बच्चू कडू यांच्या विरोधामुळं अमरावती मध्ये नवनीत राणा पडतील ? | Amravati Loksabha Election 2024| Bacchu Kadu

लोकसभा निवडकीसाठी महाराष्ट्रातील विविध मतदारसंघातील उमेदवारांची नावं जसजशी जाहीर होत आहेत, तसतसे त्यांचे विरोधक आणि बंडखोरही समोर येत आहेत. त्यामुळे काही जागांवरून, मित्रपक्षांमध्येच कलह निर्माण होताना दिसत आहेत. एकीकडे सांगली लोकसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीमधील शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये राजकीय कुस्ती सुरू झाली आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी महायुतीमध्येही, अनेक ठिकाणी तसंच चित्र दिसतंय. विदर्भात महायुतीच्या जागावाटपामध्ये, कळीच्या ठरलेल्या अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार नवनीत राणा, यांना अखेर भाजपाच्या चिन्हावर उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र भाजपाच्या उमेदवारी यादीमधून, नवनीत राणा यांची उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर, त्यांना तीव्र विरोधाचा सामनाही करावा लागत आहे. नवनीत राणा यांना आपला विरोध असल्याचं सांगत, प्रहारच्या बच्चू कडू यांनी आपण नवनीत राणा यांचा प्रचार करणार नसल्याचं जाहीर केलंय. तर शिवसेना शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ यांनी नवनीत राणा यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघात उमेदवारीवरून महायुतीमधील नेतेच आमने-सामने आल्याने येथील लढत रंगतदार होण्याची शक्यता आहे. सोबतच बच्चू कडूंनी घेतलेल्या भूमिकेमुळे नवनीत राणा यांच्यासाठी ही निवडणूक कमालीची आव्हानात्मक होण्याची शक्यता आहे.

bacchu kadu, navnit rana,

(Amravati Loksabha Election 2024| Bacchu Kadu)

नवनीत राणा यांचा राजकीय प्रवास थोडक्यात पाहायचा झाल्यास आमदार रवी राणा यांच्या पत्नी असलेल्या नवनीत राणा यांनी २०१४ मध्ये पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्या निवडणुकीत नवनीत राणा यांना शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आनंदराव अडसूळ यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. त्या निवडणुकीत आनंदराव अडसूळ यांनी १ लाख ३७ हजार ९३२ मतांनी बाजी मारली होती. मात्र २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांनी या पराभवाची परतफेड केली होती. त्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवत असलेल्या नवनीत राणा यांनी आनंदराव अडसूळ यांना, ३६ हजार ९५१ मतांनी पराभूत केले. मात्र या निवडणुका आटोपल्यानंतर काही काळातच नवनीत राणा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडली. तसेच त्या भाजपाच्या बाजूने आक्रमकपणे बोलू लागल्या. यादरम्यान, या राणा दाम्पत्याने तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचा प्रयत्न केल्याने मोठा वाद झाला होता. मात्र या घटनेमुळे राणा दाम्पत्य भाजपाच्या अधिकच जवळ आले होते. तसेच अमरावतीची लोकसभेची पुढील निवडणूक नवनीत राणा भाजपाकडून लढवतील, अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र याचदरम्यान, राज्यात सत्तापरिवर्तन होऊन राणांचे पारंपरिक विरोधक असलेले अडसूळ पिता-पुत्र शिवसेना शिंदे गटासोबत महायुतीत आले. तर दुसरीकडे बच्चू कडूही महायुतीसोबत आले होते.वर्ष दीड वर्ष किरकोळ वादविवाद झाले असले तरी अमरावती लोकसभा मतदारसंघात सारं काही सुरळीत होतं. मात्र लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागताच लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छूक असलेल्यांसह राणांचे विरोधक सक्रीय झाले. त्यात प्रहारचे बच्चू कडू हे आघाडीवर होते.

(Amravati Loksabha Election 2024| Bacchu Kadu)

नवनीत राणा ह्या भाजपाच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार अशी चर्चा सुरू झाल्यावर, बच्चू कडू यांनी त्यांना विरोध केला. नवनीत राणा यांच्याऐवजी भाजपाने अन्य कुणाला तरी उमेदवारी द्यावी, अशी मागणी कडू यांनी केली होती. मात्र तिची दखल घेतली गेली नाही. तसेच बरेच दिवस खल केल्यानंतर अखेर भाजपानं राणा यांना कमळ चिन्हावर उमेदवारी जाहीर केली.राणा यांना उमेदवारी जाहीर होताच आता महायुतीमध्ये वादाचा विस्फोट झाला. बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांचा प्रचार करणार नसल्याचं ठणकावून सांगितलं आहे. अबकी बार ४०० पार ही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेली घोषणा आहे. एखादी जागा पडली तरी काही फरक पडणार नाही, असे कडू म्हणाले आहेत. तसेच भाजपवरदेखील कडू यांनी टीका केली आहे. भाजपचे कार्यालय फोडणाऱ्याला तिकीट मिळाले, एवढी लाचारी? ज्यांनी शिवीगाळ केली त्यांना तिकीट मिळाले आहे. कोण निवडून येईल यापेक्षा कोणाला पाडायचे हे एकदा निश्चित झाले पाहिजे, त्यासाठी आम्ही कामाला लागलो आहोत, असा इशारा कडू यांनी दिलाय.

bacchu kadu,

(Amravati Loksabha Election 2024| Bacchu Kadu)

बच्चू कडू यांचा विरोध नवनीत राणा यांना चांगलाच महागात पडू शकतो, त्याची काही खास कारणं आहेत ती पुढीलप्रमाणे. अमरावती लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतल्यास येथे भाजपाची तितकीशी ताकद नसल्याचे दिसून येते. या मतदारसंघात रवी राणा हे एकमेव भाजपा समर्थक आमदार आहेत. तर नवनीत राणा यांच्या उमेदवारीला विरोध करणाऱ्या बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्तीचे दोन आमदार आहेत. स्वत: बच्चू कडू हे अचलपूर विधानसभा मतदारसंघातून अनेकदा निवडून आले आहेत.तर मेळघाटमध्येही राजकुमार पटेल हे कडू यांच्याच प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार आहेत. तर दर्यापूर, तिवसा आणि अमरावती मतदारसंघात काँग्रेसचे आमदार आहेत. मागच्या निवडणुकीत अमरावती, तिवसा, दर्यापूर आणि मेळघाट येथून राणा यांना मोठी आघाडी मिळाली होती. मात्र रवी राणा यांचा मतदारसंघ असलेल्या बडनेरा आणि बच्चू कडू यांच्या अचलपूर मतदारसंघामध्ये रवी राणा ह्या पिछाडीवर पडल्या होत्या. त्यामुळे येथील कागदोपत्री आकडेवारीचं समिकरण हे नवनीत राणा यांच्या विरोधात आहे.अमरावती लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतल्यास यावेळी येथील वातावरण हे नवनीत राणा यांना काहीसे प्रतिकूल आहे. अशा परिस्थितीत बच्चू कडू यांच्याकडून होणारा तीव्र विरोध त्यांना परवडणारा नाही. मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये अमरावतील लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या मतदारसंघांमधून बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने तब्बल १ लाख ७६ हजार ७१९ मते मिळवली होती. अचलपूर आणि मेळघाट या दोन मतदारसंघामध्ये बच्चू कडू यांचा बऱ्यापैकी प्रभाव आहे. तसेच इथे कडू यांना मानाणार वर्ग मोठ्या संख्येने असल्याने येथील मतदान हे नवनीत राणा यांच्या विरोधात जाऊ शकते. त्याशिवाय बच्चू कडू यांच्याकडून होत असलेल्या तीव्र विरोधामुळे संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये नवनीत राणा यांच्याविरोधात वातावरण निर्माण होऊ शकतं.

(Amravati Loksabha Election 2024| Bacchu Kadu)

येथे नवनीत राणा यांचा सामना काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्याशी होऊ शकतो. या मतदारसंघात काँग्रेसची ताकद लक्षणीय आहे. वानखडे हे दर्यापूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत. वंचितनेही येथे प्राजक्ता पिल्लेवान यांच्या रूपात उमेदवार दिलाय. तर येथील माजी खासदार असलेल्या आनंदराव अडसूळ, यांचे पुत्र अभिजित अडसूळ यांनीही इथून निवडणूक लढण्याची घोषणा केलीय. आता अभिजित अडसूळ यांची नाराजी दूर न झाल्यास येथील लढत ही चौरंगी होणार आहे. त्यामुळे मतविभाजन अटळ आहे. तसेच राणा दाम्पत्याला धडा शिकवण्यासाठी त्यांचे अडसूळ आणि कडू हे दोन विरोधक एकत्र येऊ शकतात. आता अडसूळ आणि कडू हे एकत्र आल्यास येथील समिकरणं बदलतील हे निश्चित आहे. त्यामुळे येथे होणाऱ्या संभाव्य लढतीत कुणालाही विजयाची लॉटरी लागू शकते.दुसरीकडे नवनीत राणा यांची सर्वाधिक मदार ही बडनेरा विधानसभा मतदारसंघावर असेल. येथून रवी राणा हे किती मताधिक्य मिळवून देतात, यावर पुढची सगळी समिकरणं अवलंबून असतील. त्याबरोबच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाचा प्रभाव मतदारसंघात कितपत पडतो, यावर त्यांचं भवितव्य अवलंबून असेल. मात्र सगळेच विरोधक एकत्र आले तर ही निवडणूक नवनीत राणा यांचा चांगलीच जड जाण्याची शक्यता आहे.आता नवनीत राणा ह्या २०१९ प्रमाणे काही चमत्कार घडवणार का? बच्चू कडूंसह इतर विरोधकांसोबत असलेले वाद मिटून ते राणा यांना मदत करणार का? याबाबत तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा.

(Amravati Loksabha Election 2024| Bacchu Kadu)

हे विषयच भारी वाचलेस का भावा !

या ५ जागांवर भाजपच्या रागापोटी शिंदेचे नेते ठाकरेंना मदत करतील ? | Loksabha Election 2024 News| Vishaych Bhariजातीचं हे गणित जुळलं तरच Praniti Shinde सोलापूरच्या खासदार होतील ? | Solapur Loksabha Election 2024|Vishaych Bhariया ५ नेत्यांमुळे कल्याणमधून श्रीकांत शिंदे पडतील | Kalyan Loksabha | Shrikant Shinde |Vishaych Bhariवंचित बहुजन आघाडी व जरांगे पाटील यांच्या आघाडीमुळे मविआला फटका बसणार ? | Prakash Ambedkar News|Vanchit Bahujan Aghadi

बच्चू कडू यांच्या विरोधामुळं अमरावती मध्ये नवनीत राणा पडतील ? | Amravati Loksabha Election 2024| Bacchu Kadu

Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇

https://www.facebook.com/vishaychbhari

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *