दादा कोंडके यांचे हे ५ डबल मिनिंग सिनेमे आजही अजरामर आहेत | Dada Kondke Marathi Movie Vishaych Bhari


दादा कोंडकेंच्या पळवापळवी सिनेमातला एक सीन. नवरी मुलीचा बाप त्याच्या मुलीसाठी नवरा मुलगा बघायला दादांच्या घरी आलेला असतो. दादा नेहमी त्यांच्या सिनेमात दिसतात तसे गोंधळलेल्या अवस्थेत हाफ चड्डीवर इनशर्ट करून त्यांच्या समोर येऊन बसतात. अन मग त्यांच्यात सुरु होते संवादफेक. दादा विचारतात, आजपर्यंत तुमच्या पोरीला किती जणांनी मागणं घातलं. त्यावर, नवरीचा बाप म्हणतो, दोन चार जणांनी घातलं, पण आम्ही त्ये मोडून टाकलं, त्यावर दादा म्हणतात. मोडून टाकलं, कसं ? नवरीचा बाप हाताची एक्शन करून म्हणतो हे असं काडदिशी, त्यावर दादा म्हणतात म्हंजी तुम्ही उद्या आमचं बी, असं काडदिशी. दादांच्या त्या डायलॉगवर हसला नाय असा एक बी माणूस तुम्हाला महाराष्ट्रात शोधून सापडणार नाय. अशा शेकडो डब्बल मिनिंग डायलॉगनी दादा कोंडके यांना गावगाड्यातल्या लोकांपर्यंत पोहोचवलं. बरं फक्त डायलॉगचं नाय तर तुझ्या हिरीचं पाणी लय ग्वाड, पोरी जरासा लावशील का हात माझ्या अंगाला, वर ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ, दे ना एकच मुका, मळ्याच्या मळ्यामधी कोण गं उभी अशी त्यांची अनेक गाणीही लोकांच्या कायम ओठांवर राहिली. काही अभिजात म्हणवल्या गेलेल्या लोकांनी दादांच्या सिनेमाला कायम अश्लील म्हणून हिणवलं पण दादांच्या सिनेमात फक्त डब्बल मिनिंग विनोद नव्हता. त्यांचे सिनेमे मोस्ट ऑफ गावगाड्यातल्या, तळागाळातल्या लोकांचं अस्सल जगणं मार्मिक पद्धतीनं दाखवायचे. आजच्या या Blog मध्ये आपण दादांच्या कारकिर्दीतल्या त्याचं top ५ डब्बल मिनिंग पण आशयपूर्ण सिनेमांचा आढावा घेणारंय.

(Dada Kondke Marathi Movie Vishaych Bhari)


तर लिस्टमधला दादांचा पहिला सिनेमाय, पळवापळवी.

दादा कोंडके, उषा चव्हाण, दिनानाथ टाकळकर, राघवेंद्र कडकोल, दिनकर इनामदार, वसंत शिंदे, आशा पाटील, शांता इनामदार, राहुल सोलापूरकर यांसारख्या तगड्या स्टारकास्टला घेवून दादांनी तो सिनेमा बनवला होता. फक्त पळवापळवीच्या थीमवर आधारित त्या सिनेमाला त्याकाळी महाराष्ट्रभर हाऊसफुल्लचे बोर्ड लागले होते. सिनेमातल्या डब्बल मिनिंग डायलॉगवर पब्लिक उलथपालथं होऊन हसत होतं. सिनेमात सगळ्यात जास्त मार्केट खाल्लं होतं त्ये दादा कोंडके यांनी साकारलेला वेंधळा शिरपा आणि दिनानाथ टाकळकर यांनी साकारलेल्या गोळे गुरुजी या व्यक्तीरेखांनी . त्यातल्या त्यात गोळे गुरुजींच्या निरागस अभिनयामुळं पिच्च्चरला आणखीनचं जास्त रंगत चढली. सिनेमात एक सीनय. एकदा वेंधळ्या शिरपाला धडा शिकवायला गेलेल्या असताना हौसा उर्फ उषा चव्हाण यांच्या पायावर म्हैस बसते. त्यामुळं त्यांच्या पायाला दुखापत होते. त्यावेळी त्या गोळे गुरुजींना त्यांचा पाय चोळायला बोलावतात. तेव्हा गुरुजी हौसाचा पाय चोळत असताना निरागसपणे म्हणतात, माझ्या हाताला खूप गुणय बरं का, त्यामुळं गावातल्या सगळ्या बायका मलाच पाय चोळायला बोलावतात. आता माझं नाव काय, गोळे गुरुजी पण लोकं मला चोळे गुरुजी म्हणतात. तेवढ्यात शाळा सोडून मास्तर बाईचा पाय चोळत बसलाय म्हणून रागावलेला शिरपा तिथ येतो अन मास्तरांना म्हणतो, खुशाल शाळा सोडून इथं बाईचा पाय चोळत बसलाय व्हय, गपगुमान बाईचा पाय सोडा, त्यावर गोळे मास्तर म्हणतो, एकवेळ शाळा सोडीन पण बाईचा पाय सोडणार नाय. तर अशी सगळी धम्मालय पण त्यात ही दादांनी त्यांच्या टिपिकल स्टाईलमध्ये सिनेमात गावाकडं दुर्लक्षित असलेली शिक्षण व्यवस्था, राजकारणातली हरवलेली नैतिकता यावर मार्मिकपणे बोटं ठेवलंय, आता कुठं त्ये इचारू नका.

(Dada Kondke Marathi Movie Vishaych Bhari)

पुढं दुसरा सिनेमाय, सासरचं धोतर. 

1991 ला अलका कुबल यांचा माहेरची साडी हा सिनेमा आला होता. तो सिनेमा पाहून गावागावातल्या बायका हमसून हमसून रडत होत्या. तो सिनेमा तेव्हा सुपरडुपर हिट ठरला होता. त्या सिनेमाची लोकप्रियता डोक्यात ठेवून आपल्या अवलिया दादांनी  लगेच सासरचं धोतर नावाचा भन्नाट कॉमेडी पिच्चर काढला. माझ्या माहितीप्रमाणं माहेरची साडी पाहून बायका जेवढं रडल्या त्येज्या डब्बल सासरचं धोतर पाहून हसल्या. दादा कोंडके, सुधीर जोशी, विजय चव्हाण, उषा चव्हान, अशा अनेक दिग्गज कलाकारांनी अभिनय केलेला तो सिनेमा. सिनेमाच्या नावातच गंमत होती त्यामुळं त्याला वेगळ्या पब्लिसीटीची गरजच पडली नाय. त्याकाळी सासरचं धोतर रिलीज झालं तेंव्हा, गावा-गावात धोतर लटकवून त्यावर सिनेमाचं नाव लिहून जाहिरात केली जात होती. काही टॉकीज मध्ये तर भाग्यवान प्रेक्षकांना चक्क धोतराचं पान गिफ्ट दिलं जायचं. त्या सिनेमात एक सिन आहे. उषा चव्हाण एक गाठ बांधलेला रुमाल सोडवण्याचा प्रयत्न करत करत दादांकडे येतात, पण ती गाठ काही त्यांना सुटत नसते. शेवटी तो रुमाल दादाच्या हातात देत उषाताई म्हणतात, ह्यात माझं सामानय, मला ही गाठ सोडवून द्या. दादा गाठ बघून म्हणतात, बाई गाठ एवढी पक्की मारायची नाय.

(Dada Kondke Marathi Movie Vishaych Bhari)


एवढी पक्की गाठ मारली तर वरच्या गाठीवरचा तान खालच्या गाठीवर पडतो, खालच्या गाठीवरचा ताण त्याच्या खालच्या गाठीवर पडतो आणि मग सामनावर ताण येतो आणि मग सामानावर ताण आला की सामानाचा पार बुक्का होतो. आता तो डबल मिनींग संवाद पण दादांनी इतक्या चपखल पद्धतीनं सिनेमात बसवलाय की काय बोलायलाचं नको. पुढं दादा सिनेमात उंदीर बरोबर बिळात गेला, कुठलाबी प्राणी बिळाशिवाय येत नाय आन बिळाशिवाय जात नाय, धोतरात बुद्धिमत्ता असते असे काही जबराट डबल मीनिंग डायलॉग्ज वापरतात तेव्हा सिनेमा पाहणारा गडागडा लोळायचा तेवढा बाकी राहतो. दादांच्या त्या डॉयलॉग्जला बिचारे सेन्सॉरवाले सुद्धा काही करू शकले नाहीत ही दादांची खासीयत होती. बरं दादा फक्त डबल मिनींग संवाद लिहायचे असं नाही. त्यांनी अनेकदा समाजव्यवस्थेवर बोट ठेवणारी, व्यवस्थेला प्रश्न विचारणारी अनेक मार्मिक वाक्य सुद्धा सिनेमात वापरली. आता त्याचं सिनेमातलं उदाहरण घ्या, दादा आणि उषा चव्हाण एका बागेत बसलेले असतात. त्यांच्यात प्रेम संवाद चालू असतो. तेवढ्यात दादा चांगल्या व्यक्तीचा स्वभाव आणि श्रीमंतीबद्दल खोल विचार करायला लावणार वाक्य वापरतात. दादा म्हणतात या जगात श्रीमंत माणूस चांगला असूच शकत नाही, अन चांगला माणूस श्रीमंत होऊचं शकत नाही. हाय कनाय इचार करण्यासारखी गोष्ट.

(Dada Kondke Marathi Movie Vishaych Bhari)

आता तिसरा दादांचा डब्बल मिनींग सिनेमाय येऊ का घरात.

त्यात दादा कोंडकेसोबत उषा नाईक आणि मधू कांबिकर यांनी धम्माल आणलीये. 1992 साली आलेला सिनेमा. त्याकाळी येऊ का घरात सिनेमाची एवढी हवा झालेली की लोकं पहाटे पासून सिनेमागृहाबाहेर तिकिटासाठी रांगा लाऊन बसायची. त्यात सिनेमात दादा पोस्ट मास्टरच्या भुमीकेत होते. एका सिनमध्ये एक माणूस पार वैतागून आपली शेळी घेऊन दादांकडे येतो अन म्हणतो, तुला बायको नाही तर माझी शेळी तुझ्या घरात ठेऊन घेतो का ? कारण माझ्या बायकोला शेळीची घाण सहन होत नाय, ही शेळी तुझ्याकडं ठेवली, तर तुला फायदा होईल अन तुला चांगलं दुध बी प्यायला मिळंल. त्यावर दादा म्हणतात असं आसलं तर मग एक काम कर. शेळी तु तुझ्याच घरात बांध अन बायको माझ्या घरात आणून दे. त्ये ऐकल्यावर समोरच्या माणसाची काय पंचांईत झाली असलं इचार करा. पुढं अजून एका सीनमध्ये दादा नदीवर आपले कपडे धूत असतात. शेजारीच उषा नाईक बसलेली असते. ती विचारते मी मदत करु का, त्यावर दादा म्हणतात, आम्हाला बायकांकडून मदत घ्यायची सवय नाही. आमचं आम्हीच सगळं धूतो. हाय कनाय समदा येड्याचा बाजार. त्या सिनेमातली टेकडीवाल्या बाबाची केळ, मला खाटच्या आवाजानं कसं तरी होतय हे सीन सुद्धा तुफान गाजले. 

(Dada Kondke Marathi Movie Vishaych Bhari)

आता लिस्टीतला चौथा सिनेमाय. बोट लाविन तिथ गुदगुल्या

अगदी नावाप्रमाणचं स्टार्ट टू एन्ड हा सिनेमा गुदगुल्या केल्यागत बेक्कार पब्लिकला हसवतो. पुष्पा भोसले, पद्मा चव्हाण, उषा चव्हान, दिनकर इनामदार, मोहन कोठणीस आणि खुद्द दादा कोंडके यांच्या बहारदार अभिनयानं नटलेला हा सिनेमा. सिनेमानं अनेक रेकॉर्ड मोडली आणि बनवली सुद्धा. सिनेमातल्या सीनसोबत त्यातली गाणी सुद्धा डबल मिनींग होती. पण त्यातल्या ढगाला लागली कळं या गाण्याबद्दलचा एक किस्सा सांगतो. मंडळी ढगाला लागली कळ ह्ये गाणं आज सुद्धा कित्येक लग्नाच्या वरातीत, डी जे शोमध्ये, बिअरबार, डान्सबारमध्ये ऐकायला मिळतं. एवढचं काय हिंदी सिनेमातले हिरो हिरोईन सुद्धा त्या गाण्यावर बेभान होऊन नाचतात. ते सुद्धा मोठ्या अवॉर्ड शो मध्ये.. इतकी त्या गाण्यानं सगळ्यांना मोहिनी घातलीये. एकदा गाणं ऐकलं की अधून मधून ते गाणं प्रत्येकाच्या ओठावर येतच असतं. बरं त्या गाण्याची एक खास गोष्ट म्हणजे जगभरात सगळ्यात जास्त ऐकल्या गेलेल्या भारतीय सिनेमातल्या गाण्यापैकी ते एक अस्सल मराठमोळ गाणं आहे. त्या गाण्यातलं एक कडवंय,

जमीन आपली, उन्हानी तापली, लाल लाल झालीया माती,

करुया काम आणि गाळूया घाम, चल पिकवू माणिक मोती

. एका वर्षात होइल तीळ. पाणी थेंब थेंब गळ

.आता त्या ओळींना शब्दशः घेतलं तर, तर ऐकता क्षणी त्ये एक शेतकरी गीत वाटतं, पण दादांचा मुड लक्षात घेऊन ऐकलं तर जे काय वाटतं त्याचा इचार तुमचा तुम्ही करा. आम्ही सांगत नाय.

(Dada Kondke Marathi Movie Vishaych Bhari)

आता दादांचा शेवटचा सिनेमाय मला घेऊन चला.

1989 साली आलेला हा सिनेमा. यात सुद्धा डबल मीनिंग संवादाचा खरमरीत तडका भरलेला होता. त्या सिनेमातला एक भन्नाट सीनय, सिनेमाची व्हिलन बाय हळव्या मनाच्या मधू कांबिकरांना सारखा त्रास देत असते, तिला धडा शिकण्यासाठी दादा कोंडके इस्त्री करताना तिच्या जीन्समध्ये चक्क खेकडा सोडतात आणि तिला जीन्स घालायला देतात, आता खेकड्याची जीन्स घातल्यावं व्हीलन बायचं काय झालं असेल इचार करा. दरम्यान ती व्हीलन बाय मला पॅन्ट मध्ये काहीतरी चावतय असं ओरडते, दादांना मदतीसाठी बोलावते, तेव्हा दादा तिला सांगतात बाई जीन्स उतरवावी लागेल. मग पुढं काय होतंय त्यासाठी तुम्हाला सिनेमा पाहावा लागेल.

(Dada Kondke Marathi Movie Vishaych Bhari)


अगदी बिळात शिरण्यापासून, खड्ड्यात पडण्यापर्यंत दादांच्या संवादानी जी काय मजा आणलीये ती बासच. मंडळी पण लोकांना वाटतं की दादा फक्त डबल मीनिंग सिनेमेचं बनवायचे, पण तस नाहीये, दादांनी त्यांच्या सिनेमातून अस्सल ग्रामीण जीवनाचं  चित्र रेखाटल, गावच्या माणसांच निरागस जगण शहरातल्या पांढरपेक्षा लोकांपर्यंत पोहचवलं. गाव, गाव पातळीवरचं राजकारण, तिथली माणस हे सगळ दादांच्या सिनेमात तंतोतंत दाखवलं आहे, म्हणूनच त्यांचे सिनेमे गाजले. त्या काळी थिएटर वाल्यांना त्यांच्या सिनेमाचे एक्स्ट्रा शो लावावे लागायचे, तेही हाऊसफुल असायचे. गावच्या गावं बैल गाड्या घेऊन सिनेमाला यायची. त्याकाळी दादांच्या सिनेमांनी सिल्वर जुबली सिनेमाची वळमाळचं लावलेली. एका ठराविक वर्गातली लोक दादांच्या सिनेमाला कायम अश्लील म्हणून हिणवायची. पण दादांच्या सिनेमात फक्त डब्बल मिनिंग विनोद नव्हता. तर अनेक गोष्टीवर केलेलं सडेतोड भाष्य होतं. ते तत्कालीन राजकारण्यांच्या भूमिकांवर ही बेधडक भाष्य करायचे. त्यांनी गावगाड्यातल्या पिचलेल्या, अज्ञानी, भोळ्याभाबड्या लोकांचं अस्सल जगणं मार्मिक पद्धतीनं दाखवलं. त्यासाठी त्यांनी सर्वसामान्य लोकांना समजेल अशी त्यांची बोलीभाषा सिनेमात वापरली. ह्ये तंत्र सहजासहजी कुणाला अवगत होतं नाही. ही किमया आधी फक्त तमाशा कलावंताना आणि वगनाट्यकारांना साध्य व्हायची. दादा कोंडकेंच्या त्या सामान्य लोकांचं जगणं मांडणाऱ्या असामान्य कलेची नोंद गिनीज बुकानं सुद्धा घेतली होती. पण त्या ही पेक्षा महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या गावगाड्यातल्या जनतेने त्यांच्यावर जीवापाड प्रेम केलं. अन त्याचं माणसांनी अद्याप दादांना त्यांच्या कलेतून आपल्यात जिवंत ठेवलंय. तर आम्हाला दादांचे हे पाच सिनेमे खूप आवडले होते. पण तुम्हाला दादांचे नेमके कोणते सिनेमे आवडले अन त्यातले कोणते डब्बल मिनिंग डायलॉग्ज आठवणीत आहेत, तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

दादा कोंडके यांचे हे ५ डबल मिनिंग सिनेमे आजही अजरामर आहेत | Dada Kondke Marathi Movie Vishaych Bhari

Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇

https://www.facebook.com/vishaychbhari

https://www.facebook.com/aplavishaychbhari

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

breaking newsdada kondkedada Kondke bhashandada kondke biographydada Kondke che marathi ganedada kondke comedydada kondke dj songdada kondke familydada kondke marathi chitrpatdada kondke marathi moviedada kondke marathi songdada kondke moviedada kondke picturedada kondke songsdada kondke specialdada Kondke superhit ganedada Kondke video songvishay bharivishaych bharivishaychbhariyeu ka gharatदादा कोंडकेदादा कोंडके मराठी चित्रपटविषय भारीविषयच भारी
Comments (0)
Add Comment