लंपट किंवा बाईलवेडा नाय, निळू फुले खऱ्या आयुष्यात लय सच्चा माणूस होता | Nilu Phule Biography |Vishaych Bhari | Nilu Phule


अंगात पुढाऱ्यासारखा खादीचा सदरा, त्यावर जॅकेट अन धोतर, डोक्याला तिरकी ठेवलेली गांधी टोपी, पायात कराकरा वाजणाऱ्या इचवाच्या कोल्हापूरी चपला, चेहऱ्यावर जातिवंत पाटलासारखा माजोरडेपणा अन बेरकी नजर, तशी त्यांची एवढी ओळख पुरेशीय. आता आपण नेमकं कुणाबद्दल बोलतोय याचा तुम्हाला अंदाज आलाचं असेल. अभिनयाचं चालतं बोलतं विद्यापीठ. अभिनेते निळू भाऊ फुले. मंडळी निळू भाऊंनी नाटकापासून मोठ्या पडद्यापर्यंत जे काही अफाट काम करून ठेवलंय त्याला तोड नाय. उगाचं नाय हिंदीतले अमरीश पुरी, जितेंद्र, बोमन इराणी सारखे मुरलेले कलाकार सुद्धा आम्ही निळू भाऊंकडून acting शिकलो असं म्हणतात. निळू भाऊंनी साकारलेल्या भूमिकांपैकी निष्ठावंत पत्रकार, माजोरडा – रंगील पाटील, धूर्त – मुरब्बी राजकारणी, पिचलेला शेतकरी, स्वतःच्या मुलाला हातानं गोळी घालणारा न्यायवादी बाप ह्या सगळ्याचं भूमिका कायमच्या अजरामर झाल्या. मंडळी निळू भाऊ फक्त आणि फक्त त्यांच्या तगड्या अभिनयाच्या जोरावर लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले होते. त्यांनी सिनेमात सपोर्टिव्ह विनोदी कॅरक्टरपासून लोकांच्या काळजात धडकी भरवणाऱ्या खलनायकापर्यंत सगळे अफाट रोल केले. पण बऱ्याच जणांनी त्यांना फक्त बाई वाड्यावर चला म्हणणारा स्त्रीलंपट व्हीलन म्हणूनचं डोक्यात ठेवलं. पण मंडळी खऱ्या आयुष्यात निळू भाऊंची इमेज खूप वेगळी होती. त्यांना लोकांना मदत करणं खूप आवडायचं. त्यांच्या सामाजिक कामांची लिस्ट खूप मोठीय. उगाच नाय सातारकरांनी NH4 हायवेवर निळू भाऊंचा बॅनर लावून त्यावर मोठ्या मनाचा माणूस असं लिहून मानवंदना दिली. असो, आजच्या या Blog मध्ये आपण त्याचं निळू भाऊंच्या आयुष्याची काही सुवर्णपानं उलगडून पाहणारय,

(Nilu Phule Biography |Vishaych Bhari | Nilu Phule)


मंडळी आपल्या लोकांना सिनेमातल्या नायकांची भुरळ पडणं साहजिकय पण निळू भाऊ एकमेव असे व्हीलन होते ज्यांनी लोकांना त्यांच्या खलनायकी भूमिकेवर ही प्रेम करायला भाग पाडलं. त्यांची भूमिका इतकी अस्सल दर्जाची असायची की ते कधी रस्त्यानं चालताना दिसले तर बायका चक्क त्यांच्याकडं पाहून कडाकडा बोटं मोडायच्या. पदरानं अंग झाकून घ्यायच्या. अन सिनेमा पाहताना तर शिव्याशाप देऊन त्यांच्या आख्ख्या खानदानाचा उद्धार करायच्या. पण खरं तर ती एका हुन्नरी कलाकाराच्या कलेला मिळालेली सर्वोत्तम दादचं होती. इतकी भयाण ताकद होती निळू भाऊंच्या अभिनयात. असो, तर मंडळी अशा या निळू भाऊंचा जन्म ४ एप्रिल १९३० मध्ये पुण्यात झाला. त्यांचं पूर्ण नाव निळकंठ कृष्णाजी फुले. त्यांच्या जन्माच्या वेळी भारत पारतंत्र्यात असल्यामुळं एकूणच संपूर्ण भारताची आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली होती. दरम्यान निळू भाऊंचे वडील त्याकाळी भाजीपाला विकून आपलं कुटुंब चालवायचे. पण तशा परिस्थितीत सुद्धा त्यांनी निळूभाऊंना मॅट्रिक पर्यंत शिक्षण घ्यायलाचं लावलं. वडिलांची निळू भाऊंना अजून पुढं शिकवण्याची इच्छा होती पण घरची परिस्थिती पाहून स्वतः निळू भाऊंनीचं पुण्यात एका लष्करी महाविद्यालयात माळीकाम करायला सुरू केलं. आता माळीकामचं का तर अगदी लहान वयापासून निळू भाऊंना झाडांबद्दल खूप प्रेम होतं. त्यामुळं माळीकामात त्यांचं मन रमलं आणि काही काळानं त्यांनी स्वतःची नर्सरी उघडण्याचं स्वप्न पाहिलं. पण घरच्या जबाबदाऱ्या आणि हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळं त्यांचं ते स्वप्न पूर्ण झालं नाही. पुढं एका मित्राच्या सांगण्यावरून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जाऊ लागले. त्यांच्यासोबत त्यांचे वेगवेगळ्या जातीधर्माचे मित्र ही जाऊ लागले. पण काही दिवसांनी तुमचे ख्रिश्चन-मुस्लिम मित्र इथं आणू नका असं त्यांना सांगण्यात आलं आणि मग निळू भाऊंनी आपल्या मित्रांना जर प्रवेश मिळत नसेल तर आपण तरी का जायचं असं म्हणून संघाच्या शाखेत जाण बंद केलं. त्याच दरम्यान आप्पा मायदेव आणि लालजी कुलकर्णी हे राष्ट्र सेवा दलाची शाखा सुरू करण्याच्या प्रयत्नात होते. तेंव्हा त्यांनी सेवा दलाच्या शाखेत सर्व जातीधर्मातल्या मुलांना मुक्त प्रवेश आहे असं जाहीर केलं. ते समजल्यावर निळूभाऊ आपल्या मित्रांसोबत राष्ट्र सेवादलात जाऊ लागले. त्यावेळी त्यांना अशी जाणीव झाली की संघात जसा भेदभाव होतो तसा भेदभाव सेवादलात होत नाही. तो फरक त्यांच्या युवा मनावर खोलवर रुजला गेला आणि तेव्हापासून ते राष्ट्रसेवा दलात सक्रिय झाले. ज्यावेळी त्यांना महिन्याला अवघा 80 रुपये पगार मिळायचा तेव्हा ते त्यातले दहा रुपये राष्ट्रसेवा दलाला द्यायचे. तेव्हापासून निळू भाऊंमध्ये सामाजिक जाणीव जागृत व्हायला लागली होती. मंडळी तसं पाहिलं तर निळू भाऊंचा मोठा भाऊ भारताचा स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय पद्धतीने सामील होता. त्यामुळं राष्ट्रप्रेमाचे संस्कार घरातूनचं त्यांना मिळालेले होते. दरम्यान निळू भाऊ सुद्धा लहान वयात छोट्या मोठ्या प्रभात काढून सत्याग्रहाच्या मिरवणुकीत सहभागी व्हायचे.

(Nilu Phule Biography |Vishaych Bhari | Nilu Phule)


एकदा तर त्यासाठी त्यांनी संपूर्ण दिवसभर तुरुंगवास ही भोगला. पुढं 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू झाली आणि निळू भाऊंनी त्या चळवळीत सक्रिय सहभाग नोंदवला. त्याचंकाळात वैचारिक बैठक पक्की झालेल्या निळू भाऊंनी सेवा दलासाठी ” येड्या गबाळ्याचं काम नाही ” हे वगनाट्य लिहिलं. त्या वगनाट्यानं निळू भाऊंच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. त्या वगनाट्याला लोकांकडून मिळणार प्रेम पाहून निळू भाऊ भारावून गेले अन त्यांनी त्याचं क्षेत्रात पुढं काहीतरी करायचं ठरवलं. दरम्यान त्यानंतर त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. सुरुवातीच्या काळात त्यांनी राष्ट्रसेवा दलाच्या कलापथकात काम केलं. त्यातून हळूहळू इतर नाटकांमध्ये देखील ते छोट्या मोठ्या भूमिका करू लागले. त्यांना वाचनाची आवड होतीच त्यामुळं अधिकाधिक दर्जेदार साहित्य त्यांच्या वाचनात येऊ लागलं. त्याकाळी निळूभाऊंवर रवींद्रनाथ टागोरांच्या दर्जेदार लिखाणाचा प्रभाव जास्त होता. त्यातूनच प्रेरणा घेऊन त्यांनी उद्यान हे नाटक लिहिलं. त्याची सगळ्या कलाक्षेत्रात चर्चा झाली. पुढं मग वसंत बापट, पु ल देशपांडे यांच्यासारख्या दिग्गजांशी त्यांचा संपर्क आला. त्यांच्यातल्या अभिनयाची ओढ पु ल देशपांडे यांनी ओळखली अन त्यांनी त्यांच्या पुढारी पाहिजे या नाटकात निळू भाऊंना रोंगे ही भूमिका ऑफर केली. ती भूमिका निळू भाऊंनी अशी काही रंगवली की सगळीकडून त्यांच्या वर कौतुकाचा वर्षाव होऊ लागला. त्यातूनच मग पुढं त्यांना त्यांचं ” कथा अकलेच्या कांद्याची ‘हे पहिलं व्यावसायिक नाटक ‘मिळालं. ते नाटक महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांनी एवढ डोक्यावर घेतलं की त्याचे दोन हजाराहून जास्त प्रयोग झाले. पुढं निळू फुले यांनी बेबी, रण दोघांचे, सखाराम बाईंडर, सूर्यास्त, पुरुष अशीही अनेक नाटकं केली. त्यापैकी विजय तेंडुलकर लिखित सखाराम बाईंडर या नाटकानं निळू भाऊंना रंगमंचावरील सुपरस्टार बनवलं. दरम्यान सगळीकडं त्यांच्या नावाचा डंका वाजू लागला होता. त्यामुळं त्यांना अनेक सिनेमाच्या ही ऑफर येऊ लागल्या होत्या. त्याआधी १९६८ साली निळूभाऊंनी अनंत माने यांच्या ‘एक गाव बारा भानगडी’ या सिनेमापासून त्यांच्या फिल्मी करिअरचा श्रीगणेशा केला होता. त्यातल्या त्यांच्या झेले अण्णाच्या भूमिकेमुळं सिनेमाला विशेष बहार आलीवती. त्यानंतर एका पाठोपाठ एक सिनेसृष्टीत निळू भाऊंची घोडदौड सुद्धा सुरूचं राहिली.

(Nilu Phule Biography |Vishaych Bhari | Nilu Phule)

सुरवातीच्या काळात काही तमाशाप्रधान सिनेमात काम केल्यानंतर निळू भाऊंनी सामाजिक विषयाकडं आपला मोर्चा वळवला. त्याकाळात त्यांना डॉ जब्बार पटेल, विजय तेंडुलकर यांची मोलाची साथ लाभली. जब्बार पटेलांनी सामना, सिंहासन, जैत रें जैत अशा त्यांच्या लागोपाठ सिनेमात निळू भाऊंना महत्वाचे रोल दिले. त्यांच्या जोडीला श्रीराम लागू, मोहन आगाशे, सतीश दुभाषी, स्मिता पाटील अशी तगडी कलाकार मंडळी होतीचं. मग काय, एका पाठोपाठ एक मास्टरपीस सिनेमे देऊन निळू भाऊ आणि टीमनं मराठी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून सोडलं. त्यापैकी सिंहासनमधला पत्रकार दिगू टिपणीस असो वा सामनामधला हिंदुराव पाटील सगळंच अप्रतिम जमून आलं होतं. सामनामधल्या कावेबाज पाटलाच्या भूमिकेनंतर मराठी सिनेमात पाटील, सावकार किंवा सरपंचाचा रोल करावा तर निळू भाऊंनीचं असं समीकरण तयार झालं होतं. पण त्या सिनेमांमधून निळू भाऊंनी समाज आणि सरकारी व्यवस्थेवर मार्मिकपणे बोट ठेवलं. निळू भाऊंच्या आणखी काही प्रसिद्ध सिनेमांची नावं सांगायची झालीचं तर गांव तसं चांगलं पण वेशीला टांगलं, पिंजरा, हऱ्या नाऱ्या झिंदाबाद, बिनकामाचा नवरा, शापित, भुजंग, प्रतिकार, फटाकडी, दीडशहाणे, भन्नाट भानू, सोंगाड्या, भालू, बन्या बापू, नारंगी मोसंबी, भटक भवानी, हळद रुसली कुंकू हसलं, मुक्काम पोस्ट ढेबेवाडी, पैंजण, गल्ली ते दिल्ली, माझा पति करोडपती, एक होता विदुषक, माल मसाला, बायको असावी अशी, भिंगरी, कळत नकळत, पुत्रवती, चटक चांदणी, लक्ष्मीची पाउले, अजब तुझे सरकार, आघात, आयत्या बिळावर नागोबा, चोरीचा मामला, एक रात्र मंतरलेली, नाव मोठं लक्षण खोटं अशा अनेक चित्रपटातून त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेचं मनोरंजन केलं. पुढं निळू भाऊंनी उतरत्या वयात गोष्ट छोटी डोंगराऐवढी या शेतकऱ्यांची व्यथा मांडणाऱ्या त्यांच्या शेवटच्या पण विद्रोही सिनेमात सुद्धा काम केलं. त्यातला अरविंद जगताप लिखित त्यांच्या तोंडचा एक डायलॉग खूप गाजला होता. म्हणजे जेव्हा कृषीमंत्री म्हणतो की मी तुमच्या शेतकरी मुलानं जीवन संपवलं हे वाईट झालं, आता त्याबदल्यात मी तुम्हाला तातडीनं एक लाख रुपये मदत मिळवून देण्याची तरतूद करतो तेव्हा निळू फुले त्यांच्या थकलेल्या आवाजात म्हणतात की, तुम्ही शेतकऱ्यांना मरायचे एक लाख रुपये देता, कधीतरी त्यांना जगण्यासाठी 10 – 15 हजार रुपये देत चला. सिनेमांतला तो डायलॉग ऐकून रडला नाय असा एकही माणूस तुम्हाला शोधून सापडणार नाय.

(Nilu Phule Biography |Vishaych Bhari | Nilu Phule)


निळू भाऊंनी फक्त मराठी नाय तर हिंदी सिनेमांत त्यांच्या अभिनयाचा नाणं खणखणीत वाजवलं. त्यांच्या हिंदी सिनेमाची नावं सांगायची झालीचं तर औरत तेरी यही कहानी, सुत्रधार, हिरासत, सारांश, कुली, प्रेमप्रतिज्ञा, वो सात दिन, दो लडके दोनो कडके, मशाल, तमाचा, जरासी जिंदगी, नरम गरम, सौ दिन सांस के, कब्जा, मां बेटी, मेरी बिवी की शादी, मोहरे, इन्साफ की आवाज, भयानक, पुर्णसत्य, सर्वसाक्षी, कांच की दीवार, दिशा या चित्रपटातून त्यांच्या अभिनयाची छाप पाडली. पण कुली सिनेमाच्या शूटिंग दरम्यान हिंदीवाल्यांनी त्यांच्याविषयी एक गैरसमज करून घेतला. तो असा की कुलीच्या शूटिंग दरम्यान अमिताभ बच्चन यांना खरीखुरी इजा झाल्यानंतर बराच काळ शूटिंग ठप्प होतं. त्याकाळात निळू भाऊंनी राजकारण गेलं चुलीत या नाटकाकडं त्यांचा फोकस वळवला आणि तालीम पूर्ण झाल्यानंतर नाटकाच्या तारखाही घेतल्या. पण इकडं अमिताभ बरे झाल्यानंतर कुलीच्या टीमनं पुन्हा शूट सुरु केलं. पण निळू भाऊंना नाटकांच्या तारखेमुळं प्रत्येकवेळी टायमिंगवर येऊन शूट करायला जमलं नाही. तेव्हा हिंदी सिनेमावाल्यांनी असा गैरसमज करून घेतला की निळू भाऊंना खूप मान चढलाय. पण खरं तर तसं काहीच नव्हतं. निळू भाऊ मराठी रंगभूमीला दिलेला आपला शब्द पाळत होते. मंडळी निळू भाऊंनी जवळपास 40 वर्ष कलाक्षेत्रात काम केलं. त्यांच्या संपूर्ण कारकीर्दीत त्यांनी 140 हून अधिक मराठी चित्रपट, 12 हिंदी चित्रपट आणि काही सुपरडुपर हिट नाटकं ही केली. रंगभूमीच्या या अविरत सेवेसाठी निळू भाऊंना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय. १९९१ साली तर चक्क राष्ट्रपतींच्या हातून त्यांना संगीत नाटक अकादमी हा पुरस्कार देण्यात आला होता. आणखी सांगायचं म्हणजे महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार, जयंतराव टिळक स्मृती जीवनगौरव पुरस्कारांनी ही त्यांना गौरवण्यात आलंय. पण शेवटच्या काळात या प्रतिभावान अभिनेत्याला खूप वाईट यातना सोसाव्या लागल्या. निळू भाऊंना अन्ननलिकेच्या कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यासाठी त्यांनी अनेक उपचार घेतले. पण शेवटी १३ जुलै २००९ रोजी अंथरुणाला खिळलेल्या निळू भाऊंनी त्यांच्या लाखों करोडो चाहत्यांचा निरोप घेतला. मराठी सिनेसृष्टीनं तिचा सर्वात ताकदीचा खलनायक गमावला. मंडळी स्क्रीनवर बेरकी, स्त्रीलंपट, दुष्ट, पापी, निर्दयी वाटणारे निळू भाऊ खऱ्या आयुष्यात मात्र खूपच अबोल, बुजरे, लाजाळू संवेदनशील असे व्यक्ती होते. त्यांची ही बाजू त्यांच्या जवळची काही लोक सोडली तर कधीच जगासमोर आली नाही.

(Nilu Phule Biography |Vishaych Bhari | Nilu Phule)

हे पण विषय भारी वाच भाऊ

अशीही बनवाबनवी या सिनेमाच्या या ५ गोष्टी कायम आठवणीत राहतील | Ashi hi Banwa Banwi | Vishaych Bhari| Laxmikant Berde

Ashok Saraf, Lakshya ला आठवणीत ठेवलं पण कुलदीप पवारांना आपण साफ विसरलो राव | Kuldeep Pawar Biography

सगळ्यांना पोट धरून हसवणारे Dada Kondke शेवटी एकटे कसे पडत गेले | Dada Kondke Biography in Marathi | Vishaych Bhari

निळू फुले प्रत्येक कलाकाराला मार्गदर्शन करायचे. त्यांनी सिनेमांतून मिळू लागलेल्या पैशानी आपल्या गरजा भागवल्यानंतर उरलेला सगळा पैसा सामाजिक चळवळीसाठी मदत म्हणून दिला. बाबा आढाव, डॉ. नरेंद्र दाभोलकर अशा समाज सुधारकांनी सुरू केलेल्या सामाजिक कृतज्ञता निधीसाठी त्यांनी ‘लग्नाची बेडी’ या नाटकाचे अनेक प्रयोग केले. नाटकाचे प्रयोग झाले की नरेंद्र दाभोलकर, बाबा आढाव यांच्यासोबत जाऊन निळूभाऊ वाडी-वस्त्यावर जाऊन लोकांची भेट घ्यायचे. त्यांच्याशी संवाद साधून जमेल तेवढी मदत करायचे. शेवटच्या काळात त्यांना ती सामाजिक काम करता यावीत म्हणून त्यांनी साताऱ्यातचं निसर्गाच्या सानिध्यात एक घर सुद्धा विकत घेतलं होतं. तर अशा या अत्यंत साध्या मनाच्या, सामाजिक भान असलेल्या, कुठेही विनाकारण आवाज न चढवता आपल्या नैसर्गिक अभिनयानं प्रेक्षकांची मन जिंकून घेणाऱ्या हरहुन्नरी कलाकाराला विषयच भारी टीमचा मानाचा मुजरा. आज त्यांच्या जाण्यामुळं मराठी सिनेसृष्टीत खूप मोठी पोकळी निर्माण झालीय. पण असो, आजपर्यंत निळू भाऊंचा कुठला रोल आणि सिनेमा तुम्हाला सर्वात जास्त आवडला त्ये आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

लंपट किंवा बाईलवेडा नाय, निळू फुले खऱ्या आयुष्यात लय सच्चा माणूस होता | Nilu Phule Biography

Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇

https://www.facebook.com/vishaychbhari

https://www.facebook.com/aplavishaychbhari

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

breaking newsnilu phulenilu phule and ashok saraf comedynilu phule ashok saraf marathi movienilu phule biographynilu phule chala hawa yeu dyanilu phule comedy marathi movienilu phule daughternilu phule dialoguenilu phule dialogue bai vadyavar yanilu phule interviewnilu phule mimicrynilu phule movienilu phule songnilu phule song marathinilu phule statusvishay bharivishaych bharivishaychbhariनिळू फुलेबाई वाड्यावर याविषय भारीविषयच भारी
Comments (0)
Add Comment