मंडळी कोकण आणि गणेशोत्सव यांचं नातं तसं शब्दात सांगणं अशक्य. म्हणजे गणेशोत्सव संपूर्ण महाराष्ट्रात साजरा होत असला तरी कोकणातील गणेशोत्सवाचा उत्साह काही औरच. कोकणातल्या परंपरा, रूढी, प्रथा यामुळं तिथल्या गणपतीची सगळ्या देशात चर्चा असते. कोकणालीत लोकांच्या मनात गणेश चतुर्थीच्या सणाबाबत इतकी उत्सुकता का असते आणि कोकणातील गणेशोत्सव हा संपूर्ण महाराष्ट्रात खास का आहे यामागं अनेक कारणं आहेत. त्यातील तीन प्रमुख कारणं आज आपण या लेखाद्वारे जाणून घेणारय…

(Kokan Ganesh Utsav Kokan Ganpati Festival)
१) गणपतीवरील श्रद्धा
निसर्ग सौंदर्याने नटलेल्या कोकणातील कोकणी माणसाची गावातील ग्रामदेवता आणि गणपती या दोन दैवतांवर अपार श्रद्धा आहे. बारा पाचाच्या गावऱ्हाटीतील ग्राम देवतांचा आदेश शिरोधार्य मानणाऱ्या कोकणी माणसाचं गणपती हे आराध्य दैवत. गावच्या देवांच्या जत्रा, शिमगा आणि गणेश चतुर्थी हे कोकणी माणसासाठी जिव्हाळ्याचे सण. मात्र त्यात गणेशोत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गणेशोत्सव कोकणात केव्हा रुढ झाला याचं निश्चित उत्तर नसलं तर अनेक कुटुंबातील शेकडो वर्षांची परंपरा पाहता हे दैवत गेल्या अनेक शतकांपासून कोकणात लोकप्रिय झालेलं असावं. कोकणात दसरा, दिवाळी आदि सण तसे मोठ्या प्रमाणात साजरे होत नाहीत. पण गणेशोत्सवाची मात्र गोष्टच वेगळी असते. कोकणी माणूस पुढच्या वर्षी लवकर या, म्हणत बाप्पाला निरोप दिल्यापासून पुढच्या गणपतीची वाट पाहत असतो. कोकणी माणसासाठी गणपती हा जणू त्याच्या घरी वर्षातून एकदा येणारा कुटुंबातील सदस्यच असतो. त्यामुळे त्यांच्यासमोर खास कोकणी मालवणी पद्धतीने वर्षातील सगळ्या व्यथा, वेदना, अपेक्षा यांचं गा-हाणं मांडलं जातं.
(Kokan Ganesh Utsav Kokan Ganpati Festival)
२) आगळ्या वेगळ्या परंपरा
कोकणातील गणेशोत्सव खूप प्रसिद्ध होण्यास येथील गावागावातील आगळ्या वेगळ्या परंपराही तितक्याच कारणीभूत ठरल्या आहेत. कोकणात गणेशोत्सवाची लगबग महिनाभर आधीच म्हणजे नागपंचमीपासून सुरू होते. नागपंचमीदिवशी नागोबाची पूजा केल्यावर कुटुंबातील जाणती व्यक्ती ठरलेल्या गणपतीच्या चित्रशाळेत जाऊन गणपतीचा पाट देऊन येते. आपल्याला कसा गणपती हवा याबाबत मूर्तीकारास कल्पना दिली जाते. मग गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी किंवा गणेश चतुर्थीदिवशी गणपतीची मूर्ती आणली जाते. आजही कोकणातील अनेक कुटुंबात शेकडो वर्षांपासून एकाच मूर्तिकाराकडून गणेश मूर्ती आणण्याची परंपरा आहे.
गणेशोत्सवात गौरींच्या सण हा कोकणात वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने साजरा केला जातो. कोकणातील काही भागात होणारा गौरींचा पाहुणचार हा पाहण्यासारखा असतो. आणखी एक गोष्ट म्हणजे तळकोकणात वाडी वाडीमध्ये होणारी गणपतीची भजनं. कोकणातील गावांमध्ये वाडीतील सर्व घरांमध्ये गणपतीची भजनं करण्याची परंपरा आहे.

(Kokan Ganesh Utsav Kokan Ganpati Festival)
३) एकोपा
कोकणातील अनेक कुटुंब नोकरीधंद्याच्या निमित्ताने सध्या मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये वास्तव्यास आहेत. तिथे सर्वांच्याच नियमित भेटीगाठी होत नाहीत. एका घरातील अनेक कुटुंबं गणपतीच्या सणानिमित्त एकत्र येतात. भेटीगाठी होतात. कोकणातील अनेक गावांमध्ये अनेक कुटुंबांकडून आपल्या मूळ घरात गणपतीची एकत्र पूजा कऱण्याची अनेक उदाहरणं आहेत. गणपतीचे पाच, सात अकरा दिवस वेगवेगळ्या ठिकाणी राहणारे कुटुंबीय आपल्या मुळ घरात एकत्र येतात. गप्पा टप्पा रंगतात. एकत्र जेवण, बाप्पांची आरती, फुगड्या यामधून कुटुंबांमधील एकोपा वाढतो. चतुर्थीच्या निमित्ताने कोकणातील जवळपास प्रत्येक गावातील बाहेरगावात राहणारी मंडळी गावी येतात. त्यामुळे इतर मित्रमंडळी भेटतात. एकमेकांच्या घरी येणं जाणं होतं. त्यातून वाडीतील, गावातील प्रश्नांवर चर्चा होते. काही समस्यांवर उपाय निघतात. त्यामुळे देवावरील श्रद्धा, धार्मिक भावना याबरोबरच कौटुंबिक आणि सामाजिक एकतेच्या दृष्टीने कोकणातील गणेशोत्सव आगळा वेगळा ठरतो.
तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे तुम्ही कमेंटमधून नक्की कळवा. जर हा लेख आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा.
Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇
https://www.facebook.com/vishaychbhari
https://www.facebook.com/aplavishaychbhari
Leave a Reply