म्हणून शहरात कामाला गेलेल्या पोरांना गावची लय आठवण येते | Gavakadchya Goshti | Vishaych Bhari
काल मध्यरात्री अचानक आमच्या गण्याचा मुंबईवरन फोन आला, आन फोनवर गडी बोलायचं सोडून डायरेक्ट ढसाढसा रडायलाच लागला. मला कळनाच काय झालं? मी त्येला इचारलं बाबा, कुठ काय ॲक्सिडंट झालाय ? कुठल्या अडचणीत सापडलाय ? का आणखीन काय झालंय ? त्येला इचारतूय पण गडी काय सांगनाच झालाय, निस्ता हुंदक्यावर हुंदक दितूय. पुन्हा मला वाटलं, गड्याला लग्न झालेल्या गर्लफ्रेडची बिलफ्रेंडची आठवण येत आसलं. म्हंजी काय झालंवतं, पोरीच्या घरच्यांनी मुंबईचा पोरगा पायजे म्हणून गण्याला नकार दिलावता, पण गण्या बी हट्टी, तीच्याशीचं लगीन करायचं म्हणून गडी मुंबयला नोकरीला आला, पण गण्याचा नोकरीत जम बससतवर हिकडं तिच्या घरच्यांनी पोरीचं लगीन बी उरकून टाकलं. त्याबद्दल इचारलं तरिबी त्यो काय सांगना. बराच वेळ हमसून हमसून रडल्यावं शेवटी त्योच बोलला. म्हणला, भावा गावची लय आठवण इतीया. हीत करमना झालयं. लगा एवढी गर्दीय आजूबाजूला पण लय एकट एकट वाटतयं. आस वाटतयं आत्ताच्या आत्ता बॅग उचलून गावाला निघून यावं पण घरची म्हणत्यात गावाला राहिलास तर तुला पोरगी कोण द्येचं नाय. म्हणून मन मारून जगावं लागतंय. पण या शहरात आता मन नाय लागत गड्या. असं वाटतंय कुणीतरी अंगातनं जीवच काढून घेतलाय. गण्याचं बोलण आयकून काळजात चरर्र झालं. त्यावर काय रिऍक्ट व्हावं कायचं कळत नव्हतं. कायतरी येडंवाकडं बोलून गड्याला मोटिव्हेट केलं नं म्हणलं दोन दिवस गावाला येऊन जा. पण मंडळी बारकाईनं इचार केला तर तुमच्या लक्षात येईल एकटा गण्याचं नाय, आज आशी लाखों गावची पोरं आपल्या पोटाची गरज भागावी म्हणून इच्छा नसताना बी शहरात रडत कुडत जगत्यात. त्यांना कायम गावाची ओढ आसती. अन ती नेमकं कशामुळं तेच आपण डिटेलिंगमधी जाणून घेणारय.

( Gavakadchya Goshti | Vishaych Bhari )
मंडळी गाव आठवतं नाय, आवडतं नाय, गावावर जीव नाय आसा माणूस जगातल्या कुठल्याच कोपऱ्यात सापडणार नाय, छोटसं खेड गाव का आसना, पण ज्याला त्याला, ज्याचं त्याचं गाव मनापासन आवडतंच, पण होतं काय, गावाकडं नोकरीच्या संधी नसत्यात, कामधंदा नसतोय, म्हणून चार पैस कमावण्यासाठी लोकं पोटापाण्यासाठी गाव सोडून लांब शहरात जात्यात. पण शहरात गेली तरी त्येस्नी गाव विसरता येत नाय. अन त्येज पयल कारण म्हंजी गावचं खुलं आणि मनमोकळं वातावरण. आमचं गुरुजी म्हणायचं, शहरात कुंबडीच्या खुराड्यागत घर आसत्यात. उगा इवढु इवढुश्या डालग्यागत खोल्या. त्यातली माणसं बी कोंबड्यागत दाटीवाटीतच राहत्यात. आता ज्या गड्याला दिवसभर फिरायला गावचं शिवार, वावार, डोंगुर कमी पडायचा त्या गड्याला शहरातल्या तशा गिचमीडया गल्ल्यांमदी आडकून पडल्यावं करमलं का? नाय तुम्हीच सांगा, औ…. गावाला कसं, सगळ मोकळंढाकळं असतंय. खुल आभाळ, मोकळे रस्ते, आजूबाजूला हिरवी झाडी. पण शहरातल्या गर्दीनं निस्त गुदमरायला होतंय. मग सो कॉल्ड रूम असो, पॉश रस्ते असो निदान लोकल ट्रेन, आजूबाजूला सगळ कोंदाट वातावरण, माणूस सोडा हवा जायला जागा नसती. गावाला कसं मस्त दुपारी तिपारी झाडाखाली गार हवेत ताणून दिली की स्वर्ग सुखाची अनुभूती यायची. शहरात दिवसरात्र पंख्याची गरगर चालू पण कपाळावरचा घाम सुकला तर तुमच्या टांगखालणं जाईन. उन्हाळ्याच्या दिसात गावाला आख्खं कुटुंब रात्री चांदण्याखाली अंगणात बसून जेवतय. त्येज्यामुळं जेवणाची टेस्ट बी कळती अन जेवाण आंगी बी लागतंय. शहरात खाणावळीचं डब उघडली की पोरांची जेवणाची इच्छाचं मरून जाती. बरं गावचा पार, शाळेचा कट्टा, देव्हळाच्या दगडी पायऱ्या अशी कितीतरी ठिकाण संध्याकाळी मित्रांच्या गप्पांनी रंगून जायाची. गावात मन मोकळं करायला ढिगानं माणसं. शहरात काय आहे, 24 तास पॉम्प पॉम्प करणाऱ्या गाड्या अन कायम धावपळीत जगणारी माणसं. बरं कुणाशी बोलावं तर त्यांच्याकड गाववाल्या माणसांसारखा मायेचा ओलावा बी नाय. ज्यो त्यो आपापल्या प्रॉब्लेममधी अडकलेला. शहरात लोकांच्या घरासारखी माणसांच्या मनाला बी कुलुपं. कुणाशी मन मोकळं करायचं अन कधी म्हणून पोरांना गावची लय आठवण इती.
( Gavakadchya Goshti | Vishaych Bhari )
आता दुसरं कारण म्हणजे मेसचं जेवाण. काय पण म्हणा, जेवाण घरचं ती घरचंच. गावाला आईनं चुलीवर केलेल्या खरपूस भाकरीचा वास, आन काळया तव्यात केलेल्या कालवणाची चव, याला जगात कशाचीचं सर नाय. बरं गावाला भाज्या बी ताज्या ताज्या अन व्हरायटीनं मिळत्यात. शहरातल्या मेसला रविवारचं वशाट सोडलं तर हायच त्यो कोबू फ्लॉवर पाचवीला पुजलेला. बरं गावाकडं कसं पोट भरलं तरी घरच्या माणसांच हात वाढताना थकतं नायतं, कितीबी खाल्ल तरी घरच्यास्नी वाटतंय पोरग अजून नीट जेवल नाय. पण इकडं मेसमधी एकादी भाकरी, निदान चपाती वाढवून द्या म्हणलं की लगीच पैस वाढवून द्या असा रिप्लाय येतो. हा आता त्यात मेसवाल्यांची बी चूक नाय म्हणा, महागाई त्येंच्या उरावं थयाथयाट करती. शहरात राहून मेस व्यवसाय करायचा म्हंजी काय खायाचं काम नाय. सकाळी सहाला सातला कामावं जाणाऱ्या माणसांना टायमिंगला डब्बा द्यावा लागतो. त्येची बी परवड हुती. असो सांगायचा मुद्दा काय, मेसच्या जेवणाला चव हाय का नाय, हे आवडतं, ते आवडतं नाय, आसल लाड नसत्यातं, जी जेवाण येईल ती गप्प खायाला लागतय, त्यामुळ जेवणाच लय हाल होतात. मग पोरास्नी गाव आठवतंय. बरं गावासारखं भूक लागली की कुठल्या बी मित्राच्या घरी पोटभर जेवण करायची सोय उपलब्ध असती. शहरात तसं कुणाच्या घरात घुसता येत नाय. भूक लागली की पहिला पाकीटात हात घालायचा अन मग विकत घेऊन काहीतरी खायाचं.

आता गावची आठवण यायच तिसर कारण म्हंजी हेक्टिक शेड्युलमुळं धोक्यात आलेलं आरोग्य. मंडळी शहरातली वाढती गर्दी, अस्वच्छता, प्रदूषण, अपघातांची वारंवारता, रोगराई, कामाची दगदग अन त्यात काळजी घ्याला कुणी जवळ नसणं यामुळं अनेकांमध्ये आजारी पडण्याचं प्रमाण खूप वाढलंय. काही जणांना तर गंभीर आजारालाही सामोरं जावं लागतंय. शारीरिक आजार तर आहेतच पण शहरातली माणसं प्रचंड मानसिक तणावाखाली जगत असल्यामुळं त्यांचं मानसिक आरोग्य ही धोक्यात आलय. कधी कधी गावाकडं मनसोक्त पावसात भिजून, उन्हा तान्हात राबून, रात रात जागून सुद्धा लोकं आजारी पडत नायत अन हिकडं शहरात आजारी पडायला गार पाण्याचं निमित्त होतय. आता बोला. सगळं हेक्टीक शेडयूल. गावाला कसं थंडीत सकाळी सकाळी उठल्यावर निवांत चुलीपुढ थंडीत शेकत बसायचं, मग उनं पडल्यावं सावकाश आंघोळ करायची. उन्हाळयात लवकर उठलं की हीरीला पवायला जायचं, पावसाळयात सगळी काम आटोपल्यावं पुन्हा आंघोळीच बघायचं, कुठली घाय नाय का काय नाय, सगळ कसं निवांत. पण शहरात पायाला भिंगरी बांधल्यागत नुस्त पळत ऱ्हायाचं. सकाळी उठल्यानंतर बस निदान ट्रेन वेळेत पकडायचं टेन्शन, कामावर वेळेत पोहोचायचं टेन्शन, ट्राफिक निदान मेगा ब्लॉकचं टेन्शन, जॉबवर टार्गेटस पूर्ण करायचं टेन्शन, काम नाही केल तर नोकरी जायचं टेन्शन, पुन्हा नोकरी गेली तर जगायचं कस, शहरात खर्च कसा भागवायचा, घरी काय सांगायचं या सगळ्याच टेन्शन यामुळं पोरं पाक किकून जात्यात. पण जबाबदाऱ्यांनी त्याच हात बांधल्याल आसत्यातं. मग त्याचा परिणाम त्यांच्या मानसिक आरोग्यावर होतो अन पोरांना गावची आठवण यायला लागती.
( Gavakadchya Goshti | Vishaych Bhari )
चौथ कारण म्हणजे आर्थिक तंगी : तूम्हाला भसम्या झाल्याला माणूस माहीतेय का ? त्याला कितीबी खायला दया, पण त्याच पोटच भरत नाय, शहरांच पण आसचं आसतयं, तूम्ही कितीबी कमवा, गरजा भागतचं नायत, पैसा पुरतचं नाय, तुमची एक गरज भागली की शहर दुसरी नवी गरज निर्माण करतं, ती गोष्ट नाय का, देव एकाला सांगतो की सुर्यास्तापर्यंत तू जेवढी जमीन पायाखाली घालशील तेवढी जमीन तूला मिळणार, आन त्यो माणूस मग जास्तीत जास्त जमीन मिळवायसाठी जीवाच्या आकांतान पळत राहतू, आन मग शेवटी दम लागून मरतू, शहरात आता माणस अशीच पळायला लागलीएतं, त्यांचा बी नाईलाजय. शहरात प्रत्येक गोष्टीसाठी पैसा मोजावा लागतो, आन पैसा नसलं तर टेंशनशिवाय दुसर कायचं हाती लागत नाय. गावाला माणसांना वाटत असतं, पोरग शहरात कमवतयं, पण शहरात पोरांच्या लक्षात येत आसतयं, त्यांनी पैशापायी आयुष्यातली किती महत्वाची गोष्ट गमावलीये. अन ती म्हणजे जगण्याचं स्वातंत्र्य. रूमच भाडं, घराचं हफ्ते, प्रवासाचा खर्च, मेसचे पैसे, गावाला पाठवायचं पैस, रोजचा खर्च हया सगळ्यात महीन्याच्या शेवटी पोरांचा खिसा कायम रिकामाच राहतो, त्यातचं मग उधारी वाढत जाती. लोकांपुढे हात पसरायला लागत्यातं, आन मग आपल्या गावातं आपण राजासारखं जगायचो, शेतात राबायचो, कष्टाचं खायचो, मनासारखं वागायचो याची आठवण येत राहती. गावाकडं तुमच्या पायात कुठल्या ब्रँडच्या चपल्या हायत्या, अंगात कुठल्या ब्रँडची कापड घातल्यात, सेंट कुठला मारलाय, कुठल्या गाडीतनं उतरलाय, ह्ये आसलं कोणच काय बघत नाय, रानात चिखलान भरल्यालं पाय अन मळल्याली कापडं माणसं यकांद्या दागिन्यासारखी अंगावर मिरवत्यात. पयल्या पावसातल्या मातीचा वास तर दहा हजाराच्या ब्रँडेड सेंटला पण येणार नाय.
( Gavakadchya Goshti | Vishaych Bhari )
खिसा मोकळा झाला की पोरांना या गोष्टी हमखास आठवत्यात. भलं बुर कसलं का आसना, पण गावचं हीरवगार शिवार सोडून, ही आपून कुठ आलू आस वाटतं राहतं. मन गावाकडं पळ काढायला बघत पण खांद्यावर पडलेल्या जबाबदारीच्या ओझ्यामुळं त्ये शक्य होतं नाय. गावाकडं बिनभरवश्याच्या पावसामुळं शेतीतनं काय उत्पन्न हाती लागतं नाय, लग्नासाठी कोण पोरगी देत नाय त्यामुळं स्वतः जिवंत असूनही सगळं मन मारून जगावं भोगावं लागतं. तोंड दाबून बुक्यांच्या मार सहन करावा लागतो. मंडळी आमचं आजिबात आस म्हणनं नाय की शहर वाईटचं आसत्यातं, उलटं शहरात जाऊन माणूस कमवतोय, गावाला पाठवतोय, म्हणून गावातली पण अनेक कुटूंब सुधारत्यात, शहरांनी गावातल्या अनेकांना ओळख दिलीय, पैसा दिला, सुबत्ता दिली, पण तरीपण ज्यांच उभ आयुष्य गावाकडं गेलयं, त्यांच्या मनातनं गाव कधी जात नाय. आन कायतरी मोठी मजबूरी असल्याशिवाय माणूस गाव सोडून ही जात नाय. प्रत्येकजण जमल तसं आपल्या मनात आपलं गावपण जपत आणि त्याचं स्वतःच्या आठवणीतलं एक गाव घेऊन शहरात जगत राहतो. तुमचं पण आसचं हाय का ? तुम्हाला पण तूमच्या गावची आठवण येतेय का ? मग आम्हाला कमेंटमध्ये तूमच्या गावचं नाव आणि तुमच्या गावाबद्दलच्या आठवणी सांगायला आजिबात विसरू नका.
Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇
https://www.facebook.com/aplavishaychbhari
Leave a Reply