शरद पवारांनी संधी दिली नसती तर आजही दिलीप वळसे पाटील पीएच असते | Dilip Walse Patil And Sharad Pawar Controversy | Vishaych Bhari

एकेकाळी दिलीप वळसे पाटील शरद पवारांचे पीए म्हणून काम बघायचे. शरद पवारांची जेवणाची वेळ, औषध घ्यायची वेळ ते अगदी
शरद पवारांचै दौरे हे सगळं नियोजन वळसे पाटलांच्या डायरीत फिक्स ठरलेलं असायचं. दिलीप वळसे पाटील यांना एकेकाळी शरद पवार यांच्या अतिशय जवळचा व्यक्तीही मानलं जायचं पण तेच दिलीप वळसे पाटील अलीकडे शरद पवारांना सोडून अजित दादांसोबत गेलेत शरद पवारांवर त्यांनी अलीकडे टीकाही केलीय की त्यांच्या नेतृत्वात एकदाही राष्ट्रवादी पूर्ण बहुमतात आली नाही म्हणून.‌ पण त्यामुळे आता दिलीप वळसे पाटील यांच्यावर शरद पवार गटाकडून कडकडून टीका होतेय. पण हे प्रकरण नेमकं काय आहे ? शरद पवारांनी दिलीप वळसे पाटील यांना राजकारणात पहिल्यांदा संधी कशी दिली? आणि सातवेळा सलग विजयी ठरलेल्या दिलीप वळसे पाटील यांचा शरद पवार पराभव करू शकतात का? हे सगळंच आपण आज या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.‌..

दिलीप वळसे पाटील यांच्या वडीलांचं नाव दत्तात्रेय वळसे पाटील. ते ही कधीकाळी आंबेगाव शिरूर मतदारसंघातून आमदार होते.‌
दिलीप वळसे पाटील यांचा पहिल्यापासूनच राजकारणात इंटरेस्ट होता. पण आपला पोरगा राजकारणात तयार व्हावा म्हणून वडील दत्तात्रेय वळसे पाटील यांनी दिलीप यांना शरद पवार यांच्याकडे ठेवलं. मग दिलीपरावही शरद पवार यांचे पीए म्हणून काम बघू लागले. शरद पवार यांच्या जेवणाच्या डब्यात काय असावं? त्यांच्या पोटाला नेमकं काय खाल्याने त्रास होणार नाही ? त्यांच्या घशाला कशाने त्रास होणार नाही इथपासून ते शरद पवार यांचे दौरे,सभा, त्यांनी कधी कुठे असायला हवं इथपर्यंतचं बारीक बारीक नियोजन दिलीप वळसे पाटीलच बघायचे‌ . त्यामुळे दिलीप वळसे पाटील हे शरद पवार यांच्या किती विश्वासातले नेते होते हे तुम्हाला कळलं असेलच. जाणकार सांगतात, अजित पवार, आर आर आर पाटील, जयंत पाटील आणि दिलीप वळसे पाटील हे राष्ट्रवादीचे चार आधारस्तंभ राहिलेले नेते होते. पैकी आर आर पाटील लवकर गेले. तर अजित पवार आणि शरद पवार यांच्या संबंधात अनेकदा तणाव राहिलेला होता. त्यामुळे जयंत पाटील आणि दिलीप वळसे पाटील या दोन नेत्यांकडे पवारा़ंनी बरीच अतिरिक्त जबाबदारी सोपवली होती. यातूनच जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपद स्वीकारल्यानंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये अनिल देशमुखांच्या अटकेनंतर दिलीप वळसे पाटील यांच्याकडे पवारांनी गृहमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली होती.

( Dilip Walse Patil And Sharad Pawar Controversy | Vishaych Bhari )

पण १९८८ पर्यंत दिलीपरावांनी शरद पवार यांच्या पीए पदावर राहून उत्तम काम केले होते. तेव्हा एके दिवशी शरद पवार यांनीच खुद्द त्यांना विचारले की दिलीप तुम्हाला इथून पुढे कुठं काम करायची इच्छा आहे? मंत्रालय की राजकारणात? म्हणजेच काय तर शरद पवारांनी दिलीप वळसे पाटील यांचं राजकीय ज्ञान बघून एकप्रकारे त्यांना राजकारणात उतरण्याचेच निमंत्रण दिले होते. तेव्हा दिलीपरावांनी शरद पवारांकडे दोन दिवसाची वेळ मागितली होती. आणि त्यानंतर पवारसाहेबांना त्यांनी मला राजकारणात उतरायचं आहे असं सांगितलं. शरद पवारांच्याच आदेशानुसार मग दिलीप वळसे पाटील आंबेगाव शिरूर मतदारसंघात आले आणि त्यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. १९८८ ते १९९० पर्यंत शरद पवार यांच्याच मार्गदर्शनात दिलीप वळसे पाटील यांनी आंबेगाव शिरूर मतदारसंघात काम केलं. आणि त्याचंच फळ म्हणून शरद पवार यांनी १९९० ला तत्कालीन कांग्रेस पक्षाकडून दिलीप वळसे पाटील यांना आमदारकीचं तिकीट दिलं. शरद पवारांचं डोकं आणि दिलीप वळसे पाटील यांचं कष्ट यामुळे १९९० ला वळसे पाटील पहिल्यांदाच आमदार झाले. पुढे वळसे पाटील यांनी या मतदारसंघात बरीच विकासकामं केली. त्या माध्यमातून मतदारसंघाच्या जनतेनं आजपर्यंत सलग सातवेळा दिलीप वळसे पाटील यांना विधानसभेत आमदार म्हणून पाठवलं.

१९९९ ला कांग्रेस मधून फुटून पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाची स्थापना केली तेव्हा ज्या निष्ठावंतांनी पवारांची साथ दिली होती त्यातलं एक नाव‌ होतं – दिलीप वळसे पाटील यांचं.पुढे सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख, आणि अशोक चव्हाण या तीनही नेत्यांच्या मंत्रिमंडळात वळसे पाटील यांनी मंत्रीपदं भूषवली.‌कांग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीत वळसे पाटील यांनी ऊर्जा ,उच्च व तंत्रशिक्षण, तसेच अर्थ अशी महत्वाची खाती सांभाळली.‌ ऊर्जामंत्री असताना त्यांनीच पहिल्यांदा भारनियमनाचं वेळापत्रक बनवण्याची योजना आखली.‌उच्च व तंत्रशिक्षण मंत्री असताना त्यांनी mkcl ची स्थापना केली. वळसे पाटील यांनी त्यांच्या कारकिर्दीत अजून एक चांगला निर्णय घेतला आणि तो म्हणजे त्यांनी विद्युत महामंडळाचं महानिर्मिती, महावितरण आणि, महापारेषण असं तीन प्रकारात अनबंडिग केलं. सर्वसामान्य शेतकरी आणि कामगारांचे प्रश्न सभागृहात उत्कृष्टपणे मांडल्याप्रकरणी त्यांना उत्कृष्ट संसदपटू म्हणूनही सन्मानित करण्यात आले होते. २००९ ला मात्र त्यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी आली त्यांनी ती यशस्वीपणे सांभाळली. त्यांचा मितभाषी स्वभाव, प्रशासन आणि कायद्यांचा त्यांचा अभ्यास यामुळे त्यांना कुठलीच अडचण आली नाही.‌पण विधानसभा अध्यक्ष पद मिळाल्यावरून नंतर वळसे पाटील यांनी एका जाहीर कार्यक्रमात नाराजी व्यक्त केली होती.‌ कदाचित त्यांना तेव्हा पुढे पक्षासाठी काहीतरी करण्याची किंवा मंत्री होण्याची इच्छा असावी.‌ पण त्यांच्याकडे आलं विधानसभा अध्यक्षपद.‌ पण हळूहळू विधानसभा अध्यक्ष पदाचीही त्यांना गोडी लागली होती. आणि त्या माध्यमातून त्यांनी उत्कृष्ट कामही केलं होतं असं राजकीय जाणकार सांगतात.

( Dilip Walse Patil And Sharad Pawar Controversy | Vishaych Bhari )

पुढे २०१९ ला महाविकास आघाडी सरकारमध्ये दिलीप वळसे पाटील यांना कामगार आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्रीपद मिळालं तेव्हा राज्यात lockdown सुरू होतं. तेव्हा कामगारांच्या खात्यात थेट रक्कम पाठवण्याची आयडियाही वळसे पाटील यांचीच होती. वळसे पाटील यांची लाॅटरी तेव्हा लागली जेव्हा सचिन वाझे प्रकरणावरून वातावरण तापलं. आणि अनिल देशमुख यांना गृहमंत्री पदावरून राजीनामा द्यावा लागला त्यामुळे जयंत पाटील की दिलीप वळसे पाटील यांच्यापैकी कोणाची त्या पदावर वर्णी लागणार हा प्रश्न होता. आता तेव्हा जयंत पाटील पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असल्यामूळे गृहमंत्री पदाची माळ शेवटी वळसे पाटील यांच्याच गळ्यात पडली . पण आता प्रश्न उरतो की शरद पवारांसोबत राहून एवढी मोठी पदं मिळाली असतानाही वळसे पाटलांनी शरद पवारांऐवजी अजित दादांसोबत जाण्याची भूमिका का निवडली?

काही जणांच्या मते वळसे पाटील यांची सत्तेत राहण्याची महत्वकांक्षा यामागे कारणीभूत आहे तर काही जणांना अजूनही असंच वाटतंय की ही सगळी शरद पवारांचीच गेम आहे म्हणून. कारण शरद पवारांशी इतका निष्ठावंत असणारा नेता हा असा एका झटक्यात त्यांना सोडून जाणार नाही. पण यावरून रोहित पवार यांनी मात्र दिलीप वळसे पाटील यांच्यावर मागे जोरदार निशाणा साधला होता. पण त्याला उत्तर देताना दिलीप वळसे पाटील यांनी रोहित पवार यांच्यावरच पलटवार केला होता. रोहित पवारांचं वय ३७ आहे आणि मी राजकारणात ४० वर्ष झालं आहे असं ते तेव्हा म्हणाले होते. त्यावर माझं वय कितीही असलं तरीही ४० वर्ष सोबत राहून तुम्हाला साहेब समजले नाहीत का ? असं रोहित पवार म्हणाले होते. ते पुढं असंही म्हणाले की, हे सगळे नेते एकत्रित येऊन माझ्याविरोधात कर्जत जामखेड मध्ये प्रचार करतील पण मी परवा करत नाही मी आंबेगाव मध्ये पवार साहेबांचा जोरदार प्रचार करणार आहे. यादरम्यान बोलताना, शरद पवार हे आमच्यासाठी उत्तुंग नेते आहेत पण रोहित पवार यांच्यामुळेच आम्ही बाहेर पडलो असं दिलीप वळसे पाटील यांनी तेव्हा म्हटलं होत़. आता खरंतर राजकीय विश्लेषकांच्या मतानुसार मागे अजित दादांनीच शिरूरच्या पुढील लोकसभा निवडणुकीसाठी दिलीप वळसे पाटील यांचं नाव सुचवलं होतं. पण मग शरद पवार यांनीच यात तातडीने हस्तक्षेप करून दिलीप लांडे किंवा दिलीप वळसे पाटील या नेत्यांऐवजी अमोल कोल्हेच तिथून पुढचे राष्ट्रवादीचे खासदारकीचे उमेदवार असतील असं सांगून टाकलं ,आणि या वादावर पडदा टाकला पण खरा संघर्ष तर तिथूनच उभा राहिला असावा असं मानण्यात येतंय.

( Dilip Walse Patil And Sharad Pawar Controversy | Vishaych Bhari )

आता दादांना अमोल कोल्हे न रूचण्याचं कारण म्हणजे ते सुप्रिया सुळेंच्या निकटवर्तीय नेते मानण्यात येतात . तसेच मागै एकदा त्यांनी जयंत पाटील मुख्यमंत्री व्हावे अशी सांगलीतील एका भाषणात उघड भूमिका घेत जयंत पाटील यांना अप्रत्यक्ष पाठिंबा दर्शविला होता. आणि हेच अजित दादांना न पटणारं असावं. त्यामुळे अमोल कोल्हेंना option म्हणून दिलीप वळसे पाटील किंवा दिलीप लांडे यांच्याकडे ते पाहत असावेत. दुसरीकडं भाजपलाही शिंदे गटाच्या सोबत येण्याने विशेष फरक पडलेला नाही, असा भाजपचाच इंटरनल सर्व्हे सांगतोय. म्हणून तर त्यांनी अजित दादा गटाला सोबत घेतल्याचं बोललं जातंय.‌ तेव्हा आता दिलीप वळसे पाटील यांच्यासारख्या हेवीवेट नेत्यांना भाजप लोकसभेची संधी देऊन मोदींना निवडून आणण्यात हातभार लावण्याच्या भूमिकेत आहे ,असं म्हणलं तर ही अतिशयोक्ती ठरू नये.असो पण आता कालच्या एका भाषणात दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार एवढे मोठे नेते पण आजपर्यंत राष्ट्रवादी एकहाती कधीच सत्तेत आली नाही अशा अर्थाचं एक वाक्य बोलून दाखवलं. यावरून सोशल मीडिया , मेनस्ट्रीम मीडिया तसेच शरद पवार गटातील अनेक नेत्यांनी ही दिलीप वळसे पाटील यांच्यावर टीका केली आहे. तर शिंदे गटातील नेत्यांनी वळसे पाटील यांच्या वाक्याचं समर्थन केलं आहे ‌.पण आता नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार दिलीप वळसे पाटील यांनी कालच्या विधानाबद्दल दिलगिरी व्यक्त केली असून मीडियाने चुकीच्या पद्धतीने ही बातमी लावली असं म्हणलं आहे. पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय, दिलीप वळसे पाटील, हे काल बोलताना चुकलेत का ? येणार्‍या काळात शरद पवारांशी पंगा दिलीप वळसे पाटील यांना किती महागात पडू शकेल? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर

Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇

https://www.facebook.com/aplavishaychbhari

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ajit pawar latestajit pawar liveajit pawar ncpajit pawar news livebreaking newsdilip valse patildilip walse patildilip walse patil biographydilip walse patil daughterdilip walse patil latestdilip walse patil latest newsdilip walse patil live todaydilip walse patil newsdilip walse patil on rohit pawardilip walse patil on sharad pawardilip walse patil songdilip walse patil song djdilip walse patil speechdilip walse patil statusdilip walse patil todaydilip walse patil today speechsharad pawarsharad pawar on ajit pawarsharad pawar on dilip walse patilvishaych bharivishaychbhariविषयच भारी
Comments (0)
Add Comment