हरी पाठातला गोड आवाज गेला | बाबा महाराज सातारकर यांचे निधन | Baba Maharaj Satarkar Death


मंडळी वारकरी सांप्रदाय म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा एक अद्भुत पैलू. त्याची भुरळ कुणाला पडली नाय तर नवलचं. आमच्या गावात सुद्धा वारकरी संप्रदायाची पाळंमुळं रुजलेलीत. मग अगदी रोजच्या नामस्मरणापासून ते आषाढी कार्तिकी वारीत वारकऱ्यांना घरी जेवण घालण्यापर्यंत अनेक कार्यक्रम गावात होतं असतात. त्यातल्या त्यात एक खास सांगायची गोष्ट म्हणजे गावात अनेकांच्या घरी रोज पहाटेची सुरुवात सुंदर आवाजातल्या हरिपाठानं होते. त्या हरिपाठाचा आवाज असतो बाबा महाराज सातारकर यांचा. बाबा महाराज सातारकरांच्या गोड, मृदू आणि संयमी आवाजात हरिपाठ ऐकताना मनात पांडुरंगाची भक्ती अन अंगावर शहारे आल्यावाचून राहत नाही. काही जण तर म्हणतात बाबा महाराजांचा हरिपाठ ऐकताना अक्षरशः तंद्री लागल्यासारखं होतं. पण आता तोच हरिपाठाचा गोड आवाज आज वारकरी संप्रदायाला कायमचं पोरकं करून गेलाय. हो, अनेकांना विश्वास बसणार नाही पण आज म्हणजे दिनांक 26 ऑक्टोबर 2023 रोजी ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचं निधन झालं. ते 89 वर्षांचे होते. नवी मुंबईच्या नेरूळ हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. खरं तर त्यांचं आध्यात्मिक आणि सामाजिक कार्य सर्वाना परिचित आहेच पण तरीही या Blog च्या माध्यमातून आपण त्यांच्या अध्यात्मिक प्रवासाच्या आठवणीना उजाळा देऊन त्यांच्या सामाजिक कार्याचा थोडक्यात आढावा घेणार आहोत.

Baba Maharaj Satarkar

(Baba Maharaj Satarkar Death)

मंडळी ज्ञानेश्वरी सांगितलंय तसं प्रत्येक माणूस ईश्वराचा अंश आहे पण काही माणसं मात्र त्यांच्या निस्वार्थ कर्मामुळं ईश्वराच्या अधिक जवळ जातात असं खुद्द बाबा महाराज सातारकर त्यांच्या कीर्तनात सांगायचे. ज्ञानेश्वरीचं निरूपण करताना त्यांनी वापरलेलं ह्ये वाक्य आज त्यांच्याचं बाबतीत खरं ठरलं असं म्हणायला हरकत नाही. कारण बाबा महाराज यांच्या अनुयायांच्या मते बाबा महाराज सातारकर हे किर्तनकलेचा परिपुर्ण आविष्कार होते. त्यांचे अनुयायी त्यांना श्रद्धास्थान, भागवत धर्माचा वैश्वीक राजदूत, आधुनिक काळातील माउली महावैष्णव अशा अनेक नावांनी ओळखायचे. बाबामहाराज सातारकरांचं कर्तृत्त्व, वक्तृत्त्व, नेतृत्त्व आणि व्यक्तीमत्त्व सगळंच महाराष्ट्राला भावलं. आजच्या घडीला कीर्तन आणि ज्ञानेश्वरीच्या निरूपण सेवेतील ते सर्वात आघाडीचे कीर्तनकार होते. बाबा महाराज सातारकर यांचा जन्म 5 फेब्रुवारी 1936 रोजी साताऱ्यात झाला. नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे ह्ये त्यांचं खरं नाव. नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे उर्फ ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकरांच्या घरात गेल्या तीन पिढ्यांपासून म्हणजे तब्बल 135 वर्षापासून कीर्तनाची आणि प्रवचनाची परंपरा जोपासली जातेय. बाबा महाराजांनी तीच परंपरा शेवटपर्यंत जपली किंबहुना पूर्ण क्षमतेने पुढं नेली. बाबा महाराजांचे वडील ज्ञानेश्वर दादामहाराज गोरे हे उत्कृष्ट मृदूंगवादक होते. त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर गोरे यांना संत साहित्याची प्रचंड आवड होती. त्यांचे चुलते आप्पामहाराज आणि अण्णामहाराज हे सुद्धा आघाडीचे निरूपणकार म्हणून प्रसिद्ध होते.

(Baba Maharaj Satarkar Death)

सुरुवातीच्या काळात त्यांच्याकडूनच बाबा महाराज सातारकरांनी परमार्थाचे धडे घेतले. काही जणांच्या म्हणण्यानुसार बाबा महाराजांनी इंग्रजी माध्यमातून एस. एस. सी. पर्यंतचं शिक्षण घेतलं होतं. वयाच्या आठव्या वर्षांपासून बाबा महाराज श्री सद्गुरू दादामहाराज यांच्या कीर्तनात अभंगांच्या चाली म्हणायचे. तिथूनच त्यांवर कीर्तनाचे संस्कार रुजत गेले. वयाच्या अकराव्या वर्षांपासून त्यांनी पुरोहितबुवा, आग्रा घराण्याचे लताफत हुसेन खाँ साहेब यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडे ही घेतले होते. महाराष्ट्राला तशी प्रदीर्घ अशी कीर्तनाची व ख्यातनाम कीर्तनकारांची परंपरा लाभलेलीय. पण तरीही मागच्या शंभर वर्षापासून वारकरी संप्रदायातील प्रमुख कीर्तनकार फड म्हणून सातारकर घराण्याच्या फडाचं नाव मानानं घेतलं जातंय. असो, पण सुरुवातीच्या काळात म्हणजे १९५० ते १९५४ या काळात बाबा महाराज यांनी फर्निचरचा व्यवसाय केल्याचं ही बोललं जातं. पुढं त्यांनी आपलं वकिलीचं शिक्षण पूर्ण केलं. पण नंतरच्या काळात त्यांचा आध्यात्मिक ओढा जास्त वाढला आणि त्यांनी स्वतःला पूर्णवेळ श्री विठ्ठल भक्तीत झोकून दिलं. दरम्यानच्या काळात त्यांनी ज्ञानेश्वरी, त्यातल्या ओव्य, ओव्यांचा आशय, मतितार्थ यावर प्रभुत्व मिळवलं. पुढं तुकाराम महाराजांच्या अभंगवाणीकडं त्यांनी लक्ष केंद्रित केलं. तुकोबांच्या रोखठोक अभंगाचे अर्थ समजून घेतले अन मग त्यांनी कीर्तनकार आणि निरूपणकार म्हणून कारकीर्द सुरू केली. १९६२ साली आप्पा महाराज सातारकर या त्यांच्या चुलत्यांच्या निधनानंतर सातारकर घराण्याची कीर्तन-प्रवचन परंपरा बाबा महाराज सातारकर यांनी पुढे चालू ठेवली. डिसेंबर १९८३ पासून दरवर्षी संतांच्या गावी कीर्तन सप्ताह आयोजित करण्याची परंपरा त्यांनी सुरू केली.

Baba Maharaj Satarkar

(Baba Maharaj Satarkar Death)


त्यानुसार भंडारा डोंगर, देहू , त्र्यंबकेश्वर, नेवासे, पैठण, पंढरपूर, पिंपळनेर आदी ठिकाणी त्यांनी कीर्तन सप्ताहांचे आयोजन केलं होतं. बाबामहाराजांनी सुमारे १५ लाख व्यक्तींना संप्रदायाची दिक्षा देऊन त्यांना व्यसनमुक्त करून त्यांचे संसार कायमचे मार्गी लावले. १९८३ साली त्यांनी जनसेवेसाठी श्री. चैतन्य अध्यात्मिक ज्ञान प्रसार संस्थेची स्थापना केली. त्या संस्थेमार्फत दरवर्षी ६० ते ७० हजार भाविकांना विनामूल्य वैद्यकीय सेवा तसंच औषधे पुरविण्यात येतात. पुढं 1990 साली त्यांनी श्री बाबामहाराज सातारकर ज्ञानपीठ प्रतिष्ठानची स्थापना केली. त्यातूनही हजारो लोक त्यांनी अध्यात्माशी जोडले. जेष्ठ निरुपणकार बाबा महाराज सातारकर यांनी त्यांचं सगळं आयुष्य अध्यात्माच्या प्रचार प्रसारासाठी अर्पण केलं. रोखठोक वाणी आणि शुद्ध विचार हे बाबा महाराज सातारकर यांचं व्रत होतं. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी जनसामान्यांचं प्रबोधन केलं. विठ्ठलाचं कीर्तन आणि ज्ञानेश्वरी यावर बाबा महाराजांनी खूप काळ लोकांना मार्गदर्शन केलं. बाबा महाराजांचं कीर्तन ऐकण्यासाठी राज्यातीलच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून भक्त जमत होते. अगदी विदेशातही बाबा महाराजांचे कीर्तन सोहळे झाले आहेत. झी टॉकीजनं सुरु केलेला गजर कीर्तनाचा या कार्यक्रमाचा महासोहळा एकदा बाबा महाराज यांच्या कीर्तनरुपी सेवेनं संपन्न झाला होता. त्यावेळी 85 वर्षे वय असून सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज, स्पष्ट आवाजातला ठामपणा पाहून उपस्थित लोक भारावून गेले होते. त्यांच्या कीर्तनाला मिळालेल्या व्यापक स्वीकृतीतून त्यांना ‘बाबा महाराज सातारकर’ हे नाव मिळालं ते आयुष्यभर त्यांच्यासोबत राहिलं. बाबा महाराजांची खास ओळख म्हणजे त्यांचा शुद्ध भाषा आणि स्पष्ट आवाजातला हरिपाठ. त्या हरीपाठाचं कॅसेट रेकॉर्डिंग सुद्धा तुफान लोकप्रिय झालं होतं. त्या हरिपाठ कॅसेटचा विक्रमी खप झाल्यानंतर राज्यपालांच्या हस्ते प्लॅटिनम डिस्क देऊन सरगम कॅसेटच्या वतीनं बाबा महाराजांना गौरवण्यात आलं होतं.

(Baba Maharaj Satarkar Death)

एवढच नाही तर श्री देवदेवेश्वर संस्थान, सारसबाग पुणे विद्यापीठ, नामदेव अध्यासन या तर्फे त्यांना त्यांच्या कार्यासाठी गौरवण्यात आलंय. महाराष्ट्र शासनानं ही त्यांना व्यसनमुक्ती पुरस्कार, कार्यगौरव पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला होता. त्याशिवाय आणखी सांगायचं म्हणजे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, तिसरी जागतिक मराठी परिषद नवी दिल्ली, तसंच मुंबई, पुणे, पिंपरी, चिंचवड, सासवड, पैठण,अक्कलकोट, नागपूर, सोलापूर या नगरपालिकेतर्फे आणि महानगरपालिकांतर्फे त्यांना नागरी सत्कार देवून पुरस्कृत करण्यात आलंय. ह्ये झालं त्यांच्या एकूण कार्य कर्तृत्वाबद्दल. आता आपण थोडक्यात त्यांची कौटुंबिक माहिती घेऊ. उपलब्ध माहितीनुसार, नेरूळच्या आगरी कोळी भवनासमोरच्या एका वसाहतीत बाबा महाराज आणि त्यांचं कुटुंब राहत होतं. बाबा महाराजांच्या पत्नीचं नाव रुक्मिणी उर्फ माई सातारकर असं होतं. दरम्यान दरम्यान, याचवर्षीच्या सुरुवातीला म्हणजे फेब्रुवारी महिन्यात बाबा महाराज सातारकर यांच्या पत्नी रूक्मिणी सातारकर ऊर्फ माई सातारकर यांचं निधन झालं होतं. त्यानंतर बरोबर 8 महिन्यानंतर बाबा महाराज सातारकर यांची आज सकाळी 6 वाजता प्राणज्योत मालवली. बाबा महाराज सातारकर आणि माई सातारकर यांना तीन अपत्य झाली. त्यापैकी भगवती आणि रासेश्वरी या दोन मुली तर चैतन्य नावाचा एक मुलगा होता. सगळेचं त्यांच्या कुटुंब परंपरेनुसार कीर्तनसेवेत कार्यरत झाले होते.

Mai satarkar

(Baba Maharaj Satarkar Death)

पण काही वर्षापूर्वी चैतन्य महाराजांचं अकस्मात निधन झालं आणि गोरे कुटुंबावर शोककळा पसरली. पण त्यानंतरही बाबा महाराज अखंडपणे त्यांची कीर्तनरुपी सेवा बजावत राहिले. पण आता त्यांच्या निधनामुळं अवघ्या महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदाय परंपरेतील लाखोंच्या समुदायावर दु:खाचा डोंगर कोसळलाय. आता त्यांच्या पश्चात त्यांच्या दोन मुली ह. भ. प. भगवती महाराज व रासेश्वरी सोनकर आणि नातवंडे असा परिवार आहे. मिळालेल्या माहितीनुसार बाबा महाराज सातारकर यांच्या पार्थिवावर उद्या म्हणजे शुक्रवारी 27 ऑक्टोबर 2023 रोजी संध्याकाळी 5 वाजता नेरुळ येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. दरम्यान, बाबा माहाराज सातारकर यांचं पार्थिव आज दुपारी तीननंतर अंतिम दर्शनासाठी नेरूळ जिमखाना समोर असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदीरात ठेवण्यात येईल अशीही माहिती समोर आलीये. आता सातारकर कीर्तन फडाची पताका बाबा महाराजांच्या कन्या ह. भ. प. भगवती महाराज यांच्या खांद्यावर आहे. पण काहीही असो, बाबा महाराज सातारकर यांच्या जाण्यानं वारकरी संप्रदायात सध्या दुःखाचं वातावरण पसरलेलं आहे. बाकी आजपर्यंत तुम्ही कधी बाबा महाराजांच्या रसाळ वाणीचा अनुभव घेतलाय का ह्ये आम्हांला कमेंट करून नक्की सांगा.

हरी पाठातला गोड आवाज गेला | बाबा महाराज सातारकर यांचे निधन | Baba Maharaj Satarkar Death

Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇

https://www.facebook.com/vishaychbhari

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *