१९९३ सालचा सप्टेंबर महिना. २९ तारखेला रात्री लातूरमधल्या किल्लारी गावातली लोकं लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देऊन आपापल्या घरी परतली होती. ढोल ताश्याच्या गजरात नाचून नाचून दमल्यामुळे अंथरुणावर पडल्या पडल्या नितरासपणे झोपी गेली होती. त्यावेळी त्यांच्या ध्यानीमनी सुद्धा नव्हतं की उद्या ३० तारखेची पहाट त्यांच्यासाठी कर्दनकाळ ठरणारे म्हणून. कारण पहाटे ३ वाजून ५६ मिनिटांनी त्या सबंध लातूर जिल्ह्याला भूकंपाचे हादरे बसले अन त्या भूकंपाचा केंद्रबिंदू होतं किल्लारी गाव. त्या भूकंपाची तीव्रता इतकी जबरदस्त होती की काही सेकंदात किल्लारीसह एकूण ५२ गावं, गावातली हजारो जितीजागती माणसं आणि त्याच्या डबल जनावरं जमिनीखाली गाडली गेली होती. ६.३ रिश्टर स्केलच्या त्या भूकंपामुळं एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं होतं . आज तब्बल ३० वर्षांनंतरही ती ३० सप्टेंबरची पहाट झाली की किल्लारीवासीयांच्या अंगावर काटा उभा राहतो. पण त्यावेळी मुख्यमंत्री असणाऱ्या शरद पवारांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीनं तिथं बचावकार्य सुरु केलं आणि मोठ्या प्रमाणात मदत पोहोचवली होती . त्यावेळचे तत्कालीन महसूलमंत्री विलासराव देशमुख, लातूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी प्रवीणसिंह परदेशी , संपूर्ण मेडिकल टीम, स्वयंसेवक यांनी सुद्धा तेव्हा खूप जीवाचं रान केलं होतं. प्रशासन आणि नागरिकांच्या एकत्रित साथीमुळं किल्लारीचं फार कमी काळात तेव्हा पुनर्वसन झालं होतं. त्याचीचं आठवण म्हणून यंदा किल्लारीमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत कृतज्ञता सभा आयोजित करण्यात आली होती. पण खरं तर ते पुनर्वसनाचं काम वाटतंय तितकं सोप्पं नव्हतं. सततचा पाऊस, संदेश पोहोचवण्यात येणारे अडथळे यामुळं सगळ्यांना खूप संघर्ष करावा लागला होता. आजच्या या Blog मध्ये आपण सगळ्या संकटावर मात करून शरद पवार यांनी किल्लारीचं पुनर्वसन तेव्हा नेमकं कसं केलं होतं,याचीच माहिती घेणारे
(Killari Bhukamp| Sharad Pawar Today Speech | Vishaych Bhari)
मंडळी त्या भूकंपाचा सर्वाधिक फटका हा लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील ५२ गावांना बसला होता. तब्बल ३० हजार घरे उध्वस्त झाली होती. तसच दहा हजाराच्या आसपास लोक आणि 15854 जनावरं त्या दुर्घटनेत मारली गेली होती. त्यात कुणाचं आख्खच्या आख्खं कुटुंब जमिनीखाली गाडलं गेलं होतं तर कुणी आपले आईवडील, आजी-आजोबा, सासू, सासरे, पती, पत्नी, मुलं, मुली, भाऊ-बहिण कायमचे गमावले होते. आज सुद्धा त्या दुर्घटनेचे अवशेष गावात जसेच्या तसे पाहायला मिळतात. आज त्या दुर्घटनेची नुसती आठवण आली तरी गावकऱ्यांच्या डोळ्यात आसवं दाटतात. प्रत्यक्षदर्शी जेव्हा त्या भूकंपाच्या घटनेचं वर्णन करतात तेव्हा अक्षरशः त्यांच्या अंगावर काटा उभा राहतो. एका व्यक्तीनं त्याचा अनुभव माध्यमांशी शेअर केला होता, त्यानं सांगितलं की, त्यावेळी मी फक्त चौदा वर्षाचा होतो, मध्यरात्री अचानक आमचं पांढऱ्या भिंतीचं घर गदागदा हलू लागलं. घराला हादरे बसत होते, भांडी कुंडी जमिनीवर आदळत होती. तोपर्यंत मी माझ्या वडिलांना मी कधीच इतकं घाबरलेल पाहिलं नव्हत पण त्यादिवशी बाबा दरवाजापाशी भेदरलेल्या अवस्थेत उभे होते. अन आई रडत होती. बाहेरच्या आवाजानं काळजात धस्स झालं होतं. पुढं भूकंपाच्या घटनेनंतर तातडीनं तिथं पोहोचलेले कॅमेरामन इस्माईल शेख यांनी त्यांचा अनुभव शेअर केला. ते म्हणाले, 30 सप्टेंबर 1993 ची पहाट महाराष्ट्र कधीच विसरू शकत नाही. गणपती विसर्जनानंतरचा तो दिवस होता. सारा महाराष्ट्र साखर झोपेत असताना लातूर जिल्ह्यातील किल्लारी आणि आजूबाजूची गावं भूकंपाने हादरून गेली होती. हजारो लोक झोपेतच गाडले गेले होते. ढिगाऱ्यांत अडकलेले मृतदेह, जखमी लोक, नातेवाईकांना शोधणारे ग्रामस्थ, मदत काम करणारे स्वयंसेवक, कोलमडलेले संसार मी माझ्या व्हीडिओ कॅमेऱ्यात तेव्हा टिपले होते. पण हाहाकाराची ती विदारकता काळीज पिळवटून टाकणारी होती. ती चित्रं माझा पिच्छा सोडत नव्हती. मला फोबिया झाला होता. त्यानंतर माझ्या हातांनी पुन्हा कधीचं कॅमेऱ्याला स्पर्श केला नाही. ते सारं आठवलं की आजही माझ्या मनात कालवाकालव होते. तर एकूण असं सगळ दुर्दैवी चित्र तिथं होतं. त्या भूकंपाची माहिती मिळताच तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार, महसूलमंत्री विलासराव देशमुख किल्लारीत पोहचले आणि त्यांनी सर्व सरकारी यंत्रणा सक्रिय केल्या. त्यांच्या जोडीला भारतीय लष्कराचे जवान सुद्धा मोठ्या संख्येनं मदतकामात उतरले होते. अशाप्रकारे आपत्ती आल्यानंतर त्यातून बचावासाठी पहिल्यांदा आपत्ती व्यवस्थापन केलं जातं. त्यासाठीचं ते लष्करी जवान अनेक दिवस त्या भागात राहिले. त्या आपत्तीमुळे १११ कोटी ४० लाख रुपयांचं अंदाजे नुकसान झाल्याचं त्यावेळी सरकारनं घोषित केलं होतं. त्या काळात प्रशासनावर कसा कंट्रोल असावा याचा प्रत्यय शरद पवारांनी दाखवून दिला. त्यादिवशी सकाळी सहा वाजता मुंबईत मंत्रालयाचं कामकाज सुरू झालं होत.
(Killari Bhukamp| Sharad Pawar Today Speech | Vishaych Bhari)
शरद पवार सकाळी नऊ वाजताच किल्लारीला जाऊन पोहोचले होते. भूकंपग्रस्तांचं पुनर्वसन करण्यासाठी राज्य सरकारनं नुकसान झालेल्या गावाची वर्गवारी केली होती. त्यामधे नुकसाना सोबतच मातीच्या थराच ही वर्गीकरण केल होत. जसं अ वर्गाच्या घरासाठी दोन मीटरपेक्षा जास्त खोलीचा थर, ब वर्गासाठी दोन मीटरपेक्षा कमी खोलीचा थर, आणि क वर्गासाठी ७० टक्क्यांपेक्षा कमी नुकसान झालेली घरे निश्चित करण्यात आली होती. तसच सरकारनं शासकीय, खासगी कंपन्या आणि वेगवेगळ्या संस्थाशी संपर्क करून त्यांच्या माध्यमातून घर बांधणीचं काम हाती घेतलं होतं. दरम्यान रेडीओ , टी व्ही च्या माध्यमातून आणि वर्तमानपत्रांच्या आधारे महाराष्ट्रभर दुर्घटनेची बातमी पसरली होती. लोक स्वतःच्या घरातलं कुणीतरी माणूस तिथं अडकलंय असं समजून भरघोस मदत पाठवू लागले होते. फक्त महाराष्ट्र किंवा देशातूनचं नाही तर जगाच्या वेगवेगळ्या भागातून मदतीचा ओघ सुरु होता. पण ती मदत तात्पुरत्या स्वरुपाची होती. तिथला विध्वंस बघता सगळ्या लोकांच कायमचं पुनर्वसन करण गरजेच होतं. मग शरद पवारांनी तातडीनं सगळी सूत्रे हलवली. सर्वात पहिल्यांदा तर त्यांनी लातूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांच्यासोबत बैठक घेतली अन सगळं प्रशासन कामाला लागलं. महाराष्ट्र सरकारनं त्या भागातील आपदाग्रस्तांचं सर्वांगीन पुनर्वसन करण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवला आणि संपूर्ण गावेच्या गावे विकसित करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान त्यासाठी पहिल्यांदा आपत्तीग्रस्त गावांची गरज लक्षात घेऊन गावासाठी वेगळी जमीन संपादित करण्यापासून सुरुवात झाली. 52 गावांचं पुनर्वसन करायचं होतं आणि त्याचा टोटल खर्च त्यावेळी 1200 कोटी इतका येणार होता. जागतिक बँकेच्या देखरेखीत त्या प्रकल्पावर खर्च केला जात होता. सरकारनं परीसरातील लोकांनाही पूनर्वसनाच्या या कार्यात सहभागी करून घेतलं. स्वतः शरद पवारांनी एकूण एक गावांना वैयक्तिकरित्या गाठी भेटी दिल्या.
(Killari Bhukamp| Sharad Pawar Today Speech | Vishaych Bhari)
विशेषतः किल्लारीवर त्यांची विशेष नजर होती.लोकांना तुम्ही बरच काही गमावलंय, पण अजून बरच तुमच्या हातात बाकी आहे असा त्यांनी तेव्हा विश्वास दिला. खरंतर आजही तिथल्या अनेक लोकांचा थेट शरद पवार यांच्याशी संपर्कय.असो पण जास्तीत जास्त लोकसहभाग मिळाला तर पूनर्वसनाच्या कामाला गती प्राप्त होईल असा पवारांचा त्यामागचा उद्देश होता. खरं तर पूर्णपणे गाव वसवणं अशा प्रकारचा देशातला तो पहिलाचा प्रोजेक्ट होता. त्यामध्ये एकूण 52 गावांचं स्थलांतर, पुर्नवसन, 23 हजार नवीन घरांच बांधकाम, विविध संस्था आणि देणगीदार यांच्या सहकार्यातून तीस हजाराच्या आसपास घरांच बांधकाम आणि शक्य असल्यास दुरुस्ती असा आराखडा आखण्यात आला होता. पण पुढं जाऊन 13 जिल्ह्यातील अडीच हजार गावातील दोन लाखांपेक्षा जास्त घरांच्या दुरुस्तीचं ही काम हाती घेण्यात आलं. प्रत्यक्षात काम सुरु झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा संपादित जमिनीवर वाहतुकीचे रस्ते बांधण्यात आले. मुख्य रस्त्याबरोबरचं अंतर्गत रस्ते, नाले, पिण्याच्या पाण्याची सोय, पाईपलाईन, वीज पुरवठा, खेळाची मैदानं, शाळेची इमारत, ग्रामपंचायत, आरोग्य, वाचनालय यांचीही आखणी आणि बांधणी करण्यात आली. पुढं त्या त्या संबधित गावातील आपत्तीग्रस्त लोकांच्या नोंदीनुसार त्यांना घराचं वाटप करण्यात आलं. अशा अनेक टप्प्यातून किल्लारी आणि इतर आपत्तीग्रस्त गावांचं पुनर्वसन पार पडलं . मात्र ती सर्व घरं बांधताना सगळ्यांच्या डोक्यात एकच विचार घुमत होता. पुन्हा भूकंप झाला तर. अगदी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवारांच्या डोक्यात सुद्धा. त्यांनी मग लगेच निर्णय घेतला की काम fast पण क्वालीटी करायचं. उगाच मदत करायची म्हणून नको . म्हणून त्यांनी किल्लारीत सगळी आरसीसीची भूकंप रोधक घरं बांधून दिली. आज जर 30 वर्षानंतर तुम्ही किल्लारी मध्ये जाऊन त्या गावातील घरं पाहिली तर तुम्हाला सरकारी कार्यालय किंवा निवासस्थाने पाहत असल्याचा फील येतो. दोन घरातील अंतर, भूकंप रोधक घरं यामुळं नवीन गावांची रचना ही विरळ लोकवस्तीची झालीय. किल्लारी गावातील अंतर्गत रस्ते हे 64 किलोमीटरचे आहेत. गाव हे तीन भागात वसलेलंय. आधी संपूर्ण गाव एकसंध होतं त्यामुळं गावात राहणाऱ्या लोकांना आता गावाचं गावपण हरपल्यासारखं वाटतं. पण भूकंप पीडित गावाच्या विकासासाठी शासनानं त्यावेळी सर्वतोपरी मदत केली, आमची गावं वसवली, पीडितांना आर्थिक नुकसानभरपाई देण्यात आली, आमच्या मुलांना नोकरीत सवलत देण्यात आली असं गावकऱ्यांचं म्हणणंय. त्यावेळी सरकारनं घरं बांधुन देण्यासोबतच लातूर जिल्ह्यातील भूकंप ग्रस्त प्रमाणपत्र असलेल्या ७३५ तरुणांना शासकीय सेवेत सामावून घेतलेलं होतं. तेव्हापासूनच शासकीय नोकरीत भूकंपग्रस्तासाठी दोन टक्के स्वतंत्र आरक्षणही ठेवण्यात आलंय. त्यावेळी शरद पवार आणि त्यांच्या प्रशासनानं आम्हाला लवकरात लवकर संकटातून बाहेर काढलं नाहीतर आमची अवस्था वाईट झाली असती अशी ही अनेक गावकऱ्यांची भावनाय.
(Killari Bhukamp| Sharad Pawar Today Speech | Vishaych Bhari)
खर तर कोणत्याही आपत्तीला सामोरं जाणाऱ्या पीडित लोकांचा किंवा व्यक्ती समूहाचा पूर्ण शाश्वत विकास करणं हेच त्यांच्या जखमेवरचं सर्वात प्रभावी औषध असतं अन नेमकं तेच तेव्हा शरद पवार, त्यांचं तत्कालीन मंत्रीमंडळ, संपूर्ण प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचारी आणि नागरिकांनी एकत्रितरित्या करून दाखवलं. ते सुद्धा तिथली बाजारपेठ, लोकांचा सामाजिक आणि आर्थिक स्तर लक्षात घेऊन. अधूनमधून कधी कोणत्या तरी गावातून आम्हाला अजून घरे मिळाली नाहीत, घरं वापरण्यालायक नाहीत, पडायला आली आहेत असं काही गावातील लाभार्थी तक्रारी करत असतात. सोबतच घरांच्या रचनेबद्दलंही त्यांचा तक्रारीचा सूर असतो मात्र प्रशासन त्याबद्दल सांगतं की संबंधित आपत्तीग्रस्तांची घरं ही भूकंपरोधक आहेत अन ती तेव्हाची गरज ओळखून सरकारी खर्चातून बांधण्यात आली होती. ती घरं त्यांच्या मनासारखी बांधता येत नाहीत अन हे आज अनेकांना सांगितलं तरी त्यांच्या लक्षात येत नाही. पुढं प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, तेव्हा दाखवलेल्या कार्यतत्परतेमुळं आज ती गावं आर्थिकरित्या सक्षम झाली आहेत. त्यांच्या शेतीला गती देण्यात आलीय. त्या भागातील पाण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी अनेक गावात जलयुक्त शिवाराची कामं सुद्धा करण्यात करण्यात आलीयेत,अन ती सुद्धा चक्क लोकसहभागातून. किल्लारी, मातोळा, करजगी यांसारख्या अनेक गावात तशी लोकसहभागातून कामे झालली आहेत. दरम्यान लोकांच्या सगळ्याच समस्या सुटल्यात असंही नाही. आजही 30 वर्षा नंतर गावपातळीवर लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतय. म्हणजे दोन घरांमधलं अंतर आणि अंतर्गत रस्त्यांची लांबी यामुळं पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईन, रस्त्यावर लागणाऱ्या विजेच्या दिव्यांची दुरुस्तीचा भरमसाठ खर्च ग्रामपंचायतीना परवडत नाहीये. त्यावेळी तातडीनं गावाचा भौतिक विकास झाला मात्र तो तसाचं टिकवून ठेवण्यासाठी लागणारा पुढील निधी आता खेचून आणता येत नाही. म्हणूनचं अनेक गावकऱ्यांचं असं म्हणणंय की सरकारी आराखड्यानुसार जरी गावांचं पुनर्वसन झालं असलं तरीही सरकारनं आणि प्रशासनानं आता आमच्या समोर नव्यानं तयार झालेल्या समस्या लक्षात घ्यायला हव्यात. दरवर्षी 30 तारखेला तिथ भूकंपात बळी पडलेल्यांना मानवंदना दिली जाते. त्यांचा स्मृतिदिन साजरा केला जातो. यावर्षी त्या कार्यक्रमाला शरद पवारांनी ३० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल हजेरी लावली. त्यावेळी शरद पवार यांनी केलेल्या कामाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कदाचित त्या कृतज्ञता सभेत सुद्धा शरद पवारांच्या कानावर गावकऱ्यांनी त्यांच्या समस्या घातल्या असण्याची शक्यताय. असो, पण तुम्हाला किल्लारी भूकंप दुर्घटनेनंतर शरद पवार यांनी किल्लारीसह ५२ गावांच्या पुनर्वसनासाठी जे कार्य केलं त्याबद्दल ऐकून नेमकं काय वाटलं त्ये आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.
Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇
https://www.facebook.com/vishaychbhari
https://www.facebook.com/aplavishaychbhari
Leave a Reply Cancel reply