Manipur नंतर आता Hariyana मध्ये उफाळली दंगल | Hariyana Violence News Update | Vishaych Bhari

एका बाजूला मणिपूर जळत असतानाच सोमवारी दुपारी हरियाणाच्या मेवातमधील नूह भागात ब्रजमंडल जलाभिषेक यात्रेदरम्यान भयानक हिंसाचार झाला. त्यावेळी दोन समाजामध्ये दगडफेक होऊन पाच लोकांचा हकनाक बळी गेला तर अनेक पोलीस कर्मचारी गंभीररित्या जखमी झाले. सध्याच्या घडीला तिथली परिस्थिती गंभीर असून तिथं जागोजागी 144 कलम लागू करण्यात आलंय. तसंच संबंधित भागातली इंटरनेट सेवा ही बंद ठेवण्यात आलीये. प्राथमिक माहितीनुसार तिथं दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण झाल्यामुळं ती दंगल झाली असं सांगितलं जातय. नेमकं काय घडलं आणि सध्या हरियाणा इतकं का पेटलंय. सगळं प्रकरण सविस्तर समजावून घेऊयात…

( Hariyana Violence News Update | Vishaych Bhari )

माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार, हरियाणाच्या नूह जिल्ह्यात बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि इतर काही हिंदू संघटनांच्या लोकांनी मिळून ब्रजमंडल जलाभिषेक यात्रेचं आयोजन केलं होतं. नऱ्हाड येथील शिवमंदिरात जलाभिषेक करून यात्रा सिंगर गावाकडं पुढं सरकत होती. बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या वतीने लोकांना त्या यात्रेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं होतं ,अशी माहिती मिळतीये. त्यानुसार गुरुग्राममधील दोन हजार, रेवाडीतून सुमारे पाचशे आणि इतर जिल्ह्यातील मिळून सुमारे पाच हजार लोक त्या यात्रेत सहभागी झाले होते. त्यातही बहुतांश महिला होत्या. पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, यावर्षीच्या 16 फेब्रुवारीला भरतपूर येथे पोलिसांना जळालेल्या बोलीरोमध्ये दोन मानवी सापळे मिळाले होते. ते सापळे होते 25 वर्षीय नासीर आणि 35 वर्षीय जुनैद यांचे. त्यांच्या हत्येचा आरोप , जलाभिषेक यात्रेचा एक आयोजक असणार्या मोनू मानेसर या तरुणावर होता. तेव्हापासून मोनू मानेसर फरारी असून त्याला मोस्ट वॉन्टेड म्हणून पोलिसांनी घोषित केलेलं होतं. तर त्या मोनू आणि त्याचा साथीदार बिट्टू याचा एक भडकावू व्हिडीओ मागच्या काही काळापासून सोशल मीडियावर फिरत होता, अशी पोलिस माहिती देतात. आता या व्हिडीओमुळंच मागच्या काही काळापासून दोन धर्म समूहांमध्ये धूसफूस वाढली होती. त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात असं नूंह कांग्रेसचे आमदार आफताब अहमद यांनी माध्यमांना सांगितलं. तसंच ती गोष्ट आम्ही प्रशासनाच्या ही कानावर घातली होती पण त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं असंही अहमद यांनी सांगितलं.

( Hariyana Violence News Update | Vishaych Bhari )

पण हरियाणाचे गृहमंत्री अनिल वीज सांगतायत की, मोनू मानेसर याचा त्या हिंसेशी काहीही संबंध नाही. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाची कलश यात्रा दरवर्षी निघते आणि त्याचा प्रवास शांततामय वातावरणात सुरू असतो.

तर स्वतः हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर खट्टर म्हणाले की, ही हिंसा म्हणजे काही जणांच पूर्वनियोजित षडयंत्र आहे. दरवर्षी ही यात्रा काढण्यात येत होती, मात्र यावेळी काही लोकांनी कट रचून यात्रेवर हल्ला करण्यास सुरुवात केली. यात्रेसोबतच हल्लेखोरांनी पोलिसांवरही हल्ला केला. ज्यामुळे यात्रा विस्कळीत झाली आणि अनेक ठिकाणी जाळपोळही झाला, वाहने जाळली गेली, हा नक्कीच एका मोठ्या षडयंत्राचा भागय असं दिसतंय. दरम्यान केंद्र आणि राज्य पोलीस दलाने नूहमधील परिस्थिती सामान्य केलीय. आजूबाजूच्या जिल्ह्यांतील तुरळक घटना, मग ते पलवल, गुरुग्राम किंवा फरिदाबाद असोत, सर्व नियंत्रणात आले आहेत. सर्वत्र शांतता प्रस्थापित झाली असली तरीही खबरदारी म्हणून तेथे संचारबंदी लागू करण्यात आलीय. तसंच जिथं जास्त गंभीर परिस्थिती होती तिथं कलम 144 लागू करण्यात आलंय. ते पुढे म्हणाले, ” नुहच्या बाहेरील जर कोणी या कटात सहभागी असेल तर त्यांचा शोध घेऊन कारवाई केली जाईल. सध्या त्या घटनेच्या एकूण 44 एफआयआर दाखल करण्यात आल्यात त्यात 70 जणांची नावे असून त्यांना ताब्यात घेण्यात आलंय. तपासादरम्यान जो कोणी दोषी आढळेल त्याला अटक केली जाईल. त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. पण त्या दुर्दैवी घटनेत सध्या 5 जणांचा मृत्यू झाला असून त्यात 2 पोलीस कर्मचारी आणि 3 सामान्य नागरिक आहेत, सर्वांना नुकसान भरपाई दिली जाईल. पोलिसांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे, प्रशासनाने देखील शांतता समितीची स्थापना केली आहे, ज्याने परिस्थिती अजून बिघडणार नाही, अशी अपेक्षा आहे.

आता पोलिसांच्या हाती आलेल्या माहितीनुसार हा हिंसाचार पूर्वनियोजित होता. नासीर आणि जुनैदच्या हत्येचा बदला घेता यावा तसेच मोनू आणि बिट्टूच्या भडकाऊ व्हिडीओंच्या रागातून काही समाजकंटकांनी आधीच पत्र्यावर काठ्या ,रॉड ,दगड गोळा करून ठेवले होते,अशी प्राथमिक माहिती आहे.‌आता यात्रा जशी नऱ्हाडच्या शिव मंदिरापासून खेडका चौकाजवळ आली तसा त्यापैकी 200 समाजकंटकांनी अचानक गोंधळ उडवून दिला आणि संतप्त जमावाने यात्रेतील लोकांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली अन त्यांची वाहने ही पेटवून दिली. तसंच काठ्या, रॉडने मारहाण करून अनेक वाहनांचे नुकसान केले.

( Hariyana Violence News Update | Vishaych Bhari )

तेवढ्यावर त्यांचं भागलं नाही म्हणून संतप्त जमावाने जाळपोळ करायला ही सुरुवात केली. यात्रेत सहभागी झालेले लोक त्या कालव्यामुळं सैरभैर धावू लागले. दरम्यान जमावानं त्यांचा पाठलाग करून त्यांना ही मारहाण केली. त्यानंतर दोन्ही बाजूने हल्ले प्रतिहल्ले सुरू राहिले. त्या घटनेत गुरुग्राम पोलिसांचा होमगार्ड नीरज आणि गुरसेवक यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर संतप्त जमावानं नूहच्या अनाज मंडी येथील सायबर क्राईम पोलिस स्टेशनच्या बाहेर पार्क केलेल्या डझनहून अधिक वाहनांना आग लावली. पोलिस ठाण्यात गोंधळ घातल्यानंतर जमाव बाजारपेठेत घुसला आणि तिथंही त्यांनी अनेक दुकानं फोडली. रोडवेजच्या दोन बससह तीसहून अधिक वाहने जाळण्यात आली. पन्नासहून अधिक वाहनांचे नुकसान झाले. त्या हिंसाचाराची माहिती पुढं जिल्हाभर पसरली आणि पुन्हाणा, तावडू, नगीना, फिरोजपूर याभागात त्याचे पडसाद उमटू लागले. होडळ ते पुन्हाणा रस्त्यावर दंगलखोरांनी मालाने भरलेले 4 ट्रक पेटवून दिले. आगीमुळे त्यात भरलेला माल जळून खाक झाला. माहिती मिळताच पोलीस अधीक्षक लोकेंद्र सिंह मोठ्या पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले अन आग विझवण्यात आली. तसंच 31 जुलै रोजी संध्याकाळी 6 वाजता गुरुग्रामच्या सोहना भागात सुमारे 200-250 आंदोलकांच्या जमावाने गोंधळ घातला. 

त्या राड्यात 5 वाहने, 1 ऑटो, 1 दुकान आणि 4 छोटी दुकाने जळून खाक झाली. त्यावेळी दोन्ही समाजातील लोकांकडून भयंकर दगडफेकही करण्यात आली. गुरुग्राम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुग्रामच्या सेक्टर 57 मध्ये असलेल्या एका धार्मिक स्थळाला सकाळी सव्वा बारा वाजता आग लावण्यात आली. हल्ला करणाऱ्यांपैकी काही जणांनी एका व्यक्तीची हत्याही केली. त्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आलीये. त्यामुळं त्या भागातल्या धार्मिक स्थळांभोवती सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यात आलीय आणि सोहना, पाटोडी, मानेसर आणि गुरुग्राममध्ये इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आलीये. प्रशासन लोकांना शांतता राखण्याचं आवाहन करतंय. पोलीस अधिकारीही दोन्ही समाजातील लोकांना भेटून शांततेचे आवाहन करण्याचा प्रयत्न करतायत. हिंसाचारानंतर आता नुह आणि सोहानामध्ये निमलष्करी दलाच्या 13 तुकड्या तैनात करण्यात आल्यात, आणखी 6 तुकड्या लवकरच येतील असं बोललं जातंय. अजून काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कालचा आख्खा दिवस गुडगाव आणि पलवलमध्ये सर्व खाजगी आणि सरकारी शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या होत्या. यात्रेत आलेल्या 3,000-4,000 लोकांना ओलीस ठेवण्यात आले होते. सायंकाळी उशिरा त्यांना पोलिसांच्या मदतीनं बाहेर काढण्यात आलंय. विश्व हिंदू परिषदेने हा हल्ला ‘जिहादी विचाराच्या लोकांनी केला असल्याचा आरोप केलाय.

( Hariyana Violence News Update | Vishaych Bhari )

बीबीसीशी बोलताना विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते विनोद बन्सल म्हणाले, “आमचे अनेक लोक जखमी झाले आहेत. काही जीवितहानी झाल्याच्या बातम्या देखील आहेत, आम्ही अद्याप त्याची पुष्टी केलेली नाही. आम्ही अजून त्याचा डेटा गोळा करत आहोत. विनोद बन्सल पुढं असंही म्हणाले की आमच्या यात्रेवर सुनियोजित कटाचा भाग म्हणून हल्ला करण्यात आला. तेथे आमचे लोक मोठ्या संख्येने अडकले होते, त्यांना रात्री उशिरापर्यंत बाहेर काढण्यात आले. आमचे कोणीही लोक सध्या तिथे अडकलेले नाहीत. प्रशासन आणि पोलीस दलाने सर्वांना सुखरूप बाहेर काढले आहे. धार्मिक स्थळावरील हल्ल्याच्या घटनेबद्दल खेद व्यक्त करताना बन्सल म्हणतात, “आम्हाला त्याची माहिती नाही, जर असे घडले असेल तर ते खूप दुःखद आहे. त्यामागे काही षडयंत्र आहे का, याची प्रशासनाने कसून चौकशी करावी.

दरम्यान त्या सगळ्या हिंसाचारावरून आपचे प्रदेशाध्यक्ष सुशील गुप्ता यांनी हरियाणा सरकारला धारेवर धरलं. ते म्हणाले, आम्ही हरियाणातील लोकांना शांतता राखण्याचे आवाहन करतो, अफवांवर लक्ष देऊ नका.  खट्टर साहेब कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात पूर्णपणे अपयशी ठरत आहेत. हरियाणा आणि केंद्रात भाजपचे सरकार आहे, पण तरीही त्यांना कायदा आणि सुव्यवस्था सांभाळता आली नाही.

पुढं सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांनीही सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. त्यांनी ट्विटरवर लिहिलंय की, हरियाणातील हिंसाचार हे मणिपूरनंतर ‘डबल इंजिन’ सरकारच्या अपयशाचे आणखी एक उदाहरण आहे. सरकारच्या रूपाने भाजपचे इंजिन बिघडले आहे.

तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी असं वक्तव्य केलं की, हरियाणातील नूह मधील जातीय हिंसाचार अत्यंत संतापजनक आहे. ईशान्येतील मणिपूरनंतर आता हरियाणात अशा घटना घडणे चांगलं लक्षण नाही. अशा कठीण काळात आपण शांतता आणि परस्पर बंधुभाव राखावा अशी मी हात जोडून हरियाणातील सर्व जनतेला प्रार्थना करतो. आपण सर्वांनी एकत्र येऊन शांतताविरोधी शक्ती आणि हिंसाचाराच्या राजकारणाचा पराभव केला पाहिजे.

( Hariyana Violence News Update | Vishaych Bhari )

ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार म्हणाले की मणिपूर, हरियाणाची हिंसा, आणि काल घडलेला ट्रेनमधला गोळीबार हे सगळं देशात वाढत चाललेल्या दूषित वातावरणाचं फलितय. हे थांबलं पाहिजे.

बाकी यंत्रणा परिस्थिती कंट्रोल मध्ये आहे असं म्हणत असली असली तरीही अद्याप हरियाणा मध्ये सगळं आलबेल नाहीये. बाकी तुमचं संबंधित प्रकरणाबद्दल नेमकं काय मतंय , या सगळ्या घटनांना नेमकं कोण जबाबदारंय, या हिंसाचाराआडून कोण आपली राजकीय पोळी भाजून घेतंय का, तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा लेख आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा.

Manipur नंतर आता Hariyana मध्ये उफाळली दंगल | Hariyana Violence News Update | Vishaych Bhari

Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇

https://www.facebook.com/aplavishaychbhari

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

breaking newsharyanaharyana newsharyana nuh violenceharyana policeharyana violenceharyana violence newsharyana violence nuhmewat haryanamewat nuh violencemewat violencemewat violence newsnuh harayan violencenuh haryananuh haryana newsnuh violencenuh violence haryananuh violence newsnuh violence reasonnuh violence updateviolenceviolence in nuhvishaych bharivishaychbhariविषयच भारी
Comments (0)
Add Comment