या ५ नेत्यांमुळे कल्याणमधून श्रीकांत शिंदे पडतील | Kalyan Loksabha | Shrikant Shinde |Vishaych Bhari
२०१९ च्या महाराष्ट्रातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर बराच सत्तासंघर्ष राज्यातील जनतेला पहायला मिळाला. विधानसभेवेळी महायुतीच्या नावाने मत मागायचं मात्र शिवसेनेचा उमेदवार पाडण्यासाठी जोर लावायचा हा भाजपचा खेळ काही मतदारसंघात शिवसेनेने पाहिला होता. विधानसभा निवडणुक निकालानंतर अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाची मागणी मान्य होत नाही म्हणून शिवसेना-भाजपचं बोलणं फिस्कटलं. सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मिळून महाविकासआघाडी तयार झाली. महाविकास आघाडीचा कारभार अडीच वर्षं चालत नाही तोवर शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि भाजपसोबत बस्तान बांधलं. सेनेचं राष्ट्रवादीसोबत जाणं आणि हिंदुत्व सोडणं मान्य नसल्याचं शिंदे सांगत राहिले. त्यानंतर उद्धव ठाकरेंना शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळू न देण्यासाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी हजार भानगडी केल्या. ठाकरेंना अक्षरशः जेरीस आणलं. सत्तासंघर्षाचा हा तिढा सर्वोच्च न्यायालयात पोहचल्यानंतर शिंदे आणि फडणवीस यांना चपराक बसली खरी, परंतु त्यांच्या सत्तास्थानाला धोका निर्माण झाला नाही. एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे प्रलंबित असून अजून काही महिने या गोष्टींचा खोळंबा असाच चालू राहील. हे असतानाच अजित पवार काही समर्थक आमदारांना सोबत घेऊन सत्तेत सहभागी झालेत. खरंतर २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत कल्याण मतदारसंघाचाचा अंदाज बांधत असताना या सगळ्या घटनांचा उल्लेख महत्त्वाचा ठरतो. कारण याचा मुंबई आणि ठाण्यातील शिवसेनेच्या दोन्ही गटांतील उमेदवारांवर पुढील निवडणुकांमध्ये फरक पडणार हे नक्कीय . यामध्ये शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला कल्याणचा मतदारसंघ हा पक्षात पडलेल्या फुटीमुळे चांगलाच चर्चेत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे हे मागील दोन टर्म या मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून येत आहेत. आपले वडील मुख्यमंत्री झाल्यानंतर श्रीकांत शिंदे यांनी स्वतःची चांगलीच हवा करून घेतली असून मुंबईसह देशातील सेलिब्रिटी मंडळी ते अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वारंवार भेटीगाठी यामुळं श्रीकांत शिंदे मागील वर्षभर लाईमलाईटमध्ये आले आहेत. मध्यंतरी एकनाथ शिंदे यांच्या खुर्चीवर बसलेला त्यांचा फोटोही चांगलाच चर्चेत होता. त्यांचा एकूण तालेवारपणा सोशल मिडियावरही दिसून येतच आहे. असो. तो मुद्दा वेगळा. पण श्रीकांत शिंदे यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आनंद परांजपे तर २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्याच बाबाजी पाटील यांचा मोठ्या मार्जिनने पराभव केला होता. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठीही त्यांनी शड्डू ठोकला असून कल्याणचा पुढचा खासदारही मीच असेन अशा घोषणाही त्यांनी सुरू केल्या आहेत. वडिलांचं मुख्यमंत्रीपद, प्रचंड जनसंपर्क, सोशल मिडियावरील प्रतिमानिर्मिती या श्रीकांत शिंदे यांच्यासाठी जमेच्या बाजू आहेत. श्रीकांत शिंदे यांनी मतदारसंघात केलेली रस्त्याची कामं, कल्याण-ठाणे-मुंबई जलवाहतूक सोय, नागरिकांना स्वस्त आरोग्य सुविधा शिवाय कोविड काळात हजारो गरजूंना केलेली मदत या गोष्टी येत्या निवडणुकीसाठी त्यांना फायद्याच्या ठरू शकतात. उद्धव ठाकरे गटातील संजय राऊत, आदित्य ठाकरे यांच्यावर केलेली शेरेबाजी मात्र त्यांना अडचणीची ठरू शकते. पण आता नेमकं कल्याणमध्ये हवा कोणाचीय? कल्याण मधून पुन्हा श्रीकांत शिंदे निवडून येऊ शकतात का ? त्यांना खरंच कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागेल की मग कल्याण मधून श्रीकांत शिंदेंचं तिकीटच कापलं जाऊ शकतं ? सगळंच इन डिटेलमध्ये पाहूयात.
(Kalyan Loksabha | Shrikant Shinde |Vishaych Bhari)
तर बघा यंदा श्रीकांत शिंदे यांना टक्कर देण्यासाठी ठाकरे गटाकडून सुभाष भोईर यांना मैदानात उतरवलं जाऊ शकतं.
किंवा मग आयत्या वेळेला आनंद परांजपे हेशरद पवार गटात उडी मारून तिथून खासदारकीसाठी दावा ठोकू शकतात.आता आनंद परांजपे हे २००८ च्या लोकसभा पोटनिवडणुकीत ठाण्यातून तर २००९ च्या लोकसभेवेळी कल्याणमधून शिवसेनेच्या तिकिटावर खासदार होते. २०१४ साली श्रीकांत शिंदेंना तिकीट देताना परांजपे यांचं तिकीट कापण्यात आलं. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आजही परांजपे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहेत. जुन्या शिवसैनिकांची मैत्री आणि मतदारसंघातील संपर्क या परांजपे यांच्यासाठी जमेच्या बाजू आहेत. परांजपे यांच्याव्यतिरिक्त कल्याण ग्रामीणचे माजी आमदार आणि ठाकरे गटाचे कल्याण लोकसभा सम्पर्कप्रमुख सुभाष भोईर यांच्या नावाचीही चर्चा लोकसभेचे संभाव्य उमेदवार म्हणून होत आहे. भोईर हे कट्टर शिवसैनिक असून उद्धव ठाकरे यांच्या विश्वासातील आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या हस्तक्षेपाने त्यांचं तिकीट कापलं गेलं होतं, त्यामुळं त्यांची शिंदे गटावर नाराजी आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या वाढदिवसानिमित्त भावी खासदार असे होर्डिंग्ज कल्याण-डोंबिवलीमध्ये लावले गेल्याचं पाहायला मिळालं होतं.२०१९ च्या विधानसभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार असलेले प्रमोद उर्फ राजू पाटील हेसुद्धा २०२४ ची लोकसभा लढवण्यास इच्छुक आहेत. त्यांनी २०१९ सालीसुद्धा लोकसभेची निवडणुक लढवली होती, मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. या ३ उमेदवारांव्यतिरिक्त रवींद्र चव्हाण या भाजपच्या डोंबिवलीच्या आमदारांचं नावही कल्याण लोकसभेसाठी चर्चेत आहे. शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय एकनाथ शिंदे यांच्याविरोधात गेला तर कल्याण लोकसभेच्या जागेवर भाजप दावा सांगू शकतं. अशा परिस्थितीत कल्याणमधून भाजपचे रवींद्र चव्हाण तर ठाण्यातून भाजपच्या चिन्हावर श्रीकांत शिंदे लढतील असा समझोता केला जाईल. वास्तविक पाहता १९९५ पर्यंत ठाणे हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला होता. रामभाऊ म्हाळगी यांच्यासारखे नेते या भागातून निवडून आले होते. मात्र आनंद दिघे यांनी आपलं वजन वापरून हा मतदारसंघ शिवसेनेला मिळवून दिला.त्यामुळेच जवळपास ३० वर्षांच्या अंतरानंतर हा मतदारसंघ स्वतःकडे घेण्याची संधी भाजप सोडणार नाही, हीसुद्धा शक्यता आहे. पण कल्याण पुरतं बोलायचं झाल्यास भाजपचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचे कल्याण लोकसभा मतदारसंघातील दौरे अचानक वाढलेले आहेत.. मागील वर्षभरात अनुराग ठाकूर यांनी तीनवेळा कल्याणचा दौरा केला आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या ३ भाजप आमदारांची आणि स्थानिक भाजप कार्यकर्त्यांची श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात असलेली नाराजी पाहता भाजप या जागेसाठी शिंदेंची अडवणूक नक्कीच करू शकतो. जागावाटपाचा निर्णय पक्षातील वरिष्ठ लोक घेतील हे शिंदे यांचं बोलणंसुद्धा त्या अर्थाने म्हणूनतर आपल्याला विचारात घ्यावं लागेल.
(Kalyan Loksabha | Shrikant Shinde |Vishaych Bhari)
असो तर कल्याण लोकसभेचा विचार करताना त्याअंतर्गत येणाऱ्या अंबरनाथ, उल्हासनगर, डोंबिवली, कल्याण पूर्व, कल्याण ग्रामीण आणि मुंब्रा कळवा या विधानसभा मतदारसंघांचाही आढावा घेणं गरजेचं ठरतं. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत इथल्या 6 पैकी 3 मतदारसंघात भाजप तर इतर 3 मतदारसंघात राष्ट्रवादी, मनसे आणि शिंदे गटाचा आमदार निवडून आला आहे. अंबरनाथ येथे शिवसेना शिंदे गटाचे बालाजी किणीकर मागील १५ वर्षांपासून आमदार आहेत. अर्थात त्यावेळी शिवसेना ही एकसंध होती. आता त्यांचं मताधिक्य कमी होणार का? की त्यांच्या करिष्म्याचा फायदा श्रीकांत शिंदेंना होणार हे पाहणं इथून रंजक ठरेल. उल्हासनगर मतदारसंघावर पप्पू कलानी आणि कुटुंबाचं मागील ४० वर्षांपासून वर्चस्व आहे. कलानी सध्या खुनाच्या आरोपाखाली तुरुंगात होते तरी त्यांच्या नावाचा दबदबा उल्हासनगरमध्ये आहे. नुकतंच रोहित पवार यांनी कलानी यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. २०१४ च्या निवडणुकीत त्यांच्या पत्नी ज्योती कलानी विजयी झाल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसशी जवळीक असलेल्या कलानी यांच्या सुनबाई पंचम कलानी यांनीही आता उल्हासनगरमधील राजकारणात लक्ष घातलं आहे. त्यांचे पती ओमी कलानी यांनी काही वर्षांपूर्वी भाजपशी हातमिळवणी केली असली तरी सध्या मात्र कलानी ग्रुप महाविकास आघाडीसोबत असल्याचं पहायला मिळत आहे. कुमार आयलानी हे सध्या तिथले भाजप आमदार असले तरी त्यांचा पाठिंबा शिंदे यांना मिळेल अशी शक्यता ठामपणे देता येत नाही. डोंबिवली भाग हा सुरुवातीपासून भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. याठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांचं जाळं आहे. रवींद्र चव्हाण हे मागील १५ वर्ष इथले आमदार असून एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात ते सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री आहेत. याही आधी त्यांनी राज्य मंत्रिमंडळात विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. रवींद्र चव्हाण यांच्या नावाची भाजपकडून लोकसभेसाठी चर्चा असून त्यांनी त्या प्रकारे तयारी सुरू केल्याचंही बोललं जात आहे. लोकसभा मतदारसंघातील ३ भाजप आमदार आणि श्रीकांत शिंदे यांच्याविरुद्ध असलेला महाविकास आघाडीतील रोष पाहता भाजपलाही रवींद्र चव्हाण यांची उमेदवारी हक्काची वाटत आहे.
(Kalyan Loksabha | Shrikant Shinde |Vishaych Bhari)
कल्याण पूर्व भागात गणपत गायकवाड हे भाजप आमदार शिंदे गटाच्या विरोधातील मानले जातात. स्वबळावर दोनदा अपक्ष म्हणून निवडून आलेले गायकवाड कल्याण लोकसभेसाठी भाजपचाच उमेदवार असावा ही मागणी लावून आहेत. त्यामुळे या भागातूनही विद्यमान खासदार श्रीकांत शिंदेना जास्त मदत मिळण्याची शक्यता नाही. कल्याण ग्रामीणमध्ये मागील ३ निवडणुकांमध्ये दोनदा मनसेच्या तर एकदा शिवसेनेच्या उमेदवाराने बाजी मारली आहे. मनसेचे एकमेव आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील याच मतदारसंघातले. ते स्वतः यंदाची लोकसभा निवडणुक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. या भागात ठाकरे गटाचे सुभाष भोईर यांचंही वर्चस्व पाहायला मिळतं. मुंब्रा कळवा भागात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जितेंद्र आव्हाडांचं वर्चस्व आहे. आव्हाड आणि शिंदे कुटुंबीय यांच्यात विशेष सख्य नसल्याने या भागातूनही लोकसभेसाठी श्रीकांत शिंदे यांना म्हणावी तशी मदत मिळणार नाही. महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मताधिक्य मिळवून देण्यासाठी हा मतदारसंघ आश्वासक आहे. मतांच्या बेरजेचा एकूण विचार करता श्रीकांत शिंदे यांच्यासाठी गेल्या निवडणुकीपेक्षा ही निवडणुक आव्हानात्मक असणार आहे. शिवसेनेत फूट पडली नसती तर श्रीकांत शिंदे महाविकास आघाडीतर्फे सहज निवडून आले असते. आता मात्र भाजपला या मतदारसंघात प्रवेश करण्याची अनायसे संधी मिळाली असून दोन शिवसेनेच्या वादामध्ये भाजप बाजी मारणार की ठाकरे गट आपली ताकद दाखवून शिंदेंची जिरवणार हे पाहणं इथं इंटरेस्टिंग ठरणार आहे.एकूणच शिंदे गट निर्मिती मुळे श्रीकांत शिंदेच्या पायावर धोंडा पडला आहे.
(Kalyan Loksabha | Shrikant Shinde |Vishaych Bhari)
हे पण विषय भारी वाच भाऊ
तासगाव कवठेमहाकाळचा पुढचा आमदार कोण | Rohit Patil की Prabhakar Patil | Vishaych Bhari
धाराशिवचा पुढचा खासदार कोण | Omraje Nimbalkar की Rana Jagjit Sinha Patil | Vishaych Bhari
रावेरचा पुढचा खासदार कोण | Eknath Khadse की Raksha Khadse | Latest Marathi News | Vishaych Bhari
पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय, कल्याण मधून पुन्हा श्रीकांत शिंदे निवडून येऊ शकतील का ? कल्याण मधला पुढचा खासदार कोणाचा होईल, शिंदे गट, ठाकरे गट भाजप की राष्ट्रवादी काँग्रेसचा . तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.
Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇
https://www.facebook.com/vishaychbhari
https://www.facebook.com/aplavishaychbhari
Leave a Reply