अशीही बनवाबनवी या सिनेमाच्या या ५ गोष्टी कायम आठवणीत राहतील | Ashi hi Banwa Banwi | Vishaych Bhari| Laxmikant Berde

धनंजय माने इथंच राहतात का, अहो लिंबू कलरची साडीचं काय मला लिंबाचं लोणचं, लिंबाचा सरबत, लिंबाचं मटण सगळंचं आवडतं, मालक तुमचे सत्तर रुपये वारले हो, हा शुद्ध हलकटपणा आहे माने, हा माझा बायको पार्वती, अरे सारखं सारखं त्याचं झाडावर काय मंडळी तुमच्यापैकी कुणी ह्ये डायलॉग ऐकले नसतील तर नवलच. सदाबहार, कल्ट क्लासिक आणि सुपरहिट अशा अशीही बनवाबनवी सिनेमांतले ह्ये डायलॉग आजसुद्धा नव्वदीतल्या प्रत्येक पोराला तोंडपाठ आहेत. बरं फक्त डायलॉग नाय तर त्यातली अतरंगी कॅरेक्टर्स, गाणी, विनोदी सीन सगळंच लोकांना जसंच्या तसं लक्षातय. आता नुकतच त्या सिनेमाला पस्तीस वर्ष पूर्ण झालीयेत. गेली पस्तीस वर्ष तो सिनेमा अक्षरशः प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतोय. आजच्या या Blog मध्ये आपण त्या सिनेमाच्या काही खासम खास गोष्टी जाणून घेणारय ज्या तुम्ही कधीच ऐकल्या नसतील.

Ashi hi Banwa Banwi

(Ashi hi Banwa Banwi | Vishaych Bhari| Laxmikant Berde)


मंडळी काळ सरतो अन आपल्याला अनेक जुने सिनेमे बोर वाटू लागतात. पण त्यातही काही अशा सदाबहार कलाकृती असतात ज्या कितीही वेळा पाहिल्या तरी जुन्या किंवा बोर वाटत नाहीत. उलट प्रत्येकवेळी सिनेमा पाहताना फ्रेशच वाटतं. त्यापैकीचं एक सिनेमा म्हणजे अशीही बनवाबनवी. आज सुद्धा तो सिनेमा तरूण आणि  ताजातवाना वाटतो. साधारण २३ सप्टेंबर १९८८ रोजी तो सिनेमा रसिकांच्या भेटीला आला होता आणि सुपरहिट ठरला होता. म्हणजे फर्स्ट क्लाससाठी ३ रूपये आणि बाल्कनीसाठी ५ रूपये तिकिटाची किंमत असून सुद्धा त्याकाळी चित्रपटानं तब्बल ३ कोटींचा गल्ला जमवला होता. त्यानंतर मराठी चित्रपटसृष्टीमध्ये बरेच सिनेमे येऊन गेले, पण अशीही बनवाबनवीची जादू जराही प्रेक्षकांच्या डोक्यावरून उतरली नाही. मंडळी खरं तर बनवाबनवी हा १९६६ साली आलेल्या बिवी और मकान या फ्लॉप हिंदी सिनेमाचा रिमेक होता. सचिन पिळगावकर यांनी त्यांच्या परीनं त्या हिंदी सिनेमाचं मराठी व्हर्जन लोकांसमोर मांडलं अन बनवाबनवी सुपरहिट झाला. हसून हसून प्रेक्षकांनी थेटर डोक्यावर घेतलं. सुरुवातीला बनवाबनवी इतका तुफान चालेल अशी कुणालाचं आशा नव्हती. पण सचिन पिळगावकरांचं व्हिजन अन अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या धम्माल मस्तीमुळं सिनेमा जबरदस्त चाल्ला. बरं जोडीला सिद्धार्थ रे, अश्विनी भावे, प्रिया बेर्डे, सुप्रिया पिळगावकर, निवेदिता सराफ, नयनतारा, सुधीर जोशी, विजू खोटे, यांसारखी मुरलेली मंडळी होतीचं. अशीही बनवाबनवी कुण्या एकट्याचा सिनेमा नव्हता. ते एक जबरदस्त पॅकेज होतं. कारण त्या सिनेमातल्या जयराम कुलकर्णी आणि सुहास भालेकरांच्या छोट्याश्या भूमिका सुद्धा लोकांना जशाच्या तशा लक्षात आहेत. बाकी आपल्या लाडक्या लक्ष्या अन अशोक मामांनी सिनेमाची रंगत आणखी वाढवली यांत शंकाचं नाही.

(Ashi hi Banwa Banwi | Vishaych Bhari| Laxmikant Berde)

सिनेमांतली सगळ्यात आवडती कॅरेक्टर म्हणजे लक्ष्यानं केलेल्या पार्वती अन सचिननं केलेल्या सुधा या बायकांचा रोल. आरारा खतरनाक. पण सिनेमाची सगळ्यात जमेची बाजू होती सिनेमाचे डायलॉग्ज. अन ती जबाबदारी नेहमीप्रमाण पिळगावकरांनी त्याचे लाडके लेखक वसंत सबनिसांना दिलेली. सबनिसांनी संवादात अक्षरशः जीव ओतला. अन त्ये सगळे संवाद अतिशय रंजकपणे सर्व कलाकारांनी पडद्यावर जिवंत केले. सर्वांच्या परफेक्ट विनोदी टायमिंगमुळं तो सिनेमा अजरामर झाला. लेखक वसंत सबनीसांनी लिहिलेले त्याकाळचे संवाद आजच्या तरुणाईलाही भुरळ पाडतात आणि म्हणूनच की काय त्या सिनेमातल्या संवादांवर दिवसाला शेकडो मिम्स बनलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. त्यात आणखी भर टाकली ती म्हणजे सिनेमातल्या गाण्यांनी. त्यापैकी हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे ह्ये गाणं तर आज सुद्धा प्रत्येक लग्नात किंवा लग्नाच्या सत्यनारायण पूजेला एकदा तरी साऊंडवर वाजतंच. तीच गत लक्ष्यानं साकारलेल्या पार्वतीवर चित्रित झालेल्या कुणी तरी येणार येणार गं या गाण्याची. आज सुद्धा प्रत्येक डोहाळ जेवणाला किंवा पोराबाळांच्या बारश्याला रेडिओवाला त्ये गाणं लावतो म्हणजे लावतोचं. बाकी अशीही बनवाबनवी हे टायटल ट्रॅक असो किंवा ही दुनिया मायाजाल मनुजा जाग जरा यातून जगी सर्व सुखी असा कोण आहे असा संदेश देणारं वैचारिक सॉंग असो सगळंच भन्नाट. त्याचं सगळं श्रेय गीतकार शांताराम नांदगावकर, सुधीर मोघे आणि संगीतकार गाण्यांना अरूण पौडवाल यांना दिलं पाहिजे. कारण सिनेमातली गाणी ऐकली की आज सुद्धा जाग्यावं नाचू वाटतं. पाय थिरकायला चालू होतात. मंडळी खरं तर त्याकाळी अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर यांचं त्रिकूट म्हटंलं की सिनेमामध्ये तीन गोष्टी असणार याची फिक्स ग्यारंटी असायची. त्या कोणत्या तर एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट अन एंटरटेनमेंट अन तेच बनवाबनवीनं सिद्ध केलं. असो आता आपण बनवाबनवीबद्दल काही माहीत नसणाऱ्या गोष्टी जाणून घेऊ.

Ashi hi Banwa Banwi

(Ashi hi Banwa Banwi | Vishaych Bhari| Laxmikant Berde)


तर ऐका पहिली गोष्ट म्हणजे मराठी सिनेसृष्टीमध्ये अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर या नायकांनी बरेच हिट सिनेमे दिले, पण एकत्रितरित्या केलेला हा त्यांचा पहिलाच चित्रपट होता, जो मराठी सिनेसृष्टीमध्ये इतिहास घडवून गेला आणि प्रेक्षकांच्या मनात कायमचा कोरला गेला. कारण त्या सिनेमापूर्वी त्यांनी कोणत्याही सिनेमामध्ये एकत्र काम केलेलं नव्हतं, पण या सिनेमानंतर हे त्रिकूट १९८९ सालादरम्यान आणि त्यानंतर, प्रदर्शित झालेल्या भुताचा भाऊ, एकापेक्षा एक, आयत्या घरात घरोबा या सिनेमांमध्ये ते एकत्र पाहायला मिळाले. आता वळूयात आपण दुसऱ्या गोष्टीकडे, ती म्हणजे या सिनेमामधल्या एका डायलॉगची. या सिनेमातला एक भन्नाट डायलॉगय, जिथं अशोक सराफ, हे स्त्रीवेशात असलेल्या लक्ष्मीकांत बेर्डेची नयनतारा यांना ओळख करून देत असतात, तेव्हा ते म्हणतात आणि हा माझा बायको पार्वती. पण तुम्हाला माहितेय का? ते वाक्य सिनेमाच्या स्क्रिप्टमध्ये कुठच नव्हतं. ते ऑन दि स्पॉट शुटच्यावेळी अशोक मामांच्या तोंडून बाहेर निघालं होतं. जे ऐकून आजसुद्धा पब्लिक येड्यासारखं हसतं. मंडळी सिनेमामध्ये एका पुरूषानं एखादी स्त्री व्यक्तिरेखा साकारणं, यामध्ये काही वेगळं नाही. पण त्या चित्रपटात स्त्री भूमिका करण्यासाठी लक्ष्मीकांत बेर्डे यांना चक्क त्यांच्या मिश्या काढाव्या लागल्या होत्या, तो आपल्या लाडक्या लक्ष्याचा एकमेव असा चित्रपटय ज्यात तो पडद्द्यावर आपल्याला बिनामिशीचा दिसलाय.

(Ashi hi Banwa Banwi | Vishaych Bhari| Laxmikant Berde)

मंडळी पुढची खास गोष्ट म्हणजे सचिन पिळगावकर यांनी बनवाबनवीसाठी वन-मॅन शो सारखी भूमिका पार पाडलीये. म्हणजे अगदी डिरेक्शनपासून नायक, गायक, नृत्य दिग्दर्शक सुद्धा. कारण ‘हृदयी वसंत फुलताना’ या गाण्याची कोरिओग्राफीसुद्धा सचिन पिळगावकर यांनीच केलीये. त्या गाण्यातलं एक विशेष चॅलेंज म्हणजे निवेदिता सराफ आणि सिद्धार्थ रे यांच्या लव्हस्टोरीचा पार्ट. कारण त्या गाण्यादरम्यान निवेदिता ही नायिका, तिच्या प्रियकरावर म्हणजेच सिद्धार्थवर रागावलेली असते आणि दोघांच्या त्याचं मूडमध्ये ते गाणं चित्रित करायचं होतं, त्यामुळं रागवलेल्या सुरामध्ये त्या जोडीला नाचवणं, त्यांना तशा स्टेप्स देणं, हे सचिन पिळगावकर यांच्यासाठी खूप चॅलेंजिंग काम होतं. मंडळी सिनेमांतला धनंजय माने इथंच राहतात का हा एव्हरग्रीन सीन तर इतका हिट झाला की त्याचं नावानं लोकं अशोक मामांना ओळखू लागले. एका बहाद्दरानं तर अशोक मामांना धनंजय माने नावाची पाटी सुद्धा गिफ्ट केली. बरं आता अशीही बनवाबनवीचे आपण सगळे तर फॅन आहोतचं पण स्वतः क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर सुद्धा त्या सिनेमाचा बेक्कार फॅनय. एकदा मुलाखतीत त्यानं मी रिफ्रेशमेंटसाठी अशी ही बनवाबनवी सिनेमा पाहतो असं सांगितलं होतं.

Sachin Tendulkar

(Ashi hi Banwa Banwi | Vishaych Bhari| Laxmikant Berde)

मंडळी त्याकाळी बनवाबनवी सुपरहिट झाल्यानंतर त्याचे अनेक भाषेत रिमेक ही करण्यात आले. जसं की १९९१ मध्ये तेलुगु भाषेत आलेला ‘चित्रम भल्लारे विचित्रम’, २००२ मध्ये कन्नडमध्ये रिलिज झालेला ‘ओलू साक बारी ओलू’ आणि नंतर २००९ मध्ये हिंदी भाषेत आलेला ‘पेइंग गेस्ट’ हा सिनेमा. २०१४ मध्ये पंजाबीमधला ‘मि. ॲंड मिसेस ४२०’ आणि यावर २०१७ मध्ये शेवटचा बंगाली भाषेमध्ये बनलेला ‘जिओ पगला’ या सिनेमांनी आपलं नशीब आजमावलं पण अशीही बनवाबनवी एवढ प्रेम कुणालाच लाभलं नाही. असो, पण तुम्हाला अशीही बनवाबनवी मधली नेमकी कोणती गोष्ट सर्वाधिक आवडलेली.गाणी, डायलॉग्ज, acting की ओव्हर ऑल पॅकेज. तुमची मतं कमेंट करून कळवा.

Ashi hi Banwa Banwi या सिनेमाच्या या ५ गोष्टी कायम आठवणीत राहतील | Vishaych Bhari

Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇

https://www.facebook.com/vishaychbhari

https://www.facebook.com/aplavishaychbhari

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *