उद्धव ठाकरे यांनी उमेदवार फायनल केले पण आता भांडणे वाढतील |Uddhav Thackeray | Loksabha Election 2024 News


मंडळी मविआतील घटक पक्षांशी बराच काळ वाटाघाटी आणि चर्चा केल्यानंतर आज अखेर ठाकरे गटानं थेट त्यांच्या १७ जागावरील उमेदवारांची नावं घोषित करून टाकली. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ती यादी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केली आणि उमेदवारांची माहिती दिली. संजय राऊत यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिलंय की, हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानं आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानं शिवसेनेच्या १७ लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यास येत आहे. त्यासोबतचं त्यांनी मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघातून अनिल देसाई यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात येत आहे, असं ट्विट केलं. यादीतली नावं पाहता ठाकरे गटानं आपल्यासोबत असलेल्या विद्यमान आमदारांची उमेदवारी कायम ठेवलीय. तर मागच्यावेळी जिंकलेल्या आणि काही नव्या लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचीही घोषणा केलीय. नेमकं कुणाकुणाची ठाकरे गटाकडून उमेदवारीसाठी वर्णी लागलीये, त्याचा त्या त्या मतदारसंघात काय परिणाम होऊ शकतो, मविआतील इतर मित्रपक्षाची तिथं काय भूमिका असू शकते त्याचा घेतलेला आहे सविस्तर थोडक्यात आढावा

uddhav thakeray,

(Uddhav Thackeray | Loksabha Election 2024 News)

मंडळी एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली होती. त्यानंतर १३ खासदार हे शिंदे गटात गेले होते. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला होता. या खासदारांची गद्दार अशी संभावना करत उद्धव ठाकरे यांनी त्यांचा पराभव करण्याची गर्जना केली होती. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाकडून या मतदारसंघांमध्ये कुणाला उमेदवारी देण्यात येते याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली होती. आता आपण एक एक करून ते मतदारसंघ आणि उमेदवारांची नावं जाणून घेऊ सर्वात पहिला आहे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ. त्या मतदारसंघात ठाकरेंकडून अरविंद सावंत यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर झालीये. ठाकरे गटाचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात अरविंद सावंत यांनी २०१४ आणि २०१९ असा दोन वेळा विजय मिळवला आहे. २०१९ मध्ये त्यांनी काँग्रेसच्या मिलिंद देवरा यांचा एक लाख मतांनी पराभव केला होता. तर आता तिसऱ्यांदा निवडणूक जिंकून विजयाची हॅटट्रिक करण्याचा त्यांचा इरादा आहे. मात्र पक्षात पडलेली फूट आणि मिलिंद देवरा यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेला असल्यानं अरविंद सावंत यांना कडव्या आव्हानाचा सामना करावा लागू शकतो.

(Uddhav Thackeray | Loksabha Election 2024 News)

त्यानंतर दुसरा लोकसभा मतदारसंघ आहे ठाणे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाण्यामधील शिवसेनेचे अनेक पदाधिकारी एकनाथ शिंदेंसोबत गेले होते. मात्र ठाणे लोकसभा मतदारसंघातील सेना खासदार राजन विचारे यांनी मात्र उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहणे पसंत केलं होतं. आता ठाकरे गटानं ठाण्यातून राजन विचारे यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आलीये..राजन विचारे हे २०१४ आणि २०१९ असे दोन वेळा लोकसभेवर निवडून गेले आहेत. २०१९ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आनंद परांजपे यांचा ४ लाख १२ हजार एवढ्या मोठ्या मताधिक्याने पराभव केला होता. मात्र आता हा मतदारसंघ विचारेंसाठी काहीसा अवघड झालेला आहे. येथे भाजपाचे चार आमदार आहेत. तर शिवसेना शिंदे गटाचे २ आमदार आहेत. एकनाथ शिंदे यांचाही या मतदारसंघात प्रभाव आहे. त्यामुळे येथील लढत अटीतटीची होण्याची शक्यता आहे.तिसरा लोकसभा मतदारसंघ आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग. शिवसेना ठाकरे गटाने कोकणातील या मतदारसंघामध्ये विनायक राऊत यांनाचं पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर केलीये. विनायक राऊत यांनी या भागातील नारायण राणेंचं वर्चस्व मोडीत काढत सलग दोन लोकसभा निवडणुकांमध्ये विजय मिळवलेला आहे. मागच्या निवडणुकीत विनायक राऊत यांनी नारायण राणेंचे पुत्र निलेश राणे यांचा १ लाख ७८ हजार मतांनी दारुण पराभव केला होता. सद्यस्थितीत शिवसेनेतील फुटीमुळे येथे चुरस निर्माण झालीय. तिथं भाजपकडून राणे कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी दिली जाऊ शकते अशी चर्चा आहे.

vinayak raut,

(Uddhav Thackeray | Loksabha Election 2024 News)

पुढं चौथा लोकसभा मतदारसंघ आहे मराठवाड्यातील धाराशिव. या लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटानं पुन्हा एकदा ओमराजे निंबाळकर यांच्यावरच विश्वास टाकलाय. ओमराजे यांनी २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राणा जगजीत सिंह पाटील यांचा १ लाख २७ हजार मतांनी पराभव केला होता. पण आता राणा जगजीतसिंह हे भाजपमध्ये गेलेत आणि तेचं ओमराजेंविरोधात भाजपकडून संभाव्य उमेदवार असतील किंवा मग ऐनवेळी भाजप त्यांना अजितदादा गटाकडून तिथं लढायला सांगू शकतं अशा चर्चा आहेत. तीन जिल्ह्यांत विभागलेल्या या मतदारसंघात भाजपाचे २ आणि भाजपा समर्थक १ अपक्ष उमेदवार आहे. तर शिवसेना शिंदे गटाचे २ आणि ठाकरे गटाचा एक आमदार आहे. ओमराजेंची लोकप्रियता तिथं मोठी असली तरी लढाई अटीतटीची होणार हे नक्की.त्यानंतर पाचवा लोकसभा मतदारसंघय परभणी. परभणीतून शिवसेना ठाकरे गटानं तिथले विद्यमान खासदार संजय जाधव यांनाचं उमेदवारी जाहीर केलीये . संजय जाधव यांनी २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये विजय मिळवलेला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत संजय जाधव यांनी अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेश विटेकर यांचा पराभव केला होता. त्यावेळी वंचितने केलेलं मतविभाजन संजय जाधव यांच्या विजयात महत्त्वाचं ठरलं होतं.दरम्यान, यावेळच्या लोकसभा निवडणुकीत अखेरच्या क्षणी वंचित काय भूमिका घेते, त्यावर पुढील समिकरणं अवलंबून असतील. यंदाही अजितदादा गटानं परभणीवर दावा केलेला असून राजेश विटेकर किंवा भाजपच्या वाट्याला ती जागा आल्यास महादेव जानकर तिथं संजय जाधव यांना आव्हान देताना दिसू शकतात.

(Uddhav Thackeray | Loksabha Election 2024 News)

पुढं सहावा लोकसभा मतदारसंघ आहे दक्षिण मध्य मुंबई. या मतदारसंघात ठाकरेंकडून अनिल देसाई यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीये. अनिल देसाई हे प्रथमच लोकसभा निवडणूक लढवत आहेत. त्यांचा सामना शिवसेना शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळे यांच्याशी होण्याची शक्यता आहे. त्या मतदारसंघामध्ये भाजपाचे दोन तर शिंदे गटाचा एक आमदार आहे. तर ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा प्रत्येकी एक आमदार आहे. संमिश्र लोकसवस्ती आणि राजकीय प्रवाह असलेल्या या मतदारसंघामध्ये अटीतटीच्या लढतीची शक्यता आहे.पुढं सातवा लोकसभा मतदारसंघ आहे मुंबई उत्तर पूर्व. या मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटानं माजी खासदार संजय दिना पाटील यांच्या खांद्यावर जबाबदारी टाकण्याचं निश्चित केलंय. मागच्या दोन निवडणुकांमध्ये तिथं भाजपाचे खासदार निवडून आले आहेत. पण त्या मतदारसंघात मराठी, गुजराती आणि मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय आहे. तिथून भाजपानं मिहिर कोटेचा यांना उमेदवारी दिलीय. दरम्यान संजय दिना पाटील हेयांच्या उमेदवारीमुळं तिथं मराठी विरुद्ध परभाषिक असं मतविभाजन होऊ शकतं. तिथं भाजपाचे तीन, शिवसेना ठाकरे गटाचे दोन आणि समाजवादी पक्षाचा एक आमदार आहे. त्यामुळे येथे कुठली समिकरणं जुळतात, यावर जय पराजयाचं गणित अवलंबून असेल.

sanjay dina patil,

(Uddhav Thackeray | Loksabha Election 2024 News)

त्यानंतर आठवा लोकसभा मतदारसंघ आहे तर मुंबई उत्तर पश्चिम. या मतदारसंघातून उद्धव ठाकरेंनी गजानन कीर्तीकर यांचे सुपुत्र अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. अमोल कीर्तिकर यांच्या उमेदवारीमुळे सध्या शिंदे गटात असलेले विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर हे माघार घेण्याची शक्यता वर्तवली जातीये. हा मतदारसंघ महायुतीमध्ये कुणाच्या वाट्याला जाईल हे अद्याप निश्चित झालेले नाही. या मतदारसंघात भाजपाचे ३ आमदार आहेत. तर शिवसेना ठाकरे गटाचे २ आणि शिंदे गटाचा एक आमदार आहे. या भागात ठाकरेंचा चांगला प्रभाव आहे. त्यामुळे येथील लढत अटीतटीची होण्याची शक्यता आहे.पुढं नववा लोकसभा मतदारसंघय रायगड. त्या लोकसभा मतदारसंघात मागच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांना पराभव पत्करावा लागला होता. दरम्यान, पक्षातील फुटीनंतरही ज्येष्ठ नेते असलेले अनंत गीते हे ठाकरे गटासोबत राहिले असून, त्यांना पुन्हा एकदा रायगड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. मागच्या दोन निवडणुकांप्रमाणेच यावेळीही अनंत गीते यांची लढत सुनील तटकरे यांच्याशी होणार आहे. कारण महायुतीत रायगडची जागा अजितदादाला मिळाली असून सुनील तटकरे हेच तिथून निवडणूक लढवणार आहेत. आता मागच्या निवडणुकीत झालेल्या निसटत्या पराभवाचा वचपा काढण्याचा अनंत गीते यांचा प्रयत्न असेल.

(Uddhav Thackeray | Loksabha Election 2024 News)

त्यानंतर दहावा लोकसभा मतदारसंघ आहे सांगली. आता हा मतदारसंघ आणि तिथल्या गुंतागुंतीची परिस्थितीय. सध्या जाहीर झालेल्या यादीत ठाकरेंनी जरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली असली तरी सांगलीच्या उमेदवारीवरून मविआत तणाव निर्माण झालेला आहे. परंपरागत मतदारसंघ म्हणून काँग्रेसला तो मतदारसंघ हवाय. पण उद्धव ठाकरे यांनी आता तिथून थेट चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर करून टाकली आहे. पण काँग्रेस सांगलीची जागा सोडायला तयार नसून आता जयंत पाटील यांच्या मध्यस्थीनंतर सांगलीच्या जागेच्या बदल्यात हातकंणगलेची जागा ठाकरेंना सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं कळतंय. त्यामुळं एका बाजूला सांगलीमध्ये काँग्रेसकडून विशाल पाटील यांचा रस्ता मोकळा झाल्याच्या चर्चा आहेत तर दुसऱ्या बाजूला चंद्रहार पाटील यांच्या गोटात उत्साहाचं वातावरण आहे. पण जर सांगलीच्या बदल्यात ठाकरेंना खरंच हातकणंगलेची जागा मिळाली तर स्वाभिमानीचे राजू शेट्टी तिथं उमेदवार असणार की मग त्यांनी मविआसोबत येण्यास नकार दिला तर ठाकरेंकडून दुसऱ्या नावांचा ही विचार करण्यात येईल याबद्दल चर्चासत्र सुरू आहेत.पुढं अकरावा लोकसभा मतदारसंघ आहे छत्रपती संभाजीनगर. या लोकसभा मतदारसंघात ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीये. पण आता त्यानंतर ठाकरे गटाकडून इच्छुक असलेले अंबादास दानवे हे नेमकी काय भूमिका घेणार याकडं सगळ्यांचं लक्ष लागलंय. त्या मतदारसंघातून सलग ४ वेळा निवडून आलेल्या चंद्रकांत खैरे यांना २०१९ च्या निवडणुकीत निसटता पराभव पत्करावा लागला होता. त्या निवडणुकीत तीन उमेदवारांमध्ये झालेल्या लढतीत अपक्ष हर्षवर्धन जाधव यांनी घेतलेल्या लक्षणीय मतांमुळे खैरे यांचा पराभव झाला होता. सद्यस्थितीत या मतदारसंघात भाजपाचे २, शिंदे गटाचे ३ आणि ठाकरे गटाचा एक आमदार आहे. त्यामुळे येथे वातावरण बाजूने असले तरी विजय मिळवण्यासाठी खैरेंना कष्ट घ्यावे लागणार आहेत. तिथं त्यांना एमआयएमचे इम्तियाज जलील आणि भाजपच्या उमेदवाराशी दोन हात करावे लागू शकतात.

chandrakant khaire,

(Uddhav Thackeray | Loksabha Election 2024 News)

त्यानंतर बारावा लोकसभा मतदारसंघ आहे मावळ. या मतदारसंघामध्ये शिवसेना ठाकरे गटाने संजोग वाघोरे यांना उमेदवारी जाहीर केलीये. संजोग वाघोरे हे काही महिन्यांपूर्वीच अजित पवार गटातून ठाकरे गटात आले होते. तेव्हाच त्यांना मावळ मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी मिळेल हे निश्चित झाले. या मतदारसंघात महायुतीचा उमेदवार अद्याप निश्चित झालेले नाही. मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपाचे २, भाजपा समर्थक अपक्ष १, शिवसेना शिंदे गट १ आणि अजित पवार गटाचे २ आमदार आहेत. त्यामुळे येथील राजकीय बलाबल हे महायुतीच्या बाजूने आहे. मात्र शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे एकत्र असल्याने येथील समिकरणं बदलू शकतात. मावळचे शिंदे गटाचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्याशी संजोग वाघेरे यांची कडवी झुंज होऊ शकते.त्यानंतर तेरावा लोकसभा मतदारसंघ आहे शिर्डी. अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे गटानं माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी जाहीर केलीय. या मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचा एक आमदार आहे. तर काँग्रेसचे दोन, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आणि भाजपाचा एक आमदार आहे.त्यामुळे येथे लढत देण्यासाठी ठाकरे गटाला आणि त्यांच्या उमेदवाराला काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या मदतीवर अवलंबून राहावे लागणार आहे. याउपर तर हेच संभाव्य उमेदवार ठाकरे गटाकडून आगामी लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरतील असं बोललं जातंय. शिर्डीत शिंदेकडून सदाशिव लोखंडे यांनाचं पुन्हा उमेदवारी देण्यात आल्यानं वाकचौरे विरुद्ध लोखंडे हा सामना तिथं रंगणारय.

(Uddhav Thackeray | Loksabha Election 2024 News)

पुढं चौदावा लोकसभा मतदारसंघ आहे बुलढाणा. तिथं ठाकरेंकडून नरेंद्र खेडेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय. बुलढाण्यात शिवसेनेची ताकद चांगली आहे..पण गंमत म्हणजे बुलढाण्याच्या जागेसाठी काँग्रेस सुद्धा खूप आग्रही आहे. काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून नरेंद्र खेडेकर यांच्या नावाला विरोध दर्शवण्यात येतोय. तर बुलढाणा लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसला सोडवून घ्या व माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांना तिथं उमेदवारी द्या, या मागणीसाठी गेल्या २४ मार्चला काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी नागपूरला पोहोचून प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची भेट घेतल्याचं कळतंय. दरम्यान आता ठाकरे आणि काँग्रेस बुलढाण्याच्या जागेचा तिढा कसा सोडवणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणारय.पुढं पंधरावा लोकसभा मतदारसंघ आहे यवतमाळ वाशीम. तिथं ठाकरेंनी मागच्या काही दिवसात सगळ्यात जास्त लक्ष दिलं असून संजय देशमुख यांच्या प्रचारासाठी तब्बल 6 सभा सुद्धा घेतल्यात त्यामुळं संजय देशमुख यांच्याचं नावावर ठाकरेंनी शिक्कामोर्तब केलंय. यवतमाळ वाशीम हा खरं तर शिवसेनेचा बालेकिल्ला. त्या मतदारसंघात भावना गवळी विद्यमान खासदार असून महायुतीकडून त्यांचा पत्ता कट होणारय अशा चर्चा आहेत. तिथं महायुतीकडून संजय राठोड यांच्या नावाची वर्णी लागण्याची चिन्हे आहेत. त्यामुळं आता ठाकरेंचे संजय देशमुख विरुद्ध शिंदेचे संजय राठोड अशीच लढाई यवतमाळ वाशीममध्ये होणारय. पण खरं तर त्या जागेवर  काँग्रेसचा दावा अजून कायम आहे.

sanjay deshmukh,

(Uddhav Thackeray | Loksabha Election 2024 News)

त्यानंतर सोळावा लोकसभा मतदारसंघ आहे हिंगोली. या मतदारसंघात नागेश पाटील आष्टेकर यांना ठाकरेंकडून संधी देण्यात आलीये. खासदार हेमंत पाटील यांना टक्कर देऊ शकणारे उमेदवार म्हणून त्यांचा मतदारसंघात बोलबालाय. त्यांनी मागच्या काही काळापासून मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर मोर्चेबांधणीला सुरुवात केलीये. आता शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर आणि नागेश पाटील यांच्यात रंगलेलं वाकयुद्ध चर्चेचा विषय ठरला होता. विधानसभा मतदारसंघ निहाय आढावा घेतला तर हिंगोलीतली लढाई अटीतटीची होण्याची चिन्हे आहेत.आता सर्वात शेवटचा लोकसभा मतदारसंघ आहे नाशिक. नाशिकमध्ये सध्या शिंदे गटाचे हेमंत गोडसे विद्यमान खासदार आहेत. मतदारसंघातली शिवसेनेची ताकद पाहता ठाकरे पहिल्यापासून नाशिकच्या जागेसाठी आग्रही होते पण त्यांच्याकडं ताकदीचा उमेदवार नव्हता. त्यामुळं शरद पवारांनी देखील तिथं चाचपणी सुरू ठेवली होती. पुढं पवार आणि संजय राऊत यांनी एकत्रितपणे नाशिकचा दौरा केला. तेव्हा सिन्नरचे माजी आमदार आणि शिवसेनेचे नेते राजाभाऊ वाजे व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांची गाठ घेतली. राऊत यांनी शिवसेनेकडे नाशिकसाठी तीन ते चार उमेदवार आहेत असं सांगितलं होतं पण शिवसेनेने केलेल्या अंतर्गत सर्व्हेमध्ये सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांची मतदारसंघात चांगली इमेज असल्याचं समोर आलं होतं. त्यामुळं आता शेवटी राजाभाऊ वाजे यांच्या नावावर ठाकरेंकडून शिक्कामोर्तब करण्यात आलंय. दुसरीकडं महायुतीत भाजप आणि शिंदे गटात नाशिकच्या जागेवरून जोरदार रस्सीखेच सुरूय. हेमंत गोडसेंची उमेदवारी धोक्यात आहे. तर या 17 जागावर ठाकरेंकडून उमेदवार जाहीर करण्यात आले असून अजून, कल्याण, जळगाव, पालघर, हातकणंगले, उत्तर मुंबई या जागांवरचा तिढा कायम आहे.पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय यापैकी किती उमेदवार महायुतीच्या उमेदवारांना टफ फाईट देऊ शकतील, यंदा लोकसभेला ठाकरेंचे यापैकी किती उमेदवार निवडून येऊ शकतात, तुमची मतं आम्हांला कमेंट करून नक्की सांगा.

(Uddhav Thackeray | Loksabha Election 2024 News)

हे विषयच भारी वाचलेस का भावा !

वंचित बहुजन आघाडी व जरांगे पाटील यांच्या आघाडीमुळे मविआला फटका बसणार ? | Prakash Ambedkar News|Vanchit Bahujan Aghadiतुकाराम महाराजांचा खरंच खून झाला होता का | Sant Tukaram Beej | Sant Tukaram Maharaj Death | Vishaych Bhari२ ठरले, अजून या ३ जागांवर अजितदादांचे फिक्स उमेदवार कोण ? | Loksabha Election 2024 | Ajit Pawar Newsदेवेंद्र फडणवीस आणि Shinde मिळून Ajit Pawar यांची गेम करतायत का ? | Latest Marathi News | Vishaych Bhari

उद्धव ठाकरे यांनी उमेदवार फायनल केले पण आता भांडणे वाढतील |Uddhav Thackeray | Loksabha Election 2024 News

Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇

https://www.facebook.com/vishaychbhari

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *