मंडळी सध्या इस्त्राईल आणि हमास यांच्यात बेक्कारं युद्ध सुरूयं. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी पॅलेस्टाईनमधल्या गाझा पट्टीतून हमास या दहशतवादी संघटनेनं इस्त्राईलवर हल्ला केला आणि तिथूनच खऱ्या अर्थानं या युद्धाला तोंड फुटलं. इस्त्राईलची सुरक्षा यंत्रणा भेदून, त्यांच्या प्रसिद्ध मोसाद या गुप्तचर यंत्रणेला धुरी देऊन हमासनं हजारो रॉकेट्सचा वर्षाव इस्त्राईलवर केलेलाय. या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना इस्त्राईलनंसुद्धा हमास जिथून हल्ला करतय ती गाझा पट्टी अक्षरशः बेचिराख करून टाकलीयं. बरं इस्त्राईलचे हे यहुदी विरुद्ध अरबी मुस्लिम देश यांच्यातला हा वाद काय नवा नाही. त्याला तशी खूप जुनी पार्श्वभूमी आहे. मागे सुद्धा साधारण ५० ते ५५ वर्षांपूर्वी झालेल्या अशाच एका युद्धात इस्त्राईलनं सिरियाच्या ताब्यात असलेला गोलन हाईट्स हा प्रदेश जिंकून घेतला. पण त्या विजयामागे एक हेर होता. जर कदाचित तो हेर नसता तर इस्राईल ते युद्ध जिंकूचं शकली नसती. मंडळी त्याचं नाव होतं एली कोहेन. एली कोहेन हा खूप खुंकार माणूस होता. म्हणजे त्याच्या हेरगिरीने इतका कहर केला होता की त्याची अगदी सिरियाच्या पंतप्रधान आणि संरक्षणमंत्री पदासाठीसुद्धा चर्चा होती. पण त्याच्या एका चुकीमुळे एली कोहेनची हेरगिरी पकडली गेली आणि त्याला भर चौकात फाशीची शिक्षा देण्यात आली. मंडळी आज एली कोहेन इस्त्राईलमध्ये हिरो आहे तर सीरियामध्ये गद्दार ! आजच्या Blog मध्ये आपण इस्त्राईल आणि पर्यायाने मोसादच्या सर्वोत्तम गुप्तहेरांपैकी एक असलेल्या एली कोहेनची कहाणी जाणून घेणार आहोत.
(Eli Cohen | Vishaych Bhari)
मंडळी एली कोहेन हा मूळचा सीरियाच्या यहुदी कुटुंबातला रहिवासी. १९१४ साली त्याच्या कुटुंबानं सिरियाच्या एलेप्पो भागातून इजिप्तला स्थलांतर केलं. एलीचा जन्म इजिप्तच्या अलेक्झांड्रिया इथला १९२४ सालचा. १९४८ साली इस्त्राईल या यहुदी देशाची निर्मिती झाल्यानंतर एली कोहेनचं कुटुंब इजिप्तहून इस्त्राईलला गेल. पण एली मात्र त्याचं इलेक्ट्रॉनिक्सचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी इजिप्तमधेच थांबला. इजिप्तमधेच एलीनं हेरगिरीचा एक कोर्स पूर्ण केला. १९५४ साली इजिप्तमधेच बॉम्बस्फोट घडवून आणून तिथल्या लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या प्रयत्नात एली होता. हे काम इस्त्राईलच्या मोसादचंच असलं तरी एली त्यावेळी थेट मोसादशी जोडला गेलेला नव्हता. या बॉम्बस्फोटप्रकरणी पोलिसांनी त्याला पकडलं खरं, पण त्याच्याविरोधात ठोस पुरावे न मिळाल्याने त्याला सोडून देण्यात आलं. त्यानंतर १९५७ साली एली इस्त्राईलला आला. १९५९ साली त्याने नादिया मलजाद नावाच्या एका इराकी मुलीशी लग्न केलं. अकाऊंट आणि ट्रान्सलेशनची कामं करून गरजेपुरते पैसे तो मिळवायचा. त्याचा संसार सुरळीत चालला असतानाच १९६० साली इस्त्राईली सैन्याच्या अमन युनिटकडून त्याला नोकरीची ऑफर आली. युनिट १३१ मध्ये काम करत असताना त्याला हेरगिरीचं प्रशिक्षण देण्यात आलं. या प्रशिक्षणानंतर त्याला सिरीयात पाठवलं जाणार होतं. सिरियाकडून गोलन हाईट्स या भागातून इस्त्राईलवर तुफान गोळीबारी केली जात होती. शिवाय सिरियाने जॉर्डन नदीच्या पाण्यावरून इस्त्राईलची कोंडी करण्याचं ठरवलं होतं. जॉर्डन ही सिरिया आणि इस्त्राईलच्या मधून जाणारी नदी. या नदीचं पाणी इस्त्राईलला जाऊ नये यासाठी सिरियाने नदीवर शेकडो बंधारे बांधले होते.
(Eli Cohen | Vishaych Bhari)
या बंधाऱ्यांचं व्यवस्थापन ओसामा बिन लादेनचे वडील मुहम्मद बिन आवाद करत होते. कालव्यांची निर्मिती थांबवणं, तयार केलेले कालवे उध्वस्त करणं आणि गोलन हाईट्सवर कब्जा मिळवणं या प्रयत्नात तेंव्हा इस्त्राईल होता. या सगळ्या कामगिरीसाठी एली कोहेनला अत्यंत परफेक्ट प्रशिक्षित करण्यात आलं होतं. त्याला प्रामुख्यानं लढाऊ विमानं, सीरियातील महत्वाची स्थळं, व्यक्ती, शस्त्रास्त्र यांची ओळख करायला शिकवलं गेलं होतं. बायकोला ही गोष्ट सांगितली तर तिच्याकडून विरोध होईल म्हणून एलीने त्याला युरोपमध्ये नोकरी लागल्याचं बायकोला खोटं सांगितलं. सीरियामध्ये जायचं तर वेगळी ओळख पाहिजे, ती ओळख बनवण्यासाठी एक कहाणी रचली गेली. ती कहाणी अशाप्रकारे. त्याचं नाव कामेल अमीन थाबेत असेल. त्याचा जन्म लेबनॉन मधला असून त्याचे आई-वडील सिरियाचे आहेत. कामेलचे काका अर्जेंटिनामध्ये राहतात. कामेलच्या जन्मानंतर त्याचं कुटुंब काकांच्या बोलावण्यावरून अर्जेंटिनाला गेलं. तिथे कामेलचे वडील कपड्यांचा व्यापार करू लागले. मात्र व्यवसायात मोठं नुकसान झाल्यानंतर त्यांचा काही महिन्यांत मृत्यू झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर काहीच दिवसांत आईचा मृत्यू झाला. त्यानंतर कामेलने ट्रॅव्हल एजन्सीमध्ये काम सुरू केलं. कालांतराने तो व्यवसायात शिरला आणि अर्जेंटिनामधील मोठा व्यापारी बनला. ही कहाणी घेऊन कामेल अमीन थाबेत म्हणजेच एली कोहेन अर्जेंटिनाला गेला. त्याचा प्लॅन यशस्वी करायला आणि त्याला लागेल ती मदत करायला मोसाद सोबत होतीच.
(Eli Cohen | Vishaych Bhari)
त्याने अर्जेंटिनामधील व्यापाऱ्यांच्या ओळखी वाढवल्या. त्यांच्या पार्ट्यांमध्ये तो जाऊ लागला. अशाच एका पार्टीत तो सिरियाच्या तत्कालीन लष्करात महत्त्वाच्या पदावर असणाऱ्या अमीन अल हाफिज यांना भेटला. पुढे याच हाफिज यांच्या मदतीने सीरियातील महत्वाच्या ठिकाणांचा ऍक्सेस थाबेतला मिळणार होता. अर्जेंटिनामधील सिरियाच्या काही करोडपती लोकांसोबत मैत्री केल्यानंतर थाबेतने सिरीयाला जाण्याची इच्छा त्यांच्याजवळ बोलून दाखवली. थाबेतच्या मैत्रीखातर त्या लोकांनी सीरियाची राजधानी दमास्कस येथे थाबेतची सोय केली. त्याला आवश्यक ती मदत पुरवली. दमास्कसमध्ये आल्यानंतरही थाबेतने इथल्या व्यापाऱ्यांसोबत उठबस वाढवली. त्यांना तो बरेच पैसे पुरवायचा. त्यामुळे थाबेतविषयी सिरियाच्या व्यापाऱ्यांमध्ये विश्वास वाढला होता. पुढे लष्करात उत्तम कामगिरी करणाऱ्या अमीन अल हाफिज यांनी सीरियातील सरकार उलथवलं आणि ते स्वतः राष्ट्रध्यक्ष बनले. कामेल थाबेत आणि अमीन अल हाफिज यांची तोपर्यंत घनिष्ठ मैत्री झाली होती. हाफिज यांच्या माध्यमातून सिरियाची सर्व गुप्त माहिती, ठिकाणं थाबेतला कळणार होती. थाबेतनं दमास्कसच्या अतिश्रीमंत लोक राहतात त्या जागेत एक बंगला विकत घेतला होता. तिथे तो नेहमीच पार्ट्यांचं आयोजन करायचा. या पार्ट्यांमध्ये सरकारी अधिकारी, मंत्री, पोलीस तसंच सैन्य प्रशासनातली लोक उपस्थित असायचे. या लोकांना भरपूर दारू पाजून त्यांच्याकडून महत्वाची माहिती थाबेत काढून घ्यायचा. काही अधिकारी सहजासहजी बोलायला तयार नसायचे, मात्र ते बाईलवेडे होते. त्यांना रिझवणाऱ्या महिलांना थाबेत त्यांच्यासोबत पाठवायचा आणि माहिती काढून घ्यायचा. त्याचबरोबर राष्ट्राध्यक्ष ज्या माणसाला जवळचा मानतात त्याच्याविषयी शंका घ्यायचं कुणाला कारण नव्हतं किंवा कुणाची तशी हिंमतही नव्हती. मंडळी याच विश्वासाच्या जोरावर थाबेत यांना संरक्षण मंत्री किंवा प्रधानमंत्री करा अशी मागणीही लोक करायचे. लष्करी लोकांसोबत बोलताना थाबेत इस्त्राईलविरुद्ध आक्रमक शैलीत बोलायचा. तुम्ही अमुक तमुक प्रकारे हल्ला केला तर आपण लवकर त्यांना धडा शिकवू वगैरे तो बोलायचा. अधिकाऱ्यांना तुम्ही काहीच करत नाही असे टोमणेही लावायचा. यावर ते अधिकारी सैन्याची जी काही तयारी आहे, यंत्रणा आहे ती दाखवण्यासाठी थाबेतला सोबत घेऊन जायचे. ही सगळी माहिती तो लक्षपूर्वक ऐकून घ्यायचा. कधीतरी उपायही सांगायचा. गरमीपासून रक्षण करण्यासाठी युकेलिप्टसची झाडं लावण्याचा सल्ला त्याने अधिकाऱ्यांना दिला.
(Eli Cohen | Vishaych Bhari)
अधिकाऱ्यांनी ती लावलीसुद्धा. याच झाडांचा फायदा घेऊन इस्त्राईलने पुढील युद्धात सिरियाची लष्करी तळं उध्वस्त केली. मागे उल्लेख केल्याप्रमाणे जॉर्डनवर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यांची सर्व माहिती मुहम्मद बिन आवाद यांना होती. थाबेतने त्यांच्याकडून ही माहिती घेतल्यानंतर काहीच दिवसांत इस्त्राईलने हे बंधारे आपल्या मिराज या लढाऊ विमानांच्या सहाय्याने उध्वस्त केले. सिरियाची लढाऊ मिग विमानं चालवायला प्रशिक्षित पायलट नाहीत ही महत्वाची माहिती थाबेतकडून मोसादला गेल्यानंतरच ही कारवाई करणं इस्त्राईली सैन्याला सोपं गेलं. मिळालेली माहिती कागदी चिठ्ठीत लिहून ती छोट्या बॉक्समधून अर्जेंटिनाला आणि तिथून इस्त्राईलला पाठवण्याचा सिलसिला काही दिवस चालू होता. व्यापारी चतुराई वापरून हे काम थाबेत करत असला तरी या पद्धतीने मोसादला माहिती मिळायला उशीर होत होता. त्यानंतर घरातील रेडिओ ट्रान्समीटरचा आधार घेऊन मोसादला संदेश पाठवण्याचं काम थाबेतने चालू केलं. दरदिवशी रेडिओचे हजारो संदेश बाहेर जात असल्याने त्यात मोसदला कुठला संदेश जात असेल याची पाहणी करायला कुणालाच वेळ नव्हता. मात्र काही दिवसांतच हे चक्र थांबणार होतं. सिरियाच्या मंत्रिमंडळात ज्या चर्चा किंवा नियोजन व्हायचं त्याची माहिती दुसऱ्या दिवशीच्या इस्त्राईलच्या वर्तमानपत्रांत असायची. सिरियाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा महत्वाचा विषय होता. वरिष्ठ मंत्री आणि अधिकाऱ्यांमधील कुणीतरी फुटीर आहे याची कुणकुण राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षा सल्लागारांना लागली. इतक्या जलद माहिती ही रेडिओ ट्रान्समिशनद्वारेच जाऊ शकते हा अंदाज बांधून सिरियाने रशियाकडून अधिकच्या सुरक्षेसाठी नवी यंत्रणा मागवून घेतली. जुन्या रेडिओ ट्रान्समिशनहून सगळे संदेश पाठवणं २४ तासांसाठी बंद केलं तरी एक संदेश मात्र गेला होता हे सुरक्षा अधिकाऱ्यांना लक्षात आलं. या संदेशाच्या ट्रान्समिशनचा शोध घेत अधिकारी बाहेर पडले तेव्हा तो शोध थाबेत यांच्या घराजवळ येऊन थांबला. असं असतानाही आपल्याकडून तपासात काही चूक झाली असेल असं वाटून अधिकाऱ्यांनी काही वेळ थांबण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशीही त्याच ठिकाणाहून रेडिओ ट्रान्समिशनद्वारे संदेश गेल्याचं निदर्शनास आल्यानंतर सैन्याने थाबेत यांच्या घरावर धाड टाकली. धाड टाकल्याच्या वेळी थाबेत आणखी एक संदेश पाठवण्याच्या तयारीत असल्याचं दिसून आलं. त्यांना तात्काळ अटक करण्यात आली
(Eli Cohen | Vishaych Bhari)
हे विषयच भारी वाचलेस का भावा !
- पॅन कार्ड क्लबनं 51 लाख लोकांना गंडवून 7000 कोटींचा घोटाळा कसा केला | Pan Card Club Fraud | Refund Process
- इस्रायल vs पॅलेस्टिनी कट्टरवादी संघटना हमास च्या संघर्षामुळं जगावर तिसऱ्या महायुद्धाचं संकट | Israel vs Hamas War 2023 News
- एजंट लोकांना फुकट फोर व्हीलर वाटणाऱ्या पर्ल्स कंपनीनं ६०००० कोटींचा घोटाळा कसा केला | PACL Refund |PACL Refund Status
थाबेत यांना भयानक पद्धतीने टॉर्चर करण्यात आलं. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर तात्काळ एक बैठक घेऊन त्यांना भर चौकात फाशी देण्याचा निर्णय घेण्यात आला. थाबेत म्हणजेच एली कोहेन पकडला गेल्याची माहिती इस्त्राईलला मिळाल्यानंतर त्यांनी तडजोडीसाठी बरेच प्रयत्न करून पाहिले. आधुनिक कृषी यंत्रणा देण्याचा प्रस्तावही सिरियापुढे ठेवण्यात आला. मात्र सिरियाने तो धुडकावून लावला. फाशी देण्यापूर्वी एली कोहेन यांच्या गळ्यात अरबी भाषेत त्यांचा गुन्हा आणि त्याची शिक्षा याविषयीचा मजकूर असलेलं कापड अडकवण्यात आलं. रात्री फाशी दिल्यानंतर दुसऱ्या दिवशीसुद्धा त्यांचं प्रेत चौकात तसंच लटकवून ठेवण्यात आलं. इस्त्राईलने त्यानंतर वारंवार मागणी करूनही एली कोहेन यांचं प्रेत इस्त्राईलला देण्यात आलं नाही. कोहेन यांचं घड्याळ मात्र त्यांच्या मृत्यूनंतर तब्बल ५४ वर्षांनी मोसादच्या हाती लागलं. ते कसं याबाबत अधिक माहिती उपलब्ध नाही. आज इस्त्राईलमध्ये एली कोहेन यांना हिरो म्हणून ओळखलं जातं. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे १९६७ साली ६ दिवसांचं युद्ध करून इस्त्राईलने सिरियाच्या ताब्यातून गोलान हाईट्स हिसकावून घेतलं. शिवाय इजिप्त आणि जॉर्डनवर हल्ला करून त्यांनाही नामोहरम करत गाझा पट्टी आणि जेरुसलेमचा मोठा भूभागही काबीज केला. कुटुंब किंवा देश अशा दोन पर्यायांमधून एली कोहेन यांनी देशाची निवड केली. आपल्या ४ वर्षांच्या गुप्तहेरीच्या काळात ते आपल्या पत्नी आणि मुलीला केवळ २ ते ३ वेळाच भेटू शकले होते. शत्रू देशाच्या संरक्षण किंवा प्रधानमंत्रीपदापर्यंत पोहोचण्याची किमया साधणारा हा गुप्तहेर त्याच्या बेदरकार कामगिरीमुळे आजही इस्त्राईलमध्ये अजरामर आहे. इस्त्राईल सरकार आणि मोसादने मिळून त्यांचं स्मारकही बनवलंय..! नेटफ्लिक्सवर कोहेन यांच्या जीवनावर आधारित स्पाय नावाची वेबसिरीज आहे. शक्य झाल्यास ती आवर्जून बघा. बाकी हा Blog तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.
Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇
https://www.facebook.com/vishaychbhari
https://www.facebook.com/aplavishaychbhari
Leave a Reply