ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीचा काळ. डी डी नॅशनल आणि डी डी सह्याद्री या दोन चॅनेलवर समस्त महाराष्ट्र आपल्या एंटरटेनमेंटची भूक भागवत होता. त्यातल्या गावाकडच्या लोकांना सगळ्यात जास्त ओढ असायची ती दर रविवारी संध्याकाळी 4 वाजता लागणाऱ्या मराठी सिनेमांची. गावात मोजून तीन टेलिव्हीजन होती त्यामुळं एका टीव्हीसमोर पन्नास पन्नास लोकं येऊन बसायची. त्याचंकाळात आमच्या पाहण्यात एक सिनेमा आला आन आख्ख्या गावाची हसून हसून पुरती वाट लागली. त्या सिनेमाचं नाव होतं बिनकामाचा नवरा. त्याकाळी नवरा बायकोच्या नात्यापासून गावागावातल्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारा उत्तम सिनेमा होता तो. खरं तर त्यात रंजना, निळू फुले, अशोक शराफ या सगळ्यांनीचं धम्माल आणलेली पण विशेष मार्केट खाल्लं ते म्हणजे हँडसम हंक कुलदीप पवार यांनी. त्या सिनेमांत कुलदीप पवार जे काही गावरान भाषा बोललेत कनाय.. आहाहा…नादखुळा. कुलदीप पवार म्हणजे मराठी सिनेमाला लाभलेला एक देखणा, रांगडा आणि अष्टपैलू अभिनेता. पण मंडळी कुलदीप पवारांचा सुरुवातीचा काळ खूप संघर्षातून उभा राहिलेलाय. आजच्या या Blog मध्ये आपण त्यांचाच सगळा जीवन प्रवास जाणून घेणारय,
(Ashok Saraf, Lakshya | Kuldeep Pawar Biography)
मंडळी, कोल्हापूरच्या मातीत १० जून १९४९ रोजी कुलदीप पवारांचा जन्म झाला. कोल्हापूरच्या मातीतला रांगडेपणा लहानपणापासूनच त्यांच्या अंगात ठासून भरला होता.. त्यांचे वडील बाळ पवार हे त्यावेळी नोकरी करत होते.. पण त्यांना सिनेमांचं सुद्धा आकर्षण होतं.. त्यावेळी कोल्हापूरला कलापंढरी म्हणून सुद्धा ओळख मिळालेली होती. त्यामुळं बऱ्याच सिनेमाचं शूटिंग आणि नाटकांचे प्रयोग तिथं व्हायचे. म्हणूनच ते नोकरी करता करता सिनेमात छोट्या-मोठ्या भूमिका करायचे. त्याशिवाय ते उत्तम माउथ ऑर्गन देखील वाजवायचे. तसंच कुलदीप पवारांची आई शांतादेवी सुद्धा कलाकार होत्या. त्या अतिशय उत्कृष्ट नकला करायच्या. आपल्या आई-वडिलांचे ते सगळे कलागुण रक्तात घेऊनचं कुलदीप पवार जन्माला आले होते. खासकरून आईचं देखणेपण अन वडिलांचं रांगडेपण. अगदी लहानपणापासून त्यांच्या मनात अभिनयाबद्दल खूप आकर्षण होतं. पुढं सेंट झेवियर्स शाळेत त्यांनी ऍडमिशन घेतलं. त्या शाळेत त्यांच्यातल्या कलागुणांना वाव मिळाला. कुलदीप पवार शाळेतल्या छोट्या मोठ्या नाटूकल्यांमध्ये अभिनय करू लागले. तेव्हा शाळेतले सगळे शिक्षक त्यांची अभिनयाची समज पाहून थक्क व्हायचे. दरम्यान ज्याकाळात सिनेमा आणि नाटकाला फार ग्लामर प्राप्त झालं नव्हतं किंवा कलाक्षेत्रात काम करणं म्हणजे भिकेचे डोहाळे लागले असं समजलं जायचं त्याकाळात कुलदीप पवारांनी अभिनय क्षेत्रातचं करिअर करायचं असं त्यांच्या मनाशी पक्क केलं. पण कलाक्षेत्रात सुरुवातीला किती खस्ता खाव्या लागतात याची त्यांच्या घरच्यांना कल्पना होती त्यात जर आपल्या पोराचा निभाव लागला नाही तर तो कायमचा आयुष्यातून उठेल अशी त्यांच्या पालकांना भीती होती.
(Ashok Saraf, Lakshya | Kuldeep Pawar Biography)
त्यामुळं आपल्या मुलानं काहीतरी ठोस कमाई करावी अशी त्यांच्या घरच्यांची इच्छा होती. पण कुलदीप पवार त्यांच्या हट्टावर अडून राहिले. पुढं मग मुलाची इच्छा पाहून तुला अगदीच त्या क्षेत्रात काहीतरी करावं असं वाटतय तर आजोबांची सांगली कोल्हापूरकडची थेटर्स सांभाळ असं त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितलं. पण कुलदीप पवारांच्या मनातलं अभिनयाचं वेड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हतं. एकीकडे घरच्यांचा विरोध आणि दुसरीकडं अभिनयाची प्रचंड ओढ या द्विधा अवस्थेमुळं त्यांच्या मनात मोठा संघर्ष चालू होता. नेमकं काय निवडाव कळत नव्हतं. बरं आपल्या मनासारखं केलं आणि वडील म्हणाले तसं आपला त्या क्षेत्रात निभाव लागला नाही तर मग आपण काय करायचं हा यक्षप्रश्नही होताचं. पण त्या वयात मुलं विद्रोही असतात. कुलदीप पवारांनी मनाचं ऐकलं आणि त्यांना अभिनेताच व्हायचंय असं घरात सांगितलं. घरच्यांना त्यांचा हा निर्णय पटला नाही म्हणून शेवटी त्यांनी रागारागात घर सोडलं आणि ते पळून कऱ्हाडला आले. त्यावेळी त्यांचं वय होतं अवघ सोळा वर्षे. दरम्यान आवेशात येऊन घर तर सोडलं पण पोटापाण्याचं काय. त्यासाठी पैसा लागतोचं की. मग त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहायचं ठरवलं आणि ते हिंदुस्थान गिअर्स नावाच्या कंपनीत कामाला लागले. एवढंच नाही तरीही पैसे कमी पडू लागले म्हणून ते पार्ट टाईम कचरा उचलण्याचं ही काम करू लागले. त्यावेळी त्यांचा पगार होता 90 रुपये. आता पोटापाण्याची थोडीफार सोय झाली होती पण अभिनयाचं वेड स्वस्थ बसू देत नव्हतं. म्हणून मग ते पैसे वाचवून नाटक बघायला जायचे आणि नाटकातल्या कलाकारांच्या अभिनयाचा बारकाईनं अभ्यास करायचे. वर आणखी कुणी कुठून तरी नाटकात काम करायची संधी मिळते का ते सुद्धा पाहायचे. त्यांची ती धडपड कृष्णा पाटील यांच्या लक्षात आली.. त्यांनी कुलदीप पवार यांच्यातली अभिनयाची भूक ओळखली अन एक माती अनेक नाती या चित्रपटासाठी त्यांना विचारलं.
(Ashok Saraf, Lakshya | Kuldeep Pawar Biography)
त्यांनी क्षणाचा ही विचार न करता होकार दिला. तो त्यांचा पहिलाच चित्रपट होता त्यामुळं त्यांनी त्यांचं सर्वस्व पणाला लावलं पण तो सिनेमा काय जास्त चालला नाही. पण तरीही ते खचले नाहीत. त्यांनी स्वतःमध्ये सुधारणा करायला सुरुवात केली. इथं राहून आपलं काय होणार नाही याची खात्री पटल्यावर त्यांनी तडक पुणे गाठलं. त्यावेळी पुण्यात मोठमोठे कलाकार राहायचे. त्यांच्याशी ओळख वाढवून जेवढं त्यांच्याकडुन शिकता येईल तेवढं शिकून घेतलं. पण टॅलेंट दाखवण्याची संधी काही त्यांना मिळत नव्हती. पुढं पुण्यातही काही होईना म्हणून ते स्वप्नांच्या नगरीत म्हणजेच मुंबईला आले. बरीच खटपट केल्यानंतर तिथं त्यांची ओळख प्रभाकर पणशीकरांशी झाली. पहिल्या भेटीतच कुलदीप पवार यांनी त्यांच्यावर आपली छाप पाडली.. त्यावेळी पणशीकर ‘इथे ओशाळला मृत्यू’ या नाटकाच्या तयारीत होते.. त्यातल्या संभाजी राजांच्या भूमिकेसाठी कलाकार शोधत होते. बराच शोध घेऊन सुद्धा त्यांना मनासारखा अभिनेता मिळत नव्हता. पण कुलदीप पवारांना भेटल्यानंतर त्यांचं मत बदललं. पवारांचं गोरगोमटं आणि राजबिंड रूप, त्यांची देहबोली हे सगळंचं संभाजीराजांच्या भूमिकेसाठी अतिशय परफेक्ट होतं. बारीक कोरीव मिशी ही त्यांच्या व्यक्तीमत्वाला परफेक्ट सूट व्हायची. म्हणूनच पणशीकरांनी त्यांना सिलेक्ट केलं. त्या संधीचं कुलदीप पवारांनी सोनं केलं आणि प्रेक्षकांची मनं जिंकली. ते नाटक खूप गाजलं आणि तिथूनच कुलदीप पवारांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. नाटक सिनेमा मालिका अशा वेगवेगळ्या क्षेत्रातनं त्यांची मागणी वाढू लागली. अभिनेता म्हणून कुलदीप पवार किती प्रतिभाशाली होते ह्ये त्यांच्या भूमिकेच्या विविधतेतून तुम्हाला लक्षात येऊ शकतं. त्यांनी नायकाबरोबर खलनायकाच्या भूमिका देखील त्याचं ताकदीनं साकारल्या. त्यांचा नायक जितका करारी होता तितकाच त्यांचा खलनायक बेरकी होता. त्यांचा खलनायक पाहिला की बायका कडाकडा बोटं मोडायच्या. त्यांनी संसार पाखरांचा सिनेमात केलेलं काम विशेष गाजलं. कदाचित लव्ह ट्रायन्गलवर बनलेला तो मराठीतला सर्वात भारी सिनेमा होता. बरं विनोदी भूमिकेत सुद्धा ते अजिबात मागे राहिले नाहीत.
(Ashok Saraf, Lakshya | Kuldeep Pawar Biography)
त्यातल्या त्यात बिनकामाचा नवरामध्ये त्यांनी निळू फुले आणि अशोक शराफ यांच्याबरं जी धम्माल उडवून दिली त्याला तोड नाय. त्या सिनेमात कुलदीप पवारांनी जो गावरान बोलीभाषेचा टोन पकडला होता तो सुद्धा लोकांना भयाण आवडला. काही जाणकारांच्या मते राजा गोसावी यांच्यानंतर अस्सल गावरान कोल्हापुरी भाषा फक्त कुलदीप पवारांनीचं पडद्यावर प्रभावीपणे जिवंत ठेवली. तसंच गुपचूप गुपचूपमधला त्यांचा पाहिले न मी तुला तू मला न पाहिले हे वाडकरांच्या आवाजातलं गाणं म्हणणारा सालस गायक सुद्धा लोकांना खूप आवडला. गाणं म्हणताना त्यांनी केलेले हावभाव आजसुद्धा लोकांच्या मनावर छापले गेलेत. त्याकाळात अश्रूंची झाली फुले, होनाजी बाळा, वीज म्हणाली धरतीला, पती सगळे उचापती, इथे ओशाळला मृत्यू, पाखरू, लग्नाची बेडी, असाही एक औरंगजेब, आव्हान, एन्काउंटर, गोलमाल, जरा वजन ठेवा, तीन लाखांची गोष्ट, तुझी वाट वेगळी, नकटीच्या लग्नाला, निष्कलंक अशी काही गाजलेली नाटके त्यांना मिळाली. बाकी त्यांच्या सदाबहार सिनेमाची नावं घ्यायची म्हणलं तर एक व्हिडीओ पुरणार नाय. पण तरीही तुम्हाला त्यांच्या काही मोजक्या गाजलेल्या सिनेमांची नाव सांगतो. कुलदीप पवारांचे जावयाची जात, बिनकामाचा नवरा, नवरे सगळे गाढव, अरे संसार संसार, गोष्ट धमाल नाम्याची, शापित, झुंज एकाकी, कुंकवाचा टिळा, गुपचूप गुपचूप, भारतीय, मराठा बटालियन, आई तुळजाभवानी, तांबव्याचा विष्णू बाळा, पैजेचा विडा, सर्जा, वजीर, दूध का कर्ज हे सिनेमे रसिकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. अरे संसार संसार मधली त्यांच्यावर चित्रित झालेली गाणी तर जाम सुपरहिट झाली. कुलदीप पवार यांनी त्याकाळातल्या एकूण एक टॉपच्या नायिकेसोबत काम केलं पण त्यातल्या त्यात त्यांची विशेष जोडी जमली ती म्हणजे रंजना आणि मधू कांबीकर यांच्यासोबत. दरम्यान छोट्या पडद्यावरही त्यांनी ‘परमवीर’मधून आपली वेगळी छाप पाडली. ‘तू तू मैं मैं’ या मालिकेतून त्यांनी प्रेक्षकांना पोटधरुन हसवल.. पती सगळे उचापती या नाटकातली त्यांची कंजूस काकाची भुमिका फारच गाजली.. त्या नाटकात ते प्रमुख भूमिकेत नसून सुध्दा त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात छाप पाडली.. या नाटकावरूनच ‘ ऑल द बेस्ट ‘ नावाचा हिंदी सिनेमा देखील काढण्यात आला होता.. रखेली या नाटकातली त्यांची भूमिका थोडी अपवादात्मक होती. पण त्यांनी त्यात सुद्धा आपल्या अभिनयाची वेगळी छाप सोडली आणि त्यांना डॅडी अशी नवी ओळख मिळाली. सिनेसृष्टीच्या ग्लॅमर पलीकडे त्यांनी आपलं वैयक्तिक जीवन सुद्धा अतिशय उत्कृष्टपणे जपलं.. त्यांची पत्नी नीलिमा आणि दोन मुलं सुद्धा मनोरंजन क्षेत्राशी निगडित आहेत.
(Ashok Saraf, Lakshya | Kuldeep Pawar Biography)
2014 साली त्यांना अंधेरी इथल्या कोकिळाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची बातमी आली.. तिथे त्यांच्यावर आय सी यु मध्ये उपचार सुरू होते.. लोकांना खळखळून हसवणारा, आपल्या बेरकी नजरेने त्यांना घाबरवणारा, त्यांचं निखळ मनोरंजन करणारा अभिनेता स्वतः हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत होता.. त्यांचं मूत्रपिंड निकामी झालं होतं.. दोन दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते.. डॉक्टरांनी अथक प्रयत्न केले पण त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही.. आणि शेवटी मनोरंजन सृष्टीच दुर्दैव म्हणून २४ मार्च, २०१४ रोजी वयाच्या ६४व्या वर्षी मूत्रपिंडांच्या आजाराने निधन झाल. त्यांच्या जाण्याने मनोरंजन सृष्टीने एक अष्टपैलू अभिनेता गमावला. अनेक मन हळहळली. त्यांची पोकळी आजही भरून निघणं शक्य नाही.. कोल्हापूर ते मुंबई असा त्यांचा प्रसिद्धीचा प्रवास आजही अनेक नवोदित कलाकारांना प्रेरणा देतो. ते आज जरी आपल्यात नसले तरी त्यांचा नाटकातला सिनेमातला अभिनय आजही आपल्याला हसवतो, रडवतो आणि आपलं मनोरंजन करतो. बाकी कुलदीप पवारांची नेमकी कोणती भूमिका तुम्हाला जास्त आवडलेली ह्ये आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसंच तुम्हाला अजून कोणत्या अभिनेता किंवा अभिनेत्याचा जीवनप्रवास आमच्याकडून ऐकायचा असेल तर त्याचं ही नाव कमेंटमध्ये सांगा.
Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇
https://www.facebook.com/vishaychbhari
https://www.facebook.com/aplavishaychbhari
Leave a Reply Cancel reply