बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी वयाच्या 58 व्या वर्षी आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक बातमी समोर आलीये. रायगडच्या कर्जत येथील त्यांनी स्वतः उभ्या केलेल्या एन. डी. स्टुडिओत त्यांचा मृतदेह आढळून आला असून त्यांच्या निधनानं सध्या मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरलेलीय. हे नितीन चंद्रकांत देसाई तेच ज्यांनी देवदास, लगान, जोधा अकबर, हम दिल दे चुके सनम, मिशन काश्मीर, प्रेम रतन धन पायो, झपाटलेला 2, हरिश्चंद्राची फॅक्टरी, बालगंधर्व यांसारख्या कित्येक सिनेमांसाठी आणि तमस, मृगनयनी, राजा शिवछत्रपती मालिका अशा अनेक सिरीयल्ससाठी सेट्स डिजाईन केले होते. एवढचं काय लालबागच्या राजाचा मंडप, देखावा, अनेक राजकीय संभाचे सेट्स, जागतिक दर्जाचे सांस्कृतिक सोहळ्यांचे सेट्स असं बरंच काम त्यांनी केलंय. त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं, सगळं सविस्तर पाहूयात….
( Nitin Desai Death News | Vishaych Bhari )
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक Nitin Desai यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून स्वतःच जीवन संपवलं. त्यांच्या कर्जत येथील एन. डी. स्टुडिओमध्येच त्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलंय. त्यांच्यावर मृत्यूपूर्वी तब्बल २४९ कोटींचं कर्ज होतं अशी माहिती आता समोर आलीय. दरम्यान नितीन देसाई यांनी एन डी स्टुडिओसंबंधित काही कामांसाठी सीएफएम या वित्तीय संस्थेकडून १८० कोटी रुपयांचे कर्ज घेतलं होतं. २०१६ आणि २०१८ या दोन वर्षांत त्या कर्जाचा करारनामा झाला होता. त्यासाठी देसाई यांनी तीन वेगवेगळ्या अशा चाळीस एकरच्या मालमत्ता तारण ठेवल्या होत्या. काही कालावधीनंतर सीएफएम या वित्तीय संस्थेने आपल्याकडील सर्व कर्ज खाती एडलवाइस ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीकडे सोपवली. परंतु कर्जाची वसुली होत नव्हती. त्यामुळे सुरुवातीला १८० कोटींवर असणारी कर्जाची रक्कम व्याजासह २४९ कोटींच्या आसपास पोहोचली. त्यामुळे देसाई हे आर्थिक संकटात सापडले होते. ठराविक मुदतीसाठी घेतलेले कर्ज न फेडल्यामुळे नितीन देसाई यांच्या कर्जत चौक येथील एन. डी. स्टुडिओवर जप्तीच्या कारवाईचे संकट ओढावले होते. कलिना येथील एडलवाईस एसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीने एन. डी. स्टुडिओच्या जप्तीसाठी रायगडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात अर्जही केला होता. पण जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जप्तीच्या कारवाईला अंतिम मंजूरी दिली गेली नव्हती. रायगडचे निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी एन. डी. स्टुडिओच्या जप्तीसंदर्भात अर्ज कार्यालयाकडे आला असल्याचे सांगितलय. खालापूरचे आमदार महेश बालदी यांच्याकडे काही दिवसांपूर्वीच देसाई यांनी त्या संदर्भातील चर्चा केल्याचं बालदी यांनी माध्यमाना सांगितलं.
दरम्यान आज सकाळी एक सफाई कर्मचारी त्यांच्या खोलीत साफसफाईसाठी गेले असताना दिग्दर्शक नितीन देसाई यांनी स्वतःला संपवलं असल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्याने मग तातडीनं ही गोष्ट पोलीसांना कळवली. त्यानंतर कर्जत आणि खालापूर येथील पोलीस तातडीने घटनास्थळी हजर झाले. पोलीसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवलाय. दरम्यान त्या घटनेचे सर्व पैलू तपासून पाहत असल्याचे पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी माध्यमाना सांगितलंय. आता आपण नितीन चंद्रकांत देसाई यांच्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊ. त्यांचा जन्म दापोली येथे झाला होता. देसाई यांनी त्यांचं शालेय शिक्षण वामनराव मुरंजन हायस्कूल, मुलुंड येथील मराठी माध्यमाच्या शाळेतून केलं होतं. पुढं मुंबईच्या जेजे स्कूल ऑफ आर्ट आणि एलएस रहेजा स्कूल ऑफ आर्ट्समध्ये त्यांनी फोटोग्राफीचं शिक्षण घेतलं. त्यानंतर पहिल्यांदा ते 1987 साली मुंबईच्या फिल्मसिटी स्टुडिओमध्ये गेले आणि लगेचच स्टिल फोटोग्राफीच्या 2-डी फॉरमॅटमधून कला दिग्दर्शनाच्या 3-डी विश्वाकडे वळाले. तेव्हा गोविंद निहलानी दिग्दर्शित तमस या टीव्ही मालिकेसाठी त्यांनी असिस्टंट कला दिग्दर्शक म्हणून नितीश रॉय यांच्यासोबत काम केलं. ते त्यांचं इंडस्ट्रीतलं पहिलं काम. त्यानंतर त्यांनी टीव्ही मालिका कबीर, चाणक्य या मालिकेत पहिल्या २५ भागांसाठी साडेपाच वर्षे असिस्टंट म्हणूनचं काम केलं आणि नंतर २६ व्या भागापासून त्यांना स्वतंत्रपणे काम करण्यास दिलं गेलं. दरम्यानच्या काळात नितीन देसाई हे अमोल पालेकर यांच्या संपर्कात आले आणि पालेकरांनी त्यांना त्यांच्या आयुष्यातलं पहिला इंडिपेंडंट प्रोजेक्ट दिला. मृगनयनी या पालेकरांच्या सुपरहिट सिरीयलसाठी कला दिग्दर्शन करण्याची संधी नितीन देसाई यांना मिळाली. तेव्हा नितीन देसाई अमोल पालेकरांना म्हणाले होते, अमोल दादा मी तुमचे हे ऋण आयुष्यात कधीच विसरणार नाही. तुम्ही मला स्वतःच्या पायावर उभं राहण्याची संधी दिली. पुढं अमोल पालेकरांच्या अनाहत सिनेमाचं कला दिग्दर्शन ही नितीन देसाई यांनीचं केलं होतं.
( Nitin Desai Death News | Vishaych Bhari )
नितीन देसाई यांना त्यांच्या कामासाठीचा पहिला पुरस्कार देण्यात येत होता तेव्हा त्यांनी तो पुरस्कार मला अमोल पालेकरांच्या हातून देण्यात यावा अशी इच्छा व्यक्त केली होती. तसं तर 1993 साली आलेल्या अधिकारी ब्रदर्सचा भूकॅम्प सिनेमापासून त्यांच्या आर्ट डिरेक्शनआ सुरुवात झाली होती पण त्यावेळी त्यांच्या कामाची कुणी दखल घेतली नव्हती. मात्र 1994 मध्ये आलेल्या विधू विनोद चोप्राच्या 1942: अ लव्ह स्टोरी सिनेमामुळं नितीन देसाई यांचं दर्जेदार काम सर्वापर्यंत पोहोचलं. त्यानंतर मग देसाई यांनी आजिबात मागं वळून पाहिलं नाही.
कितीही अवघड आणि अशक्य वाटणारं काम असो, कथेची गरज लक्षात घेऊन इनडोअर असो वा आउटडोअर डोळे दिपवून टाकणारे सेट्स उभे करण्यात नितीन देसाई यांचा हातखंडा होता. त्यांनी केलेल्या सिनेमांची नावं ऐकून तुम्हाला त्याचा अंदाज येईलच. पुढच्या काळात त्यांनी त्यांच्या कारकिर्दित परिंदा, खामोशी, माचीस, बादशाह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मेला, राजू चाचा, लगान, स्वदेस, जोश, जोधा-अकबर, देवदास, प्रेम रतन धन पायो, हम दिल दे चुके सनम, मुन्नाभाई MBBS, लगे रहो मुन्नाभाई, मंगल पांडे, दि लीजेंड ऑफ भगत सिंग, गॉड तुस्सी ग्रेट हो, जेल, पानिपत, अशा अनेक सुपरहिट सिनेमांसाठी आर्टस् डिरेक्शन केलं. हे तर काहीच नाही सलाम बॉम्बे, जंगल बुक, कामसूत्र, स्लमडॉग मिलेनियरचे दोन सेट्स, कॅनेडियन चित्रपट सुच अ लाँग जर्नी आणि होली स्मोक, फ्रेंच सिनेमा अमोक यांसारख्या इंटरनॅशनल सिनेमांसाठी ही त्यांनी आर्ट डिरेक्शनचं काम केलंय. खऱ्या अर्थानं मराठी माणूस ठरवलं तर जग जिंकू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे नितीन चंद्रकांत देसाई. त्यांनी हिंदीत प्रामुख्यानं आशुतोष गोवारीकर, संजय लीला भंसाली, विधु विनोद चोपड़ा, राजकुमार हिरानी यांच्यासोबत ही काम केलं होतं.
2005 साली त्यांनी मोठी झेप घेतली. त्यांनी रायगडच्या कर्जतमध्ये तब्बल 52 एकरात स्वतःच्या मालकीचा एनडी स्टुडिओ उभारला. त्या स्टुडिओचा नंतर 50 टक्के हिस्सा रिलायन्स एंटरटेनमेंटने सुमारे 1.50 अब्ज रुपयांना विकत घेतल्याचं बोललं जातंय. दरम्यान 2008 पासून ते सिरीयल निर्मिती क्षेत्रात उतरले होते. अमोल कोल्हेना घेऊन त्यांनीचं 2008 साली राजा शिवछत्रपती मालिकेची निर्मिती केली होती. त्या मालिकेचे सेट्स सुद्धा स्वतः त्यांनीच डिजाईन केलेले होते. तेव्हा ती मालिका सुपर डुपर हिट झाली होती. पुढं 2011 मध्ये त्यांनी मराठीत बालगंधर्व या बायोपिक चित्रपटाची निर्मिती केली. त्यात सुबोध भावे मुख्य अभिनेता तर रवी जाधव दिग्दर्शक होता. दरम्यान त्याचं काळात त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून टॅलेंट शोधून झी मराठीवर मराठी पाऊल पडते पुढे या रिऍलिटी टीव्ही शोची निर्मितीही केली. ती संकल्पना अमेरिकेन गॉट टॅलेंट शोवर आधारित होती. त्यांनी चित्तोर की रानी पद्मिनी का जौहर, ताजमहाल, बाजी राव मस्तानी यांसारख्या आणखी काही ऐतहासिक मालिकांची निर्मिती केली. २०११ मध्ये त्यांनी गजेंद्र अहिरे दिग्दर्शित हॅलो जय हिंद या मराठी चित्रपटात मुख्य अभिनेता म्हणून पदार्पण केलं. त्यात त्यांनी केलेल्या हवालदाराची भूमिका ही लोकांना खूप आवडली होती. आतापर्यंत नितीन देसाई यांना सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनाचे चार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळालेत अन ते सुद्धा पिरियड फिल्म्ससाठी.
( Nitin Desai Death News | Vishaych Bhari )
एक सुप्रसिद्ध भारतीय कला दिग्दर्शक, प्रॉडक्शन डिझायनर, निर्माता, अभिनेता, स्टुडिओचे मालक अशी त्यांची कारकिर्द म्हणूनच खूप वाखाणण्याजोगीय. बरं देसाई यांनी फक्त फिल्म्स नाय तर काही सांस्कृतिक महोत्सव, राजकीय सभा आणि धार्मिक उत्सवांचे ही भव्य दिव्य सेट्स डिजाईन केले होते. अगदीचं सांगायचं झालं तर 2008 पासून आतापर्यंत कंटिन्यू लालबागच्या राजाचा मंडप, प्रवेशद्वार आणि देखाव्याचं काम नितीन देसाई यांच्या कल्पनेतूनचं साकारलं जात होतं. ही माहिती खुद्द लालबाग ट्रस्टचे सरचिटणीस सुधीर दळवी यांनी माध्यमाना दिली त्यांच्या देखाव्यामुळं लालबागच्या राजाला पाहण्यासाठी लोकं गर्दी करायचे. 2016 साली तर चक्क दिल्लीत एका शासकीय सांस्कृतिक शो साठी त्यांनी अवाढव्य सेट डिजाईन केला होता. बरं 2019 मध्ये जेव्हा महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शिवाजी पार्कवर शपथविधी कार्यक्रम ठरला तेव्हा फक्त 20 तासात नितीन देसाई यांनी त्या शपथविधी कार्यक्रमाचा सेट उभा केला होता. ते सुद्धा 70000 लोकांनी व्यवस्थित बसता येईल असा. त्यांच्या जाण्यामुळं मराठी आणि हिंदी सिनेमा सृष्टीची कधीही भरून न येणारी झीज झालीये. त्यांच्यासाठी अनेक कलाकारांनी आपलं मन मोकळं केलं.
महेश कोठारे म्हणाले,
नितीन माझा खास दोस्त होता. तो एकदम जॉली माणूस होता. जे मनात असेल ते बोलून टाकायचा. असं काही करेल असं कधी वाटलं नाही. त्यांनी मला त्याच्या मुलीच्या लग्नाला ही बोलावलं होतं. त्यानेचं माझ्या झपाटलेला 2 सिनेमाच प्रोडक्शन डिजाईन केलं होतं. त्याच्या एन डी स्टुडिओमध्ये.
पुढं महेश मांजरेकर म्हणाले,
बातमी ऐकून मला धक्का बसला, मला काय बोलाव कळत नाहीये. मला वाटतंय लोकांनी एकमेकांशी किमान फोनवर का होईना मनातलं बोललं पाहिजे.
त्यांच्यानंतर सुप्रसिद्ध फत्तेशिकस्त, फर्जंद, पावनखिंड सिनेमाचे दिग्दर्शक दिगपाल लांजेकर म्हणाले,
जे घडलं ते अतिशय दुःखद आहे. नितीन दादा आमच्यासाठी मार्गदर्शक होते. माझ्या शिवराज अष्टक प्रोजेक्ट मध्ये त्यांचा खूप मोठा सहयोग आम्हाला लाभला.
दरम्यान नितीन देसाई यांचे खास मित्र अशोक पंडित म्हणाले,
जे कोणालाही अशक्य वाटायचं तसे कल्पनेपलीकडचे सेट नितीन डिजाईन करायचा. त्याच्याइतका टॅलेंटेड आर्ट डायरेक्टर मी माझ्या उभ्या आयुष्यात पाहिला नाही
अमोल पालेकरांनी ही आपल्या भावनाना वाट मोकळी करून दिली. ते म्हणाले,
जे ऐकलं ते धक्कादायक आहे. खूप दुःखद बातमी. नितीन खूप गुणी कलावंत होता. माझ्यासोबत त्याने इंडिपेंडट काम सुरू केलं. त्याचे राजकीय संबंध ही खूप तगडे होते. पण असं कोणतं प्रेशर त्यांच्यावर आलं काय माहीत नाही की त्याने हे टोकाच पाऊल उचललं.
दरम्यान देसाईच्या सिनेमाचे हिरो सुबोध भावे म्हणाले
नितीन होता म्हणून बालगंधर्व सिनेमा झाला. त्याने केवळ चार महिन्यात आख्ख्या सिनेमाचा भला मोठा सेट उभा केला होता.
तर दिग्दर्शक रवी जाधव म्हणाले
बातमी ऐकून मी शॉक आहे. नितीन दादा मोठी स्वप्न पाहणारा माणूस होता. आम्ही त्याला पाहून शिकलो.
दरम्यान त्या प्रकरणी नितीन देसाई यांचे मित्र आमदर महेश बालदी म्हणाले,
मागच्या बऱ्याच काळापासून त्याच्या स्टुडिओचा खर्च निघत नव्हता. त्याचे इंडस्ट्रीतल्या काही प्रमुख कलाकारांसोबत वाद झाले होते. म्हणून त्यांनी त्यांनी एन डी स्टुडिओ मध्ये येणं बंद केलं अशा चर्चा कानी आल्या होत्या. त्याने स्वतः माझ्याशी याबद्दल चर्चा केली होती.
( Nitin Desai Death News | Vishaych Bhari )
जीवन संपवण्यापूर्वी नितीन देसाई यांनी व्हॉईस नोट रेकॉर्ड केल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. काल रात्री उशिरा ते दिल्लीहून मुंबईला विमानाने आले, त्यानंतर रेकॉर्ड केलेल्या व्हॉईस क्लीपमध्ये त्यांनी काही बिझनेसमनची नावं असल्याचं म्हटलं जातय. दरम्यान आता कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी जीवनयात्रा संपवली की त्यामागे आणखी काही वास्तव दडलंय याचा शोध पोलीस घेत आहेत. बाकी संबंधित प्रकरणावर तुमच मतं नेमकं काय त्ये आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.
Nitin Desai यांना कोणाच्या दबावामुळे आयुष्य संपवावं लागलं | Nitin Desai Death News | Vishaych Bhari
Leave a Reply Cancel reply