मित्रांनो साधारण वर्षापूर्वीचा किस्साय. एक पाहुण पोरगा कधीच नाव न ऐकलेल्या कंपनीचा एक फेसवॉश घेऊन घरी आला अन म्हणला, भावा, पुण्याची अशी अशी एक कंपनीय, ती आपल्याला असले प्रॉडक्ट्स देणार. आपण डिस्ट्रिब्युटर व्हायचं आणि आपल्याखाली ह्ये प्रॉडक्ट्स विकणारी माणसं जोडायची. म्हणजे मी तीन माणसं जोडणार, पुन्हा ती तीन माणसं प्रत्येकी आणखी तीन माणसं जोडणार. असं नेटवर्क वाढत जाणार. जेवढी जास्त माणसं तेवढा आपला फायदा जास्त. प्रत्येक माणसामागं आपल्याला 10 टक्के कमिशन अन फक्त दीड हजार रुपये भरून आपल्याला डिस्ट्रिब्युटरशिप भेटतीया. एका वर्षात आपण लखपती, 3 वर्षात करोडपती, फॉरेन ट्रिप असलं काय बाय सांगाय लागला. त्येला म्हणलं भावा आधी तुझ्या विचारांना ब्रेक मार अन एका दुरीत घरी जा. या असल्या चेन मार्केटिंगच्या स्किमा बघून तू गंडशील आपण नाय. कारण मला माहितेय असं कुणी दोन वर्षात करोडपती होत नाय. आता त्या गड्याला तर तिथनं हाकलला पण आजकाल अशा स्किमाना हजारो पोरं पोरी बळी पडलेत बरं का. त्यामुळं आजच्या या Blog मध्ये आपण नेटवर्क मार्केटिंग किंवा MLM मार्केटिंग म्हणजे काय ? ते कसं चालतं ? त्यातून खरंच करोडपती होता येतं का ? त्याद्वारे लोकांना कसं फसवलं जातं ? ते भारतात लीगल आहे की इलीगल ? पिरॅमिड मार्केटिंग आणि MLM मार्केटिंग एकचय की वेगवेगळं आणि सध्या अशा कोणत्या MLM कंपन्या बाजारात उपलब्ध आहेत ?

(Chain Marketing | MLM OR Network Marketing Reality )
मंडळी जर तुम्ही सोशल मीडिया वापरत असाल तर एका विशिष्ट प्रकारच्या जॉबची जाहिरात नक्की तुमच्या वाचनात आली असणार. ज्यामध्ये असं लिहिलेलं असतं की महिन्याला कमवा 25000 ते 35000. अनुभव किंवा शिक्षणाची अट नाही. दहावी, बारावी, ग्रॅज्यूएशन कोणतीही पदवी चालेल. कुठे बाहेर जायची गरज नाही. घरबसल्या हे काम करू शकता. विद्यार्थी, रिटायर्ड व्यक्ती किंवा गृहिणी यांच्यासाठी खास सुवर्णसंधी. डायरेक्ट जॉईनिंग, कसलीही फी नाही. आता घरबसल्या 30 पस्तीस हजार मिळतायत म्हणल्यावर आपल्यापैकी बरेचजण त्या स्कीमचा मागोवा काढत कंपनीपर्यंत पोहोचतात. जाहिरातीत कंपनीचं नाव दिलेलं नसतं. तिथं गेल्यावर कळतं कंपनीचा कायतरी सेमिनार नावाचा प्रकारय. तो अटेंड कररावा लागतो. सेमिनार मध्ये काय असतं माहितेय ? नुकताचं बुक केलेला हॉल किंवा महिन्याभरापूर्वी भाड्यानं घेतलेली स्पेशल फर्निचर आणि पीओपीवाली रूम, सेमिनारच्या दिवशी फिनेल टाकून पुसून घेतलेली पॉश लादी, झगमगाटी लायटिंग, व्हाईटबोर्ड, प्रोजेक्टर, लॅपटॉप आणि सगळे काळ्या निळ्या सूटाबुटातले कर्मचारी. त्यांचं झगामगा मला बघा नेचर तिथं गेलेल्या aspirant पोरांचा मूड फ्रेश करतं. आपण कुठल्या तरी मल्टीविंग्लिश कंपनीमध्ये आलोय की काय असा भास होतो. Actually भास होत नाय तो भास तयार केलेला असतो. त्यानंतर मग कुणीतरी जबरदस्त मेकओव्हर केलेला सुटबुटातला माणूस येतो अन तो कंपनीच्या actual कामाबद्दल सांगायचं सोडून फक्त मोटिव्हेशनल भाषण देऊन उपस्थितांचं रक्त तापवतो. मग मी एका वर्षात माझी किती स्वप्न पूर्ण केली, किती घरं घेतली, किती गाड्या घेतल्या, किती देश फिरलो, माझा बँकेत किती पैसा शिल्लकय याची आकडेवारी रंगवून सांगू लागतो. बाकीचा जमलेला स्टाफ त्याला सर सर म्हणून हरभऱ्याच्या डहाळ्यावं चढवतो अन तुमच्यापुढं असं चित्र प्रेझेंट केलं जातं की त्यो या पृथ्वीतलावरचा एकमेव सर्वात यशस्वी माणूसय. त्यानंतर तुमच्यापैकी बरेच लोक चार्जअप होतात आणि तुमची मनस्थिती ओळखून ते त्यांचा पुढचा डाव टाकतात. पुढं ते तुम्हाला असं सांगतात की तुम्ही सुद्धा आमच्यासारखी तुमची सगळी स्वप्नं पूर्ण करू शकता. फक्त तुम्हाला तुमच्यासारखी अजून तीन ते सहा माणसं आपल्या कंपनीसोबत जोडावी लागतील. तुम्हाला त्या प्रत्येक माणसामागं 10 टक्के कमिशन दिलं जाईल. तसंच जर तुम्ही जोडलेल्या माणसांनी अजून सहा माणसं जोडली, आणि त्या सहा माणसांनी अजून सहा माणसं जोडली तर तुमच्या कमिशनमध्ये दिवसेंदिवस वाढ होत राहिल. जितकं जास्त माणसांच नेटवर्क तितका जास्त फायदा. एका वर्षाच्या आत तुम्ही लखपती झालेले असाल. पुढच्या तीन वर्षात तुम्ही करोडपती झालेले असाल. तुमची सगळी स्वप्न पूर्ण झालेले असतील. दरम्यान तुम्ही मनातल्या मनात अमेरिकेच्या मियामी बीचवर पोहोचलेला असतानाचं अचानक तुम्हाला कंपनीमध्ये काही ठराविक रक्कम जमा करायला सांगितली जाते. तोपर्यंत तुम्ही त्यांच्या मायाजाळात फसलेले असता आणि तुमच्या ध्यानीमनी नसताना सुद्धा तुम्ही त्यांना पैसे देऊन टाकता. अन पुढं सुरू होतं एक भयंकर चक्र. माणसं जोडण्याचं. यालाचं म्हणतात पिरॅमिड मार्केटिंग. यामध्ये लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे पिरॅमिड मार्केटिंगमध्ये कंपनीचा कोणताही प्रॉडक्ट नसतो. प्रॉडक्ट असतात खुद्द कंपनीशी जॉईन होणारी माणसं. ते लोक जितकी माणसं जोडतील तितका कंपनीला जास्त फायदा.
(Chain Marketing | MLM OR Network Marketing Reality )
Actually फायदा कंपनीला नाही तर जो त्या पिरॅमिड सिस्टीममध्ये सगळ्यात टॉपला बसलाय, एकमेव त्याचं व्यक्तीला होत असतो. बाकी त्याच्या अंडर येणारी वरच्या फळीतली काही माणसं सोडली तर बाकीच्या 99 टक्के लोकांना फक्त आणि फक्त लॉसच होतो. त्यांची श्रीमंत व्हायची, बंगला बांधायची, फोर व्हीलर घ्यायची आणि फॉरेनला जायची स्वप्नं स्वप्नच राहतात. कारण त्या स्कीममधून आजपर्यंत वरच्या लेव्हलचा टॉप सूत्रधार सोडला तर कुणालाही फायदा झाल्याचं दिसून आलेलं नाही. तरीही लोक डोळे झाकून तशा स्कीममध्ये आजतागायत पैसे गुंतवतात. गंमत म्हणजे त्या स्कीममध्ये पैसे गुंतवणाऱ्या प्रत्येकाला असं वाटतं की तो कंपनीचा मालक आहे आणि त्याने त्याच्या हाताखाली जोडलेले माणसं त्याच्यासाठी काम करतायत. पण तसं नसतं. खरी गेम वेगळी असते. पिरॅमिड स्कीममध्ये काय होतं तर प्रत्येकाला असं सांगितलं जातं की तू ग्राहक नाय, तू डिस्ट्रिब्युटरय आणि तू जेवढी माणसं तुझ्या अंडर जोडशील ते तुझे ग्राहक असतील. पण actual मध्ये टॉप लेव्हलचे सूत्रधार सोडले तर कंपनीशी जोडला गेलेला प्रत्येक माणूस हा फक्त आणि फक्त त्या फ्रॉड स्कीमचा ग्राहकच असतो. ती पिरॅमिड स्कीम हा भयंकर मोठा फ्रॉडय आणि 1995 साली अशा पद्धतीच्या फ्रॉडला पहिल्यांदा भारतात सुरुवात झाली होती. 2021 पासून भारतात New consumer protection act नुसार तशा पिरॅमिड स्कीमवाल्या कंपन्या बेकायदेशीर मानल्या जात असून त्यांच्यावर बॅन लावण्यात आलाय. आता तुम्हाला तुमच्या अंडर तीन माणसं, त्यांच्या अंडर पुन्हा तीन माणसं या गेमचा झोल लक्षात आला असेल. यालाचं नेटवर्क मार्केटिंग किंवा चेन मार्केटिंग असंही म्हणतात. अशा पद्धतीची पोंझी स्कीम नव्वच्या दशकात भारतात खूप चर्चेत आली होती. आता दुसरा प्रकार असतो MLM मार्केटिंग. MLM म्हणजे मल्टी लेव्हल मार्केटिंग. खरं तर MLM मार्केटिंग ही सुद्धा एकप्रकारे लोकांना नव्या रॅपरमध्ये घालून दिलेल्या पिरॅमिड स्कीमचाचं प्रकारय. फक्त यांत एक बदल केलेला असतो. MLM मार्केटिंगमध्ये तुम्हाला माणसं जोडण्यासोबतचं कंपनीचं प्रॉडक्ट सुद्धा सेल करायला दिलेलं असतं. मग ते एखादा साबण, फेसवॉश, शाम्पू, उदबत्ती, गोरी व्हायची क्रीम, विशिष्ट रोगावरची औषधे, रेफरल पॉईंट्स काहीही असू शकतं. ज्यांना पिरॅमिड स्कीम किती सक्सेसफुल्लय याची कल्पना होती त्यांनी काय केलं तर डायरेक्ट सेलिंगमध्ये manipulation करून त्यात MLM मार्केटिंगचा प्रकार घुसवला आणि सध्या याचं जाळं खूप मोठ्या प्रमाणात बाजारात पसरलेलंय. या MLM मार्केटिंगमध्ये वेगवेगळ्या लेव्हल असतात. म्हणजे सगळ्यात वर असतो प्लॅटिनम प्लॅन, नंतर गोल्ड, त्याखाली सिल्वर आणि सगळ्यात सुरुवातीला ब्रॉन्झ किंवा बेसिक प्लॅन. त्या त्या प्लॅनच्या आवाक्यानुसार त्याची एक ठराविक किंमत ठरवलेली असते.

(Chain Marketing | MLM OR Network Marketing Reality )
जेवढा मोठा प्लॅन तेवढा जास्त पैसा असं चित्र ग्राहकांसमोर उभं केलेलं असतं. मग तुम्ही ठरवायचं तुमची कोणता प्लॅन घ्यायची ऐपतय. त्या प्लॅननुसार त्या त्या लेव्हलमध्ये वेगवेगळी पदं देखील असतात. जो माणूस जेवढे जास्त लोकांना प्रॉडक्ट सेल करून कंपनीशी जोडेल त्यांना वरच्या पदावर बढती मिळणार असंही लालचं दिलेलं असतं. म्हणजे संबंधित MLM कंपनीत काम करणाऱ्या employees ना अशी फिलिंग यावी की आपली कंपनी टाटा अंबानी यांच्या कंपन्यासारखी आपल्या परफॉर्मन्सनुसार आपल्याला बढती देतेय. पण खरं तर तसं काहीच नसतं. MLM कंपनीत वरच्या लेव्हलचे मोठे मासे ह्ये खालच्या लहान माशांना खायलाचं बसलेले असतात. आणि महत्वाचं म्हणजे MLM भारतात लीगल आहे. कारण या प्रकारातल्या सगळ्या MLM कंपन्या डायरेक्ट सेलिंगच्या आडून आम्ही प्रॉडक्ट सेल करतो आणि मगच ग्राहकाकडून त्याचे पैसे घेतो असं सांगतात. कारण कायद्यानं प्रॉडक्ट किंवा कोणत्याही सुविधेशिवाय लोकांकडून पैसं घेणं हा गुन्हा आहे. म्हणून मग MLM कंपन्या त्यांच्या प्रॉडक्टच्या आडून त्यांची पिरॅमिड स्कीम चालू ठेवतात. अन भारत सरकार त्यांना कायद्यानं थांबवू शकत नाही. हा पण सरकार वेळोवेळी तुम्ही अशा फसव्या स्कीमपासून सावध राहा असं नक्की वॉर्न करतं. बरं असं ही नाही की MLM मार्केटिंग करणाऱ्या सगळ्या कंपन्या फ्रॉडचं असतात. actually MLM ही कंपनीचं कोणतंही प्रॉडक्ट लोकांपर्यंत पोहोचवण्याचं सर्वात प्रभावी माध्यम आहे. कारण त्यामध्ये कंपनीचा थेट ग्राहकांशी फेस टू फेस संबंध येतो आणि प्रॉडक्ट चांगलं असल्यास ग्राहक माऊथ टू माऊथ पब्लिसिटी करू लागतो. जे की उत्तम सेवा देणाऱ्या कंपन्यांसाठी चांगली गोष्टय. पण हल्ली 98 टक्के कंपन्या त्या MLM स्कीमचा वापर करुन लोकांना खोटी आश्वासनं देऊन लुबाडण्याचं काम करतात. जर तुम्ही MLM कडं फुल्ल टाईम करिअर म्हणून बघत असाल तर तुम्ही आयुष्यातून उठलाचं म्हणून समजा. सध्या मार्केटमध्ये Hindustan Unilever Ltd, AVON, Herbalife, Oriflame, Mi Lifestyle Marketing Pvt Ltd, Modicare, Tupperware, Forever Living Products, Vestige Marketing Pvt. Ltd अशा काही नामांकित MLM कंपन्याची सतत चर्चा असते.
(Chain Marketing | MLM OR Network Marketing Reality )
आता त्या कंपन्या किती जेन्यूयेन आहेत का नाहीत याची लीगल माहिती तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर जाऊन मिळवू शकता. बाकी मागच्याचं वर्षी जगभरातली सगळ्यात जुनी MLM कंपनी Amway जी 1959 साली establish झाली होती त्याचा एक फ्रॉड ED ने बाहेर काढला होता. तामिळनाडूमधल्या AMWAY च्या प्लॅन्टवर छापा टाकून 757 कोटी रुपयांची संपत्ती फ्रीझ करण्यात आल्याची बातमी माध्यमामध्ये झळकली होती. OUTLOOK INDIA ने सर्वात पहिल्यांदा ती बातमी दिली होती पण नंतर त्या कारवाईतून काय निष्पन्न झालं आणि संबंधित कंपनीवर काही अतिरिक्त कारवाई झाली का याची माहिती मिळू शकली नाही. बाकी तुम्हाला गुगल केल्यानंतर strategyindia या वेबसाईटवर इंडियातल्या संशयास्पद MLM कंपनीची नाव पाहायला मिळतील. एकदा जाऊन नक्की चेक करा. कारण मागच्या काही कळात बऱ्याच MLM कंपन्यांचे फ्रॉड समोर आलेले आहेत. मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा पैसा कमवायचा असेल तर जगात कष्टाला पर्याय नाही. अशाप्रकारे एक दोन वर्षात कोणत्या तरी चेन मार्केटिंगच्या स्कीममध्ये पैसे गुंतवून आणि माणसं जोडून तुम्हाला करोडपती करणाऱ्या स्किमा शंभर टक्के फ्रॉड असतात. वेळीच सावध व्हा.

(Chain Marketing | MLM OR Network Marketing Reality )
काहीतरी नवीन स्किल शिका, स्वतःमध्ये पैसे इन्व्हेस्ट करा, पुस्तके वाचा, नॉलेज वाढवा, तरच खऱ्या अर्थानं तुम्ही समृद्ध होऊ शकता. तसंच मित्रांनो मागच्या आठवड्याभरात आम्ही तुम्हाला fantasy App आणि शेअर मार्केटच्या नावाखाली कंपन्या कशा फ्रॉड करतात आणि लोकांना लखपती होण्याची स्वप्नं दाखवून लाखो रुपयांचा गंडा कसा घातला जातो त्याबद्दलची माहिती देणारे दोन व्हिडीओज बनवलेत. तुमच्या पैकी अजून कुणी त्ये व्हिडीओ पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शन आणि कमेंटबॉक्समध्ये तुम्हाला त्या व्हिडिओंची लिंक देऊन ठेवतो. नक्की जाऊन ते व्हिडीओ बघा आणि स्वतःचे पैसे बुडण्यापासून वाचवा. बाकी अशा कोणत्या नेटवर्क मार्केटिंग स्कीममध्ये तुम्हाला कुणी गंडा घातलाय किंवा घालण्याचा प्रयत्न केलाय का ह्ये आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.
Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇
https://www.facebook.com/vishaychbhari
https://www.facebook.com/aplavishaychbhari
One response to “करोडोंच्या गोष्टी सांगणाऱ्या Chain Marketing चा फ्रॉड कसा चालतो | MLM OR Network Marketing Reality”
-
[…] करोडोंच्या गोष्टी सांगणाऱ्या Chain Marketing च… […]
Leave a Reply