, याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

Manoj Jarange Patil हे मराठवाड्याचे दुसरे विनायक मेटे ठरतायत का |Manoj Jarange Patil | Vinayak Mete

Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇

https://www.facebook.com/vishaychbhari

https://www.facebook.com/aplavishaychbhari

6 responses to “मनोज जरांगे पाटील हे मराठवाड्याचे दुसरे विनायक मेटे ठरतायत का l Manoj Jarange Patil | Vinayak Mete”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *