पोरींचे मॅटर ते निवडणुकीतला भ्रष्टाचार, ट्रम्पतात्याला चौथ्यांदा अटक का झालीये | Donald Trump Arrest News | Vishaych Bhari
इथं आपण आपल्या राजकारणाला शिव्या देत बसलूय. पण तिकडं सातासमुद्रापार अमेरिकेत आपल्या सगळ्यांच्या लाडक्या डोनाल्ड तात्यांनी येगळाच घोळ घालून ठिवलाय. आव काय झालंय म्हणून काय इचारता. तात्यांना अमेरिकेतल्या जॉर्जिया राज्यात एका गंभीर आरोपाखाली झाल्यालीये अटक. अहो खरच. म्हंजी काय झालं 2020 साली तात्या ज्या निवडणुकीत पडलं त्या अध्यक्षपदाची निवडणूक उलथवून लावण्याचा कट रचण्यात आणि फसवणूक करण्यात तात्याचा हातंय आसलं काय बाय आरोप तात्यांवर ठेवण्यात आल्यात. त्यामुळं सध्या अमेरिकेतलं वातावरण बेक्कार तापलंय आणि तात्यांच्या कट्टर समर्थकांनी तिथं एकच राडा घालायला सुरुवात केलीये. आता तसं पाहिलं तर तात्यांना अटक होण्याची ही काय पहिलीच वेळ नाय, मागच्या वर्षभरापासून तात्यांना एक नाय दोन नाय तर तब्बल चार वेळा अटक करण्यात आली होती. पण वेळोवेळी डोनाल्ड तात्या जामिनावर बाहेर आले. आता ही त्यांचा जामीन झाल्याचं कानावं आलंय पण नेमकं निवडणुकीच्या तोंडावर तात्यांना अटक का झाली अन ह्या सगळ्या कुटाण्यामुळं तात्यांना रिपब्लिकन पक्षाकडून पुन्हा उमेदवारी तिकडं मिळल का नाय अशा अनेक प्रश्नांनी इकडं भारतातल्याबी तात्यांच्या समर्थकांचे श्वास खालीवर व्हायला लागलेत. जसा आपल्याकडं खरी राष्ट्रवादी नेमकी कुणाची, असा कार्यकर्त्यांचा गोंधळ उडालाय का नाय अगदी सेम तसं. आता हा सगळा कुटाणा नेमका काय आहे आणि त्याचा अमेरिकेतल्या आगामी निवडणुकावर, तात्यांच्या मतदारसंघावर इकडं भारतावर काय परिणाम होऊ शकतो हे सगळंच नीट व्यवस्थितपणे समजावून घेऊयात…
( Donald Trump Arrest News | Vishaych Bhari )

मंडळी डोनाल्ड तात्या अमेरिकेचे 45 वे राष्ट्राध्यक्ष होते. पण राष्ट्राध्यक्ष होण्यापूर्वी तात्या काय बारिक हस्ती नव्हती. तिकडं अमेरिकेत एक प्रसिद्ध रिअल इस्टेट डेव्हलपर आणि व्यावसायिक म्हणून त्यांची येगळी वळखय . एकेकाळी तर त्यांनी टी व्ही ऍक्टर म्हणून सुद्धा काम केलंय. आन विशेष म्हणजे तात्या हार्ड कोअर लेखक बी हायती त्यांनी 50 च्या वर पुस्तकं सुद्धा लिहलेलीयेत. अमेरिकेससोबतच संबंध जगात त्यांची अनेक हॉटेल्स, रिसॉर्ट्स, कसीनो आन कापड व्यवसायेत. त्यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प या एक स्लोवेनियाई मॉडेल हायत. मेलानिया या डोनाल्ड तात्यांच्या तिसऱ्या पत्नी बरं का आणि त्या तात्यांपेक्षा 23 वर्षांनी लहान हायत. हिकडं आपल्या गाबड्यासनी एक मिळंना तिथं तात्यानं तीन तीन बिर्हाडं केल्यात. असो तर सांगायचा मुद्दा म्हणजे २०१६ रोजी झालेल्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन यांचा पराभव करून आपल्या तात्यानी राष्ट्राध्यक्षपद मिळवल होतं. पण २०२०च्या निवडणुकित मात्र बायडेन अण्णांनी आपल्या ट्रम्प तात्यांना अक्षरशः धूळ चारली. आता तुम्हाला माहित नसलं म्हणून सांगतो 1996 पासून 2015 पर्यंत जेवढ्या पण मिस युनिवर्स, मिस अमेरिका आणि मिस टीन ऑफ अमेरिका या स्पर्धाचं अमेरिकेत आयोजन केलं गेलं त्या सर्व स्पर्धाॅंच्या आयोजनाचं क्रेडिट बी तात्यांनाचं जातं. कसं ,जोरात काम हाय का नाय आपल्या तात्यांचं? आन हो तुम्ही घरात बसून जी WWE चीं कुस्ती बघता ना त्या कुस्तीचं तात्या सुदिक खूप मोठं फॅन हायती. त्याचं आवडीपायी डोनाल्ड तात्या एकदा WWE च्या रिंग मध्ये सुद्धा गेले होते. तिथं जाऊन त्यांनी आपल्या मोदी साहेबांसारखं सगळ्यां पैलवानांचं मनोबल वाढवलं हुतं.
( Donald Trump Arrest News | Vishaych Bhari )
( Donald Trump Arrest News | Vishaych Bhari )
आता, आस सगळं आलबेल असताना सुदिक आता मात्र त्यांना जेलमध्ये जावं लागलंय. पण नेमकं असं काय संकट कोसळलय आपल्या डोनाल्ड तात्यांवर की तात्यांना जेलमध्ये जावं लागलंय बरं. तर बघा अमेरिकेतल्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी 2020 मध्ये झालेल्या निवडणुकीतला पराभवाचा निकाल उलथवून लावल्याचा प्रयत्न आण अजून अशाच 12 गुन्ह्यांचे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले होते. तात्यांसोबत अजून 18 जणांवर त्यानिमित्तानं आरोप करण्यात आले होते. गेल्या पाच महिन्यात तात्यांवर हे चौथ आरोपपत्र ठेवण्यात आलयं आणि अध्यक्षीय निवडणुकीच निकाल उलथवून लावण्याबद्दलच हे दुसर आरोपपत्रयं. बाकीचे आरोपपत्र कोणती आहेत हे पुढे बघूच. पण तात्यांचा ह्यो सगळा कुटाणा कसा काय बाहेर आला. तर जॉर्जियातल्या डिस्ट्रीक्ट ऍटर्नी म्हणजेच सरकारी वकील फनी विलीस यांनी फेब्रुवारी 2021 मध्येच त्या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. ट्रम्प यांनी जॉर्जियाचे परराष्ट्र मंत्री ब्रॅड रॅफेनस्पेर्जर यांना फोन करून बायडेन अण्णांचा विजय उलथवून टाकला जाऊ शकलं ,एवढी मत मिळवायला सांगितलं होतं. जॉर्जियाच्या कायद्यानुसार हा निवडणुकीतील हेराफेरीचा गुन्हा ठरत असल्यामुळ तवा त्या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली होती. आपल्याकडं जसं इडीच्या धाडी टाकून विरोधकांना नमवणे, EVM मशीनमध्ये घोळ करणे असे सर्रास आरोप राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून केले जातात अगदी तसंच काहीतरी डेंजर प्रकरण तिकडं बी घडलेलं.अमेरिकेच्या फनी विलीस यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत त्या प्रकरणाबद्दल चर्चा केली होती. पण तात्यांनी मात्र नेहमीप्रमाण आपल्यावर झालेले सगळे आरोप फेटाळल्यात.

( Donald Trump Arrest News | Vishaych Bhari )
माझं खच्चीकरण करून राजकीय करिअर धोक्यात आणण्यासाठी ते सगळे आरोप माझ्यावर केले गेलेत असं तात्यांचं म्हणणंय. पुढं तात्यांनी चिंताग्रस्त मुद्रेनं आपलं मन कॅमेरऱ्यासमोर मोकळं केलं. तात्या म्हणाले, खरं तर ते आरोपपत्र तीन वर्षांपूर्वीच सादर केलं जाऊ शकलं असत. पण मुद्दाम अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचारादरम्यान हे प्रकरण उकरून काढण्यात आलयं. तात्यांच्या त्या शब्दांनी चाहत्यांच्या, कट्टर कार्यकर्त्यांच्या काळजाला किती मोठे घाव झाले हे सांगून तुम्हाला पटणार नाय. पण आता त्याचं सगळ्या कुटाण्यामुळं ट्रम्प तात्यांना अटक करण्यात आलीवती. अटक केल्यानंतर तात्या तब्बल 20 मिनिट तुरुंगात होते. किती 20 मिनिट. दुनिया की कोईबी पुलीस तात्या को ज्यादा देर अंदर नही कर सकती तर. हा आता त्यातबी कहर म्हणजे अटक केल्यानंतर तात्यांचा इतर कैद्यासारखा मगशॉट म्हणजेचं एक फोटो बी काढण्यात आलाय राव. यावर तात्यांचा एक भक्त लय ढसाढसा रडला राव. तात्यांच्या त्या मुस्कटदाबीबद्दल आवाज उठवण्यासाठी मग तात्यांच्या ट्वीटर अकाऊंटवर तात्यांचा तो कैदेतला फोटो त्यानं लागलीच अपलोड केला.
अन अत्यन्त निराश मनानं फोटोला काळीज कुरतडणार एक कॅप्शन बी टाकून दिलं. ते असं की Election interference never surrender. म्हणजे हे जे काय आहे ते फक्त माझ्या साठी इलेक्शनमधला हस्तक्षेप किंवा अडथळा आहे पण मी अजून नांग्या टाकलेल्या नाहीत. मी पुन्हा त्याचं ताकदीनं सगळ्यांची घासून नाय तर ठासून येणार.
( Donald Trump Arrest News | Vishaych Bhari )
आता डोनाल्ड तात्यांना अटक झालेली कळताच त्यांचे जीवातले कार्यकर्ते पोलीस स्टेशन आणि कोर्टाबाहेर एकच गर्दी करू लागले. त्यामुळं अमेरिकेत आंदोलनसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. एवढं सगळं झालं पण जेलमधी राहत्याल ती तात्या कसलं ? अहो म्हंजी पुढच्या वीसच मिनिटांत तात्यांनी दोन लाख डॉलर्स एवढी जातमुचलक्याची भरमसाठ रक्कम भरली अन जामीन मिळवला अन मग तिथून तात्या थेट आपल्या न्यू जर्सी मधल्या आपल्या घराकडं रवाना झाले. पण मंडळी गेल्या पाच महिन्यातली तात्यांवरची ही लागोपाठ चौथी क्रिमिनल केसयं बरं का. त्यामुळं तात्यांना वारंवार मतदार संघातली कामं सोडून न्यायालयात हजर व्हावं लागतयं. कोर्टान तात्याना 25 ऑगस्टपर्यंत शरणागतीची मुदत दिली होती. शेवटी तात्या गुरुवारी फुल्टन काउंटी तुरुंगात आले आणि त्यांनी शरणागती पत्करली. पण यां सगळ्या प्रकरणाची चर्चा कवा झालती तर जेंव्हा 2020 च्या निवडणुकीत जॉर्जिया राज्यातली मतं आपल्या बाजूनं वळवण्यासाठी तात्यांनी तिथल्या अधिकाऱ्याला फोन केला होता. त्या फोन कॉलचा पहिला रिपोर्ट हा वॉश्गिंटन पोस्ट या स्थानिक वृत्तपत्रानं प्रसिद्ध केला आन त्यानंतरच या प्रकरणाची मोठी खळबळ उडाली . पण याआधीही बऱ्याच कुटाण्यात तात्यानंवर आरोपपत्र दाखल झाल्यात. मागं सुद्धा तात्याना स्टॉर्मी डॅनियल्स प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्ये स्टॉर्मी डॅनियल्स प्रकरण तेव्हा चांगलंच गाजलं होतं. कारण मॅटर गंभीर होता. ही स्टॉर्मी डॅनियल्स एक नामांकित पॉर्न स्टार असून तिच्यासोबत तात्यांचे शारिरीक संबंध होते असे काय बाय आरोप तात्यांच्या विरोधकांनी तात्यावर लावले होते. अन तिचं तोंड बंद ठेवण्यासाठी 2016 साली तात्यांनी एक लाख तीस हजार डॉलर्सची मोठी रक्कम तिला दिली होती असंबी तेव्हा विरोधक म्हणत होते. तवा तर चक्क रस्त्यावरून फरपटत नेत पोलिसांनी तात्यांची उचलबांगडी केली होती. एवढा जगज्जेता माणूस पण तेव्हा तात्यांची दयनीय अवस्था पाहून प्रत्येक तात्याप्रेमींच्या डोळ्यात आसवं उभी राहिली होती. त्या आरोपानंतर गुन्हेगारी स्वरुपाच्या आरोपांना सामोरे जाणारे तात्या अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष बनवलेवते.

( Donald Trump Arrest News | Vishaych Bhari )
पण नंतर तात्यांनी ते आरोप ही फेटाळून लावले . पुढं त्या प्रकरणात सुद्धा त्यांना जामीन मिळाला. मागं सुद्धा त्यांच्यावर ब्लॉग रायटर ई. जीयन कॅरोल यांच 1996 मध्ये लैंगिक शोषण केल आणि त्यांची बदनामीही केली, असा ठपका मॅनहटन फेडरल ज्युरींनी ठेवला होता. त्या प्रकरणी तेंव्हा तात्यांनी कॅरोल यांना पन्नास लाख डॉलरची भरपाई द्यावी, असे आदेशही न्यायालयाने दिले होते. 2021 सालच्या अध्यक्षांच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडेन यांच्याकडनं तात्यांचा पराभव झाला होता. पण तात्यांनी हा पराभव मान्य करायला नकार दिलावता. कारण निवडणुकीमध्ये गैरव्यवहार झालाय असा त्यांचा आरोप होता. बायडेन अण्णांना निवडणुकीत विजयाच प्रमाणपत्र देण्याअगोदरच तात्याच्या हजारो समर्थकांनी अमेरिकेची संसद असलेल्या कॅपिटल हिलच्या इमारतीमध्ये घुसून प्रचंड धुडगूस घातला होता. त्यावेळी सुरक्षा रक्षक आणि निदर्शकांमध्ये जोरदार धुमश्चक्री सुद्धा झाली होती. 6 जानेवारी 2021 रोजी कॅपिटल हिलमध्ये झालेल्या धुडगूस प्रकरणी आपल्याविरोधात सुरू असलेला तपास थांबवण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका तात्याच्या वतीन न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली होती. पण ट्रम्प यांची ही मागणी न्यायालयान अमान्य केली. ग्रॅन्ड ज्युरीच्या निष्कर्षावर प्रतिक्रिया देण्यासाठी तात्याना 4 दिवसांची मुदत देण्यात आली. त्यानंतर ट्रम्प यांच्यावर आरोप निश्चित केले जाणार होते आणि न्यायालयीन प्रक्रियेचा भाग म्हणून त्यांना अटक देखील केली जाणार होती. पण त्या प्रकरणाचं पुढं काय झालं याबद्दल माहिती उपलब्ध नाही. या प्रकरणात त्यांना काही दिवसांपूर्वी अटक झाली होती अशीही माहिती समोर आली होती.
असो तर भारताबद्दल बोलायचं झाल्यास आता तात्यांचं इंडियाशी येगळंच संबंध हायती. म्हणून 2016 सालच्या निवडणुकीवेळी बरीच अमेरिकन इंडियन लोक त्यांच्या बाजूने होती. माग सुद्धा ट्रम्प तात्या गुजरात मध्ये आलं होतं तवा त्यांनी मोदी आपलं खास दोस्तयत असं सांगून त्यांच्याबद्दल बरंचं कौतुक केलं होतं. तात्यांच्या अटकेमुळं या इंडियन अमेरिकन लोकांचं तसेच इंडियातल्या तात्याभक्तांचं काळीज वरखाली झालंय. हे मात्र नक्कीय. पण एकूणच तात्यांच्या ह्या सगळ्या प्रकरणांमुळे त्यांना पुढची निवडणूक लढायला मिळेल का, ही पाहण्याजोगी गोष्टय. बाकी तुम्हाला तात्यांच्या संपूर्ण अटकेबद्दल ,त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा लेख आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा.
Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇
https://www.facebook.com/aplavishaychbhari
Leave a Reply