ठाण्यात ज्या ज्या घरात शिवसेना रुजली त्या त्या घरातील माणसांच्या मनात आनंद दिघेंचं काय स्थानय ह्ये तुम्हाला आता वेगळं सांगायला नको. शिवसेनेचा साधा शिवसैनिक, बाळासाहेबांच्या विचाराचा पाईक त्ये थेट लोकांच्या मनातील धर्मवीर असा आनंद दिघेंचा राजकीय प्रवास तुम्ही अनेकदा ऐकला असेल किंवा अगदी त्यांच्यावर बनवलेल्या सिनेमातून ही पाहिला असेल. त्यांची हिंदू धर्माबद्दलची श्रद्धा, त्यांची काम करण्याची स्टाईल, लोकांच्या समस्या सोडवण्याबद्दल असणारी त्यांची आग्रही भूमिका, ठाणे जिल्हाप्रमुख सोडून कधीचं कुठल्या पदाची न केलेली अपेक्षा अशा कितीतरी गोष्टींसाठी दिघेसाहेब चर्चेत राहिले. अगदी त्यांच्या निधनानंतर त्यांचा मृत्यू ही कायम गूढ चर्चेचा विषय बनून राहिलाय. आज आनंद दिघेंची पुण्यतिथी. त्यानिमित्तानं आनंद दिघेंचा शेवटचा दिवस नेमका कसा होता अन ती घटना घडायच्या आधी दिघे साहेब कोणाकोणाला भेटले होते सगळं सविस्तर जाणून घेऊयात..
( Dharmveer Anand Dighe Last Day Story | Anand Dighe History | Vishaych Bhari )
24 ऑगस्ट 2001 ची पहाट. सगळ्या ठाण्यात गणोशोत्सवानिमित्त जल्लोशाचं वातावरण होतं. गणेशोत्सवाच्या काळात आनंद दिघे यांचा एक ठरलेला नियम होता. भागातल्या प्रत्येकाला कार्यकर्त्यांच्या घरी गणेशाच्या आरतीला जायचं. अगदी एकाही कार्यकर्त्याचं घर सुटलं नाय पाहिजे अन त्याचं मन दुखावलं नाय पाहिजे असं ते आपल्या सहकाऱ्यांना सांगायचे. पक्षबांधणीसाठी लोकांच्या गाठीभेटी घेणं किती महत्वाचंय याची त्यांना जाणीव होती. त्यामुळं ठरल्याप्रमाण आनंद दिघे कार्यकर्त्यांच्या घरी भेटी देत होते. दरम्यानच्या काळात खूप घटना घडून गेल्या होत्या. सततचा ताणतणाव यामुळं दिघे साहेबांच्या तब्येतीचा तक्रारी खूप वाढल्या होत्या. त्यांना चालताना, बोलताना धाप लागणे, अंगाला सतत घाम येणे अशी काही लक्षण त्यांचे सहकारी सातत्यानं नोटीस करत होते. ते दिघे साहेबांना तुम्ही आराम करा, आम्ही सगळं नियोजन बघतो असं सांगायचे पण ऐकतील ते दिघे साहेब कसले. आनंद दिघे आणि ठाण्यातला त्यांचा कार्यकर्ता यांच्यात जणू निष्ठेचं नाय रक्ताचं नातं तयार झालं होतं. त्यामुळं वैयक्तिकरित्या लोकांना भेटणं, त्यांची गाऱ्हाणी ऐकून घेण्यासाठी टेंभी नाक्यावर दरबार भरवणे, त्यांच्या समस्या सोडवणं यातच आनंद दिघेना समाधान मिळायचं. त्याशिवाय त्यांना चैन पडत नसे. पण यां सगळ्यामुळं त्यांच्या तब्येतीवर खूप वाईट परिणाम झाला होता.
ठाण्यातील पत्रकार सोपान बोंगाणे सांगतात की ” दिघेंना हार्टचा प्रॉब्लेम होता. एकदा-दोनदा आम्हीच त्यांना एडमिट केलं होतं दवाखान्यात. कारण ते आमचे चांगले मित्र होते. ते व्यवस्थित उपचार घ्यायचे नाहीत. त्यांचं स्वत: कडे नीट लक्ष नसायचं. कधीकधी अर्धवट उपचार घ्यायचे, कधीकधी दवाखान्यातून अचानक निघून जायचे. एकदा नवरात्राच्या काळात त्यांना गंभीर हार्ट अटॅक येऊन गेला. ते अंथरुणावर पडून होते. त्यांना सलाईन लावलेलं होतं. पण तरीही ते सारखं मला देवी बोलावतेय, मला गेलं पाहिजे असं म्हणून बाहेर पळायचे. तेव्हा त्यांना थांबवायला चक्क बाळासाहेब आणि मीनाताई ठाकरेंना मातोश्री सोडून ठाण्यात यावं लागलं होतं. दिघे साहेबांचा असा हट्टी स्वभाव होता. “
( Dharmveer Anand Dighe Last Day Story | Anand Dighe History | Vishaych Bhari )
गणपतीच्या दिवसात २४ ऑगस्ट २००१ रोजी पहाटे दिघे यांचा वंदना टॉकिजजवळ दुर्दैवी अपघात झाला. सार्वजनिक गणेशोत्सवांना भेट देऊन टेंभी नाक्याकडे परत येताना एसटी आगारातून बाहेर पडणाऱ्या बसवर दिघे त्यांची जीप आदळली आणि त्या अपघातात दिघे साहेबांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. डोक्यालाही जबर मार लागला. अपघात झाल्यानंतर आनंद दिघेंना तातडीनं ठाण्याच्या सिंघानिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. दरम्यान पुढच्या दिवशी त्यांच्या पायावर सर्जरी करण्यात आली होती. पायाच्या शस्त्रक्रियेनंतर दिघे साहेबांच्या तब्येतीत थोडा सुधार झालेला दिसला. त्यांना शुद्ध आल्यावर राज ठाकरेंनी दिघेंची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली. राज ठाकरेंनंतर शिवसेनेचे आणखी काही नेते पदाधिकारी सिंघानिया हॉस्पिटलमध्ये दिघेंची भेट घ्यायला आले. त्यांची प्रकृती स्थिरावत होती. दरम्यानच्या काळात संपूर्ण मुंबई ठाण्यात त्यांच्या अपघाताची बातमी पसरली होती. हजारोच्या संख्येनं लोक सिंघानिया हॉस्पिटलच्या परिसरात जमा व्हायला लागले होते. दिघेंच्या आरोग्यासाठी देवाला साकडं घालत होते. त्यांचे विश्वासू कार्यकर्ते एकनाथ शिंदे, दादा भुसे, मोदा जोशी सातत्यानं उपचारांचा मागोवा घेत होते. परंतु २६ ऑगस्टला संध्याकाळी आनंद दिघेंची प्रकृती अचानक बिघडली आणि संध्याकाळी 7 वाजून 15 मिनिटानी त्यांना पहिला हार्ट अटॅक आला. त्यातून दिघे साहेब सावरणार तोच 7 वाजून 25 मिनिटांनी त्यांना दुसरा मोठा हार्ट अटॅक आला आणि हॉस्पिटलमध्ये एकच पळापळ सुरू झाली. सिंघानिया हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ केली पण अखेर रात्री साडे दहाच्या सुमारास दिघे साहेबांची प्राणज्योत मालवली.
हॉस्पिटलमध्येचं दिघेंनी अखेरचा श्वास घेतला. त्यावेळी आनंद दिघे फक्त 50 वर्षांचे होते. हॉस्पिटलमध्ये दिघेंसोबत तेव्हा ठाण्याचे शिवसेना खासदार प्रकाश परांजपे होते. त्यांना घटनेचं गांभीर्य होतं म्हणून त्यांनी ती बातमी बाहेर जमलेल्या लोकांना अद्याप कळू दिली नव्हती. बाहेरच्या लोकांना वाटत होतं अजूनही आत दिघे साहेबांवर उपचार चालूच आहेत. पण शिवसेनेच्या काही मोठ्या नेत्यांना मात्र ती बातमी समजली होती. घटनेची माहीती मिळताचं राज ठाकरे, उद्धव ठाकरे तातडीनं सिंघनिया हॉस्पिटलमध्ये पोहोचले.
परिस्थिती हाताबाहेर चालली होती. लोकांच्यात संभ्रम वाढत होता. लोकांना खरं काय ते सांगणं गरजेचं होतं पण आनंद दिघेंचा मृत्यू झाला हे सांगण्यास कुणीच धजावत नव्हतं. शेवटी उद्धव ठाकरे यांनी त्याची जबाबदारी स्वीकारली. त्यांनी बाहेर येऊन जाहीर केलं की “आनंद दिघे आपल्यातून गेले. “
( Dharmveer Anand Dighe Last Day Story | Anand Dighe History | Vishaych Bhari )
उद्धव ठाकरे यांचं म्हणणं कानावर पडल्यावर बाहेर जमलेले दिघेचे कार्यकर्ते अक्षरशः आपलं भान हरवून बसले. तेवढ्यात कुणीतरी आपल्या दिघे साहेबांसोबत घातपात घडलाय अशी अफवा पसरवली. त्यानंतर दिघे साहेबाना पाहण्यासाठी कार्यकर्ते आणि लोकांनी पळापळ सुरू केली अन हॉस्पिटलच्या परिसरात दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. कंट्रोलच्या बाहेर गेलं सगळं आणि भावनिक झालेल्या आनंद दिघे यांच्या 1500 कार्यकर्त्यांनी संपूर्ण सिंघानिया हॉस्पिटललाचं आग लावली. तेव्हा जे सिंघानिया हॉस्पिटल जळून खाक झालं ते पुन्हा कधीच उभं राहिलं नाही. ठाणेकर आजही त्याबद्दल बोलताना म्हणतात त्या घटनेत ठाण्याच्या लोकांनी दिघे साहेबांसोबत एक चांगलं हॉस्पिटलही गमावलं. त्यानंतर घटनेची दखल घेऊन तत्कालीन उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी त्याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आणि नंतर 34 जणांना अटक करण्यात आली. आनंद दिघेंच्या मृत्यूनंतर संपूर्ण ठाणे बंद ठेवण्यात आलं होतं. पण तसं असतानाही हजारो शिवसैनिक त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहिले होते.
दिघे यांच्या निधनानंतर 2001 साली ठाण्यात झालेल्या शोकसभेत बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, ” आनंदच्या दाढीत हुकूमत होती. त्याच्या नादाला लागण्याची कोणाची हिम्मत नव्हती. “
( Dharmveer Anand Dighe Last Day Story | Anand Dighe History | Vishaych Bhari )
बऱ्याच जणांनी दिघे साहेबांच्या मृत्यूबद्दल बाळासाहेबांना टार्गेट केलं होतं. एकदा निलेश राणे तर थेट म्हणाले होते की दिघेंच्या मृत्यूला बाळासाहेबच जबाबदार होते म्हणून. ठाण्यात बाळासाहेबांपेक्षा दिघेंचं प्रस्थ मोठं व्हायला लागलं होतं, म्हणून त्यांना संपवण्यात आलं, अशाही चर्चा त्यावेळी रंगल्या होत्या. पण दिघे आणि बाळासाहेबांना ओळखणारे अनेकजण ती गोष्ट नाकारतात. पत्रकार बोंगाणे सांगतात, मला तसं कधीच वाटलं नाही. बाळासाहेबांचा दिघेंवर खूप विश्वास होता. बाळासाहेब त्यांचं कौतुक करायचे. बाळासाहेब आनंद दिघेंना आपला मुलगा मानायचे. ते म्हणायचे, मला जरी तीन मुलं असली तरी आनंद माझा चौथा मुलगाच होता. आनंद दिघे एकाच जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी काम करत होते. त्यांच्या कामाचं क्षेत्र ठाणे होतं. पण बाळासाहेबांच्या कामाचं क्षेत्र महाराष्ट्र होतं. त्यामुळे या दोघांची तुलना होऊ शकत नाही. आनंद दिघे मोठे होते पण ते त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये. याचा अर्थ असा होत नाही की, ते बाळासाहेबांच्या स्पर्धेत होते. ठाणे वैभव या वर्तमानपत्राचे संपादक मिलिंद बल्लाळ म्हणतात की आनंद दिघे आणि बाळासाहेब यांचं नातं चागंल होतं. बाळासाहेब त्यांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहायचे. शिवाय बाळासाहेब वयानंही त्यांच्यापेक्षा मोठे होते. बाळासाहेबांना त्यांची भीती वाटायचं काही कारणच नव्हतं, त्यामुळे दोघांमध्ये स्पर्धा असण्याचं कारणही नव्हतं.
( Dharmveer Anand Dighe Last Day Story | Anand Dighe History | Vishaych Bhari )
पण बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्यात सारंकाही अलबेल नव्हतं, असं ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांचं मत आहे. अकोलकरांनी शिवसेनेवर ‘जय महाराष्ट्र! हा शिवसेना नावाचा इतिहास आहे’ हे पुस्तक लिहिलं आहे. अकोलकर सांगतात, “आधी ठाकरे आणि आनंद दिघे यांचे संबध चांगले होते, ठाणे आणि परिसर ठाकरेंनी दिघेंना आंदण दिला होता. त्या भागात दिघेंचा शब्द अंतिम मानला जायचा. त्यावेळी बाळासाहेबांना असं वाटलं असावं की ते आपल्यापेक्षाही मोठे होतात की काय, कोणत्याही राजकीय नेत्याला स्वतःपेक्षा दुसऱ्या नेत्याची प्रतिमा मोठी झालेली आवडत नाही आणि त्यामुळेच त्या दोघांमध्ये तणाव निर्माण झाला. खरं तर आता लोकं दिघे साहेबांच्या मृत्यूबद्दल अनेक शंका कुशंका उपस्थित करतात. पण आनंद दिघे ठाण्याचे किंगमेकर होते ह्ये मात्र नक्की. ठाण्यातील नगरसेवका पासून खासदारापर्यंत एकही माणूस त्यांच्या सपोर्टशिवाय निवडून येत नसे. त्यांना लोकांनी ठाण्याचे बाळ ठाकरे अशी उपाधी दिली होती. त्यांच्या निधनाच्या 23 वर्षांनंतरही ठाण्यातले शिवसैनिक आनंद दिघेंचं नाव आदराने घेतात. म्हणून तर त्यांच्या तालमीत तयार झालेले एकनाथ शिंदे यांनी सुद्धा त्यांच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ धर्मवीर आनंद दिघे यांना स्मरण घेतली होती. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आनंद दिघे यांच्या शेवटच्या काळातील आठवणींना उजाळा देणारी ही माहीती तुम्हाला कशी वाटली त्ये आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा लेख आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा.
Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇
https://www.facebook.com/vishaychbhari
https://www.facebook.com/aplavishaychbhari
One response to “धर्मवीर आनंद दिघे यांचे शेवटचे २४ तास कसे होते | Dharmveer Anand Dighe Last Day Story | Vishaych Bhari”
-
Mast kup can
Leave a Reply Cancel reply