जालन्याच्या अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी या गावात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं त्यांच्या हजारो सहकाऱ्यांसह उपोषण सुरु होतं. मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य करून थेट आरक्षण जाहीर करावं, अशी त्यांच्या आंदोलनाची प्रमुख मागणी होती. पण आंदोलन मागे घ्यावं या सरकारच्या भूमिकेनंतर आंदोलनकर्ते आणि पोलीस अधिकाऱ्यांच्यात बाचाबाची झाली. परिणामी अंतरवाली सराटी गावात गोंधळ उडाला आणि पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज करून आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न केला. त्या लाठीचार्जमध्ये कुणाची डोकी फुटली तर कोण गंभीररित्या जखमी झालं. त्या संपूर्ण घटनेनंतर राज्याचं राजकीय वातावरण ढवळून निघालेलं असून विरोधकांकडून मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना टार्गेट करण्यात येतंय. पण आरक्षणाच्या मुद्द्यावरून इतक्या मोठ्या स्वरूपाचं आंदोलन ज्यांनी उभारलं त्ये मराठा संघटनेचे नेते मनोज जरांगे पाटील नेमके कोण आहेत याचीही राज्यभर चर्चा सुरू झालीये. म्हणूनच या व्हिडीओच्या निमित्तानं आपण मनोज जरांगे पाटील यांच्या मागील काळातील काही कार्याची माहीती घेणार आहोत...
मंडळी मनोज जरांगे पाटील ह्ये जालना जिल्यातील मराठा संघटनेचे एक मोठे आणि प्रभावी नेते म्हणून 2016 पासून पुढं आलेले आहेत. म्हणजे 2016 साली जेव्हा कोपर्डीतल्या अत्याचार प्रकरणावरून राज्यातला संतप्त झालेला मराठा समाज एकवटला आणि नंतर मराठा क्रांती मोर्चा किंवा मराठा क्रांती मूक मोर्चा या आंदोलनांना सुरूवात झाली तेव्हापासून जालनामध्ये मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं नेतृत्व करतायत. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवरून त्यांनी वेळोवेळी सरकारविरोधी आवाज उठवलाय. फक्त आवाज नाही तर अनेकदा उपोषणे आणि ठिय्या आंदोलने ही केलेली आहेत. त्यांच्या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या याचं आहेत की मराठा समाजाला शिक्षण, नोकरीमध्ये आरक्षण पाहिजे. त्यासाठी सप्टेंबर 2021 मध्येही मनोज जरांगे यांनी अंबडमध्येचं तीव्र आंदोलन केलं होतं. त्यांच्या म्हणण्यानुसार, मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून ४५ मराठा बांधवांनी आपले बलिदान दिले होते. त्या घटनेला बराच काळ लोटला पण सरकारनं वेळोवेळी मराठा समाजाच्या मागणीकडं दुर्लक्ष केलं. घोषणा करून ही सरकार मदतीच्या बाबतीत मात्र निष्क्रिय राहिलं म्हणून 2021 मध्ये त्यांनी बलिदान देणाऱ्या मराठा समाजातील कुटुंबियांतील सदस्यांना शैक्षणिक पात्रतेनुसार शासकिय नोकरी आणि १० लाख रुपये देण्यात यावेत यासाठी आधी अंबड तहसिलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण केलं. पण तरीही सरकारनं मराठा समाजाचा मुद्दा गांभीर्यानं घेतला नाही. मग मात्र मनोज जरांगे पाटील यांनी तत्कालीन राज्य सरकारला अल्टीमेटम देऊन चक्क जलसमाधी आंदोलन करण्याची घोषणा केली. त्यावेळी ते म्हणाले होते जर सरकारनं २८ सप्टेंबरपर्यंत मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या कुटुंबियांच्या सर्व मागण्या मान्य केल्या नाहीत तर मी मनोज जरांगे पाटिल २९ सप्टेंबर २०२१ रोजी, शहागड येथील उड्डाणपूलारून उडी मारून जलसमाधी घेणारच आहे, त्यानंतर राज्यात सकल मराठा समाजाकडून जी काही असंतोषाची लाट उसळेल, त्या उद्रेकास सर्वस्वी सरकारच जबाबदार असेल. त्यावेळी जरांगे यांनी प्रशासनाला त्यांच्या आंदोलनाची दखल घ्यायला भाग पाडलं होतं.
मराठी क्रांती मोर्च्याची दखल घेऊन देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात मराठा समाजाला काही काळासाठी का होईना जे sebc आरक्षण मिळालं होतं आणि त्यातून ज्या भरत्या झाल्या होत्या त्यामध्ये सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांना तात्काळ नियुक्त्या द्याव्यात म्हणूनही त्यांनी मोठ्या प्रमाणावर आवाज उठवला होता. तेव्हा सुद्धा त्यांनी चक्क सरकारला अल्टीमेटम दिला होता की जर मराठा समाजातील पोरांच्या नियुक्त्या नाही झाल्या तर आम्ही राज्यकर्त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, तसंच आम्ही सर्वपक्षीय आमदारांच्या घरांना घेराव घालू. तेव्हा देखील त्यांनी सरकारला नमतं घ्यायला भाग पाडलं होतं. कोरोनाकाळात जालना जिल्ह्यात आरोग्यसेवांची मोठी हेळसांड चालू होती. त्याचा फटका सरळ सरळ कोरोनाग्रस्त रुग्णांना बसला आणि जालनामध्ये परिस्थिती गंभीर व्हायला लागली होती. तेव्हा सुद्धा त्यांनी जालनामध्ये अतिरिक्त रुग्णालय उभारण्याची किंवा रुग्णालयांच्या मदतीसाठीची यंत्रणा उभी करावी अशी मागणी लावून धरली होती. शेवटी त्यांच्या त्या मागणीचाही ठाकरे सरकारला विचार करावा लागला आणि त्यांनी जालनामध्ये यंत्रणा उभी केली. पण यावेळी मात्र मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण कराव्यात यासाठी त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आमरण उपोषणाचा मार्ग निवडला होता. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोवर अन्नपाण्याचा घास घेणार नाही अशी त्यांची भूमिका होती. पण त्यामुळं त्यांच्या तब्येतीवर खूप गंभीर परिणाम व्हायला लागले होते.त्यांची प्रकृती अधिक खालावलीये ह्ये लक्षात आल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांच्याशी संपर्क साधला. जरांगे म्हणतात, मला मुख्यमंत्र्यांचा फोन आला, त्यांनी सांगितलं तुम्ही आंदोलन थांबवा आपण मराठा समाजाला आरक्षण देणार आहोत.
त्यावर मनोज जरांगे त्यांना म्हणाले, साहेब तुम्ही कसं आरक्षण देणार. तुम्ही आरक्षणासाठी जी समिती नेमली होती त्या समितीला 3 महिन्याचा अल्टीमेटम दिला होता. पण त्या समितीनं अजून कोणता डेटा सबमिट केला नाही मग तुम्ही कशाच्या आधारावर मराठा समाजाला आरक्षण देणार. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले मी समितीशी बोलून एक तासात माघारी कॉल करतो. पण त्यांचा कॉल आला नाही मात्र त्यानंतर पोलीस आले आणि त्यांनी आमच्यावर अमानुष पद्धतीनं लाठीहल्ला केला. त्यानंतर जरांगे यांनी माध्यमांना त्यांची पहिली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सरकारला हा सर्वात मोठा डाग आहे. माझ्या माता माऊलीला गावात येवून मोघलाईनं मारलं नाही,पण तुम्ही मारलंत. शिंदे साहेब सर्व मराठ्यांच्या तुमच्याकडून अपेक्षा होत्या. पण तुम्ही आमच्या माता माऊलींवर गोळीबार करायला लावला. अहो मला उठताही येत नाही. तरी माझ्यावर तुम्ही हल्ला करायला लावता. तुमच्या आयुष्यातला हा मोठा डाग आहे. आम्ही काय केलं की आमच्या माता माऊलींना तुम्ही घरात घुसून मारलं? आमच्यावर गोळीबार? आम्ही काय केलं? शांततेत मागणी केली की, आम्हाला आरक्षण द्या. उपोषण केलं. शिंदे साहेब तुम्हाला आणखी एकदा सांगतो, आताच या लोकांना थांबायला सांगा, नाहीतर हे गावात धिंगाणा घालतील. आमच्या माता माऊलींना धक्का लागू देऊ नका. आम्ही काही केलेलं नाही. आम्हाला आरक्षण पाहिजे, ते मरेपर्यंत मी घेणारच असाही निर्धार त्यांनी व्यक्त केला.
पुढं ते म्हणाले, “आता मला गोळ्या घाला. माझ्यात शक्ती नाही. ज्या माणसाच्या पोटात पाच दिवसापासून पाण्याचा थेंब नाही तो माणूस उठू शकत नाही. मला उठता येईना, मी बसून राहिलो. मला मीडियासमोर गोळ्या घाला. शिंदे साहेब, गावात कर्फ्यू लागलाय, थांबवा. तीन महिने झालं, समिती काम करत नाही. मी टीव्ही मीडियाच्या माध्यमातून सरकारला आवाहन करतो, लाठीचार्ज करु नका. लोकं घाबरायला लागले आहेत. तुम्ही लहान मुलांना मारलं अशी संतप्त प्रतिक्रिया ही मनोज जरांगे यांनी दिलीये. मनोज जरांगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार याआधी आम्ही सरकारशी बोलायचो, ते आमची कोणती तरी विशिष्ट मागणी पूर्ण करायचं आणि आम्ही आंदोलन मागं घ्यायचो पण आता नाही. दरम्यान मराठा संघटनेच्या त्या आंदोलनावर झालेल्या लाठीहल्ल्यानंतर महाराष्ट्रभर त्याचे पडसाद उमटायला लागलेत. धुळे-सोलापूर महामार्गावर 3 गाड्या पेटवण्यात आल्यात. तसेच 10-15 गाड्यांवर दगडफेक ही करण्यात आल्याचं समजतय. माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झालेत पण आता ह्ये प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जातीये. कारण त्या लाठी हल्ल्यानंतर मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी जालना, छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये कडकडीत बंद पुकारण्यात आलाय. आता खुद्द शरद पवार, मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी जालना मध्ये जाणार असल्याचं समजतंय. मराठा आरक्षणासाठी काम करणारे संभाजीराजे छत्रपती सकाळीच जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी पोहोचले आहेत. असो, बाकी संबंधित प्रकरणाबद्दल नेमकं तुमचं मतं काय आहे, त्ये आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. मराठा आरक्षणासाठी चिवट झुंज देणार्या मनोज जरांगे पाटील यांच्याविषयीच्या तुमच्या भावनाही आम्हाला कमेंट करून कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा.
Jalna Maratha Andolan करणाऱ्या Manoj Jarange Patil यांचा संघर्ष मोठाय | Jalna Lathi Charge News
Leave a Reply Cancel reply