प्रत्येक घरात एकतरी देशी गाय हवी असं का म्हणलं जातं | Desi Cow Benefits | Vishaych Bhari
घराजवळचा एक काकाय. त्येजी पंचक्रोशीत सेंद्रिय शेती करणारा प्रगतशील शेतकरी आन कट्टर बैलगाडा शौकीन अशी वळखय. शेती आणि पशूपालन व्यवसायाच्या जीवावर त्येनं स्वतःच कुटुंब समृद्ध केलंय. त्येजी हिच अचिव्हमेंट बघून आज अनेक संस्था, मोठ्या गावचे जाणकार सरपंच आणि मोठमोठे रेडीओ चॅनेल्स त्याला शेती नियोजन, व्यवस्थापन आणि पशुपालन या विषयांवरती लेक्चर द्यायला बोलावतात. आगदी गावकऱ्यांच्या भाषेत सांगायचं झालंच तर काकाला जनावरांचा येडा नादय. काकाचं म्हणणंय, आजच्या घडीला प्रत्येक शेतकऱ्याच्या दावणीला एक देशी गाय पायजे म्हणजे पायजेच. त्याबद्दल काकाला इचारलं तर त्येनं देशी गाय दावणीला असण्याचे काही शास्त्र शुद्ध कारणं आम्हांला सांगितली. तीच आजच्या या लेखाद्वारे आपण जाणून घेणारय…
मंडळी काकाच्या म्हणण्यानुसार, देशी गाईदावणीला सांभाळण्याचं पहिलं कारण म्हणजे देशी गाई पासून मिळणारं पौष्टिक दूध, गोमुत्र आणि शेणखत. इतर जर्शी गायींच्या तुलनेत देशी गाईच्या दुधाचं प्रमाण कमी असलं तरी तिचं दुध, शेण आणि गोमुत्र इतर जनावरांच्या तुलनेत खूपचं फायदेशीर असतं.
वैज्ञानिकांच्या मते गायीच्या दुधात ८ प्रकारचे प्रोटीन्स, ६ प्रकारचे व्हिटॅमिन्स, २१ प्रकारची अमिनो ॲसिड, ११ प्रकारचे (चरबी) युक्त ॲसिड, २५ प्रकारची खनिज तत्त्व, १६ प्रकारचे नायट्रोजनयुक्त पदार्थ, ४ प्रकारचे फॉस्फोरसयुक्त पदार्थ, २ प्रकारची शर्करा, आणि याबरोबरचं मानवी शरीराला आवश्यक अशी लोह, कॅल्शियम, आयोडिन, फ्लोरिन, सिलिकॉन इत्यादी मुख्य खनिजं आढळून येतात.
( Desi Cow Benefits | Vishaych Bhari )
या सर्व खनिज तत्वांमुळं आजच्या घडीला देशी गायीच्या दुधाला पूर्ण अन्न म्हणलं जातय. ते दुध मानवी शरीरासाठी एखाद्या टॉनिकसारखं काम करतं. शरीरातल्या रक्त, मांस, चरबी, हाडं, मज्जासंस्था आणि वीर्य यांची वृद्धी करण्यात देशी गायीचं दुध खूप महत्वाच आहे. आता वेगवेगळ्या वैज्ञानिकांनी गायीच्या दुधावर संशोधन केल्यानंतर काही निरीक्षणे इथे नोंदवली आहेत. ती निरीक्षणे आता आपण पाहूयात.
तर हॉर्वर्ड चिकित्सा विद्यालयाचे प्रोफेसर एम्.जे. रोसेनो यांच्यामते देशी गायीचं दूध एकमेव असे पेय आहे जे सर्व पौष्टिक द्रव्यांनी परिपूर्ण आहे. डब्ल्यू.एच्.ओ. च्या म्हणण्यानुसार बालकासाठी मातेच्या दुधानंतर देशी गायीचं दूध सर्वाधिक फायदेशीर आहे. पुढं इंटरनॅशनल कार्डियोलॉजी कॉन्फरन्सच्या म्हणण्यानुसार, ‘हृदयरुग्णांसाठी देशी गायीचं दूध खूप उपयोगी ठरतं. तसच डॉ. पीपल्स यांच्यामते देशी गायीच्या शरिरात सौम्य विष पचवण्याची अद्भुत क्षमता असते. त्यामुळं गायीनं एखादा विषारी पदार्थ खाल्ला तरी त्याचा परिणाम तिच्या दुधावर होत नाही. त्यानंतर कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य जे. एल्. सहस्रबुद्धे यांच्यामते गायीच्या दुधात बुद्धी कुशाग्र करण्याचा विशेष गुण आहे. त्यांनी त्याचा प्रयोग करून पाहिल्याचं हि त्यांच म्हणणय. तसच देशी गायीच दुध हे पित्तशामक म्हणून देखील काम करतं. नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट, अमेरिका यांच्यामते जर्सी गायीचं दूध प्यायल्यानं कॅन्सर वाढण्याची ३० टक्के शक्यता असते; म्हणून तथाकथित जर्सी, होल्सटीन गायीच्या दुधापासून सावधान रहावे. त्याच्या तुलनेत देशी गायींचं दुध खूप लाभदायक असतं.
आता आपण देशी गाईच्या दुधाचे आणखी काही उपयोग पाहूयात. देशी गाईचं दुध रोज सेवन केल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. आयुर्वेदामध्ये सुद्धा रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी गायीचे दूध पिणं फायदेशीर मानलं गेलंय. त्याचंबरोबर तुम्ही केसगळतीमुळे हैराण असाल तर त्यावर उपाय म्हणून नियमित गाईचे दूध पिण्याचा सल्ला तज्ञाकडून दिला जातो. व्हिटॅमिन डी आणि झिंक यांसारख्या पोषकतत्त्वांच्या कमतरतेमुळे केसगळतीची समस्या निर्माण होते. गायीच्या दुधामध्ये व्हिटॅमिन डी आणि झिंक हे पोषणतत्त्व भरपूर प्रमाणात असतात. त्या घटकांमुळं तुमच्या केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत मिळते. ज्यामुळे केसगळतीचा त्रास देखील कमी होऊ शकतो. पण अतिरिक्त प्रमाणात दूध पिणे हे देखील हानिकारक ठरू शकते. पुढचा फायदा म्हणजे हाडे मजबूत होतात. व्हिटॅमिन डीची कमतरता, व्यायामाचा अभाव, फास्ट फूड अशा विविध कारणांमुळे हाडांचे आजार उद्भवू शकतात. तशावेळी हाडे मजबूत राहण्यासाठी आणि शरीराला पुरेशा प्रमाणात कॅल्शिअमचा पुरवठा होण्यासाठी रोज देशी गाईच्या दुधाचा एक ग्लास घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात. पुढचा महत्वाचा उपयोग म्हणजे देशी गायीच्या दुधाच सेवन केल्याने मेंदूची कार्यक्षमता वाढते. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ या संस्थेनं देखील यासाठी दुजोरा दिलाय. गायीच्या दुधामध्ये ओमेगा-3 Fatty Acid भरपूर प्रमाणात असतं जे मेंदूसाठी पोषक असतं. म्हणून लहान मुलांच्या आहारात गायीच्या दुधाचा समावेश करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो.
( Desi Cow Benefits | Vishaych Bhari )
त्याचंप्रमाण डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक असणारं ‘व्हिटॅमिन ए’ हे जीवनसत्व सुद्धा देशी गायीच्या दुधात मुबलक प्रमाणात आढळतं. आत हे झालं दुधाचं. पण देशी गाईच्या दुधापासून मिळणाऱ्या ताक, दही आणि तूपाचे ही आरोग्यासाठी खूप फायदे आहेत. देशी गाईचं तूप आहारात वापरणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. रात्री झोपताना देशी गाईच्या तुपाचे फक्त दोन थेंब नाकात टाकल्याने अनेक फायदे होतात. वात, पित्त, कफ या त्रिदोषांचा समतोल साधण्यासाठी देशी गाईच्या तुपाचे दोन थेंब नाकात सोडणे फायदेशीर ठरतं. त्यामुळं अर्धशिशी किंवा डोकेदुखीचा त्रास कमी होतो. झोपेच्या तक्रारी दूर होतात. स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते. खरं तर इतके फायदे जाणून घेतल्यानंतर देशी गाई दावणीला सांभाळणं वर्थ इटय असच म्हणावं लागेल. पण देशी गायीचे फायदे इथेच संपत नाहीत. देशी गाईपासून मिळणारा कोणताच पदार्थ वाया जात नाही. देशी गायीपासून मिळणारं गोमुत्र आणि शेणखत सुद्धा शेती साठी खूप फायदेशीर असतं. अगदी वेदांमध्ये सुद्धा देशी गायीच्या शेण गोमूत्राचं महत्त्व सांगितलेलंय. आपणास गाईचे शेण हा पदार्थ जरी टाकाऊ वाटत असला तरी त्यापासून ३३ प्रकारची अन्नद्रव्ये उपलब्ध करणारे उपयुक्त जिवाणू शेण व गोमूत्राच्या माध्यमातून जमिनीला मिळत असतात. तसच शेणापासून शेतीसाठी कंपोस्ट खत, गांडूळखत, आणि गोबर गॅसही तयार केला जाऊ शकतो. देशी गायीच्या शेणापासून बनवलेलं कंपोस्टखत मातीची उत्पादनक्षमता वाढवतं. त्यामुळ हल्ली अनेक शेतकरी एक तरी देशी गाई सांभाळणं प्रेफर करतात. शेती व्यतिरिक्त देशी गाईच्या शेणापासून पर्यावरण पूरक विविध पदार्थ बनवूनही चांगले पैसे मिळू शकतात. त्यामध्ये धूपकांडी, मच्छर अगरबत्ती, गोवऱ्या, भांडी घासण्याची पावडर, चपला, कुंड्या इत्यादी वस्तूंचा समावेश होतो. तशा वस्तू बनवायचे प्लांट हल्ली देशात अनेक ठिकाणी तयार होत आहेत.
तसं पाहिलं तर देशी गाई आपल्याला संपूर्ण आयुष्यभर फायदा करून देतेचं पण मृत पावल्यानंतर सुद्धा देशी गाय शेतकऱ्याला खूप काही देवून जाते. जसं की गाईची खूरे, हाडे, शिंगे ही उत्कृष्ट पद्धतीचं खत निर्मितीसाठी वापरली जातात. मृत पावलेली गाई आपण ज्या ठिकाणी पुरतो त्या ठिकाणी पुढील काही वर्ष उत्कृष्ट दर्जाचं पीक उत्पादन येतं असं काही जणांचं म्हणणय. म्हणजे एकूणच काय देशी गाई एलआयसी पॉलिसीसारखी असते. जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी.
( Desi Cow Benefits | Vishaych Bhari )
आतापर्यत आपण देशी गाई घरी असण्याचे एकूण एक फायदे ऐकले. आता आपण भारतात देशी गाईंच्या नेमक्या कोणत्या जाती आढळतात. त्याची माहिती घेवू.
तर पहिल्या नंबरला येते देशी खिल्लार गाय.
मुख्यतः पश्चिम महाराष्ट्रातल्या सांगली सातारा, कोल्हापूर भागात ही गाय जास्त प्रमाणात पाहायला मिळते. या खिल्लार च्या ४ उपजाती पाहायला मिळतात – आटपाडी महाल, म्हसवड, थिल्लारी आणि नकली खिल्लार. तलवारीसारखी लांब टोकदार शिंगं, पांढरा रंग, मजबूत बांधा ही खिलार जातीच्या गाईची वैशिष्ट्ये असतात. ही गाय इतर देशी गायींच्या तुलनेत दुध कमी देते. पण या गायीच्या पोटी जन्मलेले बैल शेतीच्या कामासाठी आणि पळण्यासाठी खूप ताकदीचे मानले जातात. हि गाय वर्षाकाठी ४०० ते साडे ४५० लिटरच्या आसपास दुध देवू शकते.
दुसऱ्या नंबरची देशी गाय आहे लाल कंधारी.
या जातीचा उगम नांदेड मधील कंधार तालुक्यातला मानला जातो आणि हिचा कलर लालसर असल्यामुळं तिला लाल कंधार असं नाव पडलंय. काही ठिकाणी तिला लखलबुंधा असं ही म्हणलं जातं. दुष्काळी भागात या गाई आढळून येतात. राजा सोमदेवराय याने या कंधार गाईंना राजाश्रय दिल्याचं मानलं जात. ही गाय वर्षाकाठी सरासरी ५९८ लिटर दूध देत असल्याच्या नोंदी आहेत. या गाईच्या पोटी जन्मेलेले शेतीच्या आणि वाहतुकीच्या कामासाठी उत्तम मानले जातात.
( Desi Cow Benefits | Vishaych Bhari )
तिसरीय साहिवाल गाय.
भारतातली सर्वोत्तम दूध देणारी गाय म्हणून साहिवाल जात ओळखली जाते. या जातीचा उगम पाकिस्तानातील साहिवाल प्रांतातल्या मॉंटगोमेरी जिल्ह्यात झाल्याच बोललं जातं. तपकिरी लाल, किंवा महोगनी लाल अशा विविध कलरमध्ये साहिवाल गाय पाहायला मिळते. सहिवाल गाय वर्षाकाठी सरासरी २३२५ लिटर दूध देऊ शकते. त्यापैकी काही साहिवाल गायींनी तर वर्षाला सर्वाधिक ६००० लीटर दूध दिल्याचा हि अनेकांनी दावा केलाय. सध्या ऑस्ट्रेलिया मध्ये या गाईची आयात करून संकरित झेबू गाय तयार करण्यात आलीये.
चौथीय लाल सिंधी गाय.
उष्ण हवामानात तग धरून राहणारी गाय म्हणून ही जात प्रसिद्ध आहे. या गाईचा मूळ उगम देखील पाकिस्तानातल्या सिंध प्रांतातलाय. गडद लाल ते फिका पिवळा अशा वेगवेगळ्या कलरमध्ये या देशी गाई पाहायला मिळतात. यांची शिंगं मजबूत आणि वर्तुळाकार वाढलेली असतात. साहिवाल जाती प्रमाणेच या गायी सुद्धा भरपूर दूध देणाऱ्या मानल्या जातात. ही गाय वर्षाकाठी सरासरी १८०० लिटर दूध देवू शकते.आजकाल अमेरिका, ऑस्ट्रेलिया, फिलिपिन्स, ब्राझील, श्रीलंका इत्यादी देशात या गाई निर्यात करून त्यांच्यावर संशोधन आणि त्यांचं संवर्धन करण्यात येतय.
पुढ पाचव्या नंबरला आहे गीर गाय.
गुजरातमधील गीर जंगलावरून या गाईच्या जातीचं नाव पडलंय. या गाईला सुरती, गुजराती या नावाने देखील ओळखलं जातं. गीर गायीच्या पोटी जन्मलेले बैल भरपूर अवजड कामं करू शकतात. कोणत्याही परिस्थितीत तग धरून राहणारी जात म्हणून ही देशी गाय प्रसिद्धय. गीर गाईमध्ये कमी खाद्यातून जास्त दूध देण्याची क्षमता असते. वर्षाकाठी सरासरी २११० लिटर दूध देवू शकते. ब्राझील मध्ये आयात केलेल्या एका गीर गाईने एका वेळेस ६४ लिटर दूध दिल्याचं बोललं गेलं होतं.
आता पुढचीय ओंगोले गाय.
खासकरून आंध्र प्रदेशातल्या ओंगोले भागात ही गाय आढळत असल्यामुळं तिचं ह्ये नाव पडलं. काही ठिकाणी या गायीला नेल्लोर गाय म्हणून ही बोलवलं जातं. शेतीकामासाठी बैल जन्माला घालणे आणि थोड्या फार प्रमाणात दुधाच्या उत्पादनासाठी तिथले शेतकरी या जातीच्या गायीना सांभाळतात. रोगप्रतिकारक, काटक आणि कमी चाऱ्यावर गुजराण करू शकणे ही या गायींची वैशिष्ट्ये आहेत. या गाई चमकदार पांढऱ्या रंगाच्या असून त्यांची शिंगे छोट्या लांबीची असतात. या गाई वर्षाकाठी सरासरी ७९८ लिटर दूध देवू शकतात.
( Desi Cow Benefits | Vishaych Bhari )
आता राहिला सातवा आणि शेवटचा प्रकार – वेचूर गाय.
केरळच्या वेचूर भागात या गाई पाहायला मिळतात. या गाई आखूड आणि बुटक्या शरीरयष्टीच्या असतात. त्यांचा रंग लाल आणि शिंगे छोटी असतात. उष्ण आणि आर्द्र हवामानात तग धरून ठेवण्याची खासियत असल्यामुळं या गाई काटक स्वरूपाच्या असतात. या गायी त्यांच्या शरीरयष्टीच्या मानानं बऱ्यापैकी दूध देतात. म्हणजे वर्षाकाठी सरासरी ५६१ लिटर. तर एकूण असा सगळा देशी गायींच्या उपयोगाचा आणि भारतात मिळणाऱ्या त्यांच्या जातींचा बायोडेटा. याउपर तुम्हांला देशी गाईपासून मिळणारे आणखी काही खास फायदे माहिती असतील तर त्ये आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसंच तुमच्या घरी तुम्ही देशी गाय सांभाळताय का त्ये देखील नक्की कळवा. जर हा लेख आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. धन्यवाद
Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇
https://www.facebook.com/aplavishaychbhari
Leave a Reply