मालकाच्या दवाखान्याचा खर्च भागावा म्हणून बाज्या शर्यत मारत राहिला !
महाराष्ट्रातला सगळ्यात वेगवान बैल म्हणून त्याचा त्याकाळी गवगवा झालावता. त्याला पळताना बघण्यासाठी लोकं आपला कामधंदा इसरून मैदानाला हजर राहायची. सगळ्यांस्नी वाटायचं त्यो फक्त बक्षीसासाठी पळतुय. पण तसं नव्हतं, त्यो पळत होता दवाखान्यात मृत्यूशी झुंज देणाऱ्या आपल्या मालकासाठी. म्या बक्षीस मारलं तरच मालकाच्या दवापाण्याचा खर्च भागल या काळजीपोटी. असं काय नात होतं त्या बैलाचं आपल्या मालकाशी. का त्यो तब्बल १६ वर्षे न थकता शर्यतीत पळत राहिला. नेमकी काय स्टोरीय येळगावच्या बाज्याची चला पाहूयात…
साधारण १९९९ चा काळ. कराड तालुक्यातल्या येळगाव गावच्या राजू इनामदार आणि पप्पू इनामदार यांच्या वडिलांनी Bajya नावाचा एक शर्यतीचा बैल खरेदी केला. बैल इतका देखणा होता की बघताक्षणी लोकांच्या नजरेत भरायचा. ही अशी सुपाएवढी झपकेबाज गळवंड, टोकदार शिंग, टुमदार वशिंड, सरावानं कसलेलं पिळदार आन भरभक्कम शरीर, डांबासारखं सरळसोट पाय अशी त्याची एकूण शरीरयष्टी होती. इनामदारांच्या आधी ज्या मालकाकडं बाज्या होता त्यांनी तब्बल चार वर्ष त्येजा कसून सराव घेतलावता. त्येज्यामुळं इनामदारांच्या दावणीला बाज्या शर्यतीसाठी पुरता तयार हून आलावता. बाज्याला अफाट ताकद होती. तेज्यामुळं त्येजं दावं पकाडणारी माणसं त्याला दचकून असायची. बाज्या इतका अवखाळ आन ताकदीचा बैल होता की त्याला पकडण्यासाठी किमान दहा ते बारा माणसांची गरज लागायची. बाज्याच्या या ताकदीचा अंदाज आल्यामुळं मालकानं त्येज्यासाठी म्हणून खास एक लोखंडी जू बनवून घेतलावतं. ते लोखंडी जू मानव आसलं की बाज्या दुरीत चालायचा. निदान निस्ता उधळत राहायचा. कारण लाकडाचा जू म्हंजी बाज्यासाठी निव्वळ खेळणं झालंवतं. पण एवढा ताकदवान बैल असून सुद्धा त्येनं घरातल्या बायकांस्नी किंवा लहानसहान पोरांस्नी कधी इजा पोहोचवली नाय. त्येजा राग फक्त त्या माणसांवर असायचा जी माणसं विनाकारण आसुडाचा आवाज काढायची. त्यांना त्यो बरोबर ताळ्यावं आणायचा.
त्येज आणखी एक खास वैशिष्ठ्य म्हंजी त्येजी जीभ कोपराएवढी लांब होती. त्येज्यामुळं आपलं अंग चाटताना जवा कधी त्यो आपली जीभ बाहीर काढायचा तवा लोकांना त्येज्या जीभेचं लय आप्रूप वाटायचं. बाज्याला पवायचा लय मोठा नाद होता. त्यो कृष्णा नदीच पात्र सलग दोन वेळा पवत पार करायचा. त्येज्यामुळं त्येजा स्टॅमिना भयंकर वाढलावता. आन फिटनेस तर काय बोलायलाचं नको. पण एवढी रानटी मेहनत घेऊन सुद्धा बाज्याचा आहार लय साधा असायचा बर का. म्हंजी दुसऱ्या बैलांसारखं अंडी, दुध, फळफळावं आसला लाड त्येनं कधी करून घेतला नाय. त्येज खाणं म्हंजी वाळकी वैरण, मका, एकांद टायमाला गव्हाच्या पीठाचं गोळ आन उसाचं वाड. त्यातल्या त्यांत उसाचं वाड म्हंजी त्येजं सगळ्यात आवडत खाद्य. तेवढं खावून बी त्यो हाय त्या ताकदीनचं मैदान मारायचा.
बाज्यानं आपल्या आयुष्यात सगळ्यात जास्त शर्यती खेळल्या. त्यो तब्बल १६ वर्ष शर्यतीत पळाला. आतापर्यत या क्षेत्रात इतकी वर्ष शर्यत खेळलेला दुसरा कुठला बैलच झाला नाही असं त्याचे मालक राजू इनामदार आज ही अभिमानानं सांगत्यात. वर असं बी म्हणत्यात का देवानं कसं सचिनला फक्त क्रिकेट खेळण्यासाठी बनवलंय सेम तसच माझ्या बाज्याला बी पळण्यासाठी बनवलंवतं.
बाज्या आपल्या आयुष्यात त्याकाळच्या जवळपास सगळ्या बैलाबरोबर पळाला. त्यातल्या त्यांत शिवराज ट्रॅव्हल्सवाल्यांचा सुंदर, तानाजी आप्पाचा सोन्या, महेश दरोजकरांचा चॅम्पियन, संभाजी शेरेकरांचा काजळ, माळशिरसचा पिस्तुल, सातारारोडच्या नवनाथ पैलवानांचा राजा अशा बऱ्याच बैलांसोबत त्येनं मैदान मारली. कित्येक तोळ सोनं, शेकडो ढाली, लाखोंची रोख रक्कम अशी कितीतरी बक्षीस ही जिंकली. पण एक खंत त्याच्या बाबतीत कायम राहिली. त्याला कोरेगावच्या मैदानात मात्र सलग नऊ वेळा फायनलला राहून सुद्धा एक नंबर करता आला नाय. असो पण त्येनं जेवढ केलं ते सुद्धा काय कमी नव्हतं.
सगळं काही सुरळीत चाललंवत पण अचानक एक दुर्दैवी घटना घडली. बाज्याला एका मोठ्या आजारानं गाठलं. बाज्या लाळीच्या आजारात घावला. त्या आजारपणात त्येज्या जिभेला, आतड्याला जर उमातला. त्यामुळं त्येज खाण पार कमी झालं. खाण नसल्यामुळं त्येला अशक्तपणा आला. पप्पू इनामदार आणि राजू इनामदार बैलाची अवस्था बघून चिंतेत पडले. मोकार डॉक्टर केले पण बैलाला काय फरक पडला नाई. ह्ये असा हत्तीच्या ताकदीचा बैल पण कुत्र्यागत चिडीचूप हून दावणीला बसलावता. ते बघून इनामदार बंधूना रडू कोसळायचं. बैल काय आता या आजारपणातून उपजार येत नाही असं त्यांना वाटायला लागलंवत. पण त्यांच्या वडिलांना मात्र खात्री होती की ह्ये जनवार साध सुध नाय म्हणून. ह्ये एवढ्यात हार मानणार नाय. मग त्यांनी त्यांच्या परीनं बाज्यावर आयुर्वेदिक उपचार करायला सुरु केले. रात्रदिवस त्याची सेवा केली. उपचारांचा फायदा झाला. पुढच्या दोनचं महिन्यात बैल उठून उभा राहिला.
मग मालकांन त्येजा खुराक वाढवला आन बघता बघता बैल पुन्हा आड्ड्यात पळण्यासाठी तयार झाला. या असल्या आजारपणातनं उठून त्येनं पुसेगावच्या सुंदरबरोबर पळून सोन्याच्या चैनी बक्षीसात मिळवल्या. इनामदार म्हणत्यात बैल सांभाळणं म्हंजी कुण्या येड्या गबाळ्याचं काम नाय. शर्यतीचा बैल सांभाळणं म्हंजी पैलवान सांभाळण्यासारखंय. त्येज खाणं पिणं, दुखण खुपण सगळ सगळ सोसावं लागत आपल्याला. बाज्याच्या पळण्याचे किस्से जेवढे फेमसयेत तेवढेचं त्याच्या माणूसपणाचे किस्से बी लय फेमसयत.
जवा इनामदारांचे वडील दवाखान्यात ऍडमिट होते तेव्हा त्यांच्या दवाखान्यावर जाम खर्च होत होता. इनामदारांच्या घरी पैशाची तंगी चालू होती. त्यांना वडिलांच्या उपचारासाठी पैसे गोळा करावे लागत असायचे. बाज्याला जणू या सगळ्याची कल्पना आलीवती की काय माहित नाय पण बाज्या त्याकाळात तुफान वेगानं पळून मैदान माराय लागलावता. रोजची दहा बारा हजाराची बक्षीस कमवाय लागलावता. शेवटी मालक वारल्याचं जवा त्येनं पाहिलं तवा त्येजा धीर सुटला. मालकाच्या आठवणीत पुढचे तीन दिवस त्येनं तोंडात अन्नाचा कण नाय घेतला. पुढं त्येज्या आवडीचं उसाचं वाड टाकलं तरी त्यो तसाचं आसवं गाळत दावणीत बसायचा.
अशा या गुणवान आणि कर्तृत्ववान बाज्या बैलाचा २५ ऑगस्ट २०१३ साली मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर आमचा सख्खा भाऊ गेल्यासारखी आमची भावना होती असं आजही इनामदार बंधू आवर्जून सांगत्यात. त्यांनी बाज्याला जिथं माती दिली त्या ठिकाणी त्यांनी बाज्याच्या आठवणीत एक झाड लावलंय. बाज्याच्या आठवणीनं त्यांच्या डोळ्यात येणार पाणी बघितलं की आपले ही डोळे भरून आल्याशिवाय राहत नाहीत. तर मित्रांनो असा होता बाज्याचा शर्यतक्षेत्रातील संपूर्ण प्रवास. आमच्याकडून तुम्हांला अजून कोणत्या बैलाचा शर्यतप्रवास जाणून घायचा असेल तर आम्हांला त्या बैलाचं नाव कमेंटमध्ये जरूर सांगा. जर हि माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा.
Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇
https://www.facebook.com/aplavishaychbhari
Leave a Reply