लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघांमध्ये होणाऱ्या लढतींचं चित्र आता स्पष्ट होऊ लागलं आहे. काही मतदारसंघात जुने चेहरे आणि प्रतिस्पर्धी नव्याने आमने-सामने येताना दिसताहेत. तर काही मतदारसंघांमध्ये मात्र यावेळी तरुण आणि नव्या चेहऱ्यांमध्येच मुख्य लढती होतील हे स्पष्ट झाले आहे. यावेळी अशाच नव्या आणि तरुण चेहऱ्यांमुळे ज्या मतदारसंघात अटीतटीच्या लढती होतील, अशी अपेक्षा आहे, त्यापैकी एक मतदारसंघ म्हणजे सोलापूर . अनुसूचित जातींसाठी आरक्षित असलेल्या या मतदारसंघांमध्ये यावेळी काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आणि भाजपाचे राम सातपुते या दोन विद्यमान आमदारांमध्ये लढत होणार आहे. प्रणिती शिंदे ह्या सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आल्या आहेत. तर राम सातपुते हे माळसिरस मतदारसंघातून २०१९ मध्ये पहिल्यांदाच विधानसभेत पोहोचले होते. काँग्रेस आणि भाजपा दोघांनीही यावेळी सोलापूरमधून नव्या आणि तडफदार चेहऱ्यांना संधी दिल्याने येथील लढत ही अटीतटीची होईल, असं बोललं जात आहे. दोन्ही उमेदवारांची आपापली बलस्थानं आहेत. तसेच काही कच्चे दुवेही आहेत. त्यामुळे निर्णायक क्षणी सगळी समिकरणं जुळवण्यात ज्याला यश मिळेल, त्याच्या गळ्यात विजयाची माळ पडेल, हे निश्चित आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर या मतदारसंघातील नेमकी काय परिस्थिती आहे याचाच घेतलेला हा आढावा.
(Solapur Loksabha Election 2024|Vishaych Bhari)
सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आणि भाजपाचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर दोन्हीकडून जोरदार वाकयुद्धही सुरू झालं आहे. त्यात यावेळी सोलापूरमध्ये स्थानिक विरुद्ध बाहेरचे, असा वाद प्रचारामध्ये रंगण्याची शक्यता आहे. राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर होताच प्रणिती शिंदे यांनी सोलापूरची लेक म्हणून मी सोलापूरमध्ये तुमचं स्वागत करते, असं पत्र लिहून राम सातपुते हे या मतदारसंघातील मतदारांसाठी बाहेरचे असल्याचे अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही सोशल मीडियावर हे पत्र शेअर करताना बीजेपीचे पार्सल बीडला पाठवूया, अशी आक्रमक विधानं करत राम सातपुते हे बाहेरचे उमेदवार असल्याचा मुद्दा अधोरेखित करण्याचा प्रयत्न केलाय. तर त्याला राम सातपुते यांनीही आक्रमकपणे प्रत्युत्तर दिले आहे. मी २०१९ पासून सोलापूरमधील माळशिरस मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहे. त्या माध्यमातून मी सोलापूर जिल्ह्यातील जनतेच्या सेवेत माझ्या परिने होईल तेवढी विकास कामं करण्याचा प्रयत्न केलाय. धर्म आणि जातिपातीमध्ये फूट पाडून एवढी वर्षे राजकारण करण्याचा प्रयत्न कुणी केलाय हे, सोलापूरच्याच नव्हे तर देशातील जनतेनं ओळखलं आहे. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या माझ्यासारख्या सर्वसामान्य उसतोड कामगाराला उमेदवारी देऊन भाजपाने जो विश्वास दाखवलाय, त्याला सोलापूर जिल्ह्याचा विकास करून सार्थ करून दाखवण्याचा मी प्रयत्न करेन, असं प्रत्युत्तर राम सातपुते यांनी दिलंय.
(Solapur Loksabha Election 2024|Vishaych Bhari)
मात्र राम सातपुते यांच्या उमेदवारीवरून भाजपामध्येही सारं काही आलबेल नसल्याचं दिसतंय. सोलापूरमधून राम सातपुते यांच्यासह, माजी खासदार अमर साबळे, मिलिंद कांबळे, भारत वाघमारे आणि लक्ष्मण ढोबळे यांच्या कन्या कोमल ढोबळे आदी नेते इच्छूक होते. त्यासाठी या नेत्यांकडून जोरदार मोर्चेबांधणीही झाली होती. त्यामुळे भाजपाला उमेदवार जाहीर करण्यासही वेळ लागला होता. मात्र अखेर उमेदवारीच्या स्पर्धेत राम सातपुते यांनीच बाजी मारली. मात्र सातपुते यांना उमेदवारी जाहीर झाल्यावर भाजपामधील असंतोष बाहेर पडू लागला आहे. दरम्यान, कोमल ढोबळे यांनी मनासारखा उमेदवार नसल्यास नोटासमोरील बटण दाबा, मात्र मतदान अवश्य करा, असं स्टेटस ठेवल्याने चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे येथील नाराजी दूर करताना भाजपाच्या वरिष्ठांची दमछाक होण्याची शक्यता आहे. तसेच भाजपातील या अंतर्गत नाराजीचा फायदा हा प्रणिती शिंदे यांना होण्याची शक्यता आहे.
(Solapur Loksabha Election 2024|Vishaych Bhari)
आता सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा इतिहास आणि सध्याची परिस्थिती पाहिल्यास येथे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्यासारखे दिग्गज नेते काँग्रेसकडे असतानाही या मतदारसंघावर भाजपाचं वर्चस्व राहिलेलं आहे. २००९ चा अपवाद वगळता मागच्या पाच पैकी चार निवडणुकांमध्ये येथे भाजपाने बाजी मारलेली आहे. येथील स्थानिक राजकारणाची आणि जातीपातीची समिकरणं भाजपानं व्यवस्थित जुळवलेली असल्याने पक्षाला लोकसभा निवडणुकीमध्ये त्याचा फायदा होताना दिसत आहे. मात्र मागचे दोन्ही खासदार हे कामगिरीच्या दृष्टीने अगदीच निष्प्रभ ठरल्याने त्याचा भाजपाला फटका बसू शकतो. मात्र येथील विद्यमान खासदार बदलत पक्षाने ही नाराजी वाढणार नाही, याची काळजी घेतली आहे,असं असलं तरी निष्क्रिय खासदारांचा मुद्दा उपस्थित करून काँग्रेस आणि प्रणिती शिंदे येथे भाजपाची कोंडी करू शकतात.
(Solapur Loksabha Election 2024|Vishaych Bhari)
या मतदारसंघातील सध्याची परिस्थिती पाहता सोलापूर लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहा पैकी सोलापूर शहर उत्तर, अक्कलकोट, सोलापूर दक्षिण आणि पंढरपूर या ४ मतदारसंघांमध्ये भाजपाचे आमदार आहेत. तर मोहोळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे यशवंत माने हे आमदार आहेत. सद्यस्थितीत सोलापूर शहर मध्य हा एकमेव मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात आहे. तेथून लोकसभेच्या रिंगणात उतरलेल्या प्रणिती शिंदे ह्या विद्यमान आमदार आहेत. मात्र येथेही निवडून येण्यासाठी प्रणिती शिंदे यांना खूप मेहनत घ्यावी लागते. येथील काही उमेदवारांमुळे होणाऱ्या मतविभागणीचा फायदा होऊन त्या विजयी होत असतात. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्येही प्रणिती शिंदे ह्या अवघी ३० टक्के मतं मिळवून विजयी झाल्या होत्या. या निवडणुकीत एमआयएम, अपक्ष, शिवसेना आणि सीपीआयएमच्या उमेदवारांमध्ये झालेलं मोठ्या प्रमाणावरील मतविभाजन प्रणिती शिंदे यांच्या पथ्थ्यावर पडलं होत. केवळ २०१९ नाही तर २०१४ आणि २००९ मध्येही प्रणिती शिंदे अशाच प्रकारे निवडून आल्या होत्या. मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये अशा प्रकारचं मतविभाजन संपूर्ण मतदारसंघात घडून येण्याची शक्यता फार कमी आहे.
(Solapur Loksabha Election 2024|Vishaych Bhari)
आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने येथे काँग्रेसचं गणित बिघडवलं होतं. भाजपाचे जयसिद्धेश्वर स्वामी आणि काँग्रेसचे सुशील कुमार शिंदे यांच्यात मुख्य लढत असताना प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीमुळे ही लढत तिरंगी बनली होती. मात्र प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेल्या १ लाख ७० हजार मतांमुळे सुशील कुमार शिंदेंचा पराभव झाला होता. जर वंचित आणि काँग्रेसची मतं एकत्र झाली असती तर सुशिलकुमार शिंदे अकरा साडे अकरा मतांच्या थोड्या फरकाने विजयी झाले असते. मात्र यावेळी वंचितनं आपली अंतिम भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. वंचितने सात मतदासंघात काँग्रेसचा बिनशर्त पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे. त्यात सोलापूरचा समावेश असल्यास त्याचा फायदा प्रणिती शिंदे यांना निश्चितपणे होणार आहे. तसेच प्रणिती शिंदे यांनी केंद्रातील भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात नेहमीच आक्रमक भूमिका घेतलेली आहे. नुकतीच कोरोनाच्या लसीवरूनही त्यांनी मोदींवर टीका केली होती. त्यामुळे मोदींचा प्रखर विरोधक असलेल्या मतदार एक चांगला पर्याय म्हणून त्यांच्याकडे वळू शकतो.
(Solapur Loksabha Election 2024|Vishaych Bhari)
हे विषयच भारी वाचलेस का भावा !
Manoj Jarange Patil यांनी स्वतःचा राजकीय पक्ष काढला तर हे ७ खासदार निवडणुकीत पडतील | Vishaych Bhariहे ११ आमदार शरद पवारांशी कट्टरयेत | Ajit Pawar Bandkhori | Sharad Pawar Resigns | Vishaych Bhariसांगलीचा पुढचा खासदार कोण | Sanjay Kaka Patil की Vishal Patil | Sangali Loksabha | Vishaych Bhariजरांगे + धनगर युती मागं शरद पवारांचा हात | Manoj Jarange Patil | Sharad Pawar | Vishaych Bhari
आता २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या मतदानाचा आढावा घेतल्यास येथील सहा पैकी सोलापूर शहर उत्तर, सोलापूर शहर मध्य, अक्कलकोट आणि सोलापूर दक्षिण या मतदारसंघातून भाजपाला मोठी आघाडी मिळाली होती. तर मोहोळ आणि पंढरपूरमधून काँग्रेसला आघाडी मिळाली होती. सद्यस्थितीत मोहोळ आणि पंढरपूरमध्येही महायुतीचेच आमदार आहेत. तसेच सोलापूर शहर उत्तरमध्ये विजयकुमार देशमुख , सोलापूर दक्षिणमध्ये सुभाष देशमुख आणि अक्कलकोटमध्ये सचिन कल्याणशेट्टी यांच्या रूपात भाजपाकडे मतदान वळवणारे प्रभावी चेहरे आहेत.याशिवाय सोलापूर महानगर पालिका आणि जिल्हा परिषदही भाजपाच्या ताब्यात होती. त्यामुळे स्थानिक पातळीवर भाजपाकडे कार्यकर्त्यांचं बळ बऱ्यापैकी आहे. त्यात राम सातपुते यांची भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये लढाऊ नेता म्हणून प्रतिमा आहे, ती या निवडणुकीत त्यांच्यासाठी उपयुत्क ठरू शकते. त्याचा फायदा या निवडणुकीमध्ये भाजपाला होऊ शकतो. त्याबरोबरच कामगारांसाठी सुमारे १५ हजार घरे बांघलेल्या गृहनिर्माण प्रकल्पाचं मोदींनी नुकतंच उदघाटन केलं होतं. या गृहप्रकल्पासाठी कामगार नेते नरसय्या आडम मास्तर यांनी पुढाकार घेतला होता. तरी त्याला लागणारी आर्थिक मदत ही केंद्र सरकारने केली होती. त्याचा फायदाही भाजपा आणि राम सातपुते यांना येथे होऊ शकतो.एकंदरीत सोलापूरमध्ये राजकीय बळाच्या बाबतीत भाजपाची ताकद अधिक असली तरी प्रणिती शिंदे यांच्या रूपात एक प्रभावी चेहरा देऊन काँग्रेसने या लढतीत रंगत आणली आहे. आता प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांच्यामध्ये होणाऱ्या या लढतीत कोण बाजी मारेल,कोण होईल सोलापूरचा नेक्स्ट खासदार,याबाबत तुम्हाला काय वाटतं, हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा.
Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇
https://www.facebook.com/vishaychbhari
Leave a Reply Cancel reply