१९९५ साली राज्यात भाजप शिवसेना महायुतीचं सरकार स्थापन झालं होतं अन त्या सरकारमध्ये गोपीनाथ मुंडें यांच्याकडं गृहमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली होती. पण गोपीनाथ मुंडे यांच्यासाठी तो पदभार सांभाळणं म्हणजे सोप्पं काम नव्हतं. कारण तेव्हा अंडरवर्ल्ड नावाच्या राक्षसानं आख्खी मुंबई पोखरून काढली होती. दिवसाढवळ्या खून, दरोडा आणि शूटआऊट होत होते. मोठमोठ्या उद्योगपतींना, बॉलीवूड स्टार्स आणि नेत्यांना खंडणीसाठी धमक्यांचे फोन येत होते. बॉलीवूडच्या हिरोला अंडरवर्ल्डच्या भाईची धमकी अशा गोष्टी नॅशनल न्यूज ठरू लागल्या होत्या. वर्चस्ववादाच्या लढाईपोटी ते गुन्हेगार एखाद्या हिंस्त्र जनावरांसारखे वागत होते. गुन्हेगारांना पकडलं जात होतं पण पुराव्यांअभावी त्यांची सुटका होत असायची. त्यांचे पाठीराखे त्यांच्यासाठी कायद्यातून काहीतरी पळवाट शोधून काढायचे. दाऊद इब्राहीम, अरुण गवळी, आश्विन नाईक आणि छोटा राजन या चार मुख्य भाई लोकांच्या टोळ्यांनी मुंबईत निस्ता धुडघूस घातला होता. मुंबईत राहणारा प्रत्येकजण आज घरातून बाहेर पडलो तर नीट जिवंत घरी येईन का याच्या काळजीत असायचा. म्हणजे मुंबईचा क्राईम रेट सर्वोच्च बिंदूला असताना गोपीनाथ मुंडे यांनी त्यांच्या गृहमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली होती. अन तेव्हा त्यांनी घेतलेला तो एक धाडसी निर्णय ज्यामुळं मुंबई अंडरवर्ल्ड आणि प्रामुख्यानं महाराष्ट्राच्या गुन्हेगारी जगताची हवाचं टाईट झाली होती. आजच्या या Blog मध्ये गोपीनाथ मुंडे यांचा तो धाडसी निर्णय नेमका काय होता, गृहमंत्री असताना गोपीनाथ मुंडे यांची धडाकेबाज कामगिरी कशी राहिली त्याबद्दलची माहिती आपण जाणून घेणारे,
(Gopinath Munde | Vishaych Bhari)
मंडळी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे हे महाराष्ट्रातील सर्वात दिग्गज नेत्यांपैकी एक होते. एका सामान्य उसतोड मजूराचा मुलगा ते केंद्रीय ग्रामविकास मंत्री असा त्यांचा राजकीय आलेख नेहमी चढताच राहिला. ते आज आपल्यात नसले तरी आजही आठवण आली की त्यांच्या समर्थकांसह अनेक बड्या नेत्यांचे डोळे पाणावतात. 1995 ते 1999 या काळात राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीही राहिले होते. उपमुख्यमंत्रीपद भूषवताना त्यांना गृहखात्याची जबाबदारी मिळाली होती. त्याच्या दोन वर्ष आधीचं मुंबईत दाऊदनं साखळी बॉम्बस्फोट घडवून आणले होते आणि त्यामुळं संपूर्ण मुंबईत दहशतीचं वातावरण पसरलेलं होतं. त्यात आणखी भरीस भर म्हणजे गवळी, नाईक, दाऊद रवि पुजारा, भरत नेपाळी, छोटा शकील आणि छोटा राजन यांच्यात सुरु असणाऱ्या gangwar नं भयानक स्वरूप प्राप्त केलं होतं. दाऊद, गवळी यांच्या नावानं लोकांकडून खंडणी मागितली जात होती.
(Gopinath Munde | Vishaych Bhari)
मुंबईत गुंडांबरोबरच गुन्ह्यांमध्येही वाढ झाली होती. मुंबईच्या गल्लोगल्लीत रक्ताचे पाट वाहायला लागले होते. यात फक्त गुंडच नाही तर खंडणीला बळी पडलेले बिल्डर, नेते आणि बॉलीवूड सेलिब्रेटींचाही जीव गेला होता. पण त्याला पुर्ण विराम लावायचं काम केलं ते महाराष्ट्राचे तत्कालीन जिगरबाज गृहमंत्री गोपीनाथराव मुंडे यांनी. गृहमंत्री झाल्यावर काही काळ वाढत्या गुन्हेगारीचा अभ्यास केल्यानंतर त्यांना असं लक्षात आलं की जोपर्यंत गुन्हेगार संपणार नाही तोवर मुंबईतल्या गुन्हेगारीला आळा बसणार नाही . म्हणून त्यांनी गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांसोबत सल्ला मसलत करून एनकाऊंटर नावाचं ब्रम्हास्त्र बाहेर काढलं. त्यासाठी स्पेशल ट्रेनिंग घेतलेल्या पोलिसांची एक तुकडी बनवली जिला नंतर मिडियानं एनकाऊंटर स्पेशालिस्ट टास्कफोर्स म्हणून उचलून धरलं. त्या तुकडीत १९८३ सालच्या नाशिक batch मधले प्रदीप शर्मा, विजय साळसकर, रविंद्र आंग्रे, दया नायक यांसारख्या नावाजलेल्या ऑफिसर लोकांचा समावेश होता. सर्वात पहिल्यांदा गोपीनाथ मुंडे यांनी मुंबई पोलिसांना मुंबईतील गुन्हेगारी संपुष्टात आणण्यासाठी, साचलेली घाण साफ करण्यासाठी फ्री हँड दिले. त्यांचा आदेश निघताचं संपूर्ण अंडरवर्ल्ड हादरून गेलं. एनकाऊंटर स्पेशालिस्ट ऑफिसर्सनी जे जे गुन्हेगार त्यांच्या तावडीत सापडले त्यांचा खात्मा करायला सुरुवात केली. प्रत्येकानं वेगवेगळ्या gang मधील शूटर लोकांची लिस्ट बनवली अन खबऱ्यांमार्फत त्यांची खबर काढून गुन्हेगारांचा करेक्ट कार्यक्रम केला. त्याकाळात ज्या गुन्हेगारांचे राजकीय व्यक्तीशी संबंध होते त्यांनी त्या संबंधित नेत्याकडून ऑफिसर्स लोकांवर दबाव टाकण्याचे ही प्रयत्न केले. पण त्या नेत्यांच्या दबावाला बळी पडू न देता मुंबई पोलिस त्यांचं काम व्यवस्थितपणे पार पाडतील याची सोय गोपीनाथ मुंडे यांनी केली. मुंडे यांना कल्पना होती की व्यवस्थेने बांधलेले पोलिसांचे हात सोडवले तरच खऱ्या अर्थानं त्यांना मोकळीक मिळेल.
(Gopinath Munde | Vishaych Bhari)
काही जणांच्या म्हणण्यानुसार मुंडे यांनी ४० हजार पोलिस कर्मचाऱ्यांना माफियांचा खात्मा करण्यासाठी लागणारे सर्व अधिकार त्यावेळी दिले होते. दरम्यान त्या कारवाईनं माफियांची पार फाटली होती. एनकाऊंटर स्पेशालिस्ट ऑफिसर्सच्या भीतीमुळं काही गुन्हेगार देश सोडून पळून गेले तर काही त्यांच्याचं बिळात लपून बसलेले होते. पण दरम्यान १९९८ साली मुंबई पोलिसांच्या त्या एनकाऊंटर स्कीमवर काही मानवाधिकार संस्थानी आक्षेप घेतला. त्यांनी बॉम्बे हाय कोर्टात अशी बाजू मांडली की ह्ये एनकाऊंटर वगैरे घटनाविरूद कृती असून त्यामुळं मानवाधिकाराचं उल्लंघन होतंय. त्यानंतर बॉम्बे हाय कोर्टानं सेशन कोर्टाचे जज अग्यार यांच्या अध्यक्षतेखाली त्याप्रकरणी एक समिती नेमली आणि रिपोर्ट सादर करायला सांगितले. त्या अग्यार समितीनं मुंबई पोलिसांच्या एनकाऊंटर स्कीमचा संपूर्ण लेखाजोखा काढला आणि त्यानंतर मुंबई पोलिसांच्या कृत्यावर वेगवेगळे आक्षेप ही घेतले. झालं, एका झटक्यात सगळे हिरो मिडियासाठी झिरो झाले. त्या रिपोर्टच्या आधारे बॉम्बे हायकोर्टानं मुंबई पोलिसांना एनकाऊंटरची कारवाई थांबवण्याचे आदेश दिले. पण त्यानंतर अंडरवर्ल्डच्या हालचालींना मात्र भयानक वेग आला आणि मुंबई पुन्हा अस्वस्थ झाली. रोज कुणाची न कुणाची हत्या होऊ लागली. त्यावर्षी टोटल ९९ लोकांना अंडरवर्ल्डच्या शूटआऊटमुळं त्यांचा जीव गमवावा लागला. परिस्थिती पुन्हा हाताबाहेर चालली होती. दरम्यान गोपीनाथ मुंडे यांनी पुन्हा एकदा त्या परिस्थितीला नियंत्रणात आणण्यासाठी मुंबई पोलिसांना सांगितलं की तुम्ही गुन्हेगारांचा खात्मा करणं सुरु ठेवा.
(Gopinath Munde | Vishaych Bhari)
हे विषयच भारी वाचलेस का भावा !
- सॅम बहादूर सिनेमाची खरी गोष्ट | Sam Bahadur Trailer | Sam Bahadur Manekshaw | Vishaych Bhari
- मराठा समाजाच्या या माणसानं सरकारला गुडघ्यावर कसं आणलं | Manoj Jarange Sabha Live | Vishaych Bhari
- इस्रायल vs पॅलेस्टिनी कट्टरवादी संघटना हमास च्या संघर्षामुळं जगावर तिसऱ्या महायुद्धाचं संकट | Israel vs Hamas War 2023 News
- लंडनमध्ये खुलेआम फिरणाऱ्या विजय माल्ल्याला अटक का होतं नाही | Vijay Mallya Story | Scam
- वंचितला सोबत घेतलं नाही तर कांग्रेस राष्ट्रवादीचे हे ८ नेते पडतील | Prakash Ambedkar vs Sharad Pawar
बाकी मुंबई पोलिसांच्या वतीनं कोर्टात सरकार तुमची बाजू मांडेल. त्यानंतर मग पुन्हा एकदा मुंबई पोलिसांनी बेधडकपणे गुन्हेगारांना संपवण सुरूच ठेवलं. त्याच्या पुढच्या वर्षी मुंबई पोलिसांनी टोटल ८२ गुन्हेगारांचे एनकाऊंटर केले अन मुंबईचं समाजजीवन पूर्वपदावर आणण्याचं काम केलं. पुढं १९९९ ला महायुतीचं सरकार पडलं आणिराज्यात काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार आलं. त्यांनीही गोपीनाथ मुंडे यांनी दिली तशी मुंबई पोलिसांना मोकळीक दिली अन मुंबईतून अंडरवर्ल्डचा प्रभाव कमी करण्यासाठी प्रयत्न केले. तर अशा पद्धतीनं दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या धाडसी निर्णयामुळं नामांकित भाई लोकांच्या अंडरवर्ल्डला कायमचा सुरुंग लागला. आज ही राज्यात क्राईम रेट प्रचंड वाढलेला आहे. पण गोपीनाथ मुंडे गृहमंत्री असताना जी थरारक परिस्थिती होती. ती सुदैवाने आज तरी आली नाही. पण तरीही आजच्या गृहमंत्र्यांनी मुंडे सारखाच धाडसी निर्णय घेऊन आसपास वाढणार्या क्राईम रेट्वर आळा घातला पाहिजे, अशीच एकूण लोकांचीही जनभावना असेल. बाकी तुम्हाला गोपीनाथ मुंडेंच्या त्या निर्णयाबद्दल काय वाटतं, जर मुंडे यांनी तेव्हा ते पाऊल उचललं नसतं तर आज मुंबईची अवस्था किती विदारक झाली असती? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.
Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇
https://www.facebook.com/vishaychbhari
https://www.facebook.com/aplavishaychbhari
Leave a Reply