३१ ऑक्टोबर १९८४ रोजी शीख समुदायातील माथेफिरूनी इंदिरा गांधींची हत्या केल्यानंतर राजीव गांधी देशाचे नवे पंतप्रधान होतील या चर्चेला उधाण आलं होतं. त्यावेळी राजीव गांधी आणि त्यांच्या पत्नी सोनिया गांधी यांच्यात एक गंभीर संवाद झाला होता. तेव्हा राजीव गांधी सोनिया गांधी यांना म्हणाले की, पक्षाची अशी इच्छा आहे की, मी पंतप्रधान पदाची शपथ घ्यावी. ते ऐकल्यानंतर घाबरलेल्या सोनिया गांधी राजीव गांधीना म्हणाल्या, नाही.. ते लोक तुला पण मारून टाकतील. त्यावर राजीव गांधी सोनिया गांधीना म्हणाले, माझ्याकडे कोणताही पर्याय नाहीये. मी तसा ही मारला जाणार आहे. त्यानंतर दोघातला तो संवाद बराच काळ सुरू राहिला. इंदिरा गांधी यांचे प्रधान सचिव म्हणून काम पाहिलेल्या P. C. Alexandar यांनी त्यांच्या माय इयर्स विथ इंदिरा गांधी या पुस्तकात हा संवाद जसाच्या तसा लिहिलाय. त्यानंतर काही वर्षांनंतरचं म्हणजे २१ मे १९९१ रोजी राजीव गांधी यांची तामीळनाडूमध्ये हत्या करण्यात आली. असं म्हणतात की कोर्टात त्याप्रकरणी केस उभी राहिली तेव्हा एकूण २६ जणांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलं होतं. पण १९९९ साली त्यापैकी १९ जणांना सोडून देण्यात आलं. उरलेल्या सात मुख्य आरोपीपैकी चार जणांना फाशीची शिक्षा सुनावली तर तिघांना आजीवन कारावास देण्यात आला. फाशी सुनावलेल्या आरोपीमध्ये नलिनी श्रीहरन नावाची महिला देखील होती. पण पुढं नलिनी यांनी सोनिया गांधी यांच्याशी त्याप्रकरणी संवाद साधला. त्यानंतर खुद्द सोनिया गांधी यांनीच कोर्टात नलिनी यांच्या फाशीची शिक्षा कमी करून त्यांना तुरुंगवास मिळावा अशी अपील केली. म्हणजे आपल्या नवऱ्याला मारण्यात ज्या बाईचा हात होता, त्या बाईची शिक्षा कमी व्हावी म्हणून सोनिया गांधी यांनी महत्वाची भूमिका बजावली. आता सध्या ती नलिनी श्रीहरन कुठाय, सोनिया गांधी यांनी तिच्याबद्दल सौम्य भूमिका का घेतली होती अन राजीव गांधी यांच्या हत्येचा डाव कसा आखण्यात आला होता त्या सर्व प्रश्नांचा घेतलेला हा संपूर्ण आढावा…
P. C. Alexandar यांच्या पुस्तकानुसार, इंदिरा गांधीच्या हत्येनंतर AIIMS च्या इमारतीमध्ये राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांच्यात जे बोलणं झालं त्यावरून ह्ये स्पष्ट होतं की त्यावेळी राजीव यांच्या डोक्यात आपलीही हत्या होईल याची भीती होती. मग ते खलिस्तानी दहशतवादी करतील किंवा आणखी कुणी याचा त्यांना अंदाज नव्हता. पण करमजित सिंग नावाच्या एका खलिस्तान्यानं 2 ऑक्टोबर 1986 रोजी नवी दिल्लीतल्या राजघाटमध्ये राजीव गांधींना मारण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. 2 ऑक्टोबर म्हणजे महात्मा गांधी यांच्या जयंतीदिवशी देशाचे पंतप्रधान समाधीस्थळावर अभिवादन करायला येतील अन तीच योग्य वेळय त्यांना गोळी मारण्याची असं करमजित सिंगचं प्लॅनिंग होतं. त्यानुसार समाधीच्या मागच्या बाजुला यमुना नदीचा काठय तिथल्या कंपाउंडच्या मागे झुडपात लपून हल्ला करण्याचा त्याने प्लॅन केला होता. पत्रकार राणी सिंग यांनी सोनिया गांधींवर लिहिलेल्या पुस्तकात आणि तत्कालीन इंडिया टुडे वृतपत्रात त्या घटनेचा सखोल रिपोर्ट मांडण्यात आला होता. त्यावेळी राजीव गांधी यांच्यावर एकूण तीन गोळ्या झाडण्यात आल्या होत्या पण त्यापैकी फक्त एकच राजीव गांधींना चाटून गेली. पुढं त्यांच्या सुरक्षा राक्षकांनी करमजित सिंगला पकडलं. तेव्हा करमजित सिंगकडे असलेलं रिव्हॉल्वर चांगल्या दर्जाचं नव्हतं, त्याच्याकडे असलेली काडतुसं निकृष्ट दर्जाची आणि अर्धवट वापरलेली होती. त्यामुळेच राजीव गांधींचा जीव वाचल्याचं नंतर तपासात पुढ आलं. खरं तर त्या घटनेनंतर राजीव गांधींच्या सुरक्षेत आणखी वाढ करण्यात आली होती. पण जसं त्यांचं पंतप्रधानपद गेलं तसं त्यांची सुरक्षा ही काढून घेण्यात आली आणि मग 21 मे 1991 च्या रात्री श्रीपेरंबुदूरमध्ये तो भयानक बॉम्बस्फ़ोट घडवून आणला गेला. आता आपण त्याचा घटना क्रम जाणून घेऊ. त्यावेळी राजीव गांधी प्रचाराच्या निमित्तानं तामिळनाडू दौऱ्यावर गेले होते.
( Rajiv Gandhi यांची हत्या केलेली नलिनी सध्या काय करते | Rajiv Gandhi Death Conspiracy )
तामिळनाडूच्या श्रीपेरंबुदूरमध्ये राजीव गांधी यांची सभा आणि सत्कार होणार होता. तसं पाहिलं तर कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, केरळ आणि अलीकडंच नव्यानं तयार झालेलं तेलंगणा ही राज्य त्यांच्या भाषेबद्दल, त्यांच्या अस्मितांबद्दल खूप अग्रेसीव्ह असतात. त्यांना हिंदी भाषेबद्दल किंवा उत्तर भारतीयांबद्दल विशेष आस्था नसते. त्यावेळी तामिळनाडूमध्ये एलटीटीई म्हणजे लिबरेशन टायगर्स ऑफ तमि़ळ ईलम नावाची एक दहशतवादी संघटना खूप ऍक्टिव्ह होती. ती भारत आणि श्रीलंकेमध्ये स्वतंत्र तामिळ भाषिक राष्ट्रासाठी घातक आणि विस्फोटक हत्यारे घेऊन लढायची. त्याची जाणीव असतानाही राजीव गांधी तामिळनाडूमध्ये गेले होते. 21 मे 1991 चा तो दिवस. राजीव गांधीच्या आगमनामुळं तामिळनाडू काँग्रेसचे जी. के. मूपनार, जयंती नटराजन, राममूर्ती आणि हजारो कार्यकर्ते श्रीपेरंबुदूरमध्ये जमा झाले होते. त्या कार्यक्रमाला तेव्हाच्या गल्फ न्यूजच्या प्रतिनिधी नीना गोपाल देखील उपस्थित होत्या. त्या राजीव गांधींच्या सहकारी सुमन दुबे यांच्याशी बोलत उभ्या होत्या. त्यांनी सांगितलं रात्री 10 वाजून 21 मिनिटांनी 30 वर्षांची एक बुटकी, सावळी आणि जाडी मुलगी हातात चंदनाचा हार घेऊन राजीव गांधी यांच्या दिशेनं चालू लागली. सुरक्षारक्षकांनी तिला लांब उभं रहाण्याचा इशारा केला पण राजीव गांधीनीच तिला जवळ बोलवलं. तशी ती मुलगी राजीव यांच्या जवळ आली आणि त्यांच्या पाया पडण्यासाठी खाली वाकली आणि पुढच्या काही क्षणातचं होत्याचं नव्हतं झालं. कानठळ्या बसणारा एक मोठा बॉम्बस्फ़ोट झाला आणि संपूर्ण आसमंत हादरला. गल्फ न्यूजच्या प्रतिनिधी नीना गोपाल त्या संपूर्ण घटनेच्या प्रत्यक्षदर्शी होत्या.
त्या म्हणतात की, बाँबस्फोटानंतर मी माझ्या पांढऱ्या साडीकडं पाहिलं तर त्यावर मांसाचे तुकडे, आणि रक्ताचे डाग पडले होते. त्या भयानक स्फोटातून मी वाचणं हा चमत्कारच होता. माझ्या पुढे उभे असलेले सगळेच जण त्या स्फोटात मृत्युमुखी पडले. बाँब फुटण्याच्या आधी फटाके फुटण्याचा आवाज आला होता. अन त्यानंतर लगेचच तो भयानक बाँबस्फोट झाला. स्फ़ोटाचा धूर ओसरल्यावर राजीव गांधींचा शोध सुरू झाला. त्यांच्या शरीराचा काही भाग छिन्नविच्छिन्न होऊन पडला होता. राजीव यांचं कपाळ फुटल्यानं नीटसं काहीच लक्षात येत नव्हतं. पण, डोक्यातून बाहेर आलेला त्यांचा मेंदू त्यांचे सुरक्षा अधिकारी पी. के. गुप्ता यांच्या पायावर पडला होता. गुप्ता यांना त्याची जाणीव असायचा प्रश्नच नव्हता. कारण, ते स्वतःच शेवटच्या घटका मोजत होते. पत्रकार नीना गोपाल यांनी सांगितलं की, पुढं त्या चालत जिथ राजीव गांधी उभे होते त्या जागेवर जाऊन पोहोचल्या. तेवढ्यात त्यांना राजीव गांधींचं शरीर दिसलं. त्यांनी राजीव यांचे लोटो कंपनीचे बूट पाहिले आणि तो हात पाहिला ज्यावर गुची कंपनीचं घड्याळ होतं. काही वेळापूर्वीच त्यांनी गाडीच्या मागच्या सीटवर बसून राजीव गांधींची मुलाखत घेतली होती. त्यामुळं त्यांना धक्काचं बसला. पुढं राजीव गांधींचं पार्थिव अँब्युलन्सने नेण्यात आलं. बॉम्बस्फ़ोटानंतर बरोबर 10 वाजून 25 मिनिटांनी दिल्लीत राजीव यांच्या जनपथ निवासस्थानी एक फोन खणाणला. रशीद किडवई यांनी सोनिया गांधींवर लिहिलेल्या पुस्तकात त्या फोनवर झालेल्या संवादाचा वृतांत लिहिलाय. फोन चेन्नईहून आला होता आणि यावेळी फोन करणाऱ्याला काहीही करून जॉर्ज किंवा मॅडमशी बोलायचं होतं. त्यानं सांगितलं की तो गुप्तहेर खात्याचा माणूस आहे. त्यावेळी राजीव गांधींचे खाजगी सचिव व्हिन्सेंट जॉर्ज यांनी तो फोन रिसिव्ह केला होता. समोरच्या व्यक्तीनं तामिळनाडूतली दुर्दैवी घटना सांगितली.
( Rajiv Gandhi यांची हत्या केलेली नलिनी सध्या काय करते | Rajiv Gandhi Death Conspiracy )
जॉर्जनं विचारलं राजीव कसे आहेत ? फोनवरचा माणूस पाच सेकंद शांत राहिला. पण, जॉर्ज यांना पाच सेकंद जणू काळ थांबल्यासारखा वाटला. जॉर्ज यांनी कातर आवाजात विचारलं, राजीव कसे हे सांगत का नाही तुम्ही ? तेव्हा फोन करणाऱ्यानं सांगितलं की, ते आता या जगात नाहीत आणि एकदम फोन बंद झाल्याचा आवाज आला. त्यानंतर भेदरलेले जॉर्ज ‘मॅडम, मॅडम म्हणून ओरडत घरात पळाले. तो आवाज ऐकून सोनिया गांधी गडबडीत खोलीतून बाहेर आल्या. त्यांना जाणीव झाली होती की, काहीतरी गंभीर घडलंय. कारण एरवी जॉर्ज शांत असायचे. काहीही घडलं तरी ते असा आरडाओरडा करत नसायचे. सोनियांना पाहून जॉर्ज म्हणाले, मॅडम चेन्नईमध्ये एक मोठा बाँबस्फोट झालाय. त्यावर सोनियांनी जॉर्ज यांच्या डोळ्यांत बघत पटकन विचारलं, “इज ही अलाइव्ह?” म्हणजे ते जिवंत आहेत का ? मात्र त्यावर जॉर्ज खाली मान घालून गप्प राहिले. जॉर्ज यांची चुप्पी सोनियांना सारं काही सांगून गेली. त्यानंतर सोनिया गांधींनी स्वतःवरचं नियंत्रण हरवलं. त्या धाय मोकलून रडू लागल्या. रशीद म्हणतात त्यावेळी 10 जनपथच्या त्या भिंतींनी सोनियांच्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या करुण किंकाळ्या प्रथमच ऐकल्या होत्या. सोनिया खूप जोरात रडत होत्या. बाहेर गेस्ट रूममध्ये येणाऱ्या काँग्रेसी नेत्यांना त्यांचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत होता. रडतानाच सोनियांना अस्थम्याचा जोरात झटका आला आणि त्या जवळपास बेशुद्धच झाल्या. प्रियांका त्यांचं औषध शोधत होत्या. पण, त्यांना औषध मिळालंच नाही. प्रियांका सोनियांना शांत करण्याचं प्रयत्न करत होत्या. पण सोनियांवर त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. जेव्हा हा फोन आला तेव्हा प्रियांका झोपी गेली होती. राहुल गांधी मात्र अमेरिकेत शिक्षण घेत होते. आपली आई सोनियांच्या आक्रोशाने प्रियांका तातडीने धावत पळत सोनियांच्या जवळ गेली. त्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पुढं सीआरपीएफचे महानिरीक्षक डॉक्टर डी. आर. कार्तिकेयन यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष तपास पथक नेमण्यात आलं. त्यानंतर काही महिन्यांतच एलटीटीईच्या सात सदस्यांना त्या प्रकरणी अटक करण्यात आली. दरम्यान मुख्य आरोपी शिवरासन आणि त्याच्या साथीदारांनी अटक होण्याआधीच साईनाइड घेऊन स्वतःला संपवून टाकलं. डॉक्टर कार्तिकेयन यांनी एका प्रसिध्द वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं होतं की हरि बाबू यांच्या कॅमेऱ्यात मिळालेल्या 10 फोटोमुळं आमच्या तपासाला दिशा मिळाली. आम्ही 24 तास आणि आठवड्याचे सातही दिवस कोणत्याही आरामाशिवाय काम करत होतो. 3 महिन्यांत सगळा तपास संपला आणि फॉरेन्सिक रिपोर्ट यायला वेळ लागला. हत्येला एक वर्ष होण्याआधीच कोर्टात चार्जशीट दाखल केली होती.
( Rajiv Gandhi यांची हत्या केलेली नलिनी सध्या काय करते | Rajiv Gandhi Death Conspiracy )
त्यानंतर अशी माहिती समोर आली की श्रीपेरुंबदुर येथे निवडणूक रॅलीदरम्यान धनू नावाच्या एलटीटीईच्या आत्मघाती बॉम्बरने राजीव गांधींची हत्या केली. त्या आत्मघातकी हल्ल्यात राजीव गांधी आणि हल्लेखोर धनू यांच्यासह १६ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर ४५ जण गंभीर जखमी झाले होते. त्या प्रकरणात ट्रायल कोर्टानं सुरुवातीला 26 दोषींना फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र, मे 1999 मध्ये सर्वोच्च न्यायालयानं 19 जणांची निर्दोष मुक्तता केली. उर्वरित सात आरोपींपैकी नलिनी, मुरुगन उर्फ श्रीहरन, संथन आणि पेरारिवलन या चार जणांना फाशीची शिक्षा आणि उर्वरित रविचंद्रन, रॉबर्ट पायस आणि जयकुमार या तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. ज्यांना फाशी देण्यात आली होती त्यांनी पुढं दयेचे अर्ज करून आमची शिक्षा कमी करून तुरुंगवास द्यावा अशी सातत्यानं मागणी केली होती. पण वेळोवेळी त्यांची मागणी धुडकावून लावण्यात आली. राजीव हत्या: हिडन ट्रुथ्स अँड प्रियांका-नलिनी मीटिंग या पुस्तकात नलिनी श्रीहरन यांनी त्यांचा जेलमधला थरारक अनुभव सांगितला होता.
नलिनी म्हणाली, मला अटक झाली तेव्हा ती सुमारे दोन महिन्यांची गर्भवती होती. तिला अटक केल्यानंतर लगेचच तिचा पती, आई आणि लहान भावालाही अटक करण्यात आली. त्यावेळी मी खूप रडले, माझी अवस्था खूप वाईट झाली होती. मी सांगत राहिले की मी त्यांना मारलेलं नाहीये. मी केवळ त्या आत्मघाती ग्रुपची मेम्बर असल्यामुळं माझ्यावर त्यांच्या मृत्यूचा ठपका ठेवण्यात आला होता. पण त्या स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्या 17 जणांना मारून माझा काय फायदा होता. त्यावेळी मी शिकत होते. आमच्या घरी काँग्रेसला मानणारे लोकं होते. इंदिरा गांधींना मारण्यात आलं होतं तेव्हा आम्ही चार दिवस जेवलो नव्हतो. फक्त रडत होतो. अन राजीव यांची हत्या झाली तेव्हा सुद्धा आमच्या घरात तीन दिवस सगळे रडत होते. नलिनी यांनी प्रियांका गांधी आणि सोनिया गांधी यांच्याशी जेलमधल्या अत्याचाराची सगळी आपबीती शेअर केली होती असंही संबंधित पुस्तकात लिहिण्यात आलंय. त्यापैकी प्रियांका गांधी यांना नलिनीच्या बोलण्यावर विश्वास बसला नव्हता. त्या खूप रागात नलिनीशी डील करत होत्या. मात्र सोनिया गांधींनी खूप संयम दाखवला.
नलिनी शिक्षित कुटुंबातून होती. तिचे वडील इन्स्पेक्टर होते आणि आई नर्स. महात्मा गांधींनी त्यांच्या आईला पद्मावती ह्ये नाव दिलं होतं. नलिनी अभ्यासात खूप हुशार होती पण नंतर मुरुगन नावाच्या माणसाच्या ऐकण्यात येऊन ती एलटीटीई संघटनेला जॉईन झाली आणि राजीव गांधींना संपवणाऱ्या कृत्यात सहभागी झाली. असं म्हणतात जेव्हा धनु नावाची महिला राजीव गांधींच्या गळ्यात हार घालायला गेली तेव्हा नलिनी आणि तिची साथीदार सुभा प्लॅनिंगच्या exeucation वर लक्ष देत घटनास्थळी उभ्या होत्या. नलिनीला टाडा अंतर्गत चालू असणाऱ्या खटल्यात मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. पण ती गर्भवती असल्यामुळं शिक्षा लांबवण्यात आली. नलिनीनं जेलमध्येचं तिच्या मुलीला ही जन्म दिला. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे नलिनीची फाशीची शिक्षा कमी करून तिला आजीवन कारावास मिळावा यासाठी खुद्द सोनिया गांधींनीच पुढाकार घेतला होता. आपल्या पतीच्या खुनाच्या कटात जी महिला सामीलय तिची शिक्षा कमी व्हावी म्हणून अपील करणाऱ्या सोनिया गांधींचं ही तेव्हा सर्व स्तरातून कौतुक झालं होतं. शिक्षेच्या दरम्यान नलिनी तीन वेळा पॅरोलवर जेलमधून बाहेर आली. एकदा मुलीच्या लग्नाला ही तिला रजा देण्यात आली होती. नलिनी म्हणते, “ जे लोकं बॉम्बस्फोटात मारले गेले मला त्यांच्या कुटुंबियांबद्दल वाईट वाटते. त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या नुकसानासाठी त्यांना काही आर्थिक मदत मिळाली की नाही हे मला माहीत नाही. जर मिळाली नसेल तर त्यांचे खरोखरच मोठे नुकसान आहे. शिक्षा सुनावल्यानंतर चार वेळा आमच्या फाशीची तारीख निश्चित करण्यात आली होती. धर्मगुरूंना ही बोलावण्यात आलं होतं. ते सगळं माझ्या डोळ्यासमोर घडलं. पण मी कधीचं आशा सोडली नाही. मला नेहमी वाटायचं की मी काही चुकीचं केलं नाही, त्यामुळे माझं काहीही वाईट होणार नाही. दरम्यान मागच्या वर्षी म्हणजे 2022 ला तब्बल 32 वर्षे तुरुंगवास भोगल्यानंतर नलिनीला सोडण्यात आलं.
( Rajiv Gandhi यांची हत्या केलेली नलिनी सध्या काय करते | Rajiv Gandhi Death Conspiracy )
सुप्रीम कोर्टानं राजीव गांधी हत्या प्रकरणातील सर्वच आरोपीना सोडून दिल्याचं बोललं जातंय. सध्या नलिनीचं वय 56 वर्षे आहे. ती भारतातील सर्वात जास्त काळ जेलमध्ये राहणारी महिला आहे. नलिनीनं माध्यमाशी बोलताना सांगितलं की आता सुटकेनंतर पुन्हा नव्यानं आयुष्य सुरू करण्याची संधी तिला मिळालीय. मला माझ्या पती आणि मुलीसोबत राहायचय. मला कुटुंब एकत्र करायचं आहे.असंही ती तेव्हा म्हणाली. पण नलिनीला आज सुद्धा जेव्हा राजीव गांधींना मारण्याच्या प्लॅनमागे नेमका खरा सूत्रधार कोण होता असं विचारलं जातं तेव्हा ती उत्तर द्यायचं टाळते. ती म्हणते की मी निर्दोष आहे. मी कोणाचही नाव घेऊ शकत नाही किंवा कोणावरही इशारा करू शकत नाही. मला गॉसिप करण्याची सवय नाही. मला जर तेच करायचं असतं तर मी 32 वर्षे तुरुंगात राहिले नसते. सध्या ती आपल्या कुटुंबासोबत राहतीये. मात्र सगळ्यांचं हेच मत आहे की राजीव यांच्या हल्ल्यामागचा खरा सूत्रधार हा एलटीटीई या दहशतवादी संघटनेचा प्रमुख प्रभाकरनच आहे म्हणून. असो, विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात देशाचं नाव उंचावणार्या अशा या महान माजी पंतप्रधानास विषयच भारीचा मानाचा सलाम. तुम्हाला मात्र ही संपूर्ण घटना ऐकल्यानंतर काय वाटलं? सोनिया गांधींच्या नलिनीबद्दलच्या माफीच्या भूमिकेबद्दल तुमचं नेमकं काय मत आहे , तसेच राजीव गांधी पंतप्रधान म्हणून कसे होते? त्ये आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.
Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇
https://www.facebook.com/aplavishaychbhari
Leave a Reply Cancel reply