या ५ कारणांमुळे नितीन गडकरी नागपूरात पडूच शकत नाहीत | Nagpur Loksabha Election 2024 | Nitin Gadkari


पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रात गेल्या दहावर्षांपासून सत्ताधारी असलेल्या भाजपाबाबत विरोधी पक्षांमध्ये कितीही नाराजी असली तरी मोदींच्या मंत्रिमंडळातील एक नेता विरोधी पक्षांमधील नेते आणि कार्यकर्त्यांना आपलासा वाटत असतो. त्याच्या धडाकेबाज कामाचं, स्पष्टपणे बोलण्याचं कौतुक विरोधकही खुल्या मनानं करत असतात. त्यांच्या मोदींसोबत असलेल्या कथित मतभेदांची आणि पक्षांतर्गत स्पर्धेची चर्चा कायम होत असते. त्यामुळेच भाजपाच्या पहिल्या यादीत त्यांचं नाव दिसून न आल्यानंतर विरोधी पक्षांच्या नेत्यांनीही त्यांना आपल्याकडून लढण्याची ऑफर दिली. तुम्हाला कळलंच असेल, या नेत्याचं नाव आहे अर्थातच भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. नागपूर लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा मोठ्या मताधिक्याने जिंकलेल्या नितीन गडकरी यांना भाजपाने इथून पुन्हा एकदा संधी दिली आहे. आता सलग तिसऱ्यांदा मोठ्या फरकाने विजय मिळवून विजयाची हॅटट्रिक करण्याच्या इराद्याने गडकरी प्रचारात उतरले आहेत. विरोधी पक्षांकडून गडकरींच्या विरोधातील उमेदवारांची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. मात्र नागपूर लोकसभा मतदारसंघात पहिल्याच टप्प्यात मतदान होणार असल्याने गडकरी आणि भाजपा पूर्ण ताकदीनिशी तयारीला लागले आहेत. नागपूर लोकसभा मतदारसंघातील सध्याची राजकीय परिस्थिती आणि समिकरणं पाहता मागच्या दोन्ही निवडणुकांप्रमाणेच यावेळीही नितीन गडकरी दणदणीत विजय मिळवतील, अशी परिस्थिती नागपूर लोकसभा मतदारसंघामध्ये आहे. नागपूरमधून नितीन गडकरींचा विजय होण्याची शक्यता अधिक असल्याचं बोललं जातंय, त्यासाठी काही प्रमुख कारणंही सांगितली जाताहेत, त्यातील प्रमुख पाच कारणं पुढील प्रमाणे आहेत. त्यावरच आज आपण प्रकाश टाकणार आहोत.

(Nagpur Loksabha Election 2024 | Nitin Gadkari)

नितीन गडकरी यांच्या राजकीय प्रवासाबाबत बोलायचं झाल्यास त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेमधून झाली होती. पुढे ते १९८९, १९९० आणि १९९६ मध्ये नागपूरमधील पदवीधर मतदारसंघातून निवडून आले. २००२ मध्ये त्यांची बिनविरोध निवड झाली होती. यादरम्यान १९९५ मध्ये सत्तेवर आलेल्या युती सरकारच्या काळात नितीन गडकरी यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून केलेल्या कामाचं कौतुक झालं होतं. पुढे २००९ मध्ये दिल्लीतील बदललेल्या समिकरणांमुळे त्यांची भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली. मात्र काही कारणांमुळे त्यांना पक्षाचं अध्यक्षपद सोडावं लागलं होतं. पण दिल्लीच्या राजकारणात स्थिरावलेल्या गडकरींनी मागे वळून पाहिलं नाही. २०१४ मध्ये त्यांनी पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवली आणि ते खासदार झाले. त्यावेळी त्यांनी विलाास मुत्तेमवार या काँग्रेसच्या दिग्गज नेत्याला पराभवाचं पाणी पाजलं होतं. तर २०१९ मध्ये गडकरींनी नाना पटोलेंचा पराभव केला होता. आता सलग तिसऱ्यांदा नितीन गडकरी यांचा विजय निश्चित मानला जातोय. त्याचं पहिलं कारण म्हणजे नितीन गडकरी यांची कार्यपद्धती. स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध असलेले नितीन गडकरी हे त्यांच्या धडाकेबाज कामासाठीही ओळखले जातात. राज्यातील युती सरकारच्या काळात गडकरी यांनी महाराष्ट्रात सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून आपल्या कामाची छाप पाडली होती. तर २०१४ साली त्यांच्याकडे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. ही जबाबदारी सक्षमपणे पार पाडताना नितीन गडकरी यांनी नागपूरसह देशपातळीवर आपल्या कार्यक्षमतेची छाप पाडली. नागपूर मेट्रोचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प गडकरींच्याच खासदारकीच्या कार्यकाळात पूर्णत्वास आलाय. मोदी सरकारमधील काही मोजक्या कार्यक्षम मंत्र्यांमध्ये गडकरींची गणना होते. त्यांच्या कामाचा झपाटा मोठा आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत ही बाब गडकरींना फायदेशीर ठरणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीची लढाई नितीन गडकरी यांच्यासाठी सोपी असण्याचं दुसरं कारण म्हणजे नितीन गडकरी यांची असलेली लोकप्रियता. नितीन गडकरी यांनी केंद्रातील राजकारण करताना नागपूर या आपल्या मतदारसंघाकडे कधीही दुर्लक्ष केलेलं नाही. केंद्रात महत्त्वाचं खातं सांभाळत असताना गडकरी हे आठवड्यातून दोन दिवस आपल्या मतदारसंघासाठी राखून ठेवत असतात.

(Nagpur Loksabha Election 2024 | Nitin Gadkari)

या काळात ते सर्वसामान्य नागरिक, कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या भेटीगाठी घेतात. जनता दरबार आणि विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मतदारसंघातील जनतेच्या संपर्कात राहतात. त्यामुळे त्यांचा मतदारांशी थेट संपर्क आहे. खरंतर नागपूर मतदारसंघाची रचना ही गडकरी आणि भाजपाच्या राजकारणाच्या पूर्णपणे विरुद्ध अशी आहे. मात्र असं असलं तरी गडकरी यांनी येथून कमालीची लोकप्रियता मिळवलेली आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघामध्ये मागासवर्गीय आणि बहुजन मतदारांची संख्या लक्षणीय आहे. मात्र नितीन गडकरी यांनी जातीपातीची समिकरणं मोडून मतदारसंघावर आपली पकड पक्की केली आहे.यंदाची नागपूर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक नितीन गडकरी यांना सोपी असण्याचं तिसरं कारण म्हणजे येथील संभाव्य उमेदवाराबाबत महाविकास आघाडीकडून घालण्यात आलेला गोंधळ हे होय. भाजपाच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत नितीन गडकरी यांचं नाव नव्हतं. या मुद्द्यावरून ठाकरे गटासह विरोधी पक्षांनी भाजपाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. गडकरी हे अंतरगतपणे नरेंद्र मोदी यांच्या विरोधात मतं मांडत असल्याने त्यांना उमेदवारी नाकारली जाईल, असेही दावे केले गेले. उद्धव ठाकरेंनी तर नितीन गडकरी यांना महाविकास आघाडीमधून लढण्याची ऑफर दिली. मात्र हीच ऑफर आता महाविकास आघाडी आणि काँग्रेससाठी अडचणीची ठरत आहे. त्याचं कारण म्हणजे गडकरी हे चांगले उमेदवार असल्याने आता त्यांची विरोधकांनीही पाठिंबा देऊन त्यांना बिनविरोध निवडून द्यावं, अशी मागणी गडकरींचे समर्थक करत आहेत. नितीन गडकरी यांनीही या ऑफरवरून महाविकास आघाडीला टोला लगावलेला आहे. आता प्रत्यक्ष प्रचारामध्येही हा मुद्दा गडकरींच्या विरोधकांसाठी अडचणीचा ठरू शकतो. तर गडकरींविरोधात कुणाला उमेदवारी द्यावी यावरून काँग्रेसमध्ये गोंधळ निर्माण झालाय, ही बाब नितीन गडकरी यांच्या पथ्यावर पडणारी आहे. सलग दोन वेळा विजयी झालेल्या नितीन गडकरींसाठी नागपूरची लढाई सोपी असण्याचं चौथं कारण म्हणजे, या लोकसभा मतदारसंघामध्ये असलेली भाजपाची ताकद हे होय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं केंद्र असलेल्या नागपूरमध्ये भाजपाला आपलं वर्चस्व कधीच निर्माण करता आलं नव्हतं. स्थानिक पातळीवर नागपूरची महानगरपालिका भाजपाच्या ताब्यात होती. मात्र २०१४ मध्ये नितीन गडकरी यांनी येथून मोठ्या मताधिक्याने विजय मिळवल्यानंतर भाजपाची इथली ताकद लक्षणीयरीत्या वाढली.

(Nagpur Loksabha Election 2024 | Nitin Gadkari)

सध्या या लोकसभा मतदारसंघातील सहा पैकी चार मतदारसंघात भाजपाचे आमदार आहेत. त्यापैकी नागपूर दक्षिण पश्चिममधून देवेंद्र फडणवीस हे मोठ्या मताधिक्याने विजयी होत असतात. मागच्या लोकसभा निवडणुकीत या सहापैकी पाच मतदारसंघांमधून नितीन गडकरी यांना दणदणीत आघाडी मिळाली होती. केवळ नागपूर उत्तर येथून गडकरी ९ हजार मतांनी पिछाडीवर पडले होते. मात्र उर्वरित ठिकाणांहून त्यांना लक्षणीय आघाडी मिळाली होती. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे नितीन गडकरी हे संघ परिवाराच्या जवळचे नेते आहेत. तसेच नागपूर हे संघाचे मुख्य केंद्र आहे. त्यामुळे नितीन गडकरींना विजयी करण्यासाठी संघाचे स्वयंसेवकही दक्ष असतील, ही बाबही नितीन गडकरी यांना फायदेशीर ठरणारी आहे. नागपूरमध्ये नितीन गडकरी यांच्या विजयाचं कारण ठरू शकणारी पाचवी बाब म्हणजे नरेंद्र मोदी. नितीन गडकरी आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये मतभेद असल्याच्या चर्चा वारंवार समोर येत असतात. मात्र या दोन्ही नेत्यांनी उघडपणे एकमेकांविरोधात कधीही काहीही बोललेलं नाही. नितीन गडकरी यांच्या विजयात नरेंद्र मोदींची भूमिकाही महत्त्वाची ठरण्याचं कारण म्हणजे लोकसभा निवडणुकीत केंद्रातील सरकार निवडण्यासाठी मतदान होत असतं. त्यामुळे नरेंद्र मोदींना मानणारा मतदार हा इतर निवडणुकांपेक्षा लोकसभा निवडणुकीत भाजपाला अधिक मतदान करत असतो. नागापूरमध्येही मोदींना मानणारा मतदार मोठ्या प्रमाणावर आहे. तो लोकसभा निवडणुकीत गडकरींच्या मागे उभा राहील, हे वेगळं सांगायला नको, त्यामुळे अशा परिस्थितीत नितीन गडकरी यांच्यासाठी विजय हा सोपा ठरू शकतो.आता नागपूरमध्ये नितीन गडकरी हे सलग तिसऱ्यांदा बाजी मारून विजयाची हॅटट्रिक करणार का? विजय मिळाल्यास गडकरींना किती मताधिक्य मिळणार? की काँग्रेस आपल्या एकेकाळच्या बालेकिल्ल्यात गडकरींना धक्का देणार? याबाबत तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा.

(Nagpur Loksabha Election 2024 | Nitin Gadkari)

हे विषयच भारी वाचलेस का भावा !

8 ठरले पण एकनाथ शिंदे यांच्या या ५ खासदारांचं तिकीट कापलं गेलंय का ? | Loksabha Election 2024 News|Eknath Shindeजातीचं हे गणित जुळलं तरच Praniti Shinde सोलापूरच्या खासदार होतील ? | Solapur Loksabha Election 2024|Vishaych Bhariनितेश कराळे शरद पवार गटाकडून वर्ध्याचे पुढील खासदार होतील का ? | Nitesh Karale | Vishaych Bhariया ५ जागांवर भाजपच्या रागापोटी शिंदेचे नेते ठाकरेंना मदत करतील ? | Loksabha Election 2024 News| Vishaych Bhari

या ५ कारणांमुळे नितीन गडकरी नागपूरात पडूच शकत नाहीत | Nagpur Loksabha Election 2024 | Nitin Gadkari

Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇

https://www.facebook.com/vishaychbhari

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ajit pawar liveajit pawar news livebreaking newssharad pawarsharad pawar on ajit pawarvishay bharivishaych bharivishaychbhariविषय भारी
Comments (0)
Add Comment