या ५ जागांवर भाजपच्या रागापोटी शिंदेचे नेते ठाकरेंना मदत करतील ? | Loksabha Election 2024 News| Vishaych Bhari


मंडळी आता राज्यात बऱ्यापैकी महायुतीकडून लोकसभेच्या जागावाटपाचं चित्र क्लियर व्हायला लागलंय. भाजप, शिंदे गट आणि अजितदादा गटानं बऱ्याचं ठिकाणी त्यांचे उमेदवार देखील जाहीर केलेत. पण तरीही अद्याप काही ठिकाणी शिंदे गट विरुद्ध भाजप यांच्यात उमेदवारीवरून, वितुष्ट निर्माण होण्याची परिस्थिती आहे. दरम्यान जिथं शिंदेचे विद्यमान खासदार आहेत, त्याठिकाणी भाजपला ते उमेदवार निवडून यायची गॅरंटी नाही म्हणून तिथं भाजपच्या चिन्हावर उमेदवार देण्याचा भाजपचा मनसुबा असल्याचं कळतंय. त्यामुळं झालंय काय तर शिंदेच्या गोटात धुसफूस वाढलीये आणि काहींनी तर आम्ही बंड करू अशीही भूमिका घेतलीये. दरम्यान सध्या, त्या वादग्रस्त जागांवरील शिंदे गटाचे नेते, भाजपच्या रागापोटी ठाकरे गटाला अंतर्गत ताकद पुरवतील अशी शक्यता वर्तवण्यात येतीये. मग कोणते आहेत असे पाच मतदारसंघ जिथं अशी अटीतटीची परिस्थिती उद्भवू शकते त्याचा घेतलेला हा थोडक्यात आढावा.

devendra fadnvis, eknath shinde,

(Loksabha Election 2024 News| Vishaych Bhari)

मंडळी काही दिवसांपूर्वी भाजपचे केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्रातील लोकसभेच्या जास्तीत जास्त जिंकणे महत्त्वाचंय असं महायुतीतल्या वरिष्ठ नेत्यांना सांगितलं होतं. त्यामुळे जिंकून येणे हाच उमेदवारीसाठी एकमेव निकष असेल हे अमित शाह यांनी स्पष्ट केलं होतं. त्या निकषाचा विचार करता भाजपचे उमेदवार शिंदे गटापेक्षा अधिक सक्षम आहेत असा दावा सुद्धा अमित शाह यांच्याकडून करण्यात आला होता.पण तरीही शिंदे गट किंवा अजितदादा गटाकडून उमेदवारीच्या बाबतीत, माघार घेण्यात आली नाही. त्यांनी त्यांचा दावा कायम ठेवलाय. नाशिक, पालघर, ठाणे, शिर्डी, अमरावती, उत्तर पश्चिम मुंबई, कल्याणची जागा लढवण्याबाबत एकनाथ शिंदे अजूनही ठाम असल्याच्या चर्चा आहेत. दरम्यान उमेदवार घोषित केल्यानंतर त्या मतदारसंघातली सद्य परिस्थिती कशीये आणि  शिंदे गटातील नाराज नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते ठाकरेंना अंतर्गत मदत पुरवणार का त्याची आपण एक एक करून माहिती घेऊ,सर्वात पहिला आहे नाशिक. मंडळी सध्याच्या घडीला महायुतीसाठी डोकेदुखी ठरत असलेला सर्वात हॉट मुद्दा म्हणजे नाशिक लोकसभेची उमेदवारी. सध्या तिथं शिंदे गटाचे हेमंत गोडसे हे विद्यमान खासदार आहेत. त्यांची मतदारसंघावर पकड चांगली असल्यानं शिंदे महायुतीतून हेमंत गोडसे यांनाचं उमेदवारी देतील अशा चर्चा आहेत. पण दुसरीकडं नाशिकच्या जागेसाठी इच्छुक असलेल्या, भाजप उमेदवारांनी देवेंद्र फडणवीसांच्या मागं, नाशिकची जागा भाजपच्या पदरात पाडून घ्या, निदान आम्ही त्यांचं काम करणार नाही, असा सूर लावल्याची चर्चा आहे. तसंच भाजप आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल ढिकले यांनी नाशिकची जागा भाजपलाच मिळावी यासाठी देवेंद्र फडणवीसांना धारेवर धरलंय. तो वाद चिघळलेला असतानाचं नाशिकच्या जागेवर आता अजितदादा गटाचे मंत्री, छगन भुजबळ यांच्या समर्थकांनी नाशिकची उमेदवारी  भुजबळांना मिळावी यासाठी प्रयत्न सूरू केलेत. तशा आशयाचा टिजर ही लॉन्च करण्यात आलाय.

(Loksabha Election 2024 News| Vishaych Bhari)

आता भाजपला नाशिकची जागा हवीय कारण नाशकात भाजपाची ताकद अधिकय, असा तिथल्या 3 आमदारांसह जिल्हा कोअर कमिटीच्या पदाधिकाऱ्यांचा दावाय. दिनकर पाटील म्हणाले “विचार केला तर आमचे तीन आमदार, 100 नगरसेवक आहेत. अनेक ग्रामपंचायती आहेत. त्यामुळे नाशिकची जागा भाजपला मिळावी यासाठी आम्ही आग्रही आहोत. आमच्या सर्वांची ही मनापासूनची इच्छा आहे की, नाशिकची जागा भाजपला मिळावी, हा शेवटचा टप्पा असल्यानं आम्ही फडणवीस यांच्याकडे गेलो. पण खरं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांनी हेमंत गोडसे हेच नाशिक लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार असतील, अशी घोषणा केली होती. त्यामुळेच आता शिंदेंच्या शिवसेनेत अस्वस्थता पसरलीये. आता नुकतच  हेमंत गोडसे आणि त्यांच्या समर्थकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी शक्तीप्रदर्शन केलं. अगदी हेच नाही तर हेमंत गोडसेंच्या समर्थकांनी आता बंड करण्याचा इशारा दिला असून, ते भाजपच्या रागापोटी अंतर्गतरित्या, ठाकरेंच्या उमेदवाराला तिथं मदत पुरवणार का, हा चर्चेचा विषय आहे. ठाकरेंनी तिथं राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर केलेली असून, नाराज गोडसे समर्थक पूर्वाश्रमीचे सहकारी वाजे यांना मदत पुरवण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे हे एक हाडाचे कार्यकर्ते आणि पक्षाचे निष्ठावंत म्हणून परिचित आहेत. एक चारित्र्यसंपन्न व्यक्ती अशी त्यांची ख्याती असून वैद्यकीय क्षेत्रात आणि अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी त्यांनी केलेले कार्य सर्वांना परिचित आहे.  भुजबळांच्या ओबीसी कार्डवर तोडगा आणि वाजे यांची सर्व समावेशक प्रतिमा या दोन जमेच्या बाजू आहेत.

hemant godse,

(Loksabha Election 2024 News| Vishaych Bhari)


पुढचा लोकसभा मतदारसंघय रत्नागिरी सिंधुदुर्ग. तिथं सध्या शिवसेना ठाकरे गटाचे विनायक राऊत हे खासदार आहेत. तसंच उद्धव ठाकरे यांनी त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिलीय. दुसरीकडं शिवसेना शिंदे गटाकडून उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे त्या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक आहेत. खरं तर तिथं शिवसेनेची ताकद मोठीय पण भाजपा त्या मतदारसंघावरील दावा सोडायला तयार नाही. तिथून केंद्रीय मंत्री नारायण राणे किंवा निलेश राणे यांच्या उमेदवारीसाठी भाजप अडून बसल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळं भाजपा हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाला सोडण्याची ही शक्यता कमीय असं बोललं जातंय. तेथील बलाबल पाहिल्यास त्या मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी प्रत्येकी दोन ठिकाणी शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाचे आमदार आहेत. तर भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचा प्रत्येकी एक आमदार आहे. दरम्यान भाजपाचा टेक कायम राहिला आणि ती जागा तिथं भाजपला मिळाली तर सामंत यांचे शिवसेना समर्थक छुप्या पद्धतीनं ठाकरे गटाला मदत पुरवण्याची शक्यता नाकारता येत नाही.तिसरा आहे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ. मंडळी सध्या तिथं शिंदे गटाचे विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांनाचं पुन्हा एकदा संधी दिली जाणार अशा चर्चा आहेत. पण तिथं ठाकरेंचा प्रभाव अधिकय आणि त्या तुलनेत शिंदे गटाची ताकद कमकुवत आहे असा दावा भाजपकडून केला जातोय म्हणून तिथं उमेदवार बदलाची मागणी भाजपकडून सातत्यानं केली जातेय. तसंच ठाकरेंनी त्या मतदारसंघात गजानन कीर्तिकर यांचे पुत्र अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी दिल्यानं गजानन कीर्तिकर हे ऐनवेळी माघार घेतील अशीही चर्चा आहे. दरम्यान कीर्तीकर यांचं वाढतं वय आणि इतर शक्यता लक्षात घेता त्यांच्या जागी चर्चेतला आणि अनुभवी उमेदवार असायला हवा अशी भूमिका शिंदे गटाची आहे, म्हणून त्यांनी आता फिल्म अभिनेता गोविंदा यांना पक्षात सामील करून घेतलंय. करीना कपूर आणि करिश्मा कपूर तिथं स्टार प्रचारक म्हणून काम करणार असल्याच्या ही चर्चा आहेत. पण भाजपाकडून तो मतदारसंघ आपल्याकडे खेचून घेतला जाण्याची शक्यताय आणि तिथून भाजपाकडून अमित साटम यांचं नाव चर्चेत आहे. त्या मतदारसंघात भाजपाचे ३, शिंदे गटाचा एक आणि ठाकरे गटाचे २ आमदार आहेत. भाजपनं तो मतदारसंघ बळकावल्यास शिंदे गटाचे नाराज शिवसैनिक आणि गजानन कीर्तिकर यांचे समर्थक छुप्या रीतीनं ठाकरे गटाच्या अमोल कीर्तिकर यांना सपोर्ट करतील असं बोललं जातंय.

(Loksabha Election 2024 News| Vishaych Bhari)

पुढं चौथा लोकसभा मतदारसंघय पालघर. सध्या तिथं शिंदेच्या शिवसेनेचे राजेंद्र गावित हे खासदार आहेत. 2019 साली ऐनवेळी भाजपमधून शिवसेनेत आलेले राजेंद्र गावित हेच पालघर लोकसभेसाठी इच्छुक आहेत पण स्थानिक भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांकडून गावित यांच्या उमेदवारीला  विरोध केला जातोय. विधानसभा जागांच्या पातळीवर जरी भारतीय जनता पक्षाचं तिथं वर्चस्व नसलं, तरी लोकसभा मतदारसंघ म्हणून भाजपचं वर्चस्व आहे आणि ते आधीच्या निवडणुकांमध्ये दिसून आलंय. पालघर लोकसभा मतदारसंघात तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये बहुजन विकास आघाडीचं प्राबल्यय तर इतर तीन मतदारसंघांमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आहेत. आता मुद्दा असा आहे की महायुतीच्या जागावाटपात ती जागा कुणाच्या वाट्याला येणारय. कारण शिंदे आणि भाजपकडून त्या मतदारसंघावर दावा करण्यात आलाय. भाजपकडून माजी आदिवासी मंत्री विष्णू सावरा यांचे पुत्र डॉ. हेमंत सावरा, नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले विलास तरे अशी काही नावं चर्चेत आहेत. बहुजन विकास आघाडीचे नेते सत्ताधारी पक्षाच्या बाजूने राहतात असा त्यांचं इतिहासय. परिणामी भाजपनं तिथं नवीन उमेदवार दिला किंवा गावित यांनाच कमळाच्या चिन्हावर लढायला सांगितलं तर शिवसेनेचा मूळ वोटर तिथं ठाकरेंच्या मागं आपली ताकद उभी करेल असं म्हंटलं जातंय.  ठाकरेंच्या शिवसेनेकडून तिथं पालघर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष भारती कांबडी यांचं नाव सर्वाधिक चर्चेतय तर काँग्रेसचे माजी खासदार दामोदर शिंगडा यांचे चिरंजीव सचिन शिंगडा यांनीही काल पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंची गाठ घेतल्याचं सांगितलं जातंय.आता सर्वात शेवटचा लोकसभा मतदारसंघ आहे ठाणे. भाजपा आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात जबरदस्त रस्सीखेच असलेला लोकसभा मतदारसंघ म्हणजे ठाणे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाणे विधानसभा मतदारसंघ याच लोकसभा मतदारसंघातय. मात्र येथील विद्यमान खासदार राजन विचारे हे ठाकरे गटात असून, उद्धव ठाकरे यांनी त्यांनाच येथून पुन्हा एकदा उमेदवारी दिलीय. शिंदेकडून ठाण्यात प्रताप सरनाईक यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याची चर्चाय. शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ठाण्याची ओळखय. स्वर्गीय आनंद दिघे यांनी भाजपच्या नाकाखालून शिवसेनेकडं खेचून आणलेला ठाणे लोकसभा सोडायला शिंदे गट राजी नाही.

pratap sarnaik, rajan vichare,

(Loksabha Election 2024 News| Vishaych Bhari)


मात्र महायुतीच्या जागावाटपामध्ये हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाला मिळण्याची शक्यता फारच कमी आहे.  कारण तेथील सहा आमदारांपैकी चार आमदार हे भाजपाचे आहेत. तर दोन आमदार हे शिवसेना शिंदे गटाचे आहेत. त्या मतदारसंघात येणाऱ्या नवी मुंबई आणि मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रांमध्ये भाजपाच वर्चस्व अधिकय. तर ठाणे मनपामध्येही भाजपाचा लक्षणीय जनाधार आहे. त्यामुळे भाजपा कुठल्याही परिस्थितीत हा मतदारसंघ शिंदे गटाला देणार नाही, अशी चिन्हे आहेत. भाजपाकडून त्या मतदारसंघासाठी ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांच्या नावाची चर्चाय. तसेच विनय सहस्रबुद्धे यांच्या नावाचीही तिथून चाचपणी झाली होती. दरम्यान एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला अशी ओळख असलेला ठाणे लोकसभा मतदारसंघ जागावाटपाच्या गणितात भाजपच्या गळाला लागला तर त्या मतदारसंघातले शिंदे गटाचे नेते आणि मूळ शिवसैनिक बंडखोरी करत ठाकरेंच्या राजन विचारे यांच्याच पारड्यात झुकतं माप टाकण्याची शक्यता वर्तवली जातेय. तर या 5 मतदारसंघात शिंदेचे नेते उमेदवारीच्या वादातून ठाकरेंना अंतर्गतरित्या मदत पुरवू शकतात असं म्हंटलं जातंय.पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय, यापैकी कोणत्या मतदारसंघात शिंदे vs भाजप वाद उफाळण्याची शक्यता अधिकय, ठाकरेंचे उमेदवार त्या वादाचा फायदा उठवतील का तुमची मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

(Loksabha Election 2024 News| Vishaych Bhari)

हे विषयच भारी वाचलेस का भावा !

या ५ लोकसभेच्या जागांसाठी एकनाथ शिंदे आजंही भाजप सोबत भांडतायत | Loksabha Election 2024 latest News| Eknath Shindeउद्धव ठाकरे यांनी उमेदवार फायनल केले पण आता भांडणे वाढतील |Uddhav Thackeray | Loksabha Election 2024 Newsवंचित बहुजन आघाडी व जरांगे पाटील यांच्या आघाडीमुळे मविआला फटका बसणार ? | Prakash Ambedkar News|Vanchit Bahujan Aghadiजातीचं हे गणित जुळलं तरच Praniti Shinde सोलापूरच्या खासदार होतील ? | Solapur Loksabha Election 2024|Vishaych Bhari

Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇

https://www.facebook.com/vishaychbhari

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *