मित्रानो जेष्ठ अष्टमीचा दिवस उजाडतो आणि वारकरी, धारकरी आणि कष्टकर्यांना ओढ लागते ती विठू माऊलीच्या दर्शनाची. गळ्यात माळ, हातात टाळ कपाळावर चंदनाचा टिळा असा सात्विक अवतार आणि मुखात कधी पांडुरंगाचं तर कधी ज्ञानबा तुकारामाचं नाव घेऊन प्रत्त्येक वारकरी पंढरपुराच्या दिशेने चालू लागतो.
सलग १० – १२ दिवस आपल्या प्रपंचाचा त्याग करून हे सर्व वारकरी कोणतीही तक्रार न करता विठ्ठलाच्या भेटीला जातात. दरवर्षी हा वैष्णवाचां सोहळा मोठ्या दिमाखात पार पडतो. पण मित्रांनो तुम्हाला माहितेय का एवढ्या चैतन्याने आणि पॉजिटीव्ह एनर्जीने भरलेली ही वारी नेमकी कधी सुरु झाली आणि ही वारी सुरु करण्याचं खरं श्रेय कुणाचंय ते. जर नसेल तर ही माहिती तुमच्यासाठीचंय…
पण ही बंद पडलेली वारी साधारण 1830 साली नंतर एका सैनिकाने सुरु केलेली होती. हो एका सैनिकाने. ऐकून आश्चर्य वाटलं ना. पण मंडळी ही गोष्ट अगदी खरीय आणि त्या सैनिकाचं नाव होतं नाव हैबतबाबा आरफळकर.
मंडळी, खरतर वारीचा इतिहास पाहायचा झाला तर तो आता ठोसपणे कुणालाच सांगता येणार नाही. कारण वारकरी पंथातील बऱ्याचं जणांच्या म्हणण्यानुसार वारी ही संत ज्ञानेश्वर महाराजांच्या काळापासून सुरु करण्यात आली होती. ही गोष्ट खरी असली तरी तुम्हाला हे माहितेय का की ज्ञानेश्वरांच्या काळापासून चालत आलेली ही वारी मध्यंतरी काही काळासाठी बंददेखील पडली होती.
त्यांच्याचं प्रयत्नांमुळे खरं तर आज पंढरीची वारी अविरतपणे आणि शिस्तबद्धरित्या चालूय. पण एवढ्या मोठ्या सोहळ्याची त्यांनी नेमकी सुरवात कधी आणि कशी केली ते आता आपण पाहूया.
खरं तर संत ज्ञानेश्वर माऊलीच्या काळापासून ते संत तुकाराम महाराजांच्या काळापर्यंत जवळ जवळ चारशे वर्ष ही वारी अखंडपणे सुरुचं राहिली होती. त्याकाळात वारकऱ्यांसमोर बऱ्याच अडचणीही उभ्या राहिल्या होत्या पण तरीही विठ्ठलाच्या भेटीसाठी आतुर झालेल्या वारकऱ्यांनी वारीत कसलाचं खंड पडून दिला नव्हता. अगदी सुरुवातीच्या काळाचा विचार केला तर पांडुरंगाच्या पादुका घेऊन हा वारी सोहळा पार पडत असायचा. पण जेव्हा संत ज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी घेतली तेव्हापासून ज्ञानेश्वरांच्या पादुका घेऊन ही वारी पंढरीच्या दिशेने सुरु ठेवण्यात आली होती. त्यानंतर हीचं प्रथा पुढे संत तुकाराम महाराज यांच्या वैकुंठ गमनानंतर देखील सुरु राहिली. संत तुकाराम महाराजांचे चिरंजीव नारायण महाराज हे ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराज यांच्या पादुका घेऊन देहू ते आळंदी मार्गे पंढरपूरला घेऊन जाऊ लागले. पण काही कारणास्तव या प्रथेत खंड पडला. त्या दरम्यानच्या काळात हैबत बाबा यांच्या माध्यमातून ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका स्वतंत्रपणे पंढरपूरला जाऊ लागल्या.
हैबतबाबा पवार उर्फ हैबतबाबा आरफळकर हे मूळचे सातारा जिल्ह्यातील आरफळ या गावचे. पण ते ग्वाल्हेर येथील शिंदे सरकार यांच्या सैन्यातील सरदार होते. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यावर त्यांची अपार श्रद्धा होती. एकदा काय झालं तर त्यांची वारी ग्वाल्हेरहून आळंदीकडे येत असताना सातपुडा पर्वत भागात काही दरोडेखोरांनी त्यांना घेरलं. त्यावेळी त्या दरोडेखोरांनी हैबत बाबांच्या अनेक साथीदारांना ठार देखील केलं. मग त्यावेळी संकटात सापडलेल्या हैबतबाबांनी म्हणे ज्ञानेश्वर माऊलीचा धावा सुरु केला.
मनापासून देवाचा धावा केला तर आपली हाक देवापर्यंत पोहोचतेचं असं म्हणतात. आणि तसं घडलं ही. ते दरोडेखोर हैबतबाबांना मारणार नेमकं त्याचवेळी त्या दरोडेखोरांच्या म्होरक्याला मुलगा झाल्याची बातमी घेऊन एक माणूस तिथं आला. ती बातमी ऐकून आनंदी झालेल्या टोळीच्या म्होरक्याने हैबती बाबांना जीवंत सोडून दिले. दरोडेखोरांच्या हातून सुटका झालेल्या हैबतबाबांना हा आपला पुनर्जन्म झाल्यासारखं वाटू लागल.
आपण फक्त माऊलीं मुळे वाचलो अशी त्याची धारणा झाली. त्यामुळे आता उरलेलं आयुष्य हे फक्त आणि फक्त माउलीच्याच सेवेत घालवायचे या विचारातून एका धारकऱ्याचा वारकरी झाला.
पुढे येऊन मग ते आपल्या मूळ गावी न जाता आळंदी येथेचं स्थायिक झाले. मग ज्यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या संयुक्तपणे होणाऱ्या वारीमध्ये काही कारणास्तव खंड पडण्याची स्थिती निर्माण झाली होती. नेमकं त्याचंवेळी हैबतीबाबांनी पुढाकार घेत स्वतः ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीचा स्वतंत्र सोहळा सुरू केला. जो सोहळा आजपर्यंत अबाधित आहे. सुरुवातीच्या काळात फक्त डोक्यावरून पादुका घेऊन पालखी सोहळा पार पडत असायचा. पण नंतर या सोहळ्यात हैबतीबाबांच्या मार्गदर्शनाखाली काही सरदार देखील सामील झाले. आणि अखेर सोहळ्याला शाही स्वरूप प्राप्त झाले. शितोळे सरदारांनी यात अग्रेसर भूमिका घेऊन या भक्तीपूर्ण सोहळ्यासाठी तंबू, घोडे ,हत्ती आणि इतर बरच साहित्य देऊन सहकार्य केलं.
सैन्यात सरदार म्हणून काम करणारे हैबतीबाबा यांच्या अंगी असणारे शिस्तीचे गुण त्यांनी त्या वारीतही घडवून आणले. भालदार, चोपदार, शिंगाडी यांच्यासह दिंडीत चालणारा लाखो वारकऱ्यांचा समुदाय हा दंड उंचावतच अगदी शांत होऊन जातो. यावरून हैबतबाबांच्या सैनिकी शिस्तीचे दर्शन आपोआप सध्याच्या वारीतून घडते. वारीच्या इतिहासात डोकावून पाहिल्यास एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की निस्वार्थी भावनेनं पांडुरंगाच्या चरणावर लीन झालेल्या भक्तांना विठू माऊलीन नेहमीच आपल्या चरणांवर जागा दिलेलीये. वारकरी संप्रदायातला संत परिवार हे त्याचं मूर्तिमंत उदाहरणय. जसं संतांनी आपलं जीवन पांडुरंगाच्या चरणावर वाहिलेलं होतं नेमकं तसंच हैबतीबाबांनी देखील आपलं संपूर्ण जीवन ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणांवर अर्पण केलेलं होतं. त्यामुळंच पंढरपूरात विठ्ठलाच्या चरणाजवळ जसं नामदेव पायरीचं महत्वय अगदी तसंच ज्ञानेश्वरांच्या समाधीजवळ हैबतबाबांच्या पायरीचं स्थान अबाधितय. तर मंडळी असा होता वारी सोहळ्याचा हा भक्तीमय इतिहास. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंटद्वारे जरूर कळवा. माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. राम कृष्ण हरी
Connect with us : 👇 👇 👇
Leave a Reply