लोकमान्य टिळक हिरो की व्हिलन ? | Lokmanya Tilak Biography in Marathi | Vishaych Bhari
बदनामी आणि वाद महापुरुषांच्या आयुष्यालाच पुजलेले. पण म्हणून त्यांनी लोकांसाठी केलेलं काम अजिबात फोल ठरत नाही. फक्त तेवढ्या मॅच्यूअरपणे लोकांना त्यांच्या कामाकडं पाहता आलं पाहिजे. गांधी, फुले, सावरकर यांच्यासारखं टिळकांच्या भूमिकेवर ही वेळोवेळी अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आलेत. त्यांची शाहू महाराजांच्या वेदोक्त प्रकरणातली भूमिका, आगरकरांशी स्वातंत्र्य आधी की समाज सुधारणा यावर झालेली डिबेट, पंचहौद मिशनचा वाद यामुळं कुणासाठी ते हिरो आहेत तर कुणासाठी व्हीलन. असं म्हणतात की टिळक आणि शाहू महाराजांच्या वादानंतरच कोल्हापूर vs पुणे अशी श्रेष्ठतावादाची लढाई सुरू झाली. असो,तर आजच्या या व्हिडीओमध्ये आपण टिळकांच्या अभूतपूर्व कार्याबद्दल, स्वातंत्र्यलढ्यावेळी त्यांनी घेतलेल्या निर्णयांबद्दल आणि त्याकाळी एकूणच त्यांच्या भूमिका कशा राहिल्या याबद्दल माहिती जाणून घेणारय. अर्थात या व्हिडीओत सांगितलेली माहिती ही टिळकांचे चरित्रकार आणि इतिहास संशोधकांनी दिलेल्या दाखल्यांच्या आधारे कलेक्ट करण्यात आलेलीय याची नोंद घ्यावी…

मंडळी कुणाला माहिती होतं की रत्नागिरीतल्या छोट्याश्या चिखलगावमध्ये जन्मलेला एक सामान्य घरातला मुलगा पुढं जाऊन भारतीय स्वातंत्र्यलढ्यातला एक प्रभावी महापुरुष होईल. 23 जुलै 1856 हा टिळकांचा जन्मदिवस. त्यांचे वडील गंगाधरपंत आधी बदली होऊन पुण्याला आणि नंतर ठाण्याला गेले. पण बाळ टिळकांनी मात्र पुण्यात राहूनचं आपलं मॅट्रिक, बी ए आणि एल एल बीचं शिक्षण पूर्ण केलं. दरम्यान शिक्षणाच्या काळात टिळक आपल्या आरोग्याबद्दल खूप जागरूक होते. त्यांनी कसून व्यायाम केला आणि आपलं शरीर बलदंड बनवलं. त्या शरीरसंपत्तीचा फायदा त्यांना पुढं तुरुंगवास आणि एकूणच स्वातंत्र्यलढ्यातल्या धकाधकीच्या जीवनात झाला. डेक्कन कॉलेजमध्ये शिकत असतानाचं त्यांची गोपाळ गणेश आगरकरांशी गट्टी जमली. आगरकरांवर फुलेंच्या पुरोगामी विचारांचा पगडा होता तर टिळकांची राष्ट्रभक्ती अन स्वराज्याबद्दलची मतं प्रखर होती. पण दोघंही देशसेवेच्या ध्येयानं झपाटलेले. तिथच ठरवलं, आपलं आयुष्य देशासाठी वाहून घ्यायचं. त्याचंकाळात विष्णूशास्त्री चिपळूणकर आपली सरकारी नोकरी सोडून शाळा काढायचा विचार करत होते. टिळक आणि आगरकर त्यांना जॉईन झाले.
( लोकमान्य टिळक हिरो की व्हिलन ? | Lokmanya Tilak Biography in Marathi | Vishaych Bhari )
दरम्यान १ जानेवारी १८८० रोजी त्यांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. टिळकांसह सगळ्यांनी विनावेतन शिक्षकी पेशा पत्करला. शिक्षणाबरोबरच समाजात जागृती यावी या हेतूनं चिपळूणकर, टिळक व आगरकर यांनी १८८१ मध्ये आर्यभूषण छापखाना काढला. अन त्याद्वारे पुढं मराठा हे इंग्रजी भाषेतलं तर केसरी हे मराठी भाषेतलं, अशी दोन वृत्तपत्रे सुरू केली. सुरुवातीला आगरकर केसरीचे तर टिळक मराठाचे संपादक होते. वृत्तपत्रांद्वारे लोकशिक्षण, राजकीय जागृती व शासकीय अन्यायाचा प्रतिकार करणारं विद्रोही लिखाण टिळक करू लागले होते. अगदी कोल्हापूर संस्थानचे दिवाण माधवराव बर्वेंपासून , इंग्रज सरकारच्या गैरकारभारावर ते जहाल शब्दात कडाडून टीका करत असायचे. माधवराव बर्वे प्रकरणात तर टिळक व आगरकरांनी घेतलेल्या भूमिकेमुळं दोघांना चार महिने डोंगरीच्या तुरुंगात डांबण्यात आलं होतं. तो त्यांना घडलेला पहिला कारावास. त्यावेळी त्यांच्या मदतीला कोण धावून आलं होतं माहितीये. महात्मा ज्योतीराव फुले. त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा लोकमान्य टिळक आणि आगरकरांचा २६ ऑक्टोबर १८८२ रोजी जामीन केला होता. दरम्यानच्या काळात १८८२ साली विष्णुशास्त्रींचं निधन झालं. त्यांच्या पश्चात १८८४ साली वेडरबर्न, वर्ड्स्वर्थ, मंडलिक, तेलंग, दांडेकर, य.मो. केळकर, भांडारकर यांना सोबत घेऊन टिळक–आगरकरांनी पुण्यात डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली अन पुढं त्या संस्थेच्या अंडर १८८५ मध्ये फर्ग्युसन महाविद्यालयाची ही स्थापना केली. ही त्यावेळी पुण्यातली खूप मोठी घडामोड होती. पुढं सामाजिक सुधारणा आधी की स्वातंत्र्य आधी यावरून तीव्र मतभेद झाल्यामुळं टिळक आणि आगरकर वेगळे झाले. आगरकरांना आधी समाजातल्या अनिष्ट रूढी, अज्ञान, अंधश्रद्धा, पापपुण्याच्या कल्पना, जातीपातीचं निर्मूलन, धर्माधारित कर्मकांडावर बंदी महत्वाची वाटत होती. कारण त्याचा अल्टीमेटली फायदा देशाच्या स्वातंत्र्यासाठी होईल अशी त्यांची धारणा होती. अगदी असंच काहीस मतं त्याआधी महात्मा फुले यांनीही मांडलं होतं. फुलेंच्या मते जर इंग्रज जायच्या आधी देशात योग्य त्या समाजसुधारणा झाल्या नाहीत तर पुन्हा इथला समाज धर्मांध ब्राम्हणशाहीच्या अन्यायाला बळी पडेल. त्यावेळची एकूण सामाजिक चातुर्वर्ण व्यवस्था बघता फुलेंच्या विधानात सत्यता होती असं अनेक इतिहास अभ्यासक आजही मानतात.
( लोकमान्य टिळक हिरो की व्हिलन ? | Lokmanya Tilak Biography in Marathi | Vishaych Bhari )
त्याउलट जोवर लोकांमध्ये राष्ट्रीयत्वाबद्दल जाज्वल्य अभिमान जागृत होत नाही तोवर संपूर्ण स्वातंत्र्य मिळणार नाही अन देशाची प्रगती होणार नाही असं टिळकांचं मतं होतं. हा, पण त्यांचा समाज सुधारणेला विरोध होता असंही नाही. त्यावेळी त्यांनी शिक्षणासोबत अनेक समाजसुधारणेची ही कामं हाती घेतली होती. त्या सुधारणा अंमलात आणण्यासाठी ते एक स्वतंत्र संस्था स्थापण्याचा ही विचार करत होते. त्या संस्थेतर्फे सोळा वर्षांच्या आत मुलींची व वीस वर्षांच्या आत मुलांची लग्ने करू नयेत; कोणी कोणास हुंडा देऊ नये; विधवांचे वपन करू नये याबद्दलचे कायदे अमलात आणण्याचा त्यांचा मानस होता. त्यांच्यामते, सुईच्या मागोमाग जसा दोरा येतो अगदी तसंच स्वातंत्र्यामागे सामाजिक सुधारणाही येत असतात. टिळकांचं असंही म्हणणं होतं की ‘आमच्या सुधारणा आम्हीच करू, परकीय सत्तेची ढवळाढवळ आमच्या सामाजिक वा धार्मिक बाबतीत होऊ नये. मात्र लोकमत अनुकूल असेल आणि धर्मवचनांच्या बाबतींत तडजोड होत नसेल, तर असा कायदा करण्यासही आमची काही हरकत नाही. त्यांच्या चरित्रकारांच्या मते, टिळकांच्या भूमिका ह्या त्यांच्या धर्मविषयक श्रद्धेतून तयार झाल्या होत्या. टिळकांना राष्ट्राइतकाच हिंदू धर्माचाही खूप अभिमान होता. धर्म हा त्यांच्या व्यासंगाचा विषय होता. त्यांनी वेद, उपनिषदे, तत्त्वज्ञान, धर्मशास्त्रे, गीता व आचार्याची भाष्ये यांचा डीप अभ्यास केला होता. ज्याला हिंदुत्वाचा किंवा हिंदू धर्माचा अभिमान नाही, त्यास हिंदू लोकांनी काय समाजसुधारणा कराव्यात ते सांगण्याचा अधिकार नाही असंही त्यांचं म्हणणं होतं. यामुळं आगरकर आणि त्यांच्यात वादाची ठिणगी पडली अन दोघांच्या लेखण्या त्यांच्या भूमिका प्रखरपणे मांडू लागल्या. दरम्यान पुढच्या काळात टिळकांचा स्वातंत्र्यलढा अधिक तीव्र झाला. असं म्हणतात की, देश पातळीवर सगळ्यात पहिल्यांदा स्वातंत्र्याविषयी बेधडक आणि अग्रेसीव्ह भूमिका मांडण्याचं श्रेय टिळकांना जातं. लोकमान्य कधीच कुण्या व्यक्तीला किंवा कोणत्या परिणामांना घाबरले नाहीत. त्यांनीचं सुरुवातीच्या काळात नेमस्त पक्षांनी घेतलेल्या मिळमिळीत भूमिकेबद्दल आवाज उठवला आणि सगळ्यांच्या मनात स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्कय अन तो मी मिळवणारचं ही भावना पेरली. पुढं लग्नासंदर्भातल्या संमतिवयाच्या कायद्यावरूनही टिळकांवर बरीच टीका करण्यात आली होती. कारण त्यांनी कायद्याविरोधी भूमिका घेतली होती. तेव्हा आगरकर विरूद्ध टिळक एकमेकांसमोर उभे ठाकले होते. टिळकांच्या मते आपल्याला सुधारणा पाहिजे, परंतु ती सरकारी कायद्याने होणे योग्य नाही. कारण त्यात धर्मशास्त्राची गुंतागुंत अधिक होती.
( लोकमान्य टिळक हिरो की व्हिलन ? | Lokmanya Tilak Biography in Marathi | Vishaych Bhari )
त्यानंतर पुण्यात गाजलं त्ये म्हणजे पंचहौद मिशन अंतर्गत झालेला चहा बिस्कीटाचा नाष्टा. आता तुम्ही म्हणाल चहा बिस्कीटाचा नाष्टा ही काय वाद घालण्याची गोष्टय का. तर ऐका, तेव्हा चहा किंवा बिस्कीट हे पदार्थ आत्ताच्या सारखा नॉर्मल ब्रेकफास्टचा विषय नव्हता. तर दोन्ही पदार्थ साता समुद्रापार आलेल्या परदेशी खाद्य संस्कृतीची ओळख असल्यामुळं चहा बिस्कीट खाल्लं तर भारतीयांचा धर्म भ्रष्ट होतो अशी समजूत होती. तर झालं असं की डॉ. आनंदीबाई जोशी यांचे पती गोपाळराव जोशी यांनी पंचहौदमधल्या रे. रिव्हिंग्टन यांच्या मदतीनं पुण्यातील काही लोकांना व्याख्यानाला उपस्थित राहाण्याचं आमंत्रण दिलं. त्यामध्ये लोकमान्य टिळक, न्यायमूर्ती माधवराव रानडे, वि. का. राजवाडे, वासुदेवराव जोशी, रामभाऊ साने, सदाशिवराव परांजपे, विष्णू मोरेश्वर भिडे, चिंतामण नारायण भट, सीतारामपंत देवधर यांच्यासारखे अनेक लोक उपस्थित राहिले होते. दहा बारा महिला ही होत्या. पंचहौदमध्ये व्याख्यान झाल्यानंतर त्या मंडळीसमोर चहा आणि बिस्किटं आणून ठेवण्यात आली. पदार्थ समोर मांडल्यावर साहजिकच उपस्थितांच्या मनात चलबिचल सुरू झाली. ते खाल्लं तर धर्म बुडाल्याचं संकट अन नाही खाल्लं तर समाज सुधारकांच्या प्रतिमेला लागणारा डाग यामुळं त्यांची कोंडी झाली होती. पण नंतर घोटभर का होईना चहा मंडळींनी घशात ढकलून पाहुणचाराचा सन्मान केला. तो सगळा किस्सा गोपाळराव जोशींनी विशेष टिप्पणीसह ‘पुणे वैभव’ या वर्तमानपत्रात छापून आणला आणि सबंध पुण्यात एकच खळबळ उडाली. जे स्वतःला सुधारक समजतात ते आता काय भूमिका घेणार आणि जर सुधारकांचा विजय झाला तर धर्माभिमानी कसे गप्प बसणार याबद्दल चर्चा सुरू झाल्या. पुण्यातल्या लोकांनी ते प्रकरण चांगलच मनावर घेतलं होतं. पुढं एक कमिशन नेमून त्या प्रकरणावर वाद युक्तिवाद करण्यात आले. पुढं 46 जणांवर टाकलेल्या त्या फिर्यादीचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये 9 जणांवरील फिर्याद वेगवेगळ्या कारणांमुळं मागं घेतली होती तर मिशनमध्ये जाऊन चहा न घेतलेल्या 8 जणांना यथाशक्ती दान देण्याचं प्रायश्चित्त सुनावण्यात आलं होतं.

मात्र लोकमान्य टिळकांनी तेव्हा ‘ज्या गोष्टीला धर्मग्रंथात प्रायश्चित्तच लिहिलं नाही, चहाचा धर्मग्रंथात उल्लेखचं केलेला नाही तर त्यासाठी प्रायश्चित्तच का घ्यावे?’ अशी भूमिका घेतली होती. तसा पाहिलं तर टिळकांचा युक्तीवाद बरोबर होता. पण शेवटी तिडा सुटेना म्हणून प्रकरण धर्मपीठाच्या शंकराचार्यांकडं गेलं. शंकराचार्यांनी ही सर्वांनी वेगवेगळी प्रायश्चित्तं घेणं उचितय असं सांगितलं. पुढं टिळकांनी कशाला उगाच प्रकरण ताणून आपल्याचं समाजाचा रोष पत्करून घ्या असा विचार केला. कारण त्यावेळी त्यांना देशकार्यात कोणतीही अडचण नको होती. म्हणून त्यांनी आपण काशीला गेलो असताना प्रायश्चित्त घेतल्याचा पुरावा धर्मपीठाला दिला. पुढं प्रायश्चित्तानंतर हे प्रकरण संपेल असं वाटलं होतं पण प्रत्यक्षात ते जास्तच चिघळलं. ज्यांनी ज्यांनी चहा बिस्कीट खाल्लं होतं त्यांच्यावर थेट ग्रामण्य म्हणजे बहिष्कार लादण्यात आला. टिळकांना तर त्यांच्या घरातल्या कार्यासाठी पुरोहित, आचारी सुद्धा मिळणं कठीण झालं होतं. त्यांच्याकडं कुणी येत जातं नव्हतं. त्यांच्या घरातल्या आयाबायांना ही खूप त्रास सहन करावा लागला होता. हे सगळं रमाबाई रानडे यांनी पुस्तकात लिहून ठेवलंय. खरं तर तेव्हा समाज सुधारकांच्या गोटातून टिळक आणि साथीदारांनी नमती भूमिका घ्यायला नको होती अशा प्रतिक्रिया उमटत होत्या पण धर्माभिमानींची खोड मोडण्यासाठी प्रायश्चित्त घेतल्याचं काहींनी कबूल केलं होतं. त्या प्रकरणी घेतलेल्या भूमिकेवरून ही टिळकांना धारेवर धरलं जातं. आगरकरांनी तर तेव्हा थेट वर्तमानपत्रातून टिळकांवर टीका करायला सुरुवात केली होती. टिळकांनीही पलटवार केले पण अखेर आगरकरांनी ‘बोलणे फोल झाले’ या लेखातून टिळकांची माफी मागितली. टिळकांनी ही त्यावर आपल्या लेखात ‘बोलणे फोल झाले आणि डोलणेही वाया गेले’ अशी वाक्यं लिहिली होती. काही अभ्यासक असं ही म्हणतात की संमतिवयाच्या वादापासून लक्ष विचलित करण्यासाठी सुधारकांच्या शत्रूंनी पंचहौद मिशनचं प्रकरण उकरून काढलं होतं.
( लोकमान्य टिळक हिरो की व्हिलन ? | Lokmanya Tilak Biography in Marathi | Vishaych Bhari )
तसं पाहिलं तर प्रकरण शंकराचार्याकडे जाण्याआधी टिळक केसरीमधून सनातन्यांविरुद्ध लिहीत-बोलत होते. सनातन्यांच्या भूमिकेचं खंडन करणारा पहिला लेख टिळकांनी 23 फेब्रुवारी 1892 च्या ‘केसरीत’ प्रकाशित केला होता. त्या लेखाचा पुढचा भाग 1 मार्चच्या अंकात छापून आला होता. सनातन्यांच्या भूमिकेस शास्त्राधार नाही, सबब सनातन्यांची मागणी बिनबुडाची आहे असं ही त्यांनी लिहिलं होतं. ‘प्रत्येक निषिद्धाचरण ज्ञानत: केल्यानं जर जात मोडते तर बर्फ खाणारे, सोडा पिणारे, कांदे भक्षण करणारे आणि व्याजबट्ट्याचा व्यापार करणारे सर्वच ब्राह्मण लोक जातिबाह्य नाहीत काय?’ असा युक्तिवाद ही त्यांनी केला. भीमशास्त्री झळकीकर, रंगाशास्त्री अशा सनातनी विद्वानांच्या लेखांना टिळक नेटानं उत्तरं देत राहिले. त्यांचा संपूर्ण युक्तिवाद हा त्यांनी अभ्यासलेल्या धर्मग्रंथांवर, धर्मशास्त्रावर आधारलेला होता. चहा, बटाटा अशा पदार्थांचा उल्लेख स्मृतिग्रंथांमध्ये नाही, सबब त्यांस जुने नियम लावू नयेत, असंही ते सांगत होते. पण नंतर सनातन्यांचा हेतू सफल होऊ नये, म्हणून प्रायश्चित्त घेऊन त्या प्रकरणावर पडदा पाडणं गरजेचं होतं असं टिळकांना वाटलं. पण 1912 पर्यंत गाजत राहिलेल्या त्या प्रकरणामुळंच आज महाराष्ट्राच्या घराघरात पाहुणचारासाठी चहा दिला जातो. तिसरं त्यांचं गाजलेलं प्रकरण म्हणजे वेदोक्त प्रकरण. ते काय तर वेदात सांगितल्याप्रमाण ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या ३ वर्णीयांना वेदोक्ताचा अधिकार होता तर अनार्य म्हणजे शूद्राना मात्र पुराणोक्त पद्धतीनं आपले विधी करावे लागायचे. कोल्हापूरच्या शाहू महाराजांना घाटगे घराण्यातून दत्तक घेण्यात आल्यामुळं ते मूळचे क्षत्रिय नाहीत हे कारण देऊन त्यांचा राज्यभिषेक वेदोक्त पद्धतीनं होऊ शकत नाही असा पवित्रा नारायण भटजीनं घेतला. तो पुराणोक्त मंत्र म्हणून विधी करत होता. तेव्हा शाहू महाराजांनी आपण क्षत्रिय आहोत अन त्यामुळं आपला विधी वेदोक्त पद्धतीनं झाला पाहिजे असं मतं व्यक्त केलं होतं. पण जोवर ब्राह्मण तुम्हाला क्षत्रिय म्हणून मान्यता देत नाहीत तोवर तुम्ही शूद्र आहात असं नारायण भटजी म्हणाला. त्याला आप्पासाहेब राजोपाध्ये जे शाहू महाराजांच्या दरबारी पुरोहित होते त्यांनीही दुजोरा दिला. त्या गोष्टीची गांभीर्यता लक्षात आल्यावर शाहू महाराजांनी राजोपाध्ये यांना मिळणार वार्षिक 30000 इनाम बंद केला. त्यावर नाराज झालेले राजोपाध्ये आपलं गाऱ्हाण घेऊन टिळक, न. चि. केळकर, दादासाहेब करंदीकर यांच्याकडं गेले. त्या प्रकरणी सर्व सनातन्यांनी शाहू महाराजांविरुद्ध भूमिका घेतली होती. स्वतः टिळकांनी २२ व २९ ऑक्टोबर १९०१ ला ‘ वेदोक्ताचे खुळ’ या नावाचे दोन अग्रलेख केसरीत लिहून शाहु महाराजांवर टीका केली होती. ते अग्रलेख आजही उपलब्ध आहेत.
बाळाचार्य म्हणतात, “वेदोक्त प्रकरणात शाहू महाराजांच्या विरुद्ध भूमिका घेण्याचे टिळकांना काही कारण नव्हते आणि माझ्या आठवणीप्रमाणे टिळक या प्रकरणात महाराजांच्या बाजूचेच होते. महाराजांनी प्रायश्चित्ताबद्दल हट्ट धरू नये, काळ बदलला आहे असं ही टिळकांचं मत होतं. मात्र, त्याबद्दल ते उघडपणे भांडत नव्हते. टिळकांनी त्याप्रसंगी सावध भूमिका घेतली होती. पण तो वेदोक्ताचा वाद पुढे खूप वाढला, दोन्ही पक्ष आपापल्या बाजूने ऐतिहासिक पुरावे, प्रतिष्ठित व्यक्तींचा पाठींबा मिळवून आपली बाजू बळकट करू लागले. त्याप्रसंगी टिळकांनी असा ही तोडगा काढल्याचं बोललं जातं की महाराज क्षत्रिय आहेत, कारण ते छत्रपतींच्या गादीवर बसलेले आहेत. छत्रपतींना वेदोक्ताचा अधिकार असल्याने महाराज क्षत्रिय ठरतात. पण हा क्षत्रियत्वाचा अधिकार त्यांच्या घराण्यातील इतर कोणालाही मिळणार नाही. अर्थातच शाहू महाराजांना तो तोडगा मान्य झाला नाही.
वास्तविक हा वाद सर्वस्वी हिंदू धर्मातील होता पण शाहू महाराजांची बाजू वरचढ दिसायला लागल्यावर राजोपाध्ये यांनी तो वाद इंग्रजांकडे नेला. पण तिथही शाहू महाराजांचाच विजय झाला. वेदोक्त प्रकरणी शेवटी शाहू महाराजांचं क्षत्रियत्व महाराष्ट्रातील ब्राह्मणवृंदानी मान्य केलं. पण त्यानंतरच महाराष्ट्रात ब्राह्मणेतर चळवळ सुरू झाली. असं म्हणतात की ज्योतिराव फुल्यांच्या “सत्यशोधक समाजा”तील कार्यकर्त्यांना जवळ करून शाहू महाराज तेव्हा ब्राह्मणशाहीवर वैचारिक हल्ले करत होते. त्यावेळी शाहू महाराजांनी घेतलेली अस्पृश्य निर्मूलन, सर्वजातधर्मातील लोकांना सक्तीचं शिक्षण, महिलांचे अधिकार, मागासलेल्यांचा विकास या भूमिका तत्कालीन सनातनी लोकांना आवडल्या नव्हत्या. पण शाहू महाराज राजे असल्यामुळं त्यांची कोंडी झाली होती. मग ते छुप्या आणि गलिच्छ पद्धतीनं शाहू महाराजांचा विरोध करत राहिले. त्यांनी शाहू महाराजांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले. त्यावेळी कोल्हापूरात टिळकांच्या पुढाकारानं लोकप्रतिनिधी सभा अस्तित्वात आलेली होती. त्या सभेत बहुसंख्य ब्राह्मण असून प्रो. विजापूरकर, राशिंगकर, अळतेकर, अभ्यंकर, गोखले अशी मंडळी नेतेपदी होती. ऑक्टोबर 1906 मध्ये त्या सभेची पहिली व शेवटची बैठक झाली. त्या बैठकीत एका नेत्याने उद्गार काढले कि, “कोल्हापुरातील प्रत्येक स्त्री-पुरुषाला आपल्या वित्ताचे, जीविताचे किंवा नैसर्गिक हक्कांचे कसे संरक्षण होईल याची रात्र – दिवस काळजी पडली आहे. दुसऱ्या सभेच्या आधी महाराजांबद्दल घसरगुंडीची गलिच्छ कथा पसरवून कोल्हापूरात स्त्री सुरक्षित नाही असाही प्रचार कोल्हापूरातल्या काही ब्राम्हणी वृत्तपत्रानी केला होता. अन टिळक त्या लोकप्रतिनिधी सभेचे पुढारी असल्यामुळं सगळ्यांनी टिळकांना त्यासाठी जबाबदार धरलं होतं. पण खरेतर लोकमान्य आणि शाहू महाराज एकमेकांचे कट्टर विरोधी नव्हते.
( लोकमान्य टिळक हिरो की व्हिलन ? | Lokmanya Tilak Biography in Marathi | Vishaych Bhari )
कारण भारतीय स्वातंत्र्ययुद्धात लोकमान्य टिळकांना अतिशय गुप्तपणे काही बंदुका आणि पैसे शाहू छत्रपतींनी पाठवून दिले होते, अशी ज्ञानकोशकार ग. रं. भिडे यांची साक्षय. त्याच प्रमाणे गणपतराव जांबोटकर यांच्या १ ऑगस्ट १९७१ च्या ‘केसरी’मध्ये प्रसिद्ध झालेल्या मुलाखतीत लोकमान्यांच्या गुप्त संघटनेला १९०३ ते १९०८ पर्यंत शाहू छत्रपती दरवर्षी ५०० रुपये देत असल्याची नोंदय. त्यामुळं टिळकांचा शाहू महाराजांशी वाद होता वैर नव्हते असं जाणकारांचं म्हणणंय. टिळकांची एकूणच कारकीर्द बघता त्यांना सुधारक किंवा सनातनी यापैकी एका प्रकारचा शिक्का त्यांच्यावर मारता येत नाही. कारण काळानुसार त्यांच्या भूमिका बदलत राहिल्या. त्यामुळं सनातनी त्यांना ‘छुपे सुधारक’ म्हणतात तर सुधारकांच्या मते ते सनातनी होते. पण केवळ बडबड करणारे सुधारक व जातिबहिष्काराची भाषा करणारे शुक्लपक्षीय सनातनी या दोघांबद्दल आपल्याला चीड असल्याचं टिळकांनी म्हटलं होतं. त्यांच्यामते धर्मात राहूनचं धर्मातल्या चुका सुधारता येतात. आता काळानुरूप टिळकांच्या भूमिका बघा. 1895 साली काँग्रेसच्या पुणे इथे भरलेल्या अधिवेशनात सहकारी कृष्णाजी अनंत भालेकर यांनी मंडपाच्या प्रवेशद्वारापुढे अर्धनग्न शेतकऱ्याचा पुतळा उभा करून याचे तुमच्या काँग्रेसमध्ये काय स्थान आहे असा प्रश्न विचारला होता. त्याची दखल घेऊन टिळकांनी केसरीतील अग्रलेखात काँग्रेसने शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे असं निक्षुन सांगितलं होतं. खोत, सावकार अशा देशी शोषकांनी चालवलेलं शोषण परकीय ब्रिटिश सरकारच्या शोषणापेक्षा अधिक धोकादायक नाही. त्यामुळे आधी परकीय शत्रूला नमवून मग आपल्या समाज व्यवस्थेत बदल घडवावा लागेल असं त्यांचं सर्वसाधारण सूत्र होतं. पण याचा अर्थ ते सावकारकीचे समर्थक होते असा होत नाही असं ही अनेकांना वाटतं. कारण त्यांनी काढलेल्या शाळा, कॉलेजेस, वर्तमानपत्र ही त्यांची सुधारणावादी कामच होती. कोणताही लढा पुरेश्या पाठबळाशिवाय शक्य नसतो हे त्यांनी सशस्त्र क्रांतीकारकांना सांगितलं होतं.

दरम्यान काहीजण त्यांना मुस्लिमद्वेष्टे ठरवतात पण आमचे यापुढील शिवाजीराजे मुसलमानातूनही येऊ शकतात असं टिळकांनी एकदा विधान केलं होतं. कदाचित त्यांची ही भूमिका मुसलमानांबद्दल त्यांचं काय मतं होतं हे सांगण्यास पुरेशीय. मुंबईत दैनिक काढण्यासाठी त्यांनी स्थापन केलेल्या कंपनीच्या संचालक मंडळात मुसलमानही होते. दर शुक्रवारी हे पत्र मुस्लिम बांधवांसाठी विशेष पुरवणी म्हणून छापणार होतं. म्हणून तर लखनऊ कराराच्या माध्यमातून टिळकांनी मुस्लिमांसाठी सात राज्यांमध्ये १५ ते ४० टक्के राखीव मतदारसंघ देण्याचा प्रस्ताव मंजूर करुन घेतला. हा करार करण्यातली लोकमान्यांची भूमिका दूरदृष्टीची होती. त्यामुळंच की काय शौकत, महंमद अली, बॅरिस्टर जिना, हसरत मोहानी टिळकांना मुसलमानांचा शत्रू मानत नसून मित्र व मार्गदर्शक मानत होते. मुहम्मद अली जीना तर लोकमान्यांचे शिष्य म्हणून नावारुपाला आले होते. जिना टिळकांच्या प्रत्येक निर्णयात सहभागी असायचे. एवढंच काय, मंडालेच्या तुरुंगातून सुटून आल्यावर ब्रिटिश सरकारनं त्यांना आणखी एका खटल्यात अकडवलं होतं. तेव्हा स्वतः जीना यांनी मराठी शिकून, समाजावून घेऊन टिळकांच्या बाजूने युक्तीवाद केला होता अन टिळकांना त्यातून मुक्त केलं होतं. हे तर काहीच नाही टिळकांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पार्थिवाला महात्मा गांधी, मौलाना शौकत अली, जवाहरलाल नेहरू, लाला लजपतराय यांबरोबर मुहम्मद अली जीना यांनी सुद्धा खांदा दिला होता. 1920 च्या एप्रिल महिन्यात टिळकांनी काँग्रेस डेमोक्रॅटिक पक्षाची घोषणा करून त्याचा जाहीरनामाही प्रकाशित केला. या जाहीरनाम्यात जातिभेद आणि लिंगभेदाविरुद्ध स्पष्ट भूमिका घेण्यात आली होती. विशिष्ट वयाखालील मुलामुलींना मोफत शिक्षण देण्यात येईल असे स्पष्ट आश्वासन दिलं होतं. जाहीरनाम्याचा आराखडा टिळकांनी गांधी आणि जिना यांना दाखवला होता. आता ही गोष्ट खरी आहे की टिळकांची ही व्यापक भूमिका समजून घेऊन ती पेलू शकणारा अनुयायी टिळकांना मिळाला नाही. त्यांच्या अनुयायांमध्ये सनातनी विचारसरणीच्या कर्मठ लोकांचे आधिक्य होते. पण त्यात टिळकांचा दोष नव्हता असं आजही अनेक अभ्यासकांना वाटतं. कारण शेवटी महापुरुषांनासुद्धा परिस्थितीच्या मर्यादेत राहूनच कार्य करावं लागतं. टिळकांच्या मृत्युपश्चात आठ वर्षांनीत्यांचा मुलगा आणि सुधारणावादी चळवळीचा आवाज असणारे श्रीधर टिळक यांनीही रेल्वे खाली आत्महत्या केली होती. ती गोष्ट सगळ्यांसाठीच धक्कादायक आशी होती. बाळ गंगाधर टिळक नाही तर श्रीधर टिळकच खर्या अर्थाने लोकमान्य होते हे त्याकाळी अनेक सुधारणावादी नेत्यांचं म्हणणं होतं, असो बाकी टिळकांचा मंडालेचा तुरुंगवास, भयंकर राजकीय समज, धर्मशास्त्रातला गाढा अभ्यास, शिक्षणक्षेत्रातलं योगदान, स्वातंत्र्यलढ्यातलं नेतृत्व या सगळ्यांचा विचार करता टिळक खऱ्या अर्थानं अनेकांसाठी प्रेरणास्थान आहेत हे मात्र नक्कीय. पण तुमची लोकमान्य टिळकांच्या कार्याबद्दल नेमकी काय मतं आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर ही माहिती आवडली असेल तर लेख लाईक आणि शेअर करा.
Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇
https://www.facebook.com/aplavishaychbhari
Leave a Reply